या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 3 December 2014

मुंगसा मुंगसा ...

आज सकाळी थंडीने कुडकुडत होता तरी सत्योम जास्तच बोलत होता . बोलले तर तो थांबतच नाही आणि नाही बोलले तर मग शंकित होतो आणि सारखा विचारत राहतो .. ‘का ग मम्मी तू रागावलीस का ?’ म्हणून मग बोलावेच लागते . आज त्याला काय आठवले माहित नाही पण अचानक मुंगसाची आठवण झाली . तो अर्धवट वाक्य बोलत होता . मुंगसा ...काहीतरी असेच .
 त्यावरून माझे मन अचानक भूतकाळात भटकंती करू लागले . तसे आमचे सर्व भावंडाचे बालपण खूप आनंदात गेले . शेतकरी तरी सुसंकृत आणि आर्थिक दृष्ट्या सर्वसाधारण म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला जन्म ..तसे काही कमी नाही आणि अवांतर जास्त पण मिळत नव्हते . प्राथमिक गरजा तेव्हढ्या पूर्ण होत . आमचे आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ जेंव्हा वेगळे झाले तेंव्हा ते सर्व गाव सोडून रानात राहू लागले . रानही जवळच्या कर्जत बहिरोबावाडी रस्त्यावर .. म्हणून मग वाडीतून कर्जतला जाताना रोडच्या दोन्ही बाजूला त्यांनी घरे बांधली . वाडीचे अंतर एक ते दीड किमी आणि कर्जत पाच किमी . आम्ही सातवीपर्यंत वाडीच्या केंद्रशाळेत जात असू . तीन चार घरची मुले म्हणजे बराच मोठा ग्रुप तयार होई . कुणी लहान कुणी मोठे ...सगळ्यात मोठे जे कुणी असेल ते ग्रुप चे नेतृत्व करी . मग गप्पा गोष्टी करीत आम्ही सारे शाळेत जात असू . सकाळी साडेसात ते दुपारी बारा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी पाच ..असे चार वेळा दिवसातून हे दीड किमी अंतर आम्ही येत जात असू . शिस्त बाकी शिस्त असे . वाहतुकीचा रस्ता असूनही कधी कुणाला अपघात झालेला आठवत नाही . वाहतूक चालू असेल तर एका बाजूने सारे चालत . पण तरी या शिस्तीखाली आमचे बालपण दबलेले मला आठवत नाही . आम्ही तितक्या गमतीही करत असू ..म्हणून या इतके अंतर पार करून शाळेत जाण्याचा कुणाला कधी कंटाळा आला नाही .. ती आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी असायची . म्हणून आजही त्या गमती आठवल्या कि आपोआप ओठांवर हसू आल्याशिवाय राहत नाही ...
  आज ते सारे आठवायला कारण मुंगुस ! आम्ही शाळेत जात असू तेंव्हा साधारण रोज एखादे तरी मुंगुस दिसे . आणि मग ज्या कोणाला दिसे तो मुलगा मुलगी सर्वाना थांबावी आणि म्हणे ‘ मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पत .’ आणि आश्चर्य असे कि ते मुंगुस असे बोलल्यावर तोंड दाखवल्याशिवाय पुढे जात नसे ! याचे खूप आश्चर्य मला आजही वाटते . अनेक प्रश्न आजही पडतात . इतके घाईने पळणारे मुंगुस असे अचानक का थांबत असेल ? त्याला आम्ही इतक्या लहान आवाजात बोललो तरी कसे ऐकू जात असेल ? बर जरी योगायोग म्हणावा तर हा योगायोग साधारण रोजच का घडत असेल ? पण आम्ही इतकी भावंडे मोठी झालो कुणी हे कोडे उलगडले असेल असे मला तरी नाही वाटत ..
   मी सत्योमला सकाळी अंघोळ घालताना हि आठवण सांगितली .
“आम्ही लहानपणी शाळेत जात असू न तेंव्हा मुंगुस दिसले कि आम्ही म्हणायचो ‘मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पत ..’ आणि मग ते किती घाईत असले तरी तोंड दाखवल्याखेरीज पुढे जात नसे !”
“का ग मम्मी ते तोंड दाखवत असे ?”
“त्याला रामाची शप्पत घातली म्हणून .”
“मग म्हणून का दाखवी ?”
“तो रामाचा भक्त असेल .”
“मग सापाला जर शंकराची शप्पत घातली तर साप पण तोंड दाखवील का ?”
“....”
“आणि मग तुम्ही त्याला रामाची शप्पत घालून तुमचे काही काम का करून घेत नव्हते ?”
“......”
“जसे कि होमवर्क ...”
आता मात्र मला हसू आवरणे अशक्य होते ...

खरंच त्या वेळी आम्ही लहान होतो पण तेंव्हा कुणालाच कधी सुचले नाही हे मुंगुस इतके ऐकते तर आपण आपला होमवर्क याच्याकडून करून घ्यावा .....