या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday, 15 May 2013

काहीतरी हरवलंय ...

पोकळी सांगतेय उरातली
काहीतरी हरवलंय
ओढ संपली काळजातली
आता जीवन विखुरलंय
वाट वेडीवाकडी होती
तरी दु:ख नव्हते केले
स्वप्नातल्या झऱ्यावर
मनसोक्त होते पाणी पिले
आता तहान संपली
पाणी सारं आटलय
झऱ्यातून ते डोळ्यात साठलंय
पोकळी उरातली .....
वाटेवरच्या रेतीला
लाज माझ्या पावलांची
पिसाट वाऱ्याला बोलवतेय
पुसण्या रेघ खुणांची
पायाखालची जमीन सरली
डोईचं छत उडलंय
पिसाटल्या वाऱ्याने
दुसऱ्या दारी नेऊन सोडलंय
पोकळी सांगतेय ...
आता नाही वाट पाहणे
ना नवीन वाटेवर चालणे
आनंदाला कायमची ओहोटी
तप्त उन्हाची मनात दाटी
सुखाची पाठ पाहत राहणे
नाही मिळत जल स्वप्नातल्या पावसाने
कुणीतरी कानात सांगितलंय
आता कसं सांगू कुणा
माझं आयुष्यच हरवलंय .....