या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 14 September 2020

माझी पहिली गझल

मला गझल हा कविताप्रकार आधीपासूनच आवडतो . त्याची लयबद्धता , शेर , मतला ..आणि अतीमहत्वाचे आशय ! पण मी प्रथमपासूनच आळशी आहे . हा स्वभावगुण आहे . जोवर काम अंगावर पडत नाही तोवर ते माझ्याकडे केवीलवाणे बघत असते . आता करायलाच हवे ही स्थिती आली की ते काम पुढे सरकते . लिहीण्यात तसेच ..सहजपणे आणि आता लिहिले नाही तर जमणार नाही ( म्हणजे डोक्यात विचारांची गर्दी मावणार नाही ) तेव्हाच ते लिहीले जाते . माझ्या बर्याच कविता कथा रात्री लिहिल्याशिवाय झोप लागणार नाही अशा परिस्थितीत लिहील्या गेल्या आहेत . असो . हे आळसपुराण खुप मोठे आहे . तर गझल मला आवडते . डॉ शिवाजी काळे माझा फ्रेंड ..छान गझल लिहीतो . मला त्या वाचून नेहमी वाटे आपणही लिहायला हवे ..पण वृत्त आणि मात्रा यांच्यासोबत काही माझे जुळत नव्हते . मेंदूला इतका जबरा ताण ...अशक्य . एकदा अशीच एक कविता लिहीली ( अर्थात रात्रीच ) . काकांची (काकासाहेब वाळुंजकर सर माझ्या काकांचे मित्र )या काही दिवसातच ओळख झालेली .  त्यांना ती कविता पाठवली . आणि विचारले ही गझल होऊ शकते का ? काही वेळात काकांचा रिप्लाय आला ..गझल लिहीण्याचे नियम आणि एकूणच गझलेबद्दल बरेचकाही ..अगदी उदाहरणासहीत.! ..ती कविता गझल होत नव्हती . हे वाच म्हणून त्यांनी बरेच मार्गदर्शन केले . अनेकदिवस असेच गेले . तीन चार दिवसापूर्वी असेच विचार डोके सोडेनात . रात्री चार ओळी लिहिल्याच पण आता गझलेची तोंडओळख झाली होती . मी त्या चारच ओळी काकांना पाठवल्या आणि काकांचा रिप्लाय चांगला आला थोडेफार बदल सुचवले आणि दोन दिवसांनी मी पुन्हा पुर्ण गझल तयार केली . थोडे बदल करून माझ्या पहिल्या गझलेवर शिक्कामोर्तब झाले ! माझी पहिली गझल तयार झाली ! माझ्यासाठी हा क्षण खुप आनंदाचा आहे ... खरंच आहे , खरे गुरूच मठ्ठ आळशी शिष्यही समजेल असे शिकवू शकतात . आयुष्याच्या या टप्प्यात शिकणे किती अवघड असते सांगायची गरज नाही . आपण इतके सहज समजावणारे शिक्षक असतील तर सारेच सोपे होते . इतक्या कामाच्या व्यापात मी गझल करू शकले ते काकांमुळेच . काका निवृत्त प्राचार्य आहेत . त्यांच्या हाताखाली अनेक यशस्वी विद्यार्थी तयार झालेत . मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले यासाठी सदैव त्यांच्या ऋणात राहीन ! धन्यवाद काका .