या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 6 June 2011

माझे बाबा

              माझे बाबा  सदैव असलेलं प्रेरणास्थान, आजच्या या बाबांच्या दिवशी त्यांच्या चरणी नमन!
           मला आजही तो दिवस आठवतो, एक भगव्या कपड्यातील साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मी घरीच होते. आई कामात, तिने मला पोत्यातील ज्वारी घेऊन साधुबाबाना द्यायला सांगितले. 
 मी ती भिक्षा दिली आणि नेहमीच्या सवईने त्यांनी मला आशीर्वाद दिला, ''चांगला नवरा मिळू दे!'' 
 त्याच वेळी मळ्यातून आलेले,''बाबा माझ्या मुलीला आधी खूप शिकण्याचा, डॉक्टर होण्याचा आशीर्वाद द्या,                  आणि नंतर चांगल्या नवर्याचा.''
         त्या वेळी साधारण मी पाचवीत होते, त्याच वेळी निग्रह केला, कितीही कष्ट पडले तरी चालेल पण डॉक्टर व्हायचाच. तसं प्रत्येक पाल्याबाबत आई वडील हीच स्वप्न पाहतात, पण माझे बाबा आठवी पर्यंत शिकलेले एक शेतकरी आहेत. माझ्या त्या छोट्या खेडेगावातील मी पहिली महिला डॉक्टर आहे. त्या वेळी काहीही सोयी नसताना माझ्या बाबांनी मला हे स्वप्न दाखवलं! आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली.
         आज मला कसलीही अडचण वाटली तरी प्रथम त्यांची आठवण होते. त्यांनी दिलेला सल्ला मला प्रत्येक द्वंद्वातून बाहेर काढतो. त्यांचा एक एक शब्द मला प्रेरणा देऊन जातात.
         त्यांच्या प्रमाणे माझे सासरेही मला माझ्या बाबांप्रमाणेच आहेत. त्यांच्या मुलीला माई म्हणतात म्हणून आम्ही दोन्ही सुना मोठी माई , बारकी माई! आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही न दुखावणारे आमचे सासरे नेहमी मला वडीलच भासले.
          त्या दोघांसाठी परमेश्वर चरणी आज एकच मागणं.........
''त्यांना आरोग्यपूर्ण, दीर्घायुष्य लाभो! आणि त्यांच्या प्रेमाची, मायेची सावली अशीच आमच्या आयुष्यात राहो!''

Friday, 3 June 2011

उगविला नारायण

     पहाटे उठून अंघोळ करून गच्चीत मस्त विलायची टाकून केलेला चहाचा कप हातात घेऊन, थंड हवेची झुळूक अंगावर घेत चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर भोवतालची रम्य पहाट अनुभवणं काय मस्त ना? खर तर आपण आवर्जून पहाटे उठणं तेही गोड अशी साखरझोप मोडून! नको रे बाबा असच वाटतं पण एकदा तरी हे करावंच. संध्याकाळची रात्र होणं जेवढं मनमोहक तेवढंच किंवा त्यापेक्षा जरा जास्तच रात्रीचा उष:काल होणं प्रेरणादायी. तसं शहरात कदाचित हि पहाट अनुभवान अवघड पण खेड्यात ....
      शहरातील अंगण जरी हरवलं असलं तरी खेड्यात ते अबाधित आहे. अंगणात सडा घालणारी सुवासिनीसुद्धा अजूनही दिसते. शेणाने सरावलेला तो ओटा आणि त्यावर घातलेली ती सुंदर रांगोळी नक्कीच पाहणार्याचा दिवस सुखाचा करून जाते. 
                                           सकाळच्या पारी काय अंगना तुजी घाई
                                            पारोश्या केरावर देव देईनात पाई
                                           सकाळच्या पारी अंगण झाडायाचा परिपाट 
                                            माझिया दाराहून सत्यनारायनाची वाट
       अंधार हळू हळू दूर होत जातो उजाडताना सूर्य उगवण्याच्या आधीच त्याची लाल सोनेरी रंगाच्या किरणांची उधळण संपूर्ण विश्वावर करतो. घरांच्या भिंतींवर पडणारे ते किरण त्या सुवासिनीला कशाची बरं आठवण करून देतात. आपण नाही कल्पना करू शकत. कारणही तसंच आहे, त्या गरीब बापड्या माऊलीच जीवन म्हणजे तिचं कुंकू! तिला त्या कुन्काची लालीमाच मोहिनी घालणार!
                                          उगविला नारायण माझ्या वाड्याच्या लाल भिती
                                           शिळ्या कुंकवाला गं बाई माझ्या लाली किती 
       तुम्ही कधी पाहिलंय का उगवणाऱ्या सूर्याला जी किरणं आभाळात पसरतात अगदी चित्रात जशी रेषांनी दाखवतो तशी. एखाद्या लहान बाळाच्या सोनेरी जावळासारखी!
                                           उगविला नारायण उगवातानी तान्हं बाळ
                                            शिरी गं त्याच्या सोनियाचं जावयाळं  
      सूर्य उगवण्याच्या वेळी घरातील देवपूजा आटोपून ती सुवासिनी जगाला प्रकाश देणाऱ्या राविराजाला कधी विसरत नाही. त्याला ओवाळल्या शिवाय तिचा दिवसच सुरु होत नाही. तुळशीला पाणी घालून, तिला हळदी कुंकू वाहून, ओवाळून नमस्कार करणे आणि सूर्यदेवाला नमस्कार करणे हा तिचा परिपाठच! मग तिच्या या हळदी कुंकवाच्या कार्याक्रमाशिवाय त्या सूर्यनारायणाचा तरी पाय पुढे जाईल का?
                                         उगविला नारायण वरतं जायची तुम्हा ओढ 
                                         हळदी कुंकवासाठी बाई म्या तहकूब केलं थोडं
      थोड्या वर येणाऱ्या सूर्याची किरणं आता तेजानं तळपायला लागली आहेत. हि तेजस्वी किरणं पाण्यावर पडली कि पाण्याचे थेंब हिरे भासतात, तशीच ती अंगनात काम करणाऱ्या सुवासिनीच्या चुड्यावर पडली तर तो  चुडा हिर्यांचा होईल कि नाही!
                                        उगविला नारायण किरण टाकितो झाडावरी 
                                        रतन गं बाई राधायाच्या चुड्यावारी
       अशी हि नयनरम्य सकाळ का करणार नाही दिवस सुखाचा आणि समृद्धीचा? अशी खेड्यातील प्रभात नक्कीच सुप्रभात असते!
                 

Tuesday, 17 May 2011

एका लग्नाची गोष्ट

   एका लग्नाची गोष्ट, तसं पाहिलं तर प्रत्येक तरुण-तरुणीच्या मनातील एक उत्कंठेचा, जिव्हाळ्याचा क्षण. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखच आणेल याची ग्वाही नाही. माझ्या या कथेतही असंच दुःख एका तरुणाच्या आयुष्यात या विवाहाने निर्माण केले आहे.
    पहाटेचे तीन झाले पण नानी काही झोपू शकल्या नव्हत्या. संसाराची गाडी अर्ध्यात सोडून नानांनी काढता पाय घेतला होता. या घटनेला अजून वर्ष व्हायचं आहे. चोरपावलांनी नानाच आजारपण कधी त्यांच्या संसारात दाखल झाल ते नानीला कळल नाही.दोन मुल मोठा संजू आणि छोटा विकास, नानाच कुकुटपालन,त्याबरोबर शेती, संजू आय आय टी करून नुकताच एका खासगी कंपनीत लागलेला, विकासच बारावीच वर्ष चांगल मजेत चालाल होतं. एक दिवस दुपारची वेळ अचानक नाना हाक मारू लागले, '' सुनिता, सुनिता ..'' नानी धावत बैठकीत आल्या.
''अरे देवा, काय झालं? असा का करता?'' हा हा म्हणता नानाचा भलामोठा देह धरणीला आडवा झाला. नानीनं मोठ्याने आवाज देऊन आण्णा, काकी, तात्या सर्वांना गोळा केलं. जीपमध्ये टाकून जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी पुढची चिठी दिली. तसाच पुण्याला, एका खासगी मोठ्या हॉस्पिटलात दाखल केलं. मेंदूच्या कॅन्सरच निदान झालं. केवळ आठ दिवसात नानांनी आटोपत घेतलं...
    नाना गेल्या पासून नानीने अनेक रात्री जागून काढल्या, पण आज झोप न येण्याच कारण वेगळाच, आज संजूच लग्न! वडील गेल्यानंतर वर्षभरात लग्न उरकायला भटजींनी सांगितलं म्हणून घाईने मुलगी बघून सहा महिन्यानंतर लगेच लग्नाची तारीख धरली. नानींना सुनेच्या येण्याचा आनंद वाटत होता पण नानांच्या नसण्याच दु:ख जास्त. संजू तर सैरभैर कुटुंबाची जबाबदारी, आणि जीवनातल्या त्या सुखद क्षणाचं स्वागत. सहजीवनातील स्वप्नसुंदरीच आगमन, आणि नानांच्या नसण्याच दु:ख. कश्यात बुडाव हेच त्याला कळत नव्हत. त्याने फक्त तीनदा शीतल बघितली होती. तशी शीतल नाकीडोळी नीटस, रंगाने उजळ, उंच, दहावी शिकलेली, पाहताच पसंत पडावी अशी. दोनतीनदा पाहिलेली तिची छबी संजूचे मन उजळून टाकत होती. स्वप्न सुखद करीत होती. 
    नानीने उठून अंघोळ करून चूल पेटवली. चहाच आधन ठेवलं. बाकीचे उठून आवरू लागले. लग्न साडेबाराच असल्याने लवकर निघणे गरजेचे होते. करावल्यांच्या बांगड्यांची किणकिण, धावपळ आणि बडबड साऱ्या घरात चैतन्य पसरवत होत्या. आण्णा कडाडले, ''ताई,माई संजूच आवरा, नवरदेवाची मळी काढा. साडेसहा वाजता नवरदेवाला न्यायला गाडी येणार आहे, तुमी पण आवरून तयार असा.'' तशी आणखीन धावपळ वाढली.
बरोबर वेळेला गाडी आली, लांबचा प्रवास असल्याने लवकर निघणे जरुरी होते. पहिल्या गाडीत संजुबरोबर २-३    करवल्या, ३-४ करवले , काकी, २ आत्या आणि एक मामा बसले. बाकी वऱ्हाड  बसने येणार होते. 
   नऊच्या दरम्यान पहिली गाडी कार्यालयात पोहचली. वधुकडच्या सुवासिनी पुढे होऊन वराला ओवाळत होत्या सनईच्या चौघड्यांच्या, फटाक्यांच्या आवजात वरपक्ष्याचे स्वागत झाले. वराचे मित्रमंडळ चेष्टा मस्करी करत होते. या चैतन्याने भरलेल्या वातावरणात कार्यक्रम पुढे सरकत होता. साखरपुडा सुरु झाला. प्रथमच वधु समोर आली मोरपंखी रंगाच्या जरीची किनार असलेल्या साडीत, नेटक्या मेकअप मध्ये शीतल खूप लोभसवाणी दिसत होती. संजूला तिला पाहताच अंगावरून हजारो मोरपीस फिरल्याचा भास झाला. विधी चालू असताना त्याच सर्व लक्ष शीतलकडेच, तिच्याबरोबरच्या सुखस्वप्नात विचारांच्या झोपाळ्यावर झुलत होतं. साखरपुडा आटोपला, नवरी दिलेली साडी नेसून आली. भटजींनी पूजा केली, पाच सुवासिनी पुढे होऊन नवरीची ओटी भरली. शीतलने वाकून सर्वाना नमस्कार केला.
    हळदीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. नंतरच वर्हाड आलं होतं. पांढरा कुर्ता पायजमा  टोपी आणि कपाळाचा गंध लावलेला संजू पाहून, आजीला नानाची आठवण झाली. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागले. संजू हुबेहूब पित्यासारखाच, नानाच पुढे बसल्याचा भास होई. हिरवी काठपदराची साडी नेसलेली शीतल नजर लागावी अशी छान दिसत होती,थोडी बावरलेली अधिकच रूप खुलवत होती. मोत्याच्या मुंडावळ्या लावलेली नवरा नवरी सगळ्यांच्या नजरा वेधून घेत होती. हळद लावायला सुरवात झाली प्रत्येक सुवासिनी येऊन आधी नवरदेवाला हळदी कुंकू लाऊन नंतर डोक्यावर  गालांना हाताना पायांना हळद लाऊ लागल्या.नंतर नवरीला तश्याच प्रकारे हळद लावत. विजुदादाच्या वहिनीने संजूच्या तोंडात हळद कोंबली मग काय सगळ्या करावाल्यांचा गोंधळच चालू झाला. जे ते एकमेकांना हळद लाऊ लागले.विजुदादाच्या वहिनीला तर सर्व कर्वल्यानी मागे पळून पळून हळद लावली. या मस्तीत नवरी मात्र जास्तच बावरायला लागली. पण शीतलची मोठी बहिण तिला सावरू लागली. संजूला थोडं खटकलं, तो मेहुणीला म्हणालाही,''मस्तीची सवय नाही का? आमच्याकड सगळ्यांना चेष्टा करायची सवय आहे, तुम्ही हि सवय करून घ्या.'' मेहुनीही म्हणाली,''नाही दाजी, होईल तिलाही सवय होईल.'' तिने वेळ निभाऊन नेली पण संजूच समाधान झालं नाही. या गडबडीत हळद संपली. 
   लग्नाची वेळ जवळ आल्याने, घाईत नवरदेवाचा संपूर्ण पोशाख केला. वेळ कमी असल्याने मांडवातील अंघोळीचा कार्यक्रम रद्द केला. नवरदेव सजून घोड्यावर चढला, त्याला मनातून सारख वाटत होतं हे घडलं ते नानीला सांगाव त्याची नजर नानीला शोधात होती पण त्या कुठे दिसल्याच नाही. घोड्यावर चढल्यावर ती एक अशाही मावळली. कुणाला काही सांगावे का नाही हे त्याला सुचेना. उगाच काही अडचण नसेल तर गैरसमज व्हायचा. नवरदेव मारुतीरायाच दर्शन घेऊन आला पण त्याच्या मनातील विचारांचं वादळ काही थांबल नाही. नाना असते तर त्याच मन भरून आल... 
    सनईच्या  सुरांमध्ये वधु वर लग्न मंडपात येऊन उभी राहिली. शीतल आता खूपच सुंदर दिसत होती आणि शांतपणे गालातल्या गालात मंद हसत होती. तिचा तो स्मितहस्यातली छबी बघून संजूच्या मनातील वादळ शांत झालं. त्याच त्यालाच शरमल्यासारख झालं. मंगलअष्टकांच्या मंगलमय गजरात आणि सनईच्या मंजुळ स्वरात  विवाह पार पडला. त्यानंतर सप्तपदी होम सर्व विधी आटोपले. विवाह पार पडला. 
     नवरीच्या पाठवणीची वेळ तशी प्रत्येक लग्नातील भावपूर्ण वेळ. ज्या घरी मुलगी लहानाची मोठी होते, सर्वांची लाडकी असते, तिच्या प्रत्येक इछ्या पूर्ण करण्यासाठी जीवच रान केलं जातं अशा घराला सोडून जाताना  प्रत्येक मुलगी साश्रूपूर्ण मनाने निरोप देत घेत असते. परत परत जाऊन आई वडील भाऊ बहिण  सर्वांच्या गळ्यात पडून रडत असते. शीतलने असं काहीच केलं नाही उलट मोठ्या बहिणीला ती सामानाबद्दल विचारात होती. दु:खाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण बोललं कुणीच नाही...
   नवरा नवरी परतीच्या वाटेला लागली. घरी आल्यावर दोघांच ओवाळून स्वागत करण्यात आल माप ओलांडून  नवरी आत आली. आत आल्यावर कावरी बावरी बघायला लागली. कोपर्यात घुसू लागली बहिणीला बिलगु लागली. नानीला थोडं विचित्र वाटू लागलं. जश्या बायका नवरी पाहायला येऊ लागल्या आणि गर्दी वाढु लागली तशी शीतल जास्त अस्वस्थ झाली आणि वेड्यासारखे हावभाव करू लागली. नानी घाबरल्याच, ''हिला काय झालं?'' विचारातच होत्या ती भांडे फेकून देऊ लागली. संजू नानीच ओरडण ऐकून धावतच आला. तत्क्षणी त्याला झालेल्या फसवणुकीची जाणीव झाली. नानी मटकन खाली बसल्या रडू लागल्या. तोपर्यंत शीतलच्या मोठ्या बहिणीने तिला दुसर्या खोलीत नेऊन एक गोळी देऊन शांत झोपवल. तिची मोठी बहिण बाहेर येऊन माफी मागू लागली, पण संजू नानी सर्वजण स्तभ्ध होती. त्यांच्यावर परत एकदा आभाळ कोसळलं होतं..........  
         

Tuesday, 10 May 2011

माझे सारे जीवन देई मम बाळाला...

   रात्री झोपतानाच उद्याच्या कामाची यादी शालिनीने आळवली. सकाळी गडबड नको म्हणून रात्रीच डब्याच्या भाजीची तयारी करून ठेवली म्हणजे सकाळी फोडणी टाकली कि झालं. जसा छोट्या झालं तसं शालीनीची धावपळ व्हायची. शालिनीच्या लग्नाला आठ वर्ष होऊन गेली. तिचे यजमान माध्यमिक शाळेवर शिक्षक.लग्नानंतर दीड वर्षाच्या आत मोठा मुलगा आनंद झाला. तो सहा वर्षाचा झाल्यावर छोट्या झाला. दोन महिन्यापूर्वी त्यांची नगर येथे बदली झाली. सर्व नवीन वातावरण,जास्त कोणाची ओळख नव्हतीच.दिवसभर काम असल्यामुळे व ती राहत असलेली खोली दुसऱ्या मजल्यावर असल्याकारणाने तिचा अजून कोणाशी स्नेह वाढला नव्हता.   
    कर्र घड्याळाचा गजर होताच उठणे हा तिचा नियम, कधीच थोड्या वेळाने उठते असं ती म्हणत नसे.रोजच्याप्रमाणे उठून सर्व साफसफाई केली.भर्रकन अंघोळ उरकली आणि डबा तयार केला. तोवर यजमानांची अंघोळ आटोपली. त्यांचा नाष्टा देऊन तिने आनंदला उठवलं. आनंदला अंघोळ घालून यजमानांचे कपडे दिले. आठच्या ठोक्याला ते बाहेर पडले. आनंदच दुध पिऊन होईस्तोवर तिने त्याच दप्तर आवरलं. बूट घालेपर्यंत रिक्षाचा हॉर्न वाजला,आनंदला बसून ती धावतच वर आली.
   इतकी धावपळ संपेपर्यंत ती छोट्याला जणू विसरूनच गेली होती. हि जाणीव होताच तिचं मन गहिवरून आलं, त्याच्या शांत निद्रिस्त मूर्तीकडे पाहून तिला क्षणभर वाटलं ह्याचा आणि दिवसभराच्या मस्तीचा दुरूनही मेळ बसणार नाही. तिने स्वतासाठी चहा बनवला कपात ओतून बाहेरच्या खोलीत येऊन बसली. कप अर्धा रिकामा होईपर्यंत स्वारी अंथरुणात उठून तयार! शालिनी कप ठेऊन तशीच पळत जाऊन त्याला पकडलं नाहीतर त्याने पुढच्या क्षणी कॉटवरून खाली उडी मारली असती. दिवसभर इतकंच लक्ष ठेवलं तर ठीक नाहीतर काहीतरी दुखापत ठरलेलीच! तिला नेहमी आश्चर्य वाटायचं आमच्या आख्या दोन्हीकडील कुटुंबात एव्हडा उपद्व्यापी जीव कुणीच नाही जे ते आपापल्या कामात व्यग्र असणारी मग हा असा का? पण घरात सर्वांचा अगदी जीव कि प्राण तिचाही, आनंद्पेक्षा काकणभर प्रेम छोट्यावर जास्तच पण आनंदनेही कधी त्याला पाण्यात पहिले नाही. आनंद स्वभावाने शांतच पण बऱ्याच वर्षांनी त्याच्याशी खेळणारा त्याला भेटला म्हणून कदाचित, पण स्वतःची सर्व खेळणी तो छोट्याशी वाटून खेळत असे. 
   आज शालिनी जरा शांतता अनुभवत होती कारण रोजच्यापेक्षा छोट्या जरा स्थिरच होता कदाचित वादळापूर्वीची शांतता! तशी ती सदैव सतर्क असे कारण या महाराज्यांचा भरवसा नसायचा.छोट्याचा खाणं दुध पिणं, अंघोळ आटोपून त्याच्या पुढे काही खेळणी सरकून ती बाकीची आवारा आवर करू लागली. सगळं काम उरकलं तरी पिल्लू खेळत गढून गेलेलं. बघून शालिनी जरा सुखावली. पोटात भुकेची कळवळ जाणवली पण तिला वाटलं हा खेळतोय मग धुणं धुऊन नंतर जेवावं म्हणजे थोडी वामकुक्षी छोट्या बरोबर मिळेल. तशीही तिची झोप पूर्णच होत नव्हती.     
   शालिनी कपडे धुण्यासाठी बाथरूम कडे गेली. थोडं उरकलं पण भूख परत आठऊ लागली त्याच नादात आणि पाण्याचा आवाजात तिला कळलंच नाही, छोट्याने बाथरूमची बाहेरून कडी घातलेली. पाणी चालू असताना घाम  येतोय हे दिसताच तिला बंद दाराची जाणीव झाली, अरे देवा! ती मटकन खालीच बसली. अंगाला दरदरून घाम सुटला. डोळे आपोआप वाहू लागले. प्रत्येक देवाच्या पायाशी ती कधीच जाऊन आली तिला कळलच नाही. डोकं बधीर झालं होतं. ती भानावर आली ते छोट्याच्या रडण्याने. शालिनी सगळं बळ एकवटून, ''छोट्या छोट्या '' जिंवाच्या आकांताने हाका मारू लागली. तिचा आवाज ऐकून छोट्या परत दाराजवळ आला. ती त्याला कडी उघडायला सांगू लागली पण तोही लहानच! ती सुचवत असलेल्या सर्व सूचना त्याच्या आकालानाबाहेरच्या!    
   शालिनी आयुष्यात इतकी हतबल कधीच झाली नव्हती. ती बाथरूमच्या खिडकीतून बाहेर हाका मारू लागली पण खिडकी इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असल्याने काहीच साद मिळण्याची शक्यता नव्हती. तिच्या मनात अनेक विचार थैमान घालू लागले. प्रत्येक विचाराबरोबर तिच्या अंगावर शहारे येऊ लागले आणि अश्रू दुपटीने वाहू लागले. तितक्यात आठवलं जिन्याचा दरवाजा उघडा आहे, छोट्या जर जिन्यात गेला आणि पडला तर? जिना उतरून रस्त्यावर गेला तर? एखादी गाडी जोरात आली तर? जर स्वयंपाकाच्या खोलीत गेला तर? ग्यासजवळ गेला तर? हे न ते, डोक्याच्या चिंध्या होत आहेत असं तिला वाटू लागलं.प्रत्येक देवाला नवस बोलून झाले. वेड्यासारख्या कितीतरी वेळ ती, ''छोट्या छोट्या छोट्या .........'' म्हणत सुटली. 
  मान कापल्यावर कोंबडी जशी तडफडते, पाण्याबाहेर मासा जसा तडफडतो तशी अवस्था शालीनीची होती. आतापर्यंत छोट्याही रडून रडून दमला होता आणि  शालीनी....... एकचा टोला झाला. तिला जाणीव झाली यजमानांना यायला अजून दोन तास बाकी आहेत. खिडकीतून बाहेर फक्त उन आणि एक गुलमोहर नुकतीच लाल फुले लागलेला, तिला नेहमी तो लाल रंग मोहून टाकायचा पण आज तीच फुले तिला निखार्याप्रमाणे भाजत होती. पाण्याचा थंड स्पर्श अंगावर काटे फुलवत होता. मनातील या विचारांचे असंख्य कंगोरे तिला काट्या सारखे बोचत होते. 
  शालिनीला काय वाटले तिलाच कळले नाही, ती पुन्हा हाका मारू लागली, '' छोट्या, छोट्या .....'' तिला जाणवलं तो दाराशी आहे. ती प्रेमाने सांगू लागली, '' छोट्या, बाळा झोप आता, गाई गाई, सोन्या बाळा झोपी जाई.'' कधीही तिचं न ऐकणारा बाळ आजच्या दोन शब्दांच्या अंगाईने झोपी गेला. त्याची उ उ कमी होताच तिने दाराच्या फटीतून पाहिलं पिल्लू शांत झोपला होता. शालिनीच्या मनातलं काहूर आता कुठ थोडं विसावलं. आता वाटू लागलं छोट्याचे बाबा येईपर्यंत त्याने असंच झोपून राहावं. तिची भूख कधीच परागंदा झाली होती. आता वाट होती पतीराजाची! तिचे कान आता दाराकडे लागले. 
   आता छोट्याच्या बाळलीला आठउन पुन्हा पुन्हा  भरतीच्या समुद्राप्रमाणे शालिनीच मन भरून येत होतं, आणि आताचा प्रसंग समोर   
येताच तिचा थरकाप होत होता. तीनचा टोल पडताच तीच मन आणखी सुखावलं तशी जिन्यावरच्या हालचालीचा वेध घेऊ लागली. पावलाची टप टप जाणवली आणि पुढचा मागचा भान न ठेवता जोराने दरवाजा बडवायला सुरवात केली. छोट्याचे बाबा त्याला बाथरूम बाहेर झोपलेला आणि दाराच बडवण ऐकून गांगरून गेले. त्याच वेळी छोट्याही धडधड ऐकून जागा झाला न रडू लागला. बाबांनी दर उघडताच शालिनीने बाळाला कवटाळून मोठमोठ्याने रडू लागली. दोघानाही रडताना पाहून, त्याचं मिलन पाहून काय घडल याची कल्पना नसतानाही छोट्याच्या बाबांना गहिवरून आल. जन्माला येऊन कसलं दु:ख  न पाहिलेली शालिनी आज ढसाढसा रडत होती पण बाळ भेटल्याच्या आनंदान....... 
    आजही जर तिला तो प्रसंग आठवला तर डोळ्यानच्या कडा आपोआप ओलावतात आणि एक ओळ ओठांवर येते, ''देव जरी मज कधी  भेटला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला....''
   

Wednesday, 4 May 2011

सांजवेळ

                               '' सांज ये गोकुळी, सावळी सावळी ''  
 किती सुंदर वर्णन आहे हे गोकुळातल्या संध्याकाळच! खेड्यातली सायंकाळ इतकीच सुंदर!
मनाला चैतन्य देणारी!  सायंकाळी नदीच्या पाण्यात सूर्यदेवाने फेकलेला तो केशरी रंग,
 आसमंतात तो केशरी रंग उधळलेला आणि मनसुद्धा याच केशरी रंगानं भरून वाहणारं. 
अशी ही नवचैतन्य निर्माण करणारी खेड्यातली संध्याकाळ! दिवसभराच्या कष्टाने थकून
 भागूनप्रत्येकजण घराकडं निघालेला माणसापासून पक्षी गुरे सर्वजण! 
           '' दिवस मावाळीला लक्षमी शेताचा बांध चढ,
              तान्हा गं माझा राघु हाती गोफण पाया पड''  
  दिवे लागणीची ही वेळ कातरवेळ असते. आणि ती निवांत, शांत, व एकटी असेल तर काही
 सांगायलाच नको, मनाच्या तळाशी असलेल्या कडू गोड आठवणी तरंग होऊन कधी काठांनाभिडतात
 कळतच नाही. अश्या वेळी आठवणींचे पिसारे मन भरून टाकतात. मला ही वेळ मनाला उभारी देणारी
 भासते. असं वाटतं सारा निसर्ग, सारे आप्तेष्ट, माझा सुखाचा भूतकाळ आणि प्रेमाने भरलेला वर्तमान
 माझ्या या आयुष्याला एक सुखाची किनार बहाल करत आहेत.या सुखाचे या चैतन्याचे मी स्वागतच
 करणार आहे, अगदी भरल्या मनानं! 
           '' दिवस मावळीला तुम्ही दिव्याची जल्दी करा,
             लक्षमी आली घरा मोत्या पवळा यांनी वटी भरा.
  माझ्या बालपणी, मला आठवतं गाई गुरे दिवसभर रानात चरून संध्याकाळी घराची वाट धरत. गाई 
हम्बारत घराच्या ( गोठ्याच्या ) दिशेने धावतच येतात आणि त्याच वेळी गोठ्यातली वासरं गळ्यातलं 
दावा तोडण्याचा प्रयत्न करत आईच्या आवाजाला साद देत होती. गाय गोठ्यात येताच आई बाळाच्या 
मिलनाच ते दृश्य अवर्णनीय.
            '' दिवस मावळीला दिवा ओसरया बाईला,
              तान्हा ग माझा राघु सोडं वासरू गाईला.''
     अशी हि रम्य संध्याकाळ पुढे सरकत असतानाच नकळत अंधार संपूर्ण सृष्टीवर हळू हळू पांघरून 
घालायला लागतो. प्रत्येक जीव स्वप्नांच्या अंथरुणात पहुडतो, उद्याची सुख स्वप्ने आजच्यापेक्षा 
दुप्पट उमेदीने पूर्ण करण्यासाठी.........

                          ( हा माझा पहिलाच लेख-प्रपंच वाचकांनी गोड मानून घ्यावा हि विनंती.यामध्ये
  समाविष्ट केलेल्या जात्यावरच्या ओव्या माझ्या सासूबाई यांनी सांगितल्या आहेत त्या त्यांच्याच भाषेत 
मी देण्याचा प्रयत्न केला आहे )
             *जात्यावरच्या ओव्या - पूर्वीच्या काळी बायका पहाटे उठून जात्यावर दळण दळत त्या वेळी 
त्या ओव्या गात. आता त्या फक्त लग्नाच्या आधी घाना बांगड्या हा विधी असतो तेव्हाच ऐकायला मिळतात.