या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 25 November 2013

रात्र

अंधाराच्या निशब्द हृदयीं तू रुजलेली
चंद्रतारकांच्या क्षीरसागरी भिजलेली

अंधाराच्या ...नाहलीसअन लेली नेसू त्या तमसाचे
त्या नेसुवर ठिपके सजले आक्रोशाचे
दु:ख जीवांचे ओढुनी सारे पांघरलेली
अंधाराच्या ....

दिवसामागून रोजचेच हे येणे जाणे
चराचराला फुलवतेस नव्या प्रभेने
श्रमिकांच्या सुखनिद्रेसाठी मंतरलेली
अंधाराच्या ...

अखिल वेदना वेचुनी झाहली योगिनी
तुझी नीरवता निजलेल्या जीवा अर्पुणी       
सुखस्वप्न घेउनी पुन्हा निशा सजलेली
अंधाराच्या ....

                  -संध्या §

Sunday, 27 October 2013

बटाट्याची खिचडी

  मी आणि सत्योम असे लिहिणे मला तसे अचानकच सुचले . तेही असे काही प्रसंग घडतात आमच्या दोघा माय लेकरामध्ये कि लगेच कुणालातरी सांगावे असे वाटते . आज घडलेली गोष्ट उद्या आठवण होईल , उद्या तो मोठा होईल कदाचित थोडे अंतर निर्माण होईल पण आजचा माझ्या अवती भोवती घुटमळत फिरणारा माझा बाळ मला नक्कीच सदैव हवासा वाटेल ! जीवनातले सुखाचे , व्याकुळतेचे , रागाचे , भांडणाचे हे क्षण स्मृती बनून राहतील . पण हे अमृत माझ्या मनात सतत जगण्याची आशा निर्माण करील , वेदनेच्या क्षणी फुंकर घालून थंडावा देतील , असे हे कधी त्याला मी शिकवलेले तर कधी त्याने मला शिकवलेले अमृतमय प्रसंग लिहून ठेवायचे हे आणि पुन:पुन्हा ते वाचून त्या वेळेत जावून जगायचे ,किती सुंदर न ! पुन:पुन्हा आई व्हायचे ! आनंदाचे पंख लावून पुन्हा आभाळात उडायचे !

लहरेन मी , बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
मस्त आहे न कल्पना ?

   आज सकाळी लवकर उठले , आधी डबे करून मग सत्योमसाठी आवरायला कमीत कमी एक तास तर लागतोच , म्हणजे सात वाजेपर्यंत डबे तयार होणे गरजेचे ..आज लाईट जाणार लवकर मग अंघोळ उरकून मग डबे करावे हा विचार केला , आणि अंघोळ आवरली पण आता साडे सहा झाले उरकेल का डबा? झाली घाई चालू .. भाजी चपाती दोन डब्यात आणि उरल्या एक डब्यात साबुदाण्याची खिचडी द्यायचे रात्रीच ठरले होते . तसा साबुदाणा भिजत पण घातलेला .. भाजी उरकली ...पण आता सात वाजले ..
कसे आवरायचे याच विचारात होते मी ,तो मागे येवून बसलेला मला कळलेच नाही .
माझे लक्ष नव्हते ..मग हळूच तो मागे आला आणि कमरेला मिठी मारली .. “अरे माझा ननुबाळ उठला ग माझा पिल्लू , पण आवरा आता उशीर झाला खूप आधीच ..”
“थांब कि ग मम्मी..” लाडात येवून म्हणाला , पण आता वेळ खूप थोडा होता त्याचे ऐकून  जमणार नव्हते .
“सांगितले न आवर म्हणून ..”खोट्या रागाने मी ओरडले ..मग मात्र घाईने ब्रश करायला स्वारी पळाली.. मला हसू आवरेना पण मोठ्याने हसले तर परत रुसून बसायचा म्हणून दाबले . मला आता वेळ खूप कमी होता , बटाटा चिरून मग खिचडी बराच वेळ लागेल म्हणून ब्रश करून आलेल्या पिलूला विचारले , “बाळा आज खिचडीत बटाटा नसेल तर चालेल न रे ?”
“टाक न ग बटाटा , शाळेत मुले नसतील तर कसे दिसेल सांग बरं?”
“रिकामे दिसेल , त्याशिवाय शाळेला अर्थच नाही”
“मग मम्मी बटाट्याशिवाय खिचडी पण तशीच दिसेन कि गं”
पिलूचे हे शब्द ऐकले आणि गुपचूप बटाटा चिरायला घेतला ...


Thursday, 10 October 2013

माझ्या राजसा

मला हसू येतं

तुझे प्रयत्न पाहताना

भिऊन छायेला

स्वतःच्या दूर पळताना

किती अट्टहास तुझा

आपल्या प्रीतखुणा विसरण्याचा 

आपणच कोरलेल्या लेण्या

धुवून पुसण्याचा

अरे माझ्या राजसा

जीवन संपते रे

श्वास दुरावताना

कसे समजावू तुला

किती कोलाहल अंतरी

हृदयातून मोती ओघळताना !


               -संध्या §

Thursday, 12 September 2013

अभिलाषा

नको शोधू दिशा दाही
तव अंतरी मी राही
गेला सांगुनी सखाही
तरी काळजाची लाही

आल्या दिवसाचा रंग
आठवतो तुझा संग
स्वप्न झाहले हे भंग
जीव होई त्राही त्राही

वेड मजला लागले
मन तुझ्यात गुंतले
जरी जीव दुरावले
नेत्र रूप तुझे पाही

असे रोजच जगणे
तुला स्वप्नात बघणे
मग उगाच हसणे
जणू गवसले काही

आस जीवा तू येशील
पुन्हा कवेत घेशील
क्लेश तोवरी सोशील
चित्ती अभिलाषा राही

         -संध्या §

Wednesday, 28 August 2013

टाकलेली २

  डॉक्टर मागच्या दाराने आत आले आणि गोल फिरणाऱ्या त्या खुर्चीवर बसत आजूबाजूला पाहणाऱ्या कांताला न्याहाळू लागले . गर्द गुलाबी रंगाची साडी तीचा तो गोरा रंग आणखी खुलवत होती . कालचा निर्विकार चेहरा आज बावरलेला होता , नाकीडोळी नीटस असणाऱ्या तिला तो कालचे  आणि आजचे  दोन्ही भाव छान दिसत होते .  किती मोहक आहे ही कुणालाही आवडेल अशीच आहे . असो आता फक्त हिचा उपचार करणे आपले काम आहे , अशी मनाशी खुणगाठ बांधत डॉक्टर सदाशी बोलू लागले .
बोला बाबा.
काय बोलणार साहेब तुम्ही बोलीवलं  तप्साया तर आलो बगा .
बर ,कांता तु झोप टेबलवर .
काही न बोलता कांता डॉक्टरांनी खुण केलेल्या टेबलावर जाऊन झोपली . जनरल चेकअप करून डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतले , उभ्यानेच ते लिहीत होते . त्यांची ती सवयच होती . इंटरशिपला असताना ती त्यांना जडलेली . खूप सारे विध्यार्थी असल्याने प्रत्येकाला बसायला खुर्ची मिळत नसे मग सारे उभेच राहायचे . प्रत्येक पेशंट तपासताना सरांभोवती गोळा होऊन सर्व थेअरी प्रात्यक्षिक पाहून समजून घ्यायचे . जेंव्हा सरांना प्रिस्क्रिप्शन लिहावे लागे तेंव्हा मात्र सर डॉ. उमेशला पेन देत . डॉ. उमेशचेच अक्षर खूप वळणदार आणि नेटके होते त्यांच्या स्वभावासारखे , आणि म्हणून सर्व प्रिस्क्रिप्शन त्यांनाच लिहावी लागत उभे राहून आणि नंतर ती सवयच जडली त्यांना कायमची ! लिहून झाल्यावर ते खुर्चीत बसले . आधी कांताकडे पाहिले आणि नंतर ते सदाकडे पाहून बोलू लागले , “ हे पहा बाबा माझी औषधे म्हणजे पूर्ण उपचार नाही . हो तीचा पूर्ण उपचार होऊ शकतो आणि तो तिलाच करावा लागणार आहे .सदा न उमगल्याने डॉक्टरांनकडे केविलवाणा पाहत राहिला पण त्याच्याकडे लक्ष न देता ते आता कांताकडे पाहत बोलत होते .
हे बघ कांता , मी नाही जाणत तु किती अन काय भोगलेस , पण एक सांगतो दु:ख सर्वांच्या आयुष्यात असते , अगदी रंकापासून राजापर्यंत , पण असे दु:खाला कवटाळून चालत नाही . थोडे दिवस सर्वजण त्या व्यक्तीची काळजी घेतात पण त्याही गोष्टीला मर्यादा असतात . कितीही जवळची व्यक्ती असू देत सुरवातीला आनंदाने करतात , नंतर कर्तव्य म्हणून आणि शेवटी अनिच्छेने करतात . कसेही दु:खमय जीवन असले तरी सर्व सोसून पुढे चालावे लागते कारण जीवन आपल्यासाठी थांबत नाही  . मागचे बदलताही येत नाही . आणि मरण जरी यावे वाटले तरी ते काही मागून मिळत नाही . ठरलेल्या वेळीच ते येते . म्हणून वेळ जशी येईल तसे बदलणे गरजेचे आहे . होतो त्रास काही दिवस पण नंतर तीही सवय होऊन जाते . माणसाने नेहमी आधी स्वतःला आनंदी करावे आणि मग बाकी गोष्टींचा विचार करावा . अंधाराच्या भीतीने तु पुढे न जायचे ठरवले तर पहाटेनंतर उगवणारा तेजस्वी सूर्य तुला कसा दिसेन ? त्या वेळी तु अशी खिन्न राहिलीस तर त्या तेजस्वी दिवसाचे स्वागत करण्याच्या अवस्थेत असशील का ? म्हणून हे सर्व सांगतोय . तुझ्या बाबांनी सांगितले मला तु आठवीपर्यंत शिकली आहेस आणि म्हणून हे बोललो कारण मी जे समजावतो आहे ते तु समजू शकते .
    हे सर्व ऐकत असताना तिच्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव कधीच लुप्त झाले होते . त्याच जागी ती आता डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूसोबत व्यक्त होत होती . तिचे बदलणारे चेहऱ्यावरचे भाव बघून डॉक्टरांना समाधान वाटले .
हे बघ या जगात खूप वेदना भरलेली आहे . प्रत्येक जीव दु:खी आहे . तुझ्यापेक्षा , माझ्यापेक्षा असे असंख्य लोक आहेत ज्यांना मानसिक ताणाचा विचार करायला वेळही नाही कारण त्यांना दिवसभरात पोट भरण्याचीच भ्रांत आहे . काही लोकांना कुठल्याना कुठल्या आजारपणामुळे इतक्या शारीरिक वेदना आहेत त्या फक्त पाहून आपली काहिली होते . मग मला सांग यापेक्षा किती अन काय दु:ख असू शकते ? मरणाची वाट बघत जगणारी ही माणसे  पाहिली ना की मग कळते आपण आपले सर्व अवयव ठीकठाक असलेले किती भाग्यवान आहोत . अश्वत्थाम्याच्या माथी भळभळनाऱ्या जखमेसारखी माणसाच्या जीवनातही वेदना चिरंजीव आहे आणि विश्वाच्या शेवटपर्यंत राहील ...पण समोरच्यापेक्षा आपली कमी आहे या विचाराने पुढे जाण्यातच आपले सुख असावे . मलाच का दु:खी केले देवाने असे मानण्यात म्हणूनच अर्थ नाही . पटतंय का मी सांगतो आहे ते ? की मी असाच आपला बडबड करतोय ?”
या प्रश्नाने मात्र कांताची थोडी चलबिचल झाली आणि डॉक्टरांकडे पाहत अश्रुभरल्या नेत्राने ती बघत राहिली .
नाही डॉक्टर असे नका म्हणू . खरंच पटतंय मला . आजवर असे कुणी बोललेच नाही .
आता मात्र डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि ते उघडपणे त्यांनी दाखवले . इतकावेळ शांत बसलेल्या सदालाही आपली पोरगी कुठेतरी हलली याची जाणीव झाली . म्हणजे आता हे डॉक्टर तिला नक्की बरी करणार हा विश्वास पण दृढ झाला .
छान ! आता एक काम करायचे मी या गोळ्या देतो त्या मी सांगतो तश्या खायच्या . हे घ्या बाबा चिठ्ठी आणि मेडिकल मधून गोळ्या आणा .हसत सदा उठला आणि गडबडीने तो गेलाही गोळ्या आणायला .
  इतक्यात एक पेशंट विव्हळत आत आला . त्याच्या सोबत त्याची बायको होती . पोट आवळत , कमरेतून वाकलेला तो माणूस डायरेक्ट एक्झामिनेशन टेबलवर जाऊन झोपला . तो तोंडाने विव्हळणे बंद करत नव्हता त्याची असह्य वेदना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती . हे सर्व पाहत कांता उठून कोपऱ्यात जाऊन उभी राहिली .
सकाळपासून पोट दुखतंय डॉक्टर त्याचं , चला म्हणाले तर आलं नाय आन आता जास्तच झालं . दोन उलट्याबी झाल्या . लई तळमळत्यात , काय करा साहेब .
त्यांनी काही शिळे , बाहेरचे काही खाल्ले होते का ?”
व्हय साहेब त्यांनी काल लई दारू घेतली आन मटणबी खाल्लं होतं .
हो म्हणून त्रास होतोय . बर ताई मी आता इंजेक्शन देतो जर आराम पडला तर गोळ्या देतो , नाही कमी वाटले तर सलाईन लावावी लागेल .
बर साहेब करा जे करायचं ते पण त्यांची तडफड कमी करा .
डॉक्टरांनी इंजेक्शन दिले . चार पाच मिनिटात तो थोडा शांत झाला . पुन्हा कोरडी उलटी आल्यासारखे करू लागला .शेवटी टेबलावरच त्याने उलटी केली . कांताला हे पाहून मळमळल्यासारखे झाले . तरीही डॉक्टरांना इतके स्थिर पाहून तीही गप्प बसली .
ताई आपण त्यांना सलाईनच लावू .
बर साहेब .
त्याच खोलीत एका बाजूला एक पडदा लावून दोन कॉट शेजारी मांडल्या होत्या . सलाईन लावायची तयारी करून डॉक्टरांनी त्या पेशंटला आत येऊन झोपायला सांगितले . पेशंटची बायको लिहून दिलेली इंजेक्शन आणायला मेडिकलमध्ये गेली होती . आता तिथे फक्त कांताच आहे असे पाहून डॉक्टरांनी तिला जवळ बोलावले .
कांता मला मदत करते का सलाईन लावायला ?काही नाही करायचे फक्त पेशंटचा हात घट्ट पकडून ठेवायचा आणि मी सैल करा म्हटले की करायचा .
आधी कांताला भीती वाटली पण मघाचपासूनचे डॉक्टरांचे अशा गंभीर पेशंटला शांतपणे उपचार करताना पाहिल्यामुळे तिची भीड थोडी चेपली . आणि ती पुढे आली . पण तोंडाने काही बोलली नाही . तिने पुढे येऊन पेशंटचा हात डॉक्टर सांगतील तिथे धरला . डॉक्टरांनी अलगद स्काल्प व्हेनमध्ये सरकवली आणि स्टीकर लावून सलाईन जोडून टाकली . सदा गोळ्या घेऊन आला होता . त्या दुसऱ्या पेशंटची इंजेक्शन सलाईनमध्ये सोडली . आणि मग खुर्चीवर येऊन बसले . सदाने गोळ्या डॉक्टरांकडे सुपूर्द केल्या .
कांता तु खरंच खूप धीट आणि हुशार आहेस . मला वाटले नव्हते तु मला मदत करशील . माझ्या समजावण्याने तु चार आने बरी झाली आहेस .आता तुझी हुशारी आणि ही औषधे बाकीचे काम करतील .
खरंच साहेब माजी कांता बरी होऊ द्या , तुमचे लई उपकार मानिन .सदा अतिआनंदाने म्हणला . डॉक्टर फक्त हसले . त्यांनी गोळ्या नीट समजावून सांगितल्या . तिनेही समजावून घेतल्या . दोन दिवसांनी पुन्हा एकदा तपासून जा असे सांगायला डॉक्टर विसरले नाहीत . ते झाल्यावर डॉक्टर उठले आणि प्लास्टिक ग्लव्हज घालून मघाशी टेबलवर केलेली उलटी पुसून घेतली . कांता जाता जाता ते पाहत होती . तिला खूप आश्चर्य आणि आदरही वाटला डॉक्टरांबद्दल . त्यांना कुणी मदतनीस नाही ही गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवली . म्हणजे साफसफाई पण डॉक्टरच करत असणार .
      कांता वडिलांबरोबर चालत होती . सूर्य पूर्ण मावळला होता . लालसर छटा पूर्ण आभाळभर पसरली होती . अंधाराची काळी छाया त्या सुंदर मनमोहक छटेला गिळंकृत करू पाहत होती . मंद मंद वारा सर्वांगाला स्पर्श करून पुढे जात होता .प्रत्येक वाऱ्याच्या झुळकेसोबत विचारांचे तरंग कांताच्या मनात हेलकावे खात होते . इतक्या दिवसात शब्दही न बोललेली कांता आता बोलू लागली .
बाबा मी तुम्हा दोघांना लई सतावलं ना ?”
नाय गं माज्या बाय , लेकरा  तुला नियतीनं सतावलं म्हणून गं पोरी तुजी अशी हालत झाली . आन तुज दुख बघून आमचं काळीज पांगणार नव्ह ? तु तर आमच्या जीवाचा तुकडा हाय पोरी . तु सुखात अस आमाला यापरीस काय बी नगं .गच्च झालेले डोळे धोतराने पुसत सदा तिला समजावत होता तु चांगली हो म्हणून ….कांताला खूप बर् वाटलं . वाऱ्याचा झोत तीचा पदर उडवू लागला पदर सावरून आता डोळ्यातले अश्रू बाहेर पडू न देण्याचा निर्धार करत कांता वडिलांबरोबर चालत राहिली ….
      या दोन दिवसात कांताने वेळेवर गोळ्या खाल्ल्या . आधी तिला झोप येत नसे पण या गोळ्यांचा परिणाम की काय म्हणून आता तिची झोप पूर्ण होत होती . कांता बदलत होती . पानगळ संपून आता पुन्हा हिरवीकंच होत होती ...चैत्रपालवीसारखी ! औषध ही माणसाने शोधलेली सर्वात उपयोगी गोष्ट म्हणावी लागेल . तडफडणारा माणूस क्षणात शांत करणारी ही औषधे माणसासाठी  वरदानच तर आहेत ! कांता जरी आता बरी होत होती तरी मुलांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात सतत पाणी दाटत होते . तिच्या आईला तिची ही तडफड दिसत होती . आडमुठ जावायापुढे तिचाही नाईलाज होता . यात समाधानाची गोष्ट अशी होती तिच्यासाठी की आधी मुलांच्या आठवणीने बधीर झालेली कांता आता डोळ्यातून पाणी गाळत आपल्या भावना व्यक्त करत होती ….
     दोन दिवसांनी कांता आपणहून वडिलांना डॉक्टरांकडे जाण्याविषयी बोलू लागली . या डॉक्टरांमुळेच तीचा जीव थोडा शांत झाला होता . तिला आणखी शांतता हवी होती . माणूस आयुष्यभर मन:शांतीच्या तर शोधात असतो , तिला थोडी शांतता मिळाली होती आता शोधायचा होता आनंद !
बाबा आज जायचे ना डॉक्टरांकडे ?” कांताने स्वतः विचारल्याने सदाचा आनंद ओसंडून वाहू लागला . तो खूप उत्साहाने तिला घेऊन जायला तयार झाला . दोघे संध्याकाळच्या वेळी दवाखान्यात गेले . डॉक्टरांपुढे आधीच दोन पेशंट बसून होते . कांताकडे एक हसरा कटाक्ष टाकून डॉक्टर त्यांचे काम करत दोघांना म्हणाले , “ये ना कांता , बाबा बसा , हे दोन पेशंट झाले की निवांत बोलू . चालेल ना ?”
व्हय चालन ना साहेब , आमाला तरी कुठं गाडी गाठायची हाय . पाय पाय तर घरी जाणार न्हवं , उरका तुमचं दमानं .
   डॉक्टर पेशंट पाहत होते . पण आज त्यांचे सर्व लक्ष कांताकडे लागून होते . परवाची ती निर्विकार रेषा तिच्या चेहऱ्यावरून गायब झाली होती . ती आज खुपच शांत होती . ही शांतता तिच्या सौंदर्यात आणखी खुलून दिसत होती , हळदीजवळ खुलून दिसणाऱ्या कुंकासारखी ! आजही तिच्या सौंदर्याने थोडे बावरले डॉक्टर , पण ती कोण आहे याची जाणीव होताच त्यांच्यातला डॉक्टर जागा झाला .
बोल कांता कशी आहेस आज ?”
चांगली आहे डॉक्टर . मला खरंच आता बराच फरक जाणवतो आहे . नाहीतर काहीच करावे वाटत नसे . आज आईला स्वयपाक करू लागले . डॉक्टर सर्व तुमच्यामुळे झालेय .नकळत तिने डॉक्टरांचे आभार मानले .
असे नाही काही , मी फक्त माझे काम केले . आता तुझे तूच सावरणे गरजेचे आहे . झाल्या त्या गोष्टी आपण नाही बदलू शकत पण जे होणार आहे ते बदलणे गरजेचे आहे . आपला आनंद सुख हे सर्व आपल्या मानण्यावर असते . दुसऱ्याची वेदना आपल्यामुळे कमी झाली ही जाणीव खूप आनंददायी आहे . कांता , आपल्यामुळे ते दुसऱ्याच्या चेहऱ्यावर उमलणारे हास्यपुष्प खूप मोहक आणि सुगंधी असते . जो सुगंध आयुष्यभर आपल्याला उल्हासित करतो .
होय डॉक्टर खरंच मी चांगली होत आहे हे पाहून आई बाबांच्या तोंडावर उमलणारे ते हसू मलाही खूप काही देऊन गेले . ते तर माझेच आहेत पण तुम्ही माझ्यासारख्या तिसऱ्या व्यक्तीसाठी हे करताय .
ते माझे कर्तव्य आहे कांता . आम्ही डॉक्टर होतो तेंव्हा ती शपथच घेतो . असो आज मी तुला बोलावले कारण आता तुला बरे वाटेल पण आपले मन खूप चंचल असते . त्या वारूला आवरणे महाकठीण काम , आणि आता ते तुला करायचे आहे .
म्हणजे ?” काही न उमगल्याने कांताने प्रश्नार्थक चेहरा केला .
असं विस्फारित डोळ्यांनी नको पाहू माझ्याकडे .हसत डॉक्टर म्हणाले आणि दोघे हसू लागले .
अग मला इतकेच सांगायचे आहे की रिकामा वेळ आणि रिकामे डोके सैतानाचे घर व्हायला वेळ लागत नाही . म्हणून आता स्वतःला काही कामात गुंतवून घे .
मलाही जाणवले ते , पण मला रानातल्या कामाची बिलकुल सवय नाही . काय करावे काही सुचत नाही .
तु आठवी झालीस ना ?”
हो , झाले पण आता कितीतरी दिवस लोटले . दोन लेकरांची आई अभ्यास काय ध्यानात ठेवणार  ?”
ते सर्व ठीक आहे गं , मी म्हणतोय की तु मला मदतनीस म्हणून काम करू शकशील का ?”
त्या दिवशी कांताने जी मदत केली तेंव्हापासून हा विचार त्यांच्या मनात घोळत होता . आज त्यांनी अगदी सहज बोलून पण दाखवला . या प्रश्नावर मात्र कांता तिच्या वडिलांकडे पाहू लागली . सदाच्याही ते ध्यानात आले .
ते समंद ठीक हाय साहेब , पर लोक म्हणत्यान बापाला सांभाळाया जड झाली पोर म्हणून कामाला लावली .
बाबा लोक तुमची पोरगी वेडी झाली असेही काहीबाही बोलत असतीलच की ? आणि ती काम एक विरंगुळा व्हावा म्हणून करणार आहे , हो ना ?”
तेबी ठीक हाय साहेब पर मला हौसला इचाराव लागल . उद्या सांगतो तुम्हास्नी . आन तिच्या आईची व्हय असल तर लगीच कामाला बी धाडतो .
      कांता मनातून खूप खुश झाली . खरं तर तिला अश्याच कामाची गरज होती . तीचा लहानपणापासून स्वभाव मायाळू , बोलका , कष्टाळू होता . जे माणूस तिच्या संपर्कात येई ते सहसा तिला विसरत नव्हते . लग्नानंतर सर्व बदलेले होते . वर्षभर चांगलं वागणारा नवरा अचानक सैतान झाला होता , कुणी चेटूक केल्यासारखा . त्यात तीचा बिचारीचा अवघा संसार वाहून गेला होता . डॉक्टरांनी सांगितले तसे या ठिकाणी सेवा करायची बरीच संधी तिला मिळणार होती . पेशंटच्या सुख दु:खात ती स्वतःच्या वेदना सहज विसरणार होती . पण आता आई बाबा जे ठरवतील यावर सर्व अवलंबून होते .
     तिच्या आईला काही हा प्रस्ताव पटला नाही . ती आडाणी बाई तिला इतकेच वाटायचे , पोरीला त्या पुरुषमाणसासोबत कामाला पाठवायचे तर लोक काय म्हणतील ? लोकांचे जाऊ द्या पण त्या नवीन डॉक्टरचा काय भरवसा ? अनेक शंका तिच्या आईमनाला पोखरत होत्या . मुलगी म्हणजे काचेचं भांड मानणारी ती एक संसारी स्री होती . पण त्यातल्या त्यात तिला आपल्या मुलीवर खूप विश्वास होता . शेवटी कांताने याविषयी बोलायचे ठरवले . कारण तिला ओढ लागली होती त्या सेवाभावी कामाची
आई , मी काही लहान नाही . दोन लेकरांची आई आहे . मलाही पटतंय डॉक्टरांच म्हणनं कारण मला उन्हात काम शक्य नाही . आणि दुसरे असे आम्ही दोघे थोडेच राहणार सोबत , येणारे जाणारे पेशंट असतील . शिवाय दवाखाना भर चौकात आहे . आपल्या गावातले लोक असतील अवतीभवती , मग काय अडचण आहे सांग बर् ?”
कांताचे बोलणे पटले हौसाला पण तरी तीचा चेहरा नाराजच होता .
आई या लोकांच्या गराड्यात मी माझे दु:ख विसरू शकेन गं . आई हो म्हण ना . आणि पुढे पण शिकायचे आहे मला , तिथे वेळ मिळाला की मी अभ्यास पण करू शकेन ना ?”
बघ कांता तुला जायचं तर माझी ना नाय , पर उद्या काय बाय झालं तर गं . तुम्ही दोघं बी तरुण हायसा .
आई तुझा विश्वास आहे न माझ्यावर ? तसे असेल तरच मी जाईल , नाहीतर नाही .इतके सांगून कांता आत गेली . आता हौसाला ना म्हणणे कठीण वाटले .
जा बाई जा उद्यापास्न कामाला तुज्या खुशीत आमाला पण खुशी हाय .
आईच्या होकाराने कांता खुश झाली . आता उद्यापासून नवीन रस्ता , नवीन स्वप्न अन नवे सुख !
    सकाळी उठून कांताने आईला सर्व काम आवरायला मदत केली . आणि स्वतः आवरून बसली . आज तिला सोडवायला बाबा जाणार होते , उद्यापासून तिची तिच् एकटी जाणार होती . सदा आवरून तिच्यासोबत गेला  . डॉक्टरांना खूप हायसे वाटले , तिला नवीन मार्ग मिळाला होता आणि त्यांना एक चांगली मदतनीस मिळाली होती . सदा तिला सोडून निघून गेला  . सकाळ होती तरी जास्त कुणी पेशंट नव्हते . डॉक्टरांनाही कांताला तिचे काम सांगायला वेळ हवा होता . कांताने आधीच साफसफाई चालू केली . आतले साफ करायचे म्हणून तिने डॉक्टरांना बाहेर थांबायला सांगितले . झरझर फर्शीही पुसून घेतली तिने आणि डॉक्टरांना बोलवायला ती बाहेर आली .
अरे कांता तु तर खोलीचे रूपच बदलून टाकले .अतिहर्षाने डॉक्टर म्हणाले .
माझे कामच हे असणार नं ? मग मी कुठे काही वेगळे केले , माझे कर्तव्य केले .
काल आपण असे बोलल्याचे आठवून डॉक्टरांना खूप हसायला आले . तीही त्यांच्या त्या हसण्यात सामील झाली . हास्यतुषारांनी खुललेलं कांताच रूप पाहून डॉक्टरांच्या मनात चलबिचल झाली . स्वतःला आवरत त्यांनी दुसरीकडे नजर फिरवली . त्यांनी जेंव्हापासून तिला पाहिले होते तेंव्हापासून त्यांना तीचा सहवास हवासा वाटत होता . आधी घरी जाऊन आल्यावर उगीच का ते दुसऱ्या दिवशी तिची वाट पाहत होते . आता ती मनमोकळ बोलत होती त्यांच्याशी तर तिची जास्तच ओढ त्यांना वाटू लागली . पण हे व्यक्त करायचे नाही कारण ती एक विवाहित स्री आहे असे मनाशीच ठरवले होते त्यांनी , रात्रीच …..
    आतले बाहेरचे सर्व आवरून कांता तासभरात बाकावर येऊन विसावली . तोपर्यंत डॉक्टरांनी काही पेशंट पहिले होते आणि काही पुढ्यात बसलेले होते . कांताच्या लक्षात एक गोष्ट आली की ही सफाईची कामे पेशंट यायच्या आधी व्हायला हवीत . उद्यापासून कामाला थोडे लवकर यायला हवे .
कांता इकडे ये .
हो सर आले ,”डॉक्टरांनी टेम्प्रेचर कसे चेक करायचे ते शिकवले . आता हळूहळू सर्व गोष्टी तिला ते शिकवू लागले . तीही खरंच हुशार होती प्रत्येक गोष्ट लगेच आत्मसात करत होती . सारे पेशंट ओसरल्यावर आता कुठे त्यांना पोटाची आठवण झाली . कसा वेळ गेला दोघांना पण समजले नाही . आवडीचा सहवास आणि आवडीचे काम खूप मोठी गरज असते प्रत्येक माणसाची . हेच काम आपल्या आवडीचे आहे हे समजायला काहींची आयुष्य खपतात आणि आवडीच्या सहवासाची वाट पाहत संपतात सुद्धा !
        असाच आला दिवस येत होता आणि जाणारा जात होता . कांताच्या उत्साहात , ज्ञानात भर घालत . तीचा तो निर्विकार चेहरा कधीच लुप्त झाला होता . आलेल्या पेशंट बरोबर आणि वेळ असेल तर डॉक्टरांशी बोलण्यात तिचे सर्व दु:ख बाजूला करत होती . जखम कितीही बरी झाली असे वाटले तरी एखाद्या आईला लेकरू कडेवर घेऊन पाहिले की ती कासावीस व्हायची मग नंतर त्याच लेकरांना ती खेळवू लागली आणि त्यांच्यात तिच्या पिलांना शोधू लागली .
          डॉक्टरांनी तिला शिकवताना सर्व गोष्टी नीटच शिकवलेल्या , तीही सारी कामे प्रामाणिकपणे आणि उत्साहाने करत असे . उन्हाळा संपून आता पाऊस सुरु झाला होता . पेशंटची पण गर्दी आताशा वाढली होती . डॉ. उमेश फक्त हुशारच नव्हते तर समंजस बोलके आणि मनमिळाऊ होते . आणि म्हणून लोकांचा ओघ आपोआप त्यांच्याकडे खेचला जात होता . त्यात प्रत्येक कामात कांताची तत्पर साथ त्यांना लाभत होती . लोकांच्या मनात डॉक्टरांबद्दल एक आदरभावना वृद्धींगत होत होती . कुणी पैसे नाही दिले तर ते कधी ओरडत नसत .
    आज सकाळपासून खुपच गर्दी होती . डॉक्टरांनापेशंट काही केल्या संपेनात . एक एक तपासून ते बाजूला काढत की पुन्हा दोन चार येऊन बसत . आज कांताबरोबर बोलायलाच नव्हते झाले .
पहिल्या बेडवरच्या पेशंटचे सलाईन संपलेय सर , तो खूप घाई करतोय जायची , स्काल्प काढू का ?”
हो कांता काढ , गोळ्या मी सकाळीच सांगितल्या आहेत .
    त्या पेशंटची घाई चालूच होती . कांताच्या मनात आले ज्यांना आजारी पडायलाही वेळ नाही मिळत ते लोक आजारी नको पाडत जाऊ देवा ….कांताने स्काल्प काढली आणि कॉटन ठेवून दाबून धरा असे सांगून ती दुसऱ्या पेशंटचा ताप चेक करू लागली . गडबडीत तो पेशंट दाबतो न दाबतो करत लगेच डॉक्टरांच्या पुढे जाऊन उभा राहिला . टेबलवर पडणारे रक्ताचे थेंब पाहून डॉक्टरांनी वर पाहिले तर त्या पेशंटच्या स्काल्प काढलेल्या जागेतून रक्ताची धार लागली होती . घाईने डॉक्टरांनी कॉटन घेऊन तिथे दाबून धरले .
कांता sssss, तुला कळत नाही का ? स्काल्प काढून व्हेन दाबून धरावी .
सर ..इतकेच बोलू शकली ती , खरतर तिची काहीच चूक नव्हती तिने सर्व सांगितले होते पेशंटला पण त्या पेशंटला मुलखाची घाई झाली होती . आणि डॉक्टरांनाही रागवताना ती प्रथम पाहत होती . त्यात सर्वांसमोर डॉक्टरांनी तीचा असा अपमान केला , ती खुपच दुखावली . तशीच थरथरत मान खाली घालून उभी राहिली . तिचे ओघळणारे अश्रू पाहून डॉक्टर भानावर आले . पण आता ते ओरडून बसले होते आणि ती रडत होती . दोघेही पुन्हा काहीच बोलले नाही . तिची जायची वेळ झाली तरी दोघे शांतच होते . जाताना डॉक्टरांना वाटले तिला समजवावे पण ते एक शब्दही उच्चारू शकले नाही . तिने आणि डॉक्टरांनी ती संध्याकाळ खूप व्यथित मनस्थितीत घालवली . डॉक्टरांना मात्र उगीच वाटत राहिले उद्या ती नाही आली तर......
       दुसऱ्या दिवशी एकाही अक्षर न बोलता वेळेवर कामाला आली आणि कामाला लागली . तिचे काम आवरले तेंव्हा कुणी पेशंट नव्हते आलेले . ती सर्व आवरून तिच्या जागेवर जावून बसली . डॉक्टरही खुर्चीत बसले होते . खोलीत खुपच शांतता होती . ती शांतता मात्र दोघांना व्यथित करत होती . तिला वाटले किती वाईट आहेत सर आपणच रागावले आणि आता स्वतःच बोलत नाहीत . आतापर्यंत किती बडबड केली असती . त्याच वेळी डॉक्टरांना वाटे कसे बोलू ? ती रुसणार तर नाही ? कशी क्षमा मागू तिची ?
कांता .मृदू शब्दात डॉक्टरांनी हळुवार हाक मारली . त्यांचे हे असे बोलावणे ती प्रथम अनुभवत होती . एक सळसळती वीज तिच्या सर्वांगातून फिरून गेल्याचा तिला भास झाला . ती खूप थरथरली . असे का बोलावले डॉक्टरांनी मला हे तिला उमगत नव्हते . कदाचित त्यांनी रोजच्यासारखी हाक मारली असेल पण मला भीतीने असे वाटत असेल . पण असे तरंग का फिरले माझ्या शरीरात ? आता ओरडतील की काय असे वाटल्यामुळे कदाचित फिरले असतील . तिच् तिच्या शंकांचे समाधान करत होती पण वास्तव काही वेगळेच होते . आणि कितीही नाकारून ते बदलणार नव्हते . तिलाही ओढ वाटत होती डॉक्टरांची तिच्या नकळत
हो सर .कांता अजूनही थरथरत होती . तशीच ती त्यांच्या पुढे जावून उभी राहिली .
राग आला ना माझा काल खूप ?” अजूनही ते त्याच सौम्य शब्दात बोलत होते .
नाही सर .बावरलेल्या कांताने उत्तर दिले . खरतर काल तिला त्यांचा खूप राग आलेला . तिने ठरवलेही होते त्यांना बोलून दाखवायचे . आणि आज शक्य असतानाही ती गोष्ट उघड करणे तिला जमलेच नाही . का मी डॉक्टरांना रागावू शकत नाही ?  हे कोडे तिला काही केल्या उलगडेना ..
खोटे बोलू नकोस कांता , तुला राग आलेला आणि तु रुसणार पण होती माझ्यावर , हो ना ?”
सर कसे ओळखत असतील माझ्या मनातल्या गोष्टी ?
नाही सर , खरंच नाही .लाजत तिने उत्तर दिले .
असो , पण आज एक सांगतो , बऱ्याचदा कामाच्या ताणामुळे , टेन्शनमुळे असे काही बोललो तर मनाला लावून घेत जाऊ नको . खरेतर माझा तुला दुखावण्याचा कमी दाखवण्याचा बिलकुल हेतू नसतो . कायम एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव इथे आपण माणसाच्या जीवनाबरोबर खेळ करतोय , या आपल्या कामात आपल्या थोड्या चुकीमुळे पेशंटवर जीव गमावण्याची वेळ येऊ शकते . आपण माणूस नीट करतोय , मशीन नाही . आपण बिघडवलेल्या गोष्टींची भरपाई आपण आयुष्य दिले तरी देऊ शकत नाही . म्हणूनच काम करताना नीट लक्ष देऊन करायला हवे  . इतके दिवस प्रत्येक पेशंटची स्काल्प तु काढतेस मग काल अशी चूक का केलीस ?”
सर , मी नीट समजावले होते पेशंटला पण तो खूप घाई करत होता . त्याने व्हेन दाबून धरलीच नाही . लगेच तुमच्यापुढे येऊन उभा राहिला . तुम्हीच सांगा यात माझी काय चूक ?” लहान मुलाने आपली बाजू समजावताना जी निरागसता दाखवावी त्याच निरागसतेने कांताने तिची बाजू मांडली . हिच्या चेहऱ्यावर प्रत्येक भाव किती मोहक दिसतो . जणू हे सर्व रस हिच्याच सौंदर्यासाठी बनले आहेत . क्षणभर डॉक्टर विचलित झाले , पण त्यांनी स्वतःला सावरले . असे आता अनेकदा घडू लागले . तिने हसावे त्यांनी तीचा मुखचंद्र न्याहळत बसावे ….
बर बर ठीक आहे . एक ध्यानात असू देत मी रागात काही बोललो तर मनावर नको घेउस .हसून डॉक्टर म्हणाले . तोवर एक पेशंट समोर येऊन बसला . हळूहळू गर्दी वाढत गेली ती संध्याकाळपर्यंत ...तिच्या जायच्या वेळेपर्यंत ...कांताच्या आयुष्यात पहिल्यासारखे हसत खेळत दिवस येऊ अन जाऊ लागले . डॉक्टर आता थोडे फटकून वागू लागले . तिच्याबरोबर कामाशिवाय बोलणे टाळू लागले . ते स्वतःला आणि स्वतःच्या मनाला आवर घालत होते . ते त्यांना खूप जड जात होते . ते तीचा चेहरा तिचे लक्ष नाही असे पाहून न्याहळत होते . तिला थोडा बदल जाणवायचा पण वाढलेल्या व्यापामुळे त्यांना ताण येत असेल असा समज तिने करून घेतला .
     एका दुपारी एक घोळका आत आला . त्यात एक प्रेग्नंट बाई होती . तिच्या प्रसव वेदना तिच्या व्याकुळतेने व्यापलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटल्या होत्या . ते कांता आणि डॉक्टर दोघांच्या लगेच ध्यानात आले . डॉक्टरांना डिलेव्हरी करणे माहित होते पण त्यांनी इथे आल्यास असे पेशंट केले नव्हते . ती बाई तर व्याकुळतेने  विव्हळत होती . तिच्या वेदना आता तिला असह्य होत होत्या . डॉक्टरांनी तिला चेक केले , तिला तर पुढच्या गावी प्रसुतीसाठी जाण्याइतका वेळ नव्हता . मग डॉक्टरांनी तिथेच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला .
कांता तुला जमेल न मदत करायला? नाहीतर रक्त पाहून चक्कर यायची .
का नाही जमणार सर ? मी दोन लेकरांची आई आहे विसरलात का ? करीन मी मदत फक्त काय करायचे ते सांगा .हसत कांताने मदतीची तयारी दाखवली . पण डॉक्टरांचा चेहरा का पडला याची उमग तिला होईना .डॉक्टरांना खूप राग आला तीचा , का ही सारखी मला जाणीव करून देत असेल तिच्या विवाहित आणि आई असण्याची ? तिला माझ्या मनातील उलघाल तर नसेल ना कळत ? ती केस डॉक्टरांनी कुशलतेने हातावेगळी केली . त्यात कांताची तत्पर साथ खूप मोलाची वाटली त्यांना . आजपर्यंतच्या तिच्या कामावरून आणि तिच्या तत्परतेमुळे , कुशलतेमुळे ,हुशारीमुळे ही एक चांगली ,उत्तम परिचारिका होऊ शकते हे डॉक्टरांनी ताडले होते .
       एके दिवशी दुपारी कांता अशीच दारात उभी होती . डॉक्टरही आत एकटेच बसले होते  . कुणी पेशंट नव्हते . तिला पाहून तिच्या नर्स होण्याबद्दलचा विचार डॉक्टरांच्या मनात पुन्हा डोकावला .
कांता इकडे ये जरा .समोर बसण्याची खुण करत डॉक्टर तिला म्हणाले.
हो सर आले , काय झाले ? काही आणायचे का ?”
बस इथे .समोरच्या खुर्चीकडे पुन्हा खुण करत डॉक्टर म्हटले .
सर ठीक आहे मी इथे बोला न .
तु आठवी पास आहेस का ?”
हो आहे न सर .
तु आता दहावीची परीक्षा देऊ शकशील ? बाहेरून फॉर्म भरून देता येते आता परीक्षा .
पण मी का देऊ परीक्षा ?”
अग् तुझे लग्न झाले , मुले झाली म्हणून काय झाले , तुझे वय तर बारावी तेराविच्या मुलीइतकेच आहे . तु जर दहावी पास झालीस तर नर्सिंग करू शकशील . एका उत्तम नर्सचे सारे गुण तुझ्यात आहेत . आणि सरकारी नोकरी लागली तर खूप छान होईल .
हो सर मला पण शिकावे वाटते . पण मला जमेल का ? मला अभ्यासाची पण आवड आहे . तरी झेपेल का हा दहावीचा अभ्यास ?”
अग् दोन वर्ष लागू देत पास व्हायला पण प्रयत्न तर कर .
पण आता कोण करणार इतकी खटपट ?”
तु उद्या इथल्या हायस्कूलच्या शिक्षकांना भेट , बघ काय म्हणतात .आणि जर अडचण आलीच तर मी आहे .
अदभूत तेजाने तिचे डोळे चमकत होते . डॉक्टर किती चांगले आहेत . मी एक कामाची बाई आहे , आपली कामाची बाई कमी होईन आणि आपली अडचण होईल हा विचार पण त्यांच्या निर्मल मनाला शिवला नसेल . यांचे खूप उपकार आहेत , काय माहित माझ्याच्याने कधी फिटतील ?
   दुसऱ्या दिवशी लगेच हायस्कूलच्या सरांना ती भेटून आली . तिला माहित होते की ती आज कामाला गेली की डॉक्टर पहिली ती चौकशी करतील . हायस्कूलचे सर तयार झाले मदत करायला . तिच्याकडे साधारण सहा महिन्यांचा कालावधी होता अभ्यासासाठी , पण ती झपाटून अभ्यास करू लागली . काम करून ती अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळत होती . तिच्या या जिद्दीने डॉ. उमेश खूप भारावले . त्यांना त्यांच्या शालेय जीवनाची आठवण झाली . तेही खूप जिद्दी आणि हुशार होते . म्हणूनच ते मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेवूनही डॉक्टर झाले .
    प्रसुतीचे पेशंट चालू झाल्यापासून कामाचा व्याप आणखी वाढला . जागेचा पण प्रश्न निर्माण झाला . डॉक्टरांनी शेजारी असलेली दुसरी खोलीही भाड्याने घेतली . कांताचे थोडे काम वाढले पण अजिबात कुरकुर नाही केली तिने , उलट उत्साहने ती काम करत राहिली . आणि जिद्दीने अभ्यास पण करत होती . कांताला अभ्यास आणि काम करताना बरीच कसरत करावी लागे . आताशा पेशंट खूप वाढले होते . तिला घरी जायला उशीर होऊ लागला . ती जागून अभ्यासही करायची . काही वेळा रात्री डिलिव्हरी पेशंट आले तर सर तिला न्यायला येऊ लागले . हौसा कुरबुर करायची पण कांताने त्याकडे दुर्लक्ष केले . महिन्यात एकदोनदा तिला असे जावे लागे . तिथे सोबतीला पेशंटचे नातेवाईक असायचे , आणि सरांबद्दल खूप विश्वास होता  . असेही डॉक्टर आणि कांता यांचे समाजात वावरणे असे होते की कुणी आवर्जून जरी ठरवले त्यांच्यात कुठले नाते दाखवायचे तरी दाखवू शकणार नव्हते . आता कांताची सर्वांशी ओळख झाली होती . त्याचे कारण तिचे सर्वांशी प्रेमळ लाघवी बोलणे , त्यांची मनापासून काळजी घेणे , त्यांना मदत करणे हे होते . त्यामुळे कांता जर दिसली नाही तर लोक आवर्जून विचारत ,” डॉक्टर कांता कुठे गेली ?”  डिलिव्हरी साठी नाव नोंदवून जाणाऱ्या बायका तिला तिथे थांबण्याबद्दल आग्रह करत . आता कांता सर्वांची आवडती झाली होती . तिने पेरलेल्या चांगल्या बीजांची तर ही फळे होती . खरोखर ती एक चांगली नर्स होती आता नावापुरते डिग्री घेणे बाकी होते  .
     कांताची परीक्षा जवळ आली होती . अभ्यास करण्यासाठी ती सरांना विचारून लवकर घरी जाऊ लागली . डॉक्टरही तिला अडवत नसत . त्यांना तिला नर्स झालेले पहायचे होते . तीचा सहवास कमी मिळतो याचा त्रास व्हायचा त्यांना पण तसे उघड बोलून दाखवणे शक्य नव्हते . संध्याकाळी पेशंट नसले की त्यांचा जीव कासावीस होत असे . आजकाल त्यांच्या मनात कांताच्या जवळ जाण्याची मनीषा डोकावत असे . तिच्याबद्दल आपल्या मनातील हे प्रेम तिच्यापुढे व्यक्त करावे असे राहून राहून त्यांना वाटे . पण व्यावहारिक विचार त्यांना तसे न करण्यास प्रवृत्त करे . शिवाय आपण असे आत्ता बोललो आणि तिच्या मनात असे काही नसेल तर उगीच तिच्या अभ्यासात अडथळा निर्माण व्हायचा असेही त्यांना वाटे . एकटेपणी तिची हसणारी मुद्रा , तीचा झालेला ओघवता स्पर्श आठवून ते जास्तच व्याकुळ होत . तिची कमतरता ती नसताना तर खूप जाणवायची . त्यांना त्याचा सर्वात जास्त त्रास जेंव्हा तिने परीक्षेसाठी पंधरा दिवस सुट्टी घेतली तेंव्हा झाला . त्या दिवसात पेपरला जाताना ती सरांना भेटून जात असे . तिच्या या अनुपस्थितीत सरांना काम करावे लागू नये म्हणून शेजारच्या एका मावशीना तिने सफाईची जबाबदारी सोपवली . ती तिच्या परीने सरांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करत होती . तिची कामाबद्दलची जबाबदारीची जाणीव खरोखर वाखाणण्याजोगी होती . रोजंदारीवर काम करणारे लोक सहसा मालकाच्या अडचणीचा विचार करत नाहीत , पण ती तशी नव्हती , म्हणून डॉक्टरांना तिचे खूप कौतुक वाटे . ती काम तिच्या आनंदासाठी समाधानासाठी करत होती , पैशासाठी नाही . ते पंधरा दिवस डॉक्टरांनी असमाधानात आणि गैरसोयीत घालवले .   कांताची कमी त्यांना तीव्रतेने जाणवायची . तिच्या सकाळच्या पाच मिनिटाच्या भेटीसाठी ते व्याकुळ व्हायचे . सकाळी तिच्या क्षणभर दर्शनाची वाट ते उत्कटतेने पाहत असत . ती  सरांना देव मनात होती , तिच्या आयुष्याला दिशा देणारा देव ! रोज पेपरला जाताना म्हणूनच ती त्यांच्या चरणांना स्पर्श करणे विसरत नव्हती . सुरवातीला डॉक्टरांना अवघडल्यासारखे वाटे पण नंतर ते आनंदाने तिला आशीर्वाद देऊ लागले . पंधरा दिवस कसे गेले हे तिला अजिबात समजले नाही पण डॉक्टरांना प्रकर्षाने तिच्या त्यांच्या आयुष्यातील स्थानाविषयी जाणीव झाली . तिच्या परीक्षा संपल्या . ती रोजच्यासारखी कामावर रुजू झाली . पुन्हा एकदा त्यांच्या आनंदी सहवासाचे दिवस बहरू लागले . काही दिवसांच्या विरहामुळे व्याकुळ , डॉक्टरांचे मन धीट होऊन तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले . तिलाही डॉक्टरांचे बदलेले वागणे उमजू लागले . या बदल झालेल्या वागण्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न ती करत नव्हती कारण तेच आता तिला मोहात गुंतवू लागले . तिला दोघांच्या विषमतेच्या जानीवेपासून तो मोह तिला दूर करू लागला . तिला त्यांचा प्रेमभारला सहवास हवासा वाटत असे . प्रेमाने , आनंदाने , दु:खाने व्यथित झाल्यावर डोके टेकण्यासाठी तिलाही एका खांद्याचा हव्यास वाटू लागला . अजूनपर्यंत तरी त्या दोघांमध्ये मानसिक , भावनिक बंध गुंफले जात होते . शारीरिक बंधाच्या कल्पनेपासून ते कोसो दूर होते . याच वेळी डॉक्टरांच्या मनात याच शरीरबंधाची ओढ उत्कटतेने हेलकावे घेत होती . पण आपण असे केले तर ती कदाचित आपल्यापासून दूर जाईल ही भीतीही त्यांचे मन ग्रासून होती . ते मोठ्या कष्टाने तिच्यापासून दूर राहत होते .
    डॉक्टरांनी दवाखाना सुरु करून एक वर्ष पूर्ण होत होते . त्यांना खूप चांगला प्रतिसादही मिळाला होता . वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाला त्यांचे आई वडील हजर होते . कांता त्यांना प्रथम पाहत होती . त्यांच्या आई वडिलांच्या दृष्टीने ती एक हाताखाली काम करणारी बाई होती . आणि तशीच वागणूक ते तिला देत होते . या त्यांच्या वागणुकीने कांता खूप व्यथित झाली . आपण खरे काय आहोत आणि कुठली स्वप्न पाहत आहोत या जाणीवेने तीला  मेल्याहून मेल्यासारखे झाले त्या दिवशी डॉक्टरांच्या लग्नाविषयी पण बरीच चर्चा होत होती . काम सांभाळत त्यांचे बोलणे कांता कान देऊन ऐकत होती . आता तिच्या मनातील भावनांचे कल्लोळ तिला दाद देत नव्हते . ते इतरांना दिसू नये म्हणून ती खूप प्रयत्न करत होती , मनाला आवरत होती ,सावरत होती. हे सर्व कुणाला दिसू नये म्हणून ती सर्वांसमोर येणे टाळत होती . डॉक्टर मात्र ती थोडी नजरेआड झाली तरी तिच्या मागे येत होते . आज त्यांच्या मनात काही वेगळेच विचार होते . त्यांच्या प्रेमभावनेचा उच्चार ते आई वडीलांसमोर करणार होते . त्यांचे मागे फिरणे तिला खूप व्यथित करत होते . दिवसभर पेशंट , डॉक्टरांचे नातेवाईक , पुढारी भेट देण्यासाठी येत होते . त्या गडबडीत डॉक्टरांना अजिबात वेळ मिळत नव्हता आई वडिलांशी बोलायला . काम आवरून घरी जायला तिला त्या दिवशी खूप उशीर झाला .
      त्या दिवशी ती कामामुळे शरीराने आणि विचारांच्या वादळामुळे मनाने खूप दमली होती . मनातील असंख्य विचार तिला झोपू देत नव्हते . पहाटे तिला झोप लागली . तोवर तिने मनाला सावरले होते . डॉक्टरांसाठी मी थोडीही पात्र जोडीदार नाही  हे तिच्या मनाने मान्य केले . डॉक्टरांची ओढ बघता जरी हट्टाने तो प्रयत्न आपण केला तरी दुराग्रही समाज ही गोष्ट कदापी मान्य करणार नाही . यात आपली , दोघांच्या आई वडिलांची आणि डॉक्टरांची अशी काही बदनामी होईल जी आपण पूर्ण आयुष्य वेचले तरी भरून येणार नाही . सरांनी आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला म्हणून त्यांचाच हात पकडून चालणे योग्य नाही . हा शुध्द स्वार्थीपणा होईल , नव्हे लोक असेच म्हणतील . आणि चुकून आपली मुले आपल्याकडे परतली तर कुठल्या नात्याने आपण त्या मुलांना तोंड दाखवणार आहोत ….. या शेवटच्या विचाराने तिच्या सर्वांगाचा थरकाप झाला . अंगातून घाम निथळू लागला . डॉक्टरांना पण इथेच थांबवून त्यांच्या नव्या आयुष्याची सुरवात करून देणे आपलेच कर्तव्य आहे . त्यांना नव्याने उभे करून आपण त्यांच्या आयुष्यातून कायमचे जायचे हे मनाशी पक्के केले तेंव्हाच ती झोपू शकली . तिला कळत होते हे योगिनी सारखे जीवन कंठने किती अवघड आहे पण त्याशिवाय तिला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नव्हता .
    आताशा तिचे वागणे डॉक्टरांना खूप खटकत असे . पण त्यांना तसे बोलून दाखवता येत नसे .
. तिचे हसणे आणि बोलणेही कमी झाले होते . ती त्यांच्याशी कामापुरतेच बोलत होती . जरी बोलली तरी फक्त त्यांच्या लग्नाविषयी विषय काढायची , आई वडिलांच्या निरोपाविषयी चौकशी करायची , आणि मुली पाहणे चालू करा असा सल्लाही द्यायची . मग डॉक्टर वैतागून म्हणायचे मी मुलगी पाहिली आहे . पण कोण ? हा प्रश्न विचारण्याचे धाडस तिने कधी करू शकली नाही . तिलाही उत्तर माहित होते ....
      तिच्या निकालाच्या दिवशी खुपच  टेन्शन मध्ये होती . तिला माहित होते जर आपण पास झालो तरच पुढे शिकायचे म्हणून डॉक्टरांपासून दूर जाऊ शकणार आहोत . पास झाल्याचे कळताच तिचे मन खिन्न झाले , तिला जरी किती दूर जावेसे वाटे तरी तिचे मन अजून त्यासाठी पूर्ण तयार नव्हते . शेवटी तिच्या आयुष्यातील अतिप्रिय सुखाचा त्याग तिला करायचा होता , इतरांच्या सुखासाठी .... आणि असे ठरवणे कितीही सोपे असले तरी त्या प्रक्रियेतून जाने ,ते जीवन जगणे ही अतिअवघड गोष्ट आहे . पण तरी ती हसून वरवर आनंद व्यक्त करत होती . डॉक्टर मात्र खूप खुश होते . त्यांची कांता त्यांच्या अपेक्षेप्रमाणे एकेक पायरी पादाक्रांत करत होती . सर्वस्वी तिच्या हिमतीवर , कष्टाने तिने हे यश संपादन केले होते . तिच्या हुशारीबद्दलचा विश्वास आणि तिच्याबद्दलचा आदर डॉक्टरांच्या मनात द्विगुणीत झाला होता . तीचा गुलाबासारखा खुललेला चेहरा पाहून आज डॉक्टरांनी ठरवले आपले प्रेम तिच्यासमोर व्यक्त करायचे . दिवसभर त्याच प्रयत्नात होते डॉक्टर , पण त्यांना ती संधी मिळालीच नाही . त्यांच्या मनातील विचार मनातच राहिले . कुठलीही दबलेली गोष्ट स्फोट होऊन बाहेर पडते हे समजण्याइतके डॉक्टर हुशार होते . पण प्रेम ही अशी वेड लावणारी गोष्ट आहे जी बुद्धीमान माणसाची मतीही बधीर करून टाकते . डॉक्टरांचीही तशीच गत झाली होती . दोन चार दिवस हे विचार त्यांच्या मनात तसेच खदखदत होते , त्यांना अस्वस्थ करत होते पण त्यांच्याच्याने ते व्यक्त करणे काही त्यांना जुळेना .
      त्या दिवशी रात्री दोन वाजता डॉक्टर कांताला न्यायला आले . डिलिव्हरीची पेशंट आली म्हणून न्यायला आले असा कांताचा समज झाला . पण डॉक्टरांची अस्वस्थता तिने ओळखली , आणि तीही जरा काळजीत पडली . पावसाची रिपरिप झाली होती . रस्त्याने चिखल झालेला . त्यातून वाट काढत दोघे दवाखान्यात आले . तिथे निरव शांतता होती . कुठल्याही पेशंटचा मागमूस नव्हता . कांता जरा हादरली हे पाहून , पण डॉक्टरांवर तीचा पूर्ण विश्वास होता म्हणून त्यांच्या मागोमाग ती आत आली . आता मात्र डॉक्टरांचा नूर मात्र पूर्ण पालटला . इतक्यादिवस आत दाबून ठेवलेली प्रेम भावना  खळखळ  डोळ्यातून झरू लागली . एखाद्या असहाय बालकाप्रमाणे ते रडत होते . कांता खूप अस्वस्थ झाली आता . त्यांनी तिचे हात धरले आणि अलगद बाकावर बसवले . त्या स्पर्शाने ती पुरी मोहरली पण तसे दाखवणे तिने कटाक्षाने टाळले . डॉक्टर तिच्यासमोर गुढग्यावर येत जमिनीवर बसले . तिच्या मांडीवर डोके टेकवून ते तिला अश्रूंचा अभिषेक घालू लागले . ते रडत आहेत हे पाहून आधी त्यांच्या अनआकलनीय वागण्याने बावरलेली कांता व्याकुळ होऊन रडू लागली .
कांता सांग ना का दूर दूर राहतेस माझ्यापासून ?” घोगऱ्या आवाजात डॉक्टर विचारत होते . कांताला माहित होते अश्या वेळी आपण कितीही समजूत घातली तरी ते समजून घेणार नाहीत , म्हणून काही न बोलता हळुवार ती त्यांच्या केसातून हात फिरवत राहिली .
कांता मी खूप प्रेम करतो गं तुझ्यावर , मला तुझ्या सहवासात खरंच खूप सुख लाभते . हे सुख मला आयुष्यभर हवे आहे . तु  माझी जीवनसाथी हो ना . असे झाले तर या पृथ्वीतलावर माझ्याइतका सुखी माणूस कुणी नसेल . मला फक्त तुझ्या शरीराची ओढ नाही तुझ्या प्रेमळ सहवासाची आहे . तु माझी हो ना कांता . आपल्या एक होण्यामुळे कितीही त्रास सोसावा लागला न जगाचा तरी माझी तयारी आहे . आणि इथे प्रोब्लेम होऊ लागले तर आपण दूर कुठे जाऊ तिथे राहू . कांता प्लीज नाही म्हणू नको . मी तुझ्याशिवाय श्वास पण नाही घेऊ शकत . मला तुझ्या भूतकाळाशी अजिबात देणेघेणे नाही , मला तुझा भविष्यकाळ हवा आहे . बोल ना काहीतरी कांता , प्लीज ...व्याकुळ होऊन डॉक्टर तिची आर्जवे करीत होते . मान वर करून आता ते तिच्याकडे पाहू लागले . ती रडत होती . त्यांनी तीचा चेहरा ओंजळीत धरला . तीही खूप मोहरली होती : त्यांच्या स्नेहमय शब्दांनी आणि प्रेमभरल्या स्पर्शाने ! क्षणभर दोघे एका अनामिक ओढीने एकमेकांना पाहत राहिले . दोघांचे श्वास आता एकरूप झाले होते . तिने गच्च डोळे मिटले . अचानक बाहेर जोराचा पाऊस कोसळू लागला , ती भानावर आली . पाऊस जणू तिला तिच्या निश्चयाची आठवण करून देण्यासाठीच कोसळत होता ....
मला घरी नेऊन सोडवा , कृपा करून सर ..थरथरत ती इतकेच बोलू शकली . डॉक्टर पण आता सावरले होते . त्यांच्या मनाला पोखरणाऱ्या प्रेमभावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या ..ते मोकळे झाले होते . आपण काय करू पाहत होतो ही जाणीव होताच ते थोडे बावरले , कारण त्यांचा प्रेम व्यक्त करण्यापलीकडे तिला इथे आणण्याचा दुसरा काहीच हेतू नव्हता .
अगं पण पाऊस आहे जोराचा , पाऊस ओसरल्यावर सोडतो .
नाही आता लगेच सोडवा , असू देत पाऊस .
तुला राग आला न माझा , सॉरी कांता ..
नाही सर राग नाही , पण आई ओरडेल .
बर सोडवतो , पण घरी गेल्यावर सांग पेशंट पुढे पाठवले म्हणून .
हो सर .
  अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंत पाऊस चालू होता . ते दोघेही भिजत होते . पण नंतर त्यांच्या मनातील ओसरणाऱ्या वादळासोबत तोही ओसरला . डॉक्टरांना हलके वाटत होते पण कांताचे अंतकरण जड झाले होते .....
      दुसऱ्या दिवशी कांता वेळेवर कामाला हजर झाली . सर्व काम आवरून कुणी नाही असे पाहून डॉक्टरांसमोर खुर्चीवर जाऊन बसली . तिची नजर मात्र जमिनीकडे होती .
सर मी नर्सिंगला अडमिशन घेणार आहे .
अरे छानच , मीही तुला तेच सांगणार होतो .आपल्याला कदाचित ही होकार देणार असे वाटून ते हर्षभराने बोलले . त्यानाही वाटे जर ही नर्स झाली तर आपल्या घरून हिला जास्त विरोध होणार नाही .
सर मी हायस्कूलच्या सरांना त्या निकालाच्या दिवशी बोलले होते . आज त्यांनी घरी येऊन फॉर्म पण भरून नेला .
छान केलेस .
सर मी उद्यापासून कामाला येणार नाही . पण तुमची अडचण होऊ नये म्हणून शेजारच्या मावशींना सांगितले आहे . आता त्या येतील कामाला , त्यांचाच बारावी झालेला मुलगा आहे तो येईल मदतनीस म्हणून . तुम्हाला न विचारता हे ठरवले त्याबद्दल सॉरी....
नाही असे काही नाही , त्याबद्दल नको सॉरी म्हणू . उलट तूच माझ्या अडचणी दूर केल्यास कामाला माणसे बघून . याबद्दल मीच तुझा आभारी आहे .
आणि एक सांगायचे होते सर , तसा लहान तोंडी मोठा घास घेते पण सांगावेसे वाटतेय . सर आई बाबा पाहतील ती मुलगी बघून लग्न करा . सुखाने संसार करा . माझी वाट वेगळी आहे . आपले रस्ते फक्त समांतर जाऊ शकतात आणि समांतर रेषा कधीच एकमेकीत मिसळत नाहीत . म्हणून माझे विचार झटकून टाका . थोडे दिवस दु:ख वाटेल पण तुम्हीच म्हणता ना , अश्वत्थाम्याच्या भाळी असलेल्या जख्मेसारखे दु:ख हाही एक शाप आहे समाजाला . हेही सर्व विसरून जाल . एकदा लग्न झाले की माझी आठवण पण होणार नाही . आणि तुम्हाला नक्की प्रेमळ सहचारिणी लाभेल . तुम्हीच खूप चांगले आहात ...
तूच सारे ठरवून मोकळी झालीस , हे सर्व ठरवताना तुला एकदाही माझा विचार करावा नाही वाटला ? मीही वेडा आहे माझे प्रेम आहे मग तुझेही असावे असा काही नियम नाही .विषण्ण मनाने डॉक्टर बोलले . त्यांचे डोळे गच्च झाले होते . तीचा हा नकार कसा सोसायचा या विचारांनी शरीर थरथरत होते . कांता स्वतःला बळेच सावरत होती . त्यांच्या अश्रूंनी तिच्या जिवाचीही कालवाकालव होत होती . तिलाही किती कठीण होते त्यांच्याशिवाय जगणे , त्यांच्यापासून दूर राहणे .
सर असे का बोलता ? खरे तर माझेही खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर . तुमच्याशिवाय जीवन माझ्यासाठी शाप आहे . पण तरी तुमचा अपमान , अवहेलना पाहणे मला नाही जमणार . माझी परीक्षा झाली तेंव्हापासून मी माझे प्रेम ओळखले होते . पण दवाखान्याच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात आपल्या दोघांमध्ये असलेली तफावत दिसली . खरंच आपण फक्त समांतर जगू शकतो एकत्र नाही हे कळून चुकले .
कांता असे नको करू . तुझ्यासाठी मी सर्व सोडायला तयार आहे . तु दूर नको जाऊ . तुझ्याविना जीवन अशक्य आहे .
नाही सर , सर्व सुरळीत होईल . आपले कामच आपल्याला जगणे शिकवेल . किती दु:ख आहे जगात . आपण तर प्रेमाची एक अंतरआत्मा उजळवणारी ज्योत मनात ठेऊन दूर जाणार आहोत . एकदा संसारात रमलात की सर्व काही विसरून जाल . मुलांचा सहवास यापेक्षा दुप्पट आनंददायी असेल . खरे सांगू सर , तुम्हाला तरी एक किरण आहे जीवनात येईल असा , पण माझ्या आयुष्यात तर फक्त अंधार आहे . पण तरी मी हरणार नाही . तुम्ही मला मान ,सन्मान आणि आत्मभान दिलंय . रुग्णसेवेची ज्योत हाती घेवून मी माझे आणि इतर व्यथित जीवांचे जीवन उजळवणार आहे ; तुमचा आशीर्वाद घेऊन .....

कांता ssss माझी कांता ....इतकेच बोलू शकले डॉक्टर . खरंच किती महान बनली होती ती . आपल्या आयुष्यात अडचणी उभ्या राहू नयेत म्हणून तिने आज तिच्या सुखांची होळी पेटवली होती .....आज ही नवऱ्याने टाकलेली पोर व्यथितांचे जीवन उजळण्याची मनीषा अंतरी साठवून पुढे जाणार आहे... ...आपल्यापासून दूर ....