या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday, 3 August 2013

टाकलेली

  “आई ssss”सापकन आसुडाचा दोर कांताच्या पाठीवर उठला , जिवाच्या आकांताने तिने आईला साद घातली . हौसा बाजूलाच उभी होती पण त्या भगताला  काही बोलायची तिची बिशाद नव्हती . कांताच्या एकेका हाकेला हौसाच्या जीवाची तगमग वाढत होती , उन्हात पाण्याबाहेर तडफडनाऱ्या माशासारखी . पोटात कालवाकालव व्हायची पण कांताच्या अंगातली ती हडळ बाहेर काढायची तर या भगताचे ऐकणे गरजेचे होते . आज ना उद्या कांता नीट होईन या आशेवर हौसाने आणि सदाने दवाखाना केला , ब्राम्हण सांगेन ते सर्व केले पण पोरीत काही बदल होत नव्हता . रोज ती घुम्यासारखी बसायची . घराचा एक कोपरा धरून निपचित पडून राहायची . तिला जेवणाची हौस ना कामाची . भावजया तिला दोन तीन दिवस कामाला पण घेऊन गेल्या तिचे मन रमेल म्हणून , पण कांतात काही बदल झाला नाही . खुरपायला पात धरली की तिथेच बसून राहायची , मातीला बघत पण पुढे सरकतही नव्हती आणि खुरपतही नव्हती . भावजया पण कंटाळल्या तिला समजावून . दुसऱ्याच्या रानात काम करायचे तर हिला समजावण्यात वेल दवडून चालत नव्हते , कारण मालकीण रागावण्याची भीती होती . दुसऱ्या दिवशी त्यांनी काही तिला नेली नाही . भाऊ नी वडील वेगळे खात होते ,शेजारीच राहत. पण जशी कांता आली तसं हौसाच्या जीवाला घोर लागला होता . कसे व्हायचे पोरीचे ही जर नाही नीट झाली तर , भाऊ भावजया आपल्या मागे थोडीच बघणार आहेत . नाही दारोदार हिंडावे पोरीने वेड्यासारखे ..असा विचार येताच तिच्या जीवाचा थरकाप होई . या विचारांनी घायाळ होत हौसा आणि सदा जे कोणी सांगतील ते उपचार कांतासाठी करत राहिले . आज तर कुणा एका शेजारणीने हा भगत आणला होता . त्याने मारून मारून कांताच्या अंगाचे कातडे सोलून काढले होते . कांता फक्त आई म्हणून विव्हळत होती कसला प्रतिकार मात्र करत नव्हती . जवळजवळ अर्धा तास हा कार्यक्रम चालला शेवटी कांता बेशुध्द होऊन खाली कोसळली .
      ती पडल्यावर शेजारणीसकट त्या भगताने काढता पाय घेतला . हौसा मात्र रडत होती , आरडून कांताला साद घालत होती .
कांते , ए कांते उठ की गं कांते sss” लेकीच्या वेदनेने माउलीच्या अंगाचे पाणी पाणी होत होते . तिचाही नाईलाज होता . अडाणीच होती ती म्हणून या अश्या लोकांवर ती विश्वास ठेवत होती आणि कांताच्या मानसिक वेदनेसोबत शारीरिक वेदना पण वाढवत होती . आणि आपण तीचा त्रास वाढवतो आहे हे बिचारीच्या गावीही नव्हते . सदाने मात्र पळत जाऊन गावातल्या एकुलत्या एक डॉक्टरला बोलावून आणले . डॉक्टर पण नवीनच होते . त्यांनी साधारण महिन्यापूर्वी या गावात भाड्याच्या खोलीत दवाखाना चालू केला होता . लांब गावाचे असल्याने कुणी नातेवाईक पण नव्हते त्यांचे या गावात . लग्न नव्हते झाले , एकटेच राहत . आई , वडील , भाऊ गावाला होते . घरमालक त्यांना खानवळ पुरवत होते . उंच , अंगाने सडपातळ असलेले डॉक्टर शांत , संयमी आणि दिसण्यात पण उजवे होते . गरीब घरचे असल्याने या गावाकडच्या लोकांच्या कष्टाची आणि दु:खाची पुरेपूर जाणीव त्यांना होती . दुपारी विरळाच असल्याने , डॉक्टर कसलेसे पुस्तक वाचत बसलेले . इतक्यात सदा आत धापा टाकत आला .
डॉक्टरसाहेब !आत येताच सदाने डॉक्टरांचे पायच धरले . मळकट धोतर आणि अंगात फक्त गंजी घातलेला सदा डॉक्टरांना ओळखीचा नव्हता . पण ते एकदम गडबडले कारण वडिलांच्या वयाचा माणूस आपले पाय धरतोय या जाणीवेने त्यांना ओशाळल्यासारखे झाले . त्यांनी त्याला उठवून शांत केले .
काय झाले बाबा ?” त्याला न्याहळत डॉक्टर बोलले .
माझी पोर बिनसूद झाली डॉक्टर , चला ना घरी पाहून घ्या तिला . आमी कसायानी तिला भगताच्या हवाली केली , त्यांनी मारून मारून तिला बिनसूद केली किवं . तुमी चला साहेब , बघा तिला . माज्या कांतिला वाचवा साहेब .एका दमात सदाने जे सांगता येईल ते सर्व सांगितले . केस सिरीअस आहे म्हटल्यावर डॉक्टरांनी गरजेचे सर्व सामान ब्यागेत घेतले आणि सायकल घेऊन सदासोबत चालू लागले .
      धुळीचा दहा मिनिटांचा रस्ता पार करत ते दोघे भर उन्हात टेकडीच्या पुढे असलेल्या घराजवळ आले . पूर्वेला तोंड करून रांगेत चार खोल्या होत्या . मातीच्या भिंतीवर पत्रे टाकलेले . पुढे शेणाने सारवलेले अंगण आणि त्याच्या पुढे काही फुलांची झुडपे होती . पटांगण स्वच्छ होते . त्यातल्या एका खोलीत सदाने डॉक्टरांना नेले . आत जाताच डॉक्टरांना एक तेलकट वास आला . त्या अंधाऱ्या खोलीत एका बारीक खिडकीतून थोडा उजेड आत येत होता . खिडकी बंद होती , हे दोघे आत येताच हौसाने पुढे होऊन खिडकी उघडली , आत लख्ख प्रकाश पडला . त्या उजेडात कांता खोलीच्या मध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली . डॉक्टरांनी जवळ जाऊन तिची पल्स चेक केली . श्वासोच्छवास चालू होता पण ती वेदना देऊनही जागी होत नव्हती . डॉक्टरांनी कानाची पाळी दाबून पहिली पण कुठलाही रिस्पॉन्स त्या मुलीने दिला नाही . साधारण अठरा वर्षाची कांता मारामुळे लालेलाल झाली होती . चाफेकळी नाकाचा शेंडा लाल झालेला आणि चेहऱ्यावर माराच्या खुणा दिसत होत्या . तिचे ब्लडप्रेशर चेक करून डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले . तिच्या चेहऱ्यावरची नजर हटणार नाही इतकी सुंदर होती ती , डॉक्टरांची नजरही तिच्या चेहऱ्यावर खिळून राहिलेली . किती सुंदर आहे ही , काय झाले असेल हिला ? असे अघोरी उपचार कुठल्या आजारासाठी करत असतील हिचे आई वडील ?तारुण्याच्या ऐन भरात अशी वेळ का यावी या मुलीवर ? एक ना अनेक प्रश्न डॉक्टरांच्या संवेदनशील मनाला पडत होते . थोड्या वेळात ती हातपाय हलवू लागली . जडावलेले डोळे उघड्तानाचा त्रास तिच्या चेहऱ्यावर उमटला आणि डॉक्टरांनी उसासा सोडला . जरा वेळात ती पूर्ण जागी होऊन उठून बसली तिच्या मनगटाला हात लावत डॉक्टरांनी पल्स पाहत तिला विचारले , “कसं वाटतंय कांता ?”
विस्फारित डोळ्यांनी कांताने डॉक्टरांनकडे पाहिले . चुळबुळ ती दुसरीकडे बघू लागली . हौसाने गद्गदा हलवत तिला विचारू लागली , “सांग गं कांते कसं वाटतंय त्ये ?”
बर आहे आई आता , पण हात दुखतोय .तिचे हे शुद्ध बोलणे ऐकून डॉक्टरांना आश्चर्य वाटले .
होईल ते पण ठीक , बाबा गोळ्या देतो चला माझ्याबरोबर . आणि हो कांता उद्या बाबांबरोबर तु दवाखान्यात ये , येशील ना ?”
डॉक्टरांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते तिचे , परत शून्यात नजर गेली , जणू सगळे हरवून बसली होती आयुष्यात …..
धाडते तिला उद्याला साहेब .हौसा सावरून घेत बोलली .
ब्याग आवरून डॉक्टर आणि सदा बाहेर आले . दोघे चालू लागले , डॉक्टरांच्या मनातले प्रश्नांचे मोहोळ मात्र काही केल्या पुन्हा उचल खात होते , शांत होण्याचे नावच घेत नव्हते . माणसाच्या आयुष्यात असे हरवलेपण का येत असेल ? फक्त दुसरयासाठीच जगायचे असते का ? स्वतःच्या जीवाचे , भावनांचे काहीच मोल असु नये ? का या मुलीच्या आयुष्यात जगण्यासारखे काही उरले नसेल ? पायातली जोडवीगळ्यातल्या काळ्या मण्यांची पोत तर सांगतेय हिचे लग्न झालेय , मग असा कुठल्या दु:खाचा सागर उरात साठवून आहे ती ? हिला मुले असतील की लगेच आली असेल ती माहेरी ? हिला टाकलेली तर नसेल नवऱ्याने  ? इतक्या सुंदर बायकोला एखादा माणूस कसा सोडू शकतो ? का मी हिचा इतका विचार करतोय ? प्रश्नांच्या या मालिकेचा स्फोट तर होणार होताच , निम्मे अंतर पर केले तेंव्हा डॉक्टरांनी सदाला विचारलेच , “ बाबा हे असे का झाले ? या मुलीला काही अडचण आहे का सासरी ?”
मावळतीला झुकलेल्या सूर्याकडे पाहत सदाने एक लांब सुस्कारा सोडला .
काय सांगू साहेब माज्या सोन्यासारख्या पोरीच्या जल्माची लक्तरं . किती म्हनुनश्यान कष्ट उपसलं या पोरास्नी वाढवाया . तीन पोरांच्या पाठीव चौथं होऊन दिलं वाटायचं पोरगीच व्हणार , तीन भावास्नी राखी बांधाया . नवसाने अशी लेक झाली साऱ्या वस्तीव उठून दिसायची . जी नको ती लाड केलं . कुणाच्या पोरी शाळेत जात नव्हत्या पर हिला मी खांद्याव घेवून जायचो . आठवी पातूर शिकावली . पोरगी आठवीतच भलीमोठी दिसाया लागली . त्यात देखणी बी लई . सोनगावच्या जाधवाच एक चांगलं स्थळ आलं . घरच चांगलं , पोरगा बी उठून दिसायचा संगतीच्या पोरांपारीस . कांतीला पाहिलं आन लगीच व्हय म्हणला . झटदिशी ठरलं आन झालं बी लगीन .सूर्य आता क्षितिजाच्या आड गेला होता . डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत सदा पुन्हा सांगू लागला .
नव्या संसाराच कौतुक ते काय पहायचं , पावना बी जी नाय ती लाड करायचा . पहिल्या खेपला पोरगं झालं आन दुसऱ्या टायमाला पोरगी .
या मुलीला दोन मुले आहेत ?” डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले .
व्हय साहेब दोन पोरं पर दोनी त्या कसयाने त्येच्याजवळ ठीवली हायत , एकजरी इकडं असतं ना तर पोरीचं असं नसत झालं बगा .दुसऱ्या खेपला आली ती बाळातीन व्हायला तर त्या कसयान दुसरी बाई बघितली . नुसती बघितली नाय तर लगीन बी उरकून घेतलं. तरी बी कांती म्हणायची मी तिथच राहते पर त्यो जुल्मीच व्हता , ही देखणी म्हणून नाय त्यो आळ घ्यायचा . म्हणायचा जा इथून राह्यचं नाय . दारू ढोसून मार  मार मारायचा , पोरांना उरास धरून ती कोपऱ्यात पडून रहायची .
डोळ्यात दाटून आलेले अश्रू आवरेनासे झाले सदाला , समोरचा रस्ता पुसट होत होता . धोतराच्या सोग्याने डोळे पुसून पुन्हा चालायचा . डॉक्टरांना आता खूप वाईट वाटू लागले . उगीच आपण या बाबांच्या जखमेची खपली काढली . किती दु:ख आहे बिचारयांच्या मनात , लाडकी लेक संपते आहे हे पाहताना खरंच किती तगमग होत असेल या दोन जीवांची
नका रडू बाबा , होईल सर्व ठीक , आपण उपचार करू तिचे . अजिबात काळजी करू नका उद्या घेऊन या तिला . तुम्हाला तुमची मुलगी पहिल्यासारखी करून देऊ .आपण काय  बोलून गेलो हे कळल्यावर डॉक्टर थोडे बावरल्यासारखे झाले . जास्त तर नाही ना या बाबांच्या आशा वाढवत ? या विचाराने त्यांचे मन धगधगू लागले . पण बाबांचा उजळलेला चेहरा पाहून त्यांना थोडे समाधान वाटले . पण पुढे सावरून घेत ते बोलू लागले .
मी काही देव नाही बाबा पण जितके काही ज्ञान आहे माझे या विषयात त्याचा पूर्ण आणि प्रामाणिक उपयोग करून मी या मुलीचे आजारपण कमी करण्याचा प्रयत्न करीन .तिला या भ्रमिष्ठ अवस्थेतून बाहेर काढीन .
त्या आडाणी सदाला डॉक्टर पुन्हा असे का बोलले हे उमगले नाही पण डॉक्टरांच्या रुपात त्याला एक आशेचा किरण दृष्टीस आला . अंधारात चाचपडणार्‍याला चकाकणारा काजवा दिसला तरी थोडा दिलासा मिळतो तसेच वाटले सदालाही ! कारण आता या चमत्कारांनीच काही होऊ शकते असे त्याला वाटायचे . डॉक्टरांची मात्र वेगळीच मनस्थिती होती , या गरीब लोकांना उगीच स्वप्नांचे इमले बांधून देऊन त्यांचे प्रश्न सुटत नाहीत . खरंच जर या मुलीसाठी काही करू शकलो तर ठीक आहे . शिवाय आपले ज्ञान काही तज्ञ मानसोपचारतज्ञासारखे नक्कीच नाही . म्हणूनच आपल्या मर्यादा ओळखून मघाशी जे एक पाउल मागे आलो याचा जराही पश्चाताप त्यांना वाटला नाही . उद्या कांताला घेऊन येतो असे सांगून सदा जायला निघाला पण गडबडीत तो डॉक्टरांना फी विषयी न विचारताच बाहेर गेला . काय हे लोक ? मी धावतपळत त्या बाबांबरोबर गेलो , दवाखाना बंद ठेऊन तर त्या बाबांनी फी विषयी विचारले पण नाही , आणि मी किती तळमळलो त्या मुलीसाठी ? हे लोक असेच फुकटे असणार . जर नव्हते पैसे तर कमीत कमी उद्या परवा देतो असे तरी सांगायचे होते . अशा विचारांत हरवलेले डॉक्टर खुर्चीत बसतच होते की सदा पुन्हा धावत आला .
माफी असा साहेब , मी आडाणी गडी पण गडबडीत तुमचा पैसा द्यायचा विसरून गेलो बगा , लई डोकं येडं झालं बगा या पोरीच्या कारणानी , माफी करा .काकुळतीने सदा बोलला आणि शंभरची नोट पुढे धरली . डॉक्टरांना कसेसेच झाले , आपण उगीच गैरसमज केला म्हणून त्यांची फी घेऊन उरलेले पैसे परत करत डॉक्टर बोलले , “तसे काही नाही बाबा , उद्याला तुम्ही येणारच होते मग मीही काही बोललो नाही .
      नुकतीच चैत्र पौर्णिमाहोऊन गेलेली . उन्हाची रखरख अंगाची लाही करत होती . पण तरी डौलाने झाडावर मिरवणारी चैत्रपालवी माणसाच्या मनाला थंडावा देत होती . दुपारी कुणी पेशंट नव्हते . डॉक्टर बाहेर उभ्या असलेला  कडूनिंब पाहत होते . पानांपेक्षाही जास्त असणारा तो पांढरट पिवळ्या रंगाच्या फुलांचा बहर खूप मनमोहक दिसत होता . त्या मोहराचा येणारा मंद वास , आत येणाऱ्या वाऱ्याच्या थंड झोताबरोबर येत होता . घामेजलेल्या शरीराला तेव्हडाच विसावा मिळायचा , पुन्हा मोकळा श्वास घेण्यासाठी ! पण डॉक्टरांना सकाळी खूप राग यायचा त्या मोहराचा , कारण गळून पडणारी फुले त्यांच्याच दारात पडत होती . रोज त्यांना ती स्वतःच साफसफाई करावी लागे . आता त्यांना ती गोष्ट आठवली आणि ते मनाशी हसू लागले . खरंच किती विचित्र आहे माणसाचे मन  , जी गोष्ट सकाळी त्रास देत होती ती आता ग्रीष्माच्या दुपारी आनंद देत आहे . किती या निसर्गाची किमया न्यारी , नको असणाऱ्या काही गोष्टी कधीतरी मनाला सुख देऊन गेल्या आहेत आणि भविष्यात देणार आहेत मग आज त्यांचा थोडा त्रास बाजुच्यानी काढायला काय हरकत आहे . या विचारांसरशी त्यांना कांताची आठवण झाली . का आली नसेल ती ? काही प्रोब्लेम तर नसेल झाला ? की ती मुलगीच यायला तयार नसेल ? काही असो पण खरंच किती दु:ख अनुभवते आहे ती या कोवळ्या वयात ...असे नशीब कोणाला न मिळो ...तसे पहिले तर कोण सुटलाय या दैवाच्या फेऱ्यातून , आपणही शेवटच्या वर्षाला असताना कोण कुठल्या त्या पोरीपायी आत्महत्या करण्याच्या विचारात होतोच की ...पण नशीब मोठे म्हणून देसाई सर भेटले . किती समजावले त्यांनी , आधी स्वतःसाठी जगावे मग दुसऱ्याचा विचार करावा . जीवन खूप सुंदर आहे . पुन्हा ते भेटेल की नाही याची कोणालाच कल्पना नाही , मग का असे गमवायचे ते अश्या लोकांसाठी जे आपला विचारही नाही करत ? त्यांच्या समजवण्याने आणि अथक प्रयत्नांनी तर आपण डिप्रेशन मधून बाहेर आलो . सुनीताची आठवण येताच डॉक्टर  मनाशीच हसले . किती वेडा होतो मी , माझ्याविषयी जराही विचार न करणाऱ्या त्या मुलीसाठी मी माझे जीवन संपवणार होतो . किती खुळचटपणा ! ती तिच्या आयुष्यात सेटल झाली असती पण आपल्या आई वडिलांचे किती हाल झाले असते . त्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई आपल्या शिक्षणासाठी संपवली होती . काय केले असते त्यांनी आपल्या मागे ? धन्य ते देसाई सर , त्यांच्या उपकारांचे ओझे उतरणे कठीण आहे . पण अश्या कांतासारख्या पेशंटला नीट करण्यास जरी यशस्वी झालो तरी थोडसे तरी उतराई होऊ त्यांच्या उपकारातून काल वाटायचे की का इतका विचार करतोय आपण या मुलीचा पण आता उमजते आहे की काही दिवसापूर्वी आपणही याच फेज मध्ये होतो म्हणून कदाचित तिच्याविषयी आस्था वाटतेय आपल्याला. का बरे आली नसेल ही कांता ? तिच्या बाबांनी तरी काही निरोप येऊन  सांगायचा होता .
     डॉक्टरांना  विचारांत वेळ कधी गेला हेच समजले नाही . डोक्यावरची तळपणारी उन्हे , पश्चिमेला झुकलेल्या सूर्यामुळे आता तिरपी होत सौम्यपणे दारातून आत येत गारव्याला पसरलेल्या कुत्र्यासारखी अंग टाकून टेबलावर पसरली होती .इतक्यात घरमालकिणीची हाक ऐकू आली .चहा साठी त्या बोलावत होत्या . येतो म्हणून उत्तरादाखल खिडकीतून आवाज देऊन डॉक्टरांनी सांगितले आणि मरगळलेल्या, बसून अवघडलेल्या शरीराला हातपाय ताणत , मोकळे करत खुर्चीतून उठले . मोरीत जावून बाद्लीतले थंड पाणी चेहऱ्यावर शिडकावले . त्या थंड स्पर्शाने उगीच अंग मोहराल्यासारखे झाले . अंगभर रोमांच उभे राहिले . उन्हाने तापलेले शरीर थंड करत अंगभर उठलेले शहारे पुन्हा शांत झाले . हातपाय पुसून तोंड पुसत ते बाहेरच्या खोलीत आले . सदा आणि कांता बाकावर येऊन बसले होते
कशी आहे बाबा मुलगी तुमची ? परत काही त्रास नाही न झाला ?” मनातील त्यांना पाहून झालेली खुशी जराही चेहऱ्यावर न दाखवता डॉक्टरांनी सदाला पाहत विचारले .
नाय काय तरास झाला साहेब , पर बोलत काय नाय , तिच्या आईन बळ बळ दोन घास खाया घातली . दुपारच्याला येणार व्हतो पर लई उन होतं , म्हनुश्यान तिची माय बोलली उन उतारलं न मग जा , म्हणून उशीर झाला .
डॉक्टरांना थोडे समाधान वाटले , उशिराचे कारण विचारायच्या आधीच समजले . कांता मात्र एकटक खाली पाहत होती . तिने एकदाही वर मान केली नाही की आपणहून या संभाषणात सहभागी झाली नाही नाही .

बर बाबा मी पाच मिनिटात आलो चहा घेऊन , आल्यावर निवांत बोलू . तुम्ही इथेच बसा . कुणी आले पेशंट तर बसून ठेवा , लगेच येतील असे सांगा .थोडक्यात इथे लक्ष ठेवा असे सांगून डॉक्टर मागच्या दाराने वर घरमालकांनकडे गेले . ते गेल्यावर कांता वर मान करून दवाखाना बघू लागली . सगळीकडे सामान नेटके लावलेले , टेबल पण स्वच्छ होते . फारशी अनेक दिवस न पुसाल्यासारखी मळकट दिसत होती . खोलीचे छत कौलारू असल्याने जाळ्याजळमटे त्यांची मालकी हक्क असल्यागत चिकटलेली होती . एकटा पुरुष इथे राहतो आहे याच्याच जणू खाणाखुणा दाखवत होती ती खोली . एका स्रीच्या हातांची तिला गरज आहे याची जाणीव सहज तिऱ्हाईताला व्हावी असेच खोलीचे रूप होते . माणूस तसं किती एकटा असतो ना ? जन्माला येताना आणि जाताना सुद्धा ! आयुष्याभरही एकटाच तर असतो , माणसांत हरवलेला एकटा ! जीवनातल्या प्रत्येक दु:खी वळणावर त्याची जाणीव आणखी पोखरून टाकते . सहजीवनाची ओढ यातूनच तर निर्माण होत नसेल ? पण या सहजीवनात ज्या कुणाच्या वाट्याला चांगला जोडीदार येतो त्याचे सहजीवन फुलते , बहरते . त्या सहजीवनातही वादळे येतात , नाही असे नाही , पण सामंज्यस्याने ती शांतही होतात . तिच्या बिचारीच्या वाट्याला मात्र तिला हवे ते सहजीवन आलेच नाही .तिची सामंज्यस्याची सर्व ओझी एकटीने उचलण्याची तयारी होती , पण तेही तिच्या नशिबी नव्हते . म्हणूनच कांता निराशेच्या गर्तेत कोसळत होती . तिला गरज होती एका हाताची , जो तिला मानसिक आधार देऊ शकणार होता . पण तो हात नवऱ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा असावा असे विचारही तिच्याभोवती कधी रेंगाळले नव्हते . नवराबायकोच्या नात्याशिवाय असलेले सहजीवन म्हणजे व्यभिचार ही कल्पना घेऊन जगात असलेला समाज तिच्याभोवती होता . तिचे तरी विचार यापेक्षा काय वेगळे असणार होते . शारीरिक गरजेच्या पुढे जाऊन काही  मानसिक गरजाही असतात ही कल्पना त्यांच्या मनाला कधी शिवली नव्हती . म्हणून मानसिक उपचार घेणारे लोक वेडे आणि असे उपचार देणारे डॉक्टर वेड्यांचे अशीच सर्वांची धारणा असे . अवतीभवती आता कांताची गणना पण वेडी म्हणूनच होऊ लागली होती . हौसा सदाला मात्र असे अजिबात वाटत नसे . त्यांनी कांताला लहानपणापासून पाहिले होते . वाढताना , खेळताना , हसताना , रडताना ,संकटांचा सामना करताना पण त्यांच्या दृष्टीने तिला तिच्या दु:खाने अबोल बनविले होते . तिच्या जगण्याला एखादे उदिष्ट हवे होते . तिची मुले जरी सोबत असती तरी ती इतकी व्यथित नसती बनली . आणि असे उद्दिष्ट मिळाले की रातराणी होऊन बहरणार होती , भोवतीच्या अंधारात सुगंध पसरणार होती. ….
                                                                                       क्रमशः

Friday, 19 July 2013

विस्कटलेली मी

विस्कटलेली मी
कशी रे सावरू
व्याकुळल्या मना
कशी रे आवरू

पांगारा फुलला
हिरव्या त्या लता
तुजविण झूट
ही सारी सुबत्ता
तुजसाठी सांग
किती आता झुरू

हसणारे झरे
बाजू खळाळती
पवन स्पर्शाने
तरुही लाजती
याद तुझी अशी
कितीदा अव्हेरू

अवती भवती
प्रीतीचे चांदणे
श्वेत पावलांनी
तुझे हळू येणे
शशी दर्शनाने
रातीत बावरु

ओढही तुझीच
येशी परतून
नेत्रात आसव
न जाती सुकून
कविता या माझ्या
तुझेच लेकरू
विस्कटलेली मी …
                                    -संध्या §.

Thursday, 11 July 2013

सई


  बेल झाली आणि फुलपाखरांच्या झुंडी उडाव्यात तशी छोटी छोटी मुले वर्गाबाहेर पळत सुटली , साऱ्या मैदानभर पसरली . ती सुंदर फुलपाखरे फिकी पडवीत अशी हि गोंडस मुले भासत होती . अंगणभर बागडण्यात  ज्या कोमल जीवांना आनंद आहे , त्या तीन चार वर्षाच्या निरागस फुलांना आईबापांनी शाळा नावाच्या कोंडावड्यात  आणून कोंडलेले . पण बांधलेले जनावर जसे मुक्त झाले की दिसेल त्या दिशेला उधळते तसेच या मुलांबद्दल न झाले तर नवल ! सई मात्र आज खोकत खोकत खाली मान घालून जिथे स्कूलबस असते त्या दिशेला चालली . बसमध्ये जावून आपल्या जागेवर बसली . इतर मुलांसारखे तिचेही बालपण कुतूहल , निरागसता आणि चंचलता या गुणांनी परिपूर्ण होते , परंतु आज तिला बरेच वाटत नव्हते , कधी एकदा आईच्या कुशीत जावून झोपते असे झालेले . आईच्या आठवणीने तिचे मन व्यथित होत होते . तिच्यासाठी सर्व वेदनांचा अंत कुठे असेल तर आईच्या कुशीत ! आई सुरवात आईच अंत इतकेच त्या चिमुकल्या जीवाचे ज्ञान ! आज घर येईपर्यंत तिला दम निघत नव्हता . गाडी थांबली आणि दफ्तर तिथेच फेकून ती पळू लागली . आई बाहेरच चालत होती , अरे पण हे काय अशी का चालतेय आई , रडत रडत …. आईचे रडवेले तोंड पाहून सई धावत येउन आईला बिलगली , पण  आतून पळत आलेल्या आजीने तिला ओढून बाजूला केले .
"अगं  बाई आईला नको त्रास देऊ , चल बाजूला हो ! आईचे पोट दुखत आहे . आईला आता बाळ होणार आहे . आहे न मज्जा ?" सईला जवळ घेत आजी तिला सांगू लागली .
माझी आई रडते आणि आजीला कसली गं मज्जा येते ?  फुरंगटून सई आजीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली . तिला आजीला आनंद का होतोय याचा ठाव लागेना . आजीपासून दूर झालेली सई न उमगल्याचा चेहरा करून आईकडेच पाहत राहिली .
"अगं पिला आपल्या आईला आता बाळ होणार , रियाच्या भैय्यासारखे !" आजीने तिला समजेल असे समजावले . आता मात्र कळी  खुलली , गोंडस चेहऱ्यावर सुमधुर हास्याची लकेर उमटली . तिचा चेहरा पाहून आजीला गुलाबाचे फुल उमलते आहे असाच भास झाला . मग आजीच्या गळ्यात पडत ती आणि आजीही हसत सुटल्या
 "खरंच  का गं आजी मला पण रियाच्या भैय्यासारखे बाळ मिळणार खेळायला ?" मनातले कुतूहल बाहेर काढत सईने आजीला प्रश्न केला .
"हो गं पिलू होणार आईला बाळ , पण आईला त्रास नाही द्यायचा . शहाण्या मुलासारखे वागायचे बर " आजीनेही अट  घातली .
"हो गं आजी , आज मी आईला त्रास नाही देणार . तुझ्याच हातून जेवणार , आवरणार . तुझ्याच जवळ झोपणार पण . मग आई बाळाचे आवरिल , हो ना ?" आईच्या जवळ जाण्याला पारखे होणार यापेक्षा बाळ  येणार म्हणून सई  आज आजीची कुठलीही अट  मान्य करायला तयार झाली .
"माझी गुणाची गं नात ती !" आजीने सईच्या गालावर दोन्ही हात फिरवत स्वतःच्या कानाच्या मागे दोन्ही हातांची बोटे कडकडून मोडत सईची माया काढली . दिवसभरात असे ती कितीतरी वेळा करत असे . सई होतीच  खूप गोड आणि समजूतदार !
       आजीने आज तिला कडेवर घेऊन जेवू घातले . आज सईचे दुखणे कुठच्या कुठे पळून गेले , पण रडत फिरणारी आई पाहून तिचेही तोंड रडवेले होई . तिच्या आई प्रेमाला सर्वजण  जाणून होते . आजीने मग अलगद तिला तिथून उचलले आणि आत घेऊन गेली . ती आज बाळाच्या स्वप्नात हरवून आजीच्या पोटाला धरूनच झोपी गेली . आज आईचे पोट धरून झोपायला मिळणार नव्हते , पण बाळ येणार हा आनंद जास्त होता म्हणून आई नाही झोपायला याचे दु:ख कमी झाले . किती न माणसाचे मन विचित्र एखादी गोष्ट जोवर मिळते तोवर त्याशिवाय काहीच नको असते पण नाही मिळत हि जाणीव होताच मग आहे ते पण चालते !
             आईच्या मांडीवर झोपलेले एक गोरेपान बाळ पाहून सई हरकून गेली . इवलेसे हात ,पाय ते छान डोळे , डोक्याचे काळेभोर जावळ असे नाजुकसे बाळ  आता उठून हातपाय झाडू लागले , त्याच्या मोहक हालचाली पाहून सई  टाळ्या पिटत नाचू लागली . तिला  तिचा आनंद कसा व्यक्त करावा हेच समजत नव्हते . कधी एकदा हि गोष्ट आपण जाऊन  रियाला सांगतो असे तिला होऊन गेले . बाळाला हलका हात लावून तिने रियाच्या घराकडे धूम ठोकली .
"रिया , रिया ssss" सई लांबूनच हाक मारत होती . रिया बाहेर येत तिच्याकडे पाहू लागली .
"रिया , मला पण भैय्या झालाय आता खेळायला . त्याचे हात ना मऊ मऊ कापसासारखे आहेत . " सई  धापा टाकत आपल्या बाळाचे कौतुक रियाला सांगू लागली .
"आमचा भैय्या तर तुमच्या बाळापेक्षा छान आहे ."
"नाही माझच  बाळ चांगलं  आहे . गोरं  पण आहे ." सई  ठसक्यात म्हणाली . आता दोघींचे चांगलेच भांडण जुंपले . रिया तिच्या भैय्याला हात लावून देत नसे त्याचा राग सईला होता म्हणून तीही आज तिच्या बाळाचे कौतुक सांगून रियाला चिडवत होती .
"रियाच बाळ  काळा , आमचा भैय्या गोरा ." सई  आता सुरात  टाळ्या पिटत  नाचत ओरडू लागली . हिच्या उत्साहापुढे रिया बिचारी काही बोलू शकत नव्हती , आणि जरी तिने बोलण्याचा प्रयत्न केला तरी सई तिचे ऐकत नव्हती . शेवटी रियाने मोठ्याने भोंगा पसरला . तिचा आवाज ऐकून रियाची आई बाहेर आली .
"सई का ओरडते ? मारू का तुला ? रियाला का रडवते ?" तरी सई  ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ती आपली एकाच गाणे लावून ओरडत होती . शेवटी रियाची आई एक लाकूड घेऊन  तिला मारायला धावली , सई  पण घराच्या दिशेने धावू लागली . सई पुढे आणि रियाची आई मागे , शेवटी रियाच्या आईने सईला पकडलेच ! आता सई घाबरली आणि रडू लागली …. रडतच आईला हाका मारत ती खडबडून उठली . डोळे चोळत ती शेजारी बघू लागली पण आई जवळ नव्हती आणि आजीही नव्हती . तिला आणखीनच रडू कोसळले . ती झोपेतून उठली कि आधी आई हवी असे तिला , पण आज कुणीच नव्हते . सईचा भोंगा ऐकून तिची काकू धावतच आली .
"काय झालं माझ्या सोनूला , उगी बाळा उगी ." तिची काकू तिची समजूत काढत होती पण आईसाठी व्याकुळलेले तिचे मन मात्र रडत रडत तिच्या आईला शोधत होते . सई  काही केल्या गप्प बसेना आता काकूला पण समजत नव्हते या फुलपाखराची समजूत कशी काढू ?
"सई आता दीदी होणार , सईची आई आज डॉक्टरांकडे  गेली बाळ आणायला . उद्या आजी आणि आई आपल्याला नवं , गोर बाळ आणणार आहेत ."हि क्लुप्ती लगेच कामी आली आणि रडके तोंड क्षणात हसू लागले . अलगद काकूला येउन बिलगले आणि चालू झाली प्रश्नांची सरबत्ती !
"काकू आपलं बाळ गोरं आहे ना ?"
"हो आहे ना ."
"मी सांगत होते रियाला , तर ती म्हणली नाही म्हणून ." सई अजून स्वप्नातल्या विचारांत होती . एक ना अनेक प्रश्नांच्या भडिमारात काकू हरवून गेली . प्रश्न काही संपत नव्हते आणि काकू पण तिचे काम सांभाळत प्रश्न झेलत होती आणि उत्तरे फेकत होती . शेवटी सई बाहेरच्या फुलझाडांच्यात रमली . अनेक रंगांची फुले तिच्या आईने आणि काकूने दारात लावलेल्या त्या फुलझाडांना आली होती . सईची आईनंतर दुसरी आवडती गोष्ट म्हणजे विविधरंगी लहान मोठी फुले ! ती तासंतास त्या फुलांच्या गराड्यात असे , लहान नाजूक रानफुले तर तिला खूप आवडत म्हणून रोज आजोबांबरोबर ती मळ्यात जायचा हट्ट करे आणि येताना वेगवेगळी ,सुंदर नाजुकशी फुले घेऊन येई . मग एक एक करून सर्वांना फक्त दाखवी देत फक्त आईला असे , आजीने किती वेळा मागो देवपूजेला दे म्हणून पण ती ऐकेल तर शपथ ! आजही तिने गुलाबाचे फुल तोडले , काकू खूप रागावणार होती पण आज तिची आई नाही तिने भोकाड पसरले तर आवरायला म्हणून बिचारी मुग गिळून गप्प बसली .
"काकू काकू , मी ना हे फुल बाळाला देणार ."
"अगं वेडे ते बाळ येईपर्यंत सुकून जाईन , उद्या तोडायचे होते गं पिला तू . " काकुच्या या बोलण्यावर स्वारी एकदम नाराज झाली . आता बाळाला कुठले फुल देऊ ? या काळजीने बिचारे सईचे मुख्पुष्प मात्र आधीच सुकून गेले . इतक्यात त्यांचे बोलणे लांबून ऐकणारा काका आला , त्याने सईचा नाराज रंग ओळखला आणि मग सईला जवळ घेऊन म्हणाला ," आम्ही आमच्या पिलूचे फुल सुकणार नाही यासाठी एक आईडिया करणार ."
"खरच कारे काका ? मग नाही ना सुकणार फुल ?"
"नाही सुकणार , पण एक अट आहे !" प्रश्नार्थक नजरेने सई त्याच्याकडे पाहू लागली .
" अरे पिला फक्त एकच अट कि सईने आज आई नाही म्हणून रडायचे नाही , आणि काकुच्या हाताने जेवायचे . सईची आई उद्या येणार आहे . करणार ना मी सांगितले ते ?" सईने होकारार्थी मान हलवली पण एक व्याकुळतेने भरलेली रेघ तिच्या गोंडस चेहरा व्यापून राहिली . आज आईविना राहायचे म्हणजे
मग सई आणि काकाने एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या फुलाचा देठ बुडेल आणि फुल वर राहील असे ठेऊन तो ग्लास उंच ठेऊन दिला . फुल सुकणार नाही या चिंतेतून सईची एकदाची सुटका झाली . पण आईविना झोपायचे ती एकटीच बाहेर बसून राहिली सर्वांनी तिला खेळवण्याचा ,रिझवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या त्यांना यश येत नव्हते . ती बराच वेळ बसून समोर वाहणाऱ्या रस्त्याकडे पाहत राहिली . गाड्या येत जात होत्या , रोज त्या वाहनांना पाहून खिदळणारी सई  आज निश्चल होती .
            समोर एक कार थांबली अगदी दारासमोर , आजीला उतरताना पाहून सईला कोण आनंद झाला . तिला इतकेच कळत होते आई आली कि बाळ येणार ! ती धावत गाडीजवळ गेली , उस्तुकतेने ती आई उतरण्याची वाट पाहू लागली पण आत्या उतरलेली पाहून तिचा विरस झाला . आत्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण तिने लगेच धूम ठोकली ते थेट काकाच्या मांडीवर जावून बसली . आत्या बोलावत होती तिला , पण काही केल्या ती येत नव्हती . शेवटी आत्याने आईकडे जायचे आमिष दाखवून सईला जवळ घेतलेच . त्याच आनंदात नंतर ती आत्याच्या मागे पुढे हिंडत राहिली . तिला फक्त एकाच आशा होती आत्या तिच्या गाडीतून मला आईकडे नेणार मग मला बाळ पाहायला मिळणार . ती अंधार झाला तरी आत्याच्या मागे हिंडत राहिली शेवटी तिला आईकडे नेणे भागच पडले .
      दवाखान्यात जायच्या नावाने लांब पळणारी सई आज तिथे जायला उत्सुक होती . आईला पाहून लगेच बिलगु असे तिला झालेले पण एका कॉटवर झोपलेली आजरी आई पाहून तिला कसेसेच झाले . बाळ पण आईजवळ होते पण त्या कपडे न घातलेल्या भैय्याला हात लावायचे धाडस सईला झाले नाही . ती आत्याच्या मागे लपू लागली . आई तिला बोलावू लागली पण सई मागे मागे सरकत राहिली . बाळ होण्यासाठी आईला सलाईन लावले याचे तिला वाईट वाटले . मघाचपासून आईच्या भेटीला उतावळी झालेली ती आता मात्र आईपासून दूर पळत होती आणि ते आईला लावलेल्या सलाईनला भिउन ! माणूस तसे आयुष्यभर कितीतरी मोठ्या स्वप्नांचा त्याग करत राहतो , एका खोट्या आणि छोट्या भीतीने आणि ज्यावेळी ती भीती ओलांडून तो पुढे सरकतो तेंव्हा किती शुल्लक होती अडचण जी आपण सहजगत्या पार करू शकलो , हे आठवून आधीच्या आपल्या भीतीची कीव करत राहतो . सई पण माणसाचेच पिलू होती . भीती हि जन्मापासून तिच्या मनात ठाण मांडून बसलेली ….
      कष्टकर्‍यांचे कष्ट , उतारवयाला वार्धक्यपिडा, काळजीने पिचलेल्याला त्याची व्यथा विसरायला लावणाऱ्या बाळलीला दवाखान्यातून आल्यापासून बंद आहेत हे पाहून आजोबांनी सईला छेडलेही पण आज ती खूप गप्प होती . सर्वांना अपेक्षित होते कि सई घरी येऊन बाळाच्या गमती जमती सांगेल , उत्साहाने काही बोलेन पण आज काही कळी खुलत नव्हती . शेवटी काकीच्या हाताने थोडेफार जेवण करून काकाजवळ येऊन पहुडली . तिला झोप मात्र येत नव्हती . शेवटी काकाच तिच्याशी बोलू लागला .
“आज सईदीदी बोलणार नाही का आमच्याशी ?”
“...”
“आई उद्या येणार न बाळाला घेऊन ?”
“हा , पण काका आईला सलाईन का लावले ?”
“आईला बरे वाटावे म्हणून , तिचे पोट दुखत होते ना ? तर सलाईन लावल्यामुळे ते दुखायचे थांबले .”
“बाळ घ्यायचे डॉक्टरांकडून म्हणून नाही न लावले , तसं असेल तर नको आपल्याला बाळ .”
“नाही पिलू , तसे अजिबात नाही . आईला बरे वाटावे पोट दुखू नये म्हणून लावले सलाईन . आता उद्या आई बाळ घरी येणार मग आपण आपले फुल देऊ त्यांना .” या विश्लेषणावर मात्र ते ते दोन चिमुकले डोळ्यांचे पोवळे चकाकले आणि खुदकन हसले .
   आई ,सई आणि बाळ यांच्या सहजीवनाचे सुखस्वप्न पाहत हळूच झोपेच्या पारंब्यावर हिंदोळे घेत ती झोपेच्या आधीन झाली ...
    चिमण्यांच्या चिवचिवाटाने बाहेर खुललेली प्रभा आतल्या सईच्या चिवचिविने बहरू लागली होती . तिच्या अनेक प्रश्नांनी , सुमधुर आवाजाने , लोभसवाण्या चेहऱ्याने  सर्वांची सकाळ सुप्रभात होत होती . कालच्या बाळाचे आगमन आणि आजच्या सईच्या बाळलीला दोन्हीच्या सुवर्णयोगाने घरातील वातावरण सुखदायक लहरींनी भरून गेले होते . सकाळच्या सर्व गोष्टी आवरून घरातील इतर लोकांची ज्याच्या त्याच्या कामाकडे पांगापांग झाली . आज सईला सुट्टी होती मग तीही आवरून घरात एका बाजूला कालचे ते फुल घेवून बसली . ती एका ठिकाणी शांत बसली म्हणून जे ते त्यांच्या कामात गर्क झाले . थोडावेळ कुणाचेच तिच्याकडे लक्ष नव्हते . माहेरी आलेली आत्या थोडी उशिरा उठली पण उठताच तिला सईची आठवण झाली , सर्वांना सई विचलित आहे हे रात्री ध्यानात होते . म्हणून आधी आत्या सईला शोधू लागली तर एका बाजूला सईचे फुल आणखी सजवण्याचा उद्योग चालू होता . तिने तिची जुनी बाहुली मोडून तिच्यातील रंगीत कागदाचे छोटे छोटे गोल त्यात मांडून आणि काही चमक त्यावर टाकून ते गुलाबाचे फुल तिच्या वयाच्या मानाने अप्रतिम सजवले होते आणि काही हिरवी पाने ती त्या फुलाला जोडण्याच्या प्रयत्नात होती पण ते काही तिला जुळत नव्हते . आता आई येणार होती आणि ती येईपर्यंत हे सर्व तिला पूर्ण करायचे होते . आत्या तिच्याकडे कौतुकाने पाहत होती पण तिला डिस्टर्ब करावे असे आत्याला अजिबात वाटले नाही . तिचा प्रयत्न खूप छान होता पण दोऱ्याने बांधल्याशिवाय ती पाने त्या फुलाला जोडली जाणार नव्हती . मग आत्या हळूच सईच्या बाजूला जावून बसली .
“सई sss , पिलू मी मदत करू ? किती सुंदर फुल सजवले आहे पिलाने ! कुणाला बरे देणार आहेस ? मला का ?” लाडीकपणे तिला जवळ घेत आत्या बोलली .
“नाही , मी ना आई आणि बाळाला देणार !” सईने घाईने स्पष्टीकरण केले .
“बर बर , दे हो पिला पण हि पाने जोडायची तर दोऱ्याने बांधावी लागतील , बांधून देऊ का मी ?”
“हो द्या आत्या .” खुश होत सई बोलली . त्या गुलाबापेक्षाही रमणीय असे सईचे हास्य पाहून क्षणभर तिची आत्या हरकून गेली . आणि दोघींनी मिळून ते फुल सजवले ! आता सर्व घर बाळाच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून होते .
   कोमल , सुस्वरूप असे छोटेसे बाळ काकीआजीच्या कुशीत विसावलेले आणि कान बांधून आणि शाल पांघरून आई आणि बाळ बाबा , आजीसोबत दारात आले . घाईने सईच्या काकीने पाणी आणि भाकरीचा तुकडा ओवाळून टाकून इडापिडा टळो म्हणून बाजूच्या झाडीत टाकून दिली . अगदी आनंदात बाळाचे स्वागत झाले . आईसोबत बाळही त्यांच्यासाठी तयार कॉटवर विसावले .... सई मात्र इकडून तिकडून त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती ...हातात ते फुल तुटू नये म्हणून सांभाळून धरत होती ...कुणाचा स्पर्श त्याला होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत होती . भोवतीच्या गर्दीतून तिला पुढे जाताच येत नव्हते . थोडी जागा झाली आणि छोटी सई सुळकन आईजवळ गेली आणि फुल बाळाच्या पुढे धरून घे म्हणणार तोच आजीने रागाने येऊन तिला बखोटीला धरून बाजूला केले आणि जोराने तिच्यावर खेकसली .
“सई बाळाच्या डोळ्यात जाईन न त्याची घाण , चल हो बाजूला , जा बाहेर जाऊन खेळ ...”
आजीच्या या वागण्याने मघापासून आईची वाट पाहणारी सई , आगीच्या ज्वालांनी एखादे सुंदर पुष्प होरपळून जावे तसे सईचे मुखपुष्प नुसते कोमेजुनच नाही गेले तर तिच्या कोमल भावनांचा जणू कडेलोट होत आहे असेच तिच्या त्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहून आत्याला वाटले . रोज भोकाड पसरून रडणारी सई आज मुकपणे अश्रू गाळत एका बाजूला जावून बसली ...... 

हीच आमची छोटी सई ! या कथेतील बराचसा भाग सत्य आहे . मी तिची आत्या तिच्या मनातील , बाळाच्या आगमनाने झालेल्या अनेक भावनांचा वेध घेऊन त्याना व्यक्त रूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न !

     
         

Tuesday, 9 July 2013

वंद्य मजला प्रीत माझी

शोधताना तव खुणा
जीव माझा तळमळे
वंद्य मजला प्रीत माझी
जरी यत्न भासती खुळे

नयन मिटता लोभवी
गाली हास्य तव निजलेले
लाविते वेड मजला
तू फुल दवात भिजलेले
बोलवू कितीदा तुला
तव मूर्त मनी सदा झुले

मम कल्पनेच्या सागरी
सलील तुझिया प्रीतीचे
स्वप्नांच्या अंबरी
धवल ठिपके स्मृतीचे
त्या रजनीसम प्रीत अपुली
नक्षीदार चांदणे, रोज त्यावरी फुले

वंद्य मजला प्रीत माझी
जरी यत्न भासती खुळे !
                                              -संध्या §.


माझ्यासाठी तूच एक


Saturday, 6 July 2013

करंटा तो क्षण

क्षणापूर्वी तु माझा होतास
क्षणात असा बदल का झाला
करंटा तो क्षण जीवघेणा
माझ्या जीवाचा वेध घेऊन गेला

जीवापेक्षा जास्त जपले होते
तुझ्या सहवासाचे क्षण
तुजसवे मनाने टिपले होते
प्रेमाने भरलेले कण अन कण
क्षणभराच्या निष्काळजीने
असा माझा घात केला
करंटा तो क्षण …

तू सावरायचे होते त्या
ढासळणारया स्वप्नघराला
आवरायचे होते गैरसमजाच्या
उसळणाऱ्या त्या सागराला
तुही मोहात त्या क्षणाच्या
मला नि स्वताला हरवून बसला
करंटा तो क्षण …

आता जीवनात राहिले फक्त
तुझ्या स्नेहाची वाट पाहणे
होतो थरकाप सर्वांगाचा
तव विरहाच्या जाणिवेने
सर्व हरले तरी का निग्रह मनी
आणीन परतून एकवार माझिया प्रियाला
करंटा तो क्षण …
- संध्या § .

Wednesday, 15 May 2013

काहीतरी हरवलंय ...

पोकळी सांगतेय उरातली
काहीतरी हरवलंय
ओढ संपली काळजातली
आता जीवन विखुरलंय
वाट वेडीवाकडी होती
तरी दु:ख नव्हते केले
स्वप्नातल्या झऱ्यावर
मनसोक्त होते पाणी पिले
आता तहान संपली
पाणी सारं आटलय
झऱ्यातून ते डोळ्यात साठलंय
पोकळी उरातली .....
वाटेवरच्या रेतीला
लाज माझ्या पावलांची
पिसाट वाऱ्याला बोलवतेय
पुसण्या रेघ खुणांची
पायाखालची जमीन सरली
डोईचं छत उडलंय
पिसाटल्या वाऱ्याने
दुसऱ्या दारी नेऊन सोडलंय
पोकळी सांगतेय ...
आता नाही वाट पाहणे
ना नवीन वाटेवर चालणे
आनंदाला कायमची ओहोटी
तप्त उन्हाची मनात दाटी
सुखाची पाठ पाहत राहणे
नाही मिळत जल स्वप्नातल्या पावसाने
कुणीतरी कानात सांगितलंय
आता कसं सांगू कुणा
माझं आयुष्यच हरवलंय .....