या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 8 October 2020

मनात ठाण मांडून बसणारा कवितासंग्रह , ' सगळं उलथवून टाकलं पाहिजे '

हार्मिस प्रकाशनने 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे ' हा देवा झिंजाड यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केला आहे . तो मिळाल्यावर वाचायला थोडा वेळ लागला परंतु सुवर्णाताईने आधीच पुस्तकावर अभिप्राय त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहिला होता तेंव्हाच पुस्तक वाचण्याची उत्सुकता होती . म्हणून जसा वेळ मिळेल तशी एक एक कविता वाचत गेले . टायघाल्या ही कविता आधीच वाचण्यात आणि ऐकण्यात होती . ग्रामीण जीवनात शेतकरी हा अविभाज्य भाग त्याच्या आयुष्याची परवड आणि त्याबद्दल शहरी मनाची असंवेदनशीलता याचे अगदी रांगड्या भाषेत वर्णन करणारी हि कविता तेंव्हाच मनाच्या कोपऱ्यात घर करून गेलेली . ' गाडग्यामडक्यात गोमतार साठविणाऱ्या अन रक्त आटवून बाटूक जगवणाऱ्या डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी गावठी गाईचंच काळीज लागतं '  गावातील जगणं जितकं पोटतिडकीने मांडले आले तितकेच रागाने कवी विचारतात  ' घराघरात भांडणं लावणाऱ्या एकता कपूर मालिका पाहताना ओघळणारं पाणी काय कामाचं ' 

   ग्रामीण जीवन रेखाटताना ग्रामीण स्त्री सर्वाधिक शोषित आहे . तिच्यावर केलेल्या बऱ्याच कविता कवीच्या संवेदनशील मनाची आणि त्यांनी सोसलेल्या वेदनांची साक्ष देतात . अगदी साध्या , रोजच्या जीवनातील दुर्लक्षित अशा वस्तूंचा / गोष्टींचा आधार घेत ग्रामीण स्त्रीच्या दुर्लक्षित वेदनांचे वर्णन कवी करतात . चुंबळ ही तशीच कविता . ' ओझ्याखालची चुंबळ आणि चुंबळीखालची बाई .. अवस्था दोघींची सारखीच होई ..' पुढे कवी म्हणतात , 'एकदा चपटी झाली कि कायमची अडगळीत फेकून दिली जाते .' हे यथार्थ असे स्त्रीजीवनाचे वर्णन आहे . कवीच्या डोळ्यांनी पाहिलेली ही स्त्री किती पुरूषहृदयांना हळवं करत असेल ?  

 बैल आणि शेतकरी यांच्यातील नातेही जितके विलोभनीय तितकेच हळवे आणि प्रेमळही असते . ' अर्धी बादली ' ही कविता त्याच नात्याचे मनाला स्पर्शून जाणारे वर्णन करते . कवीचा स्रियांसाठीचा आणि विशेषतः शोषित स्रियांबद्दलचा आशावाद अजून कायम आहे . म्हणून इंदिरा या त्यांच्या कवितेत ' आणि घडावी एखादी तरी इंदिरा गावाबाहेरच्या इंदिरा आवास योजनेतून .. ' . आताच्या दिखाऊ जमान्यात दिखाऊ गोष्टींचे जे स्तोम माजलेय त्याने महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्याही व्यापून टाकल्या आहेत . आणि म्हणून भीती वाटतेय कवीला , ते डीजे या कवितेत म्हणतात , 'ह्या दिखाऊपणाच्या भडक युगात डीजेवाले महापुरुषांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरतील .' कवी फक्त बंडखोर लेखन करून थांबत नाहीत तर म्हणतात , 'काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथवून टाकलं पाहिजे ' माणसाचे आयुष्य जेंव्हा भोगत सहन करत वेदनेच्या अत्युच्य कड्यावर जाते तेंव्हा त्याला उलथवून टाकण्याची बदलवून टाकण्याची उर्मी झपाटून टाकते . हा कवितासंग्रह अशाच अत्युच्य वेदनांचा कडेलोट झाल्यावर निर्माण होणाऱ्या मनोअवस्थेतून साकार झालाय हे प्रत्येक कवितेत जाणवत राहते . ती वेदना ते कष्ट तो आशावाद आपल्या नेणिवेत साठत जातो . पांढरपेशा समाजावर ओढलेले ओरखडे आपल्या काळजावर कधी उमटतात हे समजतच नाही . कवीचे दुःख वेदना कधीच आपले होऊन जातात आणि उलथवून टाकण्याच्या , बदल करण्याच्या आशा उभारी घेऊ लागतात , उगवू लागतात मनातून ! 

   शहरी मनातील बोथट होत गेलेल्या संवेदनांची प्रचिती बऱ्याच कवितांमधून येते . कवीची शहर आणि ग्रामीण जीवनाची दरी दाखवण्याची आणि ती सांधण्याची तळमळ प्रत्येक कवितेत दिसते . ' केली जाते बेडवर पडल्या पडल्या बिनदिक्कतपणे समीक्षा गादीवाफ्यांवर भाजी खुडणाऱ्या हातांची ' .  श्रीमंत तुकडे अशीच एक कविता , ' पण होतात तेव्हा अनंत वेदना आतड्याला जेव्हा बघतो मी शिळ्या भाकरीचे श्रीमंत तुकडे डस्टबिनमधे ...' म्याकडोनाल्ड जातीच्या जिभा मधे कवी लिहीतात ' मिल्कशेक पिणार्या ह्या शहरी तोंडांना कधीच नाही कळणार गायीचे पाय बांधून पिशवीत भरून पाठवलेलं अमृत ..अन टूळटूळीत डोळ्यानं पहात पहात एका दुधाच्या घोटासाठी रडणारी लहान लहान वासरं '.डोळ्यात आपोआपच पाणी आणणारं हे काव्य काळजात ठाण मांडून बसतं ! 

आईच्या संस्कारात वाढलेल्या कवीला फक्त आईचं नाही तर सगळ्या बायांचं दुःख दिसतं आणि शब्दाशब्दातून थरथरत राहतं . चिंचा बोरी या प्रतिकात्मक रूपात त्या अवतरतात कवितेत . कधी चुंभळीचं आणि बाईचं दुःख एक होतं . कुमारी जी नासवली जाते याचे मनाला घायाळ करणारे काव्य उमटते ' गांडूरोग ' या कवितेत . ' कवटी फुटल्यावर तिची आई एकटीच गेली तडातडा चालत रानात झाडपाल्याचं औषध आणायला लेकीच्या कोवळ्या मायांगावर लावण्यासाठी ..'.भुंड्या हातांनी या कवितेत आलेली आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या बायकोची वेदना आणि तरीही हार न मानता तिचं आयुष्याला भिडणं निशब्द करून जातं ..कवीनं विचारलेला प्रश्न ' पण करते का कधी माती आत्महत्या ?'  विचार करायला भाग पाडतो . पुढे जाऊन उत्तरही कवीच देतात म्हणतात ' सावरत राहते त्याच्या स्वप्नातील शिवार तिच्या भुंड्या हातांनी ...' काळ्या आईला विकणार्या गुंठाधारकांवरही कवीच्या शब्दांचा आसूड वार करतो . कवी खेदाने म्हणतात ,' तरी म्हणत नाही तिला कुणी हल्ली काळी आई ह्या गुंठापुजकांच्या टोळीत ..'  ' पदर ' ही कविताही अशीच पाळीत नाकारलेल्या स्त्रीची व्यथा मांडणारी . ग्रामीण भागात देवीच्या उत्सवात अनेक बायका देवीला विटाळ होतो म्हणून पाळी आलेल्या बायकांना लांब बसवतात . कुठल्याच कामात आणि उत्सवात त्यांना सामील केले जात नाही . त्या स्त्री देवतांना प्रश्न विचारायला न भिणारा कवी म्हणतो , 'ऍलर्जी आहे का तुमच्या भरजरी पदराला ? पदर आलेल्या बायकांची ?'  पुढे जाऊन कवीच सांगतो , ' अगं ...अवघ्या जगाला जगवणारी माती मानत नाही विटाळ मग तू मातीपेक्षा मोठी आहेस का ? '.कावळा शिवला की ..ही कविताही याच आशयाची ..' पण कावळा शिवला की परत परत गोधड्या रूढीपरंपरांच्या दारात मारून मुटकून बसवल्या जातात .'  बांगडी कविताही स्त्रीच्या जीवनाचे वर्णन करणारी आहे . स्त्रीचे दुःख गरीब श्रीमंतीच्या बाहेरचे आहे . म्हणून कवी म्हणतात ,' गरीब असो वा श्रीमंत सदैव..त्याच परिघात किणकिणत राहते बांगडी ' . 

 असा हा कवी देवा झिंजाड यांचा कवितासंग्रह नक्कीच वेगळा आहे . ग्रामीण शहरी जीवन , ग्रामीण स्त्री जीवन , मुर्दाड समाजव्यवस्था , राजकीय उदासीनता , स्त्रीयांच्या जीवनातील व्यथा , उतारवयात आलेली लाचारी अशा अनेक प्रश्नांना आपल्यासमोर मांडतो हा कवितासंग्रह ! आणि कवी आता बदल हवा ही जाणीव मनामनात पेरतात ..सगळं उळथवून टाकलं पाहिजे म्हणत मनात ठाण मांडून बसते ती देवा झिंजाड यांंची कविता !. संग्रही  असावाच असा कवितासंग्रह ..जो या दिशाहीन काळात उलथवून उभं राहण्याची प्रेरणा देईल !

   डॉ संध्या राम शेलार . 


No comments: