या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 11 August 2014

माझ्या जीवनाची साठवण

तू आणि तुझी आठवण
माझ्या जीवनाची साठवण
तुझ्या परिसस्पर्शाने,
 मंतरलेले ते क्षण
माझ्या अंतरात जपलेली ,
 मधुर ती ताण
तुझ्या शब्दांचे ,
हळुवार कवण
व्यापून आहेस आयुष्य ,
तूच माझा साजन
आरपार काळजात ,
तुझे नजरबाण
अंगभर फुलवती ,
शहारयांचे रान
आजही डोळे आहे ,
तुझ्याच वाटेस लावून
तुजपाशी अंत जीवनाचा ,जगणे
होवून तुझ्या पदी धुलीकण
तू आणि तुझी आठवण
माझ्या जीवनाची साठवण ....

                                             - संध्या §

Wednesday, 6 August 2014

रिती

गडद आमवसेच्या रात्री
डोळ्यात रुतणारया  त्या काळोखात
पायवाटेत वाकड्या सरळ रेषा ,
कधी टोचतही होते चिमुकले काटे
आणि कधी रक्ताचे ते दवायेव्हडे थेंब,
वेडा प्रयत्न करत होते ,
ती कोरडी रेती भिजवण्याचा !
पण ,
एक वेगळाच हर्ष ह्रदयात उचंबळून येत होता
काहीतरी रिते होत होते ,
रक्ताच्या त्या प्रत्येक थेंबाबरोबर ...
आयुष्यभर मनात रुतलेले ते अपरिमीत ,अगणित
काही अपमानित , तर काही बोचरे क्षण!
पावले तशीच पुढे जात होती ....
रिती होत होती ...
त्यांना त्या काळ्याकुट्ट अंधारात ,
दोन चिमुकल्या , मिनमिनत्या चांदण्या दिसत होत्या ,
तुझेच दोन आर्जवी नेत्र ते .....
रिती होउन तुझ्याकडे बोलावत होते ....
आणि मीही धावत होते ...रिती होउन!
                                                -संध्या§

Thursday, 3 July 2014

रात्रीचे प्रेमगीत

दिस संपला संपला
रात निजली निजली
आळवाच्या पानावर
सुखे सजली सजली


किर्र किर्र काजव्यांची
पानापानात भरली
भेदरली हि पाखरे
खोप्याखोप्यांनी दडली 


धरा गगन कशी ही
एका रंगात नाहली
विसरून तुझे माझे
एकमेकात विरली  


प्रीत पाहुनी तयांची
चंद्रचांदणे हसली
शुभ्र किरणे धरेच्या
गाली सजली सजली


अंग चोरून चोरून
पानेफुलेही लाजली
प्रणयाच्या खेळामध्ये
सारी अवनी नाहली
               -संध्या §

Monday, 23 June 2014

गुरु !

    काही क्षण असे येतात , क्षणात  संपूनही  जातात , कधी संपले हे कळायच्या आत ते भूतकाळ होतात . असे काही निखारे पदरात टाकून जातात कि का झाले ? कसे झाले ? असे केले असते तर टाळले गेले असते का ? मला आज सुचते आहे तेंव्हा का नसेल सुचेल ? प्रश्न आणि अनेक उत्तरे परंतु ती उत्तरे द्यायची वेळही निघून गेलेली ! पण ती वेळच अशी येते कि सारी बुद्धी त्यावेळी निकामी होती काय ? किंवा कसली अशी भूल पडली त्या वेळी ? या प्रश्नांनी आधी मन हैराण होते आणि मग उदासीन ! उदासी इतकी अमर्याद असते कि आपल्या जीवनाला निरर्थक ठरवण्यापर्यंत मनाची मजल जाते .
     खरच जीवन निरर्थक आहे का ? कुणाच्या जीवनातील अस्तित्वामुळे त्याला अर्थ येतो का ? कुणाच्या नाराज होण्याने ते तिथेच थांबते का ? या प्रश्नांची उत्तरे नाहीपाशी येऊन थांबतात ! जर याचे उत्तर नाही आहे तर जीवनातील अर्थ म्हणजे काय ? तो त्याला कसा द्यायचा ? हि विद्या या मनुष्याला कोण शिकवणार ? कि जीवनाच्या शेवटीच हे सत्य उमगणार का ? आणि जर तेंव्हा हे कळणार असेल कि आपण का जगतो तर तेंव्हा वेळ निघून गेलेली असेलच न ?
   हे जीवनाचे सार , सत्य वेळेआधी उलगडणे हि आजच्या तरी काळाची गरज झाली आहे ...समाजात कलीने पाय रोवलेले असताना या आयुष्याच्या नावेला पैलतीर दाखवणारा असा एकच  आहे आणि तो आहे तो परमात्मा ! पण तो भेटणार कसा ? अनेक तपे करूनही त्याची प्राप्ती नाही ! पण त्याच दयाळू ईश्वराने हे ज्ञान उलगडून दाखवले गीतेमध्ये ! तीच गीता माणसाला  जीवनाचा खरा अर्थ सांगते . जे अनेक प्रयोगांनी शास्त्रज्ञांना उमजले नाही ते गीता सांगते . पण गीतेचे हे क्लिष्ट ज्ञान मराठीत समजावले ते जगद्गुरू ज्ञानेश्वर माउलींनी ! आणि तेच अमृत अनुभव सामान्यजनांना भरवले ते गुरूंनी !
    मी माझे रोजचे काम आणि नाती सांभाळण्यात अशी कसरत करत होते कि त्यापलीकडे काही विश्व आहे हेच जणू काही मला ज्ञात नव्हते . परमेश्वराची आराधना करायची ती आपली भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी इतकेच मी करत होते . हे प्राप्त झाले कि ते दे म्हणून त्याची आराधना , उपास ,यात्रा यातच जीवन  अडकून पडलेले . हे करत असताना देवाने मला हे दिले नाही म्हणून त्याचा दु:स्वास करण्यापर्यंत मन धजले . पण या कर्मकांडातून बाहेरचा मार्ग दाखवला आमच्या परमपूज्य गुरूंनी ! ह.भ.प. गोरखनाना शेलार ! आम्ही त्यांना फक्त नाना म्हणायचो . तसे पहिले तर त्यांचे फक्त एकच प्रवचन मी ऐकले . ते भेटले मला ते प्रत्येक वेळी पेशंट म्हणून . पण त्या काही मिनिटांच्या भेटीत ते असे काही सांगत कि ते मनाला स्पर्शून जाई . प्रत्येक वेळी असे काहीतरी शिकवून जात , कि त्या वेळी ते उमजत नसे परंतु जेंव्हा निवांत त्यांच्या बोलण्याचा विचार करत बसे तेंव्हा कळायचे कि नाना आपल्याला शिकवून गेले !
    मागच्या गुरुपौर्णिमेच्या वेळी माझी मनोमन खूप इच्छा होती कि नाना सर्वांना अनुग्रह देतात मग मी पण या वेळी घेणार . बाकीच्या जाणाऱ्यांना मी मला न्या म्हणून सांगितलेही परंतु गाडी दारात आली आणि माझ्याकडे  डिलेव्हरीसाठी एक पेशंट आली . मन खूप हिरमुसले , परंतु मी न जाता ते पेशंट पहिले . त्यानंतर साधारण दोन दिवसांनी नाना आजारी असल्याने आमच्याकडे आले . मी मनातील खंत बोलून दाखवली . मला अनुग्रह हवा होता . नानांनी बाकीच्या गोष्टी बोलून झाल्यावर शेवटी सांगितले तुमची हि सेवा हीच ईशसेवा आहे ! त्या वेळी मला काही समजले नाही , परंतु रात्री झोपेची आराधना करत असता तो प्रसंग पुन्हा आठवला आणि मला माझा अनुग्रह मिळाला !
    त्यानंतर बऱ्याचदा ते घरी आले अनेक विषयांवर चर्चा झाली . मी एक ज्ञानेश्वरीची प्रत आणली होती आणि देव्हाऱ्यात ठेवली होती . ती नानांनी पहिली . आम्ही त्यांना विचारत होतो काय वाचत जाऊ म्हणून , त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरी ! नाही जमले वाचायला तर फक्त रोज एकदा डोके टेकवा त्यावर !
    मला नेहमी आश्चर्य वाटे कि एक सोफ्टवेअर इंजिनिअर या मार्गाकडे वळू शकतो आणि तेही त्यामध्ये इतके गाढ ज्ञान संपादन करू शकतो तेही नोकरी सांभाळून !
    एका दशक्रिया विधीला गेले असता तिथे मला एक हरिपाठाचे एक पुस्तक भेट मिळाले . मी या आधी हे पुस्तक पाहिलेही नव्हते , फक्त ऐकून होते . ते त्या वेळी मी तसेच ड्रोवर मध्ये टाकले , नंतर अश्याच एका निवांत वेळी मी वाचू लागले . जास्त काही समजत नव्हते परंतु वाचले . नंतर नाना सर्दी आहे म्हणून दवाखान्यात आले . त्या वेळी नानांनी विचारले काही वाचता का ? त्यांना नमस्कार करत मी म्हटले नाना हरिपाठ वाचते पण समजत नाही .. नाना बोलले कि समजत नसेल तरी वाचत राहा ...नक्की समजेल . ते त्यांचे शेवटचे शिकवणे ठरले . त्या आजाराने ए आर डी एस चे रूप घेतले आणि त्यातच नानांची प्राणज्योत मालवली . ....
                      माझिया मनीचा जाणोनिया भाव तो  करी उपाव गुरुरावो //१ //
                       आवडीचा मंत्र सांगितला सोपा / जेणे नोहे गुंफा कोठे काही //२//

Thursday, 20 March 2014

काजळाची माया


काजळाची माया
मजवर भारी
उरात भिंगरी
भिरभिरे

वेदनेची फुले
अंगोअंगी झुले
मन कोमेजले
अश्रू ढाळी

विरहाचा शाप
असे मला खास
पिडेचाही वास
माझ्या जीवी

खुपणारे काटे
वाट हि सोडीना
आशा हि सुटेना
विषयांची

भीतीचा अंगार
काळीज हे पोळी
संशयकल्लोळी
लाही लाही

देवा तूच आता
शेवटची आस
थांबवी विनाश
संसाराचा
            -संध्या §.

Thursday, 13 February 2014

प्रेमाची कविता

प्रेमाची कविता लिहिता हात आजही थरथरतात
मनात दाटलेले सारे मेघ डोळ्यातून पाझरतात
संस्कारांची अवजड ओझी , त्यातच तुझी प्रेमळ हाक
कर्कच्च बंध तोडून धावलेली पावले आठवतात
                     
                          *****

भिंतींना शोधत शोधत पायात गुंतलेली ती नजर
डोईवर विसावलेला दूर करून तो डोईजड पदर
तुझ्या प्रीत अर्णवात, क्षणात उसळणारी मी लहर
नाही रे नाही , झाले खाक तरी नसे मज तुझा विसर .

                         *****

                                         -संध्या §.

Monday, 25 November 2013

रात्र

अंधाराच्या निशब्द हृदयीं तू रुजलेली
चंद्रतारकांच्या क्षीरसागरी भिजलेली

अंधाराच्या ...



नाहलीसअन लेली नेसू त्या तमसाचे
त्या नेसुवर ठिपके सजले आक्रोशाचे
दु:ख जीवांचे ओढुनी सारे पांघरलेली
अंधाराच्या ....

दिवसामागून रोजचेच हे येणे जाणे
चराचराला फुलवतेस नव्या प्रभेने
श्रमिकांच्या सुखनिद्रेसाठी मंतरलेली
अंधाराच्या ...

अखिल वेदना वेचुनी झाहली योगिनी
तुझी नीरवता निजलेल्या जीवा अर्पुणी       
सुखस्वप्न घेउनी पुन्हा निशा सजलेली
अंधाराच्या ....

                  -संध्या §