या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 19 December 2016

ती गाव सोडून जाते.....

“बाई ...ओ बाई ...लवकर बाहेर या , चौकात बघा काय गोंधळ चाललाय ?” नंदाबाईच्या हाकेसरशी मी पोळपटावरची चपाती , जिची तवा आ वासून वाट बघत होता , ती तशीच ठेवून बाहेर आले . लेकीला जाताना स्वयंपाक ओट्याकडे बोट दाखवले आणि नंदाबाईच्या मागे निघाले . सकाळची वेळ असल्याने लोकांच्या भानगडी करायला कुणाला अजिबात सवड नव्हतीच . मलाही शाळेत जायची घाई होतीच पण ताई सुट्टीला आली तशी ती मागचे सारे बघे मग थोडी स्वस्थता लाभे . खरं तर इतकच कारण नव्हतं तसं काम सोडून जायला पण काल सखू नंदा आणि माझ्याजवळ जे बोलली ते रात्रभर डोक्यात घुमत होते . त्यात नंदाची हाक आली म्हणजे नक्कीच सखूचे काही कारण होते , मनात घालमेल दाटली आणि तशीच साडीचा घोळही न सोडता नंदाच्या मागे धावले . धापा टाकीत तिथे पोहचलो खऱ्या परंतु सारं पाणी पुलाखालून गेलं होतं .
    आमदारसाहेबांच्या प्रयत्नातून साकार झालेला तो ग्रामपंचायतीच्या आणि सोसायटीच्या पुढ्यात शांतपणे विसावलेला तो सिमेंटचा चौक आज सखूच्या ओरडण्याने काहूर माजल्यागत नाचत होता . फिल्टर पाणी न्यायला आलेली चार दोन टाळकी गमजा बघत उभी होती . सकाळची वेळ म्हणून अजून ग्रामपंचायतीचे टाळे कडीलाच घुटमळत होते . चौकातल्या बंगल्यांची शांत संयमी दारे किलकिली होऊन पुन्हा निर्ढावलेला स्वर आळवीत बंद झाली . एक दोन घरांच्या दारात चार दोन मुंडकी मान हलवीत इकडे तिकडे पाहत राहिली , फक्त पाहतच राहिली . सखूची आर्त किंकाळी इमारतीच्या भिंतींवर आदळून पुन्हा तिच्याच घश्यात शिरू लागली . खताच्या गोणीची कळकटलेली पांढरी पिशवी कपड्यासाहित धुळीत लोळत होती आणि पिशवीची मालकीण नवऱ्याच्या लडखडत्या लाथांनी विव्हळत होती , सिमेंटच्या रस्त्याने सोलवटणारे अंग पुन्हा पुन्हा झाकीत होती . शुद्ध नसलेला नवरा आई बहिणीवरून कान करपवून टाकणारी शिवीगाळ करीत होता . सखुला रोज अवती भवती दिसणारी माणसे दुरूनच या नाट्याचा आस्वाद घेताना दिसत होती . त्यांच्या चेहऱ्यावर बुजत बुजत  झळकणारे ते हसू , नवऱ्याच्या लाथेपेक्षा जास्त रुतत होते काळजात तिच्या . तिचा केविलवाणा चेहरा पाहून मला भडभडून आले . मी आणि नंदाने आहे तसे जावून तिला कवळ घातली . नंदाच्या पाठीत सखूच्या दारुड्या नवऱ्याची लाथ बसली आणि नंदा चवताळलेल्या वाघिणीच्या आवेशात त्याच्यावर धावून गेली . तिच्या हातच्या दोन मुस्कटात खाऊन सखूच्या नवऱ्याचे  लटपटणारे पाय आभाळाकडे वळले आणि तो धडकन धूळ उडवत सिमेंटच्या रस्त्यावर आपटला .
“काय गं सखे , एका झापडीत ते माकड तोंड वर करून पडतंय आन तू त्याचा भर चौकात मार खाती ? तुलाच आक्कल नाही बघ ..आन बसती रडत .” नंदाबाई बोलली खरी पण जळणाऱ्याच्या बुडाच्या यातना त्यालाच कळतात . सखूच्या कुंकावरून ओघळणारी रक्ताची धार नाकाच्या शेंड्यावरून कोसळत मातीत मिसळत होती . आम्हा दोघींचा आधार मिळताच ती सावरून बसली ..डोळ्याचं पाणी तसच ठेवून पदराच्या टोकाने नाकावरची धार पुसू लागली . नंदा आणि मलाही तिची ही अगतिकता पाहून रडू आले . तिच्या कपाळाला चांगलीच खोप पडली होती आणि ती बिचारी खोप तिचा धर्म पाळत खळखळून वाहत पण होती . तिच्याच पदराने तिचे डोके आवळले आणि आधार देत तिला जवळच्या दवाखान्यात नेवू लागलो . शेजारीच बगळ्याच्या रंगाला लाजवील अशा पांढऱ्या शुभ्र कपड्यात गाव तंटामुक्ती अध्यक्ष दात काढीत आमच्याकडे पाहू लागला . त्याला आम्ही करीत आहोत हे त्याचे कर्तव्य आहे याचेही भान नव्हते . हाच पांढरा हत्ती एखाद्या पत्रिकेत नावापुढे ‘ तंटामुक्ती अध्यक्ष’ मोठ्या अक्षरात लिहित असेल ! अर्धवट शिक्षित आणि पैशाचा माज असलेली ही कोडगी जमात ! माझ्या डोक्यात मुंग्या तरातरा करू लागल्या ..
    ग्रामपंचायतीच्या गाळ्यात दुकान मांडून बसलेला तो गावचा एकमेव डॉक्टर , आम्ही सखुला नेऊन बाहेर बाकावर बसवले . मागून तिची लेक भावाला हाताला धरून आणि एका हातात तीच कळकटली पिशवी धरून आमच्या मागे आली . बाहेर पेशंटची चाहूल लागली म्हणून डॉक्टरसाहेब बाहेर आले खरे पण त्यांच्या येण्याने साऱ्या खोलीत आंबट वास हवेत एकरूप झाला . त्याचे तोल जाणारे पाय सांभाळत शेवटी तो खुर्चीत बसला . कदाचित त्याचे हे पहिलेच पेशंट असावे . सखुची जखम तशी खोलच होती . त्यात ठेचलेली असल्याने टाके टाकणे जमणार नाही म्हणून डॉक्टरांनी पट्टी बांधली आणि कसले इंजेक्शन देवून आम्हाला बाहेर काढले . लडखडत आत जाताना तो मला पैशांची आठवण करून द्यायचे मात्र बिलकुल विसरला नाही .
“शाळेत जाताना देऊन जाते !” या हमीवर त्याने पुन्हा आतल्या खोलीचे दार बंद केले . सखूच्या पदराला धरून बारकं पोरगं सारखं तिला हलवत होतं .
“काय झालं पोरा ? का आईला त्रास देतो ?” माझ्या शब्दाबरोबर ते गप्प झालं खरं पण त्याच्या बहिणीला छेडू लागलं . आजूबाजूची मानसं आमची वरात बघून हसत होती .
“बाई , शाळेत नाही जायचे का ? तुम्ही अशी गावकी करीत हिंडल्या तर पोरांना कोण शिकवणार ?” आणखी एक पांढरा हत्ती जाता जाता कुजक्या काटक्या उकरून गेला . मला त्याला उत्तर देणे जमणार नव्हतेच . शाळामास्तर म्हणजे साऱ्या गावाचा नोकर , नोकराची लाचारी माझ्या मेंदूत शिरली आणि उलटं उत्तर देण्याऐवजी मी लाचार हसून उत्तर दिले , “जायचे ना आता असेच , गावकी कसली दादा ? ती शेजारी आहे तर आणली होती दवाखान्यात ..”
“आं , तिचा नवरा का मेला का काय ?” त्याने पुन्हा कुजक्या काटक्या उधळल्या . आता मात्र माझा विवेक मला डिवचत होता , तरी लाचारी मेंदूला वेटोळे घालून बसली होती .
“मेला तरी बरं होईल बिचारीचं , कष्ट करून आणलेलं लेकरांच्या मुखात तरी पडेल , दादा त्याचंच करणं धरण आहे बघा हे . पडलाय चौकात उताणा पिऊन ..तिकडच चाललात तर दिसनच तुम्हाला ..” माझ्या या वाक्यावर तो ‘दादा’ जरा बावरला आणि कसनुसं हसत सरसर पुढे गेला , मान खाली घालून !
“बाई , खरं तर या पांढऱ्या टोप्यावाल्यांना एकदा फोकानी हाणल  पायजे ..यांच्या घोंगड्या गुत्त्यावाल्यांच्या खाली आन आपल्या यांच्या खाली ..मेल्यांना मोडणारं संसार नाय दिसत , त्यांचा मताचा शिक्का दिसतोय बगा ..”
“जाऊ दे नंदा , काही बोलू नको ..एकट्याच्या मुखाने रेटायचा विषय नाही हा ..” पंधरा वर्षाचा गावाचा अनुभव माझ्या तोंडातून बाहेर पडत होता . नंदा तरी कुठे नवीन होती . आमच्या घराला कशाची झळ नव्हती म्हणून आम्ही गप्प होतो . सखुसारखी एखादी भेटली कि मात्र याची तीव्रता मनाला पोखरत राहते .
“सखू , बाई शाळेत जायच्यात तू माझ्या घरी चल , पोरं खात्यान काय तरी आन मग बाई आल्यावर बघू काय करायचं ..” समोरच्याच्या अडचणी ओळखायला शाळा शिकावी लागत नाही , हेच खरे . नाही तर आडाणी नंदा हे बोललीच नसती . हृदय पवित्र असेल तर मनाच्या वेदना कळायला वेळ लागत नाहीच ! मंदिराच्या आत थंडावा बाहेरून नाही येत , तो आताच असतो !
“नको नंदाताई , म्या जाते माहेराला आता सरळ ..फकस्त रोडपातूर सोबत चला तुमी ..” इतकावेळ तोंड लावून गप्प बसलेली सखू कोणालाच अडचण व्हायला तयार नव्हती .
“आये , जेवाय दे ना ..भूक लागली ...” मघाशी गप्प झालेलं पोर आता रडू लागलं . त्या लहान जीवाला आईच्या वेदनांची झळ लागत नव्हती , इतकावेळ पोटात दडवलेली कळ मात्र त्याला आता स्वस्थ बसू देत नव्हती . सखू तशीच खाली बसली आणि रस्त्यावर लेकरांना पोटाशी धरून हंबरडा फोडून रडू लागली . इतकावेळ वळून बघणाऱ्या नजरा ,आमच्या नजरांसहित पाणावल्या . सखुला सावरीत कशीबशी नंदाच्या घरी आणली . नंदाने तिच्या लेकरांच्या पुढ्यात भांडी सरकवली . सखुला खा म्हणाली पण ओठांच्या खाली पाण्याचा घोट बळच तिने ढकलून दिला , ताट बाजूला सारून गुढग्यात डोके खुपसून हमसून हमसून रडू लागली . माझा पाय काही तिथून उचलेना . आकराची शाळेची घंटा जोरात किंचाळत होती , माझ्या मनात मात्र सखुचे हमसून रडणेच घुमत होते . तिच्याजवळून पाय निघत नव्हता . तिने मघाशीच माहेरी जाण्याचा निर्णय सांगितला होता , तसा तिने कालही सांगितला होताच परंतु आमच्या सांगण्याने तिच्या थोड्याफार आशा पल्लवित झालेल्या तिच्या काळ्याभोर डोळ्यात मी बघितल्या होत्या . आता मात्र विझलेले तिचे नेत्र फक्त आणि फक्त वाहत होते . माझा हात तिच्या डोक्यावरून फिरत होता , अनाहूतपणे !
“बाई , तुमचं सारं पटतं हो मला ..म्या कितीबी कष्ट करीन , माह्या लेकरांना शिकवीन . मलाबी कळतंय हिथं छपराच्या सावलीत राहीन , सवताचं घर हाय ..पर म्या आणल्यालं बी ह्यो पोरांचा बाप खाऊ देत नायी ..तुमीच सांगा पोरांच्या पोटात नसल तर शाळा व काय शिकत्यान लेकरं ? सांजसकाळी ह्यो ढोसून येणार ..हाय ते सारं गिळणार आन बदड बदड बदाडणार ..आजूबाजूची मानसं हासून गम्मत बघत्यात ..इदर्यावाणी शिव्या ऐकायला मिळत्यात नव्ह...बदडाया लागल्याव कुणी पुढं हून सोडवीत नाय ..कधी पोरं उपाशीच झोपत्यात ..माहेरात काय वेगळ नाय , तिथंबी कामच कराच पर केल्यालं पोटात जायीन हो बाई ! शाळाच नाय शिकायला मिळाची , पर शिकून बी कुठं प्वाट भरतंय का ? आणि तुमच्याइतुक शिकाय पैका तर पाहिजेन ..तुमी माझं लय केलं , कदी इसर नाय पडायचा पर ह्यो नवरा मरुस्तवर मला हिथं सुकानी खाऊन देचा नाय ...पोरं कळीत झाली कि इयीन पुन्हा ..आता मातुर मला जाया पायजेन ..” तिने माझा तिच्या डोक्यावरून फिरणारा हात ओठांना लावला आणि अश्रूंचा अभिषेक त्यावरू करू लागली . पोरांचं खाऊन झालं होतं . तिने ती मळलेली पिशवी उचलली , एका हाताने झटकली ...बारक्या पोराच्या नाकाचा शेंबूड पदराने पुसला आणि आमच्या पायाला हात लावून रस्त्याला लागली ....माझ्या डोक्यात मुंग्यांनी गर्दी केली , बधीर नजरेने मी तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत होते ....नंदाने हलवले आणि मी सावध झाले . तशीच घराकडे गेले . ग्लासभर पाणी घश्याखाली घातले . शाळेची पर्स उचलली आणि चालू लागले . मागून दीदी हाक मारीत होती , मी हात हलवून तिला आत जायला खुणावले आणि पुढे चालू लागले . पंचायतीसमोर सखूचा नवरा तसाच उताणा पडला होता , लघवी होऊन पायजमा ओला झाला होता . ऊन त्याच्या अंगावर नाचत होते आणि तो ? शाळेची घंटा कधीच झाली होती . मुख्याध्यापक काहीतरी बोलणार हे नक्की होते . आठवीवर पहिला तास होता आज , मुलांना मात्र बरे वाटले असेल ! वर्ग डोक्यावर घेतला असेल , त्यांचे बाप अजून गुत्त्यावर असतील आणि आया रानात पोहचल्या असतील . मुले मोठी होऊन गुत्त्यावर जातील आणि मुली नवऱ्याचा मार खाऊन रानात जातील ...माझ्यासारखे शिक्षक मात्र रोज शिकवतील ......
‘खरा तो एकची धर्म ...जगाला प्रेम अर्पावे ...’

आणि ‘ती’ ? ....ती गाव सोडून निघून जाईल ! 
         डॉ संध्या राम शेलार .

2 comments:

Dr Madhuri Bothate said...

छान..

Unknown said...

अगदी वास्तव मांडलस खूप प्रभावी नी bhauk