अनेक दिवसांचा विरह ,
तितक्याच आवेगाने ओढलंय जवळ
अजून कोवळ्या नात्याला पक्व व्हायचंय
मग रूजेल वेदनेचं बीज माझ्या कुशीत ..
अलवार हलत डूलत राहील आत
मला करेल अलिप्त माझ्याचपासून
जगण्यालाही वेदनांचं वलय येईल
सारी मळमळ रोजच पडेल बाहेर
वांती झाली तरी काहीतरी सतत जळजळत राहील
आतल्या आत ...छळत राहील ..
नंतर मात्र ओकारी नकोशी होईल
मळमळीला आता निशब्द व्हावे लागेल

त्या ताणाने फटफटतील शीरा
ह्रदयाची कळ मात्र वाढत राहील !
आता मोठं झालं असेल बीज वेदनेचं
मला कुरतडत कुरतडत ..
त्याने आपलं जीवन साकारलं असेल !
पोखरून गेलेली मी ...
असह्य कळांनी आता मरणाला टेकलेली ..
अत्युच्च वेदनेचा डोह मला टाकील व्यापून ..
शेवटी सगळं शांत होईल ..
नव्या पहाटेला आभा व्यापून जाईल ...
मात्र एक वेदना पुन्हा जन्म घेईल !
डॉ संध्या राम शेलार .
4 comments:
_/\_ _/\_
अप्रतीम रचना स्रीत्त्वाच्या संपूर्ण रूपाचं मन स्पर्शून जाणारं काव्य ! आनंदातच प्रसव वेदना विरघळून जाव्यात असं हळवंपण शब्दांतून स्रवताना दिसतं
अभिनंदन 💐
काकासाहेब
धन्यवाद सर
धन्यवाद माधुरी
Post a Comment