या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 25 January 2016

खरंच गुलामगिरी संपली आहे का ?

“उठा स्वतंत्र भारताच्या नागरिकांनो , साडे पाच वाजले ..साडे सहा ला तर बस येईल .” बाळाच्या अंगावरची रजई ओढत मी म्हणाले खरी पण इतक्या गारठ्यात त्याला उठवणे मलाही जीवावर आले होते . त्याने पुन्हा पांघरून ओढून घेतले .
“अरे , आज २६ जानेवारी पिलू , शाळेत नाही का जाणार तू ? आज ध्वजारोहण करायचे ना ?” लगेच गडबडीत स्वारी उठून बसली .
“तुला रात्री सांगितले ते ध्यानात आहे ना मम्मी ?” डोळे चोळतच स्वारी बोलू लागली .मीही तोंड वाकडे करून विचारले नजरेनेच काय रे ?
“अशी कशी विसरते तू ? अगं मम्मी मी नाही का सांगितले आणि तू प्रॉमिस पण केलेस की ध्यानात ठेवीन .” तक्रारीचा सूर उंच झाला जरा .
“बरं बाबा , मी तरी काय काय ध्यानात ठेवणार रे , सॉरी पण तू कित्ती गोष्टी सांगतो , सगळ्या नाही लक्षात राहत बघ .” त्याने मग लाडीगोडी लावत जवळ येत सांगितले ,  “अगं , आपल्या दवाखान्याशेजारी एकही झेंडा पडलेला दिसायला नको , दिसला तर मग उचलून ठेवशील असे म्हणाली ना तू ?” मग माझ्या मेंदूत क्लिक झाले . होरे मी म्हणाले खरी ..त्यावेळीच त्याने आणखी एक हट्ट केला होता ..तू तुझा व्हाटस अप चा प्रोफाईल बदलून तिरंगा लावायचा . पण माझ्या एका प्रश्नाने त्याला थोडे गडबडून टाकले . का रे बाळा , फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच देशावर प्रेम करायचे का ? तो थोडावेळ चुळबुळ करत राहिला आणि मग म्हणाला , नाहीच गं , मग तू असे कर की वर्षभर तुझा प्रोफाईल तिरंगा ठेव ! किती सोपे उत्तर शोधले रे बाळा तू ..पण इतके सोपे नाहीच सर्व ! फक्त तिरंग्याचा अवमान न करणे इतकीच देशभक्ती का ? किती संकुचित जगतो आहोत आपण ..देश म्हणजे काय ? तो फक्त सरहद्दीतच कायम करायचा का ? की सरहद्दीच्या आतील सर्व जीव समानतेचा धडा गिरवत जगत आहेत यावर देश कायम करायचा ..ही जी माणसामाणसातील दरी आहे ती सरहद्दीच्या बाहेर का संपते ? माणूस म्हणून आपले काहीच अस्तित्व नाही का या भूतलावर ? एक ना अनेक प्रश्नांनी धिंगाणा माझ्या मनात चालू केला , अरे पण विचारात हरवून जमणार नव्हतेच मला ! मुलांचे आवरून त्यांना दूध देवून गाडी येण्याच्या वेळी तैय्यार केले . मुले गेलीही ..पण काम चालू असताना त्या एकांत शांत वातावरणात शाळेच्या पटांगणातून लता मंगेशकरांच्या आवाजात ‘ जरा याद करो कुर्बानी .’ ऐकू येत होते . आणि मन असह्य अशा घालमेलीत अडकून पडले . हाताने काम चालूच होते , परंतु मनाने मी कामात नव्हतेच . बाहेर गेले  , पक्षांना चारा टाकायला आणि भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवायला ..रोजचीच सवय दोन तीन वर्षापासूनची म्हणून सारी कामे अगदी व्यवस्थित चालू होती जरी मन कामात नव्हते ! दोन तीन कावळे लगेच जवळ येवून उभे राहिले त्यांना भांडे धुवून त्यात पाणी टाकेपर्यंत पण दम निघत नव्हता तर्री मी आज लवकर सारे करीत होते . तसाही पक्षांचा दिवस पहाटेच सुरु होतो म्हणजे त्यांना भूक लागणारच ना ? आणि मी मनाशीच हसले ..माणसाने सृष्टीचे गणित आपल्याच ठेक्यावर का चालवले असेल ? पण तरी किती सुधारणा झाली तरी निसर्ग माणसाला हुलकावणी देतोच आणि तोच श्रेष्ठ आहे हे वारंवार दाखवतो . पण हे समजेल त्याला ! मला तरी समजते का ? या प्रश्नावर मात्र मन अधिक गहिऱ्या खाईत जातेय असेच वाटले .
  मी भांडे धुवून पाणी ओतनारच होते रस्त्यावर की एक बैलगाडी येताना दिसली , त्यांच्यावर उडू नये म्हणून मी कावळ्यांची घाई डावलून थांबले (थोडे सौजन्य अजून अबाधित आहे !) दोन लहान लेकरे , दोघे तरुणच म्हणावे की पोरकट या संभ्रमात पडावे असे नवराबायको , आणि एक मळकटलेल्या आणि केसांचा पुंजका न विंचरलेल्या म्हातारीच्या (?) ओझ्याने वाकलेली ती मरतुकडी बैलजोडी गाडी ओढत पळत होती . अजून सातही वाजले नव्हते , गारठ्याने कुडकुडावे इतकी थंडी हवेत होती , सूर्याचे आगमन झाले होते पण तोही कदाचित पांघरून ओढून बसला होता , कुडकुडत ! सकाळी उठायला नकार देणारे माझे मन त्या टोळीवाल्या लोकांना उसतोडीला जाताना पाहून थोडे बावरले . किती पहाटे हे नित्यादि कर्म आवरून पोटाच्या सोयीसाठी बाहेर पडलेत , अगदी या पक्षांसारखेच ! खरे तर हा गरीब आणि पोटापाण्यासाठी भटकंती करणारा माणूसच अजून निसर्गाला धरून वागतोय नाहीतर आपण ? चंगळवादाच्या भोवर्यात अडकून पडलोय ! काल एक पुस्तक वाचताना , मार्स्कवाद ,कम्युनिस्ट , समाजवाद असे अनेक भयंकर शब्द वाचले ..भयंकरच कारण मला त्याचा अर्थच माहीत नाही ..काय आहे हे ? कम्युनिस्ट विचारवंतांची हत्या वगैरे खूप वाचनात येते आताशा पण सारे डोक्याला फेर्या मारून निघून जाते ..आजही मी डॉ असून मला समाजवाद माहीत नाही ! त्याची रुजलेली खोल मुळे माहीत नाहीत ! का मी जाणूनच घेवू इच्छित नाही ? गांधीबाबा वाचला रे तुला फक्त पुस्तकाची पाने पालटत वाचत गेले ..तुझे अस्तित्व त्या पानापानात न शोधताच ! सत्याचे प्रयोग वाचले ..तुझ्याच आश्रमातून विकत आणले होते ..भारावले काहीवेळ तुझ्या त्या त्यागासाठी पण काय झाले ..दोन तीन तासानंतर पूर्ववत झाले सारे .. पैसे नाहीत तर दवाखान्यात का आलात असे विचारण्यापर्यंत मजल गेली माझी तुला वाचतानाच ! हे लिहितानाही डोळे ओले झालेत पण खरे सांगू हेही वांझच विचार आहेत बघ ..मनाला कोंडून जगतोय गांधीबाबा आम्ही , चंगळवादाचा पुरस्कार करीत ! आज ६७ वा प्रजासत्ताक साजरा करताना एकाही चंगळवाद्याच्या मनात काहीच खुपत नाही ..ना तुझे आख्खे आयुष्य समाजासाठी स्वातंत्र्यासाठी वाहने ना त्या असंख्य अशा स्वातंत्र्यनायाकांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी झुगारून देणे ! त्यांच्या रक्तावर पोसलेली आमची चंगळवादी मने पुन्हा गुलामगिरीची परक्यांची अस्रे घेऊन आपल्याच बांधवांना ठेचण्यासाठी सज्ज झालीत गांधीबाबा ! गुलामगिरी खरंच संपलीय का ? की अजूनही आहे अबाधित त्या मग्रूर मनात ? ज्यांच्या पूर्वजांचा बळी गेला गुलामगिरी झुगारताना आज त्यांचे वंशज आम्ही पुन्हा तीच गुलामगिरी गरीब ,शोषितांवर लादायला सज्ज आहोत .. त्या वेळेत आणि आज  काहीच फरक नाही गांधीबाबा , फक्त परिमाणे बदलली आहेत . तेंव्हा जास्त ताकदवान राजा होता आणि आज जास्त पैसेवाला झालाय फक्त ! मी नेहमी विचारते कुणी टोळीवाले , उसतोडीचे पेशंट आले की कुठला रे बाबा तुम्ही ...त्यांनी मग मराठवाडा विदर्भातील वेगळ्यावेगळ्या गावांची नावे सांगावी ..अशीच काही गावे आहेत ही भर माझ्या ज्ञानात पडते इतकेच ..अलीकडे थोडे वाचून वाचून संवेदनशीलता (सामाजिक) जपणारे मन बावरते थोडेसेच पण फी घेऊन स्याम्पलची औषधे देण्यापुरतेच ! स्वतःच्या हितासाठी संवेदनशीलता जपणारी आपली मने कधी प्रगल्भ होणार हा वांझोटा विचार मनात कुरवाळत ..हो पण यांच्याच कष्टावर गाडी , बंगले आणि प्रॉपरटी घेणारा हा सुशिक्षित समाज कधीच आत्मपरीक्षण करणार नाही का ? की दोन चार रुपडे फेकले की आपण मोकळे झालो का दानवीर म्हणून घ्यायला ...या कष्टकऱ्यांच्या जीवनात ज्या दिवशी हास्य उमलेल तो दिवस खरा प्रजासातक असेल ! शक्य आहे का हे ..हे वांझोट्या विचार्वांतांनो आणि पैसा , प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या मागे पळणाऱ्या आपल्या सारख्या त्यांच्या कष्टावर आपली पोटे पोसणाऱ्या बांडगुळांनो एकदाच मनाला हे विचारून बघायचे का ?
आज खरंच लाज वाटतेय मला , पहिल्यांदा ..माझ्याच गुलामगिरीची ! कारण कामाची बाई आली नाही तर नित्यादि कर्मे करायलाही बावरणारे माझे मन गुलामच नाही का ? सवयीचे गुलाम , चंगळवादाचे गुलाम !

        डॉ संध्या राम शेलार . 

No comments: