या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday, 2 June 2017

पोरकी

            पोरकी

अनवाणी पाय भाजून त्याला फोडे उठतील असा तापलेला रस्ता अघळपघळ पसरला होता . दुतर्फा घरांची ओळ एकमेकींत घुसल्यासारखी भासत होती पण चिटपाखरूही बाहेर दृष्टीला पडत नव्हते . उन असे होते कि सावल्याही अंग चोरून शरीरांच्या खाली लुप्त होत होत्या . अचानक येणारी हलकी वावटळ धूळ उडवीत होती . थोड्या वेळात शांत होत पुन्हा धुळीचे लोट घरांच्या , झाडांच्या अंगावर बसून त्यांचा श्वास गुदमरून टाकत होती . लांब लांब उसासे टाकत सारेजण उद्विग्न नजरेने एकमेकांना पाहत होती . हातपाय हलविण्याची शक्ती मात्र कुणाच्याच अंगात नव्हती .लोळागोळा झालेले हे रस्ते अचानक एखादी गाडी गेली कि फुत्कारून उठत आणि पुन्हा मेल्यासारखे शांत पडून राहत . या थोरल्या उन्हात झपझप पावले टाकत मनीषा चालली होती . शक्यतो ती इकडेतिकडे पहात कधीच चालत नसे तिचे चालणे अगदी नाकासमोर ! पहिल्यापासून तिला कुणाच्या भानगडीत नाक खुपसायला , उगीच कुणाचे तरी काही लहान सहान गोष्टीचे चर्वण करायला अजिबात आवडायचे नाही . तिचे घर ,शेत ,दोन मुले , नवरा आणि अपंग सासू याव्यत्यरिक्त तिचे बोलणे कामाशिवाय कुणाशी होत नसे .

  किराणा दुकान जिथून ती तिचा महिन्याचा किराणा भरून घेत असे ते घरापासून लांब होते . ती दुकानात पोहचली तोवर घामाने डबडबून गेली होती . गल्ल्यावर काका बसलेले आणि काकू दारात दळण निवडत बसली होती. दुपारची वेळ असल्याने गिऱ्हाईक नव्हतेच . तिथेच ओट्यावर असलेल्या कट्ट्यावर मनीषा विसावली . उन्हाने लाल झालेला चेहरा सारखा पदराने पुसत होती . वाऱ्याने आणि पदर खालीवर करून केस विस्कटले होते मात्र कपाळावरची केसांची कमान तशीच होती . मधला लांबलचक भांग आणि तिचा तो उभट चेहरा या दोन्हीमुळे केसांची ती चित्र काढल्यासारखी ठेवण अगदी नक्षीदार कमानिसारखी दिसत होती . दोन मुलांची आई होती पण अजूनही खुपच सुंदर दिसायची मनीषा , रंग थोडा बदलला होता आणि चेहऱ्यावर उठलेले वांगाचे दाग सोडले तर तिच्या दिसण्यात काही बदल नव्हता . तशीच काटकुळी , दोन्ही बाळंतपणात ती अजिबात सुधारली नव्हती , कशी सुधारणार होती मुल जन्मल्याच्या पाचव्या दिवशी उठून तिला घरकाम करावे लागे . सासू अपंग आणि तिलाही आई वडील नव्हते , शेजारणी पाच दिवसापेक्षा जास्त दिवस करत नव्हत्या . ना शेक ना शेगडी , खायला भरपूर असे पण कामात तिला वेळच व्हायचा नाही . जाता येत जे मुखात पडेल त्यावर तिचा दिवस संपायचा . नवरा तरी करून काय करणार त्यालाही नोकरी करून घरची चार पाच एकर जमीन करावी लागे , म्हणजे दोघेही भरपूर कष्ट करीत . दुकानदार काका काकूला तिच्याबद्दल खास आपुलकी ! कारणही तसेच होते , ती काकूच्या बहिणीच्या नंदेची मुलगी , या गावात या काका काकू शिवाय कुणीच तिच्या माहेरचे नाते सांगणारे नव्हते . आई बाप लहानपणी गेले , भाऊ आणि वहिनीच्या हाताखाली सारे बालपण संपले . स्नेहाचा जराही गंध नसलेली वहिनी आणि सदा दारिद्र्यात असलेला भाऊ यामुळे माहेर लग्न झाले तेंव्हाच तुटलेले ! तिला स्नेहाची उब मिळाली ती फक्त या काका काकुजवळ ! म्हणून कुठल्याही अडचणीला ती त्यांच्याकडे धाव घेई . अबोल नवरा आणि सदा दुखण्याने कातावलेली सासू यांच्याकडून स्नेहाची अपेक्षा तिने लग्नानंतर आठवड्यातच सोडून दिली . तिचे हे दु:खी आयुष्य पाहून काका काकू हळहळत , यापलीकडे तेही काही करू शकत नव्हते ! कष्ट कष्ट आणि कष्ट यात ती तिच्या भावना आणि शरीर या गोष्टीही जपाव्या लागतात हे पूर्ण विसरून गेली होती ...

“का गं मनीषा , इतक्या उन्हाची का आलीस ?” गुढग्यावर हात टेकून उठत काकू तिला म्हणाल्या .

“परत चार वाजता गवताला जायचंय काकू , म्हणून म्हटले जावून यावे आताच , संध्याकाळी स्वयपाकाला तेल नाही .” अजूनही ती पदराने घाम पुसत होती .

“किती कष्ट करतेस ,थोडे स्वताकडे पण पाहत जा .” तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत काकू म्हणाल्या .

“तुमच्यापासून काय लपलेय का काकू , आता तर फक्त कष्टांचीच साथ जीवनभर !” तप्त रस्त्याकडे विषण्णपणे पाहत राहिली ती ! तिच्या मनात पण आगीचा डोंब उसळला होता . बाहेरची तप्तता काहीच नव्हती तिच्यापुढे . रिकामा ग्लास काकूने काढून घेतल्याचे पण तिला कळले नाही .

“असे नको म्हणू बेटा , उन्हानंतर सावली येतेच ना ? एकदिवस तुझाही असेल !” काका तिला समजावत होते . परंतु त्यानीही तिच्या आयुष्यात सावली येईल हि आशा सोडून दिली होती . जे काही कानोकानी समजत होते त्यावरून तिचे आयुष्य सुखी व्हायला फक्त काही चमत्कारच आवश्यक होता . आणि त्यांना माहीतच होते या कलीयुगात देवही चमत्कार करू शकत नाही . कसे होईल या पोरीचे अशी हळहळ व्यक्त करण्याखेरीज काहीही करणे त्या उभयतांच्या हाती नव्हते .

  तिची शून्यात हरवलेली नजर पुन्हा काकुकडे वळली . काकू काही बोलणार तोवर तिने पूर्वपदावर येत सामानाची यादी काकांच्या हातात दिली .

“हे सारे द्या बर काका , पण बिल त्यांचा पगार झाला कि मिळेल , चालेल ना ?”

“चालेले बाळा , का नाही चालणार ? तू तर आमची मुलगीच आहेस .” काका हसून बोलले पण त्यांचा मुलगी म्हणण्यामागे तिने व्यक्त व्हावे हाच उद्देश होता . काका काकूची स्नेहार्द नजर तिच्या मनात खळबळ माजवत होती . तीही भिंती आणि तुळशीपुढे व्यक्त होऊन थकली होती . तिलाही वाटे कुणी माणूस भेटावे ज्याने माझे दु:ख फक्त ऐकून तरी घ्यावे . असे मनात कुढत राहिले तर ...कधीतरी नक्कीच वेडी होईन ! आत्महत्येचा विचार अनेकदा आला तिला पण मुलांचे चेहरे तिला तसे करू देत नव्हते . खरच तिच्याशिवाय कोण होते मुलांना तरी ? पुन्हा शून्यात नजर गुंतवत ती अबोल झाली . काकू तिच्या जवळ जाऊन बसल्या . ओट्यावर उन नव्हते पण उन्हाच्या झळा तिथेही जाणवत होत्याच .

“काका सामान काढतील तोवर चल आत आपण सरबत घेऊ , खूप दमलीस . जेवलीस का पण ?”

“हो जेवले काकू , न जेवून कसे चालेले .” एक लांब उसासा सोडला तिने .

“हो ते पण आहे , नको खूप कुढत जाऊ , कुणालाच कष्ट चुकत नाहीत.” आत जाता जाता दोघी बोलत होत्या . तिला बसायला बसकर देत काकू स्वयंपाकाच्या ओट्याजवळ गेल्या . दोघेच घरात असल्याने ते स्वयंपाकघर नेटके होते . धुळीचा , जळमटे यांचा मागमूसही नव्हता . काकूंची दोन्ही मुले नोकरीसाठी बाहेर होती . घर मुले नातवंडे आली कि फुलून उठे . पण सुट्टीपुरतेच हे सुख त्यांच्या नशिबी होते . पण त्यातही समाधान शोधायचे दोघे . या जगात नाईलाजास्तव समाधान मानणाऱ्यांची संख्या अफाट आहे . या तिच्या विचारांबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक केविलवाणे स्मित झळकले .

“खर सांगू काकू , आता मी जगणेच सोडून दिलेय . काय चांगले काय वाईट , इतरांनी आपल्याशी कसे वागावे हे ठरवणे मी कधीच सोडून दिले . कुणी राग केला तरी राग येत नाही आणि कुणी जिव्हाळ्याने बोलले तरी सुख नाही वाटत . अश्रू आता माझ्या डोळ्यांचा पत्ता कधी कधीच शोधत येतात . मुलांना पोरकेपण येऊ नये म्हणून आजचा दिवस उद्यावर ढकलणे इतकेच माझ्या जीवनात उरले आहे . आणि हे विचारांचे जंजाळ पुन्हा माझे चित्त विचलित करू नये म्हणून हा कामाचा व्याप वाढवते . जोपर्यंत थकून आपोआप झोप येत नाही तोपर्यंत कष्ट करणे इतकेच मनाशी ठरवले आहे . बघू किती दिवस असे चालू राहते . आता कश्याचीच ओढ राहिली नाही .” पुन्हा खोलात नजर गेली तिची .

“दु:ख आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे . म्हणून त्यापासून दूर पळून किंवा त्याकडे पाठ फिरवून जगणे योग्य नाही .”

“दु:ख जेंव्हा अगतीकतेच्या दारात नेवून सोडते ना तेंव्हा या असल्या वचनांना काही अर्थ राहत नाही काकू !” पुन्हा केविलवाणे हसू तिच्या मुखावर उमटले .

“इतकी हतबल नको होवूस बेटा ,प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते .”

“नाही काकू , उत्तर असते प्रश्नाला पण कधी कधी ते आयुष्याच्या शेवटीही कळत नाही . कधी ते उत्तर शोधण्याची इच्छाच मरून जाते ,आणि कधी कळते पण इतके क्लिष्ट असते कि ते समजूनही अंगवळणी पडत नाही . माझेही असेच झालेय .”

“असे नको हरूस बेटा , आपण सारे बंडूला समजावू तो नक्की ऐकेल बघ .”

“ऐकेल ? किती वेडी कल्पना आहे काकू तुमची! मी एक सांगू , तो आपण बोलू ते ऐकून घेईल , अगदी तुम्हाला प्रत्युत्तर पण करणार नाही .” छद्मी हसत मनीषा बोलली . तिचे हे हसू पाहून काकूच्या काळजात मात्र चर्र झाले . प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहण्याशिवाय त्यांना दुसरे काही उत्तरच सुचले नाही .

“काकू तुम्हाला वाटते न कि ते ऐकून घेऊन त्यांच्या कर्माबद्दल पश्चाताप करतील , हळहळ करतील आणि मग तसे वागणे सोडून देतील ?” काकूंनी फक्त मान हलवली .

“असे बिलकुल काही होणार नाही , त्यांना त्यांच्या या कुकर्माची लाज बिलकुल वाटत नाही , जराही खेद नाही , आपण कुणाचे जीवन फक्त उध्वस्त नाही करत तर कोळून पितोय याचा यत्किंचीतही खेद त्यांना नाही . उलट असे तुमच्यासमोर वागताना जे चोरून चालले आहे ते उघड चालू होईल . अशा माणसांची सदसद्विवेकबुद्धी बुद्धी सर्वथा लोप पावलेली असते .” विषण्णतापूर्वक मनीषा बोलत होती . काकूने हातात दिलेला सरबताचा ग्लास लगोलग रिकामा करत ती पुन्हा बोलू लागली .

“एक महिना होत आला , ज्या गोष्टींची कुणकुण लागली त्या गोष्टी सत्य आहेत का ते पडताळून पहावे वाटले , पाहिलेही आणि समोर आले ते एक नग्न सत्य ! मला हि गोष्ट माहित नव्हती तोपर्यंत ती माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न होत असे , पण एकदा माहित झाले आणि राजरोस सारे व्यवहार चालू झाले . पाहणारल्या लाज वाटते परंतु यांना वाटत नाही ! अज्ञानत सुख असते हे वचन सार्थ आहे , जोवर मला काही ठावूक नव्हते किंवा फक्त शंका होती ते कळल्यावर जे राजरोस व्यवहार चालू झाले ! यावरून हेच सिद्ध झाले ना ? कुणी सांगेताई बंडू सोबत आम्ही एक बाई पहिली , कधी त्यांचा फोन रात्री एक वाजेपर्यंत चालू राही , मी विचार करायचे असेल कुणी शाळेतील मित्र , पण किती मनाला समजावले तरी वाटत राही कोण असेल ? मित्र कि मैत्रीण ? असे पूर्वी कधी कुणाशी बोलताना मी त्यांना कधी पाहिले नव्हते . एकदा खूप मन घट्ट करून त्यांना विचारले कोणाशी बोलता इतके ? दिवसभर कंटाळा नाही का येत ? भीत भीतच विचारले , वाटले कदाचित माझ्यावर वैतागेल पण झाले उलटेच ! मला जवळ घेत म्हणाले माझा एक मित्र आहे , बाहेर होता खूप दिवसांनी भेटलाय ! त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शात सर्व शंका गवतात वाट दिसेनाशी व्हावी तश्या नाहीश्या झाल्या ! किती मधुरता असते त्या स्पर्शात , जणू साऱ्या वेदनांचा शेवट त्यात होतो ! परंतु ते मृगजळ होते ...त्यामागे मला माझ्या आयुष्याच्या वाळवंटात धावत राहायचे हेच माझे प्राक्तन आहे ते मला तेंव्हा उमजले नाही . ते सुख रातराणीच्या सुगंधासारखे तेव्हड्या रात्रीपुरतेच माझ्या आयुष्यात होते याची त्यावेळी जराही कल्पना मला नव्हती . दुसऱ्या दिवशी शेजारची एक बाई मला धुणे धुवायला गेले आडावर तेंव्हा सांगत होती , मनीषा जरा जपून बर यांनी काल बंडूला एका बाई सोबत पाहिले ! तू गरीब गाय आहेस असा आंधळा विश्वास ठेवशील आणि कुणी तुझा संसार चोरून नेईन तुला कळणार पण नाही . तेंव्हापासून मी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होते . रोज देवाला वेड्यासारखी प्रार्थना करे कि सारे खोटे असू दे ! माणसाचे मन आणि सश्याचे काळीज एकाच गोष्टीपासून बनले असतील , जेंव्हा भीतीचे शंकेचे ढग दाटतात तेंव्हा आपोआप ते लुकलुक करायला लागते ! माझीही अशीच धडधड दिवसरात्र चालू राही ! पहिल्यांदा विचारले तेंव्हा त्यांनी प्रेमाने समजावले पण दुसऱ्या वेळी धावून आले अंगावर , आत्या तिथेच होत्या त्याही घाबरल्या पण दिवसरात्र सेवा करणाऱ्या माझ्या सुनेवर का रे रागावतो असे एका शब्दाने त्यांना फटकारले नाही !” लांब उसासा घेत डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना थोपवण्याचा असफल प्रयत्न करत मनीषा जमिनीत नजर खुपसून बसली .

“शकुताईकडून हि अपेक्षा नव्हती ! त्यांनी तुला आधार देणे न्यायाचेच होते .” तिच्या पाठीवर मायेने थोपटत काकूने तिची बाजू उचलून धरली .

“काय न्याय काय अन्याय याची त्यांना थोडीही चाड नाही . माझा तो बाब्या बाकी सारे ...कसे सहन करू काकू ? घराचे वासेही फिरले होते माझ्या . किती आत्मीयतेने मी माझा माझा म्हणून संसार करत होते पण तिथे बसण्यापुरती जागाही माझ्या मालकीची नाही ! मी त्यांना कधीही एका शब्दाने नाही दुखावले . सतत त्यांच्या अपंगत्वाचे ओझे मी माझ्या मानगुटीवर वाहत राहिले , एका शब्दाने कधी त्या गोष्टीबद्दल नाही बोलले . पण मलाच कळत नाही मी कुठे कमी पडले . मुलाबद्दल इतकी माया आणि मी ? कुणीच नव्हते का त्यांची ? कि नाते बदलले म्हणून चुका चुका होत नाहीत का ? मीही जर चुकले असते तर त्या इतक्या निष्क्रीय राहिल्या असत्या ? ज्या खांद्यावर विश्वासाने डोके टेकावे ते अस्तित्वातच नसावेत ! याच्याइतके उद्विग्न करणारे काहीच नसेल जगात , मी कुठल्यातरी खोल दरीत कोसळत आहे असेच वाटले तेंव्हा ! अश्रूंची संततधार मुकपणे माझ्या डोळ्यातून वाहताना पाहूनही त्यांच्यातील माणूस जागे नाही झाले . त्या दिवशी पहिल्यांदा मार खाल्ला मी ! मारण्याबद्दल खेद नव्हता फक्त होता तो सासूबाईंनी दाखवलेल्या निष्क्रियतेबद्दल !” उद्विग्नपणे ती बोलत होती . चेहऱ्यावरची हरेक शीर ती बोलताना उडत होती . ठसठसणारी एखादी जखम मोकळी झाल्यावर जसे हलके वाटते तसे तिला बोलून झाल्यावर वाटू लागले .

“काकू , त्या दिवशी दिवसभर मी उपाशी झोपून राहिले पण कुणी माझ्याजवळ आले नाही . शेवटी आकाश शाळेतून आल्यावर म्हणाला ‘आई बरे नाही का तुला ? डोके दुखत असेल तर दाबून देऊ का ?’ त्याच्या या बोलण्याने दिवसभर हृदयात उसळणारा बंदिस्त सागर मोकाट सुटल्यासारखा डोळ्यातून वाहू लागला . खरंच कुणासाठी नाही पण माझ्या मुलांसाठी मला जगावेच लागेल . गोठ्यातून भुकेने व्याकुळ ढोरांचे ओरडणे आता कुठे माझ्या कानात घुमले . आकाशला काही नाही असे समजावण्यात माझी जी धावपळ झाली ते वर्णन करणे कठीणच ! त्याने माझ्या कुशीतून त्याची सुटका करवून घेतली आणि माझ्या डोळ्यांचे पाणी पुसत राहिला . किती माया होती त्याच्या स्पर्शात ! मी मग सगळे विचार झटकून त्याला खायला दिले आणि गोठ्यात ढोरांना चारा टाकायला गेले .”

“असे किती दु:ख असले तरी लेकरांच्या निरागस चेहऱ्यात ते हरवून जाते बघ , म्हणून जे सुख कुणाची मुलगी , बायको म्हणून घेताना वाटत नाही न त्यापेक्षा कितीतरी मोठे सुख वाटते आई ...म्हणून घेताना !”

“किती खरे आहे ना हे मला त्या दिवशी खूप प्रकर्षाने जाणवले . त्याच लेकरांसाठी आता माझे जगणे असेल ! त्या दिवसानंतर आत्या दोन दिवस माझ्याशी बोलल्याच नाहीत . मी मात्र जीवनाला एक नवीन ध्येय मिळाल्यासारखे झपाटल्यासारखे काम करत राहिले . डोक्यातील विचारांचे काहूर तसेच उंच उंच जावून पुन्हा जमिनीचा ठाव घेत होते. प्रत्यक्ष दु:खासोबत जगणे जितके दु:सह्य असते त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण असते ते दु:ख आयुष्यात येणार या शंकेसोबत जगणे ! त्या शंकांनी गर्भगळीत होऊन जातो जीव ! त्या दिवसानंतर चार पाच दिवस तो अबोला चालू होता . माझ्याकडे बघून ते दुसरीकडे तोंड वळवत , ते पाहून वाटायचे हेही सोसेल जीवाला पण तुमचा विश्वासघात नाही हो सोसवत , काय कमी ठेवले होते मी तुमच्या आयुष्यात म्हणून तुम्ही हे असला मार्ग निवडलात? वाटायचे हे फक्त शंकांचेच धुके असावे , सत्याचा सूर्य उगवला कि तेही निघून जावे दूर दूर ! पण तो धूर होता काकू , माझ्या संसाराला लागलेल्या आगीचा धूर ! जो नाक बंद करून माझा श्वास गुदमरवणार होता ! माझं उरलेलं आयुष्य त्याच्या काजळीने गडद काळे करणार होता ...माझ्या लेकरांचे भविष्य धुसर करणारा धूर ...काकू ..” तिला पुढे शब्दही उच्चारणे कठीण झाले . ती फक्त रडत राहिली ...काकुनी तिला जवळ घेतले , बाहेरून थंड वाटणारा कुकर उघडला कि त्याचे वाफेने जीव कोंडला आहे असे वाटावे तसे काकूंना तिच्या वेदनांचा तो कोंडमारा उघडल्याने वाटू लागले , त्यांचाही जीव आता गुदमरू लागला होता .. तिला समजावण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करण्याचा वांझोटा प्रयत्न त्या करत राहिल्या . त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या ....वेळ सर्व आवळलेल्या दोऱ्या ढिल्या करत जातो इतकेच काकूंच्या जीवाला आता वाटत होते ... आशा माणसाच्या मनाला अगदी कडेलोटाच्या वेळीही सावरून नेते , कदाचित म्हणूनच माणूस पुन्हा नव्याने उभारी घेत असेल राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखे !

“तो धूरही आयुष्यातून जाईल असे वाटायचे , वाटायचे कि असू देत चुका करतो तो माणूस असतो , त्याला माफ करणारही माणूसच असतो ...विस्तवाची राख होईल आणि पुन्हा सारे पूर्वपदावर येईल ...पण त्या ज्वाला आहेत काकू ज्वाला ! कदाचित माझ्या चितेच्या ज्वालेबरोबरच थंड होणार आहेत ...दिवस संपायचा रात्रही संपायची पण माझे विचार आणि उसासे संपत नव्हते . कधी मन निश्चयाने भरून यायचे वाटायचे या अपमानाचा बदला घ्यावा , या नवऱ्याला अशी अद्दल घडवावी कि पुन्हा यालाच काय पण जगातल्या कुठल्याही नवऱ्याला बायकोचा घात करायच्या आधी त्याचाच अवसानघात होईल , पुन्हा वाटयचे काय होईल काही केले तरी ? आपल्या मर्यादा ओळखून पाउल टाकणेच शहाणपणाचे होईल . भावाचे वागणे , वहिनीचे तुसडेपण आठवले कि मनाचे सारे खेळ मनातच संपायचे . कितीही केले तरी माझे माहेर माझे नाही हे मी केंव्हाच जाणले आहे . तो रस्ता बंद झाला कि दुसरी पायवाटसुद्धा माझ्या आयुष्यात नाही . मग कुठे जायचे ? असे मनात आले कि हातपायच गळून जायचे ...” हतबल मनीषा काकुकडे केविलवाणी पाहत होती . काकूच्या नजरेत मात्र अश्रुंचे तळे उभे राहिले होते . त्यांच्या मनात मनिषाचे आई वडील किती चांगले होते या आठवाणे साकारलेले ते तळे मनीषाने त्यांच्याकडे विषण्ण मनाने पाहिल्याबरोबर खळखळ वाहू लागले .

“तुझे आई बाप असते तर ....असा अपमान होताच त्यांनी तुला कधीच नेली असती ...आणि ते असते तर ...या बंडूची पण इतकी हिम्मत झाली नसती . समाज इतका वाईट आहे एखादा जीव अगतिक आहे म्हटल्यावर सारे त्याचा छळ करू पाहतात ..” डोळ्यातील पाणी पुसत काकू बोलल्या .

“आई बाबा असते तर ...पण ते नाहीत ना आज काकू ....” तिचे अस्फुट रडणे आता अस्फुटपणाच्या सीमा पार करून गेले . तिला आवरणे आता काकूला कठीण होत होते . इतका वेळ त्यांचे बोलणे बाहेरून ऐकणारे काका आत आले .

“बेटा आवर स्वतःला आणि आम्ही आहोत दोघे नसले तुझे आई बाबा तरी .. असे एकटे नको समजू . नाही तुझे आई बाप होऊ शकलो तरी तुला आधार नक्की देऊ . जेंव्हा कधी तुला असे वाटेल कि आता मरणाशिवाय काही मार्ग नाही तेंव्हा एक दार विसरू नकोस तुझ्या काका काकूचे !” साऱ्यांचे काळीज भरून येत होते . इतका वेळ दाटलेले ढग डोळ्यांमधून वाहत होते . प्रेमाच्या ओलाव्याने साऱ्या वेदना हलक्या होतात . मनिषाचे मनही शांत होत होते . तिने काकांकडे एक कृतज्ञापूर्ण कटाक्ष टाकला .

“त्यानंतर मी काम करत राहिले . त्या दिवशी रविवार होता दोन्ही मुलांना सुट्टी होती . ते बाहेर गेले होते आणि आत्या शेजारी . मी माझ्या कामात आणि विचारात होते . आकाश रडत आला . मी विचारले काय झाले म्हणून तर म्हणू लागला ‘आई आता आपण गरीब होणार ?’ मी हसून विचारले का रे बाळा असे का विचारतो ? आपण का गरीब होऊ ? तर म्हणाला रोहितची आई म्हणत होती त्याच्या बाबांना कि बंडू आता घरात पैसे नाही देणार मग कशी करेल बिचारी मनीषा ? खरच का गं आई असे होणार ? त्याच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते होते ते फक्त तेच तेच प्रश्न ! थोडावेळ मी गप्प राहिले त्याचे डोळे पुसत राहिले . काय समजावणार होते त्याला मी ? मलाच कळत नव्हते . असे काही नाही सांगात ती वेळ तर मी निभावून नेली पण ? त्या रात्री मीच पुढे होऊन त्यांना विचारले तुम्ही आम्हाला असे वाऱ्यावर तर नाही ना सोडून जाणार ? माझे जाऊ देत पण मुले तर तुमच्याच रक्ताची आहेत त्यांचा तरी विचार करा . त्यावर त्यांनी जी रुक्ष प्रतिक्रीया दिली तिने तर माझा जीवच हलवून सोडला . ते मुलांना कधी अडचण येऊ देणार नव्हते . दर महिन्याचा पगार आईकडे न देता मला देणार होते .. म्हणजे ? म्हणजे त्यांच्या आयुष्यात नक्की दुसरी स्री होती ! एक समाधान होते आकाशच्या शंकेप्रमाणे आम्ही गरीब होणार नव्हतो !” खिन्नपणे मनीषा बोलत होती .

“काकू नंतर मीही त्यांच्याशी बोलणे सोडून दिले .आधी असे वाटे कि कदाचित मीच शंका घेते , त्यांचे तसे काही नसेल त्यानाही माझ्या अशा वागण्याचा त्रास होत असेल पण त्या दिवशी असे बोलले आणि सारे प्रश्न माझ्या दृष्टीने संपले होते . त्या नंतर तीन दिवसांनी रोहितची आई म्हणजे माझी जाव लागते , ती आली धावतच आली , मला चल म्हणाली मी गेले तिच्या सोबत तर भावोजी म्हणाले बंडू आणि ती बाई देवळाच्या मागच्या बागेत आहेत , चला तुम्ही , मी भावोजींच्या गाडीवर बसून गेले ..खरे आता विचार येतो जायला नकोच होते ...पण त्या दिवशी गेले . ती दोघे गळ्यात गळे घालून निर्लज्जपणे तेथे बसली होती . मला पाहून ते उभे राहिले  पण मी मात्र घेरी येऊन तिथेच पडले . घरी कशी आले मला माहित नाही . त्या दिवशी ते मात्र घरी आलेच नाहीत . पोरांचे तोंड पाहून मी सारी कामे केली मुलांना जेऊ घालून झोपवले पण सारे यांत्रिकपणे ! दुसऱ्या दिवशी ते घरी आले मला विचारले पण बरे आहे का ? मी हो म्हटले , त्यांच्या पायावर पडून त्यांना विनंती केली कृपा करून तुम्ही आमच्या जीवनात परत या माझी दया करा . पण त्या दगडाला घाम नाही फुटला . ते तेंव्हा मात्र निग्रहाने संगत होते ‘ काही झाले तरी मी रेश्माला अंतर देणार नाही . तुम्हाला काही कमी पडणार नाही पण तुला तिचे असणे मान्य करावे लागेल’ त्यांच्या या बोलण्याने माझे त्यांच्या आयुष्यातले स्थान मला कळले होते . खरंच तसे पाहता ती बाई माझ्यापेक्षा सुंदर होती असेही काही नव्हते मग असे का झाले ? मी कुठे कमी पडले ? मला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते . आता एक करणे जरुरीचे होते ते म्हणजे मुलांच्या या संस्कारक्षम वयात त्यांना या घटनेपासून दूर ठेवायचे होते . म्हणून मग मी माझ्या भावनांना आवर घालून त्यांना एक अट घातली , म्हटले जे काही करायचे ते मुलांच्यापासून दूर ! त्यांना तुमच्या या वागण्याची जराही कुणकुण नको लागायला , इतकाच उपकार करा ! त्यांनी हि गोष्ट कबुल केली…तेंव्हापासून मनात हे सारे घेऊन जगते आहे ...कदाचित असेच जगावे लागेल ....शेवटी नशीब ...नशीब नशीब म्हणते पण खरेच का हो काकू हेच माझे नशीब आहे का ? कि माझी अगतिकता आहे ... मी खरंच बाकी काही मार्गच नसल्याने या नशिबाच्या चक्रात अडकली आहे . रोज सर्व काम करते , दोन घासही पोटात ढकलते जगते .दिवस संपतो काकू पण तिन्ही सांज झाली ना मनात काहूर उठते ...रोज आभाळाला जाऊन भिडते ...झोप तर केंव्हाच मला विसरून गेली आहे ...या अगतिकतेमुळे काळीज पोकळ झालंय असे वाटते ..उरातली ती पोकळी मनाला पोखरत राहते ..डोळ्यांच्या दारावाटे अश्रू होऊन बाहेर येते ...आणि रात्रभर उशी भिजवत राहते ...” खिन्न नजरेने ती जमिनीत नजर खुपसून बसली होती . एक पाय गुढग्यात वाकवून डोके त्यावर टेकलेले ..अश्रू ओघळत जमीन भिजवत होते ...

   बराच वेळ ती अशीच रडत राहिली . काकू काका डोळे टिपत होते ,आज त्यांना या आईबपाविना पोरीचे आईबाप व्हायचे होते . दोघांच्या मनात ही एकच गोष्ट खेळत होती . काकू पुढे होऊन तिला मायेने जवळ घेत बोलू लागल्या .

“बेटा खूप सोस्तेस तू पण एक सांगते आम्ही दोघे आहोत तोवर तुझ्यासाठी कधीही हे दरवाजे बंद नाही होणार . आता भिंतीना न बोलता आमच्या दोघांजवळ तुझे मन मोकळे करत जा . नवरा नाही असेच समज त्याचे तुझ्या आयुष्यातील असणे पुसून टाक म्हणजे त्याच्या नसण्याची जाणीव तुला त्रासदायक होणार नाही . हा हा म्हणता मुले मोठी होतील ...तारुण्याचे हे दिवस मावळतीला झुकतील तेंव्हा बंडूही परतेल . मुलांनी तुझे कष्ट पहिले आहेत , दु:खही जाणतील ,आणि म्हणून कधीच तुला दुखावणार नाहीत . आणि एक सांगू कुणीच जाणणार नाही तेंव्हा आम्ही आहोत ! तुझे आई बाप !” काकाही प्रत्येक शब्दाला हुंकार भरत डोळे पुसत होते ...

   तिने उठून दोघांच्याही पायांना स्पर्श केला . घड्याळात चार वाजायला आले होते . तिला पुढच्या कामाची ओढ होती . मनात उंच उंच उडणारे विचार तळाशी गेले होते आणि जडवलेले काळीज हलके झाले होते ...चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले होते . उठून तिने सामानाच्या पिशव्या उचलल्या .

“आईबापाच्या घरी येऊन राहायची वेळ नाही येणार पण त्यांचे असणे इतका हुरूप देईन कि संकटांचे डोंगरही हसत पार होतील ...” हसून तिने काका काकुकडे पाहिले आणि चालू लागली . उन्हे थोडी कलली होती . त्यांची दाहक किरणे आता पोळत नव्हती . आता वारे होते पण धूळ उडवत नव्हते ... घरांवर साचलेले धुलीकण बाजूला घेऊन जात होते ...झाडांचाही श्वास आता मोकळा झाला होता ...मनीषा पायाखालच्या जमिनीला पाहत झपझप चालत होती ....

        डॉ संध्या राम शेलार

Monday, 19 December 2016

ती गाव सोडून जाते.....

“बाई ...ओ बाई ...लवकर बाहेर या , चौकात बघा काय गोंधळ चाललाय ?” नंदाबाईच्या हाकेसरशी मी पोळपटावरची चपाती , जिची तवा आ वासून वाट बघत होता , ती तशीच ठेवून बाहेर आले . लेकीला जाताना स्वयंपाक ओट्याकडे बोट दाखवले आणि नंदाबाईच्या मागे निघाले . सकाळची वेळ असल्याने लोकांच्या भानगडी करायला कुणाला अजिबात सवड नव्हतीच . मलाही शाळेत जायची घाई होतीच पण ताई सुट्टीला आली तशी ती मागचे सारे बघे मग थोडी स्वस्थता लाभे . खरं तर इतकच कारण नव्हतं तसं काम सोडून जायला पण काल सखू नंदा आणि माझ्याजवळ जे बोलली ते रात्रभर डोक्यात घुमत होते . त्यात नंदाची हाक आली म्हणजे नक्कीच सखूचे काही कारण होते , मनात घालमेल दाटली आणि तशीच साडीचा घोळही न सोडता नंदाच्या मागे धावले . धापा टाकीत तिथे पोहचलो खऱ्या परंतु सारं पाणी पुलाखालून गेलं होतं .
    आमदारसाहेबांच्या प्रयत्नातून साकार झालेला तो ग्रामपंचायतीच्या आणि सोसायटीच्या पुढ्यात शांतपणे विसावलेला तो सिमेंटचा चौक आज सखूच्या ओरडण्याने काहूर माजल्यागत नाचत होता . फिल्टर पाणी न्यायला आलेली चार दोन टाळकी गमजा बघत उभी होती . सकाळची वेळ म्हणून अजून ग्रामपंचायतीचे टाळे कडीलाच घुटमळत होते . चौकातल्या बंगल्यांची शांत संयमी दारे किलकिली होऊन पुन्हा निर्ढावलेला स्वर आळवीत बंद झाली . एक दोन घरांच्या दारात चार दोन मुंडकी मान हलवीत इकडे तिकडे पाहत राहिली , फक्त पाहतच राहिली . सखूची आर्त किंकाळी इमारतीच्या भिंतींवर आदळून पुन्हा तिच्याच घश्यात शिरू लागली . खताच्या गोणीची कळकटलेली पांढरी पिशवी कपड्यासाहित धुळीत लोळत होती आणि पिशवीची मालकीण नवऱ्याच्या लडखडत्या लाथांनी विव्हळत होती , सिमेंटच्या रस्त्याने सोलवटणारे अंग पुन्हा पुन्हा झाकीत होती . शुद्ध नसलेला नवरा आई बहिणीवरून कान करपवून टाकणारी शिवीगाळ करीत होता . सखुला रोज अवती भवती दिसणारी माणसे दुरूनच या नाट्याचा आस्वाद घेताना दिसत होती . त्यांच्या चेहऱ्यावर बुजत बुजत  झळकणारे ते हसू , नवऱ्याच्या लाथेपेक्षा जास्त रुतत होते काळजात तिच्या . तिचा केविलवाणा चेहरा पाहून मला भडभडून आले . मी आणि नंदाने आहे तसे जावून तिला कवळ घातली . नंदाच्या पाठीत सखूच्या दारुड्या नवऱ्याची लाथ बसली आणि नंदा चवताळलेल्या वाघिणीच्या आवेशात त्याच्यावर धावून गेली . तिच्या हातच्या दोन मुस्कटात खाऊन सखूच्या नवऱ्याचे  लटपटणारे पाय आभाळाकडे वळले आणि तो धडकन धूळ उडवत सिमेंटच्या रस्त्यावर आपटला .
“काय गं सखे , एका झापडीत ते माकड तोंड वर करून पडतंय आन तू त्याचा भर चौकात मार खाती ? तुलाच आक्कल नाही बघ ..आन बसती रडत .” नंदाबाई बोलली खरी पण जळणाऱ्याच्या बुडाच्या यातना त्यालाच कळतात . सखूच्या कुंकावरून ओघळणारी रक्ताची धार नाकाच्या शेंड्यावरून कोसळत मातीत मिसळत होती . आम्हा दोघींचा आधार मिळताच ती सावरून बसली ..डोळ्याचं पाणी तसच ठेवून पदराच्या टोकाने नाकावरची धार पुसू लागली . नंदा आणि मलाही तिची ही अगतिकता पाहून रडू आले . तिच्या कपाळाला चांगलीच खोप पडली होती आणि ती बिचारी खोप तिचा धर्म पाळत खळखळून वाहत पण होती . तिच्याच पदराने तिचे डोके आवळले आणि आधार देत तिला जवळच्या दवाखान्यात नेवू लागलो . शेजारीच बगळ्याच्या रंगाला लाजवील अशा पांढऱ्या शुभ्र कपड्यात गाव तंटामुक्ती अध्यक्ष दात काढीत आमच्याकडे पाहू लागला . त्याला आम्ही करीत आहोत हे त्याचे कर्तव्य आहे याचेही भान नव्हते . हाच पांढरा हत्ती एखाद्या पत्रिकेत नावापुढे ‘ तंटामुक्ती अध्यक्ष’ मोठ्या अक्षरात लिहित असेल ! अर्धवट शिक्षित आणि पैशाचा माज असलेली ही कोडगी जमात ! माझ्या डोक्यात मुंग्या तरातरा करू लागल्या ..
    ग्रामपंचायतीच्या गाळ्यात दुकान मांडून बसलेला तो गावचा एकमेव डॉक्टर , आम्ही सखुला नेऊन बाहेर बाकावर बसवले . मागून तिची लेक भावाला हाताला धरून आणि एका हातात तीच कळकटली पिशवी धरून आमच्या मागे आली . बाहेर पेशंटची चाहूल लागली म्हणून डॉक्टरसाहेब बाहेर आले खरे पण त्यांच्या येण्याने साऱ्या खोलीत आंबट वास हवेत एकरूप झाला . त्याचे तोल जाणारे पाय सांभाळत शेवटी तो खुर्चीत बसला . कदाचित त्याचे हे पहिलेच पेशंट असावे . सखुची जखम तशी खोलच होती . त्यात ठेचलेली असल्याने टाके टाकणे जमणार नाही म्हणून डॉक्टरांनी पट्टी बांधली आणि कसले इंजेक्शन देवून आम्हाला बाहेर काढले . लडखडत आत जाताना तो मला पैशांची आठवण करून द्यायचे मात्र बिलकुल विसरला नाही .
“शाळेत जाताना देऊन जाते !” या हमीवर त्याने पुन्हा आतल्या खोलीचे दार बंद केले . सखूच्या पदराला धरून बारकं पोरगं सारखं तिला हलवत होतं .
“काय झालं पोरा ? का आईला त्रास देतो ?” माझ्या शब्दाबरोबर ते गप्प झालं खरं पण त्याच्या बहिणीला छेडू लागलं . आजूबाजूची मानसं आमची वरात बघून हसत होती .
“बाई , शाळेत नाही जायचे का ? तुम्ही अशी गावकी करीत हिंडल्या तर पोरांना कोण शिकवणार ?” आणखी एक पांढरा हत्ती जाता जाता कुजक्या काटक्या उकरून गेला . मला त्याला उत्तर देणे जमणार नव्हतेच . शाळामास्तर म्हणजे साऱ्या गावाचा नोकर , नोकराची लाचारी माझ्या मेंदूत शिरली आणि उलटं उत्तर देण्याऐवजी मी लाचार हसून उत्तर दिले , “जायचे ना आता असेच , गावकी कसली दादा ? ती शेजारी आहे तर आणली होती दवाखान्यात ..”
“आं , तिचा नवरा का मेला का काय ?” त्याने पुन्हा कुजक्या काटक्या उधळल्या . आता मात्र माझा विवेक मला डिवचत होता , तरी लाचारी मेंदूला वेटोळे घालून बसली होती .
“मेला तरी बरं होईल बिचारीचं , कष्ट करून आणलेलं लेकरांच्या मुखात तरी पडेल , दादा त्याचंच करणं धरण आहे बघा हे . पडलाय चौकात उताणा पिऊन ..तिकडच चाललात तर दिसनच तुम्हाला ..” माझ्या या वाक्यावर तो ‘दादा’ जरा बावरला आणि कसनुसं हसत सरसर पुढे गेला , मान खाली घालून !
“बाई , खरं तर या पांढऱ्या टोप्यावाल्यांना एकदा फोकानी हाणल  पायजे ..यांच्या घोंगड्या गुत्त्यावाल्यांच्या खाली आन आपल्या यांच्या खाली ..मेल्यांना मोडणारं संसार नाय दिसत , त्यांचा मताचा शिक्का दिसतोय बगा ..”
“जाऊ दे नंदा , काही बोलू नको ..एकट्याच्या मुखाने रेटायचा विषय नाही हा ..” पंधरा वर्षाचा गावाचा अनुभव माझ्या तोंडातून बाहेर पडत होता . नंदा तरी कुठे नवीन होती . आमच्या घराला कशाची झळ नव्हती म्हणून आम्ही गप्प होतो . सखुसारखी एखादी भेटली कि मात्र याची तीव्रता मनाला पोखरत राहते .
“सखू , बाई शाळेत जायच्यात तू माझ्या घरी चल , पोरं खात्यान काय तरी आन मग बाई आल्यावर बघू काय करायचं ..” समोरच्याच्या अडचणी ओळखायला शाळा शिकावी लागत नाही , हेच खरे . नाही तर आडाणी नंदा हे बोललीच नसती . हृदय पवित्र असेल तर मनाच्या वेदना कळायला वेळ लागत नाहीच ! मंदिराच्या आत थंडावा बाहेरून नाही येत , तो आताच असतो !
“नको नंदाताई , म्या जाते माहेराला आता सरळ ..फकस्त रोडपातूर सोबत चला तुमी ..” इतकावेळ तोंड लावून गप्प बसलेली सखू कोणालाच अडचण व्हायला तयार नव्हती .
“आये , जेवाय दे ना ..भूक लागली ...” मघाशी गप्प झालेलं पोर आता रडू लागलं . त्या लहान जीवाला आईच्या वेदनांची झळ लागत नव्हती , इतकावेळ पोटात दडवलेली कळ मात्र त्याला आता स्वस्थ बसू देत नव्हती . सखू तशीच खाली बसली आणि रस्त्यावर लेकरांना पोटाशी धरून हंबरडा फोडून रडू लागली . इतकावेळ वळून बघणाऱ्या नजरा ,आमच्या नजरांसहित पाणावल्या . सखुला सावरीत कशीबशी नंदाच्या घरी आणली . नंदाने तिच्या लेकरांच्या पुढ्यात भांडी सरकवली . सखुला खा म्हणाली पण ओठांच्या खाली पाण्याचा घोट बळच तिने ढकलून दिला , ताट बाजूला सारून गुढग्यात डोके खुपसून हमसून हमसून रडू लागली . माझा पाय काही तिथून उचलेना . आकराची शाळेची घंटा जोरात किंचाळत होती , माझ्या मनात मात्र सखुचे हमसून रडणेच घुमत होते . तिच्याजवळून पाय निघत नव्हता . तिने मघाशीच माहेरी जाण्याचा निर्णय सांगितला होता , तसा तिने कालही सांगितला होताच परंतु आमच्या सांगण्याने तिच्या थोड्याफार आशा पल्लवित झालेल्या तिच्या काळ्याभोर डोळ्यात मी बघितल्या होत्या . आता मात्र विझलेले तिचे नेत्र फक्त आणि फक्त वाहत होते . माझा हात तिच्या डोक्यावरून फिरत होता , अनाहूतपणे !
“बाई , तुमचं सारं पटतं हो मला ..म्या कितीबी कष्ट करीन , माह्या लेकरांना शिकवीन . मलाबी कळतंय हिथं छपराच्या सावलीत राहीन , सवताचं घर हाय ..पर म्या आणल्यालं बी ह्यो पोरांचा बाप खाऊ देत नायी ..तुमीच सांगा पोरांच्या पोटात नसल तर शाळा व काय शिकत्यान लेकरं ? सांजसकाळी ह्यो ढोसून येणार ..हाय ते सारं गिळणार आन बदड बदड बदाडणार ..आजूबाजूची मानसं हासून गम्मत बघत्यात ..इदर्यावाणी शिव्या ऐकायला मिळत्यात नव्ह...बदडाया लागल्याव कुणी पुढं हून सोडवीत नाय ..कधी पोरं उपाशीच झोपत्यात ..माहेरात काय वेगळ नाय , तिथंबी कामच कराच पर केल्यालं पोटात जायीन हो बाई ! शाळाच नाय शिकायला मिळाची , पर शिकून बी कुठं प्वाट भरतंय का ? आणि तुमच्याइतुक शिकाय पैका तर पाहिजेन ..तुमी माझं लय केलं , कदी इसर नाय पडायचा पर ह्यो नवरा मरुस्तवर मला हिथं सुकानी खाऊन देचा नाय ...पोरं कळीत झाली कि इयीन पुन्हा ..आता मातुर मला जाया पायजेन ..” तिने माझा तिच्या डोक्यावरून फिरणारा हात ओठांना लावला आणि अश्रूंचा अभिषेक त्यावरू करू लागली . पोरांचं खाऊन झालं होतं . तिने ती मळलेली पिशवी उचलली , एका हाताने झटकली ...बारक्या पोराच्या नाकाचा शेंबूड पदराने पुसला आणि आमच्या पायाला हात लावून रस्त्याला लागली ....माझ्या डोक्यात मुंग्यांनी गर्दी केली , बधीर नजरेने मी तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत होते ....नंदाने हलवले आणि मी सावध झाले . तशीच घराकडे गेले . ग्लासभर पाणी घश्याखाली घातले . शाळेची पर्स उचलली आणि चालू लागले . मागून दीदी हाक मारीत होती , मी हात हलवून तिला आत जायला खुणावले आणि पुढे चालू लागले . पंचायतीसमोर सखूचा नवरा तसाच उताणा पडला होता , लघवी होऊन पायजमा ओला झाला होता . ऊन त्याच्या अंगावर नाचत होते आणि तो ? शाळेची घंटा कधीच झाली होती . मुख्याध्यापक काहीतरी बोलणार हे नक्की होते . आठवीवर पहिला तास होता आज , मुलांना मात्र बरे वाटले असेल ! वर्ग डोक्यावर घेतला असेल , त्यांचे बाप अजून गुत्त्यावर असतील आणि आया रानात पोहचल्या असतील . मुले मोठी होऊन गुत्त्यावर जातील आणि मुली नवऱ्याचा मार खाऊन रानात जातील ...माझ्यासारखे शिक्षक मात्र रोज शिकवतील ......
‘खरा तो एकची धर्म ...जगाला प्रेम अर्पावे ...’

आणि ‘ती’ ? ....ती गाव सोडून निघून जाईल ! 
         डॉ संध्या राम शेलार .

Friday, 24 June 2016

उखडलेला मोगरा

“स्वप्ना , ए स्वप्ना ..उठ पाच वाजले !” आईच्या आवाजाबरोबर स्वप्नाची मधुर झोप चाळवली . अजून अंथरुणातून उठण्याची तिची मनिषा बिलकुल नव्हती . पाच दहा मिनिट तर ती नक्कीच पडू शकत होती . शेजारी कावेरी अजून गडद झोपेच्या आधीन होती . पहाटेचा तो थंडावा तसा दोन दिवसांनपासूनच जाणवत होता . मान्सूनच्या पावसाने जरी उशिरा हजेरी लावली होती तरी अगदी मनभरून तो कोसळत गेली चार दिवस सुखावून जात होता . तिच्या नाकात मोगऱ्याचा गंध हलकेच झोपेशी तादात्म्य पावत चालेल्या मनाला झोका देवून गेला . ती खडबडून जागी झाली आणि मुखमार्जन न करताच मळ्याच्या वाटेला लागली . मंद वाऱ्याची झुळूक सर्वांगाला स्पर्श करीत थरथरत गेली . मघापासून उठायला नकार देणारे , चवचवणारे अंग क्षणात मोकळे झाले ; तसं तिची पावले चपळतेने पडू लागली . चार पाच दिवसाच्या वरुणकृपेने पायवाटेच्या दुतर्फा बरेच गवत वाढले होते . नव्या कापडाचा हिरवा रंग जणू साऱ्या चराचराने धारण केला होता . नुकतेच रविराजाने दक्षिणायनात पाऊल टाकले होते म्हणून अजूनही त्याची लवकर उठण्याची सवय काही मोडली नव्हतीच ! आणि म्हणून सहा नव्हते वाजले तरी उजेडाने तमसाला चांगलेच पिदाडून लावले होते . कोवळ्या रूपाने अवतीर्ण होणारी ती हरिततृणे , कॉंग्रेसच्या तृणाचे ते हिरवे कोवळेपण , आघाडा , चीलाचं गवत , कुरमुडी , हरळ , चिकटा , टाकळा सगळ्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धाच जणू लागली होती . टाकळा मात्र साऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत सर्वत्र माजला होता . कॉंग्रेसच्या गवताची कुरघोडी मोडीत काढायला तो चांगलाच तयार झाला होता . कॉंग्रेसच्या गवताची गम्मत आजीने मागे एकदा सांगितली होती . हे विलायती गवत इतके कसे माजते आणि हा हा म्हणता मोठे कसे होते हेच कळत नाही . मागच्या वेळी आप्पांनी सारा बांध पेटवून दिला तरी राख आहे तोवरच ते पुन्हा उगवून आले . आजी म्हणते , “ती जातच इलायती , माजुरी ..विंग्रजांनीच आणली ती , इलायती गहू आला ..स्वस्तात आला मग काय मायबाप सरकारला हे ....दुवा, पर जशी मानसं सुधरीवली आणि त्यांच्यावर राज्य केलं या गोऱ्या साहेबांनी तसं बघा गहू दिला पर हे माजुरड तण बी दिलं बघा ..आसं माजी आई सांगायची..” तसे आजीला पण थोडेफार गोरे शिपाई आठवतात ,,पण त्या तिच्या बालपणीच्या आठवणी .
    पूर्वी कधीच्या अस्तित्वाच्या खुणा सांगत असलेल्या गुर्‍हाळाच्या विहिरीपर्यंत स्वप्ना आली पण अजून त्या कोवळ्या गवताचे कौतुक तिच्या मनाला बिलगून होतेच . विहिरीचा हौद थोड्या उंचावर असल्याने घरापासूनच तो दिसे , गुर्‍हाळ एका बाजूला मोडक्या छपराच्या खाली आधन ओतायचा हौद , पुढे मोठे चुल्वान , एका बाजूला डोक्याच्या वर जाईल अशी चिमणी वरच्या बाजूची काळवंडली काठ घेऊन उभी होती . बाहेरच्या बाजूने चिमणीच्या विटा आणि मातीचे पोपडे ढासळले होते . चिमणीच्या विरुध्द बाजूला असलेला चोथरीचा ढीग काळपटला होता , तसे आत उकरले तर अजूनही पांढरीतक चोथरी निघत असे . पूर्णपणे उखानलेला ओटा किती आत्मीयतेने स्वप्ना आणि कावेरीच्या मदतीने आईने सारवला होता . आजोबांच्या काळात गुऱ्हाळ बारा महिने चालू राही पण आता स्वप्नाच्या जन्माच्या वेळेपासून फक्त हिवाळ्याचे चार महिने खिर्चलाचा पट्टा चालू होई . ते चार महिने मानाने मिरवणारी भली दांडगी कढई ..एक हौद भरून रस त्यात मावायचा , हात्या , बादल्या , फावडा , झार्या , हागरं टाकायचं बारीक पत्र्याचं हौद ..सारं सारं चोथरीच्या खाली लपायचं . तिथून जाताना स्वप्नाच्या नाकात गुळाचा तो गोड वास शिरला आणि कढई उतरते आहे असा आवाज तिच्या कानात घुमू लागला , ‘धरली का ? सावध , कुंडली गवरदे हरी विठ्ठल , माउली श्री ज्ञानदेव तुकाराम.....पंढरीनाथ महाराज कि जय !’ या जयघोषाबरोबर इंजिनाच्या जवळचा लिंब थरथरल्याचा भास तिला झाला आणि विहिरीच्या कडेने ती पाटातचालू लागली . आता दोन चिंच , मेहंदीचे आत्याने लावलेले झुडूप , जांभळ आणि कवठ पार केली . पाटात जरी पाणी नव्हते खेळले तरी चिखल पायाला लागत होता , काळ संध्याकाळी झालेल्या पावसाचा तो प्रसाद होता . उंच गेलेल्या पिंपळाच्या खाली छोटे खुरुटले मोगऱ्याचे तेच झुडूप तिला उठल्यापासून साद घालीत होते .शुभ्र गोदडी पांघरून जणू ते झुडूप अजूनही निद्रेच्या आधीनच आहे असाच भास झाला तिला ..तीही असेच आप्पांच्या सफेद जुनेर धोतरापासून आजीने केलेली ती शुभ्र मऊ गोदडी बाजूला सारून आली होती . तिने लगबगीने फुले तोडायला सुरुवात केली . ओढणीत एक झोळी केली आणि त्यात तिची मोगऱ्याची सुगंधी रास विसावू लागली , जणू तीही तिची वाटच पहात होती .काल संध्याकाळी मळ्यात जाताना तिने एकमेकींच्या गळ्यात गळे घालून बसलेल्या त्या पाकळ्या कळी म्हणून मिरवताना पाहिल्या होत्या . त्याच पाकळ्या रात्रभर एकमेकींच्यातून उसवून एक सुंदर टपोरं , सुगंधित मोगऱ्याचं फुल झाल्या होत्या . उसवाताना किती वेदना झाल्या असतील न त्यांना ? पण हे फुललेलं त्याचं रूप कष्टातून , वेदनेतून साकारलेलं अद्वितीय रूप आहे ! हे दवबिंदू अशा असंख्य अक्रोशांचे तर अश्रू नसतील ?पण आक्रोशाने इतके विलोभनीय सौंदर्य निर्मित होत असेल तर तोही सृजनाचाच आक्रोश नाही का ? रात्रीतून या तारकांच्या शुभ्रराशी या छोट्याशा झुडुपावर अवतीर्ण इतक्या सहजतेने थोड्याच होतील ? त्या उत्तेजनकारक विचाराने अन सुवासाने ती क्षणभर दिग्मूढ झाली , एक सुगंधित लहर तिला रोमरोमात फुलवून गेली ..काही आठव मन:पटलावर उमटले आणि स्वप्नाच्या पावलांनी लज्जित नजरेने परतीचा मार्ग धरला . स्वतःला आवरत ..सावरत ती चालत होती . या मेहंदीने तर नसेल माझे मन ओळखले या विचारांनीच ती अर्धमेली झाली आणि त्या आठवांना बाजूला करण्याच्या प्रयत्नात घाईने पळूच लागली !
“स्वप्नाताई , किती गं चांगली आहेस माझी ताई ..उम्म्ह्ह...”म्हणत कावेरीने तिच्या हातातला एक गजरा काढून घेतला आणि तिला वेळावत निघून पण गेली .
“खरोखरची काऊ आहेस तू , आयितखाऊ काऊ ..” स्वप्नाने तिच्यासाठीही गजरा बनवला होताच , तशी ती रोज बनवे देखील पण कावेरी तिच्या लांबलचक , दाट गजर्‍यासाठीच हव्यास धरे आणि चलाखी करून तोच गजरा पदरात पाडून पण घेई . थोडावेळ स्वप्ना चरफडे पण थोडाच वेळ मग काऊच्या केंसात हेलकावणारा तोच गजरा पाहून तिचेही मन प्रसन्न होई ! लहान भावंडासाठी ताई हीही एक आईच तर असते !
   आज साऊ , रूपाताई , विनिता साऱ्या लवकर रस्त्याला लागल्या . कावेरी पण जाऊन त्यांना मिसळली . स्वप्ना मात्र थोडी मागे राहिली . ही घरून निघेपर्यंत बाकीच्या मुलींनी ओढा गाठला होता . खरे तर रोज स्वप्ना उशीर करेच आणि धावत जाऊन त्यांना सामील होई , पण आज तिच्या मनाने पावलांशी आणि उत्साहासोबत काडीमोड घेतली होती जणू . पुढे जाणाऱ्या बहिणी दिसत होत्या पण त्यांना जाऊन गाठण्याची उमेद मात्र मनात उमटत नव्हती . वस्तीपासून मोरवाडी फाटा अर्धा किलोमीटरवर होता . जरी तो राज्यमार्ग होता आणि त्याच रस्त्याने एस टी येई पण ती काही मधे अधे थांबत नसे . गावातून सुटली कि फाट्यावर तेही गर्दी नसेल तर ! म्हणून या मुलींना लवकर जाऊन बराच वेळ फाट्यावर थांबावे लागे . आधी सापडेल त्या वाहनाने जात साऱ्या पोरी पण एक वर्षापासून एस टी ने मुलींसाठी पास फुकट केला होता . एखादी छोटी योजना ग्रामीण स्रीसाठी शिक्षणाची कवाडे खुली करू शकते याची प्रचीती या योजनेने वर्षभरातच दिली होती . कारण ज्या गावातल्या मुली स्वप्नाच्या वर्गातल्या, खर्चामुळे पुढचे शिक्षण बंद करणार होत्या त्या साऱ्या आता शाळेत येत होत्या . कारण फी माफ आणि आता जाण्यायेण्यासाठी लागणारा खर्चही पास फ्री झाल्याने कमी झाला होता .
  स्वप्नाच्या बहिणी आता मागे वळून पाहत होत्या , पिंपळ आला लिमकर वस्तीचा तरी अजून ती ओढ्यापर्यंत पण आली नव्हती . कावेरीला वाटले उगीच ताईचा गजरा घेतला , कदाचित म्हणून तर ती रागावली नसेल ना ? पण स्वप्ना आज वेगळ्याच विचारांत होती ! आता ती आणि साऊ अकरावीला गेल्या होत्या . कॉलेज आणि भोवतीचे ते बदललेले वातावरण , त्यात सामावून जाने किती कष्टप्रद असते . आधीच्या कन्याशाळेजवळच होते जुनिअर कॉलेज , पण तरी आता शिक्षक , सहअध्यायी सारेच बदलले होतेच त्यात बर्याच मुली आधीच्या मैत्रिणी असल्या तरी बऱ्याच नवीनसुद्धा होत्या . आजूबाजूच्या गावांहून आलेले बरेच नवीन विद्यार्थी पण होते ,आणि त्यात भरीस भर मुलेही आता त्यांची सहअध्यायी होती ! एक वेगळाच नवखेपणा सर्वत्र भरला होता . तो हवासाच वाटत होता सर्वांनाच , कुणी निडरपणे कबूल करे तर कुणी मैत्रीण ते लपवून शहाजूकपणाचा आव आणे ..स्वप्ना बहुतेक दुसऱ्या गटात मोडत होती . पण शहाजूकपण नव्हते तिच्या वागण्यात तर एक भीती होती ..एक अनामिक भीती जी तिच्या सभोवतालच्या वातावरणाने मनात पेरली होती !
     ओढ्याजवळच्या गिरिणीच्या आवाजाने ती भानावर आली , अवतीभोवती पाहत अंग चोरून घेत उगीच बावरली ..काय पण विचार करते मी ! म्हणत अंगभर पसरलेला रोमांच लपविण्याचा खुळा प्रयत्न ती करीत राहिली . बरं झालं साऊ आणि बाकीच्या नाहीत इथे ...पण आई म्हणते मुलीचे शील काचेचे भांडे ! एकदा तडकले तरी पुन्हा नाही वापरता येत ..का ? मुलाचे असे का नसेल ? विक्रमदादाने तर किती दिवस त्या संगीला फिरवले आणि आता सुंदर अशी विभावहिनी त्याला मिळाली ! मग कुठे काय नुकसान झाले त्याचे ? जाऊ दे , नकोच हे विचार पण ..आपल्याला शिकायला पाहिजे, मोठे व्हायला पाहिजे ..किती मोठे नाव होते शिकून ! आपली ओळख सारा समाज मनात ठेवतो आणि स्वतःची कमाई वरून म्हणजे सारखे कुणावर अवलंबून नकोच राहायला . बाबा पण नाही का म्हणायचे , पोरींनो पोहायला शिका ..जरी एखादीच्या नशिबाने वाईट नवरा मिळाला , दिले ढकलून विहिरीत तरी जीव जगवता यायला हवा ..असेही जरी नाही मारले तरी स्वतःची उपजीविका करून तरी स्वतःचा जीव जगवायला हवाच ना ? नाहीतर जावे लागेल रानात खुरपे घेऊन , आईसारखे आणि काकीसारखे !
   इतकावेळ तरुण्यासुलभ भावनांनी ओतप्रोत स्वप्नाचे हृदय , शिक्षण आणि आईजवळ थांबले आणि पावलांचा वेग वाढला . स्वतःच्या विचारांना दुषणे देत ती झपझप चालत मुलींच्या घोळक्यात मिसळली पण मनाने अलिप्तच राहिली . फाट्यावर एक भला मोठा पिंपळ अनेक वर्षांपासून तटस्थ उभा होता . एका तिकोनावर उभा तो वृद्ध वृक्ष सहजतेने दोन माणसे सामावतील असा बुंधा असलेला त्या परिसरातील एकमेव वृक्ष होता . पिंपळपान पहायचे असेल तर आभाळाकडेच नजर फिरवावी लागे . निळ्याभोर पृष्ठावर ती विलोभनीय पोपटी पाने पाहणाऱ्याच्या डोळ्यांना शीतल सौख्य प्रदान करीत असत , वर्षानुवर्षे ! त्याची वाऱ्याच्या झोताने पडलेली पाने या साऱ्या शाळकरी मुलींच्या कौतुकाचा विषय बनत ..अशा कितीतरी पानांची जाळीदार पाने या विद्यार्थ्यांच्या पुस्तकातून तयार होत असत . कालौघात ती हरवून जात आणि पुन्हा नव्याने या मुलांच्या पुस्तकाचा आधार घेत तयार होत . थोडे पांढरट तपकिरी बुंधा दोन माणसांच्या पण कवळीत बसणार नाही इतका मोठा होता , त्याची पोपडा होऊन निघणारे सालीचे तुकडे काढले कि आत लोण्याला लाजवील असा बुंधा दिसे ..मऊ मऊ बुंधा , त्यावर बोटे फिरवताना मोरपंखाचा भास होई ! थोडे वर गेले बुंधा दोन फांद्यात विभागला गेला होता आणि तो इंग्रजी वाय चा आभास देई , त्याच्या लागुनच एक खोबण होती , जणू त्यातला डोळा काढून नेलाय कुणी ! त्या वृक्षाबद्दल अनेक दंतकथा त्या परिसरात ऐकायला मिळत आणि त्यात एक अशी होती कि , एक नाग नागिणीचे कुटुंब त्याच्या वरच्या खोबणीत, वर्षानुवर्षे आहे . त्याला कुणी डिवचले तर तो माणूस मरे ! स्वप्नाला ते आठवले त्या अश्वत्थ वृक्षाकडे पाहताना आणि तिच्या नखशिखांत थरार जाणवला तिला . ती आणि तिच्या या बहिणी कधीच त्याच्या सावलीला उभ्या राहत नसत . तिथेच शेजारी दहा पावलांवर एक कडूलिंबाचे , पिंपळाइतके मोठे नाही पण भरगच्च सावली देणारे ते झाड यांना जास्त प्रिय होते . तिथेच दगड मांडून त्या बसत लाल पिवळ्या एस टी ची वाट पाहत . परीक्षेच्या काळात तर पुस्तक वाचून जमिनीवर त्याची उजळणी करायला याच्या त्या नाजूक काड्यांचा बराच उपयोग होई , कारण तासभर तरी एस टी ची वाट या मुलींना रोज पहावी लागेच . कधी त्याच्या जखमातून निघणारा डिंक या पोरी कण कण साठवून ठेवत . स्वप्ना मात्र असं डिंक तिच्या नजरेला पडले कि लगेच तोंडात टाके . त्याची ती कडवट चव तिला भारी प्रिय होती , त्याचे दाट चिकटवून ठेवणे आणि प्रयासाने त्यांचे विलग होणे , हा खेळ साऱ्याच मुलांचा प्रिय खेळ पण स्वप्नाला त्याची चवच भारी वाटे . असं डिंक दिसले कि तिचे डोळेच चकाकत ! आज मुलींच्या कुठल्याच संभाषणात ती मनाने नव्हतीच . तेव्हढ्यास तेव्हढे उत्तर देऊन ती तिच्याच मनोभूमीत पुन्हा पुन्हा जात होती .
“ताई , गजरा घेतला म्हणून रागावलीस का गं ? तसं असेल तर नको तुझा गजरा मला ..” कावेरी नाटकी रुस्क्या स्वरात बोलली . तशा साऱ्या पोरी हसू लागल्या . स्वप्ना फक्त तिच्या केसांवरून हात फिरवत हसली .
  विचारांत तल्लीन स्वप्ना आज जास्तच मोहक दिसत होती . तो ड्रेसचा फिकट गुलाबी रंग तिला तिला खुलवत तर होताच पण लांब बाह्यांचा ब्लाउज आणि झिरमिळ्यांची ती कॉलर तिला जास्त मोहक करीत होती,भरीस भर म्हणून ती काही आठवून मनाशीच मधाळ हसत होती ..लाजेचे ते इंद्रधनू पाहून साऊ तिला म्हणालीही पण तिने लज्जित हास्याने तिच्याकडे पाहिले . साऊला मग अधिकच चेव आला आणि ती तिला छेडू लागली . इतक्यात ओढ्याच्या वर चढलेले ते एस टी चे लाल पिवळे धडधडणारे धड पाहून रूपाताईने साऱ्यांना इशारा केला आणि साऱ्या पोरी रस्त्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या . मोरवाडीच्या पोरापोरींचा गलकापण त्यात विलीन झाला . कुणीतरी एक उगीच स्वप्नाला खेटून वर चढला तशी स्वप्ना थरथरली आणि मागे झाली , रूपाताईच्या मागे अंग चोरून उभी राहिली आणि भेदरल्या नजरेने दाराकडे पाहू लागली . तसं ते पोरगं जास्तच चेकाळलं आणि दाट विचकावत तिच्याकडे पाहू लागलं ..त्याच्या तोंडातून कसलीतरी घाणेरडी लाळ गळतेय असेच वाटले स्वप्नाला जरावेळ ...मग तिने नजर फिरवली आणि रूपाताईला हलक्या आवाजात तक्रार करू लागली .
“स्वप्ना आपणच नाही पाहिले कोण पाहतेय तर थोडीच दिसणार आपल्याला असले किळसवाणे लोक ..तू नको बघूस ..असेही हत्तीने श्वानाचे भुंकणे नजरेआड करावे नेहमी !” रूपाताईच्या या समंजस समजावण्याने स्वप्नाच्या मनातील वादळ पळभरात शमले .आणि त्या गर्दीत ती एस टी त चढली , रूपाताईच्या मागोमाग !
   सकाळच्या गाडीला बसायला जागा मिळणे अशक्यप्रायच असे ,फक्त आत शिरायला मिळाले तरी धन्यता वाटे साऱ्यांनाच , कारण हा तालुक्याला जाताना शेवटचा थांबा ..बऱ्याचदा या मुलींना ओळखीचे ड्रायव्हरकाका असतील तर पुढच्या केबीनमध्ये बसायला जागा देत . स्वप्ना पाठीची ब्याग सावरीत आणि हातातले जरनल घट्ट पकडून एका हाताने शीटचा आधार घेत उभी होती तिच्याच बहिणी तिच्या आजूबाजूला होत्या . ती उभी असलेल्या शीटवर मात्र मुलेच बसली होती . या मुलींची अशी अवघडलेली अवस्था पाहून एकालाही वाटले नाही उभे राहून जागा द्यावी म्हणून ..आणि चुकून कधी असा अनोळखी तरुण पोरगा जागा देऊ लागला तरी रूपाताईचा स्पष्ट मेसेज होता कि बसायचे नाही ! तसं रूपाताईचे सांगणे या साऱ्याजणी ऐकायच्याच ! तसे पाहता या पुढेमागे , वरखाली उडणाऱ्या डब्यात स्वतःचे तटस्थ अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून धरणे अशक्यच होते , मग कुणाचा कुणाला धक्का लागणे ठरलेले असे . तेंव्हा होणारी नजरानजर अपरिहार्य होती . अशा अनेक कडू आंबट ..गोड नाहीच ..प्रसंगाच्या प्रवासातून सुटका व्हायला दहा मिनिट तरी ठरलेले होते . एसटी च्या त्या दोन हाताच्या दारातून बाहेर पडणे म्हणजे एक दिव्यच असे , भराभर एकमेकांना घाईने किंवा मुद्दामहून एकमेकांना धक्का देत बाहेर पडणारे ते विद्यार्थी कोंडवाड्यातल्या मेंढरांसारखे बाहेर पडत . कधी एकमेकांना ढकलत तर कधी अलगद तरंगत बाहेरचे मोकळे आकाश प्राप्त होई !
   गर्दीतून बाहेर पडताना मात्र साऱ्या सख्या अलग होत आणि साऱ्या खाली येईपर्यंत आलेल्या त्यांची वाट पाहत बाजूला थांबत . स्वप्ना आज आधी उतरली , मघाशी लगट करणारं ते पोरगं जवळून काहीतरी बोलत जातंय असं वाटलं तिला पण तिने अजिबात त्याकडे दुर्लक्ष केले आणि खरोखर रूपाताईचा फोर्मुला काम करून गेला . खरंच किती सोपे असते एखाद्या ओंगळवाण्या कृतीला मात देणे ....प्रतिक्रिया न देऊनच समोरच्याची हार निश्चित करतो आपणच ! भरभर साऊ ,रूपाताई ,कावेरी आणि विनिता तिच्याभोवती गोळा झाल्या . थांब्यापासून कॉलेजचे पायी अंतर पाच मिनिटाचे , त्यात बाकीच्या गावांच्या एसटी आल्या असल्या कि त्याही मैत्रिणी सामील होत चालताना ...कावेरी आज स्वप्नाच्या सोबत चालत होती .
“ताई , ती पाण्याची टाकी किती गं उंच आहे , मला तर बाई भीतीच वाटते तिची ..वरून सारं गाव दिसत असेल नाही ..पण वर गेल्यावर भीती पण किती वाटत असेल गं ..” कावेरी रोज सभोवती नजर फिरवत चाले आणि सारा वृतांत कथन करीत पाऊल टाकत राही ..आज कशी कुणास ठाऊक ती पाण्याची टाकी मान वर करून पाहत होती .
“काऊ , अगं एक वर्ष झालं , त्या टाकीवरून एका प्रेमीयुगुलाने उडी मारून जीव दिला होता ..आहे ना ध्यानात ?” विनिता तिला आठवण करून देऊ लागली .
“हो गं , कसं त्यांना हे जीवन संपवावं असं वाटलं असेल गं ...नुकताच पालवलेला शेंडा असा हाताने खुडणे , कसे गं जमत असेल यांना ?” कावेरीचा कातर आवाज तिच्या काळजात चिरत शिरतोय असेच वाटले स्वप्नाला ..
“काऊ पुरे आता , बाकीचा अंक घरी गेल्यावर वाच ..” रूपाताईने इकडे तिकडे पाहत साऱ्यांनाच दटावले ..भरभर त्यांची पावले कॉलेजच्या दिशेने पडू लागली .
   जवळच्या मुली आधी येऊन मागची बेंच पकडत बसायला . उशिरा येणाऱ्यांना नाईलाजाने पुढच्या बेंचवर बसावे लागे आणि साऊ आणि स्वप्नाला तर रोजच उशीर होई ..एसटीच्या दिरंगाईमुळे ! आज स्वप्नाला नाईलाजाने पहिल्या बेंचवर कडेच्या बाजूला बसावे लागले . तिथे बसने कुठल्याच मुलीला आवडत नसे ..एक तर प्रत्येक शिक्षक तिथेच बघून शिकवत आणि जराही नजर इकडे तिकडे फिरवणे अशक्य होई ..आणि त्यात कहर असा कि शेजारी लागुनच मुलांची रांग असे ! आज पहिलाच तास लिहून देणाऱ्या सरांचा , बसायला आवराआवरी करेपर्यंतच सर हजर झाले आणि स्वप्नाची एकच  धांदल उडाली . तिने घाईने वही काढून लिहायला सुरुवात केली . कानात साठवत गेलेले शब्द लेखणीतून वहीवर उतरू लागले , काही शब्द अलगदपणे हवेत विरूनही जाऊ लागले . तसे ती जास्तच कण देऊन ऐकू लागली . लेखणी चपळतेने धावू लागली . या कर्ण आणि कराच्या स्पर्धेत तिचे पेन गळून खाली पडले , पदकमलांच्या आश्रयाला जाऊन ! ती ते पेन घ्यायला झुकली आणि ....ती नजर तिच्या आरपार शिरतेय असाच आभास तिच्या सर्वांगाला झाला ...पळभरापूर्वी स्थिर असलेले तिचे मन एका कटाक्षाने सैरभैर झाले . मघाशी सरांच्या शब्दांशी स्पर्धा करणारी लेखणी त्राण संपलेल्या जिवासारखी धडपडू लागली ..आता अनेक शब्द हवेतच विरून जाऊ लागले . रूपाताईचे बोलणे आठवले आणि तिच्या मनातील काहूर थोडे स्थिरावू लागले ..तिच्या मनाने त्या अक्षांचा चेहरा पहायचे ठरवले आणि लिहिताना आपसूक नजर तिकडे फिरली ..ते डोळेही तिलाच पाहत होते ..मघाच्या फाट्यावरच्या नजरेतले ते लाळघोटेपण नव्हतेच ते ..एक वेगळीच सौम्यता होती तिच्यात ..मनाला भुलवणारी शीतलता ...कोवळ्या तृणाला हिरवाईने दिलेली सौम्यता ... मोगऱ्याच्या गंधाने नासिकारंध्रातून शिरून मनाला मारलेल्या मिठीतली शीतलता ...थंडगार झुळकेने क्षणात मलीन तनाला उत्तेजित करणारी ती शीतलता ! रूपाताई ओंगळवाण्या कृतीला प्रतिक्रिया द्यायची नसते , पण मग या हव्याशा क्रियेला काय प्रतिक्रिया द्यायची गं ? खरंच सांगशील तू कि फटकारशील मला दुषणे देवून ? या भावनेला लाजेच्या , भीतीच्या पांघरुणाखाली असेच झाकून ठेवायचे का ? हे विचार मात्र स्वप्नाने माशी झटकावी असे झटकून टाकले !
   दिवसाच्या अखेरपर्यंत तिचा त्या डोळ्यांचा चेहरा मनात साठवायचा राहूनच गेला . नजरेत गुंतलेली नजर हटविण्यात तिचा क्षण संपत राहिला आणि एक गोड हुरहूर तनमनाला घेरून भिरभिरत राहिली ..तिच्याच भोवती ! कॉलेज सुटूनही तिची लागलेली तंद्री सुटत नव्हती . ती तशीच तिला घेऊन घरी आली , रोजचा दिनसमाप्तीला अंग वेढून टाकणारा थकवा आज पंख लावून उडून गेला होता . येऊन खायचे पण भान नव्हते तिला , तशीच थंडगार पाण्याचा शिडकावा चेहऱ्याला देऊन ती मोगऱ्याच्या कळ्या पाहायला धावत सुटली . आजपर्यंत मिटलेल्या पाकळ्यांच्या त्या कळ्यांचं कसलच कौतुक तिला नव्हतं , पण उमललेल्या या फुलाला आज कळीची ओढ लागली होती ..भूतकाळ उकरून आठवण्याची हौस माणसालाच असते नाही ! विहिरीपर्यंत जाऊपर्यंत तिला चांगलाच दम लागला ..चिंच , जांभूळ , मेहंदी , कवठ आणि हा आला पिंपळ ...पिंपळाच्या बुंध्याला विसावलेलं ते मोगऱ्याचं ..हे पहा झुडूप ..झुडूप ...झुडूप ...सकाळी तर इथंच होतं ? ? ?
“आई , ते ते झुडूप ..मोगरा ..” तिचा कातर आवाज आणि डोळ्यात गोठलेला बर्फ पाहायला कुणालाच वेळ नव्हता .
“काय बोलतेय स्वप्ना ..काय झालं तुला ..थांब जरा वेळाने बोलू . ती काकी तिथे रडून रडून दमली , काही खाल्लं नाही सकाळपासून , जा पाणी घेऊन जा . बरं झालं बाई ताईसाहेब आल्या नाहीतर तिला बघू का काम बघू हेच कळल नसतं बघ मला ..” आईच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध होत नव्हता तिला . हातात दिलेला तांब्या तिने काकीच्या खोलीत नेवून ठेवला ..तसे हुस्मरणारे काकीचे शब्द तिच्या कानावर पडले , काकी आत्याच्या गळ्यात पडून रडून रडून सांगत होती .
“ताईसाहेब माझ्या बहिणीची एकुलती एक पोर होती हो ती , आपल्या स्वप्नाच्या तर वयाची ..कशी हो गेली ..त्या रांडामेल्यांचा कसा जीव झाला असेल तिला मारायचा ..सख्खा बाप लेकराच्या जीवावर उठला हो ..ताई आरडत होती बाहेरून पण कुणी कुणी नाही ऐकलं ..कवळी कळी उमलायच्या आधीच चिरडून टाकली या भुतांनी ..ताईसाहेब ..”
स्वप्नाच्या डोळ्यावरची तंद्री खाडकन उघडली ..उत्कर्षाला काकांनी मारली , जीवे मारली ..का ? त्यांचा तर किती जीव होता ..तिने सांगावे आणि त्यांनी द्यावे ..मला कावेरीला तिच्यासारखी एक पण वस्तू , कपडे मिळत नसत . शाळेत हुशार म्हणून होस्टेलला ठेवली होती ...मग काय झालं असेल ?
“ताई ,इकडे ये ना ..”म्हणून कावेरीने तिला ओढतच मागच्या अंगणात नेले . तिचा तो खुसफुस आवाज तिला उमजत नव्हता . ती कान देऊन ऐकण्याचा अट्टहास करीत होती पण तो काही स्वप्नाच्या मेंदूला भिडत नव्हता . ..त्यांना असे मागे जाताना पाहून आप्पांनी हाक दिली .
“ताई , काऊ अंधार झालाय आता थांबा , पोरीच्या जातीने दिवस मावळला कि घरात बसावं ..” तशा दोघी आत आल्या आणि आईला मदत करू लागल्या .
“वहिनी , कसा हो जीव धजला असेल त्यांचा ..घरात लेकराचा जीव घ्यायला ..” आत्या भाकरी करणाऱ्या आईला विचारात होती . आईने पोरींकडे नजर टाकत आत्याला गप्प केले .
“जा पोरींनो , अभ्यास करा ..भाकरी झाल्या कि बोलावीन जेवायला ..” आईने जवळजवळ ढकलूनच लावले कावेरीला . तशी धुसफुसत ती त्यांच्या खोलीत आली , स्वप्ना आधीच आली होती . दोघींनी डोळ्यापुढे पुस्तके धरली पण मन त्यात रमत नव्हते ..स्वप्नाच्या मनात विचारांची शृंखलाच तयार होत होती . उखडलेला मोगरा ...मेलेली उत्कर्षा ...
“ताई , तुला माहितय का ? अगं उत्कर्षा एका महाराच्या पोरासोबत पळून गेली होती ..आठ दिवसांनी पुण्याला एका झोपडपट्टीत सापडली दोघं ..त्याला मरोस्तोवर मारला आणि हिला उचलून आणली घरी ..काल रात्री काकांनी आणि आजीने गळा आवळून मारली तिला .” कावेरीने तिला कळलेली माहितीत स्वप्नाला पुरवली . विस्मयाने स्वप्ना काहीवेळ तिच्याकडेच पाहत राहिली ..
“तुला कुणी सांगितले ? काहीपण वावड्या नको उडवू ..” डोळ्यांनी दटावत ती कावेरीला बोलली खरी पण तिच्याही मनाला उत्कर्षाचे जाने काही केल्या पटत नव्हते ..काही विचीत्राचा वास तिला कधीचा घरभर पसरलेला जाणवत होताच ..
इतक्यात आईची हाक आली आणि दोघी जेवायला गेल्या ..घश्यात घुटमळत असलेला घास प्रत्येकजण बळेच घशाखाली उतरवत होता . काकीचे हुस्मरने अजूनही चालूच होते ..तसे आप्पा कडाडले .
“पुरे आता , कुळबुडव्यांना अशीच शिक्षा असते ..खानदानी मराठ्याने केले असते तेच साडूने केले .त्याच्या जागी मी पण तेच केलं असतं . म्हणून आता बास झालं रडणं , तुम्ही जगा बाकीच्यांना पण जगू द्या ...जेवा आता ..विखारी वेळ मुळासकट उपटायची असती ..” आप्पांनी घास तोंडात घातला . काकीचे हुस्मरने पळभरात शांत झाले . मघापासून फडफडणारा देव्हाऱ्यातला दिवा दार लोटून घेताच मंद जळत रहावा , तशीच भासली काकी स्वप्नाला !
  विचारांच्या एकमेकीत गुंतलेल्या कड्या उराशी घेवून स्वप्नाला झोपेचा थांग लागत नव्हता . कावेरी मात्र कधीच निद्रिस्त झाली होती ..बर्याच कालाने तिची नजर अंधाराच्या आधीन झाली .
  मोगऱ्याची कळी ...उखडलेलं मोगऱ्याचं झुडूप ....रडणारी काकी ...मोगऱ्याचं फुल ...ते शीतल डोळे ...मराठा ...कुळबुडवी उत्कर्षा ...मेलेली उत्कर्षा ........
घामाघूम झालेली स्वप्ना ताडकन उठून बसली ..पांढरी शुभ्र गोदडी तिने बाजूला केली . आणि हलकेच ओढणीने घाम पुसत ती उठून उभी राहिली . पांघरुणाची घडी करून तिने पायथ्याला ठेवली . कावेरी अजून झोपलेली होती ..मुखमार्जन न करताच ती मळ्याच्या वाटेकडे धावली .. ओटा ओलांडायच्या आधीच आईने हाक मारली ..
“स्वप्ना , नको जाऊ .कालच मोगरा उपटून काढला आप्पांनी ..रानात अडचण करतो म्हणून !” तशी स्वप्ना पाणावल्या डोळ्यांनी आईकडे बघू लागली . आईचे पण डोळे पाणावले ...
ती एकटक मळ्याकडे पहात राहिली ..नकोच तो डोळ्यांचा चेहरा बघायला ...त्याची जात वेगळी असली तर ?

               डॉ संध्या राम शेलार .