“स्वप्ना , ए
स्वप्ना ..उठ पाच वाजले !” आईच्या आवाजाबरोबर स्वप्नाची मधुर झोप चाळवली . अजून
अंथरुणातून उठण्याची तिची मनिषा बिलकुल नव्हती . पाच दहा मिनिट तर ती नक्कीच पडू
शकत होती . शेजारी कावेरी अजून गडद झोपेच्या आधीन होती . पहाटेचा तो थंडावा तसा
दोन दिवसांनपासूनच जाणवत होता . मान्सूनच्या पावसाने जरी उशिरा हजेरी लावली होती
तरी अगदी मनभरून तो कोसळत गेली चार दिवस सुखावून जात होता . तिच्या नाकात
मोगऱ्याचा गंध हलकेच झोपेशी तादात्म्य पावत चालेल्या मनाला झोका देवून गेला . ती
खडबडून जागी झाली आणि मुखमार्जन न करताच मळ्याच्या वाटेला लागली . मंद वाऱ्याची
झुळूक सर्वांगाला स्पर्श करीत थरथरत गेली . मघापासून उठायला नकार देणारे ,
चवचवणारे अंग क्षणात मोकळे झाले ; तसं तिची पावले चपळतेने पडू लागली . चार पाच
दिवसाच्या वरुणकृपेने पायवाटेच्या दुतर्फा बरेच गवत वाढले होते . नव्या कापडाचा
हिरवा रंग जणू साऱ्या चराचराने धारण केला होता . नुकतेच रविराजाने दक्षिणायनात
पाऊल टाकले होते म्हणून अजूनही त्याची लवकर उठण्याची सवय काही मोडली नव्हतीच ! आणि
म्हणून सहा नव्हते वाजले तरी उजेडाने तमसाला चांगलेच पिदाडून लावले होते . कोवळ्या
रूपाने अवतीर्ण होणारी ती हरिततृणे , कॉंग्रेसच्या तृणाचे ते हिरवे कोवळेपण ,
आघाडा , चीलाचं गवत , कुरमुडी , हरळ , चिकटा , टाकळा सगळ्यांची एकमेकांवर कुरघोडी
करण्याची स्पर्धाच जणू लागली होती . टाकळा मात्र साऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत
सर्वत्र माजला होता . कॉंग्रेसच्या गवताची कुरघोडी मोडीत काढायला तो चांगलाच तयार
झाला होता . कॉंग्रेसच्या गवताची गम्मत आजीने मागे एकदा सांगितली होती . हे
विलायती गवत इतके कसे माजते आणि हा हा म्हणता मोठे कसे होते हेच कळत नाही .
मागच्या वेळी आप्पांनी सारा बांध पेटवून दिला तरी राख आहे तोवरच ते पुन्हा उगवून
आले . आजी म्हणते , “ती जातच इलायती , माजुरी ..विंग्रजांनीच आणली ती , इलायती गहू
आला ..स्वस्तात आला मग काय मायबाप सरकारला हे ....दुवा, पर जशी मानसं सुधरीवली आणि
त्यांच्यावर राज्य केलं या गोऱ्या साहेबांनी तसं बघा गहू दिला पर हे माजुरड तण बी
दिलं बघा ..आसं माजी आई सांगायची..” तसे आजीला पण थोडेफार गोरे शिपाई आठवतात ,,पण
त्या तिच्या बालपणीच्या आठवणी .
पूर्वी कधीच्या अस्तित्वाच्या खुणा सांगत
असलेल्या गुर्हाळाच्या विहिरीपर्यंत स्वप्ना आली पण अजून त्या कोवळ्या गवताचे
कौतुक तिच्या मनाला बिलगून होतेच . विहिरीचा हौद थोड्या उंचावर असल्याने घरापासूनच
तो दिसे , गुर्हाळ एका बाजूला मोडक्या छपराच्या खाली आधन ओतायचा हौद , पुढे मोठे
चुल्वान , एका बाजूला डोक्याच्या वर जाईल अशी चिमणी वरच्या बाजूची काळवंडली काठ
घेऊन उभी होती . बाहेरच्या बाजूने चिमणीच्या विटा आणि मातीचे पोपडे ढासळले होते .
चिमणीच्या विरुध्द बाजूला असलेला चोथरीचा ढीग काळपटला होता , तसे आत उकरले तर
अजूनही पांढरीतक चोथरी निघत असे . पूर्णपणे उखानलेला ओटा किती आत्मीयतेने स्वप्ना
आणि कावेरीच्या मदतीने आईने सारवला होता . आजोबांच्या काळात गुऱ्हाळ बारा महिने
चालू राही पण आता स्वप्नाच्या जन्माच्या वेळेपासून फक्त हिवाळ्याचे चार महिने
खिर्चलाचा पट्टा चालू होई . ते चार महिने मानाने मिरवणारी भली दांडगी कढई ..एक हौद
भरून रस त्यात मावायचा , हात्या , बादल्या , फावडा , झार्या , हागरं टाकायचं बारीक
पत्र्याचं हौद ..सारं सारं चोथरीच्या खाली लपायचं . तिथून जाताना स्वप्नाच्या
नाकात गुळाचा तो गोड वास शिरला आणि कढई उतरते आहे असा आवाज तिच्या कानात घुमू
लागला , ‘धरली का ? सावध , कुंडली गवरदे हरी विठ्ठल , माउली श्री ज्ञानदेव
तुकाराम.....पंढरीनाथ महाराज कि जय !’ या जयघोषाबरोबर इंजिनाच्या जवळचा लिंब
थरथरल्याचा भास तिला झाला आणि विहिरीच्या कडेने ती पाटातचालू लागली . आता दोन चिंच
, मेहंदीचे आत्याने लावलेले झुडूप , जांभळ आणि कवठ पार केली . पाटात जरी पाणी
नव्हते खेळले तरी चिखल पायाला लागत होता , काळ संध्याकाळी झालेल्या पावसाचा तो
प्रसाद होता . उंच गेलेल्या पिंपळाच्या खाली छोटे खुरुटले मोगऱ्याचे तेच झुडूप
तिला उठल्यापासून साद घालीत होते .शुभ्र गोदडी पांघरून जणू ते झुडूप अजूनही
निद्रेच्या आधीनच आहे असाच भास झाला तिला ..तीही असेच आप्पांच्या सफेद जुनेर
धोतरापासून आजीने केलेली ती शुभ्र मऊ गोदडी बाजूला सारून आली होती . तिने लगबगीने
फुले तोडायला सुरुवात केली . ओढणीत एक झोळी केली आणि त्यात तिची मोगऱ्याची सुगंधी
रास विसावू लागली , जणू तीही तिची वाटच पहात होती .काल संध्याकाळी मळ्यात जाताना
तिने एकमेकींच्या गळ्यात गळे घालून बसलेल्या त्या पाकळ्या कळी म्हणून मिरवताना पाहिल्या
होत्या . त्याच पाकळ्या रात्रभर एकमेकींच्यातून उसवून एक सुंदर टपोरं , सुगंधित
मोगऱ्याचं फुल झाल्या होत्या . उसवाताना किती वेदना झाल्या असतील न त्यांना ? पण
हे फुललेलं त्याचं रूप कष्टातून , वेदनेतून साकारलेलं अद्वितीय रूप आहे ! हे
दवबिंदू अशा असंख्य अक्रोशांचे तर अश्रू नसतील ?पण आक्रोशाने इतके विलोभनीय सौंदर्य
निर्मित होत असेल तर तोही सृजनाचाच आक्रोश नाही का ? रात्रीतून या तारकांच्या शुभ्रराशी
या छोट्याशा झुडुपावर अवतीर्ण इतक्या सहजतेने थोड्याच होतील ? त्या उत्तेजनकारक विचाराने
अन सुवासाने ती क्षणभर दिग्मूढ झाली , एक सुगंधित लहर तिला रोमरोमात फुलवून गेली ..काही
आठव मन:पटलावर उमटले आणि स्वप्नाच्या पावलांनी लज्जित नजरेने परतीचा मार्ग धरला .
स्वतःला आवरत ..सावरत ती चालत होती . या मेहंदीने तर नसेल माझे मन ओळखले या
विचारांनीच ती अर्धमेली झाली आणि त्या आठवांना बाजूला करण्याच्या प्रयत्नात घाईने
पळूच लागली !
“स्वप्नाताई , किती
गं चांगली आहेस माझी ताई ..उम्म्ह्ह...”म्हणत कावेरीने तिच्या हातातला एक गजरा
काढून घेतला आणि तिला वेळावत निघून पण गेली .
“खरोखरची काऊ आहेस
तू , आयितखाऊ काऊ ..” स्वप्नाने तिच्यासाठीही गजरा बनवला होताच , तशी ती रोज बनवे
देखील पण कावेरी तिच्या लांबलचक , दाट गजर्यासाठीच हव्यास धरे आणि चलाखी करून तोच
गजरा पदरात पाडून पण घेई . थोडावेळ स्वप्ना चरफडे पण थोडाच वेळ मग काऊच्या केंसात हेलकावणारा
तोच गजरा पाहून तिचेही मन प्रसन्न होई ! लहान भावंडासाठी ताई हीही एक आईच तर असते !
आज साऊ , रूपाताई , विनिता साऱ्या लवकर
रस्त्याला लागल्या . कावेरी पण जाऊन त्यांना मिसळली . स्वप्ना मात्र थोडी मागे
राहिली . ही घरून निघेपर्यंत बाकीच्या मुलींनी ओढा गाठला होता . खरे तर रोज
स्वप्ना उशीर करेच आणि धावत जाऊन त्यांना सामील होई , पण आज तिच्या मनाने पावलांशी
आणि उत्साहासोबत काडीमोड घेतली होती जणू . पुढे जाणाऱ्या बहिणी दिसत होत्या पण
त्यांना जाऊन गाठण्याची उमेद मात्र मनात उमटत नव्हती . वस्तीपासून मोरवाडी फाटा
अर्धा किलोमीटरवर होता . जरी तो राज्यमार्ग होता आणि त्याच रस्त्याने एस टी येई पण
ती काही मधे अधे थांबत नसे . गावातून सुटली कि फाट्यावर तेही गर्दी नसेल तर !
म्हणून या मुलींना लवकर जाऊन बराच वेळ फाट्यावर थांबावे लागे . आधी सापडेल त्या
वाहनाने जात साऱ्या पोरी पण एक वर्षापासून एस टी ने मुलींसाठी पास फुकट केला होता .
एखादी छोटी योजना ग्रामीण स्रीसाठी शिक्षणाची कवाडे खुली करू शकते याची प्रचीती या
योजनेने वर्षभरातच दिली होती . कारण ज्या गावातल्या मुली स्वप्नाच्या वर्गातल्या,
खर्चामुळे पुढचे शिक्षण बंद करणार होत्या त्या साऱ्या आता शाळेत येत होत्या . कारण
फी माफ आणि आता जाण्यायेण्यासाठी लागणारा खर्चही पास फ्री झाल्याने कमी झाला होता .
स्वप्नाच्या बहिणी आता मागे वळून पाहत होत्या ,
पिंपळ आला लिमकर वस्तीचा तरी अजून ती ओढ्यापर्यंत पण आली नव्हती . कावेरीला वाटले
उगीच ताईचा गजरा घेतला , कदाचित म्हणून तर ती रागावली नसेल ना ? पण स्वप्ना आज
वेगळ्याच विचारांत होती ! आता ती आणि साऊ अकरावीला गेल्या होत्या . कॉलेज आणि
भोवतीचे ते बदललेले वातावरण , त्यात सामावून जाने किती कष्टप्रद असते . आधीच्या
कन्याशाळेजवळच होते जुनिअर कॉलेज , पण तरी आता शिक्षक , सहअध्यायी सारेच बदलले होतेच
त्यात बर्याच मुली आधीच्या मैत्रिणी असल्या तरी बऱ्याच नवीनसुद्धा होत्या .
आजूबाजूच्या गावांहून आलेले बरेच नवीन विद्यार्थी पण होते ,आणि त्यात भरीस भर
मुलेही आता त्यांची सहअध्यायी होती ! एक वेगळाच नवखेपणा सर्वत्र भरला होता . तो
हवासाच वाटत होता सर्वांनाच , कुणी निडरपणे कबूल करे तर कुणी मैत्रीण ते लपवून
शहाजूकपणाचा आव आणे ..स्वप्ना बहुतेक दुसऱ्या गटात मोडत होती . पण शहाजूकपण नव्हते
तिच्या वागण्यात तर एक भीती होती ..एक अनामिक भीती जी तिच्या सभोवतालच्या
वातावरणाने मनात पेरली होती !
ओढ्याजवळच्या गिरिणीच्या आवाजाने ती भानावर
आली , अवतीभोवती पाहत अंग चोरून घेत उगीच बावरली ..काय पण विचार करते मी ! म्हणत
अंगभर पसरलेला रोमांच लपविण्याचा खुळा प्रयत्न ती करीत राहिली . बरं झालं साऊ आणि
बाकीच्या नाहीत इथे ...पण आई म्हणते मुलीचे शील काचेचे भांडे ! एकदा तडकले तरी
पुन्हा नाही वापरता येत ..का ? मुलाचे असे का नसेल ? विक्रमदादाने तर किती दिवस
त्या संगीला फिरवले आणि आता सुंदर अशी विभावहिनी त्याला मिळाली ! मग कुठे काय
नुकसान झाले त्याचे ? जाऊ दे , नकोच हे विचार पण ..आपल्याला शिकायला पाहिजे, मोठे
व्हायला पाहिजे ..किती मोठे नाव होते शिकून ! आपली ओळख सारा समाज मनात ठेवतो आणि
स्वतःची कमाई वरून म्हणजे सारखे कुणावर अवलंबून नकोच राहायला . बाबा पण नाही का
म्हणायचे , पोरींनो पोहायला शिका ..जरी एखादीच्या नशिबाने वाईट नवरा मिळाला , दिले
ढकलून विहिरीत तरी जीव जगवता यायला हवा ..असेही जरी नाही मारले तरी स्वतःची
उपजीविका करून तरी स्वतःचा जीव जगवायला हवाच ना ? नाहीतर जावे लागेल रानात खुरपे
घेऊन , आईसारखे आणि काकीसारखे !
इतकावेळ तरुण्यासुलभ भावनांनी ओतप्रोत
स्वप्नाचे हृदय , शिक्षण आणि आईजवळ थांबले आणि पावलांचा वेग वाढला . स्वतःच्या
विचारांना दुषणे देत ती झपझप चालत मुलींच्या घोळक्यात मिसळली पण मनाने अलिप्तच
राहिली . फाट्यावर एक भला मोठा पिंपळ अनेक वर्षांपासून तटस्थ उभा होता . एका
तिकोनावर उभा तो वृद्ध वृक्ष सहजतेने दोन माणसे सामावतील असा बुंधा असलेला त्या
परिसरातील एकमेव वृक्ष होता . पिंपळपान पहायचे असेल तर आभाळाकडेच नजर फिरवावी लागे
. निळ्याभोर पृष्ठावर ती विलोभनीय पोपटी पाने पाहणाऱ्याच्या डोळ्यांना शीतल सौख्य
प्रदान करीत असत , वर्षानुवर्षे ! त्याची वाऱ्याच्या झोताने पडलेली पाने या साऱ्या
शाळकरी मुलींच्या कौतुकाचा विषय बनत ..अशा कितीतरी पानांची जाळीदार पाने या
विद्यार्थ्यांच्या पुस्तकातून तयार होत असत . कालौघात ती हरवून जात आणि पुन्हा
नव्याने या मुलांच्या पुस्तकाचा आधार घेत तयार होत . थोडे पांढरट तपकिरी बुंधा दोन
माणसांच्या पण कवळीत बसणार नाही इतका मोठा होता , त्याची पोपडा होऊन निघणारे
सालीचे तुकडे काढले कि आत लोण्याला लाजवील असा बुंधा दिसे ..मऊ मऊ बुंधा , त्यावर
बोटे फिरवताना मोरपंखाचा भास होई ! थोडे वर गेले बुंधा दोन फांद्यात विभागला गेला
होता आणि तो इंग्रजी वाय चा आभास देई , त्याच्या लागुनच एक खोबण होती , जणू
त्यातला डोळा काढून नेलाय कुणी ! त्या वृक्षाबद्दल अनेक दंतकथा त्या परिसरात
ऐकायला मिळत आणि त्यात एक अशी होती कि , एक नाग नागिणीचे कुटुंब त्याच्या वरच्या खोबणीत,
वर्षानुवर्षे आहे . त्याला कुणी डिवचले तर तो माणूस मरे ! स्वप्नाला ते आठवले त्या
अश्वत्थ वृक्षाकडे पाहताना आणि तिच्या नखशिखांत थरार जाणवला तिला . ती आणि तिच्या
या बहिणी कधीच त्याच्या सावलीला उभ्या राहत नसत . तिथेच शेजारी दहा पावलांवर एक
कडूलिंबाचे , पिंपळाइतके मोठे नाही पण भरगच्च सावली देणारे ते झाड यांना जास्त प्रिय
होते . तिथेच दगड मांडून त्या बसत लाल पिवळ्या एस टी ची वाट पाहत . परीक्षेच्या
काळात तर पुस्तक वाचून जमिनीवर त्याची उजळणी करायला याच्या त्या नाजूक काड्यांचा
बराच उपयोग होई , कारण तासभर तरी एस टी ची वाट या मुलींना रोज पहावी लागेच . कधी
त्याच्या जखमातून निघणारा डिंक या पोरी कण कण साठवून ठेवत . स्वप्ना मात्र असं
डिंक तिच्या नजरेला पडले कि लगेच तोंडात टाके . त्याची ती कडवट चव तिला भारी प्रिय
होती , त्याचे दाट चिकटवून ठेवणे आणि प्रयासाने त्यांचे विलग होणे , हा खेळ
साऱ्याच मुलांचा प्रिय खेळ पण स्वप्नाला त्याची चवच भारी वाटे . असं डिंक दिसले कि
तिचे डोळेच चकाकत ! आज मुलींच्या कुठल्याच संभाषणात ती मनाने नव्हतीच . तेव्हढ्यास
तेव्हढे उत्तर देऊन ती तिच्याच मनोभूमीत पुन्हा पुन्हा जात होती .
“ताई , गजरा घेतला
म्हणून रागावलीस का गं ? तसं असेल तर नको तुझा गजरा मला ..” कावेरी नाटकी रुस्क्या
स्वरात बोलली . तशा साऱ्या पोरी हसू लागल्या . स्वप्ना फक्त तिच्या केसांवरून हात
फिरवत हसली .
विचारांत तल्लीन स्वप्ना आज जास्तच मोहक दिसत
होती . तो ड्रेसचा फिकट गुलाबी रंग तिला तिला खुलवत तर होताच पण लांब बाह्यांचा
ब्लाउज आणि झिरमिळ्यांची ती कॉलर तिला जास्त मोहक करीत होती,भरीस भर म्हणून ती
काही आठवून मनाशीच मधाळ हसत होती ..लाजेचे ते इंद्रधनू पाहून साऊ तिला म्हणालीही
पण तिने लज्जित हास्याने तिच्याकडे पाहिले . साऊला मग अधिकच चेव आला आणि ती तिला
छेडू लागली . इतक्यात ओढ्याच्या वर चढलेले ते एस टी चे लाल पिवळे धडधडणारे धड पाहून
रूपाताईने साऱ्यांना इशारा केला आणि साऱ्या पोरी रस्त्याच्या बाजूला येऊन उभ्या
राहिल्या . मोरवाडीच्या पोरापोरींचा गलकापण त्यात विलीन झाला . कुणीतरी एक उगीच
स्वप्नाला खेटून वर चढला तशी स्वप्ना थरथरली आणि मागे झाली , रूपाताईच्या मागे अंग
चोरून उभी राहिली आणि भेदरल्या नजरेने दाराकडे पाहू लागली . तसं ते पोरगं जास्तच
चेकाळलं आणि दाट विचकावत तिच्याकडे पाहू लागलं ..त्याच्या तोंडातून कसलीतरी
घाणेरडी लाळ गळतेय असेच वाटले स्वप्नाला जरावेळ ...मग तिने नजर फिरवली आणि रूपाताईला
हलक्या आवाजात तक्रार करू लागली .
“स्वप्ना आपणच नाही पाहिले
कोण पाहतेय तर थोडीच दिसणार आपल्याला असले किळसवाणे लोक ..तू नको बघूस ..असेही हत्तीने
श्वानाचे भुंकणे नजरेआड करावे नेहमी !” रूपाताईच्या या समंजस समजावण्याने स्वप्नाच्या
मनातील वादळ पळभरात शमले .आणि त्या गर्दीत ती एस टी त चढली , रूपाताईच्या मागोमाग !
सकाळच्या गाडीला बसायला जागा मिळणे अशक्यप्रायच
असे ,फक्त आत शिरायला मिळाले तरी धन्यता वाटे साऱ्यांनाच , कारण हा तालुक्याला
जाताना शेवटचा थांबा ..बऱ्याचदा या मुलींना ओळखीचे ड्रायव्हरकाका असतील तर पुढच्या
केबीनमध्ये बसायला जागा देत . स्वप्ना पाठीची ब्याग सावरीत आणि हातातले जरनल घट्ट
पकडून एका हाताने शीटचा आधार घेत उभी होती तिच्याच बहिणी तिच्या आजूबाजूला होत्या .
ती उभी असलेल्या शीटवर मात्र मुलेच बसली होती . या मुलींची अशी अवघडलेली अवस्था
पाहून एकालाही वाटले नाही उभे राहून जागा द्यावी म्हणून ..आणि चुकून कधी असा
अनोळखी तरुण पोरगा जागा देऊ लागला तरी रूपाताईचा स्पष्ट मेसेज होता कि बसायचे नाही
! तसं रूपाताईचे सांगणे या साऱ्याजणी ऐकायच्याच ! तसे पाहता या पुढेमागे , वरखाली
उडणाऱ्या डब्यात स्वतःचे तटस्थ अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून धरणे अशक्यच होते , मग
कुणाचा कुणाला धक्का लागणे ठरलेले असे . तेंव्हा होणारी नजरानजर अपरिहार्य होती .
अशा अनेक कडू आंबट ..गोड नाहीच ..प्रसंगाच्या प्रवासातून सुटका व्हायला दहा मिनिट
तरी ठरलेले होते . एसटी च्या त्या दोन हाताच्या दारातून बाहेर पडणे म्हणजे एक
दिव्यच असे , भराभर एकमेकांना घाईने किंवा मुद्दामहून एकमेकांना धक्का देत बाहेर पडणारे
ते विद्यार्थी कोंडवाड्यातल्या मेंढरांसारखे बाहेर पडत . कधी एकमेकांना ढकलत तर
कधी अलगद तरंगत बाहेरचे मोकळे आकाश प्राप्त होई !
गर्दीतून बाहेर पडताना मात्र साऱ्या सख्या अलग
होत आणि साऱ्या खाली येईपर्यंत आलेल्या त्यांची वाट पाहत बाजूला थांबत . स्वप्ना
आज आधी उतरली , मघाशी लगट करणारं ते पोरगं जवळून काहीतरी बोलत जातंय असं वाटलं
तिला पण तिने अजिबात त्याकडे दुर्लक्ष केले आणि खरोखर रूपाताईचा फोर्मुला काम करून
गेला . खरंच किती सोपे असते एखाद्या ओंगळवाण्या कृतीला मात देणे ....प्रतिक्रिया न
देऊनच समोरच्याची हार निश्चित करतो आपणच ! भरभर साऊ ,रूपाताई ,कावेरी आणि विनिता
तिच्याभोवती गोळा झाल्या . थांब्यापासून कॉलेजचे पायी अंतर पाच मिनिटाचे , त्यात
बाकीच्या गावांच्या एसटी आल्या असल्या कि त्याही मैत्रिणी सामील होत चालताना ...कावेरी
आज स्वप्नाच्या सोबत चालत होती .
“ताई , ती पाण्याची
टाकी किती गं उंच आहे , मला तर बाई भीतीच वाटते तिची ..वरून सारं गाव दिसत असेल
नाही ..पण वर गेल्यावर भीती पण किती वाटत असेल गं ..” कावेरी रोज सभोवती नजर फिरवत
चाले आणि सारा वृतांत कथन करीत पाऊल टाकत राही ..आज कशी कुणास ठाऊक ती पाण्याची
टाकी मान वर करून पाहत होती .
“काऊ , अगं एक वर्ष
झालं , त्या टाकीवरून एका प्रेमीयुगुलाने उडी मारून जीव दिला होता ..आहे ना
ध्यानात ?” विनिता तिला आठवण करून देऊ लागली .
“हो गं , कसं
त्यांना हे जीवन संपवावं असं वाटलं असेल गं ...नुकताच पालवलेला शेंडा असा हाताने
खुडणे , कसे गं जमत असेल यांना ?” कावेरीचा कातर आवाज तिच्या काळजात चिरत शिरतोय
असेच वाटले स्वप्नाला ..
“काऊ पुरे आता ,
बाकीचा अंक घरी गेल्यावर वाच ..” रूपाताईने इकडे तिकडे पाहत साऱ्यांनाच दटावले ..भरभर
त्यांची पावले कॉलेजच्या दिशेने पडू लागली .
जवळच्या मुली आधी येऊन मागची बेंच पकडत बसायला
. उशिरा येणाऱ्यांना नाईलाजाने पुढच्या बेंचवर बसावे लागे आणि साऊ आणि स्वप्नाला
तर रोजच उशीर होई ..एसटीच्या दिरंगाईमुळे ! आज स्वप्नाला नाईलाजाने पहिल्या बेंचवर
कडेच्या बाजूला बसावे लागले . तिथे बसने कुठल्याच मुलीला आवडत नसे ..एक तर
प्रत्येक शिक्षक तिथेच बघून शिकवत आणि जराही नजर इकडे तिकडे फिरवणे अशक्य होई ..आणि
त्यात कहर असा कि शेजारी लागुनच मुलांची रांग असे ! आज पहिलाच तास लिहून देणाऱ्या
सरांचा , बसायला आवराआवरी करेपर्यंतच सर हजर झाले आणि स्वप्नाची एकच धांदल उडाली . तिने घाईने वही काढून लिहायला
सुरुवात केली . कानात साठवत गेलेले शब्द लेखणीतून वहीवर उतरू लागले , काही शब्द
अलगदपणे हवेत विरूनही जाऊ लागले . तसे ती जास्तच कण देऊन ऐकू लागली . लेखणी
चपळतेने धावू लागली . या कर्ण आणि कराच्या स्पर्धेत तिचे पेन गळून खाली पडले ,
पदकमलांच्या आश्रयाला जाऊन ! ती ते पेन घ्यायला झुकली आणि ....ती नजर तिच्या आरपार
शिरतेय असाच आभास तिच्या सर्वांगाला झाला ...पळभरापूर्वी स्थिर असलेले तिचे मन एका
कटाक्षाने सैरभैर झाले . मघाशी सरांच्या शब्दांशी स्पर्धा करणारी लेखणी त्राण
संपलेल्या जिवासारखी धडपडू लागली ..आता अनेक शब्द हवेतच विरून जाऊ लागले . रूपाताईचे
बोलणे आठवले आणि तिच्या मनातील काहूर थोडे स्थिरावू लागले ..तिच्या मनाने त्या
अक्षांचा चेहरा पहायचे ठरवले आणि लिहिताना आपसूक नजर तिकडे फिरली ..ते डोळेही
तिलाच पाहत होते ..मघाच्या फाट्यावरच्या नजरेतले ते लाळघोटेपण नव्हतेच ते ..एक
वेगळीच सौम्यता होती तिच्यात ..मनाला भुलवणारी शीतलता ...कोवळ्या तृणाला हिरवाईने
दिलेली सौम्यता ... मोगऱ्याच्या गंधाने नासिकारंध्रातून शिरून मनाला मारलेल्या
मिठीतली शीतलता ...थंडगार झुळकेने क्षणात मलीन तनाला उत्तेजित करणारी ती शीतलता ! रूपाताई
ओंगळवाण्या कृतीला प्रतिक्रिया द्यायची नसते , पण मग या हव्याशा क्रियेला काय प्रतिक्रिया
द्यायची गं ? खरंच सांगशील तू कि फटकारशील मला दुषणे देवून ? या भावनेला लाजेच्या ,
भीतीच्या पांघरुणाखाली असेच झाकून ठेवायचे का ? हे विचार मात्र स्वप्नाने माशी
झटकावी असे झटकून टाकले !
दिवसाच्या अखेरपर्यंत तिचा त्या डोळ्यांचा
चेहरा मनात साठवायचा राहूनच गेला . नजरेत गुंतलेली नजर हटविण्यात तिचा क्षण संपत
राहिला आणि एक गोड हुरहूर तनमनाला घेरून भिरभिरत राहिली ..तिच्याच भोवती ! कॉलेज
सुटूनही तिची लागलेली तंद्री सुटत नव्हती . ती तशीच तिला घेऊन घरी आली , रोजचा दिनसमाप्तीला
अंग वेढून टाकणारा थकवा आज पंख लावून उडून गेला होता . येऊन खायचे पण भान नव्हते
तिला , तशीच थंडगार पाण्याचा शिडकावा चेहऱ्याला देऊन ती मोगऱ्याच्या कळ्या पाहायला
धावत सुटली . आजपर्यंत मिटलेल्या पाकळ्यांच्या त्या कळ्यांचं कसलच कौतुक तिला नव्हतं
, पण उमललेल्या या फुलाला आज कळीची ओढ लागली होती ..भूतकाळ उकरून आठवण्याची हौस
माणसालाच असते नाही ! विहिरीपर्यंत जाऊपर्यंत तिला चांगलाच दम लागला ..चिंच ,
जांभूळ , मेहंदी , कवठ आणि हा आला पिंपळ ...पिंपळाच्या बुंध्याला विसावलेलं ते
मोगऱ्याचं ..हे पहा झुडूप ..झुडूप ...झुडूप ...सकाळी तर इथंच होतं ? ? ?
“आई , ते ते झुडूप ..मोगरा
..” तिचा कातर आवाज आणि डोळ्यात गोठलेला बर्फ पाहायला कुणालाच वेळ नव्हता .
“काय बोलतेय स्वप्ना
..काय झालं तुला ..थांब जरा वेळाने बोलू . ती काकी तिथे रडून रडून दमली , काही
खाल्लं नाही सकाळपासून , जा पाणी घेऊन जा . बरं झालं बाई ताईसाहेब आल्या नाहीतर
तिला बघू का काम बघू हेच कळल नसतं बघ मला ..” आईच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध होत
नव्हता तिला . हातात दिलेला तांब्या तिने काकीच्या खोलीत नेवून ठेवला ..तसे हुस्मरणारे
काकीचे शब्द तिच्या कानावर पडले , काकी आत्याच्या गळ्यात पडून रडून रडून सांगत
होती .
“ताईसाहेब माझ्या
बहिणीची एकुलती एक पोर होती हो ती , आपल्या स्वप्नाच्या तर वयाची ..कशी हो गेली ..त्या
रांडामेल्यांचा कसा जीव झाला असेल तिला मारायचा ..सख्खा बाप लेकराच्या जीवावर उठला
हो ..ताई आरडत होती बाहेरून पण कुणी कुणी नाही ऐकलं ..कवळी कळी उमलायच्या आधीच चिरडून
टाकली या भुतांनी ..ताईसाहेब ..”
स्वप्नाच्या
डोळ्यावरची तंद्री खाडकन उघडली ..उत्कर्षाला काकांनी मारली , जीवे मारली ..का ?
त्यांचा तर किती जीव होता ..तिने सांगावे आणि त्यांनी द्यावे ..मला कावेरीला
तिच्यासारखी एक पण वस्तू , कपडे मिळत नसत . शाळेत हुशार म्हणून होस्टेलला ठेवली
होती ...मग काय झालं असेल ?
“ताई ,इकडे ये ना ..”म्हणून
कावेरीने तिला ओढतच मागच्या अंगणात नेले . तिचा तो खुसफुस आवाज तिला उमजत नव्हता .
ती कान देऊन ऐकण्याचा अट्टहास करीत होती पण तो काही स्वप्नाच्या मेंदूला भिडत
नव्हता . ..त्यांना असे मागे जाताना पाहून आप्पांनी हाक दिली .
“ताई , काऊ अंधार
झालाय आता थांबा , पोरीच्या जातीने दिवस मावळला कि घरात बसावं ..” तशा दोघी आत
आल्या आणि आईला मदत करू लागल्या .
“वहिनी , कसा हो जीव
धजला असेल त्यांचा ..घरात लेकराचा जीव घ्यायला ..” आत्या भाकरी करणाऱ्या आईला
विचारात होती . आईने पोरींकडे नजर टाकत आत्याला गप्प केले .
“जा पोरींनो ,
अभ्यास करा ..भाकरी झाल्या कि बोलावीन जेवायला ..” आईने जवळजवळ ढकलूनच लावले
कावेरीला . तशी धुसफुसत ती त्यांच्या खोलीत आली , स्वप्ना आधीच आली होती . दोघींनी
डोळ्यापुढे पुस्तके धरली पण मन त्यात रमत नव्हते ..स्वप्नाच्या मनात विचारांची
शृंखलाच तयार होत होती . उखडलेला मोगरा ...मेलेली उत्कर्षा ...
“ताई , तुला माहितय का
? अगं उत्कर्षा एका महाराच्या पोरासोबत पळून गेली होती ..आठ दिवसांनी पुण्याला एका
झोपडपट्टीत सापडली दोघं ..त्याला मरोस्तोवर मारला आणि हिला उचलून आणली घरी ..काल
रात्री काकांनी आणि आजीने गळा आवळून मारली तिला .” कावेरीने तिला कळलेली माहितीत
स्वप्नाला पुरवली . विस्मयाने स्वप्ना काहीवेळ तिच्याकडेच पाहत राहिली ..
“तुला कुणी सांगितले
? काहीपण वावड्या नको उडवू ..” डोळ्यांनी दटावत ती कावेरीला बोलली खरी पण तिच्याही
मनाला उत्कर्षाचे जाने काही केल्या पटत नव्हते ..काही विचीत्राचा वास तिला कधीचा
घरभर पसरलेला जाणवत होताच ..
इतक्यात आईची हाक
आली आणि दोघी जेवायला गेल्या ..घश्यात घुटमळत असलेला घास प्रत्येकजण बळेच घशाखाली
उतरवत होता . काकीचे हुस्मरने अजूनही चालूच होते ..तसे आप्पा कडाडले .
“पुरे आता , कुळबुडव्यांना
अशीच शिक्षा असते ..खानदानी मराठ्याने केले असते तेच साडूने केले .त्याच्या जागी
मी पण तेच केलं असतं . म्हणून आता बास झालं रडणं , तुम्ही जगा बाकीच्यांना पण जगू
द्या ...जेवा आता ..विखारी वेळ मुळासकट उपटायची असती ..” आप्पांनी घास तोंडात
घातला . काकीचे हुस्मरने पळभरात शांत झाले . मघापासून फडफडणारा देव्हाऱ्यातला दिवा
दार लोटून घेताच मंद जळत रहावा , तशीच भासली काकी स्वप्नाला !
विचारांच्या एकमेकीत गुंतलेल्या कड्या उराशी
घेवून स्वप्नाला झोपेचा थांग लागत नव्हता . कावेरी मात्र कधीच निद्रिस्त झाली होती
..बर्याच कालाने तिची नजर अंधाराच्या आधीन झाली .
मोगऱ्याची कळी ...उखडलेलं मोगऱ्याचं झुडूप ....रडणारी
काकी ...मोगऱ्याचं फुल ...ते शीतल डोळे ...मराठा ...कुळबुडवी उत्कर्षा ...मेलेली उत्कर्षा
........
घामाघूम झालेली
स्वप्ना ताडकन उठून बसली ..पांढरी शुभ्र गोदडी तिने बाजूला केली . आणि हलकेच
ओढणीने घाम पुसत ती उठून उभी राहिली . पांघरुणाची घडी करून तिने पायथ्याला ठेवली .
कावेरी अजून झोपलेली होती ..मुखमार्जन न करताच ती मळ्याच्या वाटेकडे धावली .. ओटा
ओलांडायच्या आधीच आईने हाक मारली ..
“स्वप्ना , नको जाऊ .कालच
मोगरा उपटून काढला आप्पांनी ..रानात अडचण करतो म्हणून !” तशी स्वप्ना पाणावल्या
डोळ्यांनी आईकडे बघू लागली . आईचे पण डोळे पाणावले ...
ती एकटक मळ्याकडे
पहात राहिली ..नकोच तो डोळ्यांचा चेहरा बघायला ...त्याची जात वेगळी असली तर ?
डॉ संध्या राम शेलार .
5 comments:
Mast!
खूप छान
अप्रतिम
सर्वांचे आभार
Post a Comment