या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Sunday, 27 October 2013

बटाट्याची खिचडी

  मी आणि सत्योम असे लिहिणे मला तसे अचानकच सुचले . तेही असे काही प्रसंग घडतात आमच्या दोघा माय लेकरामध्ये कि लगेच कुणालातरी सांगावे असे वाटते . आज घडलेली गोष्ट उद्या आठवण होईल , उद्या तो मोठा होईल कदाचित थोडे अंतर निर्माण होईल पण आजचा माझ्या अवती भोवती घुटमळत फिरणारा माझा बाळ मला नक्कीच सदैव हवासा वाटेल ! जीवनातले सुखाचे , व्याकुळतेचे , रागाचे , भांडणाचे हे क्षण स्मृती बनून राहतील . पण हे अमृत माझ्या मनात सतत जगण्याची आशा निर्माण करील , वेदनेच्या क्षणी फुंकर घालून थंडावा देतील , असे हे कधी त्याला मी शिकवलेले तर कधी त्याने मला शिकवलेले अमृतमय प्रसंग लिहून ठेवायचे हे आणि पुन:पुन्हा ते वाचून त्या वेळेत जावून जगायचे ,किती सुंदर न ! पुन:पुन्हा आई व्हायचे ! आनंदाचे पंख लावून पुन्हा आभाळात उडायचे !

लहरेन मी , बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
मस्त आहे न कल्पना ?

   आज सकाळी लवकर उठले , आधी डबे करून मग सत्योमसाठी आवरायला कमीत कमी एक तास तर लागतोच , म्हणजे सात वाजेपर्यंत डबे तयार होणे गरजेचे ..आज लाईट जाणार लवकर मग अंघोळ उरकून मग डबे करावे हा विचार केला , आणि अंघोळ आवरली पण आता साडे सहा झाले उरकेल का डबा? झाली घाई चालू .. भाजी चपाती दोन डब्यात आणि उरल्या एक डब्यात साबुदाण्याची खिचडी द्यायचे रात्रीच ठरले होते . तसा साबुदाणा भिजत पण घातलेला .. भाजी उरकली ...पण आता सात वाजले ..
कसे आवरायचे याच विचारात होते मी ,तो मागे येवून बसलेला मला कळलेच नाही .
माझे लक्ष नव्हते ..मग हळूच तो मागे आला आणि कमरेला मिठी मारली .. “अरे माझा ननुबाळ उठला ग माझा पिल्लू , पण आवरा आता उशीर झाला खूप आधीच ..”
“थांब कि ग मम्मी..” लाडात येवून म्हणाला , पण आता वेळ खूप थोडा होता त्याचे ऐकून  जमणार नव्हते .
“सांगितले न आवर म्हणून ..”खोट्या रागाने मी ओरडले ..मग मात्र घाईने ब्रश करायला स्वारी पळाली.. मला हसू आवरेना पण मोठ्याने हसले तर परत रुसून बसायचा म्हणून दाबले . मला आता वेळ खूप कमी होता , बटाटा चिरून मग खिचडी बराच वेळ लागेल म्हणून ब्रश करून आलेल्या पिलूला विचारले , “बाळा आज खिचडीत बटाटा नसेल तर चालेल न रे ?”
“टाक न ग बटाटा , शाळेत मुले नसतील तर कसे दिसेल सांग बरं?”
“रिकामे दिसेल , त्याशिवाय शाळेला अर्थच नाही”
“मग मम्मी बटाट्याशिवाय खिचडी पण तशीच दिसेन कि गं”
पिलूचे हे शब्द ऐकले आणि गुपचूप बटाटा चिरायला घेतला ...


Thursday, 10 October 2013

माझ्या राजसा

मला हसू येतं

तुझे प्रयत्न पाहताना

भिऊन छायेला

स्वतःच्या दूर पळताना

किती अट्टहास तुझा

आपल्या प्रीतखुणा विसरण्याचा 

आपणच कोरलेल्या लेण्या

धुवून पुसण्याचा

अरे माझ्या राजसा

जीवन संपते रे

श्वास दुरावताना

कसे समजावू तुला

किती कोलाहल अंतरी

हृदयातून मोती ओघळताना !


               -संध्या §