या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 17 October 2011

पत्रास कारण कि

                                                  //श्री//                             

१७/१०/२०११                                                                                          सौ गीतांजली शेलार 
सोमवार                                                                                                                सांजवेळ 


                                     आदरनीय,
                                                 माझ्या बाळाचे गुरुजन ,
                                                       स. न .वि .वि . पत्रास कारण कि ,
माझ्या हृदयातील ज्या लहरींच्या प्रेरणेने हृदयाची हालचाल चालू आहे त्या लहरींचा निर्माता, माझ्या संधीकाली असणाऱ्या आयुष्याचा आधार, माझ्या मनाचा आनंद असणारा माझा बाळ मी त्याच्या पुढील जडणघडणी करता तुमच्याकडे सोपवताना माझ्या मनातील माझ्या स्वप्नांची, माझ्या अपेक्षांची जी काही यादी म्हणा हव तर ती मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणून तुमच्या अमूल्य अशा वेळेतील काही मिनिटे माझा हा पत्रप्रपंच वाचण्यासाठी द्यावा हि नम्र विनंती!
       माझ्या मनातील या ताऱ्याला, माझ्या आयुष्यातील स्वप्नांच्या या वेलीला आकाशाला गवसणी घालायची कला शिकवा !ज्यामुळे तो फक्त माझ्याच मनातील तारा न राहता समाज्यातील दीनदुबळ्या प्रत्येक घटकाच्या मनातील स्वप्नांचा वेलु बनेल ! त्याला बाराखडी शिकवताना क -कमळाचा ख -खगाचा आणि ग -गवताचा नक्की शिकवा,हे शिकवताना त्याला हा निसर्गच आपला निर्माता आहे याची अवहेलना करताना तुला तेवढच दु:ख होऊ दे जेव्हड तुला तुझ्या आई बाबाची अवहेलना होताना होईल हेही नक्की   शिकवा! फुलपाखरू जसं लहान मोठ्या प्रत्येक फुलातील मधुरस प्राशन करून आपल्या पंखांवर अनेक रंग घेऊन जशी आनंदाने बागडतात तसं प्रत्येक क्षणातील लहान मोठं सुख जगायचं कसं हे शिकवा म्हणजे त्याच आयुष्य फुलपाखराच्या पंखान्प्रमाणे विविधरंगी होईल ! 
        खळखळ वाहणारा निर्झर जसं त्याच्या शुद्ध पाण्याने काठावरील प्रत्येक सान थोराची तहान भागवण्यात धन्यता मानतो तसं यालाही प्रत्येक अबालवृद्धाची काठी होऊन सेवेच्या आणि प्रेमाच्या निर्मळ जलाने त्यांची तृषा शांत करताना निरपेक्ष भावना उरी कशी जपावी हे शिकवा ! नदी जसं डोंगराच्या कड्यावरून कोसळल्यानंतरहि तिचा प्रवाह अखंड चालू ठेवते आणि स्वताची वेदना उरी साठवून भोवताल हिरवाईच्या नवचैतन्याने नटवून पुढे चालत राहते तसं त्यालाही सांगा निराशेच्या गर्तेत गेल्यावरही स्वताच्या वेदनेच भांडवल न करता जवळच्या गरीबांच जीवन सुखाच्या हिरवळीने व्यापून टाक, स्वताचा प्रवास न थांबवता ! 
        पाखरू जसं दिवसभर चाऱ्यासाठी हिंडून सायंकाळी घरट्याकडे झेपावते तसं तुही संपूर्ण जगातील ज्ञान मिळवण्याच्या नादात स्व:तच्या  मूळ घरट्यात परतायचं असतं हे कधी विसरू नकोस! आणि तुझी ज्ञानार्जनाची भूक भागविण्यासाठी काही क्षणांसाठी दूर जाताना भांबावून जाऊ नये हेही शिकवा माझ्या पिलाला! डोंगर जसं वाऱ्यावादळात जराही विचलित न होता भक्कम राहतो तसं तुही या समाजाने निर्माण केलेल्या चक्रीवादळात हरवून न जाता बरोबरच्या आणखी चार जणांना घेऊन कसं तटस्थ रहायचं हेही नक्की शिकवा ! 
         त्याला हे सांगा कि फणसा नारळाप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनात असतो  एक हळवा गोडवा जो मिळवायचा असतो न थकता त्याचे काटे काढून व कडक करवंटी फोडून ! थकु नकोस हे करताना कारण कष्ट करून जी गोष्ट मिळवशील ती तुला फक्त सुख नाही देणार तर आत्मसुख देणार आहे ! कितीही छोटा जीव असलास तू, तरी तुझ्यासारख्यांना  एकत्र घेऊन कितीही मोठं कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असते आपल्यात! हे पटवून देताना मुंग्यांच्या एकीने कसं भलमोठ वारूळ तयार होत हेही दाखवा त्याला!
          त्याला शिकवा कितीही मोठा तरु बनलास समाजाच्या, दृष्टीने तरी वेलींनाअंगाखांद्यावर घेऊन त्यांनाही आकाशाजवळ नेऊन सोड त्या अशोकवृक्षाप्रमाणे !आणि त्याचवेळी तुझी मूळहि घट्ट कर जमिनीत त्या वटवृक्षाप्रमाणे!  त्याला शिकवा शोधायचं असत या निसर्गाच्या कुशीत लपलेल सत्य, जे आपल जीवन संमृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करेल ! त्याला हेही सांगा आपला निर्माता असणाऱ्या निसर्गाने बनविली आहे प्रत्येक गोष्ट माणसाच्या भल्यासाठी फक्त कसं ते आपण ओळखायच असत ! 
          माजलेल्या भल्यामोठ्या हत्तीला जसं छोटी मुंगी काबू करू शकते तसं तू कितीही लहान असलास तरी तुझी सत्याची आणि प्रेमाची ताकत अगडबंब अशा संकटालाही वेसन घालू शकते हे त्याला समजावून सांगा! 
तुम्हाला मी माझा संगमरवरी दगड सुपूर्द केला आहे त्याला तुम्ही पायरीचा आकार दिलात तर मी समजेन माझा बाळ ज्ञानेश्वर बनला म्हणून नक्की तुम्हाला दुवा देईन! त्यातून तुम्ही कळस घडवला तर मी समजेन तुम्ही तुकाराम घडवला आणि तुम्हाला दुवा देईन ! आणि तुम्ही त्याची मूर्ती घडवली तर मी समजेन तुम्ही राम ,कृष्ण किंवा शिवाजी राजे घडवलेत आणि तुम्हाला दुवा देईन ! 

                                                                                              -तुमची कृपाभिलाषी 
                                                                                                      सौ गीतांजली शेलार.

                                                                                          
                     

Wednesday, 12 October 2011

माझी जगावेगळी प्रेमकहाणी !

     आज गजर होण्याच्या आधीच जाग आली. पहाटेचे साडे चार वाजले होते, उजाडायला अजून बराच वेळ होता म्हणून या कुशीवरून  त्या कुशीवर वळत होतो पण झोपेला काही माझ्या डोळ्यांचा पत्ता गवसत नव्हता! काळजी   मग ती येणाऱ्या सुखद क्षणाची असो अथवा लहान मोठ्या संकटाची, मनात तितक्याच ताकतीच काहूर निर्माण करायला पुरेशी असते. रात्री बापूंचा फोन आल्यापासून मनाची हर्षित अवस्था मित्रांपासून लपता लपत नव्हती, कशी लपेल मी कधीचा मनाशीच हसत होतो, जेवतानाही मन जेवणात नव्हतच! शेवटी न राहवून विलास म्हणालाच,''आम्हाला कळेल का या आनंदचे कारण?''
''अरे काही नाही उद्या बापू आणि दादा येणार आहेत दादाला मुलगी पाहायला आम्ही जाणार आहोत.''
'' तू असा काही वागतो आहेस कि मला वाटल तुलाच मुलगी पाहायची आहे!''
'' नाही रे, आमच्या चौघांच्या घरात हे नवीन माणूस म्हणजे थोडी उस्तुकता असणारच ना ? त्यात मला बहिण नाही, म्हणून रे बाकी काही नाही!''
       सगळ्यांच्या आधी उठून चहा, नाश्ता उरकून बसलो. बाल्कनीत येऊन बापू आणि दादाची वाट पाहत होतो. समोरच्या मोकळ्या मैदानात होस्टेलची मुलं क्रिकेट खेळत होती .
सुहास मला हाक मारत होता ''चल ना विकास''
''नको रे सुहास त्याची इस्री मोडेल कपड्यांची, आज वहिनी पाहायची आहे आम्हाला'' माझ्या आधी विलास उत्तरला. सगळे हसत निघून गेले . त्यांचा खेळ मी बाल्कनीतून बघत होतो..
''विकास ,ये विकास  आवरल का रे ''बापूंची हाक. मी वाकून बघितलं तर दोघेही आले होते मी धावत खाली गेलो दादाच्या मस्करीचा एकही चान्स मला सोडायचा नव्हता. गेल्या गेल्या दादाला मिठी मारली,''काय मग नवरदेव, चला लवकर वहिनी वाट पाहत असतील'' थोडसं हसून दादाने स्वताची सोडवणूक केली नि उत्तर न देता गाडीत जावून बसला. तो अबोल आहे पहिल्यापासून पण असं.....जाऊ दे न हा कदाचित लाजत असेल आणि आहे त्याचा स्वभाव नको त्या गोष्टीच ओझं मानगुटीवर घेऊन रडत बसण्याचा ... पण आज मात्र मी फुल मूडमध्ये होतो ... आज बापू नि आई कुणाच मी ऐकणार नव्हतो. माझी बडबड ऐकून बापू मनापासून दाद देत होते ...शेवटी त्यानीही हि वेळ आतुरतेने इच्छिली होतीच कि ...एक तास पूर्ण प्रवासात मी दादाची मस्करी करण्यात इतका दंग होतो कि त्याच्या काय भावना आहेत, काय स्वप्न आहेत हेही जाणून घ्यावं हे भान उरलं नाही. माणूस स्वानंदात इतका बुडून जातो कि समोरचं माणूस खरोखर आपल्या सुखात समाधानी आहे कि नाही याचा त्याला विचारही करावासा वाटत नाही मग तो तुमचा कुणीही असो...मी याला अपवाद कसा असेल!   
   आम्ही तिथे पोहचताच जंगी स्वागत झालं. हळूच दादाला कोपर मारला नि कुजबुजलो,''स्वागत जावईबापू!''
बैठकीची खोली नीटनेटकी सजवलेली, गर्भश्रीमंती प्रत्येक वस्तू पाहून लक्षात येत होती . चहापान झालं . मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला . मुलीचा भाऊ तिला घेऊन बैठकीत येत होता सर्वांच लक्ष्य तिकडे नि मी दादाला कोपरखळ्या मारण्यात गर्क! मुलगी समोर येऊन बसत होती तो मी तिला पाहिलं नि हातभर वर उडालो...जो चेहरा मी गेली दोन वर्ष मनाच्या कोंदणात ठेऊन पूजत होतो नि माझ्या वहीत फक्त तिच्याच सौंदर्याच्या वर्णनाने पानेच पाने भरली होती, जी माझ्या हृदयातील मंदिरात स्थानापन्न झालेली देवता होती, जिच्यासाठी मी सर्वकाही विसरून तासन तास तिच्या फक्त एका दर्शनासाठी कॉलेजच्या गेटमध्ये बसून असायचो ती माझी स्वप्नपरी,माझी प्रिया, माझी ह्रिदयचोर कोमल होती.... माझ्या मनाच्या या देवतेला या क्षुद्र जीवाबद्दल काहीच माहित नव्हत मी आपला एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेला एक प्रेमवीर होतो ज्याचं प्रेम त्याच्या मनाच्या नि वहीच्या बाहेर कधी आलच नव्हतं...पण आज असं काही समोर उभं राहील हे माझ्या कधी स्वप्नीही नव्हतं! रात्रीपासून हवेत उडणारा मी धाडकन जमिनीवर आदळलो होतो .... अशा ब्रह्मसंकटात सापडलो होतो कि ....अचानक आलेल्या वळीवाने बहरलेला गुलमोहर लुटून नेला .......................मी मात्र न वर्णिता येईल अशा संभ्रमात अडकलो होतो.............
    त्यानंतर काय झालं, मी कसा घरी आलो ,दादा काय बोलला हे आठवत नाही. मी एका अशा अवस्थेत होतो कि दुसऱ्या दिवशी जरासा भानावर आलो .तोपर्यंत हे काय झालं , दादाऐवजी दुसरा कुणी असता तर भांडून,विनंती करून कसही मी तिला मिळवलच असतं पण जर दादाने होकार दिला तर? का देईल तो नकार? इतकी सुंदर, सालस मुलगी तो नको म्हणणार नाही ,आणि ती जर वहिनी म्हणून घरात आली तर मी स्वतःला संभाळू शकेल का ? बर झालं मी कुणालाही माझी हि प्रेमकहाणी सांगितली नाही. कमीत कमी मी एकटाच सहन करणारा असणार आहे..... हो पण आता माझ्या आयुष्यातील लग्न हि गोष्ट मी काढून टाकणार! तिच्याशिवाय दुसरी कुणी ....नाही विचारही मनात आणू शकत नाही ! काय करू ...माझ्या मनाची हि अवस्था कुणाला सांगू ! आईला ...नको ,कि बापूंना ...,कि विलासला ...नको बाहेरच्या माणसाला नको ..काय करू ...अस वाटत होतं डोक्याचे सगळे केस उपटून काढावेत ,भिंतीवर डोक आपटाव कि ....
    दिवसभर कॉलेजला गेलो नाही ,न जेवता तसाच पांघरुन घेऊन झोपून राहिलो . मित्रांनी कमेंट केल्या पण त्या समजण्याच्या पलीकडे मी गेलो होतो,शेवटी तीही कंटाळून कॉलेजला गेली. चारच्या दरम्यान बापूंचा फोन आला, त्यांनी जे सांगितलं त्याने मला काय कराव काही कळत नव्हत. दादा नाही म्हणत होता लग्न करायला, बापू सांगत होते त्याला समजाव म्हणून! आता मी कस समजावणार होतो देव जाणे ! दादा इतक्या सुंदर मुलीला का नाही म्हणत असेल? मी काल येताना काही बरळलो तर नाही? तसं बापूनी सांगितलं असत मला, काय झालं दादाला, कुणी दुसरी? त्याने मला सांगितलं असतं, कदाचित लाजला असेल, पण आईला नक्की सांगितलं असतं ...मला आनंद होत होता पण वाईटहि  वाटत होत तिला नकार कळल्यावर ती आमचा सर्वांचा तिरस्कार तर करणार नाही? एक ना अनेक शंका माझं मन पोखरत होत्या.
     दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटमध्ये थांबायचं धाडस झालं नाही पण म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसं ती माझ्या समोर आलीच! पण ती हवीशी वाटणारी एक रमणी होती , माझी? कोमल होती. पर्वाची ओळख लक्षात ठेऊन तिने एक हसरा कटाक्ष माझ्याकडे टाकला ,माझ्या शरीरात एक गोड ,हवीशी वाटणारी वेदना सरसरून अंगभर पसरली , क्षणभर कोमल मोरपीस चेहऱ्यावर फिरतोय असं भासलं ! भानावर आलो तर तिथ कुणीच नव्हत..मनाचं हे सुख क्षणभर राहील! वाटल तिला उद्या नकार कळला तर काय होईल ? देवाला माझी दया कधी येईल का ? तसाच परत होस्टेलला आलो . आपण कितीही अस्वथ असलो तरी जगापासून मनाची हि होरपळ लपवाविशीच वाटते, डोक्यावर पांघरून घेतलं कि कुणाला काही कळणार नाही असच वाटत  राहते ... पण लपवल्याने  प्रश्न अनुत्तरीत राहण्याची भीती जास्त ! जखमेची खपली न काढता कितीही औषध लावलं तरी जखम बरी थोडीच होणार आहे ,जखम बरी होण्यासाठी खपलीखालची ठसठसणारी घाण निघणे गरजेचे ! आईनेच हे कधीतरी सांगितलं होतं ! मी लगेच उठलो नि बापुना  फोन केला .
''बापू, मी बोलतोय, विकास''
''अरे हा बोल विकास, अरे हो तुला सांगायचं राहील ,अरे तुझ्या दादाने दुसरीच मुलगी पहिली आहे म्हणून तो लग्नाला नकार देत होता , सकाळीच आईला सर्व सांगितलं त्याने आणि फोटोहि दाखवला मुलीचा, सुरेख आहे मुलगी आणि शिकलेली सुद्धा , तीन वर्षापासून चाललय पण दादाने मागमूस लागू दिला नाही ,आईला आणि मला वाईट वाटल ...एव्हडे मैत्रीचे संबंध ठेऊन मुलांना आपण जवळचे वाटत नाही म्हणून ...पण जाऊ दे त्याचा आनंद तोच माझाही म्हणजे आपला सर्वांचा रे , तुला फोन करणार होतो पण म्हटल तू कॉलेजांत असशील ...बर तू का फोन केलास? ''
''.....''
''सांग न विकास , काय झालं ?''
'' काही नाही बापू , तुम्ही नकार कळवला ?''
''नाही , म्हटल प्रत्यक्ष जाऊन सर्व सांगाव नि झाल्या गोष्टीबद्दल माफी मागावी ''
''तुम्ही जायच्या आधी माझ्याकडे याल का ?''
''हो येईल बाळा, काही काळजीच नाही ना?''
''नाही बापू ,आल्यावर बोलेन मी ''
''ठेऊ मग ''
''हो ,आणि होस्टेलमध्ये या ''
''बर बर ''
फोन ठेवला पण डोक्यावरच भलमोठ ओझं कमी झाल्यासारख भासल ,पण आता पुढच्या मोठ्या परीक्षेची तयारी करायची होती ती म्हणजे बापूंना सर्वकाही खर सांगण्याची .....
       आजची सकाळ पावसात धुवून निघालेल्या झाडासारखी स्वच्छ, मोकळी वाटत होती . एक वेगळाच विश्वास मन भरून उरला होता ...मी आजची परीक्षा नक्की पास होणार ....कदाचित माझ्या अर्ध्या बोलण्याने बापू झोपू शकले नसावेत म्हणून लवकर उठून आठ वाजता होस्टेलच्या वेटिंगररूम मध्ये आल्याचे निरोप माळीकाकाने आणला. सर्व आवरून मी खाली गेलो ,बापू वाटच पाहत होते .
''चला बागेत बसू ''
''बोल विकास ,काय झालं आता रात्रभर मी आणि तुझी आई झोपलो नाही, काही आजारी नाहीस ना ? का कुणी त्रास देत तुला? परीक्षेच टेन्शन अजिबात घेऊ नकोस , एक ऐवजी दोन वर्ष लागू दे मी आहे ना , पण मुलांनी सुखी असाव एव्हडच वाटत रे , बोलं रे बोल आणखी उत्कंठा नको लावूस.''
'' नाही बापू माझी काही काळजी करू नका, आणि कॉलेजच म्हणाल तर मी नक्की चांगल्या मार्कांनी पास होणार आहे, पण आज मला काही मागायचं आहे ,आणि हो तुम्हीही तुम्हाला आवडल तर होकार द्या.''
''....बापू मला आपण पाहायला गेलेलो ना ती मुलगी आवडते ,दोन वर्षापासून मी तिच्यावर प्रेम करतो पण तिला काय कुणालाच सांगण्याच धाडस मला झालं नाही ,त्या दिवशी दादाची नवरी म्हणून तिला पाहिलं नि मी गळूनच गेलो , पण नन्तर कुणाला न सांगता मनात ठेवण्याचा निर्णय घेतला पण दादाचा नकार समजल्यावर  पुन्हा अस्वस्थ झालो नि विचार करून करून शेवटी तुम्हाला सांगण्याच ठरवल कारण तुम्हीच सांगता ना विचारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत म्हणून ! बापू नकार सांगण्यापेक्षा तुमच्या लहान मुलासाठी मागणी नाही घालू शकत तुम्ही ! प्लीज बापू , हीच वेळ आहे तिला सांगण्याची कारण मी तिच्या समोर गेलो कि माझी वाचाच बंद होते ! तुम्ही माझे वडील तर आहात पण माझे मित्रही आहात ,तुम्हीच मला या संभ्रमातून बाहेर काढू शकता ! कराल ना बापू एव्हड ,प्लीज मला समजून घ्याल ना ?''
बापू उठले नि मला कडकडून मिठी मारली ,नि डोळ्याच पाणी पुसत म्हणाले ,'' मलाही ती मुलगी सून म्हणून आवडली होती रे, पण तुला कुठल्या तोंडाने विचारावे हेच कळत नव्हत , वाटल तु काही वेगळा विचार तर करणार नाहीस, पण त्या विधात्यालाच काळजी रे सगळ्याची! माझ्या मनातल बोललास बाळा ,मनातल बोललास! आत्ता जातो नि त्यांना सांगून येतो .''
मी गपकन वाकलो नि बापूंचे पाय धरले , त्यांनी परत मला उराशी कवटाळल . परत यायला उशीर झाल्याने , फोन करूनच बापुंनि त्यानीही हि गोष्ट आनंदाने स्वीकारल्याच सांगितल .....
     आज आवरून कॉलेजच्या गेटमध्ये बसलो, ती  येण्याच्या दोन तास आधी ! ती ...आली....एक हसरा  कटाक्ष ....मी घायाळ ..........ती लाजली नि क्लास पर्यंत जाईपर्यंत खाली घातलेली मान वर केली नाही !  विलास ,सुहास सर्वजण प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होते ,पण मी मात्र ..............................................     

Monday, 26 September 2011

आण्णांच्या आंदोलनाने मला काय दिले?

  ''मम्मी , ए मम्मी मला न स्केल घ्यायची आहे पैसे दे न दादाजवळ.'' उठल्यापासून सत्योमच एकच मागण चालल होत. मी मात्र त्या दोघांचे आणि सारिका आत्याचा डबा करण्याच्या घाईत होते. ते झाल नि डबे , बाटल्या भरून सत्योमला अंघोळ घालायला गेले. परत त्याची भुणभुण चालू झाली. खर तर दादा सांगत होता पहिलीत स्केल लागत नाही, उगाच हि मुल मारामाऱ्या करतात, म्हणून मी दुर्लक्ष्य करत होते पण तो काही केल्या मागणी मागे घेत नव्हता. शेवटी मी शेवटच अस्र बाहेर काढल हात वरचा खाली येईपर्यंत बाळ कडाडला,''बघ आ मम्मे मी उपोषण करीन!'' मला हसाव कि रडावं हेच कळेना. दादाला पैसे दिले नि छोटी स्केल घ्यायला सांगितली.
     नेहमी स्वताच्या मागण्या रडून, आदळ आपट करून मान्य करून घ्यायचा प्रसंगी तोड फोड करायची वेळ आली तरी करायचा. पण आजचा हा अवतार बघून मी निशब्द झाले. आण्णांच आंदोलन जेव्हापासून चालू होत तेव्हापासून आमचा news chanal बंद नव्हता. त्यात आमची चर्चाही तो ऐकत असे. मुलांच्या मनात घर करून बसलेल्या या गोष्टी अचानक अश्या पुढे येतात कि आपण निरुत्तर होऊन जातो.
     आण्णांच्या आंदोलनाने देशाला काय दिल यापेक्षा तरुणांना, उगवत्या पिढीला एक नवी दिशा दिली. ती अशी कि फक्त हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत तर ते वाढत जातात अनेकदा मनुष्यहानी, वित्तहानीहि  होते, देशाच तसच आंदोलनकर्त्याचहि न भरून येणार नुकसान होत. या उलट अहिंसेच्या मार्गाने जरी काही मिळाल नाही तरी काही हानी तर होत नाही. गांधीजींनी दाखवलेला हा अहिंसेचा मार्ग आपण जरी विसरलो होतो तरी आण्णांनी तो परत दाखउन दिला आहे,आणि यशस्वी झालेला सर्व जगाने पाहिला आहे. म्हणून  आण्णांनचे शतश: आभार ! 

Sunday, 25 September 2011

वयनीमाय

      हवेतला गारवा उगाचच अंगाला झोंबत होता. न्याहारीची वेळ झाली तरी उन वर यायचं नाव घेत नव्हत. पण शेवन्ताच्या अंगणाला आज निराळाच रंग होता. तसं पहिल तर अंगण घराच्या आतल वातावरण कस आहे याचच प्रतिबिंब! स्वच्छ सारवलेला ओटा, उजव्या हाताला छपरात दोन गाया एक वासरू टाकलेली मक्याची कुटी चघळत होती. घासाच ओझ ओट्याजवळच्या बदामाच्या झाडाखाली पडलेल. शेवंता घरातलं काम उरकून बाहेर गुरांना पाणी ठेवायला आली. गायांच्या पुढ बादली ठेऊन ती जरा झाडाच्या सावलीत ओट्यावर टेकली. मागच्या आठ दिवसाची तगमग आता कुठ शांत होती. मनाच्या पाखराला सदान चांगलीच येसण घातली, ती पण प्रेमाने समजावून! आणि विशेष म्हणजे थोडाही धाक न दाखवता. सदाची हीच सामंजस्याची भाषा, प्रेमाचे शब्द शेवंता आणि त्याला आता पर्यंत एकमेकांशी घट्ट बांधून आहेत. नवरा बायकोच नातं असच जितक लांब ढकलू तेवढ जोरात परत एकमेकांजवळ ओढून आणत. पृथ्वी जस सूर्याभोवती गुरुत्व-आकर्षानामुळ फिरत राहते तस! एक अशीच ओढ यांनाही बांधून होती. 
         मोटर चालू होती म्हणून शेवंता आज विहिरीवर कपडे धुवायला गेलेली. शेजारची ताईबाई संग होतीच. त्यांच्या दोघींमधी शेजारणी असून कधी भांडण नव्हती, एकमेकीची मदतच करायच्या! हौदाच्या कडांवर मोठाल दगड असल्यान कपडे धुवायला सोप जायचं. वीजमंडळाच्या कृपेची फक्त गरज असायची! 
'' शेवन्ते परभू लई दिस झाल आला नाय ग.''
'' ताई, मास्तर हाय त्यो, सवड तर पायजेन, त्यामधी माधुरीची बी शाळा असतीया, एक दिस सुटी असली तरी आठ दिसाचा राडा आवरायला अख्खा दिस संपतो. लागून सुट्या आल्या कि येत्यानच कि !''
''बघ शेवन्ते, तुमी पाठच्या दीर ,नंदला मोठ करायच म्हनुनशान पोटपाणी पिकू दिल न्हाय! म्हातारपणी ह्यांनी सांभाळ केला तर ठीक न्हायतर अवघड होऊन जायचं!''
''न्हाय ताई, माजी पोर तशी न्हायत ,ती कावा बी अंतर नाय देयची.''
''परभू हाय तुजा पर माधुरी हाय का ?''
''नाय ग ताई गुणी पोर हाय ती बी .''
''चांगल हाय पर तू आपली जपून आस . काय कुणाचा भरवसा नाय बग कुणाची मती कवा बदलल सांगण अवगड हाय, चल येते मी झाल माज .''
      ताईबाई गेली पण शेवन्ताच डोक मात्र बधीर झाल. संशयाची ठिणगी एकदा पडली कि वनवा पेटवल्याशिवाय   गप्प होत नाही. एकदा का वनवा पेटला कि घरच्या घर उध्वस्त झालीच म्हणून समजा. कळत असूनही संशयाच्या या वारूला कुणी लगाम घालू इच्छित नाही हि सगळ्यात मोठी शोकांतिका! मग या संशयाने अगदी आई मुलाच्या नात्याचा बळी घेतला तरी यांना चालतो. आणि या विखारी रोपाला खत पाणी घालायला बाकीचे टपलेले असतातच. माणूस क्षणाच नात वर्षानुवर्षे जपलेल्या नात्याला गिळंकृत करताना पाहूच कसा शकतो? शेवंता मात्र गलबलून गेली होती. जेवानावरच मन उडून गेल होत. सदा येई पर्यंत तिचा जीव शांत होणार न्हवता. कारण त्याने लग्नाआधी नसबंदी केली नसती तर एखाद पोर मला बी झाल असत माझा खरा गुन्हेगार तोच आहे. शेवन्ताच अंग थरथर कापत होत. सदा आल्यावर त्याला किती दोष देऊ नि किती नको अस तिला झाल होत. हातान या माणसान आपल्या आयुष्याच वाटोळ करून घेतलय आता म्हातारपणी कुणाच्या तोंडाकड बघायचं? एक न अनेक शंका तिला घायाळ करत होत्या. दु:खाची नुसती चाहूल माणसाला हतबल का बनवत असेल? ते होणार कि नाही हेही त्यांना माहित नसत, पण मरण यायच्या आधीच खड्डा घेण्याची सवयच बनून गेली आहे. उद्याच्या दु:खाच्या चाहुलीने आपण आपल आज संपवतो आहे हेही यांना का कळत नाही देवच जाणो? 
      सदा आला पण शेवंता एक शब्दहि का बोलत नाही याचा काही अंदाज त्याला येईना. थोडा गोडीन तिच्याजवळ गेला पण तीन असा काही त्याला झिडकारला कि त्याच डोकच बधीर झाल. जाताना तर सगळ ठीकठाक होत मग अस अचानक दोन तासात काय घडल? आता काय करायचं? ओरडल तर परस्थिती आणखी बिघडणार थोड कुरवाळच पाहिजे हे त्याने उमजून घेतलं.
''शेवन्ते काय न सांगता तू आजूक माजा किती जीव जाळणार हैस? सांगती का जाऊ लांब कुठतरी? परत त्वांड नाय दाखीव्णार तुला.''
आता मात्र जीव्हारी बाण लागला. शेवंती ढसाढसा रडायला लागली त्याच्या गळ्यात पडून आणि विहिरीवर झालेली हकीगत सांगितली. सदा लागला हसायला. ''हे तुज ना शेवन्ते उद्याच्याला जेवण मिळल का नाय ह्या विचारांनी आजच उपाशी राहण्यासारक झाल! तुला ग कश्याला काळजी पायजे याची. मी हाय ना कुणी नसाल तरी, आन समजा तू आजच मरून गेल्यावर?''  सदा परत मोठ्यान हसायला लागला. शेवंती मात्र जास्तच भडकली,''माज डोक तळ्याव नाय आन तुमालाव कश्याची मस्करी सुचती ? जावा तीकड नका बोलू माज्यासंगत.'' सदान तिला जवळ घेत तिला समजावल.
''शेवन्ते आग कुत्र्याच्या पिलाला जीव लावला त ते बी आपल्या माग पळत! ह्यो तर माजा पाठचा भाऊ हाय. आणि मला सांग तू बी पोटच्या पोरापरीस जास्तच जीव लावला नव्ह परभुला मंग तुज्या संस्काराव तुज इस्वास का त्या ताय्बायवर सांग बर मला? आन माधुरी बद्दल बी तू शंका कशी घेऊ शकती तीन बी तुजी किती सेवा केली बर तू आजारी होती तवा! लोकाची असली तरी चार बुक शिकल्याली समंजस पोर हाय ती ! आशी उगाच डोक्यात राख कश्यापरीस घालती, येवड सांगून तुला पटत नसल चल चार दिस त्येन्च्यासंग राहून तू अनुभव घेऊन बग मंग तर झाल. उरिक लवकर आजच या शंकला चुलीत घालू .'' 
   शेवंता लगबगीने उठली, परभूकड जायचं म्हणून ती गरबडीने  मळ्यात जाऊन मिरच्या, वांगी, शेपू-चुक्याची भाजी, पेरू ,आन बरच काही घेऊन आली. दोनच्या गाडीने दोघ पर्भूकड रवाना झाली. पोहचायला पाच वाजले. माधुरी नुकतीच आली होती. दादा नि वयनीमायला बघून तिला तिचा आनंद लपवता येन अवघड होऊन बसल, आत येताच ती दादाच्या पाया पडली आणि वयनीला जाऊन बिलगली, लई दिवसांनी आई दिसल्यावर जस लेकरू बिलगत तशी! सदा शेवन्तिकड बघत होता, नजरानजर होताच शेवंती वरमली. त्यांना  चहा पाणी देऊन माधुरी स्वय्पाकाला लागली, शेवंता लुडबुड करू लागली पण माधुरीन तिला हाताला धरून बाजूला बसवल. तासाभरात परभू आला त्याला अचानक आलेले दादा, वयनीमाय बघून इतका आनंद झाला कि दोघांना कुठे ठेऊ कुठे नको अस झाल . त्याचं ते प्रेम बघून शेवंता मात्र आतल्या आत खजील होत होती. तिला धरणी माय ठाव दे अस झाल तिची चुलबुल बघून सदा मनातल्या मनात हसत होता पण त्याला ते लपवता येत नव्हत. जेवण आटोपल्यावर ती माधुरी जवळ बोललीच,''तुला कधी अस वाटल नाय आपल्या नवऱ्याची दादा वयनी आपण कश्यापरीस त्येंच करायचं .''
''वयनीमाय, तुमाला  जर तवा वाटल असत तर मला आता तस वाटल असत. ज्या मावलीने बारीक दीर,नणंद सांभाळण्यासाठी आपल् पोट पाणी पिकू दिल नाही त्या माउलीची अशी अवहेलना केली तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा माझी पाप धुऊ शकणार नाही !''
''बस बस माधुरी, तुला हे सांगितलं कुणी?''
''तुमच्या लाडक्या पर्भून! आणि हो लग्नाआधीच कबुल करून घेतल कि माझ्या दादाला आणि वयनीमायला अंतर द्यायचं नाही! या अटीवर तर यांनी लग्न केल माझ्याबरोबर!''
आज शेवन्ताला जन्मच सार्थक झाल अस वाटायला लागल. सगळ भरून पावलो आता देवाकड काही मागण नाही! माणूस सुख शोधत उर फुटेपर्यंत धावतो पण त्याच्याजवळ लपलेल सुख त्याला दिसत नाही त्या कस्तुरी मृगसारख! 
   शेवंतान सगळ सदाला सांगितलं! तिचे डोळे तिच्या नकळत वाहत होते पण आनंदाने ! 
''पण परभू सारख तुमी लगणा आधी मला इस्स्वसात घेतलं असत त जमल नसत का ?'' लाडिक गुश्यात शेवंता बोलली.
''तवा आजाच्यासारक लग्नाआगुदार भेटली आसती तर सांगितलं आसत कि!'' मिस्कीलपने सदा बोलला. लाजत शेवंती त्येच्या कुशीत शिरली. ति आता निश्चिंत झाली!
         बदामच्या झाडाखाली बसून एक निश्चय शेवन्ताने आज केला,'' परत आसा येडेपणा नाय करायचा, माज्या पर्भूबद्दल शंका म्हंजी देवाबद्दल शंका!''                  

Monday, 19 September 2011

श्रद्धांजली

चार दिवसापूर्वी माझ्या सासरच्या नात्यातील एका आजींच अचानक अल्पश्या आजाराने निधन झालं. तसं पाहिलं तर जन्ममरण हे कुणासाठी थांबलेल किंवा चुकलेल नाही पण काही व्यक्ती अस आयुष्य जगलेल्या असतात कि हि त्यांच्या जाण्याची घटना तिऱ्हाईत मानसाला अस्वस्थ करून जाते. या आजींच्या बाबतीत असाच काहीस घडल. परिसरातील त्यांना ओळखणारी जवळजवळ सर्वचजन तळमळली, त्यात मीही आलेच. त्या खूप जवळच्या नव्हत्या पण त्यांनी आमच् नातं जवळच बनवलं होतं. जितक्यावेळा त्या भेटल्या तेव्हा त्या आपलेपणाने जिव्हाळ्याने बोलल्या! गुलाबाच्या फुलासारखं काट्याच्या वेदना स्वत:जवळ ठेऊन भोवताल सुगंधित करणाऱ्यांपैकी त्या एक ! आयुष्यभर फक्त दु:ख सोसनाऱ्या, कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वताची दु:ख कधीच त्यांनी  दया किंवा मदत मिळवण्यासाठी वापरली नाहीत.
   लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुली पदरात टाकून जोडीदार अर्ध्यावर टाकून देवाला प्रिय झाले. नंतर छोट्या दीर जावांना सांभाळत आणि स्वताची मुले सांभाळत संसार पुढे नेला. मुलाच लग्न केलं तेही लहान तीन मुलं आणि शांत संय्यमी सून ठेऊन देवाला प्रिय झाले. पुत्रवियोग सहन करत नातवंड मोठी केली व्यवहार कुशलतेने , कष्टाने शेती करून इतर दीरानच्या बरोबरीला संसार नेऊन ठेवला. हे करत असताना सर्व नातेवाईकांच्या सुख दु:खात त्या सहभागी झाल्या. जळणाऱ्या ज्योतीसारख वेदना सहन करत प्रकाश मात्र सर्वाना दिला . दारातल्या तुळशी सारखं आयुष्य जगत तुळशीच्या ओट्यावर मृत्यूला त्यांनी जवळ केलं !
 मी कविता करत नाही पण त्यांच्यासाठी सुचलेल्या या ओळी खाली देत आहे.

             एक आत्मा आयुष्यभर फक्त दु:ख झेललेला
             कधीचा एक अश्रू तिने पापण्यांवर पेललेला
             अश्रुना मुभा नव्हती गालावर ओघळून मुक्त होण्याची
             त्या आत्म्याला ताकत हवी होती फाटलेलं आभाळ पेलण्याची

             उन पडलं वादळ आलं पाऊस आला
             पिलांना पंखाखाली घेणारी पक्षीण ती
             आयुष्यातील दु:खांसमोर
             दत्त म्हणून उभी ठाकनारी वाघीण ती

             रडण्याला आणि दु:खाला
             तिनं कधीच बळ बनू दिल नाही
             हसण्याणचं मानसं जिंकायची
             जिंकायच्या दिश्याही दाही

             अश्या या छत्रछायेला आपण
             जरी आज पारखे झालो
             नजर तिची घारीची तशीच आहे
             आपण मात्र नतमस्तक होऊन वाकलो.

Thursday, 8 September 2011

देवदूत

 गाठ मग ती शरीराच्या कुठल्याही भागात असो मनपटलावर एक भीतीची लकेर उमटवून जाते. असाच प्रसंग काल  परवा मीही अनुभवला. कॅन्सर विषयी भीती सर्वांच्या मनात असते आणि तस काही आपल्याला होऊ शकत अशी जाणीव जरी झाली तरी मन सैरभैर होऊन जात सगळ जग अचानक भकास वाटू लागत, जीवनात भरलेला सुगंध अचानक वार्याच्या झोताबरोबर उडून जातो. असा प्रसंग शत्रूलाही लाभू नये इतपर्यंत भावना मन व्यापून टाकतात.
   वीस दिवस झाले असतील साधारण एकाएकी एक गाठ जाणवली. वेदना नव्हती पण गाठ तशी मोठी होती . आता कळली किती दिवसापासून असेल सांगण जरा कठीणच कारण वेदना नव्हती . चाचपून पाहिलं इतर ठिकाणी हलत होती पण खालच्या बाजूने चिकटलेली भासली.दहा दिवस थोडीफार औषधे घेऊन बघितली पण काहीच फरक नाही मग डॉक्टरांना दाखवायचं ठरलं वेळे प्रमाणे रुबी हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागात पोहचलो डॉ अनुपमा माने यांना दाखवायचं ठरलं डॉ बाह्य रुग्ण तपासणी विभागात होत्या माझ्या अगोदर एक आजी होत्या कदाचित त्यांच्या त्या जुन्या पेशंट असतील. डॉ बाहेर आल्या त्या आजींची स्मित करत विचारपूस केली अर्ध्या तासात परत येते ऑपरेशन आहे सांगून निघून गेल्या . वेळ लागेल म्हणून चौफेर नजर फिरवली . एक मुलगी तिच्या आई वडिलांसोबत होती डोक्याला भुवयांना अजिबात केस नव्हते कदाचित किमो थेरपी चालू असावी आई वडील तिला हव नको ते विचारत होते पण चैतन्य हरवलेला तिचा चेहरा अंगावर शहारे उभे करत होता! माझ्या ह्यांनी हि गोष्ट ओळखली आणि ते माझ मन त्यांच्या बोलण्यात गुंतवण्याचा असफल प्रयत्न करू लागले!                                                                                
    तिच्या शेजारी एक जोडप बसलेलं यजमान एकदम शरीराने मनाने खचलेले आणि शेजारी बसलेली बायको डोळ्याच्या कडेपर्यंत आलेले अश्रू गालावर ओघळू न देण्याच्या असफल प्रयत्नात! काही लोकांच्या चेहऱ्यावर नीट झाल्याच समाधान आणि काहीतरी अवयव गमावल्याच दु:ख दोन्ही भावना एकत्रित लपंडाव खेळताना! कुणाच्या नाकात असलेली नळी काहींना त्यांच्या पासून किळस आल्यामुळे दूर बसण्यासाठी प्रेरित करत होती त्याच वेळी माझ मन मात्र यांचे आता किती दिवस राहिले असतील या विचाराने गर्भ गळीत झालेले! मन खिन्न होत आज मी सुपात असेल नि उद्या या जात्यात आले तर ? शरीरात एक वेदना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत विजेसारखी चमकून गेली डोळे मिटून मी यांचा हात पकडला. 
  आमचा नंबर आला आत जाताच एका गोड स्मितहास्याने डॉक्टरांनी आमच् स्वागत केल . माझ्या थोडा जीवात जीव आला . त्यांनी शांतपणे सर्व रिपोर्ट पहिले नि काही प्रश्न विचारले त्या मधेच स्मित करत शांतपणे विचारत होत्या . माझ्या मनावरचा ताण हळू हळू कमी होत होता . तपासून झाल्यावर त्यांनी विशेष नाही यावर शिक्कामोर्तब केल पण भविष्यात त्रास नको म्हणून काही तपासण्या करून आपण ती गाठ काढून टाकू असा सल्ला दिला. त्यांनी जराही न वैतागता (नाही तर काही डॉक्टरांना प्रश्न विचारणारे पेशंट नको असतात ) अगदी प्रेमाने प्रत्येक शंकेच निरसन केल.दोन दिवसापूर्वी आम्ही ती गाठ काढून टाकली . आज मन आणि शरीर या दोनही वरचा ताणरूपी पडदा हटला आहे . मन प्रसन्न आहे. याच सर्व श्रेय जात माझ्या अस्थिर मनस्थित साथ देणाऱ्या माझ्या यजमानांना, माझ्या कुटुंबियांना आणि देवदूत होऊन भेटलेल्या डॉ अनुपमा माने यांना! डॉ मानेन सारखे देवदूत माझ्या सारख्या संभ्रमात असणाऱ्या प्रत्येक पेशंटला भेटोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !   

Sunday, 4 September 2011

शिक्षक दिन

    आज सकाळपासून सत्योमचा गृहपाठ करून घ्यायचं हे लक्षात होतच कारण दोन दिवसाच्या  सुटीनंतर सोमवारची शाळा त्याच्या आठवणीत आणून द्यावी लागते. दादाला विचारल तर तो म्हणाला कि शिक्षक दिनाच कार्ड करायला सांगितलं आहे. त्या दोघांनी कार्ड करायला घेतली पण मी मात्र माझ्या शाळेच्या आठवणीत हरवले. 
    तस चौथीच्या अगोदरच विशेष काही आठवत नाही पण काही कविता त्याही नाचून गाऊन म्हणत असू म्हणून. खऱ्या आठवणी पाचविपासुनच्या! पाचवीत आलो पण शिक्षक मात्र तेच कारण आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा होती मग पहिलीपासून सातवी पर्यंत एकच वर्ग शिक्षक! आमचे काळदाते गुरुजी! प्रत्येक विध्यार्थ्याच प्रेमाने त्यांनी नामकरण केलेल. ते जेव्हड मन लाऊन शिकवत तितक ते विद्यार्थ्याला समजून घेत. त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट हालचालींवर लक्ष ठेवत. माझ नाव त्यांनी चिंधी अस ठेवलेल कारण माझ नाव ( माहेरच )  संध्या म्हणून संधी -चिंधी अस! त्यांच्या ह्या नामकरणाचा कधी राग नाही आला तितका जीव ते आम्हाला लावत आईच्या ममतेने जपत! तेव्हा बाक नव्हते बसायला एकामागे एक जमिनीवर बसाव लागत असे. एकदा ते इतिहास शिकवत होते मी मात्र माझ्या पुढे बसलेल्या मुलीची वेणी घालत होते ! त्यांनी हे बघितलं मला जवळ बोलावलं हात पुढे करायला लावला जोरात छडी मारली. त्यावेळी मी त्यांना विनवत  होते गुरुजी मला मारू नका माझ लक्ष आहे तुम्ही पाहिजे ते विचारा पण कश्याच काय त्यांना राग अनावर झाला होता. मारल्यावर मग मला विचारल माझ बरोबर उत्तर ऐकून ते मात्र अस्वस्थ झाले. शाळा सुटल्यावर जवळ बोलून त्यांनी हात हातात घेतला म्हणायला लागले लक्ष देत जा! चिंधे जास्त लागल नाही ना ? त्यावेळी त्यांचे डोळे पानवले होते! तेव्हा पासून मी कधी तास चालू असताना कुणाची वेणी घातली नाही ! सातवीत असताना काळदाते गुरुजींची बदली झाली तेव्हा निरोप समारंभाच्या भाषणात प्रत्येक विध्यार्थी रडत रडत भाषण करत होता! अश्या शिक्षकांची शिक्षक दिनी तर नक्कीच आठवण होते.