या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 26 September 2011

आण्णांच्या आंदोलनाने मला काय दिले?

  ''मम्मी , ए मम्मी मला न स्केल घ्यायची आहे पैसे दे न दादाजवळ.'' उठल्यापासून सत्योमच एकच मागण चालल होत. मी मात्र त्या दोघांचे आणि सारिका आत्याचा डबा करण्याच्या घाईत होते. ते झाल नि डबे , बाटल्या भरून सत्योमला अंघोळ घालायला गेले. परत त्याची भुणभुण चालू झाली. खर तर दादा सांगत होता पहिलीत स्केल लागत नाही, उगाच हि मुल मारामाऱ्या करतात, म्हणून मी दुर्लक्ष्य करत होते पण तो काही केल्या मागणी मागे घेत नव्हता. शेवटी मी शेवटच अस्र बाहेर काढल हात वरचा खाली येईपर्यंत बाळ कडाडला,''बघ आ मम्मे मी उपोषण करीन!'' मला हसाव कि रडावं हेच कळेना. दादाला पैसे दिले नि छोटी स्केल घ्यायला सांगितली.
     नेहमी स्वताच्या मागण्या रडून, आदळ आपट करून मान्य करून घ्यायचा प्रसंगी तोड फोड करायची वेळ आली तरी करायचा. पण आजचा हा अवतार बघून मी निशब्द झाले. आण्णांच आंदोलन जेव्हापासून चालू होत तेव्हापासून आमचा news chanal बंद नव्हता. त्यात आमची चर्चाही तो ऐकत असे. मुलांच्या मनात घर करून बसलेल्या या गोष्टी अचानक अश्या पुढे येतात कि आपण निरुत्तर होऊन जातो.
     आण्णांच्या आंदोलनाने देशाला काय दिल यापेक्षा तरुणांना, उगवत्या पिढीला एक नवी दिशा दिली. ती अशी कि फक्त हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत तर ते वाढत जातात अनेकदा मनुष्यहानी, वित्तहानीहि  होते, देशाच तसच आंदोलनकर्त्याचहि न भरून येणार नुकसान होत. या उलट अहिंसेच्या मार्गाने जरी काही मिळाल नाही तरी काही हानी तर होत नाही. गांधीजींनी दाखवलेला हा अहिंसेचा मार्ग आपण जरी विसरलो होतो तरी आण्णांनी तो परत दाखउन दिला आहे,आणि यशस्वी झालेला सर्व जगाने पाहिला आहे. म्हणून  आण्णांनचे शतश: आभार ! 

Sunday, 25 September 2011

वयनीमाय

      हवेतला गारवा उगाचच अंगाला झोंबत होता. न्याहारीची वेळ झाली तरी उन वर यायचं नाव घेत नव्हत. पण शेवन्ताच्या अंगणाला आज निराळाच रंग होता. तसं पहिल तर अंगण घराच्या आतल वातावरण कस आहे याचच प्रतिबिंब! स्वच्छ सारवलेला ओटा, उजव्या हाताला छपरात दोन गाया एक वासरू टाकलेली मक्याची कुटी चघळत होती. घासाच ओझ ओट्याजवळच्या बदामाच्या झाडाखाली पडलेल. शेवंता घरातलं काम उरकून बाहेर गुरांना पाणी ठेवायला आली. गायांच्या पुढ बादली ठेऊन ती जरा झाडाच्या सावलीत ओट्यावर टेकली. मागच्या आठ दिवसाची तगमग आता कुठ शांत होती. मनाच्या पाखराला सदान चांगलीच येसण घातली, ती पण प्रेमाने समजावून! आणि विशेष म्हणजे थोडाही धाक न दाखवता. सदाची हीच सामंजस्याची भाषा, प्रेमाचे शब्द शेवंता आणि त्याला आता पर्यंत एकमेकांशी घट्ट बांधून आहेत. नवरा बायकोच नातं असच जितक लांब ढकलू तेवढ जोरात परत एकमेकांजवळ ओढून आणत. पृथ्वी जस सूर्याभोवती गुरुत्व-आकर्षानामुळ फिरत राहते तस! एक अशीच ओढ यांनाही बांधून होती. 
         मोटर चालू होती म्हणून शेवंता आज विहिरीवर कपडे धुवायला गेलेली. शेजारची ताईबाई संग होतीच. त्यांच्या दोघींमधी शेजारणी असून कधी भांडण नव्हती, एकमेकीची मदतच करायच्या! हौदाच्या कडांवर मोठाल दगड असल्यान कपडे धुवायला सोप जायचं. वीजमंडळाच्या कृपेची फक्त गरज असायची! 
'' शेवन्ते परभू लई दिस झाल आला नाय ग.''
'' ताई, मास्तर हाय त्यो, सवड तर पायजेन, त्यामधी माधुरीची बी शाळा असतीया, एक दिस सुटी असली तरी आठ दिसाचा राडा आवरायला अख्खा दिस संपतो. लागून सुट्या आल्या कि येत्यानच कि !''
''बघ शेवन्ते, तुमी पाठच्या दीर ,नंदला मोठ करायच म्हनुनशान पोटपाणी पिकू दिल न्हाय! म्हातारपणी ह्यांनी सांभाळ केला तर ठीक न्हायतर अवघड होऊन जायचं!''
''न्हाय ताई, माजी पोर तशी न्हायत ,ती कावा बी अंतर नाय देयची.''
''परभू हाय तुजा पर माधुरी हाय का ?''
''नाय ग ताई गुणी पोर हाय ती बी .''
''चांगल हाय पर तू आपली जपून आस . काय कुणाचा भरवसा नाय बग कुणाची मती कवा बदलल सांगण अवगड हाय, चल येते मी झाल माज .''
      ताईबाई गेली पण शेवन्ताच डोक मात्र बधीर झाल. संशयाची ठिणगी एकदा पडली कि वनवा पेटवल्याशिवाय   गप्प होत नाही. एकदा का वनवा पेटला कि घरच्या घर उध्वस्त झालीच म्हणून समजा. कळत असूनही संशयाच्या या वारूला कुणी लगाम घालू इच्छित नाही हि सगळ्यात मोठी शोकांतिका! मग या संशयाने अगदी आई मुलाच्या नात्याचा बळी घेतला तरी यांना चालतो. आणि या विखारी रोपाला खत पाणी घालायला बाकीचे टपलेले असतातच. माणूस क्षणाच नात वर्षानुवर्षे जपलेल्या नात्याला गिळंकृत करताना पाहूच कसा शकतो? शेवंता मात्र गलबलून गेली होती. जेवानावरच मन उडून गेल होत. सदा येई पर्यंत तिचा जीव शांत होणार न्हवता. कारण त्याने लग्नाआधी नसबंदी केली नसती तर एखाद पोर मला बी झाल असत माझा खरा गुन्हेगार तोच आहे. शेवन्ताच अंग थरथर कापत होत. सदा आल्यावर त्याला किती दोष देऊ नि किती नको अस तिला झाल होत. हातान या माणसान आपल्या आयुष्याच वाटोळ करून घेतलय आता म्हातारपणी कुणाच्या तोंडाकड बघायचं? एक न अनेक शंका तिला घायाळ करत होत्या. दु:खाची नुसती चाहूल माणसाला हतबल का बनवत असेल? ते होणार कि नाही हेही त्यांना माहित नसत, पण मरण यायच्या आधीच खड्डा घेण्याची सवयच बनून गेली आहे. उद्याच्या दु:खाच्या चाहुलीने आपण आपल आज संपवतो आहे हेही यांना का कळत नाही देवच जाणो? 
      सदा आला पण शेवंता एक शब्दहि का बोलत नाही याचा काही अंदाज त्याला येईना. थोडा गोडीन तिच्याजवळ गेला पण तीन असा काही त्याला झिडकारला कि त्याच डोकच बधीर झाल. जाताना तर सगळ ठीकठाक होत मग अस अचानक दोन तासात काय घडल? आता काय करायचं? ओरडल तर परस्थिती आणखी बिघडणार थोड कुरवाळच पाहिजे हे त्याने उमजून घेतलं.
''शेवन्ते काय न सांगता तू आजूक माजा किती जीव जाळणार हैस? सांगती का जाऊ लांब कुठतरी? परत त्वांड नाय दाखीव्णार तुला.''
आता मात्र जीव्हारी बाण लागला. शेवंती ढसाढसा रडायला लागली त्याच्या गळ्यात पडून आणि विहिरीवर झालेली हकीगत सांगितली. सदा लागला हसायला. ''हे तुज ना शेवन्ते उद्याच्याला जेवण मिळल का नाय ह्या विचारांनी आजच उपाशी राहण्यासारक झाल! तुला ग कश्याला काळजी पायजे याची. मी हाय ना कुणी नसाल तरी, आन समजा तू आजच मरून गेल्यावर?''  सदा परत मोठ्यान हसायला लागला. शेवंती मात्र जास्तच भडकली,''माज डोक तळ्याव नाय आन तुमालाव कश्याची मस्करी सुचती ? जावा तीकड नका बोलू माज्यासंगत.'' सदान तिला जवळ घेत तिला समजावल.
''शेवन्ते आग कुत्र्याच्या पिलाला जीव लावला त ते बी आपल्या माग पळत! ह्यो तर माजा पाठचा भाऊ हाय. आणि मला सांग तू बी पोटच्या पोरापरीस जास्तच जीव लावला नव्ह परभुला मंग तुज्या संस्काराव तुज इस्वास का त्या ताय्बायवर सांग बर मला? आन माधुरी बद्दल बी तू शंका कशी घेऊ शकती तीन बी तुजी किती सेवा केली बर तू आजारी होती तवा! लोकाची असली तरी चार बुक शिकल्याली समंजस पोर हाय ती ! आशी उगाच डोक्यात राख कश्यापरीस घालती, येवड सांगून तुला पटत नसल चल चार दिस त्येन्च्यासंग राहून तू अनुभव घेऊन बग मंग तर झाल. उरिक लवकर आजच या शंकला चुलीत घालू .'' 
   शेवंता लगबगीने उठली, परभूकड जायचं म्हणून ती गरबडीने  मळ्यात जाऊन मिरच्या, वांगी, शेपू-चुक्याची भाजी, पेरू ,आन बरच काही घेऊन आली. दोनच्या गाडीने दोघ पर्भूकड रवाना झाली. पोहचायला पाच वाजले. माधुरी नुकतीच आली होती. दादा नि वयनीमायला बघून तिला तिचा आनंद लपवता येन अवघड होऊन बसल, आत येताच ती दादाच्या पाया पडली आणि वयनीला जाऊन बिलगली, लई दिवसांनी आई दिसल्यावर जस लेकरू बिलगत तशी! सदा शेवन्तिकड बघत होता, नजरानजर होताच शेवंती वरमली. त्यांना  चहा पाणी देऊन माधुरी स्वय्पाकाला लागली, शेवंता लुडबुड करू लागली पण माधुरीन तिला हाताला धरून बाजूला बसवल. तासाभरात परभू आला त्याला अचानक आलेले दादा, वयनीमाय बघून इतका आनंद झाला कि दोघांना कुठे ठेऊ कुठे नको अस झाल . त्याचं ते प्रेम बघून शेवंता मात्र आतल्या आत खजील होत होती. तिला धरणी माय ठाव दे अस झाल तिची चुलबुल बघून सदा मनातल्या मनात हसत होता पण त्याला ते लपवता येत नव्हत. जेवण आटोपल्यावर ती माधुरी जवळ बोललीच,''तुला कधी अस वाटल नाय आपल्या नवऱ्याची दादा वयनी आपण कश्यापरीस त्येंच करायचं .''
''वयनीमाय, तुमाला  जर तवा वाटल असत तर मला आता तस वाटल असत. ज्या मावलीने बारीक दीर,नणंद सांभाळण्यासाठी आपल् पोट पाणी पिकू दिल नाही त्या माउलीची अशी अवहेलना केली तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा माझी पाप धुऊ शकणार नाही !''
''बस बस माधुरी, तुला हे सांगितलं कुणी?''
''तुमच्या लाडक्या पर्भून! आणि हो लग्नाआधीच कबुल करून घेतल कि माझ्या दादाला आणि वयनीमायला अंतर द्यायचं नाही! या अटीवर तर यांनी लग्न केल माझ्याबरोबर!''
आज शेवन्ताला जन्मच सार्थक झाल अस वाटायला लागल. सगळ भरून पावलो आता देवाकड काही मागण नाही! माणूस सुख शोधत उर फुटेपर्यंत धावतो पण त्याच्याजवळ लपलेल सुख त्याला दिसत नाही त्या कस्तुरी मृगसारख! 
   शेवंतान सगळ सदाला सांगितलं! तिचे डोळे तिच्या नकळत वाहत होते पण आनंदाने ! 
''पण परभू सारख तुमी लगणा आधी मला इस्स्वसात घेतलं असत त जमल नसत का ?'' लाडिक गुश्यात शेवंता बोलली.
''तवा आजाच्यासारक लग्नाआगुदार भेटली आसती तर सांगितलं आसत कि!'' मिस्कीलपने सदा बोलला. लाजत शेवंती त्येच्या कुशीत शिरली. ति आता निश्चिंत झाली!
         बदामच्या झाडाखाली बसून एक निश्चय शेवन्ताने आज केला,'' परत आसा येडेपणा नाय करायचा, माज्या पर्भूबद्दल शंका म्हंजी देवाबद्दल शंका!''                  

Monday, 19 September 2011

श्रद्धांजली

चार दिवसापूर्वी माझ्या सासरच्या नात्यातील एका आजींच अचानक अल्पश्या आजाराने निधन झालं. तसं पाहिलं तर जन्ममरण हे कुणासाठी थांबलेल किंवा चुकलेल नाही पण काही व्यक्ती अस आयुष्य जगलेल्या असतात कि हि त्यांच्या जाण्याची घटना तिऱ्हाईत मानसाला अस्वस्थ करून जाते. या आजींच्या बाबतीत असाच काहीस घडल. परिसरातील त्यांना ओळखणारी जवळजवळ सर्वचजन तळमळली, त्यात मीही आलेच. त्या खूप जवळच्या नव्हत्या पण त्यांनी आमच् नातं जवळच बनवलं होतं. जितक्यावेळा त्या भेटल्या तेव्हा त्या आपलेपणाने जिव्हाळ्याने बोलल्या! गुलाबाच्या फुलासारखं काट्याच्या वेदना स्वत:जवळ ठेऊन भोवताल सुगंधित करणाऱ्यांपैकी त्या एक ! आयुष्यभर फक्त दु:ख सोसनाऱ्या, कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वताची दु:ख कधीच त्यांनी  दया किंवा मदत मिळवण्यासाठी वापरली नाहीत.
   लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुली पदरात टाकून जोडीदार अर्ध्यावर टाकून देवाला प्रिय झाले. नंतर छोट्या दीर जावांना सांभाळत आणि स्वताची मुले सांभाळत संसार पुढे नेला. मुलाच लग्न केलं तेही लहान तीन मुलं आणि शांत संय्यमी सून ठेऊन देवाला प्रिय झाले. पुत्रवियोग सहन करत नातवंड मोठी केली व्यवहार कुशलतेने , कष्टाने शेती करून इतर दीरानच्या बरोबरीला संसार नेऊन ठेवला. हे करत असताना सर्व नातेवाईकांच्या सुख दु:खात त्या सहभागी झाल्या. जळणाऱ्या ज्योतीसारख वेदना सहन करत प्रकाश मात्र सर्वाना दिला . दारातल्या तुळशी सारखं आयुष्य जगत तुळशीच्या ओट्यावर मृत्यूला त्यांनी जवळ केलं !
 मी कविता करत नाही पण त्यांच्यासाठी सुचलेल्या या ओळी खाली देत आहे.

             एक आत्मा आयुष्यभर फक्त दु:ख झेललेला
             कधीचा एक अश्रू तिने पापण्यांवर पेललेला
             अश्रुना मुभा नव्हती गालावर ओघळून मुक्त होण्याची
             त्या आत्म्याला ताकत हवी होती फाटलेलं आभाळ पेलण्याची

             उन पडलं वादळ आलं पाऊस आला
             पिलांना पंखाखाली घेणारी पक्षीण ती
             आयुष्यातील दु:खांसमोर
             दत्त म्हणून उभी ठाकनारी वाघीण ती

             रडण्याला आणि दु:खाला
             तिनं कधीच बळ बनू दिल नाही
             हसण्याणचं मानसं जिंकायची
             जिंकायच्या दिश्याही दाही

             अश्या या छत्रछायेला आपण
             जरी आज पारखे झालो
             नजर तिची घारीची तशीच आहे
             आपण मात्र नतमस्तक होऊन वाकलो.

Thursday, 8 September 2011

देवदूत

 गाठ मग ती शरीराच्या कुठल्याही भागात असो मनपटलावर एक भीतीची लकेर उमटवून जाते. असाच प्रसंग काल  परवा मीही अनुभवला. कॅन्सर विषयी भीती सर्वांच्या मनात असते आणि तस काही आपल्याला होऊ शकत अशी जाणीव जरी झाली तरी मन सैरभैर होऊन जात सगळ जग अचानक भकास वाटू लागत, जीवनात भरलेला सुगंध अचानक वार्याच्या झोताबरोबर उडून जातो. असा प्रसंग शत्रूलाही लाभू नये इतपर्यंत भावना मन व्यापून टाकतात.
   वीस दिवस झाले असतील साधारण एकाएकी एक गाठ जाणवली. वेदना नव्हती पण गाठ तशी मोठी होती . आता कळली किती दिवसापासून असेल सांगण जरा कठीणच कारण वेदना नव्हती . चाचपून पाहिलं इतर ठिकाणी हलत होती पण खालच्या बाजूने चिकटलेली भासली.दहा दिवस थोडीफार औषधे घेऊन बघितली पण काहीच फरक नाही मग डॉक्टरांना दाखवायचं ठरलं वेळे प्रमाणे रुबी हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागात पोहचलो डॉ अनुपमा माने यांना दाखवायचं ठरलं डॉ बाह्य रुग्ण तपासणी विभागात होत्या माझ्या अगोदर एक आजी होत्या कदाचित त्यांच्या त्या जुन्या पेशंट असतील. डॉ बाहेर आल्या त्या आजींची स्मित करत विचारपूस केली अर्ध्या तासात परत येते ऑपरेशन आहे सांगून निघून गेल्या . वेळ लागेल म्हणून चौफेर नजर फिरवली . एक मुलगी तिच्या आई वडिलांसोबत होती डोक्याला भुवयांना अजिबात केस नव्हते कदाचित किमो थेरपी चालू असावी आई वडील तिला हव नको ते विचारत होते पण चैतन्य हरवलेला तिचा चेहरा अंगावर शहारे उभे करत होता! माझ्या ह्यांनी हि गोष्ट ओळखली आणि ते माझ मन त्यांच्या बोलण्यात गुंतवण्याचा असफल प्रयत्न करू लागले!                                                                                
    तिच्या शेजारी एक जोडप बसलेलं यजमान एकदम शरीराने मनाने खचलेले आणि शेजारी बसलेली बायको डोळ्याच्या कडेपर्यंत आलेले अश्रू गालावर ओघळू न देण्याच्या असफल प्रयत्नात! काही लोकांच्या चेहऱ्यावर नीट झाल्याच समाधान आणि काहीतरी अवयव गमावल्याच दु:ख दोन्ही भावना एकत्रित लपंडाव खेळताना! कुणाच्या नाकात असलेली नळी काहींना त्यांच्या पासून किळस आल्यामुळे दूर बसण्यासाठी प्रेरित करत होती त्याच वेळी माझ मन मात्र यांचे आता किती दिवस राहिले असतील या विचाराने गर्भ गळीत झालेले! मन खिन्न होत आज मी सुपात असेल नि उद्या या जात्यात आले तर ? शरीरात एक वेदना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत विजेसारखी चमकून गेली डोळे मिटून मी यांचा हात पकडला. 
  आमचा नंबर आला आत जाताच एका गोड स्मितहास्याने डॉक्टरांनी आमच् स्वागत केल . माझ्या थोडा जीवात जीव आला . त्यांनी शांतपणे सर्व रिपोर्ट पहिले नि काही प्रश्न विचारले त्या मधेच स्मित करत शांतपणे विचारत होत्या . माझ्या मनावरचा ताण हळू हळू कमी होत होता . तपासून झाल्यावर त्यांनी विशेष नाही यावर शिक्कामोर्तब केल पण भविष्यात त्रास नको म्हणून काही तपासण्या करून आपण ती गाठ काढून टाकू असा सल्ला दिला. त्यांनी जराही न वैतागता (नाही तर काही डॉक्टरांना प्रश्न विचारणारे पेशंट नको असतात ) अगदी प्रेमाने प्रत्येक शंकेच निरसन केल.दोन दिवसापूर्वी आम्ही ती गाठ काढून टाकली . आज मन आणि शरीर या दोनही वरचा ताणरूपी पडदा हटला आहे . मन प्रसन्न आहे. याच सर्व श्रेय जात माझ्या अस्थिर मनस्थित साथ देणाऱ्या माझ्या यजमानांना, माझ्या कुटुंबियांना आणि देवदूत होऊन भेटलेल्या डॉ अनुपमा माने यांना! डॉ मानेन सारखे देवदूत माझ्या सारख्या संभ्रमात असणाऱ्या प्रत्येक पेशंटला भेटोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !   

Sunday, 4 September 2011

शिक्षक दिन

    आज सकाळपासून सत्योमचा गृहपाठ करून घ्यायचं हे लक्षात होतच कारण दोन दिवसाच्या  सुटीनंतर सोमवारची शाळा त्याच्या आठवणीत आणून द्यावी लागते. दादाला विचारल तर तो म्हणाला कि शिक्षक दिनाच कार्ड करायला सांगितलं आहे. त्या दोघांनी कार्ड करायला घेतली पण मी मात्र माझ्या शाळेच्या आठवणीत हरवले. 
    तस चौथीच्या अगोदरच विशेष काही आठवत नाही पण काही कविता त्याही नाचून गाऊन म्हणत असू म्हणून. खऱ्या आठवणी पाचविपासुनच्या! पाचवीत आलो पण शिक्षक मात्र तेच कारण आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा होती मग पहिलीपासून सातवी पर्यंत एकच वर्ग शिक्षक! आमचे काळदाते गुरुजी! प्रत्येक विध्यार्थ्याच प्रेमाने त्यांनी नामकरण केलेल. ते जेव्हड मन लाऊन शिकवत तितक ते विद्यार्थ्याला समजून घेत. त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट हालचालींवर लक्ष ठेवत. माझ नाव त्यांनी चिंधी अस ठेवलेल कारण माझ नाव ( माहेरच )  संध्या म्हणून संधी -चिंधी अस! त्यांच्या ह्या नामकरणाचा कधी राग नाही आला तितका जीव ते आम्हाला लावत आईच्या ममतेने जपत! तेव्हा बाक नव्हते बसायला एकामागे एक जमिनीवर बसाव लागत असे. एकदा ते इतिहास शिकवत होते मी मात्र माझ्या पुढे बसलेल्या मुलीची वेणी घालत होते ! त्यांनी हे बघितलं मला जवळ बोलावलं हात पुढे करायला लावला जोरात छडी मारली. त्यावेळी मी त्यांना विनवत  होते गुरुजी मला मारू नका माझ लक्ष आहे तुम्ही पाहिजे ते विचारा पण कश्याच काय त्यांना राग अनावर झाला होता. मारल्यावर मग मला विचारल माझ बरोबर उत्तर ऐकून ते मात्र अस्वस्थ झाले. शाळा सुटल्यावर जवळ बोलून त्यांनी हात हातात घेतला म्हणायला लागले लक्ष देत जा! चिंधे जास्त लागल नाही ना ? त्यावेळी त्यांचे डोळे पानवले होते! तेव्हा पासून मी कधी तास चालू असताना कुणाची वेणी घातली नाही ! सातवीत असताना काळदाते गुरुजींची बदली झाली तेव्हा निरोप समारंभाच्या भाषणात प्रत्येक विध्यार्थी रडत रडत भाषण करत होता! अश्या शिक्षकांची शिक्षक दिनी तर नक्कीच आठवण होते.