या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday, 10 February 2016

जोहार -सुशील धसकटे यांची एक वास्तवदर्शी कादंबरी

‘जोहार’ एक असा शब्द जो काळाच्या ढिगाखाली गाडला गेला . साठ हजार वर्षांची ओळख सांगणारा हा शब्द !  अर्थ साधा , ‘ नमस्कार’ इतकाच पण त्याला वापरताना ‘मायबाप’ जोडले संत चोखोबा यांनी ..आणि त्याची ओळख दीनवाणी गरीबाची हाक झाली .. मी पुस्तक वाचायला घेतले , अजून सुरवात करीतच होते , ओपीडी जसा वेळ मिळेल तशी वाचत असते मी , मग पुस्तक टेबलवरच असते , अनेक जणांनी तो शब्द वाचला आणि प्रतिक्रिया दिली ..काय डॉ काय वाचताय , आता कुठे उकरून काढता ..आता कुणी दीनवाणे नाही आणि नम्र सुद्धा नाही ! उकरून काढता ? हे मनात घोळत राहिले , आणि जशी वाचत गेले तशी उकरून काढलेली ही मुळे मला दिसू लागली .
 तिसऱ्या प्रकरणातील शेवटचे मल्हारेया सीक्षापण वाचले आणि साऱ्या गोष्टींची उकल झाली . मल्हारच्या मनातील खळबळ , मुळांना सोडून उंच वाढणाऱ्या समाजाने उडवलेली त्याच्या प्रश्नातून व्यक्त होते आणि सर्वज्ञ गोसावी (श्री चक्रधर स्वामी ) यांनी  केलेलं त्याचे विश्लेषण अत्यंत मर्मभेदी वाटले मला ..कारण तिथेच त्या कादंबरीची उंची लक्षात आली आणि तिला मुळांना घट्ट करणारी ही सामाजिक कादंबरी मनात अनेक तरंग निर्माण करून गेली . ते सर्वाज्ञांनी  केलेलं विवेचन मुद्दाम इथे द्यावे वाटते ..
सर्वज्ञ  म्हणतात , “ बुड नाइ : त्याले आधारू कायसेनि ? : शेंडा उंच भासे : वरवर : अल्पायुषी : तकलादू : जादा टिकत ना : बुड म्हणजे मूळ : नाळ : तेणे जितुके खोलखोल खोल : तितुकी समृद्धीची ओल चिरंतन : सत्वयुक्त : टिकावू : म्हणून बुडाची जाणीव होआवी की :”
 आजच्या भरकटलेल्या समाजव्यवस्थेचे परिपूर्ण चित्रण विश्लेषणासह लेखकाने कादंबरीत केले आहे , आणि तेही ग्रामीण , समजणाऱ्या बोली भाषेत ..म्हणून माझ्यासारख्या शहरी , ग्रामीण भागाचा अनुभव घेणार्याला तर ती जास्त भिडते . वास्तववादी चित्रण करताना लेखकाने कुठलीही अतिशोयोक्ती तर केली नाहीच पण जिथे ते सत्य नागडे करू शकतील तिथे न बुजता त्यांनी केले आहे ..म्हणूनही ही कादंबरी वास्तव शब्दांकित करते . आजच्या समाजातील अराजकता ही समाजाने मुळांची जोपासना न करता फक्त आभाळाला आपले केल्यामुळे आहे . आणि इथेच माणसाने त्याच्या आणि सर्व सृष्टीच्या विनाशाची बीजे पेरली आहेत .
    माझ्या वरील सांगण्यावरून असे वाटेल की लेखकाचे विचार प्रतिगामी तर नाहीत ? पण सांगतांना अत्यंत आनंद वाटतोय की प्रतिगामी आणि पुरोगामी दोन्ही मधील चांगल्याची सांगड घालूनच चिरंतन समृद्ध संस्कृती निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी मानवतावादी दृष्टीकोन ठेवणे जास्त उचित असेल . आजच्या समाजच्या चंगळवादी भूमिकेवर टीकास्र सोडतानाच ते समाजातील जास्त आणि कमीचा फटका या समाजव्यवस्थेला कसा बसत आहे हेही सांगतात . इतके सांगतांना कुठेही कादंबरी रटाळवाणी होत नाही . फक्त शिकवण न राहता ती कादंबरी आहे , ही जाणीव प्रत्येक ठिकाणी येते .
  शहरी आणि ग्रामीण भागातील विरोधाभास रेखाटताना कुठेही त्यात अतिरंजन तर जाणवत नाहीच , पण वास्तव जास्त जवळ जावून पाहत आहोत असेच वाटते . दिशाहीन समाजाचे चित्रण करताना राजकारण , शिक्षणक्षेत्र ,साहित्य, कृषिक्षेत्र आणि समाजतील बीभत्स रूप प्रत्येक ठिकाणी चित्रित होते . या कादंबरीत ग्रामीण भागातील , मल्हार या विध्यार्थ्याचे एम ए  ते एम फील पर्यंतचे वर्णन आहे . त्याचे मित्र आणि तो यांच्यातील संभाषण जेंव्हा समाजातील अंदाधुंद दाखवते त्याच वेळी त्या मुलांची त्याला विरोध करून पुढे जाण्याची मानसिकता जास्त कौतुकास्पद आहे ..समाजातील विषमतेने , सामाजिक प्रश्नांनी , जातिभेदाच्या स्तोमाने विचलित झालेली ही तरुण मने मांडताना कुठेही एकसुरीपणा नाहीच पण त्यांच्या मनातील गोंधळ ,आणि शंका लेखकाने बारकाव्याने मांडल्या आहेत .
 ग्रामीण महाराष्ट्रातील पाणीटंचाई , गरिबी , नैतिक मूल्यांना दिली जाणारी मूठमाती , राजकारणासाठी होणारी समाजाची दिशाहीन फरफट , स्रीयांच्या पिळवणूकी बरोबर स्री स्वातंत्र्याच्या नावाखाली  होणारी कुटुंबाची होरपळ सांगताना कुठेही एकांगीपण जाणवत नाही . अशी ही समाजाचे सर्व बाजूंनी विवेचन करणारे लेखन आहे आणि हे वास्तववादी लेखन म्हणूनच मनाला अस्वस्थ करून तर जातेच पण विचार करायलाही भाग पाडते . आणि हेच या कादंबरीचे यश आहे . लेखकाची मुळांना न सोडता होणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची आस प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेते ..कारण सर्वज्ञ गोसाव्याच्या सांगण्यानुसार समृद्धी असलेला समाज उंच गेला तरी मुळे किती खोलवर रुजली आहेत यावरच त्याचे चिरंतन अस्तित्व टिकणार आहे !
    भुषण राक्षे यांनी , ‘महानुभाव - वारकरी , महात्मा फुले - शाहू - शिंदे - सयाजीराव - गांधी - साने गुरुजी - आंबेडकर - लोहिया - शरद पाटील - नेमाडे या विचार परंपरेचे बोट घट्ट पकडून , त्यांना स्वतः च्या जाणीव - नेणिवेत मुरवत मल्हारने भवतालच्या अशाश्वत - आभासी वास्तवात मिसफीट होऊनही सकारात्मक तेने केलेल्या स्वतंत्र प्रवासाची ही हकीकत प्रत्येकालाच अस्वस्थ करणारी व प्रत्येकासमोर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे …’  या सार्थ शब्दात सांगितले आहे या कादंबरीबद्दल !
         डॉ संध्या राम शेलार .

No comments: