या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday 19 August 2011

पठ्ठी

   ''मरण येत नाही, म्हणून जगतेय!'' असे वाक्य अनेकांच्या तोंडी येत. खरोखर ते हतबल असतात का ? जगणं इतकं अवघड असू शकतं ? तसं पाहिलं तर कितीसं दु:ख आपण सहन करत असतो! कदाचित हो कदाचित नाही! दु:ख असताना मृत्यू कवटाळंण जितकं सोपं तितकं ते पार करून जाण अवघड! आणि ज्याला अवघडाची आस तो माणूस! मग आपण माणूसपण कस सोडू शकतो ? ज्या स्रिया पोटच्या पिलाला आपल्याबरोबर बळी द्यायला तयार होतात त्यांच्यासाठी............
     मळलेले कपडे पण वास न येणारे, केस विंचरलेले चेहरा काळाच पण धुतलेला, पदर खांद्यावर पण पूर्ण छाती पूर्णपणे न झाकणारा, मांडीवरची पोर साधारण पाच सहा महिन्याची. जवळच पाच वर्षाची दुसरी पोर. ''नंबर आला तुमचा चला ताई'' गडबडीने उठून आत केबिन मध्ये गेली. डॉक्टरांनी तपासून औषधे लिहून दिली अन ती बाहेर आली. ''औषध निम्मीच का आणलीत ताई?'' ''पैसा कमी हाय'' ''मग डॉक्टरांना सांगा'' ती परत आत गेली. 
     ''सगळी औषध घेतली नाहीस तर तुझ बाळ कस नीट होणार ताई? आधीच ते जास्त आजारी आहे, त्याला औषध लागतीलच.'' डॉक्टर.
     ''काय करू ताई, आठ दिसाच खाय प्यायचं सामान  भरून जे बाकी राह्यलं तेच्यामंदी हीच औषध आली''  
     ''तुझा नवरा कुठाय, बोलव त्याला'' 
     ''ताई हि पोरगी झाली त्यो मला सोडून गेला दुसरी बाई घेऊन, मी बा जवळ हाय तिथबी साव्तर आय हाय, उसतोडीच काम त्येंच्या संग करते, ती म्हणती दवा पाण्याला कुठून पैसा देऊ तीन पोर आन चौथी मी त्ये खायला तरी किती जनस्नी देणार आन त्यावर दवा म्हंजी लई झाल. आठ दिस झाल पोर आजारी हाय, आज पैस दिलं म्हणून आले.'' 
       डॉक्टरांना कससच झाल नि त्यांनी त्यांच्या जवळची औषधे त्या बाईला दिली.
    ''फी देऊ नको बाहेर मी सांगते त्यांना.''
    ''लई उपकार झाल ताई''
    ''मुलींच्या शिक्षणाचं काय'' दयेपोटी डॉक्टरांनी चौकशी केली.
    '' त्ये कस जमल ताई? आमी आठ नऊ महीन इकडच असतु. माझ्या या मोठ्या पोरीला आश्रम शाळेत घेतील काव ताई?''
    ''घेतील ना ती सहा वर्षाची होऊ दे नंतर टाक आश्रम शाळेत.''
     ती बाहेर गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात डॉक्टर म्हणाले ''पाठ थोपटली पाहिजे पठ्ठीची! अवघडलेल जगण तिनी सोप केलय!''   

Wednesday 10 August 2011

मनात रुतलेले क्षण


 
        '' आई गं '' आनंद असो वा वेदना हे दोन शब्द ज्याच्या ओठी येत 
नसतील असा माणूस विरळ. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात मोठी जागा 
कुणाची असेल तर ती आईची! प्रत्येक सुखाची पायरी आईपासून सुरु 
होते आणि दु:खाचा शेवट आईपाशी होतो. मनाच्या कुठल्या कोपर्यात 
दडली आहे इतर वेळी समजणार नाही पण सुख-दु:खाच्या वेळी ''आई गं '' 
हे दोन शब्द जिव्हेला कधी सजवून गेले ते कळतच नाही. आईबद्दल 
लिहिण्यासाठी शब्द जरी अपुरे नसतील तरी वेळ मात्र अपुरी आहे .(आत्ता तरी )       
        पायात रुतलेला काटा जसा घर करून जसा घर करून जातो तसे मनाला रुतलेला क्षणहि तसाच . पायाच कुरूप कमीत कमी भरून निघत, औषधउपचारांनी बरही होतं पण मनाची ती वेदना अचानक उद्भवली की.......
       त्या दिवशी mathचा तास संपायला उशीर झाला पळतच प्रयोगशाळेत गेले सगळेजण आले होते पण सर् अजून दिसत नव्हते. हायस वाटलं. सगळ्या मुली टेबलाजवळ बसलो. माधुरी कुठाय म्हणेपर्यंत धावत येणाऱ्या बाईसाहेब दिसल्या ''आई गं '' नेहीमिप्रमाणे ठेचाळली. ''लागल नाही ना'' नेहमीची सर्वांची प्रतिक्रिया! बर तरी हिच्या आई आमच्याच शाळेत होत्या!
     ''ये खरच आई किती नकळत येत ना?''इति सारिका.
     ''स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,'' उमा.
     '' कुणाची आई कितीही वाईट असुदे मुलांसाठी ती सर्वस्व असते,'' मोहिनी.
     ''माझी आई जीवाची सखी,'' वैशाली.
    ''हमारी अम्मी की तो बातही अलग अम्मी की जान है हम,'' शबाना.
    ''माझ्या सर्व समस्यांच समाधान आहे आई,'' मी
    दीपा मात्र तोंड लपून बसलेली. सारीकाने  हलवलं पोरीच्या डोळ्यात पाणी! सगळ्यांच्या नजरा दिपावर खिळल्या. कुणाला अर्थबोध होत नव्हता.नेहमी जिच्या चेहऱ्यावर हास्य विलसत असतं ती दीपा आज रडत होती सर्वजनी आश्चर्याने बघत होत्या. तिने मनसोक्त रडून घेतल चेहरा लालबुंद झाला. हुसमरत ती बोलली ................
    ''मला आईच नाही गं!'' 

Wednesday 3 August 2011

वागीन

          ''आये ये आये, सांग ना बापूला मला बी ताईच्या वाणी साळत जायच हाय.''     
          '' आगं पर ती मालकाची पोर हाय, आपून गरीब माणसं सकाळच्याला खाललं तर रात्तच्याला मीळना!''     
          '' ती कवी जाती की ती कुठ लई तालेवाराची लेक हाय.''      
          '' नकु वाद घालू बग माज्यासंगं, उरिक लवकर दुगिनी चार पुती शेंगा काडल्या त चार घम्याली मिळत्यान.''       
            गावात सातविपतुरच शाळा हुती. संगीला तवर शिकावनं बापूला जमलं पण आता इस्टीनि तालुक्याला धाडायच म्हंजी सोपं नव्हत्. त्याला बी वाटायचं पर वाटत् तसं सगळ थोडच हुतं. संगी तशी कळाय लागलं तशी हुशार! कदी तिनी खेळ अन खाण्याचा हट्ट केला नव्हता. जी आसन ती भावंडासनी देणार राहिल तर घेणार. साळत बी नापास कवा झाली नाय. शाळा चालू झाल्याल्या महिना झाला रोज संगी आईला तेच सांगायची. ताराबाईचा नाईलाज हुता.       
            संगी दिसाया निटास, सरळ लांब नाक, कामानिवानी भुवया, तपकिरी डोळ् उभाट चेहरा! उंची कमीच पर पोर बघताच मनात भरणारी! कामाला वागीण जी सांगनार ती काम केलच बगा. सातवीची शाळा बंद झाली न आईनी तिला रानातल्या कामाला न्यायाची चालू झाली. कामाच्या बाया बी सांगायच्या संगीच्या आईला धाड तिला साळला पर संगीच्या आयेची काळजी येगळी हुती आसली देखणी पोर काय बाय येडं वंगाळ झालं म्हंजी? मायचं ती!
            कामाला जायच्या अगुदार शिळीला गवात आणायला संगीच जायाची आईला बी घरातल काम उरकुस्तवर जायाची वेळ व्हायाची. संगीला उशीर झाला घाईतच पळली मालकाच्या ऊसाचा बांध काय नवीन नव्हता. गवतात पाय आडाकला फुड सापदिशी मोठ्या काळ्या दगडाव पडणार की इक्रमनी तिचा हात धरला. दोग धापदिशी माग उसाच्या कटाला पडली.इक्रम्नी तिला लागून दिल नाय  अंगावरच झेलली. तिला काय बी कळायच्या आत त्यान तिला उसात ओढली.
            जागी झाली तवा सगळ्या आंगातून कळा निगल्या आये म्हणायला तोंडातनं सबुद निगणं आवगड झाल्त आयच्या मांडीवरच डोक उचलता उचलत नव्हत आयकड बघितलं डोल्यास्नी लागलेल्या धारा थाबायचं नावच घीनात थोडा जीव शांत झाला. आयेचा आधार घेत उठली पायापातूर रगात बघितलं न तिला काय झालं अंदाज इना निट पायल जी मोटा हंबरडा फोडला कुणाला म्हणूनश्यान ती आवरणा. आई बापू कपाळाला हात लाऊन बसली. गरीब बिचारी आणिक काय करणार हुती!
            पंधरा दिस झालं पर संगी काय हातरून सोडना. कुणी बोलाया लागल तर डोळ्यातून पाणी काढण्यापरीस दुसर काय बी करत न्हवती. डोक्यातून जात न्हव्हत् इक्रमदादान आस कामुन्श्यान करावा. ताई तर सांगायची आपून सगळी बहिण भावंड म्हणून!
           '' संगे, बग कोण आलं हाय, आता तरी बुलशील न्हव''
            ताई आत आली न संगी उठून तिच्या गळा पडून रडाय लागली. सगळी घटना संगीनं ताईसनी सांगितली. तशी रागान लाल झालेली ताई उठून उभी राह्यली,''संगे उगाच दादाच नाव घेऊ नगस, तुमा लोकास्नी खाया घालायचं न तुमी इनाकरण आमची बदनामी नग करूस.''
            कालवा ऐकून संगीची आय आत आली. आज पहिल्यांदाच सगल्यास्नी करणाऱ्याच्या नावाचा उलगाडा झाला पर आईन संगीच्या तोंडावर हात ठिवला. आंजरून गोंजरून निट समजावल. संगीच्या डोक्यात मातूर इक्रम आन ताईसाठी नुसता राग नव्हता तर आग व्हती.
          ''आग संगे घरात बसूनस्यान याड लागल तुला, काम नग करू पर रानात गेल्याव मन तरी रमल.''
          बळ बळ आज आईन तिला बाहेर काढली. रानात गेल्याव गप् बसल ती संगी कसली. मोकळ्या हवत तीच मन बी जरा मोकळ झालं. हातात खुरपं घेऊन ती बी कामाला लागली. आज परत पहिल्यावाणी समद्या बायांच्या फुडं. ताराबाईचा जीव इतक्या दिस उडाला व्हता. फुडं फुडं सरनाऱ्या संगीला बघून तीच डोळ काठापातूर वल व्हयाचं नी परत खुरप्याखालच तन बघत  मातीत मिसाळून जायचं ! 

          '' संगे आग संगे बग तुजी शिळी सुटली पळ लवकर''
          संगी खुरप टाकून धावली. मुकं जनवार दावं सुटल्यावर सगळ्या दिशा त्याच्याच की पिसाटासारखाच उधाळनार बगा. संगी धापा टाकीत बायांपासून लांबवर आली. जोराच्या वाऱ्याला बी आताच टायम गावला वय. ह्या शिळीला आता आशी मारल ना मनाचा नुसता चरफडा होत हुता. ''काय संगे बराय ना, मग काय चाललय आता कवा पडायचं आमच्या अंगावर? चल की आता'' हसत हसत इक्रम एकदम पुढ उभा ठाकला  संगीच्या सगळ्या अंगात दारारून मुंग्या आल्या रेखीव कपाळावर घामाच थेंब गोळा झालं हातपाय धरणीला धरीनात. ''संगे आग संगे काय झालं ग पळाया''  कमळामावशीच्या आवाजानी तीच धडधडणार काळीज थोड हालक झालं. माग बगीतल परत वळूस्तवर जसा आला तसा इक्रम गायब बी झाला. संगीन घाम पुसला नी कमळामावशीच्या मागणं चालू  लागली. 
          आता तिला हे रोजच झालं. एकटी दिसली की तिला गाठायचा नी वाईट वाकड बोलायचा. माणूस तरी सारक कवर जवळ राह्यच. तिच्या डोक्यातल्या आग मातूर आता तिच्याहि आवरन्यापलीकडे गेली . ह्या इक्रमनी मला डागाळली तरी त्याच मन भरना माजा जीव बी घेणार हाय का आता? आईला सांगावा तर ती बी गप् बस म्हणल. ह्याला धडा शिकवायला पायजेनच. पर त्याला शिव्या देऊन्बी लाज वाटणा. परत कुत्र्यासारका माग पुड हायच.
         ह्या वाऱ्याला काय मरी आली उठल्यापासून भना भना करतुया. आईलाबी ना कवा टायमात काम उरकायला जमल नाय. बाया न्ह्यारिला यीतील तरी हि घरची हलायची नाय. बस तशीच मी जात्ये आता! कवा कडवळ कापून व्हायचं परत खुरपायला बी जायचं हाय.   
इळयाला धार लावली झपा झपा पावलं टाकीत निगाली कडवाळाच्या रानात. भर भर  विळा चालू लागला निम्मा वाफा झाला नी मागण कवळ कमरेला पडली. झिडकारल तरी कवळ काय सुटना. तीन इक्रमचा स्पर्श वळाकला तिच्या डोक्यातली आग भडकली खापदिसी काय कळायच्या आत तीन इळा त्याच्या हाताव मारला. आज ह्याला नाय सोडणार! कमरची मिठी सैल झाली हात दाबीत त्यो खाली वाकला न संगीन सपा सपा इळयांनी जमल तिथ वार केला. रगताच्या चिळकांडया उडून तीच त्वांड लाल झालं पर ती थांबायच नाव घेत नव्हती. इक्रामच्या आरोळ्या ऐकून समदी कामाची मजूर पळत आल एकान संगीचा हात धरला न इळा काडून घेतला इक्रामच धड निपचित वाफ्यात पडल आन संगी आरडत व्हती.
                            '' वागीन हाय वागीन, त्या कुत्र्यासारका मागून वार करीत नाय फुडून चिरते!''