या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !
Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Tuesday, 17 February 2015

ताक

  ताक ! हि अशी गोष्ट कि लहानपणी ती प्रत्येक घरात असणारच ! आज दुधाचेच भेटणे मुश्कील तर ताकाची काय व्यथा ..चहा आला तरी त्यात थोडे दुध जास्त पाणी . बळेच तो पाण्याचा चहा नरड्याखाली ढकलायचा . शहरात तर हीच स्थिती . खेड्यांमध्ये थोडी बरी परिस्थिती , कमीतकमी तिथे पिशवीचे दुध नसते . तशी मी अश्या गावात राहते जिथल्या मातीला खेड्याचा सुगंध आहे आणि आभाळाला शहराचा रंग आहे ! म्हणून  पाणी न मिसळेले दुध आम्हाला सहज उपलब्ध आहे . आणि त्यावर साय तर अशी जाड चांगली येते . पण माझे तोंड बांधलेले आहे कारण वजन ! बरे लेकरांना दुध गाळून दिले तरच पिणार , मग काय त्या सायीचे विसर्जन प्रत्येक दिवशी दह्यात . मला साय खायला खूप आवडायची , म्हणजे आवडते पण . लहानपणी आईची नजर चुकवून चुलीवर कोळशाच्या धगीवर उकळणारे ते दुध आणि त्यावर आलेली ती साय भेटली कि अमृत भेटल्याचा आनंद ! आज चणे आहेत पण दात गेले .. मग आता माझ्याकडे साधारण आठवड्यात दह्याचे पातेले भरते . मग ताक !
          ताक करणे खरच म्हणजे खरंच खूप आनंददायी असते . अगदी कृष्णाच्या गोकुळात गेल्याचा भास होतो. दह्याचे पातेले फ्रीजमधून बाहेर काढले कि पहिली आठवते माझी आजी . रंगाने उजळ , नऊवारी साडी , चोळी घातलेली , चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा भरगच्च , पण एक लाजरे हसू त्यांना षोडशीपेक्षाही सुंदर करत होते . अशी माझी आजी ताक करायला लागली कि जणू मथुरेची यशोदा भासे . मागच्या दारातल्या आंब्याच्या झाडाला रवी अडकवण्याची दोरी होती . स्वच्छ सारवलेली जमीन आणि एका डब्यात आजी ताक करे . ती रवीची लयबद्ध हालचाल , आणि डब्यातल्या ताकाचे त्याबरोबर उसळणे . जणू एखादी लावण्यवती रस्त्याने ठुमकत चालत आहे आणि भोवतालची गर्दी उगीच आनंदाने , हर्षाने  उसळत आहे ! अलगद त्या लोण्याने डोके वर काढावे आणि आजीने ते मोठ्या नजाकतीने , हातांवर नाचवत वर काढावे . ते धुवून घेणे हि पण एक कलाच बर का ! कारण ते हाताला चिकटलेले लोणी , मऊ अगदी सोडवत नाही पण हळुवारपणे ते पातेलेल्या पुसत राहावे . बोटांच्या मध्ये साचलेले ते लोणी लहानपणी जेंव्हा आजी भावाला चाटावी  न तेंव्हा मी लहान का नाही याचा खूप खेद होई , आणि मग वाटे मी रांगत असेल तेंव्हा आजी मलाही चाटवत असेल ! शेवटी ती तो गोळा फिरवत फिरवत मस्त गोल करायची . त्यात बोट घालणे म्हणजे एक मनात रुंजी घालणारी खोडी ... पण ते केल्याशिवाय मी काही हलत नसायची ...मग हळूच ते बोट तोंडात ..काय चव होती ...सांगणे तसे अवघडच ! पण आठवले न कि मनीमानसी आनंद दाटतो .. आणि एक स्मिताची रेषा चेहऱ्यावर उमटते , आजही !
         आताही जेंव्हा जेंव्हा मी ताक करते तेंव्हा मला हे सारे जसेच्या तसे चित्रपट पहावा तसे नजरेसमोरून जाते .. हे वाचणाऱ्या किती जणींनी हा हर्ष अनुभवला असेल , ताक करण्याचा पण मी जेंव्हा ताक करत असते तेंव्हा फक्त एक स्मित असते मनात आणि मुखावर .. मग कुणीतरी म्हटलेले आहे , 'ताक करणारी स्री  पहिली ना गोकुळातली ती समाधानी यशोदा आठवते , एक सुखी , समाधानी स्री आठवते ...' हे सत्य आहे सख्यानो ! एकदा ताक करून पहाच ...गोकुळात आहात असे वाटेल ! 


Sunday, 8 April 2012

पाऊस पडून गेल्यावर

  पाऊस हि जशी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट तसे पाऊस पडून गेल्यावर भेटणारा निसर्ग माझा सगळ्यात जीवश्चकंठश्च सखा ..खूप खूप आवडीचा ...अनेकदा खूप आतुर असते मी त्याला भेटायला ...जणू तो गवसल्यावर मी पुन्हा उमलून येणार आहे ...आणि तसे होतेही , मन असे भरून येते उत्साहाने कि सर्व भोवताल सुख पेराल्यासारखा भासतो ...प्रेमाच्या स्पर्शासाठी आसुसलेली मने जशी मोहरून जातात ...धुंद होतात ...सर्व जगाला विसरून स्वत:मध्ये हरवून जातात ..त्यांना काही सोयरसुतक राहत नाही कुणी काय बोलेल याचे ...तशी मी विसरून जाते स्व आणि विरघळून जाते त्या मनमोहन निसर्गात ...
   अजून छान आठवते मला, शाळेतून आल्यावर पाऊस पडलेला असेल तर जेवणाच सुद्धा भान नाही तशीच उधळायचे म्हणा न ...पश्चिमेला चालत राहायचे ...उजाड माळरान पण त्या वरुणाने त्यालाही असे स्वच्छ केलेले कि पिवळ्या पडलेल्या त्या गवताच्या काड्या चक्क सोनेरी दिसायच्या आणि त्याच्यावर पडलेल्या त्या सूर्यकिरणांनी पुन्हा प्रकाश परावर्तीत करत आहेत असे भासायचे .. अनेकदा कुणाचा दागिना पडला असे वाटून मी त्यांना हातात पण घेवून पाहायची ..त्या काड्यांचा मऊ लीचापिचा स्पर्श मला अनेकदा त्यांना परत परत उचलण्यासाठी भाग पडायचा ...कितीदा मी पुन्हा पुन्हा फसायचे, त्यावर पडलेले ते थेंब मला अंगठीतले खडे भासायचे.
    काही ओघळी वाहत असायच्या तर काही वाहिलेल्या पाण्याचे ठसे दाखवायच्या ...माझी मीच विचार करायचे पाण्याचे कुठे ठसे असतात का, आणि मनाशीच हसायचे ...पण त्या खुणा असतात हि गोष्ट जशी मोठी होत गेले तशी उलगडली ..गढूळ पाणी आधीच वाहून गेलेले असायचे आणि आता स्वच्छ ,नितळ पाणी बघितले कि ओंजळ भाराविशी वाटायची ,वाटले ते केले नाही तर ते लहानपण कसले ? मग चप्पल काढून हळूच त्या पाण्यात पाय घालायचे ,ती मऊ माती जणू पायाला मखमल भासायची , मग त्या ओघळीने पुढे पुढे चालत जायचे सावकाश त्या मऊ मखमलीचा स्पर्श अनुभवत काहीतरी वेगळे वाटायचे ...अंगभर शहारा आणायचा तो स्पर्श ..मऊ मातीचा सुगंधी स्पर्श ..
      धूतलेल्या गवतासारखे धुतलेले दगड आणि लहान मोठ्या शिळा पण जवळ बोलवायच्या मला ..बघ मीही सुंदर आहे म्हणून ! त्या हिरव्या पिवळ्या गवतातले ते काळे दगड वेगवगळ्या आकारांचे - कुणी पूर्ण गोल तर कुणी वरून चपटे जणू बसायला तयार झाले आहेत ते .. मग खेळ सुरु व्हायचा या दगडावरून त्या दगडावर ... ते दगड पण साडीवरच्या बुंदक्याप्रमाणे वाटायचे


   पहिल्या पावसात ते शिवार धुतलेले पिवळे वस्र पांघरल्यासारखे वाटायचे मग दिवस थोडा कलला कि केशरी पिवळा एकत्र झालेल्या त्या रंगाला अजून काही उपमा मला तरी सुचली नाही पण डोळे दिपून जायचे , आणि वेड लागायचे त्या रंगांना डोळ्यात साठवायचे ...नंतरच्या पावसात मात्र धरती जणू ते पिवळे वस्र फेकून हिरवे नेसायची ...त्या हिरवाईवर उडणारी फुलपाखरे ...त्यांच्या मागे पळणे ...त्यांच्या पंखांचे रंग पहायचे आणि ते मोजायचे ..पुन्हा नवे फुलपाखरू ..पुन्हा नवे रंग ..नुकतीच उमलेली ती रानफुले इतकी लोभस असायची कि कोशातून आताच बाहेर आली आहेत आणि उत्सुकतेने या अतिसुंदर दुनियेला अनिमिष नेत्रांनी न्याहाळत आहेत ,जणू हे जग आताच नव्याने बनले आहे फक्त त्यांच्यासाठी ! मग मलाही त्या फुलांच्या विविधतेचे खूप नवल वाटायचे ..काही लाल ,गुलाबी ,जांभळी ,पांढरी ,पिवळी .... काही लहान अगदी डोळे जवळ नेवून पाहायला लागायची तर काही मोठी ..काही कानातल्या कुड्या बनायची तर काहींच्या बुंध्याचा रस गोड लागायचा ..काही फुलांना एकत्र गुंफून वेणी बनायची तर काहींना एकात एक करून छान चक्र बनायचे ...
       किती नवलाई आहे हि! सुखाच्या राज्याची जणू राणी बनायचे मी त्या नाविण्यात हरविलेली ..त्यापासून दूर ओढणारी प्रत्येक व्यक्ती मला शत्रू वाटायची .. तोच तो मावळणारा दिवस ...आवडायचा पण त्याने तिथेच  थांबावे असे वाटायचे , पण तो कसला थांबतो ...तेंव्हा मात्र त्याचा खूप खूप राग यायचा ...माझा तो शत्रू बनायचा ..आणि अंधाराला मग तो पाठवून द्यायचा या माझ्या स्वर्गाला झाकायला ...

Thursday, 17 November 2011

मला भीती वाटते ...

     मला भीती वाटते .....जेव्हा कधी सुख हुरळून माझ्या पदराच्या दिशेने धाव घेतंय असं भासलं मी पदर पकडून बसून तशीच उभी राहिले ...सुख मात्र मला हुलकावणी देत दुसरीकडेच ...मी वेडी एका क्षणाची भुकेली पण उन वाराच मिळाला अन्न पाणी कधीच नाही ...विज्ञान शिकताना वाटायचं धन आणि ऋण सारखेच असल्याशिवाय वस्तू स्थिर राहायची नाही तसच आयुष्य असेल ...धन ऋण सारखेच मिळतील ...पण फक्त ऋण मिळूनही माझं आयुष्य इतकं स्थिर कसं आहे ! आश्चर्य आहे नाही ? मन सतत एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करत असे विज्ञानाचा नियम माझ्या आयुष्यात चुकीचा का ठरला ? का मी अपवाद आहे ? अपवादाचा शिक्का घेऊन तशीच जगत आहे ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणी दु:ख वाटून घेणारे भेटले कि त्याच्याही पाठीवर  नियतीने आसूड टाकला ...त्याचं दु:ख पाहून पाऊस डोळ्यात दाटला ...आईने  सांगितलेलं सुखं वाटावीत दु:ख स्वताची स्वतः भोगावी ...पण ती मिळायच्या आधीच ...ते कापरासारखं हवेत विरघळले तर काय करायचे हे सांगायचं आई कशी विसरलीस तू ? आताशा तिलाही विचारायची भीती वाटते...तिला दु:ख होईल म्हणून ! कापूर ओंजळीत यायच्या आधी विरघळला ...वास मात्र नाकापर्यंत आला ...त्यावर समाधान पावले ...नाही ...मनाची समजूत काढली तशी ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणाचं सुख चोरून घेताना ...त्याचा काय दोष आहे ...ते  माझ्या प्राक्तनात नाही याचा ! शेवटी मलाच माहित वेदना काय असतात ,कशा सहन कराव्या लागतात आपल्या जवळचं ओरबाडले जाताना ! चोरी करणे पाप आहे हे पाहिलं मी समाजात जेव्हा कुणी शिक्षा भोगताना दिसलं ...माझ्या जवळचं ओढून घेणाऱ्याने ते पाप म्हणून का नाही दूर लोटलं? त्याला सुख मिळाले मला आनंद आहे ...पण ते अंगवळणी पडताना आभाळ मनी दाटलेले आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...चुकून ,अपवादाने मिळत जेव्हा थोडं सुख ,एखादा अणु असावा जसा या भल्या मोठ्या पृथ्वीवर ! शोधत राहते अनेक गणितं मनात ठेऊन ...मिळाल्याची जाणीव होते पण बाकीचे दाखवायला टपलेले असतात ...मी कशी चूक आहे ते ... आणि सिद्धही करतात स्वताला ...मी मात्र सिद्धता शोधातच राहते ! कधी सापडेल मला ? सापडेल सापडेल मी मनाला दटावलं आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ... घामेजलेल्या माझ्या हातात जरी सुख आलं तरी नाही न जाणार निसटून ?  समुद्राच्या काठच्या त्या वाळूसारखं ...निसटतेहि ते ...मी विचार करते मी तर घट्ट आवळल्या मुठी ,मग काय बिघडलं? मला लाभणार नसेल तर का मला हुलकावणी देत हे ? प्रश्न मनात यायच्या आत ...मी त्याला समजावते गंधाळेल कधीतरी ती गुलाबी फुलांनी वाकलेली ,कागदी फुलांची वेल ! आणि सापडेल मला पाणी त्या भयानक वाळवंटात ...मृगजळामागे धावत आहे मी उर फुटेपर्यंत ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ......................... 

Sunday, 6 November 2011

काट्याच्या झाडावरचं फुल

           रुतणारे दगड आणि बोचणारे काटे संपतील का कधी? जीवनाशी पैजा  घेत चालतेच आहे एका निवाऱ्याची आणि निवांत विसाव्याची वाट बघत ..... देवालाही साकडं घातलं दे मला प्रेमाचा पाऊस ज्यात भिजून आत्तापर्यंतच्या वेदना ,थंडाव्यासाठी आसुसलेल्या, तुझा स्पर्श होताच उडून जाऊ दे त्या रुईच्या म्हातारीसारख्या माझ्या दृष्टीपलीकडे .........पण तोही नाही बरसला ....वाटल असेल काही काम माझ्याही पेक्षा गरजेच ...कदाचित माझ्याही वरचढ असेल त्याचं दु:ख ....परत येशीलच कि .... मी वाट पाहीन ...तसंही वाट पाहून मिळालेलं सुख किती गोड असतं ते त्या चातकानी सांगितलं होत मला ! या उल्हासित आठवाणे परत व्यापून टाकल मन माझं...बारा महिने नाही त्याही पेक्षा जास्त प्रतिक्षेची तयारी केली त्याने ! त्या रसभरीत स्वप्नांनी प्राण पेरले कणा कणात ! उद्या नक्की माझ्या दारात सुखाचं झाड उगवणार होत ! स्वप्नांच्या या गरुडावर स्वार होऊन कधीच गेलं ते विश्वाच्या भ्रमनासाठी! त्याला वरून सगळ सुजल सफल दिसत होत ! थंडगार आंब्याचं झाड , रसरसलेल्या फळांनी बहरलेलं, वाटलं जावं जवळ त्याच्या ...गेले तिथं एका फांदीवर विसावलेही ...भळभळ वाहणारी जखम तिथेही होती ...विचारलं त्या आंब्याच्या झाडाला ....इतका सुखी तू रसरसलेली फळ आणि थंड हिरवी पान काय दु:ख आहे तुला ? माझ्या फळांसाठी मारतात दगड मुलं आणि करतात रक्तबंबाळ मला .. या जखमा वागवत मीही मोठा झालो ! लहान असताना वाटायचं फळ आल कि काय सुख पण आता ....कधी फळे संपतील याची वाट पाहतोय .........डोळ्यांच्या कडा पुसत उठले ! परत जागेवर आले ...आता ठरवलंय नाही वाट पाहणार सुखाची ,प्रेमाची ....जर भेटणार असेल याहीपेक्षा मोठी वेदना तर नको कोसळू पावसा ...आज उमलेलं फुल उद्या सुकनारच कि ! म्हणून जगून घेणार आहे मी आज ....आता ठरवलंय त्या दगडांना आणि काट्यांना कवेत घेऊन खेळणार आहे त्या वाऱ्याशी ! आणि झेपावणार आहे आभाळाकडे त्यालाही कधीतरी दया येईलच कि ..........
         

Friday, 3 June 2011

उगविला नारायण

     पहाटे उठून अंघोळ करून गच्चीत मस्त विलायची टाकून केलेला चहाचा कप हातात घेऊन, थंड हवेची झुळूक अंगावर घेत चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर भोवतालची रम्य पहाट अनुभवणं काय मस्त ना? खर तर आपण आवर्जून पहाटे उठणं तेही गोड अशी साखरझोप मोडून! नको रे बाबा असच वाटतं पण एकदा तरी हे करावंच. संध्याकाळची रात्र होणं जेवढं मनमोहक तेवढंच किंवा त्यापेक्षा जरा जास्तच रात्रीचा उष:काल होणं प्रेरणादायी. तसं शहरात कदाचित हि पहाट अनुभवान अवघड पण खेड्यात ....
      शहरातील अंगण जरी हरवलं असलं तरी खेड्यात ते अबाधित आहे. अंगणात सडा घालणारी सुवासिनीसुद्धा अजूनही दिसते. शेणाने सरावलेला तो ओटा आणि त्यावर घातलेली ती सुंदर रांगोळी नक्कीच पाहणार्याचा दिवस सुखाचा करून जाते. 
                                           सकाळच्या पारी काय अंगना तुजी घाई
                                            पारोश्या केरावर देव देईनात पाई
                                           सकाळच्या पारी अंगण झाडायाचा परिपाट 
                                            माझिया दाराहून सत्यनारायनाची वाट
       अंधार हळू हळू दूर होत जातो उजाडताना सूर्य उगवण्याच्या आधीच त्याची लाल सोनेरी रंगाच्या किरणांची उधळण संपूर्ण विश्वावर करतो. घरांच्या भिंतींवर पडणारे ते किरण त्या सुवासिनीला कशाची बरं आठवण करून देतात. आपण नाही कल्पना करू शकत. कारणही तसंच आहे, त्या गरीब बापड्या माऊलीच जीवन म्हणजे तिचं कुंकू! तिला त्या कुन्काची लालीमाच मोहिनी घालणार!
                                          उगविला नारायण माझ्या वाड्याच्या लाल भिती
                                           शिळ्या कुंकवाला गं बाई माझ्या लाली किती 
       तुम्ही कधी पाहिलंय का उगवणाऱ्या सूर्याला जी किरणं आभाळात पसरतात अगदी चित्रात जशी रेषांनी दाखवतो तशी. एखाद्या लहान बाळाच्या सोनेरी जावळासारखी!
                                           उगविला नारायण उगवातानी तान्हं बाळ
                                            शिरी गं त्याच्या सोनियाचं जावयाळं  
      सूर्य उगवण्याच्या वेळी घरातील देवपूजा आटोपून ती सुवासिनी जगाला प्रकाश देणाऱ्या राविराजाला कधी विसरत नाही. त्याला ओवाळल्या शिवाय तिचा दिवसच सुरु होत नाही. तुळशीला पाणी घालून, तिला हळदी कुंकू वाहून, ओवाळून नमस्कार करणे आणि सूर्यदेवाला नमस्कार करणे हा तिचा परिपाठच! मग तिच्या या हळदी कुंकवाच्या कार्याक्रमाशिवाय त्या सूर्यनारायणाचा तरी पाय पुढे जाईल का?
                                         उगविला नारायण वरतं जायची तुम्हा ओढ 
                                         हळदी कुंकवासाठी बाई म्या तहकूब केलं थोडं
      थोड्या वर येणाऱ्या सूर्याची किरणं आता तेजानं तळपायला लागली आहेत. हि तेजस्वी किरणं पाण्यावर पडली कि पाण्याचे थेंब हिरे भासतात, तशीच ती अंगनात काम करणाऱ्या सुवासिनीच्या चुड्यावर पडली तर तो  चुडा हिर्यांचा होईल कि नाही!
                                        उगविला नारायण किरण टाकितो झाडावरी 
                                        रतन गं बाई राधायाच्या चुड्यावारी
       अशी हि नयनरम्य सकाळ का करणार नाही दिवस सुखाचा आणि समृद्धीचा? अशी खेड्यातील प्रभात नक्कीच सुप्रभात असते!
                 

Wednesday, 4 May 2011

सांजवेळ

                               '' सांज ये गोकुळी, सावळी सावळी ''  
 किती सुंदर वर्णन आहे हे गोकुळातल्या संध्याकाळच! खेड्यातली सायंकाळ इतकीच सुंदर!
मनाला चैतन्य देणारी!  सायंकाळी नदीच्या पाण्यात सूर्यदेवाने फेकलेला तो केशरी रंग,
 आसमंतात तो केशरी रंग उधळलेला आणि मनसुद्धा याच केशरी रंगानं भरून वाहणारं. 
अशी ही नवचैतन्य निर्माण करणारी खेड्यातली संध्याकाळ! दिवसभराच्या कष्टाने थकून
 भागूनप्रत्येकजण घराकडं निघालेला माणसापासून पक्षी गुरे सर्वजण! 
           '' दिवस मावाळीला लक्षमी शेताचा बांध चढ,
              तान्हा गं माझा राघु हाती गोफण पाया पड''  
  दिवे लागणीची ही वेळ कातरवेळ असते. आणि ती निवांत, शांत, व एकटी असेल तर काही
 सांगायलाच नको, मनाच्या तळाशी असलेल्या कडू गोड आठवणी तरंग होऊन कधी काठांनाभिडतात
 कळतच नाही. अश्या वेळी आठवणींचे पिसारे मन भरून टाकतात. मला ही वेळ मनाला उभारी देणारी
 भासते. असं वाटतं सारा निसर्ग, सारे आप्तेष्ट, माझा सुखाचा भूतकाळ आणि प्रेमाने भरलेला वर्तमान
 माझ्या या आयुष्याला एक सुखाची किनार बहाल करत आहेत.या सुखाचे या चैतन्याचे मी स्वागतच
 करणार आहे, अगदी भरल्या मनानं! 
           '' दिवस मावळीला तुम्ही दिव्याची जल्दी करा,
             लक्षमी आली घरा मोत्या पवळा यांनी वटी भरा.
  माझ्या बालपणी, मला आठवतं गाई गुरे दिवसभर रानात चरून संध्याकाळी घराची वाट धरत. गाई 
हम्बारत घराच्या ( गोठ्याच्या ) दिशेने धावतच येतात आणि त्याच वेळी गोठ्यातली वासरं गळ्यातलं 
दावा तोडण्याचा प्रयत्न करत आईच्या आवाजाला साद देत होती. गाय गोठ्यात येताच आई बाळाच्या 
मिलनाच ते दृश्य अवर्णनीय.
            '' दिवस मावळीला दिवा ओसरया बाईला,
              तान्हा ग माझा राघु सोडं वासरू गाईला.''
     अशी हि रम्य संध्याकाळ पुढे सरकत असतानाच नकळत अंधार संपूर्ण सृष्टीवर हळू हळू पांघरून 
घालायला लागतो. प्रत्येक जीव स्वप्नांच्या अंथरुणात पहुडतो, उद्याची सुख स्वप्ने आजच्यापेक्षा 
दुप्पट उमेदीने पूर्ण करण्यासाठी.........

                          ( हा माझा पहिलाच लेख-प्रपंच वाचकांनी गोड मानून घ्यावा हि विनंती.यामध्ये
  समाविष्ट केलेल्या जात्यावरच्या ओव्या माझ्या सासूबाई यांनी सांगितल्या आहेत त्या त्यांच्याच भाषेत 
मी देण्याचा प्रयत्न केला आहे )
             *जात्यावरच्या ओव्या - पूर्वीच्या काळी बायका पहाटे उठून जात्यावर दळण दळत त्या वेळी 
त्या ओव्या गात. आता त्या फक्त लग्नाच्या आधी घाना बांगड्या हा विधी असतो तेव्हाच ऐकायला मिळतात.