या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 11 July 2013

सई


  बेल झाली आणि फुलपाखरांच्या झुंडी उडाव्यात तशी छोटी छोटी मुले वर्गाबाहेर पळत सुटली , साऱ्या मैदानभर पसरली . ती सुंदर फुलपाखरे फिकी पडवीत अशी हि गोंडस मुले भासत होती . अंगणभर बागडण्यात  ज्या कोमल जीवांना आनंद आहे , त्या तीन चार वर्षाच्या निरागस फुलांना आईबापांनी शाळा नावाच्या कोंडावड्यात  आणून कोंडलेले . पण बांधलेले जनावर जसे मुक्त झाले की दिसेल त्या दिशेला उधळते तसेच या मुलांबद्दल न झाले तर नवल ! सई मात्र आज खोकत खोकत खाली मान घालून जिथे स्कूलबस असते त्या दिशेला चालली . बसमध्ये जावून आपल्या जागेवर बसली . इतर मुलांसारखे तिचेही बालपण कुतूहल , निरागसता आणि चंचलता या गुणांनी परिपूर्ण होते , परंतु आज तिला बरेच वाटत नव्हते , कधी एकदा आईच्या कुशीत जावून झोपते असे झालेले . आईच्या आठवणीने तिचे मन व्यथित होत होते . तिच्यासाठी सर्व वेदनांचा अंत कुठे असेल तर आईच्या कुशीत ! आई सुरवात आईच अंत इतकेच त्या चिमुकल्या जीवाचे ज्ञान ! आज घर येईपर्यंत तिला दम निघत नव्हता . गाडी थांबली आणि दफ्तर तिथेच फेकून ती पळू लागली . आई बाहेरच चालत होती , अरे पण हे काय अशी का चालतेय आई , रडत रडत …. आईचे रडवेले तोंड पाहून सई धावत येउन आईला बिलगली , पण  आतून पळत आलेल्या आजीने तिला ओढून बाजूला केले .
"अगं  बाई आईला नको त्रास देऊ , चल बाजूला हो ! आईचे पोट दुखत आहे . आईला आता बाळ होणार आहे . आहे न मज्जा ?" सईला जवळ घेत आजी तिला सांगू लागली .
माझी आई रडते आणि आजीला कसली गं मज्जा येते ?  फुरंगटून सई आजीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली . तिला आजीला आनंद का होतोय याचा ठाव लागेना . आजीपासून दूर झालेली सई न उमगल्याचा चेहरा करून आईकडेच पाहत राहिली .
"अगं पिला आपल्या आईला आता बाळ होणार , रियाच्या भैय्यासारखे !" आजीने तिला समजेल असे समजावले . आता मात्र कळी  खुलली , गोंडस चेहऱ्यावर सुमधुर हास्याची लकेर उमटली . तिचा चेहरा पाहून आजीला गुलाबाचे फुल उमलते आहे असाच भास झाला . मग आजीच्या गळ्यात पडत ती आणि आजीही हसत सुटल्या
 "खरंच  का गं आजी मला पण रियाच्या भैय्यासारखे बाळ मिळणार खेळायला ?" मनातले कुतूहल बाहेर काढत सईने आजीला प्रश्न केला .
"हो गं पिलू होणार आईला बाळ , पण आईला त्रास नाही द्यायचा . शहाण्या मुलासारखे वागायचे बर " आजीनेही अट  घातली .
"हो गं आजी , आज मी आईला त्रास नाही देणार . तुझ्याच हातून जेवणार , आवरणार . तुझ्याच जवळ झोपणार पण . मग आई बाळाचे आवरिल , हो ना ?" आईच्या जवळ जाण्याला पारखे होणार यापेक्षा बाळ  येणार म्हणून सई  आज आजीची कुठलीही अट  मान्य करायला तयार झाली .
"माझी गुणाची गं नात ती !" आजीने सईच्या गालावर दोन्ही हात फिरवत स्वतःच्या कानाच्या मागे दोन्ही हातांची बोटे कडकडून मोडत सईची माया काढली . दिवसभरात असे ती कितीतरी वेळा करत असे . सई होतीच  खूप गोड आणि समजूतदार !
       आजीने आज तिला कडेवर घेऊन जेवू घातले . आज सईचे दुखणे कुठच्या कुठे पळून गेले , पण रडत फिरणारी आई पाहून तिचेही तोंड रडवेले होई . तिच्या आई प्रेमाला सर्वजण  जाणून होते . आजीने मग अलगद तिला तिथून उचलले आणि आत घेऊन गेली . ती आज बाळाच्या स्वप्नात हरवून आजीच्या पोटाला धरूनच झोपी गेली . आज आईचे पोट धरून झोपायला मिळणार नव्हते , पण बाळ येणार हा आनंद जास्त होता म्हणून आई नाही झोपायला याचे दु:ख कमी झाले . किती न माणसाचे मन विचित्र एखादी गोष्ट जोवर मिळते तोवर त्याशिवाय काहीच नको असते पण नाही मिळत हि जाणीव होताच मग आहे ते पण चालते !
             आईच्या मांडीवर झोपलेले एक गोरेपान बाळ पाहून सई हरकून गेली . इवलेसे हात ,पाय ते छान डोळे , डोक्याचे काळेभोर जावळ असे नाजुकसे बाळ  आता उठून हातपाय झाडू लागले , त्याच्या मोहक हालचाली पाहून सई  टाळ्या पिटत नाचू लागली . तिला  तिचा आनंद कसा व्यक्त करावा हेच समजत नव्हते . कधी एकदा हि गोष्ट आपण जाऊन  रियाला सांगतो असे तिला होऊन गेले . बाळाला हलका हात लावून तिने रियाच्या घराकडे धूम ठोकली .
"रिया , रिया ssss" सई लांबूनच हाक मारत होती . रिया बाहेर येत तिच्याकडे पाहू लागली .
"रिया , मला पण भैय्या झालाय आता खेळायला . त्याचे हात ना मऊ मऊ कापसासारखे आहेत . " सई  धापा टाकत आपल्या बाळाचे कौतुक रियाला सांगू लागली .
"आमचा भैय्या तर तुमच्या बाळापेक्षा छान आहे ."
"नाही माझच  बाळ चांगलं  आहे . गोरं  पण आहे ." सई  ठसक्यात म्हणाली . आता दोघींचे चांगलेच भांडण जुंपले . रिया तिच्या भैय्याला हात लावून देत नसे त्याचा राग सईला होता म्हणून तीही आज तिच्या बाळाचे कौतुक सांगून रियाला चिडवत होती .
"रियाच बाळ  काळा , आमचा भैय्या गोरा ." सई  आता सुरात  टाळ्या पिटत  नाचत ओरडू लागली . हिच्या उत्साहापुढे रिया बिचारी काही बोलू शकत नव्हती , आणि जरी तिने बोलण्याचा प्रयत्न केला तरी सई तिचे ऐकत नव्हती . शेवटी रियाने मोठ्याने भोंगा पसरला . तिचा आवाज ऐकून रियाची आई बाहेर आली .
"सई का ओरडते ? मारू का तुला ? रियाला का रडवते ?" तरी सई  ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ती आपली एकाच गाणे लावून ओरडत होती . शेवटी रियाची आई एक लाकूड घेऊन  तिला मारायला धावली , सई  पण घराच्या दिशेने धावू लागली . सई पुढे आणि रियाची आई मागे , शेवटी रियाच्या आईने सईला पकडलेच ! आता सई घाबरली आणि रडू लागली …. रडतच आईला हाका मारत ती खडबडून उठली . डोळे चोळत ती शेजारी बघू लागली पण आई जवळ नव्हती आणि आजीही नव्हती . तिला आणखीनच रडू कोसळले . ती झोपेतून उठली कि आधी आई हवी असे तिला , पण आज कुणीच नव्हते . सईचा भोंगा ऐकून तिची काकू धावतच आली .
"काय झालं माझ्या सोनूला , उगी बाळा उगी ." तिची काकू तिची समजूत काढत होती पण आईसाठी व्याकुळलेले तिचे मन मात्र रडत रडत तिच्या आईला शोधत होते . सई  काही केल्या गप्प बसेना आता काकूला पण समजत नव्हते या फुलपाखराची समजूत कशी काढू ?
"सई आता दीदी होणार , सईची आई आज डॉक्टरांकडे  गेली बाळ आणायला . उद्या आजी आणि आई आपल्याला नवं , गोर बाळ आणणार आहेत ."हि क्लुप्ती लगेच कामी आली आणि रडके तोंड क्षणात हसू लागले . अलगद काकूला येउन बिलगले आणि चालू झाली प्रश्नांची सरबत्ती !
"काकू आपलं बाळ गोरं आहे ना ?"
"हो आहे ना ."
"मी सांगत होते रियाला , तर ती म्हणली नाही म्हणून ." सई अजून स्वप्नातल्या विचारांत होती . एक ना अनेक प्रश्नांच्या भडिमारात काकू हरवून गेली . प्रश्न काही संपत नव्हते आणि काकू पण तिचे काम सांभाळत प्रश्न झेलत होती आणि उत्तरे फेकत होती . शेवटी सई बाहेरच्या फुलझाडांच्यात रमली . अनेक रंगांची फुले तिच्या आईने आणि काकूने दारात लावलेल्या त्या फुलझाडांना आली होती . सईची आईनंतर दुसरी आवडती गोष्ट म्हणजे विविधरंगी लहान मोठी फुले ! ती तासंतास त्या फुलांच्या गराड्यात असे , लहान नाजूक रानफुले तर तिला खूप आवडत म्हणून रोज आजोबांबरोबर ती मळ्यात जायचा हट्ट करे आणि येताना वेगवेगळी ,सुंदर नाजुकशी फुले घेऊन येई . मग एक एक करून सर्वांना फक्त दाखवी देत फक्त आईला असे , आजीने किती वेळा मागो देवपूजेला दे म्हणून पण ती ऐकेल तर शपथ ! आजही तिने गुलाबाचे फुल तोडले , काकू खूप रागावणार होती पण आज तिची आई नाही तिने भोकाड पसरले तर आवरायला म्हणून बिचारी मुग गिळून गप्प बसली .
"काकू काकू , मी ना हे फुल बाळाला देणार ."
"अगं वेडे ते बाळ येईपर्यंत सुकून जाईन , उद्या तोडायचे होते गं पिला तू . " काकुच्या या बोलण्यावर स्वारी एकदम नाराज झाली . आता बाळाला कुठले फुल देऊ ? या काळजीने बिचारे सईचे मुख्पुष्प मात्र आधीच सुकून गेले . इतक्यात त्यांचे बोलणे लांबून ऐकणारा काका आला , त्याने सईचा नाराज रंग ओळखला आणि मग सईला जवळ घेऊन म्हणाला ," आम्ही आमच्या पिलूचे फुल सुकणार नाही यासाठी एक आईडिया करणार ."
"खरच कारे काका ? मग नाही ना सुकणार फुल ?"
"नाही सुकणार , पण एक अट आहे !" प्रश्नार्थक नजरेने सई त्याच्याकडे पाहू लागली .
" अरे पिला फक्त एकच अट कि सईने आज आई नाही म्हणून रडायचे नाही , आणि काकुच्या हाताने जेवायचे . सईची आई उद्या येणार आहे . करणार ना मी सांगितले ते ?" सईने होकारार्थी मान हलवली पण एक व्याकुळतेने भरलेली रेघ तिच्या गोंडस चेहरा व्यापून राहिली . आज आईविना राहायचे म्हणजे
मग सई आणि काकाने एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या फुलाचा देठ बुडेल आणि फुल वर राहील असे ठेऊन तो ग्लास उंच ठेऊन दिला . फुल सुकणार नाही या चिंतेतून सईची एकदाची सुटका झाली . पण आईविना झोपायचे ती एकटीच बाहेर बसून राहिली सर्वांनी तिला खेळवण्याचा ,रिझवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या त्यांना यश येत नव्हते . ती बराच वेळ बसून समोर वाहणाऱ्या रस्त्याकडे पाहत राहिली . गाड्या येत जात होत्या , रोज त्या वाहनांना पाहून खिदळणारी सई  आज निश्चल होती .
            समोर एक कार थांबली अगदी दारासमोर , आजीला उतरताना पाहून सईला कोण आनंद झाला . तिला इतकेच कळत होते आई आली कि बाळ येणार ! ती धावत गाडीजवळ गेली , उस्तुकतेने ती आई उतरण्याची वाट पाहू लागली पण आत्या उतरलेली पाहून तिचा विरस झाला . आत्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण तिने लगेच धूम ठोकली ते थेट काकाच्या मांडीवर जावून बसली . आत्या बोलावत होती तिला , पण काही केल्या ती येत नव्हती . शेवटी आत्याने आईकडे जायचे आमिष दाखवून सईला जवळ घेतलेच . त्याच आनंदात नंतर ती आत्याच्या मागे पुढे हिंडत राहिली . तिला फक्त एकाच आशा होती आत्या तिच्या गाडीतून मला आईकडे नेणार मग मला बाळ पाहायला मिळणार . ती अंधार झाला तरी आत्याच्या मागे हिंडत राहिली शेवटी तिला आईकडे नेणे भागच पडले .
      दवाखान्यात जायच्या नावाने लांब पळणारी सई आज तिथे जायला उत्सुक होती . आईला पाहून लगेच बिलगु असे तिला झालेले पण एका कॉटवर झोपलेली आजरी आई पाहून तिला कसेसेच झाले . बाळ पण आईजवळ होते पण त्या कपडे न घातलेल्या भैय्याला हात लावायचे धाडस सईला झाले नाही . ती आत्याच्या मागे लपू लागली . आई तिला बोलावू लागली पण सई मागे मागे सरकत राहिली . बाळ होण्यासाठी आईला सलाईन लावले याचे तिला वाईट वाटले . मघाचपासून आईच्या भेटीला उतावळी झालेली ती आता मात्र आईपासून दूर पळत होती आणि ते आईला लावलेल्या सलाईनला भिउन ! माणूस तसे आयुष्यभर कितीतरी मोठ्या स्वप्नांचा त्याग करत राहतो , एका खोट्या आणि छोट्या भीतीने आणि ज्यावेळी ती भीती ओलांडून तो पुढे सरकतो तेंव्हा किती शुल्लक होती अडचण जी आपण सहजगत्या पार करू शकलो , हे आठवून आधीच्या आपल्या भीतीची कीव करत राहतो . सई पण माणसाचेच पिलू होती . भीती हि जन्मापासून तिच्या मनात ठाण मांडून बसलेली ….
      कष्टकर्‍यांचे कष्ट , उतारवयाला वार्धक्यपिडा, काळजीने पिचलेल्याला त्याची व्यथा विसरायला लावणाऱ्या बाळलीला दवाखान्यातून आल्यापासून बंद आहेत हे पाहून आजोबांनी सईला छेडलेही पण आज ती खूप गप्प होती . सर्वांना अपेक्षित होते कि सई घरी येऊन बाळाच्या गमती जमती सांगेल , उत्साहाने काही बोलेन पण आज काही कळी खुलत नव्हती . शेवटी काकीच्या हाताने थोडेफार जेवण करून काकाजवळ येऊन पहुडली . तिला झोप मात्र येत नव्हती . शेवटी काकाच तिच्याशी बोलू लागला .
“आज सईदीदी बोलणार नाही का आमच्याशी ?”
“...”
“आई उद्या येणार न बाळाला घेऊन ?”
“हा , पण काका आईला सलाईन का लावले ?”
“आईला बरे वाटावे म्हणून , तिचे पोट दुखत होते ना ? तर सलाईन लावल्यामुळे ते दुखायचे थांबले .”
“बाळ घ्यायचे डॉक्टरांकडून म्हणून नाही न लावले , तसं असेल तर नको आपल्याला बाळ .”
“नाही पिलू , तसे अजिबात नाही . आईला बरे वाटावे पोट दुखू नये म्हणून लावले सलाईन . आता उद्या आई बाळ घरी येणार मग आपण आपले फुल देऊ त्यांना .” या विश्लेषणावर मात्र ते ते दोन चिमुकले डोळ्यांचे पोवळे चकाकले आणि खुदकन हसले .
   आई ,सई आणि बाळ यांच्या सहजीवनाचे सुखस्वप्न पाहत हळूच झोपेच्या पारंब्यावर हिंदोळे घेत ती झोपेच्या आधीन झाली ...
    चिमण्यांच्या चिवचिवाटाने बाहेर खुललेली प्रभा आतल्या सईच्या चिवचिविने बहरू लागली होती . तिच्या अनेक प्रश्नांनी , सुमधुर आवाजाने , लोभसवाण्या चेहऱ्याने  सर्वांची सकाळ सुप्रभात होत होती . कालच्या बाळाचे आगमन आणि आजच्या सईच्या बाळलीला दोन्हीच्या सुवर्णयोगाने घरातील वातावरण सुखदायक लहरींनी भरून गेले होते . सकाळच्या सर्व गोष्टी आवरून घरातील इतर लोकांची ज्याच्या त्याच्या कामाकडे पांगापांग झाली . आज सईला सुट्टी होती मग तीही आवरून घरात एका बाजूला कालचे ते फुल घेवून बसली . ती एका ठिकाणी शांत बसली म्हणून जे ते त्यांच्या कामात गर्क झाले . थोडावेळ कुणाचेच तिच्याकडे लक्ष नव्हते . माहेरी आलेली आत्या थोडी उशिरा उठली पण उठताच तिला सईची आठवण झाली , सर्वांना सई विचलित आहे हे रात्री ध्यानात होते . म्हणून आधी आत्या सईला शोधू लागली तर एका बाजूला सईचे फुल आणखी सजवण्याचा उद्योग चालू होता . तिने तिची जुनी बाहुली मोडून तिच्यातील रंगीत कागदाचे छोटे छोटे गोल त्यात मांडून आणि काही चमक त्यावर टाकून ते गुलाबाचे फुल तिच्या वयाच्या मानाने अप्रतिम सजवले होते आणि काही हिरवी पाने ती त्या फुलाला जोडण्याच्या प्रयत्नात होती पण ते काही तिला जुळत नव्हते . आता आई येणार होती आणि ती येईपर्यंत हे सर्व तिला पूर्ण करायचे होते . आत्या तिच्याकडे कौतुकाने पाहत होती पण तिला डिस्टर्ब करावे असे आत्याला अजिबात वाटले नाही . तिचा प्रयत्न खूप छान होता पण दोऱ्याने बांधल्याशिवाय ती पाने त्या फुलाला जोडली जाणार नव्हती . मग आत्या हळूच सईच्या बाजूला जावून बसली .
“सई sss , पिलू मी मदत करू ? किती सुंदर फुल सजवले आहे पिलाने ! कुणाला बरे देणार आहेस ? मला का ?” लाडीकपणे तिला जवळ घेत आत्या बोलली .
“नाही , मी ना आई आणि बाळाला देणार !” सईने घाईने स्पष्टीकरण केले .
“बर बर , दे हो पिला पण हि पाने जोडायची तर दोऱ्याने बांधावी लागतील , बांधून देऊ का मी ?”
“हो द्या आत्या .” खुश होत सई बोलली . त्या गुलाबापेक्षाही रमणीय असे सईचे हास्य पाहून क्षणभर तिची आत्या हरकून गेली . आणि दोघींनी मिळून ते फुल सजवले ! आता सर्व घर बाळाच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून होते .
   कोमल , सुस्वरूप असे छोटेसे बाळ काकीआजीच्या कुशीत विसावलेले आणि कान बांधून आणि शाल पांघरून आई आणि बाळ बाबा , आजीसोबत दारात आले . घाईने सईच्या काकीने पाणी आणि भाकरीचा तुकडा ओवाळून टाकून इडापिडा टळो म्हणून बाजूच्या झाडीत टाकून दिली . अगदी आनंदात बाळाचे स्वागत झाले . आईसोबत बाळही त्यांच्यासाठी तयार कॉटवर विसावले .... सई मात्र इकडून तिकडून त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती ...हातात ते फुल तुटू नये म्हणून सांभाळून धरत होती ...कुणाचा स्पर्श त्याला होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत होती . भोवतीच्या गर्दीतून तिला पुढे जाताच येत नव्हते . थोडी जागा झाली आणि छोटी सई सुळकन आईजवळ गेली आणि फुल बाळाच्या पुढे धरून घे म्हणणार तोच आजीने रागाने येऊन तिला बखोटीला धरून बाजूला केले आणि जोराने तिच्यावर खेकसली .
“सई बाळाच्या डोळ्यात जाईन न त्याची घाण , चल हो बाजूला , जा बाहेर जाऊन खेळ ...”
आजीच्या या वागण्याने मघापासून आईची वाट पाहणारी सई , आगीच्या ज्वालांनी एखादे सुंदर पुष्प होरपळून जावे तसे सईचे मुखपुष्प नुसते कोमेजुनच नाही गेले तर तिच्या कोमल भावनांचा जणू कडेलोट होत आहे असेच तिच्या त्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहून आत्याला वाटले . रोज भोकाड पसरून रडणारी सई आज मुकपणे अश्रू गाळत एका बाजूला जावून बसली ...... 

हीच आमची छोटी सई ! या कथेतील बराचसा भाग सत्य आहे . मी तिची आत्या तिच्या मनातील , बाळाच्या आगमनाने झालेल्या अनेक भावनांचा वेध घेऊन त्याना व्यक्त रूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न !

     
         

1 comment:

Unknown said...

खूप सुंदर लिहल आहे....