या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Sunday, 14 February 2016

माणूस असणं

“राधे , ए राधे ....कुठे मेलीस गं  रांडे ...तुझं मढ बसवलं ..तुझी आय येणार का बाप गं ? कोण ह्यो शेणकुर करणार ..श्याण पार xxx आलं न ढोरांच्या ..”  आक्काबाईने सुनेच्या अंगावरचं घोंगड फेकून दिलं . ग्यानबा आणि राधा बावचळून उठली खरी पण कपड्यांची आवराआवर करताना दोघांची चांगलीच बेंबळ झाली . आक्काबाईला एकच पोरगा , ग्यानबा ..चार महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं , शेजारच्याच जामगावच्या राधेसोबत . आक्काबाईला ग्यानबा झाला आणि तिचा नवरा कुठे गेला कुणालाच तपास नाही वीस वर्ष तिने लोकांची मजुरी करून पैशाला पैसा जोडला , दोन खोल्यांचं घर बांधून घेतलं , पत्र्याचंच घर पण नेटकं ! गावातून शिंदे वस्तीकडे जाताना कच्च्या रस्ताच्या वरच्या अंगाला ..पूर्वेकडे घराचं दार , दारात तीन चार ढोरं होती , दुभती गाय एकच आणि ती पण गावरान , मग काय दूध घरचं टाकून डेरीला घालणे शक्यच नव्हते , एक लिटर दुधातून डेरीला काय देणार ? जसा ग्यानबा कळीत झाला तसा त्याने शाळा सोडून ढोरांच्या मागे हिंडणे चालू झाले . आक्काबाईला पण त्याच्या न शिकण्यावर आक्षेप नव्हताच , उलटपक्षी तो लवकर हाताखाली आला यातच तिला आनंद होता . घराच्या चार ढोरांच्या जोडीला आणखी काही ढोरांच्या राखोळ्या तिने मिळवल्या , त्यांचे महिन्याचे पैसे ती घेऊ लागली आणि अशा प्रकारे ग्यानबाचे ज्ञान सोडून कष्ट करणे चालू झाले . पैशाने पैसा जोडत आक्काबाईनेही काही उभेच केले , आणि तेही तिच्या लाडक्या ग्यानबासाठी ! झोपडीचे घर झाले ..एक दुचाकी दारात आली ..वर्षानुवर्षे पाण्याआभावी पडीक असलेली जमीन बागायती व्हावी म्हणून आक्काबाईने एक विहीरही खणून घेतली पण तीही पावसातच ओली राही ..मग चार पाच महिन्याच्या पाण्यावर जेव्हडी तरकारी होई तेव्हडीच ती ग्यानबाला हाताशी घेऊन करे , या तिच्या कष्टांवर आज ती गरिबांच्या यादीतून मध्यमवर्गीय गटात आली होती . तिच्या या धोरणी आणि कष्टाळू वृत्तीचे सर्व गावाला कौतुक होतेच पण तिच्या भांडकुदळ आणि कडक स्वभावाची झळ न लागलेला गावकरी सापडणे थोडे अशक्यप्राय होते .
“आगं आई ...अशी गं काय करती ..तिला बरं नाही म्हणून झोपली ती ..रातभर तापानी फणफणत होती ..आता कुठं डोळा लागला व्हता बघ ..” ग्यानबाच्या या बोलण्यात आईच्या अशा वागण्याबद्दलची नाराजी स्पष्ट दिसत होती ..
“आहाहा ..मोठा आला बायकुचा पुळका करणारा ..आई कधी आजारी म्हणून नाय दिसली रं तुला ..आन मेल्या तिला रांडला ताप व्हता मंग मुडद्या तुला उठाया काय रोग आलाता व्हय ..बसतो आपला बायकुच्या उबला दिवस वर आला तरी ..” आक्काबाईचं डोकं जास्तच भडकलं आणि नाही ते ती बोलून गेली ..बोलल्यावर जीभ दाबून उपयोग नव्हता , जर तिने माघार घेतली तर अशीच सून डोक्यावर वरवंटा फिरवणार या भीतीने तिला अनेक दिवस ग्रासले होतेच त्यात आज हा असा उलटून बोलतो , नक्की राधाच हे शिकवते त्याला , याची खात्री झाली आक्काबाईला ..तशीच तडतडत ती तिथून निघून गेली ..जातानाही तिने सुनेच्या आईबापाचा उद्धार करणे सोडले नव्हतेच ..
  दोन तीन दिवस असेच धुसफुसत गेले आणि एके दिवशी सकाळीच आक्काबाईची धाकटी पुण्याची बहिण आली . येताच तिने आक्काबाईला मिठी मारली आणि दोघी बहिणी हमसून रडू लागल्या . ग्यानबा आणि राधेला याचा काहीच उलगडा होत नव्हता ..घाईने ती पाणी घेऊन आली ..आणि त्या मावससासूच्या पुढे तिने तांब्या धरला . विमलबाईने तो घेतला , खाकरून खोकरून तिने गुळणा केला आणि तोंडावरून पाण्याचा हात फिरवून तिने नाक तोंड वाकडे करत राधेच्या हाती ठेवला . तिचे असे बघणे पाहून राधा पटकन घरात शिरली आणि चहापाण्याला लागली , स्वयपाक करणेही चालूच होते . ग्यानबाला मात्र पुण्याची विमलमावशी पाहून भलताच आनंद झाला आणि तो नेहमीप्रमाणे तिच्या पिशव्या उचकू लागला .
“आक्का तुझं प्वार एव्हडा वाढला पण एरंडच बघ ..लगीन झालं तरी त्याची पहिली खोड काय गेली नाय ..” हसून कौतुकाने भेळीचा पुडा त्याच्या हातात ठेवत मावशी त्याला जवळ घेऊन गालगुच्च धरू लागली . ग्यानबाने चलाखीने तिच्या हातात्तून सुटका केली स्वतःची आणि तसाच पळत आत गेला . एका परातीत भेळ सोडली आणि त्याने ओट्यावर बसून आक्का मावशीच्या पुढे खायला चालू केले . इतक्यात राधा चहा घेऊन आली आणि लग्नात आलेले ते नवे कप चहाने भरून त्या तिघांपुढे मांडले . आक्काबाई डोळे वटारून राधेकडे पाहत काही खुणावू लागली . राधेने ते लगेच ओळखले आणि गडबडीने मावशी आणि आक्काच्या पाया पडली ..
“राहू दे बघ पोरी , तू पाया नाय पडली तर माझं पाय नाय सुजायचं बघ ..इतकीच नेमाची होती तर आल्या आल्या कळू नाय व्हय ..” तिच्या डोक्यावर आशिर्वादाऐवजी अशी मुक्ताफळे उधळत हात मात्र ठेवला . राधेने ग्यानबाकडे पाहिले आणि तशीच आत गेली . आनंदाने फुललेला ग्यानबाच चेहरा असा पडलेला पाहून दोघी बहिणींच्या पोटात कालवले ..
“ग्याना , लेकरा आमी का वैरी हाव तुझे , पर या नव्या पोरींच्या सांगण्यानी कितीतरी संसार वाया जात्यात बघ ..आन तुझ्या आईला जर का तिनी नाय पाह्यलं  , तर कोण हाय तिचं ? तूच सांग बाबा ..म्हणून अशी परक्याची पोर लेकरं होऊनश्यान आपली होऊसतर आपणच दापया हवी बघ . आन आमचं काय सुदिक म्हणणं नाय , तू तुझा जीव लाव पर आक्का दापती तिला तर आक्काचा तेव्हडा वचक राहू दे पोरा नायतर वावडी होऊन कधी संसार तुझ्या भोळ्या माणसाचा उडून जाईल ते बी उमगणार नाही बघ ..” त्याच्या जवळ बसत विमलमावशीने डायरेक्ट मुद्याला हात घातला . कारण आक्काबाईने तिला फक्त ग्यानबाला समजून सांगायला निरोप देवून बोलावली होती . आणि तीही तिचे काम करण्यात बरीच यशस्वी झाली होती . भावनिक साद घालून दोघी बहिणींनी ग्यानबाला चांगलेच गोल केले , तशा त्या वाईट नव्हत्याच , दोघीही प्रेमळ होत्या , त्यांचे जीव लावणेच आजवर ग्यानबाने अनुभवले होते म्हणून आईचे  त्या दिवशीचे  वागणे पाहून तोही बराच बावरला होता . आणि आज या दोघी बहिणी समाज्याचे अनुभव सांगून त्याला शहाणे करीत होत्या (की कान फुंकत होत्या ?) त्यांच्या वांझ भीतीपायी ! राधेचा कानोसा घेत दोघींनी त्याची समजूत (?) काढली आणि दोघी बहिणी निश्चिंत होऊन हसल्या . त्यांचे हसणे पाहून ग्यानबाला काहीतरी खुपले पण त्याच्या आईची बऱ्याच दिवसानंतर अशी हसरी मुद्रा पाहून तोही सुखावला .
   त्या दिवशी आपले कार्य समाप्त करून विमलमावशी गेली खरी पण ग्यानबा मात्र राधेपासून जरा फटकून वागू लागला ..आईच्या समोर तरी ..आक्काबाईला पण आपली ही मोहीम यशस्वी झाल्याचा परिपूर्ण आनंद देत राहिला ..नवऱ्याचे वागणे बघून राधा जरा धास्तावली होती ..
“आक्काबाई ...” मोठी आरोळी देत रखमाबाई ओट्यावर बसती झाली . हातातली परडी खाली ठेवत पुन्हा एकदा तिने आरोळी दिली , “अंबाबाईचा जोगवा ssss” राधा आवाज ऐकून धावतच बाहेर आली आणि परडीवाली , गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेली बाई बघून ती धावतच आत जावून दोन्ही हातात मावेल इतके पीठ घेऊन आली . तिने परडीच्या लहान टोपलीत पीठ घातले आणि त्या बाईला वाकून नमस्कार करती झाली ..आक्काबाईच्या सुनेच्या या शहाणपणाने ती बाई बरीच सुखावली ...
“वर्सात कृष्ण बागडू दे अंगणात ..” म्हणून तोंडभरून आशीर्वाद दिला . इतक्यात आक्काबाईपण धावतच आली शेजारच्या घरून , ग्यानबा कधीच ढोरांच्या मागे गेला होता .
“गुरुमाउली .......”म्हणून आक्काबाईने लगोलग पाय धरले रखमाबाईचे ..आक्काबाईच्या डोईवर हात ठेऊन काही आशिर्वादाचे शब्द पुटपुटत गुरुमाउलीने डोळे मिटून घेतले ..
“गुरुमाई , एक सांगणं होतं ..” घाबरत , रखमाबाईच्या ध्यानस्त मुद्रेकडे पाहून लाचार शब्दात आक्काबाईने प्रश्न केला . रखमाबाईने हळूच पापण्या उघडल्या आणि नजरेनेच काय असा प्रतिप्रश्न केला .
“माई . सहा महिने झालं ..सूनचा महिना एळेला हजर होतुय , आता तिच्यासंगच्या पोरी पोटुशी हायेत ..” रखमाबाईने मान हलवली आणि हवेत बोटे फिरवली ..थोडा वेळ तशीच बसून राहिली .
“हुं ..हुं ...” असा आवाज करीत रखमाबाई घुमू लागली आणि आणि आक्काबाई अशी बावरली की तिला काही सुचेना आधी ..घुमण्याचा आवाज वाढू लागला .आता घुमणारी रखमाबाई हात एकमेकांत घट्ट करून जागेवरच डुलू लागली . जोराने मानेला झटके देवू लागली . तोवर पळत जाऊन आक्काबाई पंचपाळ घेऊन कुंकू रखमाबाईच्या कपाळाला लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत राहिली ..शेवटी तिने ते लावलेच , जवळच्या परडीला हळद कुंकू वाहून तिने आणि राधेने मनोभावे परडी आणि रखमाबाईला नमस्कार केला ..त्या डोके वर करताच थोडी शांत झालेली रखमा पुन्हा जोराने घुमू लागली . हात खाली वर करीत राहिली , परंतु तिने एकमेकांत घट्ट रुतवलेली बोटे मात्र सोडली नाहीतच पण ती जास्त घट्ट करीत गेली .. मानेला झटका देऊन रखमाने केसांचा अंबाडा कधीच मोकळा केला होता . पुढे मागे उडणारे ते केस , तो घुमण्याचा आवाज , गुढग्यावर येवून पुन्हा खाली पडणे , कपाळाला पसरून लागलेले ते कपाळभर कुंकू याने साधारण पन्नाशीची , म्हातारपणाकडे झुकलेली ही काळीसावळी रखमा अधिकच भयंकर दिसू लागली . भेदरलेली राधा मागे सरू लागली तसे आक्काबाईने तिला पुढे ओढून घेतले आणि पाया पडायला खुणावले ..बिचारी राधा , सासूचे मोठे डोळे आणि रखमाचा हा अवतार पाहून ती पुरतीच घाबरली . तरी ती रखमाच्या पायाशी झुकली ..रखमा आता अधिकच घुमत राहिली ..हा सारा प्रकार पाहून आजूबाजूच्या बायका गोळा झाल्या आणि त्याही रखमाचे पाय धरू लागल्या , कुणी कुंकू लावू लागल्या .
“गुरुआई ...माझ्या घरचा वंश कधी वाढल ..” शेवटी आक्काबाईने धाडस करून विचारले ...
“हुं ...हुं ...हुं ...आक्के ...हुं ..हुं ..तुझी सून ...हुं हुं हुं ...मावलाया वलंडून गेली हाय ..हुं हुं हुं ...त्यांचा कोप हाय ..हुं हुं हुं ..तिच्या माहेरच्या ...हुं हुं हुं ..मावलाया लई कडक हायेत ..हुं हुं हुं ..तिथं गावाच्या वरच्या बाजूच्या वढ्यात हायेत ...हुं हुं हुं हुं ..तिला इचार गिल्ती का तिकडं ..हुं हुं हुं हुं  ..” आक्काबाईने सुनेकडे पाहिले , राधेने मान हलवली ..आणि आक्का पुन्हा रखमाच्या पायावर पडली ..
“गुरुआई ,  चूक झाली तिच्याकडनं ..माफी करा ..लेकरू हाय ..अल्लड हाय चुकायचं ..तुम्ही आय हाय सरव्यांची ..उपाय सांगा ..पर नाडू नगा माझ्या पोरीला ..” आणि आक्का पटापट रखमाचे पाय धरू लागली ..राधा मात्र पुरती गोंधळली होती , तिची ही कडक सासू क्षणात मऊ लोण्याचा गोळा झाली होती . तिच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव दाटले आणि अनिमिष नेत्रांनी ती पुढचे नाट्य पाहू लागली ..तिने अनेकदा अशा घुमणाऱ्या बायका मरीबाईच्या पुढं पहिल्या होत्या पण अशी बोलणारी जोगवेकरीन ती प्रथम पहात होती .
“हुं हुं हुं ......” करीत रखमा जास्तच घुमू लागली आणि आक्का जास्तच भेदरली ..पुन्हा आक्काने रखमाचे पाय घट्ट धरले आणि तिला विनवणी करू लागली . आपल्या कडक सासूला असे नम्र होताना पाहून राधा मात्र मनातून आनंदित झाली होती ..
“हुं हुं हुं ...आक्के ...हुं हुं हुं ...मावलायांच्या सवास्नी घाल ..हुं हुं हुं ...तेबी तिथं जावून ...हुं हुं हुं हुं ...ह्या महिन्यात करशील तर पुढच्या महिन्याला सून बाहेर बसायची नाही ...हुं हुं ....” एक लिंबू हातात देत आक्का तिच्या पटापट पाया पडत राहली ..आणि बोटांनी गुंतलेल्या हातात लिंबू फोडून रखमा हळू हळू शांत होत गेली ...जसे सारे संपले तशा बायका पांगल्या आणि अवघडलेली रखमा स्वतःला आवरून पुन्हा पुढच्या घरी गेली ...आरोळी देत ..
“अंबाबाईचा जोगवा ..” आक्का आणि राधा मात्र एकमेकींकडे पाहत राहिल्या ..
   सारे सोपस्कार करून दोघी सासूसुना आल्या ..राधा आनंदात होती कारण तीन चार महिन्यातून ती माहेरी गेली होती . आक्का मात्र महिना पालटण्याची वाट बघू लागली . राधा तिच्या वेळेला पुन्हा बाहेर बसली ..आणि आक्काने डोक्याला हात लावला ..वर्ष झाले ग्यानबाच्या लग्नाला परंतु राधेच्या महिन्याची तारीख मात्र बदलत नव्हती ..प्रत्येक वेळी ती बाहेर बसली की आक्काबाई कपाळ झोडू लागली ..हळूहळू ती राधेवर चिडून जाऊ लागली . ग्यानबा नाही पाहून ती तिला मारूही लागली . ग्यानबा आता सोबत्यांची लेकरे घेऊन उबगला होता , त्याला स्वतःचे लेकरू हवे होते ! तो आता राधेपासून दुरावत गेला ..आणि त्यांच्यातला हा दुरावा वाढल्याने ..राधाही सुकून गेली . महिना काही चुकत नव्हता आणि तिचा महिना आला की कुणी मेल्यासारखी दोघांची तोंडे पाहून राधा कोमेजू लागली . सासूचा जाच होताच आता नवऱ्याचा वाढू लागला ..रखमा येत होती , जोगवा मागत होती पण आक्का गुरुमाई ला दोष न देता राधेलाच त्रास देत होती ..नवेनवे सारे उपाय करून झाले ..राधाने या जाचाने अन्नपाणी कमी केले तशी आल्या वेळी टचटचलेली राधा अधिकच कमजोर झाली आणि सारखी आजारी पडू लागली .. मुलाची आशा सोडाच पण राधीचा दवाखानाच या माय लेकरांच्या नाकी नऊ आणू लागला . आक्काबाई दिवसरात्र स्वतःच्या आणि ग्यानबाच्या प्रारब्धाला कोसत होती . आला दिवस जात होता . आताशा राधीच्या आई बापाचे येणे पण कमी झाले . हळूहळू राधा औषधाशिवाय अंथरुणात तळमळू लागली , आक्काबाई काय तिला दवाखाना दाखवत नव्हतीच ...राधेची शरीरयष्टी अधिकच खालावली . एक दिवस स्वयपाकाच्या जागी चालेल्या मायलेकरांच्या गोष्टी राधेने ऐकल्या आणि त्याच जागी ती बसली . तिचे भविष्यच अंधारात घिरट्या मारू लागले आणि अशक्त राधी कधी त्याच जागी बेशुद्ध झाली हे कुणालाच कळले नाही .
“अंबाबाईचा जोगवा ....” एक हाक तिच्या कानी पडली आणि ती उठून बसली , म्हणजे कालपासून ती त्याच जागी पडली होती ! तिने तोंडाला पाणी लावले आणि बाहेर आली अजूनही रखमा आणि तिची सासू एकमेकींच्या कानाला लागून काही बोलत होत्या . तिने स्वतःचे आवरून अंघोळ केली , बाहेर आली तरी दोघी काही बोलत होत्या . अंघोळ करून ती परडीच्या पाया पडली , \रखमा आणि आक्काबाईच्या पण ...दोघींनी तिच्याकडे लक्ष दिलेच नाही ..काही मनात ठेवून ती निश्चयी मुद्रेने आत मात्र गेली . तिच्या उजळलेल्या चेहऱ्याचे आकलन मात्र कुणालाच झाले नाही आणि तिची ती शांत मुद्रा पाहून दोघीही बावरल्या ...
    त्यानंतर तीन चार दिवस राधा बरीच उत्साही दिसत होती . तिच्यातील या बदलाने मायलेकरांच्या कपाळाला आठ्या पडत होत्या ..त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या मनसुब्यांवर पाणी तर पडणार नाही ही काळजी दोघांना सतावत होती . आता राधा रोज स्वयपाक , घरकाम करू लागली . त्यांच्या टोमण्यांना न जुमानता खाऊ लागली . तशी दोघा मायलेकरांची घालमेल वाढू लागली ..
“राधे ..इकड यी ...” ग्यानबाने जोरात हाक मारली . राधा त्याला जेवायला वाढून नुकतीच बाहेर कपडे वाळायला घालत होती .तिलाही भूक लागली होती म्हणून घाईने आवरत होती . तेवढ्यात ग्यानबाची हाक ऐकून ती आत पळत आली ..तिला पाहताच तिच्या नवऱ्याने भांडे कोपऱ्यात भिरकावले ..आणि कडाडला .
“रांडीचे , तुला मीठ किती टाकायचं हे बी कळत नाही का ?” आणि तो पुढे होऊन खरकट्या हाताने तिला बडवू लागला . ती तशीच बाहेर धावली , सासूला येताना पाहून त्याच जागी ओट्यावर बसली , नवरा चुलीचं लाकूड पाठीत घालणार तोच तिने रखमाबाई सारखी बोटे एकमेकांत गुंतवली आणि गुढग्यावर येऊन घुमू लागली ...
“हुं हुं हुं ......” आक्काबाई धावतच ओट्यावर आली आणि घरातून पंचपाळ घेऊन आली . तिला कुंकाचा मळवट भरू लागली ..पण हलणारी राधा तिला आवरत नव्हती . थोडी शांत होत राधेने कुंकू लावून घेतले . आणि पुन्हा जोराने घुमू लागली . इतक्यात साऱ्या शेजारणी धावतच आल्या . ग्यानबा रखमाबाईला बोलवून आणायला गाडीवर गेला . पाचच मिनिटात रखमा तिथे परडी घेऊन हजार झाली ..आणि राधेच्या अंगातील देव पाहून गालात हसली ...
“ देवा ...काय चुकलं माकलं सांगा ..” रखमा राधेच्या पायावर झुकली . राधा आता जास्तच जोराने घुमत होती सारे केस फिसकटून तिच्या चेहऱ्यावर आले होते .
“देवा माफी करा ..चुकी सांगा ..” रखमा आणि आक्का दोघी तिला विनवत होत्या ...
“हुं हुं हुं ....रखमे ...हुं हुं हुं ..”
“जी देवा ..”
“हुं हुं हुं तुला कसली विद्या दिली म्या आन त्वा गं द्वाडानी काय केलं ..”
“सांगा देवा ..चूक आसल तर माफी करा ..”
“हुं हुं हुं ..तुला देव कळना ..हुं हुं ..त्याची परडी आणल्यापरीस ती नीट व्हत नाय ..तुला कळाया नको ..हुं हुं हुं”
“चुकलं आई ..उपाय सांगा ..”
“हुं हुं हुं ..राधीची परडी आणा ..हुं हुं हुं ..”
“आई , तुमी सांगा ते करू ..”आक्काबाई पुढे होऊन म्हणाली . राधीच्या अंगात जास्तच जोर आला ..
“हुं हुं हुं ..आक्के ...”
“आई सांगा , चुकी माफ करा ..” आक्काबाई विनवणी करू लागली . ग्यानबा एका बाजूला बसून सारे विस्फारित डोळ्यांनी पाहत होता .
“हुं हुं हुं ..राधीचा देव केल्याशिवा तिला प्वार व्हणार नाय ..हुं हुं हुं ..”
“तुमी सांगला त्या करीन आई ..”
“हुं हुं हुं ...परडी आण आधी , देवधर्म कर ..हुं हुं हुं...” आक्काबाई हात जोडून राधेच्या पुढे बसली होती .
“हुं हुं हुं ..तिलाबी प्वार होईन ..हुं हुं हुं पर दम धरा ...हुं हुं हुं ..”
“जी आई ...”
“आधी देव करा ...हुं हुं हुं ..” राधेने जोराचा आवाज केला आणि ती पुन्हा जोराने घुमू लागली .आता मात्र रखमा पुढे आली , तिने राधाच्या हाती लिंबू दिले , राधेने ते एका दाबत चुरा करून टाकले ..आणि हळूहळू शांत होत गेली ...ती तशीच खाली कोसळली . आक्काबाई , रखमाबाई पुढे झाल्या आणि तिच्या केसांना आवरू लागल्या ...झोपेचे सोंग घेतलेली राधा मात्र मनात हसत होती , आणि रखमा पण !
      डॉ संध्या राम शेलार .

ही कथा लिहिताना एक कविता मनात घर करून होती .
  माणूस असणं
तू मला दगड म्हणालास
परी मी दुभंगले नाही
मग मी छिन्नी हातोडा झाले
आणि सोलत बसले स्वतःला
रंग , रूप , आकार येईपर्यंत
आता तू मला देवी म्हणतोस
आणि रोज फुलं वाहतोस
माझं माणूस असणं
कधी मान्यच नाही का तुला ?
  - किरण केंद्रे .
किती सार्थ शब्द आहेत ..आजही ग्रामीण भागात असलेल्या शोषित स्रीला असाच देवाचा आधार घेऊन जगावे लागते आहे . आणि जेंव्हा अशी असहाय स्री असे कर्मकांडाचे मार्ग निवडते तेंव्हा मला तिचा आदर वाटतो ..कारण निराधार अशी ती अबला देव जरी तारून नेत नसला तरी त्याचे नाव मात्र तिला तारून नेते ..ग्रामीण जीवनातील ही अंधश्रद्धा संपवायची असेल तर आधी स्री शिक्षण झाले पाहिजे आणि स्रीशोषण थांबले पाहिजे !

            -डॉ संध्या राम शेलार .

No comments: