या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 11 May 2020

शब्द शोधत जगावं

जगणं अवघडून उभं राहिलं की , 
आपलं आपणच उमजून घ्यावं  
आपल्याच प्रश्नांची उत्तरं शोधत 
बोलता बोलता निशब्द व्हावं 
जावं खोलवर रूतत भूतकाळात 
आणि शोधावित नव्यानं 
जगण्याची कारणं ..
सापडली ती तर जगणं आपली म्हणावं 
नाहीतर .....
सुर्योदयानं संपणार्या अंधाराला आठवावं 
फुटू द्यावेत धुमारे वाळलेल्या खोडावर 
सुर्योदयाची वाट पाहात ..शब्द शोधत जगावं ! 

Friday, 8 May 2020

दारूबंदी आणि करोना

  परवापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे . सर्वत्र दारूदुकानांना चालू ठेवण्यासाठी मिळालेल्या शासकीय परवानगीमुळे समर्थनार्थ असमर्थनार्थ प्रतिक्रिया प्रत्येकजण मांडत आहे . ढासळनारी अर्थव्यवस्था हे कारण सरकारने दिले असले तरी चर्चा करणारे अनेक कारणे सांगत आहेत . कुणाला काळजी आहे अनेक दिवस दारू न मिळाल्याने होणार्‍या त्रासाची तर कुणाला वाटते दारू प्रमाणात पिल्याने काय होणार आहे ? दारू म्हणजे फळांचा रस तर आहे ! काहीजण दारूला प्रतिष्ठा देवू पाहत आहेत . अनेकांनी दारूचा इतिहास सांगून त्याची भलामन केली . आपले देवदेवता पितात , पूर्वज घ्यायचे वगैरे . कुणाला श्रमपरीहारासाठी हवी आहे . अनेकांनी मानसिक आरोग्याचे कारण पुढे केले . करोंनामुळे आलेले मानसिक तणाव कमी व्हावेत ही काहींची इच्छा आहे . काहीजनांना कुटुंबासोबत (बायको ) राहून होणार्‍या भांडणावर दारू हा इलाज वाटतो . सरकार म्हणते राज्याची बिकट आर्थिक अवस्था सावरण्यास दारूच्या विक्रीतुन मिळणारा महसूल गरजेचा आहे . दारू पिणारे , विकणारे आनंदात आहेत . अनेक विनोद केले जात आहेत . दारूडे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत वगैरे .

   ज्या देशाच्या इतिहासात महात्मा गांधी हे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते . ज्या गांधी विचारांनी भारताच्याच नाही तर त्यानंतर स्वतंत्र झालेल्या प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली आहे . तळागाळातील प्रत्येक व्यक्ती जोवर दु:खात आहे अडचणीत आहे तोवर माझे कार्य चालूच राहील असे गांधीजी नेहमी म्हणत . गांधीजींचे दारूबंदीचे काम सर्वश्रूत आहेच . त्यांचे याविषयी योगदान खूप मोलाचे आहे . नशा केल्याने त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान तर होतेच परंतु त्यांच्या मुलांचे स्रियांचे अनन्वित छळ होतात . नशेमुळे क्रियाशीलता संपुष्टात येते . आर्थिक संकटाचा त्या कुटुंबाला सामना करावाच लागतो परंतु उपासमार सुद्धा होते . समाजातील शोषित स्रियांच्या जीवनात आनंद यावा , मुलाबाळांची उपासमार होऊ नये म्हणून गांधीजींनी दारूबंदीचेही आवाहन केले होते . या त्यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असे . असाच एक उल्लेख गांधीजींना लिहीलेल्या म्हैसूर राज्यातील होल्लीकेरी येथील एका पत्रलेखकाने केला आहे . तो म्हणतो , “माझ्या रानी परज जमातीच्या लोकांनी दीड महिन्यापासून ताडी व इतर मादक पेये पिण्याचे पुर्णपणे सोडून दिले आहे . कुणी जर नशा करण्याचा प्रयत्न केला तर गावाचे नाईक , यजमान आणि करभान यांच्याकडून दखल घेऊन कडक शासन केले जाते . यामुळे झोपड्यात आता भांडणे होत नाहीत . त्यांच्या बायका आनंदाची बातमी देतात . त्यांचा काळ शांततेत चालला आहे .” या पत्राला उत्तर देताना गांधीजी त्यांचे अभिनंदन करतात . शुद्धीकरण चळवळीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक करतात . 1921 च्या चळवळीचा उल्लेख करून ते म्हणतात की त्यावेळी घडले त्याप्रमाणे पुन्हा हे लोक नशेकडे वळू नयेत म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत . त्यासाठी त्यांना चरख्याचा आश्रय घ्यायला लावायला हवा . त्यामुळे त्यांचे कापडावर खर्च होणारे पैसेही वाचतील आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील . दारुवर खर्च होणारा पैसा पण वाचेल . गांधीजी पुढे जावून हेही सांगतात की नशामुक्ती इतकेच ध्येय नाही तर व्यसनांचे उच्चाटण झाल्याचा अहवालही आपण द्याल याची मला उत्सुकता आहे .

  या पत्रानंतर बनसाडा संस्थांनातील रानी परज चौकशी समितीचा अहवाल आहे . तो वल्लभभाई पटेल यांनी या संस्थांनातील 47 गावांना भेटी देऊन काढला आहे . यात ते महाराजसाहेबांच्या प्रजेच्या प्रती केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख करतात . त्याचे गांधीजी कौतुकही करतात . परंतु ते महाराजसाहेबांना सांगतात , “ जोवर आपण दारूच्या व्यापारातून प्राप्ती करणे आवश्यक मानतात तोवर तुम्ही जे काही तुमच्या माणसांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे . बनसाडा प्रदेशाला लागून असलेल्या ब्रिटिश , गायकवाड व धरमपुर या तीन शेजारी प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे तुमच्या संस्थांनाला दारूबंदीचे धोरण यशस्वी करणे अवघड जात आहे . ही गोष्ट खरी आहे . पण महान गोष्टी महान त्यागावाचून आणि महान उपाययोजना केल्यावाचून अमलात आणता येत नसतात . आपल्या संस्थांनाला संपूर्ण दारूबंदी जाहीर करून या कामी पुढाकार घेता येईल . इतकेच नव्हे तर शेजारच्या राज्यात दारूबंदीकरता चळवळ करणेही शक्य होईल . मुख्य गोष्ट दारूपासून मिळणारा महसूल सोडून देण्याला तयार होण्याची आहे . या बाबतीत लागलीच हाती घ्यायचा उपक्रम म्हणजे , मद्यपानाला बळी पडलेल्या जमातीत जोराचा मद्याविरोधी प्रचार चालविण्याव्यतिरिक्त हा महसूल इतर कोणत्याही कामी , मग ती कामे कितीही प्रशंसनीय असली तरी , वापरायचा नाही असे ठरविणे हा होऊ शकेल . कोणत्याही संस्थांनाला आपल्या लोकांनी या दुर्व्यसनाचा त्याग करावा असे मनापासून वाटत असेल , त्याला या दुर्व्यसनात लोळत पडणे कायद्याने अशक्य करून स्वस्थ बसता येणार नाही , त्याला त्या दुर्व्यसनाचे मूळ शोधून लोकांनी त्याचा त्याग करण्याविषयीचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल . दारूबंदीचे कोणतेही धोरण जर मी सुचविलेल्या स्वरुपाच्या रचनात्मक कार्याच्या जोडीने अमलात आणण्यात आले तर त्या धोरणांचा परिणाम त्या लोकांची आणि त्यांच्याबरोबरच त्या संस्थानाची उतरोत्तर अधिक भरभराट होण्यातच खात्रीने होणार . संपूर्ण दारूबंदी अमलात आणण्याच्या दृष्टीने जगात हिंदुस्तान हाच सर्वात आशादायक देश आहे याचे साधे कारण आहे की , येथे व्यसनासक्ती ही प्रतिष्ठेची किंवा छानछौकीची गोष्ट मानली जात नाही आणि ती काही विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे !” ( महात्मा गांधी यांचे संकलित वाङ्मय खंड 34 )

     वरील गोष्टीवरून आधी केलेल्या सर्व दारू / व्यसनविषयक समर्थनाची उत्तरे गांधीजींनी आधीच दिलेली आहेत . खरेतर उच्चमध्यमवर्ग सोडला तर दारू आणि इतर व्यसनांमुळे कुटुंबातील स्रिया आणि मुलांची होणारी परवड अत्यंत क्लेशकारक आहे . मागे काही दिवसापूर्वी अशीच एका सासू सून आलेल्या . त्या मुलीचा नवरा हातभट्टीची दारू पिल्याने गेला होता . त्या दोघीही सासूसुनेनी बरे झाले मेला कमीतकमी लेकरबाळांच्या मुखात घास जातोय आता अशी प्रतिक्रिया दिली . जेंव्हा एक आई आणि बायको अशी बोलत असेल तेंव्हा खरोखर त्यांना या व्यसनाधीन मुलाचा / नवर्‍याचा किती छळ सहन करावा लागत असेल याचा विचारही करवत नाही . बरे श्रमपरिहार म्हणून मजूर घेत असेल तर त्याच वेळी त्याची बायकोही तितकेच काम करत असते मग तिचा श्रमपरिहार कसा होणार ? काही आदिवासी स्रिया अशी व्यसने जरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांचे होणारे शोषण कुणी का पाहू शकत नाही . बापाचे अनुकरण मुलगा नकळत्या वयात करू लागतो आणि वयाची पंचविशी होण्याआधीच संपतो . समाजातील तरुणांना निष्क्रिय करणारी दारू राजरोस मिळू लागली तर खरोखर आपल्या देशाची भरभराट होईल का ? आताच्या करोंनाच्या पार्श्वभूमीवर जर हे दारू पिऊन संतुलन हरवलेले लोक रस्त्यावर फिरून /पडून करोंनाचा प्रादुर्भाव वाढवणार नाही का ? आणि जर असे झाले तर आजवर ज्या लोकांनी प्रामाणिकपणे लॉकडावून पाळले , ज्या पोलिस डॉक्टर आणि इतर यंत्रणांनी स्व:ताचे जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांचे प्रयत्न मातीमोल होणार नाही का ?  एसी मध्ये बसून समर्थन करणारे यांना एकच आवाहन करावेसे वाटते की , त्यांनी अशाप्रकारे उध्वस्त होणार्‍या दहा कुटुंबाची तरी जबाबदारी घ्यावी आणि मग दारूबंदीला विरोध करावा . माझ्या एक वकील स्नेही दिलशाद मुझावर कोल्हापूरच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत . त्या दारुमुळे होणार्‍या मुलांच्या आणि महिलांच्या दुर्दशेचे शोषणाचे वर्णन करीत होत्या . ऐकून ज्या गोष्टी अस्वस्थ करतात त्या जगताना त्या लोकांची काय अवस्था होत असेल . व्यसनाधीनतेमुळे वाढणारी गुन्हेगारी , घरगुती हिंसा याला शासन फक्त कायदे करून आळा घालू शकत नाही . कारण निम्यापेक्षा जास्त गुन्हे पोलिसांपर्यंत जातच नाहीत . जे जातात त्यातही न्याय मिळणारे कितीतरी अल्प आहेत . महसुलाचे कारण पुढे करणे योग्य नाही . महसुलाचे तेच एकमेव साधन नाही . आणि ज्यांच्या सोईसाठी हा महसूल गोळा होईल त्यांचे आणखी हाल वाढणार असतील तर याला अर्थ तरी काय ? हे म्हणजे पेशंट नाही म्हणून डॉक्टरने निरोगी माणसांच्या किडन्या  विकण्यासारखे झाले ! महसुलासाठी जर सरकार दारुविक्रीला परवानगी देत असेल आणि आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत असेल तर सरकारला गांधीजींच्या त्या शब्दांची आठवण करून द्यावीशी वाटतेय , “ जोवर दारूच्या व्यापारातून प्राप्ती काढणे आवश्यक मानतात तोवर ते जे आपल्या लोकांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे !” 


Wednesday, 8 April 2020

मला का वाटलं !

मला का वाटलं ....
माझी वेदना तुझ्या डोळ्यातून झरत होती ..
कुठेतरी खोलवर आतमधे जी सलत  होती ...
न सांगायचे ठरवलेही होते ..
मला न्याय नकोच आहे आता ...
मरणाने शांतपणे यावं आणि कुरवाळत जवळ घ्यावं ..
इतकीच आस होती ...
माझे अश्रूही  गेलेत सुकून ...
मागत नाहीत ते मुक्तीचं दान हल्ली ...
पण फिरतात माझ्या कणाकणात ....
बारीकशी सल होऊन ...
झुरतात ते दिवसरात्र ...
विझलेली आग होऊन ...
संपलेल्या आयुष्याची इतकीच खूण बाकी होती ...
तरीही मला का वाटलं ...
माझी वेदना तुझ्या डोळ्यातून झरत होती ...
जीवनाच्या यशाचा लिहीला जाईल इतिहास जेव्हा ...
अपयशाची कारणे माझ्या मातीआड गाडली जातील ...
हीच एक आशा मला पुनःपुन्हा सावरत होती ...
डॉ संध्या शेलार .

Thursday, 5 September 2019

तुझ्यापासून

तुझ्या आठवणींची आता सुरुवात तुझ्यापासून
मला नवी कविता सुचली अर्थात तुझ्यापासून


कालचे काही क्षण मनात गोठून गेलेले 
आता रोज त्यांची उजळणी, लपवून तुझ्यापासून


तू भेटल्याने नव्याने भेटलेले मला तरुणपण
माझ्या छोट्या गोष्टीही आणते मिरवून तुझ्यापासून


ओढ, उत्सुकता आणि तुला जाणून घेण्यातला नवेपणा
नव्या  प्रेमाचा गंध येई बहरून तुझ्यापासून


छान प्रेमाच वाटल्या  अन मिळालेल्या कौतुकाचं ही
नातं देईल बळ दोघांना, माझ्यापासून, तुझ्यापासून


भविष्य काही असो अन काही असोत पुढच्या गोष्टी
माझा आनंद आभाळभर, अन त्याचा उगम तुझ्यापासून.......... 


Saturday, 24 August 2019

आठवण

मनाने मनाशी कितीदा हसावे
किती हे बहाने किती मी फसावे

हसावे रडावे पुन्हा सावरावे
कितीदा नव्याने जीवा गुंतवावे

तुझे शब्द सारे तुझे ते इशारे
पुन्हा यौवनाने परतून यावे

जाशील कितीदा येशील कितीदा
कितीदा मनाने पुन्हा पालवावे

हळव्या क्षणांचे रोमांचित किस्से
तनाने मनाने किती जागवावे

तुझ्या आठवांचा सुगंधित वारा
लपेटून गात्रांस संपून जावे

      डॉ संध्या राम शेलार .

Monday, 11 June 2018

दहावीचे मार्क ..वास्तव कि फुगवटा ?

          मागील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र शुभेछ्यांचा वर्षाव पडू लागला . अगदी काही विद्यालयांचा निकाल तर १०० % लागला . सोशल मिडीयावर तर अनेक निकाल पोस्ट होऊ लागले . बहुतेक विध्यार्थी हे ८० % च्या वर गुण मिळवलेले  होते . २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १६,२८,६१३ विध्यार्थी परीक्षेला बसले होते . त्यापैकी ४,०३,१३७ विध्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत , ५,३८,८९० विध्यार्थी प्रथम श्रेणीत ; ४,१४,९१४ विध्यार्थी द्वितीय श्रेणीत ; ९९,२६२ विध्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . राज्यात एकूण १२५ विध्यार्थ्यांना १०० % गुण आहेत . ६३,३३१ विध्यार्थ्यांना ९० % पेक्षा जास्त गुण आहेत . संपूर्ण महाराष्ट्राचा  निकाल हा ८९.४१ % इतका लागला आहे . अशा प्रकारे निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ नाही . गेली काही वर्ष ही एक परंपराच निर्माण झाली आहे . २० वर्षापूर्वी बहुतेक शाळांत प्रथम क्रमांक हा ८० -९० % च्या दरम्यानच असायचा . परंतु आज सगळ्याच शाळांमधून ९० % चा हा आकडा १० तरी विद्यार्थ्यांनी पार केलेला असतोच ! आश्चर्य म्हणजे निम्म्या मुलांना प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त असते . खरोखर आजचा विध्यार्थी इतका हुशार झाला आहे का ? कि हा मार्कांचा फुगवटा आहे ? असे प्रश्न उपस्थित व्हावेत इतकी परीस्थिती कठीण निर्माण झाली आहे का ? हो तर का ?
   निकालानंतर सोशल मिडीयावर अनेक मेसेज फिरत राहिले . काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे , काही विनोदी तर काही या फुगवट्याबद्दल शंका उपस्थित करणारे होते . अनेक जाणकार यावर चर्चाही करत होते . आणि त्यांना मुलांच्या भविष्याविषयी काळजीही वाटत होती . कितीतरी जण मुलांच्या डोक्यावर टांगलेल्या स्पर्धेने व्याकुळ होत होते तर कुणाला त्यांचे कोमेजणारे बालपण व्यथित करीत होते . तरीही ही स्पर्धा नाकारणे बहुतेक लोकांना स्वतःसाठीही शक्य नव्हते . असे का झाले याचा विचार करायला आज पालकांनाही वेळ नाही आणि त्यामुळे थोडावेळ व्यथित होणार्या समाजालाही नाही . मग त्या प्रश्नामधून बाहेर पडण्याची उपाययोजना होणे तर अधिक क्लिष्ट होत चालले आहे . बुद्धीला श्रेष्ठत्व देताना श्रमाची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे . आजही बंद दाराआड काम करणाऱ्याला श्रेठत्व दिले जात आहे . आणि कष्टापासून तरुणांना दूर नेले जातेय . आरोग्यसंपन्न आयुष्य ही संकल्पना नामशेष होऊन संपन्न आयुष्य हेच सर्वांचे ध्येय होतेय . आर्थिक संपन्नता प्राप्त करणे इतकेच ध्येय मुलांच्याही पुढे ठेवले जात आहे . कुणीही पालक मुलांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी उत्सुक नसतात , शाळांचे निकाल टक्क्यांमध्ये पाहून मुलांना शाळेत प्रवेश घेतला जातो . शाळेचे मैदान किती मोठे आहे हे पहायलाही कुणाला वेळ नसतो . काही शाळा तर गुराढोराप्रमाणे मुलांना वर्गामध्ये कोंबत असतात .  शेळ्यामेंढ्या सारखी पळणारी ही मुले खरोखर एक सुदृढ समाज निर्माण करू शकतील ? हा प्रश्न सतत मनाला पोखरत राहतो !
   या मागच्या कारणांचा जर पाठपुरावा केला तर एक भयाण अशी व्यवस्था यामागे असल्याचे दिसते . सारे अगदी बेमालूमपणे घडवून आणले जात आहे . या धूळफेकीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही . पालकांना आपले पाल्य ८० % च्या घरात गेले कि अनेक मोठी स्वप्ने दिसू लागतात . कारण त्यांच्या वेळी हे मार्क वर्गात पहिल्या आलेल्या विध्यार्थ्याचे असत आणि तो आज कुठेतरी तथाकथित यशस्वी असतो . पालकांच्या अपूर्ण स्वप्नांना पुन्हा पालवी फुटू लागते . मोठी स्वप्ने मोठी रक्कम मागतात . त्यासाठी हे पालक राबराब राबतात . पाल्य ८० % मिळवते . मग पालक डॉक्टर , इंजिनियर , सरकारी अधिकारी आणि तत्सम मोठ्या पदांची अपेक्षा बाळगून मुलांना स्पर्धेत उतरवत राहतात . त्यासाठी भलीमोठी जाहिरात करणारे क्लासेस त्यांच्या स्वप्नांना आणखी प्रोत्साहन देत राहतात . मग क्लासची अधिक फी त्यांच्यासाठी उद्याच्या यशाचे (?) हप्ते  ठरते . कुणीही आपल्या पाल्याच्या बुद्धिमत्तेचा आवाका तपासण्याचा प्रयत्न करीत नाही ,कारण त्याच वेळी सारे पालक आपला आर्थिक आवाका निर्माण करण्यात व्यस्त असतात . मागे एकदा असेच एका सहकार्यांना दुसरा मुलगा झाल्यावर मी सहज प्रश्न केला आता भरपूर मालमत्ता करावी लागेल ? त्यावर त्यांनी एक छान प्रतिप्रश्न केला, ‘ आपणच जर सारे करून ठेवले तर मुलांनी काय करायचे ?’ वास्तविक हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडायला हवा !
  बरं इतका आटापिटा करूनही मुले बारावी परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत . दहावीत सर्वाधिक गुण मिळवणारी मुले बारावीत लांब फेकली जातात . अटीतटीने जरी मार्क मिळवले तरी ते अपेक्षेपेक्षा खूप कमी असतात . NEET , IIT JEE , AIIMS , MHTCET यासारख्या परीक्षेत तर खूप कमी मुले टिकतात . आणि जी जवळपास गेलेली असतात ती पुन्हा स्वप्नांच्या मागे लागतात . भलीमोठी डोनेशनची रक्कम घेऊन . बरीच मुले तिथेही टिकत नाहीत . ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांना सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावू लागते . MPSC UPSC करणारी बरीच मुले हे बारावीत कमी मार्क असल्याने डॉक्टर इंजिनिअर होता न आलेली असतात . तीही या स्पर्धेत मागे पडतात .
  यात सगळ्यात बिकट अवस्था होते ती ग्रामीण युवकांची ! एकतर शेती किंवा मजुरी करणाऱ्या ग्रामीण लोकांना भरमसाठ फी भरणे अशक्य असते . शेतीच्या अविश्वासू उत्पन्नावर जगणे किती अवघड आहे हे या मुलांनी आधीच अनुभवलेले असते . त्यात एखादा यशस्वी झालेला त्यांना संपन्न उद्याची स्वप्न दाखवत असतो . अभ्यासाच्या बोज्यामुळे ही मुले शेतीपासून आधीच दुरावलेली असतात . आणि आईवडीलही मुलांना शेतीत उतरू देण्याच्या मानसिकतेत नसतात . कारण शेतीचे सारेच रामभरोसे . शेवटी काही मुले यशस्वी होतात परंतु जवळजवळ ८० % मुले ही काहीही न मिळवता माघारी येतात . अशा मुलांपुढे आयुष्य आ वासून उभे असते , कष्ट करणारे आईबाप थकलेले असतात . जबाबदारी आता या मुलांवर असते . छानछौकी राहण्याची सवय , लग्नाच्या घोडेबाजारात नसलेली पत ,आणि शेतीची कामेही येत नाहीत , इतर औद्योगिक शिक्षणही घेतलेले नसते .त्यात  आरोग्याकडे आजवर केलेले दुर्लक्ष त्यांना शारीरक दृष्ट्याही कमजोर ठेवते . कष्टाची कामे करणे अशक्य होऊन जाते . ही निराशा या मुलांचे आयुष्य कोमेजून टाकते . आणि व्यसनाधीनता त्यांना पोखरून टाकते . यशाने सुरु झालेली ही अयशस्वी कारकीर्द घेऊन ही मुले उद्वेग आणणारे , नाकर्तेपणाचे आयुष्य जगत राहतात . हे कुठेतरी थांबायला हवे . दहावीच्या मार्कांचा हा कृत्रिम फुगवटा या नव्या पिढीचे कधीही भरून न येणारे मानसिक शारीरक नुकसान करतो आणि उरतो एक पोखरलेला समाज !
     शिक्षणसंस्थांचे बाजारीकरण आणि कोचिंग क्लासेसचे स्तोम या गोष्टी जर यामागे असतील तर वेळीच याला आळा घालायला हवा . नाहीतर राजकारण्याचे कुरण होणारी शिक्षणक्षेत्रे कधीही उज्ज्वल भारत घडवू शकणार नाही! यात जितकी जबाबदारी शासनाची आहे त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी पालकांची आहे . कारण आपलं मुल हे स्पर्धेचं घोडं बनवायचं कि एक संवेदनशील समाजप्रती जागरूक माणूस ते आपणच ठरवायचं आहे .  

Friday, 2 June 2017

पोरकी

            पोरकी

अनवाणी पाय भाजून त्याला फोडे उठतील असा तापलेला रस्ता अघळपघळ पसरला होता . दुतर्फा घरांची ओळ एकमेकींत घुसल्यासारखी भासत होती पण चिटपाखरूही बाहेर दृष्टीला पडत नव्हते . उन असे होते कि सावल्याही अंग चोरून शरीरांच्या खाली लुप्त होत होत्या . अचानक येणारी हलकी वावटळ धूळ उडवीत होती . थोड्या वेळात शांत होत पुन्हा धुळीचे लोट घरांच्या , झाडांच्या अंगावर बसून त्यांचा श्वास गुदमरून टाकत होती . लांब लांब उसासे टाकत सारेजण उद्विग्न नजरेने एकमेकांना पाहत होती . हातपाय हलविण्याची शक्ती मात्र कुणाच्याच अंगात नव्हती .लोळागोळा झालेले हे रस्ते अचानक एखादी गाडी गेली कि फुत्कारून उठत आणि पुन्हा मेल्यासारखे शांत पडून राहत . या थोरल्या उन्हात झपझप पावले टाकत मनीषा चालली होती . शक्यतो ती इकडेतिकडे पहात कधीच चालत नसे तिचे चालणे अगदी नाकासमोर ! पहिल्यापासून तिला कुणाच्या भानगडीत नाक खुपसायला , उगीच कुणाचे तरी काही लहान सहान गोष्टीचे चर्वण करायला अजिबात आवडायचे नाही . तिचे घर ,शेत ,दोन मुले , नवरा आणि अपंग सासू याव्यत्यरिक्त तिचे बोलणे कामाशिवाय कुणाशी होत नसे .

  किराणा दुकान जिथून ती तिचा महिन्याचा किराणा भरून घेत असे ते घरापासून लांब होते . ती दुकानात पोहचली तोवर घामाने डबडबून गेली होती . गल्ल्यावर काका बसलेले आणि काकू दारात दळण निवडत बसली होती. दुपारची वेळ असल्याने गिऱ्हाईक नव्हतेच . तिथेच ओट्यावर असलेल्या कट्ट्यावर मनीषा विसावली . उन्हाने लाल झालेला चेहरा सारखा पदराने पुसत होती . वाऱ्याने आणि पदर खालीवर करून केस विस्कटले होते मात्र कपाळावरची केसांची कमान तशीच होती . मधला लांबलचक भांग आणि तिचा तो उभट चेहरा या दोन्हीमुळे केसांची ती चित्र काढल्यासारखी ठेवण अगदी नक्षीदार कमानिसारखी दिसत होती . दोन मुलांची आई होती पण अजूनही खुपच सुंदर दिसायची मनीषा , रंग थोडा बदलला होता आणि चेहऱ्यावर उठलेले वांगाचे दाग सोडले तर तिच्या दिसण्यात काही बदल नव्हता . तशीच काटकुळी , दोन्ही बाळंतपणात ती अजिबात सुधारली नव्हती , कशी सुधारणार होती मुल जन्मल्याच्या पाचव्या दिवशी उठून तिला घरकाम करावे लागे . सासू अपंग आणि तिलाही आई वडील नव्हते , शेजारणी पाच दिवसापेक्षा जास्त दिवस करत नव्हत्या . ना शेक ना शेगडी , खायला भरपूर असे पण कामात तिला वेळच व्हायचा नाही . जाता येत जे मुखात पडेल त्यावर तिचा दिवस संपायचा . नवरा तरी करून काय करणार त्यालाही नोकरी करून घरची चार पाच एकर जमीन करावी लागे , म्हणजे दोघेही भरपूर कष्ट करीत . दुकानदार काका काकूला तिच्याबद्दल खास आपुलकी ! कारणही तसेच होते , ती काकूच्या बहिणीच्या नंदेची मुलगी , या गावात या काका काकू शिवाय कुणीच तिच्या माहेरचे नाते सांगणारे नव्हते . आई बाप लहानपणी गेले , भाऊ आणि वहिनीच्या हाताखाली सारे बालपण संपले . स्नेहाचा जराही गंध नसलेली वहिनी आणि सदा दारिद्र्यात असलेला भाऊ यामुळे माहेर लग्न झाले तेंव्हाच तुटलेले ! तिला स्नेहाची उब मिळाली ती फक्त या काका काकुजवळ ! म्हणून कुठल्याही अडचणीला ती त्यांच्याकडे धाव घेई . अबोल नवरा आणि सदा दुखण्याने कातावलेली सासू यांच्याकडून स्नेहाची अपेक्षा तिने लग्नानंतर आठवड्यातच सोडून दिली . तिचे हे दु:खी आयुष्य पाहून काका काकू हळहळत , यापलीकडे तेही काही करू शकत नव्हते ! कष्ट कष्ट आणि कष्ट यात ती तिच्या भावना आणि शरीर या गोष्टीही जपाव्या लागतात हे पूर्ण विसरून गेली होती ...

“का गं मनीषा , इतक्या उन्हाची का आलीस ?” गुढग्यावर हात टेकून उठत काकू तिला म्हणाल्या .

“परत चार वाजता गवताला जायचंय काकू , म्हणून म्हटले जावून यावे आताच , संध्याकाळी स्वयपाकाला तेल नाही .” अजूनही ती पदराने घाम पुसत होती .

“किती कष्ट करतेस ,थोडे स्वताकडे पण पाहत जा .” तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत काकू म्हणाल्या .

“तुमच्यापासून काय लपलेय का काकू , आता तर फक्त कष्टांचीच साथ जीवनभर !” तप्त रस्त्याकडे विषण्णपणे पाहत राहिली ती ! तिच्या मनात पण आगीचा डोंब उसळला होता . बाहेरची तप्तता काहीच नव्हती तिच्यापुढे . रिकामा ग्लास काकूने काढून घेतल्याचे पण तिला कळले नाही .

“असे नको म्हणू बेटा , उन्हानंतर सावली येतेच ना ? एकदिवस तुझाही असेल !” काका तिला समजावत होते . परंतु त्यानीही तिच्या आयुष्यात सावली येईल हि आशा सोडून दिली होती . जे काही कानोकानी समजत होते त्यावरून तिचे आयुष्य सुखी व्हायला फक्त काही चमत्कारच आवश्यक होता . आणि त्यांना माहीतच होते या कलीयुगात देवही चमत्कार करू शकत नाही . कसे होईल या पोरीचे अशी हळहळ व्यक्त करण्याखेरीज काहीही करणे त्या उभयतांच्या हाती नव्हते .

  तिची शून्यात हरवलेली नजर पुन्हा काकुकडे वळली . काकू काही बोलणार तोवर तिने पूर्वपदावर येत सामानाची यादी काकांच्या हातात दिली .

“हे सारे द्या बर काका , पण बिल त्यांचा पगार झाला कि मिळेल , चालेल ना ?”

“चालेले बाळा , का नाही चालणार ? तू तर आमची मुलगीच आहेस .” काका हसून बोलले पण त्यांचा मुलगी म्हणण्यामागे तिने व्यक्त व्हावे हाच उद्देश होता . काका काकूची स्नेहार्द नजर तिच्या मनात खळबळ माजवत होती . तीही भिंती आणि तुळशीपुढे व्यक्त होऊन थकली होती . तिलाही वाटे कुणी माणूस भेटावे ज्याने माझे दु:ख फक्त ऐकून तरी घ्यावे . असे मनात कुढत राहिले तर ...कधीतरी नक्कीच वेडी होईन ! आत्महत्येचा विचार अनेकदा आला तिला पण मुलांचे चेहरे तिला तसे करू देत नव्हते . खरच तिच्याशिवाय कोण होते मुलांना तरी ? पुन्हा शून्यात नजर गुंतवत ती अबोल झाली . काकू तिच्या जवळ जाऊन बसल्या . ओट्यावर उन नव्हते पण उन्हाच्या झळा तिथेही जाणवत होत्याच .

“काका सामान काढतील तोवर चल आत आपण सरबत घेऊ , खूप दमलीस . जेवलीस का पण ?”

“हो जेवले काकू , न जेवून कसे चालेले .” एक लांब उसासा सोडला तिने .

“हो ते पण आहे , नको खूप कुढत जाऊ , कुणालाच कष्ट चुकत नाहीत.” आत जाता जाता दोघी बोलत होत्या . तिला बसायला बसकर देत काकू स्वयंपाकाच्या ओट्याजवळ गेल्या . दोघेच घरात असल्याने ते स्वयंपाकघर नेटके होते . धुळीचा , जळमटे यांचा मागमूसही नव्हता . काकूंची दोन्ही मुले नोकरीसाठी बाहेर होती . घर मुले नातवंडे आली कि फुलून उठे . पण सुट्टीपुरतेच हे सुख त्यांच्या नशिबी होते . पण त्यातही समाधान शोधायचे दोघे . या जगात नाईलाजास्तव समाधान मानणाऱ्यांची संख्या अफाट आहे . या तिच्या विचारांबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक केविलवाणे स्मित झळकले .

“खर सांगू काकू , आता मी जगणेच सोडून दिलेय . काय चांगले काय वाईट , इतरांनी आपल्याशी कसे वागावे हे ठरवणे मी कधीच सोडून दिले . कुणी राग केला तरी राग येत नाही आणि कुणी जिव्हाळ्याने बोलले तरी सुख नाही वाटत . अश्रू आता माझ्या डोळ्यांचा पत्ता कधी कधीच शोधत येतात . मुलांना पोरकेपण येऊ नये म्हणून आजचा दिवस उद्यावर ढकलणे इतकेच माझ्या जीवनात उरले आहे . आणि हे विचारांचे जंजाळ पुन्हा माझे चित्त विचलित करू नये म्हणून हा कामाचा व्याप वाढवते . जोपर्यंत थकून आपोआप झोप येत नाही तोपर्यंत कष्ट करणे इतकेच मनाशी ठरवले आहे . बघू किती दिवस असे चालू राहते . आता कश्याचीच ओढ राहिली नाही .” पुन्हा खोलात नजर गेली तिची .

“दु:ख आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे . म्हणून त्यापासून दूर पळून किंवा त्याकडे पाठ फिरवून जगणे योग्य नाही .”

“दु:ख जेंव्हा अगतीकतेच्या दारात नेवून सोडते ना तेंव्हा या असल्या वचनांना काही अर्थ राहत नाही काकू !” पुन्हा केविलवाणे हसू तिच्या मुखावर उमटले .

“इतकी हतबल नको होवूस बेटा ,प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते .”

“नाही काकू , उत्तर असते प्रश्नाला पण कधी कधी ते आयुष्याच्या शेवटीही कळत नाही . कधी ते उत्तर शोधण्याची इच्छाच मरून जाते ,आणि कधी कळते पण इतके क्लिष्ट असते कि ते समजूनही अंगवळणी पडत नाही . माझेही असेच झालेय .”

“असे नको हरूस बेटा , आपण सारे बंडूला समजावू तो नक्की ऐकेल बघ .”

“ऐकेल ? किती वेडी कल्पना आहे काकू तुमची! मी एक सांगू , तो आपण बोलू ते ऐकून घेईल , अगदी तुम्हाला प्रत्युत्तर पण करणार नाही .” छद्मी हसत मनीषा बोलली . तिचे हे हसू पाहून काकूच्या काळजात मात्र चर्र झाले . प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहण्याशिवाय त्यांना दुसरे काही उत्तरच सुचले नाही .

“काकू तुम्हाला वाटते न कि ते ऐकून घेऊन त्यांच्या कर्माबद्दल पश्चाताप करतील , हळहळ करतील आणि मग तसे वागणे सोडून देतील ?” काकूंनी फक्त मान हलवली .

“असे बिलकुल काही होणार नाही , त्यांना त्यांच्या या कुकर्माची लाज बिलकुल वाटत नाही , जराही खेद नाही , आपण कुणाचे जीवन फक्त उध्वस्त नाही करत तर कोळून पितोय याचा यत्किंचीतही खेद त्यांना नाही . उलट असे तुमच्यासमोर वागताना जे चोरून चालले आहे ते उघड चालू होईल . अशा माणसांची सदसद्विवेकबुद्धी बुद्धी सर्वथा लोप पावलेली असते .” विषण्णतापूर्वक मनीषा बोलत होती . काकूने हातात दिलेला सरबताचा ग्लास लगोलग रिकामा करत ती पुन्हा बोलू लागली .

“एक महिना होत आला , ज्या गोष्टींची कुणकुण लागली त्या गोष्टी सत्य आहेत का ते पडताळून पहावे वाटले , पाहिलेही आणि समोर आले ते एक नग्न सत्य ! मला हि गोष्ट माहित नव्हती तोपर्यंत ती माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न होत असे , पण एकदा माहित झाले आणि राजरोस सारे व्यवहार चालू झाले . पाहणारल्या लाज वाटते परंतु यांना वाटत नाही ! अज्ञानत सुख असते हे वचन सार्थ आहे , जोवर मला काही ठावूक नव्हते किंवा फक्त शंका होती ते कळल्यावर जे राजरोस व्यवहार चालू झाले ! यावरून हेच सिद्ध झाले ना ? कुणी सांगेताई बंडू सोबत आम्ही एक बाई पहिली , कधी त्यांचा फोन रात्री एक वाजेपर्यंत चालू राही , मी विचार करायचे असेल कुणी शाळेतील मित्र , पण किती मनाला समजावले तरी वाटत राही कोण असेल ? मित्र कि मैत्रीण ? असे पूर्वी कधी कुणाशी बोलताना मी त्यांना कधी पाहिले नव्हते . एकदा खूप मन घट्ट करून त्यांना विचारले कोणाशी बोलता इतके ? दिवसभर कंटाळा नाही का येत ? भीत भीतच विचारले , वाटले कदाचित माझ्यावर वैतागेल पण झाले उलटेच ! मला जवळ घेत म्हणाले माझा एक मित्र आहे , बाहेर होता खूप दिवसांनी भेटलाय ! त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शात सर्व शंका गवतात वाट दिसेनाशी व्हावी तश्या नाहीश्या झाल्या ! किती मधुरता असते त्या स्पर्शात , जणू साऱ्या वेदनांचा शेवट त्यात होतो ! परंतु ते मृगजळ होते ...त्यामागे मला माझ्या आयुष्याच्या वाळवंटात धावत राहायचे हेच माझे प्राक्तन आहे ते मला तेंव्हा उमजले नाही . ते सुख रातराणीच्या सुगंधासारखे तेव्हड्या रात्रीपुरतेच माझ्या आयुष्यात होते याची त्यावेळी जराही कल्पना मला नव्हती . दुसऱ्या दिवशी शेजारची एक बाई मला धुणे धुवायला गेले आडावर तेंव्हा सांगत होती , मनीषा जरा जपून बर यांनी काल बंडूला एका बाई सोबत पाहिले ! तू गरीब गाय आहेस असा आंधळा विश्वास ठेवशील आणि कुणी तुझा संसार चोरून नेईन तुला कळणार पण नाही . तेंव्हापासून मी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होते . रोज देवाला वेड्यासारखी प्रार्थना करे कि सारे खोटे असू दे ! माणसाचे मन आणि सश्याचे काळीज एकाच गोष्टीपासून बनले असतील , जेंव्हा भीतीचे शंकेचे ढग दाटतात तेंव्हा आपोआप ते लुकलुक करायला लागते ! माझीही अशीच धडधड दिवसरात्र चालू राही ! पहिल्यांदा विचारले तेंव्हा त्यांनी प्रेमाने समजावले पण दुसऱ्या वेळी धावून आले अंगावर , आत्या तिथेच होत्या त्याही घाबरल्या पण दिवसरात्र सेवा करणाऱ्या माझ्या सुनेवर का रे रागावतो असे एका शब्दाने त्यांना फटकारले नाही !” लांब उसासा घेत डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना थोपवण्याचा असफल प्रयत्न करत मनीषा जमिनीत नजर खुपसून बसली .

“शकुताईकडून हि अपेक्षा नव्हती ! त्यांनी तुला आधार देणे न्यायाचेच होते .” तिच्या पाठीवर मायेने थोपटत काकूने तिची बाजू उचलून धरली .

“काय न्याय काय अन्याय याची त्यांना थोडीही चाड नाही . माझा तो बाब्या बाकी सारे ...कसे सहन करू काकू ? घराचे वासेही फिरले होते माझ्या . किती आत्मीयतेने मी माझा माझा म्हणून संसार करत होते पण तिथे बसण्यापुरती जागाही माझ्या मालकीची नाही ! मी त्यांना कधीही एका शब्दाने नाही दुखावले . सतत त्यांच्या अपंगत्वाचे ओझे मी माझ्या मानगुटीवर वाहत राहिले , एका शब्दाने कधी त्या गोष्टीबद्दल नाही बोलले . पण मलाच कळत नाही मी कुठे कमी पडले . मुलाबद्दल इतकी माया आणि मी ? कुणीच नव्हते का त्यांची ? कि नाते बदलले म्हणून चुका चुका होत नाहीत का ? मीही जर चुकले असते तर त्या इतक्या निष्क्रीय राहिल्या असत्या ? ज्या खांद्यावर विश्वासाने डोके टेकावे ते अस्तित्वातच नसावेत ! याच्याइतके उद्विग्न करणारे काहीच नसेल जगात , मी कुठल्यातरी खोल दरीत कोसळत आहे असेच वाटले तेंव्हा ! अश्रूंची संततधार मुकपणे माझ्या डोळ्यातून वाहताना पाहूनही त्यांच्यातील माणूस जागे नाही झाले . त्या दिवशी पहिल्यांदा मार खाल्ला मी ! मारण्याबद्दल खेद नव्हता फक्त होता तो सासूबाईंनी दाखवलेल्या निष्क्रियतेबद्दल !” उद्विग्नपणे ती बोलत होती . चेहऱ्यावरची हरेक शीर ती बोलताना उडत होती . ठसठसणारी एखादी जखम मोकळी झाल्यावर जसे हलके वाटते तसे तिला बोलून झाल्यावर वाटू लागले .

“काकू , त्या दिवशी दिवसभर मी उपाशी झोपून राहिले पण कुणी माझ्याजवळ आले नाही . शेवटी आकाश शाळेतून आल्यावर म्हणाला ‘आई बरे नाही का तुला ? डोके दुखत असेल तर दाबून देऊ का ?’ त्याच्या या बोलण्याने दिवसभर हृदयात उसळणारा बंदिस्त सागर मोकाट सुटल्यासारखा डोळ्यातून वाहू लागला . खरंच कुणासाठी नाही पण माझ्या मुलांसाठी मला जगावेच लागेल . गोठ्यातून भुकेने व्याकुळ ढोरांचे ओरडणे आता कुठे माझ्या कानात घुमले . आकाशला काही नाही असे समजावण्यात माझी जी धावपळ झाली ते वर्णन करणे कठीणच ! त्याने माझ्या कुशीतून त्याची सुटका करवून घेतली आणि माझ्या डोळ्यांचे पाणी पुसत राहिला . किती माया होती त्याच्या स्पर्शात ! मी मग सगळे विचार झटकून त्याला खायला दिले आणि गोठ्यात ढोरांना चारा टाकायला गेले .”

“असे किती दु:ख असले तरी लेकरांच्या निरागस चेहऱ्यात ते हरवून जाते बघ , म्हणून जे सुख कुणाची मुलगी , बायको म्हणून घेताना वाटत नाही न त्यापेक्षा कितीतरी मोठे सुख वाटते आई ...म्हणून घेताना !”

“किती खरे आहे ना हे मला त्या दिवशी खूप प्रकर्षाने जाणवले . त्याच लेकरांसाठी आता माझे जगणे असेल ! त्या दिवसानंतर आत्या दोन दिवस माझ्याशी बोलल्याच नाहीत . मी मात्र जीवनाला एक नवीन ध्येय मिळाल्यासारखे झपाटल्यासारखे काम करत राहिले . डोक्यातील विचारांचे काहूर तसेच उंच उंच जावून पुन्हा जमिनीचा ठाव घेत होते. प्रत्यक्ष दु:खासोबत जगणे जितके दु:सह्य असते त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण असते ते दु:ख आयुष्यात येणार या शंकेसोबत जगणे ! त्या शंकांनी गर्भगळीत होऊन जातो जीव ! त्या दिवसानंतर चार पाच दिवस तो अबोला चालू होता . माझ्याकडे बघून ते दुसरीकडे तोंड वळवत , ते पाहून वाटायचे हेही सोसेल जीवाला पण तुमचा विश्वासघात नाही हो सोसवत , काय कमी ठेवले होते मी तुमच्या आयुष्यात म्हणून तुम्ही हे असला मार्ग निवडलात? वाटायचे हे फक्त शंकांचेच धुके असावे , सत्याचा सूर्य उगवला कि तेही निघून जावे दूर दूर ! पण तो धूर होता काकू , माझ्या संसाराला लागलेल्या आगीचा धूर ! जो नाक बंद करून माझा श्वास गुदमरवणार होता ! माझं उरलेलं आयुष्य त्याच्या काजळीने गडद काळे करणार होता ...माझ्या लेकरांचे भविष्य धुसर करणारा धूर ...काकू ..” तिला पुढे शब्दही उच्चारणे कठीण झाले . ती फक्त रडत राहिली ...काकुनी तिला जवळ घेतले , बाहेरून थंड वाटणारा कुकर उघडला कि त्याचे वाफेने जीव कोंडला आहे असे वाटावे तसे काकूंना तिच्या वेदनांचा तो कोंडमारा उघडल्याने वाटू लागले , त्यांचाही जीव आता गुदमरू लागला होता .. तिला समजावण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करण्याचा वांझोटा प्रयत्न त्या करत राहिल्या . त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या ....वेळ सर्व आवळलेल्या दोऱ्या ढिल्या करत जातो इतकेच काकूंच्या जीवाला आता वाटत होते ... आशा माणसाच्या मनाला अगदी कडेलोटाच्या वेळीही सावरून नेते , कदाचित म्हणूनच माणूस पुन्हा नव्याने उभारी घेत असेल राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखे !

“तो धूरही आयुष्यातून जाईल असे वाटायचे , वाटायचे कि असू देत चुका करतो तो माणूस असतो , त्याला माफ करणारही माणूसच असतो ...विस्तवाची राख होईल आणि पुन्हा सारे पूर्वपदावर येईल ...पण त्या ज्वाला आहेत काकू ज्वाला ! कदाचित माझ्या चितेच्या ज्वालेबरोबरच थंड होणार आहेत ...दिवस संपायचा रात्रही संपायची पण माझे विचार आणि उसासे संपत नव्हते . कधी मन निश्चयाने भरून यायचे वाटायचे या अपमानाचा बदला घ्यावा , या नवऱ्याला अशी अद्दल घडवावी कि पुन्हा यालाच काय पण जगातल्या कुठल्याही नवऱ्याला बायकोचा घात करायच्या आधी त्याचाच अवसानघात होईल , पुन्हा वाटयचे काय होईल काही केले तरी ? आपल्या मर्यादा ओळखून पाउल टाकणेच शहाणपणाचे होईल . भावाचे वागणे , वहिनीचे तुसडेपण आठवले कि मनाचे सारे खेळ मनातच संपायचे . कितीही केले तरी माझे माहेर माझे नाही हे मी केंव्हाच जाणले आहे . तो रस्ता बंद झाला कि दुसरी पायवाटसुद्धा माझ्या आयुष्यात नाही . मग कुठे जायचे ? असे मनात आले कि हातपायच गळून जायचे ...” हतबल मनीषा काकुकडे केविलवाणी पाहत होती . काकूच्या नजरेत मात्र अश्रुंचे तळे उभे राहिले होते . त्यांच्या मनात मनिषाचे आई वडील किती चांगले होते या आठवाणे साकारलेले ते तळे मनीषाने त्यांच्याकडे विषण्ण मनाने पाहिल्याबरोबर खळखळ वाहू लागले .

“तुझे आई बाप असते तर ....असा अपमान होताच त्यांनी तुला कधीच नेली असती ...आणि ते असते तर ...या बंडूची पण इतकी हिम्मत झाली नसती . समाज इतका वाईट आहे एखादा जीव अगतिक आहे म्हटल्यावर सारे त्याचा छळ करू पाहतात ..” डोळ्यातील पाणी पुसत काकू बोलल्या .

“आई बाबा असते तर ...पण ते नाहीत ना आज काकू ....” तिचे अस्फुट रडणे आता अस्फुटपणाच्या सीमा पार करून गेले . तिला आवरणे आता काकूला कठीण होत होते . इतका वेळ त्यांचे बोलणे बाहेरून ऐकणारे काका आत आले .

“बेटा आवर स्वतःला आणि आम्ही आहोत दोघे नसले तुझे आई बाबा तरी .. असे एकटे नको समजू . नाही तुझे आई बाप होऊ शकलो तरी तुला आधार नक्की देऊ . जेंव्हा कधी तुला असे वाटेल कि आता मरणाशिवाय काही मार्ग नाही तेंव्हा एक दार विसरू नकोस तुझ्या काका काकूचे !” साऱ्यांचे काळीज भरून येत होते . इतका वेळ दाटलेले ढग डोळ्यांमधून वाहत होते . प्रेमाच्या ओलाव्याने साऱ्या वेदना हलक्या होतात . मनिषाचे मनही शांत होत होते . तिने काकांकडे एक कृतज्ञापूर्ण कटाक्ष टाकला .

“त्यानंतर मी काम करत राहिले . त्या दिवशी रविवार होता दोन्ही मुलांना सुट्टी होती . ते बाहेर गेले होते आणि आत्या शेजारी . मी माझ्या कामात आणि विचारात होते . आकाश रडत आला . मी विचारले काय झाले म्हणून तर म्हणू लागला ‘आई आता आपण गरीब होणार ?’ मी हसून विचारले का रे बाळा असे का विचारतो ? आपण का गरीब होऊ ? तर म्हणाला रोहितची आई म्हणत होती त्याच्या बाबांना कि बंडू आता घरात पैसे नाही देणार मग कशी करेल बिचारी मनीषा ? खरच का गं आई असे होणार ? त्याच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते होते ते फक्त तेच तेच प्रश्न ! थोडावेळ मी गप्प राहिले त्याचे डोळे पुसत राहिले . काय समजावणार होते त्याला मी ? मलाच कळत नव्हते . असे काही नाही सांगात ती वेळ तर मी निभावून नेली पण ? त्या रात्री मीच पुढे होऊन त्यांना विचारले तुम्ही आम्हाला असे वाऱ्यावर तर नाही ना सोडून जाणार ? माझे जाऊ देत पण मुले तर तुमच्याच रक्ताची आहेत त्यांचा तरी विचार करा . त्यावर त्यांनी जी रुक्ष प्रतिक्रीया दिली तिने तर माझा जीवच हलवून सोडला . ते मुलांना कधी अडचण येऊ देणार नव्हते . दर महिन्याचा पगार आईकडे न देता मला देणार होते .. म्हणजे ? म्हणजे त्यांच्या आयुष्यात नक्की दुसरी स्री होती ! एक समाधान होते आकाशच्या शंकेप्रमाणे आम्ही गरीब होणार नव्हतो !” खिन्नपणे मनीषा बोलत होती .

“काकू नंतर मीही त्यांच्याशी बोलणे सोडून दिले .आधी असे वाटे कि कदाचित मीच शंका घेते , त्यांचे तसे काही नसेल त्यानाही माझ्या अशा वागण्याचा त्रास होत असेल पण त्या दिवशी असे बोलले आणि सारे प्रश्न माझ्या दृष्टीने संपले होते . त्या नंतर तीन दिवसांनी रोहितची आई म्हणजे माझी जाव लागते , ती आली धावतच आली , मला चल म्हणाली मी गेले तिच्या सोबत तर भावोजी म्हणाले बंडू आणि ती बाई देवळाच्या मागच्या बागेत आहेत , चला तुम्ही , मी भावोजींच्या गाडीवर बसून गेले ..खरे आता विचार येतो जायला नकोच होते ...पण त्या दिवशी गेले . ती दोघे गळ्यात गळे घालून निर्लज्जपणे तेथे बसली होती . मला पाहून ते उभे राहिले  पण मी मात्र घेरी येऊन तिथेच पडले . घरी कशी आले मला माहित नाही . त्या दिवशी ते मात्र घरी आलेच नाहीत . पोरांचे तोंड पाहून मी सारी कामे केली मुलांना जेऊ घालून झोपवले पण सारे यांत्रिकपणे ! दुसऱ्या दिवशी ते घरी आले मला विचारले पण बरे आहे का ? मी हो म्हटले , त्यांच्या पायावर पडून त्यांना विनंती केली कृपा करून तुम्ही आमच्या जीवनात परत या माझी दया करा . पण त्या दगडाला घाम नाही फुटला . ते तेंव्हा मात्र निग्रहाने संगत होते ‘ काही झाले तरी मी रेश्माला अंतर देणार नाही . तुम्हाला काही कमी पडणार नाही पण तुला तिचे असणे मान्य करावे लागेल’ त्यांच्या या बोलण्याने माझे त्यांच्या आयुष्यातले स्थान मला कळले होते . खरंच तसे पाहता ती बाई माझ्यापेक्षा सुंदर होती असेही काही नव्हते मग असे का झाले ? मी कुठे कमी पडले ? मला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते . आता एक करणे जरुरीचे होते ते म्हणजे मुलांच्या या संस्कारक्षम वयात त्यांना या घटनेपासून दूर ठेवायचे होते . म्हणून मग मी माझ्या भावनांना आवर घालून त्यांना एक अट घातली , म्हटले जे काही करायचे ते मुलांच्यापासून दूर ! त्यांना तुमच्या या वागण्याची जराही कुणकुण नको लागायला , इतकाच उपकार करा ! त्यांनी हि गोष्ट कबुल केली…तेंव्हापासून मनात हे सारे घेऊन जगते आहे ...कदाचित असेच जगावे लागेल ....शेवटी नशीब ...नशीब नशीब म्हणते पण खरेच का हो काकू हेच माझे नशीब आहे का ? कि माझी अगतिकता आहे ... मी खरंच बाकी काही मार्गच नसल्याने या नशिबाच्या चक्रात अडकली आहे . रोज सर्व काम करते , दोन घासही पोटात ढकलते जगते .दिवस संपतो काकू पण तिन्ही सांज झाली ना मनात काहूर उठते ...रोज आभाळाला जाऊन भिडते ...झोप तर केंव्हाच मला विसरून गेली आहे ...या अगतिकतेमुळे काळीज पोकळ झालंय असे वाटते ..उरातली ती पोकळी मनाला पोखरत राहते ..डोळ्यांच्या दारावाटे अश्रू होऊन बाहेर येते ...आणि रात्रभर उशी भिजवत राहते ...” खिन्न नजरेने ती जमिनीत नजर खुपसून बसली होती . एक पाय गुढग्यात वाकवून डोके त्यावर टेकलेले ..अश्रू ओघळत जमीन भिजवत होते ...

   बराच वेळ ती अशीच रडत राहिली . काकू काका डोळे टिपत होते ,आज त्यांना या आईबपाविना पोरीचे आईबाप व्हायचे होते . दोघांच्या मनात ही एकच गोष्ट खेळत होती . काकू पुढे होऊन तिला मायेने जवळ घेत बोलू लागल्या .

“बेटा खूप सोस्तेस तू पण एक सांगते आम्ही दोघे आहोत तोवर तुझ्यासाठी कधीही हे दरवाजे बंद नाही होणार . आता भिंतीना न बोलता आमच्या दोघांजवळ तुझे मन मोकळे करत जा . नवरा नाही असेच समज त्याचे तुझ्या आयुष्यातील असणे पुसून टाक म्हणजे त्याच्या नसण्याची जाणीव तुला त्रासदायक होणार नाही . हा हा म्हणता मुले मोठी होतील ...तारुण्याचे हे दिवस मावळतीला झुकतील तेंव्हा बंडूही परतेल . मुलांनी तुझे कष्ट पहिले आहेत , दु:खही जाणतील ,आणि म्हणून कधीच तुला दुखावणार नाहीत . आणि एक सांगू कुणीच जाणणार नाही तेंव्हा आम्ही आहोत ! तुझे आई बाप !” काकाही प्रत्येक शब्दाला हुंकार भरत डोळे पुसत होते ...

   तिने उठून दोघांच्याही पायांना स्पर्श केला . घड्याळात चार वाजायला आले होते . तिला पुढच्या कामाची ओढ होती . मनात उंच उंच उडणारे विचार तळाशी गेले होते आणि जडवलेले काळीज हलके झाले होते ...चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले होते . उठून तिने सामानाच्या पिशव्या उचलल्या .

“आईबापाच्या घरी येऊन राहायची वेळ नाही येणार पण त्यांचे असणे इतका हुरूप देईन कि संकटांचे डोंगरही हसत पार होतील ...” हसून तिने काका काकुकडे पाहिले आणि चालू लागली . उन्हे थोडी कलली होती . त्यांची दाहक किरणे आता पोळत नव्हती . आता वारे होते पण धूळ उडवत नव्हते ... घरांवर साचलेले धुलीकण बाजूला घेऊन जात होते ...झाडांचाही श्वास आता मोकळा झाला होता ...मनीषा पायाखालच्या जमिनीला पाहत झपझप चालत होती ....

        डॉ संध्या राम शेलार