या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Sunday 27 October 2013

बटाट्याची खिचडी

  मी आणि सत्योम असे लिहिणे मला तसे अचानकच सुचले . तेही असे काही प्रसंग घडतात आमच्या दोघा माय लेकरामध्ये कि लगेच कुणालातरी सांगावे असे वाटते . आज घडलेली गोष्ट उद्या आठवण होईल , उद्या तो मोठा होईल कदाचित थोडे अंतर निर्माण होईल पण आजचा माझ्या अवती भोवती घुटमळत फिरणारा माझा बाळ मला नक्कीच सदैव हवासा वाटेल ! जीवनातले सुखाचे , व्याकुळतेचे , रागाचे , भांडणाचे हे क्षण स्मृती बनून राहतील . पण हे अमृत माझ्या मनात सतत जगण्याची आशा निर्माण करील , वेदनेच्या क्षणी फुंकर घालून थंडावा देतील , असे हे कधी त्याला मी शिकवलेले तर कधी त्याने मला शिकवलेले अमृतमय प्रसंग लिहून ठेवायचे हे आणि पुन:पुन्हा ते वाचून त्या वेळेत जावून जगायचे ,किती सुंदर न ! पुन:पुन्हा आई व्हायचे ! आनंदाचे पंख लावून पुन्हा आभाळात उडायचे !

लहरेन मी , बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
मस्त आहे न कल्पना ?

   आज सकाळी लवकर उठले , आधी डबे करून मग सत्योमसाठी आवरायला कमीत कमी एक तास तर लागतोच , म्हणजे सात वाजेपर्यंत डबे तयार होणे गरजेचे ..आज लाईट जाणार लवकर मग अंघोळ उरकून मग डबे करावे हा विचार केला , आणि अंघोळ आवरली पण आता साडे सहा झाले उरकेल का डबा? झाली घाई चालू .. भाजी चपाती दोन डब्यात आणि उरल्या एक डब्यात साबुदाण्याची खिचडी द्यायचे रात्रीच ठरले होते . तसा साबुदाणा भिजत पण घातलेला .. भाजी उरकली ...पण आता सात वाजले ..
कसे आवरायचे याच विचारात होते मी ,तो मागे येवून बसलेला मला कळलेच नाही .
माझे लक्ष नव्हते ..मग हळूच तो मागे आला आणि कमरेला मिठी मारली .. “अरे माझा ननुबाळ उठला ग माझा पिल्लू , पण आवरा आता उशीर झाला खूप आधीच ..”
“थांब कि ग मम्मी..” लाडात येवून म्हणाला , पण आता वेळ खूप थोडा होता त्याचे ऐकून  जमणार नव्हते .
“सांगितले न आवर म्हणून ..”खोट्या रागाने मी ओरडले ..मग मात्र घाईने ब्रश करायला स्वारी पळाली.. मला हसू आवरेना पण मोठ्याने हसले तर परत रुसून बसायचा म्हणून दाबले . मला आता वेळ खूप कमी होता , बटाटा चिरून मग खिचडी बराच वेळ लागेल म्हणून ब्रश करून आलेल्या पिलूला विचारले , “बाळा आज खिचडीत बटाटा नसेल तर चालेल न रे ?”
“टाक न ग बटाटा , शाळेत मुले नसतील तर कसे दिसेल सांग बरं?”
“रिकामे दिसेल , त्याशिवाय शाळेला अर्थच नाही”
“मग मम्मी बटाट्याशिवाय खिचडी पण तशीच दिसेन कि गं”
पिलूचे हे शब्द ऐकले आणि गुपचूप बटाटा चिरायला घेतला ...


3 comments:

Sahayogi said...

गोष्ट सुंदर आहे, प्रश्नच नाहीं. पण मला वाटतं की टाईटल मध्ये काहीतरी गडबड झाली. खिचडी बटाट्याची की साबूदाण्याची? जरा सांगाल का?

Unknown said...

धन्यवाद सहयोगी !
खिचडी साबुदाण्याचीच हो पण सत्योम सांगतो ती खिचडी केली की प्रश्न पडतो की खरोखर ती साबुदाण्याचीच आहे का ? म्हणून इथे बटाट्याची खिचडी !

Unknown said...

धन्यवाद सहयोगी !
खिचडी साबुदाण्याचीच हो पण सत्योम सांगतो ती खिचडी केली की प्रश्न पडतो की खरोखर ती साबुदाण्याचीच आहे का ? म्हणून इथे बटाट्याची खिचडी !