या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday 10 December 2021

मौन

माझ्या मौनाचे अर्थ लावू नकोस 
तुझ्या सोईने ..
त्याचा प्रत्येक धागा वेगळे सांगेन काही ..
विरत चाललेलं प्रेम ,आशा ,आकांक्षा ..
घट्ट होणारा आक्रोश क्रोध ...कधी तिरस्कारही सापडेल सोबतीला ..
तेव्हा होऊ नकोस नाराज ....
जरी सापडला अगतिकता आणि असहायतेचा चुरगळलेला दोर तर ओढू नकोस ..
ताणलं तर तुटतं हेही ठेव लक्षात ..
तुच म्हणतोस आपण देतो तेच येतं बुमरँग होऊन ..
आताशा शेवटाला आलेला मायेचा आणि स्त्रीसुलभ ओलाव्याचा धागाही  दिसेल ! 
        डॉ संध्या राम शेलार . 

Saturday 24 July 2021

सिंबा द किंग


तो तेजस्वी डोळ्यांचा छोटासा जीव पायर्यांच्या बाजूला उभा राहून डोळ्यात डोळे घालून बघत होता . कारूण्यमय नजर आरपार गेली . पटकन उचलून कुशीत घेतलं ! साध्या रेलिंगला हात न लावणारी मी ( घाण असेल म्हणून ) पण तो मातीने माखलेला दीडशे ग्रँमचा जीव अगदी कुशीत घेतला आणि ओठ आपोआपच त्याच्या मस्तकी टेकले ! आयुष्यात प्रेमाचा खरा अर्थ याच जीवाने शिकवला . तो होता ( होता लिहीताना जीव कापरा होतोय )  माझा आमचा सर्वांचा लाडका सिंबा !  त्याचा तो कडका देह काही दिवसात भरू लागला तसे त्याचे बागडणे , घरभर हिंडणे , मस्ती करणे चालू झाले . दादाची त्याची मस्ती दिवसेंदिवस वाढत होती आणि मैत्री पण ! सगळ्यांच्या मनात त्यानुसार प्रेमाचा अपार भाव निर्माण केला . त्याची मस्ती , खेळणे जसे कौतुकाचे होई तसे त्याचे आजारपण , बाहेर फिरायला जाणे काळजीचे होई . दोन दिवस येत नसे कधी . तो गेला की आपोआप जेवणावरचेही लक्ष उडून जाई . सारेच त्याची वाट पहात असू . हॉस्पिटलचा स्टाफ पण त्याचा शोध आजूबाजूला घेत राही . पण तो यायचा ..आधी ओपीडीत येऊन पप्पांना भेटला की धूम ठोकत वर पळायचा . वाटी दुधाने भरेपर्यंत दम निघत नसे ..या पायातून तिकडे आणि तिकडून इकडे ..घर आनंदाने उजळून जाई ! त्याच्या झोपायच्या जागा , लपायच्या जागा ..ठरलेल्या ..महाराजांच्या मुर्तीच्या पायाशी बसायची तर भारी हौस ! देवपूजा चालू झाली की देव धुतलेले पाणीच पिणार ..कुंकूमतिलक  लावेपर्यंत तिथेच बसणार ..गुलाबी शाल त्याची अतिप्रिय ..तिच्यात लोळणे आवडता उद्योग ..बोंबील आणि सुकट आवडते खाद्य . त्याने कधीच catfood खाल्ले नाही . स्वयंपाक करताना पाठीवरून फ्रीजवर आणि तिथून घड्याळाच्या काट्याला खेळणे . जोवर मी किचनमधे असे तोवर तिथून हलणे नाही . त्याचे लसीकरण मोठे गमतीचे ..डॉक्टरांना तो चांगला ओळखे . ते दिसले की पळू लागे पण शेवटी माझ्याच कुशीत शिरून बसे . त्याच्याकडून चुकून घाण झाली तर भामटा होई चांगलाच ..मग लाड घालत बसे ..पण त्याची घाण मी काढू लागले तो कासावीस होई ..त्याची देहबोली सांगे त्याच्या मनातील वैषम्य ! माझा सिंबा ! आमचा लाडका सिंबा ! आज वर्षापूर्वी आमच्यातून गेला ...रस्त्यावर पडलेला तो निर्जीव देह दादाने कवटाळून आणला ..मी त्याचे पापे घेत होते पण तो कधीच पलटून माझ्या नाकाला पंजा लावणार नव्हता ..तो पुन्हा कधीच येणार नव्हता ...आम्ही सारे रडत होतो ...आजही रडतो ...आमचा लाडका सिंबा ..प्रेम करणे त्याने आम्हाला शिकवले . तो गेल्यानंतर कितीतरी रस्त्यावर फिरणाऱ्या जीवांना घर मिळवून दिले ..दोघांना आम्ही सांभाळतो ...आमच्या रूकुला बाळ झाले ..दादा म्हणे सिंबा म्हणू ..पण जीव झाला नाही त्याला सिंबा म्हणायचा ...पण आमचा बबुही तसाच आहे ! त्याच बाळलीला आणि तेच attitude चे वागणे ! आमचा सिंबा ...तुला आम्ही कधीही विसणार नाही ...तु आम्हाला प्रेम करणे शिकवले ..!
     ..   .....तुझी 
        .......मम्मी , पप्पा आणि दादा .

Sunday 17 January 2021

तुझ्या जगण्यासाठी

ते  उभ्या करतील तत्वज्ञानाच्या भिंती . 

तू लढत असशील रोजच्या जगण्यासाठी ..

ते सिद्ध करतील ..

तुझी लढाई कशी आहे समाजशास्त्राच्या बाहेरची 

पण तरी तू लढत राहशील ..तुझ्या जगण्यासाठी ..

तुझा आक्रोश नाही पोहचणार त्यांच्या कानापर्यंत 

कारण त्यांनी भिंतींवर छत आणि दरवाजेही बनवले असतील ..

तुझे एकेक अंग तुटत राहील ..तू धडपडत राहशील जगण्यासाठी..

तरी तू सांगत राहशील ..

तुझ्या एकाकी लढाईची कथा …

तुझ्या जगण्यातील त्यांचा राक्षस आता मोठा होईल ..

आक्राळविक्राळ …

तुझ्या आणि त्यांच्याही भिंती डगमगतील आणि जमिनोदस्त होतील ..

तु अजूनही लढत असशील रोजच्या जगण्यासाठी…

ते मात्र गाडले जातील ..भल्यामोठ्या तत्वज्ञानाखाली !