या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday, 6 July 2013

करंटा तो क्षण

क्षणापूर्वी तु माझा होतास
क्षणात असा बदल का झाला
करंटा तो क्षण जीवघेणा
माझ्या जीवाचा वेध घेऊन गेला

जीवापेक्षा जास्त जपले होते
तुझ्या सहवासाचे क्षण
तुजसवे मनाने टिपले होते
प्रेमाने भरलेले कण अन कण
क्षणभराच्या निष्काळजीने
असा माझा घात केला
करंटा तो क्षण …

तू सावरायचे होते त्या
ढासळणारया स्वप्नघराला
आवरायचे होते गैरसमजाच्या
उसळणाऱ्या त्या सागराला
तुही मोहात त्या क्षणाच्या
मला नि स्वताला हरवून बसला
करंटा तो क्षण …

आता जीवनात राहिले फक्त
तुझ्या स्नेहाची वाट पाहणे
होतो थरकाप सर्वांगाचा
तव विरहाच्या जाणिवेने
सर्व हरले तरी का निग्रह मनी
आणीन परतून एकवार माझिया प्रियाला
करंटा तो क्षण …
- संध्या § .

Wednesday, 15 May 2013

काहीतरी हरवलंय ...

पोकळी सांगतेय उरातली
काहीतरी हरवलंय
ओढ संपली काळजातली
आता जीवन विखुरलंय
वाट वेडीवाकडी होती
तरी दु:ख नव्हते केले
स्वप्नातल्या झऱ्यावर
मनसोक्त होते पाणी पिले
आता तहान संपली
पाणी सारं आटलय
झऱ्यातून ते डोळ्यात साठलंय
पोकळी उरातली .....
वाटेवरच्या रेतीला
लाज माझ्या पावलांची
पिसाट वाऱ्याला बोलवतेय
पुसण्या रेघ खुणांची
पायाखालची जमीन सरली
डोईचं छत उडलंय
पिसाटल्या वाऱ्याने
दुसऱ्या दारी नेऊन सोडलंय
पोकळी सांगतेय ...
आता नाही वाट पाहणे
ना नवीन वाटेवर चालणे
आनंदाला कायमची ओहोटी
तप्त उन्हाची मनात दाटी
सुखाची पाठ पाहत राहणे
नाही मिळत जल स्वप्नातल्या पावसाने
कुणीतरी कानात सांगितलंय
आता कसं सांगू कुणा
माझं आयुष्यच हरवलंय .....

Wednesday, 24 April 2013

बेईमान मन


बेईमान मन , गेले मला सोडून


नव्या हृदयाशी , नवे नाते जोडून
बेईमान मन ....
मी अन माझे मन , सुखाची गुंफण
एकमेकांत विरघळलेलो , नव्हते कुंपण
बेईमान मन ....
सुगंधित एका क्षणी ,ते गेले बावरून
मी समजावले , काही काळ धरले सावरून
बेईमान मन ....
कसे ग मोहरले , प्रियास त्या पाहून
तन माझे थरारले , गेले पाखरू उडून
बेईमान मन ...
तमा नाही माझी त्याला , पुरे गेले बदलून
येईल काहो खरे सांगा , माझ्यासाठी ते परतून
बेईमान मन ....                                      


 -गीतांजली शेलार


Sunday, 7 April 2013

प्रीतस्वप्ने

तू पाठ फिरवलीस
अन माळ ओघळली
तूच होती माळलीस
घेवून ती प्रीतस्वप्ने

तू असे रडवलेस
काठोकाठ ही लोचने
तूच होते टिपलेस
दावून ती प्रीतस्वप्ने

तू कारे कुढवलेस
उर भरे तमसाने
प्रभाही तूच दिलीस
तेवऊन प्रीतस्वप्ने

तू मला अव्हेरलेस
जीवन माझे संपले
तूच होते जगवले
दावून ती प्रीतस्वप्ने  

Friday, 29 March 2013

नवीन वाट आहे


सुटून जरी गेली रेती करातुनी
आता मजसाठी थांबोनी,
नवीन वाट आहे.
प्रलयात भयाण त्या कोणी
गेले मज शिकवोनी,
प्रत्येक हृदयस्पंदनी,
बघ येते लहरुनी
अविरत लाट आहे.
होते कधी व्याकुळ विरहिनी
नवमते प्रसवली मनगर्भिनी,
केले रुदन ज्यांनी,
तेथे सदैव सुखांनी
फिरवली पाठ आहे.
जाय प्राप्त निसटोनी
मग मन भरे निश्चयांनी,
समस्त दुष्कर यत्न्यांनी,
पुनरपि हर्षभरुनी
आणणे पहाट आहे.
आता मजसाठी थांबोणी,
नवीन वाट आहे ...  

Thursday, 28 March 2013

का ग आई रडतेस ?


का ग आई तू रडतेस
माझ्या जन्मावर
गर्द काळोखी पसरतेस
उमलणाऱ्या जीवनावर
तव हळव्या मातृस्पर्शाने
डोलणारी मी कलिका
त्या उन उन अश्रुने
दाहक अग्नी होवून पोळतेस
सांग कि ग आई ..का रडतेस
तुझ्यापासून सुरवात
मम नव विश्वाची
तुझ्यामुळे फारकत
स्वर्गीय संवेदनांची
तूच भली ताकत
माऊली माझी,मला अव्हेरतेस
खरच सांग न ..का रडतेस
देइन तुझी हि बाहुली
सौख्यस्वप्नास आकार
वचनबध्द हि सावली
करण्यास सर्व साकार
अशी का आल्या पावली
परतून जा म्हणतेस
कृपा करून सांग न ..का रडतेस
मजसवे काही बोल
उरत श्वास गुदमरतोय
उदारातली ओल
नासिकेत कली भरतोय
छकुलीसवे डोल
आतुर मी, कधी कुरवाळतेस
डोळ्यात पाणी,
कशी ग तू हसतेस
वात्सल्यभरल्या नजरेने,
कितीदा ग ओवाळतेस !

  दुसऱ्या खेपेस पण मुलगी झाली म्हणून लेबर रूम मध्ये रडणारी आई , बाहेर जेंव्हा तिला शिफ्ट केले रूम मध्ये तेंव्हा त्याच बाळाला जवळ घेवून पाहत होती , कुरवाळीत होती , डोळे भरून प्रेमाने पाहत होती . तो प्रसंग पाहून हि  कविता सुचली!