दिवस उगवताच आग ओकत येणारा दिनकर , धुलीकणांनी मलीन झालेल्या वृक्ष वेली , तप्त अशी मृत्तिका आणि इकडून तिकडे तहानेने व्याकुळ होवून पळणारे सजीव , वसुंधरेचे काळीज उद्विग्न करीत होते . पाखरांचे थवेच्या थवे झाडांच्या पानांची सावली शोधून दमून शेवटी माणसाच्या घरांचा आधार घेत होते . ते पण थोडा वेळ लगेच कुणी त्यांना तिथून हाकलून काढीत होते . असा क्रोधीत होता दिनकर कि दुपारी तर डोक्यात , पोटात , अंगावर आणि संपूर्ण सृष्टीवर जणू रखरख पेरीत होता . धुलीकणांनी कोंडलेले श्वास वृक्ष वेली जबरीने मोकळा करण्याचा असफल प्रयत्न करीत होती . कधी पवनाची कृपा झाली तर थोडा श्वास कसातरी मोकळा होत होता . आटलेले तलाव , नद्या अंगावरच्या भेगा सावरीत कशीतरीच दिसत होती . भेगाळलेल्या जमिनी कोरडा टाहो फोडीत होत्या… वसूचे काळीज अधिकच हळवे करीत होत्या ! थंडीच्या दिवसात इतका प्रेमळ असणारा दिनकर , त्याचा अचानक असा क्रोधाग्नी का भडकावा हेच तिला उमगत नव्हते . प्रेमाच्या गुलाबी थंडाव्यासारखा त्याचा क्रोधही सोसला असता तिने , परंतु लेकरांचा जीव घेणारा हा कसला राग ? लेकरे तर त्याचीही न ? मग ? कुठला बाप असा रागवत असेल कि स्वत:च्याच पिलांना होरपळून मारीत असेल ? तिच्या जीवाची मात्र खूप खूप उलघाल चालली होती . त्याला का असा वागतोस असे विचारले तर उगीच अधिक क्रोधीत व्हायचा … मन व्याकुळ झाले होते पण नेत्रात टिप्पूस उतरावा इतकेही जल तिच्यात बाकी नव्हते . किती हा क्रोध … बस करा दिनकर बस करा … नाही नाही आता गप्प बसून चालणार नाहीच … बोलावेच लागेल आपल्या लेकरांसाठी तरी बोलावेच लागेल … ते बाप असतील पण मी आई आहे … माझे हृदय फाटणार न त्या लेकरांची टाहो ऐकून ?
"दिनकरा , दिनकरा … का असे क्रोधीत झालात दिनकरा ?" डोळ्यात प्राण आणून वसूने शेवटी विचारलेच.
"तू मला विचारतेस वसू ? मला ?" कपलावरच्या रेषा अधिकच दीर्घ करत दिनकर तिच्यावरच प्रश्न फेकू लागला . तप्त झालेली वसू आता खूपच हळवी झाली … डोळ्यातील आर्जवे तो वाचू शकत होता , त्याने तो घायाळही झाला पण त्याचा क्रोध त्याहीपेक्षा जास्त होता .… तिच्या प्राणप्रियाला तिची तगमग समजू नये याचे अतीव दु:ख तिला कातर कातर करीत होते . तिचा श्वास अधिक अधिक वाढू लागला . पण येणारा तो वाराही तप्तच येत होता आणि तडफडणाऱ्या जीवांना जास्तीच वेदना देत होता . तिचा दोलायमान झालेला जीव शेवटी लेकारांपाशी येवून स्थिर होऊ लागला …. आणि कठोर होत तिने शेवटी त्याला प्रतिप्रश्न केलाच ,
"दिनकरा तुम्हाला नाही दिसत तुमच्या क्रोधाग्नीने होरपळणारी तुमची लेकरे ? त्यांचा जीव घेवूनच थांबणार आहात का तुम्ही ?"
"वसू तू मला भावनेच्या आहारी घालू नकोस पण आज जे ते भोगत आहेत त्यांच्याच कर्माची फळे आहेत , आणि इथे जर समज नाही दिली तर ते तुलाही घेवून नष्ट होतील ." क्रोधीत दिनकर हळवा झाला होता आणि त्याचे वसूबद्दलचे प्रेमच त्याला असे करणे भाग पाडत होते …
"माझ्या लेकरांसाठी माझे सर्वस्व संपले तरी चालेल मला ! आणि असेही त्यांच्याशिवाय अर्थच काय आहे हो धरेला ?" वसू फुरंगटून बोलली .
"वसू …. मातृप्रेमाने अंध होवून जावू नकोस … तुझा शेवट व्हायच्या आधी त्यांचा शेवट आहे मग तूच ठरव या स्वार्थी मानवासाठी तू आपल्या इतरही लेकरांचा बळी देणार आहेस का ?" क्रोधाने थरथरत दिनकर जवळजवळ ओरडलाच . त्याच्या ओरडण्याने कंपित होत वसुही अधिकच हट्टाला पेटली .
"म्हणजे मानवाने सारे केले … असे म्हणता … इतर लेकरांनी का भोगावे म्हणता आणि स्वतः काय करता हो … मानवाच्या आधी बाकीच्या जीवांनाच तुम्ही आधी वेठीस धरले आहे … आणि लेकरू चुकले म्हणून तुम्ही त्याचा जीवच घ्यावा हा कुठला न्याय ?"
"वसू … न्यायाची गोष्ट मला शिकवू नकोस … तू फक्त बघत राहा थोड्यांच्या जाण्याने जर सार्यांना सुख मिळणार आहे तर त्यासाठी थोड्यांचे बलिदान द्यायलाच हवे …."
"मी माझ्या जीवात जीव आहे तोवर असे नाही होऊ देणार … मग तुम्ही दुरावलात तरी चालेल मला !" कठोर शब्दात वसूने दिनकरला ऐकवले खरे पण आतून ती उसवत चालली होती , तिचे हृदय आक्रंदत होते … प्रियाच्या विरहविचारांनी विदीर्ण होत होते …. वरून वज्राप्रमाणे कठीण दिसणारी वसू आतून ढवळून निघाली होती … परंतु लेकरांसाठी असेही निर्णय घ्यावे लागतीलच … स्वतःच्या प्रेमाचा बळी द्यावाच लागेल … नाही नाही मी आता माझ्या पिल्लांना न्याय मिळवून देणारच …
"वसू … वसू अशी नको करू … अग मी का कुणी त्यांचा शत्रू आहे …. ठीक आहे … जशी तुझी इच्छा . पण एक लक्षात ठेव माझ्याशिवाय तुही जिवंत राहू शकणार नाहीस आणि तुझी माझी पिलेही … "आधी हळवा झालेला दिनकर पुन्हा कठोर होऊन तिला धमकावत बोलला .
"तुमच्यासोबत राहून मरण्यापेक्षा तुमच्याशिवाय मरणे पत्करू आम्ही … कमीत कमीत बापाचा आधार नव्हता म्हणून जीव गेला असे तरी म्हणतील सारे !" रागाने थरथरत असलेली वसुही आता प्रत्येक शब्दाला शब्द फेकत होती .
"तुही माणसाच्या स्रीसारखी वागू लागलीस न ? पण लक्षात ठेव या साऱ्या विनाशाला माणसाच्या मुर्खपणासारखे तुझे आंधळे प्रेमही कारणीभूत असेल … " रागाने रक्तवर्णी होत दिनकर बोलत होता . त्याचा तांबूस चेहरा रागाने आणि दु:खाने लालबुंद झाला होता .
"मी तरी मानवी स्रीसारखे वागत आहे पण तुम्ही तर मार्जर नरासारखे स्वतःच्या पिलांनाच गिळायला निघालात … " फणकाऱ्याने वसू बोलली आणि धुळीचे लोट पुन्हा उधळू लागली … जेणेकरून या कठोर प्रियाचे तोंडही तिला दिसू नये .
"वसू ……. " रागाने चरफडत दिनकर असंख्य तप्त किरणे धरेकडे फेकत राहिला … तरीही त्याचा क्रोध अजून वाढतच होता . वसूच्या सर्वांगाची लाही लाही होऊ लागली . दिनकर वसुची सारी लेकरे आडोसा शोधात लपू लागली … आणि या आपल्या मातापित्याच्या भांडणात आपला जीव तर जाणार नाही ना ? या भीतीने वसूच्या कुशीचा आधार घेवू लागली …. धुळीच्या लोटांनी वसू साऱ्यांना पांघरून घालू लागली पण ते तप्त पांघरून त्यांना अधिक कासावीस करू लागले . शेवटी वसूने तिच्या भावांना निरोप पाठवून बोलावून घेतले .
भगिनीचा निरोप मिळताच प्रथम पवन धावतच आला , मागोमाग मेघानेही हजेरी लावली . तिने तिची सारी व्यथा कोरड्या पडलेल्या नेत्रांनी आणि ओलावलेल्या शब्दांनी दोघांना ऐकवली . तिच्या शरीराच्या दाहाचा आधी इलाज करायचे दोघांनी ठरवले आणि पवनाच्या मदतीने मेघाने तिच्याभोवती अभ्राचे अच्छादन तयार केले . क्षणात वसू दिनकराच्या नजरेआड झाली . मावळतीला झुकलेल्या दिनकराच्या मनातही कातरवेळीची हुरहूर दाटून आली आणि लांब उसासे टाकत तो फक्त म्हणाला , "वसू … "
" वसुताई , तू हि गोष्ट आधीच आमच्या कानी घालायला हवी होती ." डोळ्यातली आसवे टिपत पवन म्हणाला.
"हो वसुताई , पण जाऊ देत अजूनही वेळ गेलेली नाही . आपण वरुणाला बोलावू आणि आधी तहानलेल्या लेकरांना थोडा ओलावा देवूत . " मेघाने पवानाच्या शब्दांना होकार भरत आपले म्हणणे मांडले . त्याचा सल्ला दोघानाही पटला . कारण तहानेने व्याकुळ झालेल्या लेकरांना आधी शांत करणे गरजेचे होते .
वसुताईच्या मायेखातर आलेल्या वरुणाने स्वतःचे काम चोख बजावले आणि सारे नियम धाब्यावर बसवत उन्हाळ्यात पाऊस बरसू लागला . व्याकुळ झालेल्या जीवांना मात्र आता कुठे हायसे वाटू लागले . त्यांची चूक अजूनही माणसाच्या लक्षात आली नव्हती . आईच्या पदराआड सारी सुरक्षित होती . आताची वेळ टळली होती परंतु भविष्यातील अनेक अडचणी कश्या सोडवायच्या हा खूप मोठा प्रश्न होता .
तीन चार दिवस झाले मेघाचे अच्छादन अजूनही तसेच होते . आणि दिनकराची उष्णता नव्हती म्हणून वरुणाला बरसणे भाग होते . इतक्या दिवसात दिनकराचा काहीच निरोप नव्हता . आठ दिवस झाले तरी दिनकराचा काहीच निरोप येत नव्हता . व्याकुळ वसू मात्र ओलावल्या नेत्रातून अविरत टिपे गाळत होती . तिचे शांत मन आता दिनकराच्या भेटीसाठी धावा करत होते . गारठलेली माणसे आजारी होऊन तर कुणी काठ सोडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याबरोबर वाहून तर कुणी गारपीटमध्ये सापडून मरत होती . वसूचे विरहाने आणि दु:खाने व्याकुळ हृदय फक्त टिपे गाळण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत . पश्चातापाने दग्ध मन बाहेरच्या गरव्यानेही थंड होत नव्हते . राहिल्यासाहिल्या झाडांची पानेही आता पिवळी पडली होती . त्यांना गरज होती पित्याच्या प्रेमाची पण …. प्राण्यांनी तर कधीचे शेवटचे श्वास मोजायला सुरुवात केली होती .
'वसू अजून किती दिवस तू असा खोटा अभिमान कुरवाळत बसणार आहेस ? तुम्हा दोघांच्या हट्टापायी आजून किती जीव जाणार आहेत ? पण दिनकरानेही आपल्या लेकरांचे रक्षण करायला हवेच न ? किती साद घालीत आहेत हि माणसे सूर्यदेवाला पण कसे यांचे हृदय पिळवटत नसेल ? पण मी का बोलावत नाही दिनकराला ? मीच साद घालायला हवी …. खरच … आणि वसू पवनाच्या गळी पडून हुस्मरून रडू लागली . ….
"दिनकरा … पुरे आता … माझ्यासाठी नको पण लेकरांसाठी …"
आणि चमत्कार व्हावा तसा काही वेळात पोपटी रंगाचे वस्र ल्यालेल्या वसुला आपल्या शीतल कोवळ्या किरणांनी आलिंगन देत दिनकराचे आगमन झाले . वसुला वेढलेल्या मेघाने कधीच आपला मुक्काम हलवला होता आणि पवन हलक्या थंडाव्याचा शिडकाव दोघांच्या अंगावर करत त्यांना चिडवत होता … मात्र दोघांच्या मनात एकच काळजी सलत होती … यातून मानवाने काही बोध घेतला असेल का ?

No comments:
Post a Comment