परवापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे . सर्वत्र दारूदुकानांना चालू ठेवण्यासाठी मिळालेल्या शासकीय परवानगीमुळे समर्थनार्थ असमर्थनार्थ प्रतिक्रिया प्रत्येकजण मांडत आहे . ढासळनारी अर्थव्यवस्था हे कारण सरकारने दिले असले तरी चर्चा करणारे अनेक कारणे सांगत आहेत . कुणाला काळजी आहे अनेक दिवस दारू न मिळाल्याने होणार्या त्रासाची तर कुणाला वाटते दारू प्रमाणात पिल्याने काय होणार आहे ? दारू म्हणजे फळांचा रस तर आहे ! काहीजण दारूला प्रतिष्ठा देवू पाहत आहेत . अनेकांनी दारूचा इतिहास सांगून त्याची भलामन केली . आपले देवदेवता पितात , पूर्वज घ्यायचे वगैरे . कुणाला श्रमपरीहारासाठी हवी आहे . अनेकांनी मानसिक आरोग्याचे कारण पुढे केले . करोंनामुळे आलेले मानसिक तणाव कमी व्हावेत ही काहींची इच्छा आहे . काहीजनांना कुटुंबासोबत (बायको ) राहून होणार्या भांडणावर दारू हा इलाज वाटतो . सरकार म्हणते राज्याची बिकट आर्थिक अवस्था सावरण्यास दारूच्या विक्रीतुन मिळणारा महसूल गरजेचा आहे . दारू पिणारे , विकणारे आनंदात आहेत . अनेक विनोद केले जात आहेत . दारूडे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत वगैरे .
ज्या देशाच्या इतिहासात महात्मा गांधी हे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते . ज्या गांधी विचारांनी भारताच्याच नाही तर त्यानंतर स्वतंत्र झालेल्या प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली आहे . तळागाळातील प्रत्येक व्यक्ती जोवर दु:खात आहे अडचणीत आहे तोवर माझे कार्य चालूच राहील असे गांधीजी नेहमी म्हणत . गांधीजींचे दारूबंदीचे काम सर्वश्रूत आहेच . त्यांचे याविषयी योगदान खूप मोलाचे आहे . नशा केल्याने त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान तर होतेच परंतु त्यांच्या मुलांचे स्रियांचे अनन्वित छळ होतात . नशेमुळे क्रियाशीलता संपुष्टात येते . आर्थिक संकटाचा त्या कुटुंबाला सामना करावाच लागतो परंतु उपासमार सुद्धा होते . समाजातील शोषित स्रियांच्या जीवनात आनंद यावा , मुलाबाळांची उपासमार होऊ नये म्हणून गांधीजींनी दारूबंदीचेही आवाहन केले होते . या त्यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असे . असाच एक उल्लेख गांधीजींना लिहीलेल्या म्हैसूर राज्यातील होल्लीकेरी येथील एका पत्रलेखकाने केला आहे . तो म्हणतो , “माझ्या रानी परज जमातीच्या लोकांनी दीड महिन्यापासून ताडी व इतर मादक पेये पिण्याचे पुर्णपणे सोडून दिले आहे . कुणी जर नशा करण्याचा प्रयत्न केला तर गावाचे नाईक , यजमान आणि करभान यांच्याकडून दखल घेऊन कडक शासन केले जाते . यामुळे झोपड्यात आता भांडणे होत नाहीत . त्यांच्या बायका आनंदाची बातमी देतात . त्यांचा काळ शांततेत चालला आहे .” या पत्राला उत्तर देताना गांधीजी त्यांचे अभिनंदन करतात . शुद्धीकरण चळवळीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक करतात . 1921 च्या चळवळीचा उल्लेख करून ते म्हणतात की त्यावेळी घडले त्याप्रमाणे पुन्हा हे लोक नशेकडे वळू नयेत म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत . त्यासाठी त्यांना चरख्याचा आश्रय घ्यायला लावायला हवा . त्यामुळे त्यांचे कापडावर खर्च होणारे पैसेही वाचतील आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील . दारुवर खर्च होणारा पैसा पण वाचेल . गांधीजी पुढे जावून हेही सांगतात की नशामुक्ती इतकेच ध्येय नाही तर व्यसनांचे उच्चाटण झाल्याचा अहवालही आपण द्याल याची मला उत्सुकता आहे .
या पत्रानंतर बनसाडा संस्थांनातील रानी परज चौकशी समितीचा अहवाल आहे . तो वल्लभभाई पटेल यांनी या संस्थांनातील 47 गावांना भेटी देऊन काढला आहे . यात ते महाराजसाहेबांच्या प्रजेच्या प्रती केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख करतात . त्याचे गांधीजी कौतुकही करतात . परंतु ते महाराजसाहेबांना सांगतात , “ जोवर आपण दारूच्या व्यापारातून प्राप्ती करणे आवश्यक मानतात तोवर तुम्ही जे काही तुमच्या माणसांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे . बनसाडा प्रदेशाला लागून असलेल्या ब्रिटिश , गायकवाड व धरमपुर या तीन शेजारी प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे तुमच्या संस्थांनाला दारूबंदीचे धोरण यशस्वी करणे अवघड जात आहे . ही गोष्ट खरी आहे . पण महान गोष्टी महान त्यागावाचून आणि महान उपाययोजना केल्यावाचून अमलात आणता येत नसतात . आपल्या संस्थांनाला संपूर्ण दारूबंदी जाहीर करून या कामी पुढाकार घेता येईल . इतकेच नव्हे तर शेजारच्या राज्यात दारूबंदीकरता चळवळ करणेही शक्य होईल . मुख्य गोष्ट दारूपासून मिळणारा महसूल सोडून देण्याला तयार होण्याची आहे . या बाबतीत लागलीच हाती घ्यायचा उपक्रम म्हणजे , मद्यपानाला बळी पडलेल्या जमातीत जोराचा मद्याविरोधी प्रचार चालविण्याव्यतिरिक्त हा महसूल इतर कोणत्याही कामी , मग ती कामे कितीही प्रशंसनीय असली तरी , वापरायचा नाही असे ठरविणे हा होऊ शकेल . कोणत्याही संस्थांनाला आपल्या लोकांनी या दुर्व्यसनाचा त्याग करावा असे मनापासून वाटत असेल , त्याला या दुर्व्यसनात लोळत पडणे कायद्याने अशक्य करून स्वस्थ बसता येणार नाही , त्याला त्या दुर्व्यसनाचे मूळ शोधून लोकांनी त्याचा त्याग करण्याविषयीचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल . दारूबंदीचे कोणतेही धोरण जर मी सुचविलेल्या स्वरुपाच्या रचनात्मक कार्याच्या जोडीने अमलात आणण्यात आले तर त्या धोरणांचा परिणाम त्या लोकांची आणि त्यांच्याबरोबरच त्या संस्थानाची उतरोत्तर अधिक भरभराट होण्यातच खात्रीने होणार . संपूर्ण दारूबंदी अमलात आणण्याच्या दृष्टीने जगात हिंदुस्तान हाच सर्वात आशादायक देश आहे याचे साधे कारण आहे की , येथे व्यसनासक्ती ही प्रतिष्ठेची किंवा छानछौकीची गोष्ट मानली जात नाही आणि ती काही विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे !” ( महात्मा गांधी यांचे संकलित वाङ्मय खंड 34 )
वरील गोष्टीवरून आधी केलेल्या सर्व दारू / व्यसनविषयक समर्थनाची उत्तरे गांधीजींनी आधीच दिलेली आहेत . खरेतर उच्चमध्यमवर्ग सोडला तर दारू आणि इतर व्यसनांमुळे कुटुंबातील स्रिया आणि मुलांची होणारी परवड अत्यंत क्लेशकारक आहे . मागे काही दिवसापूर्वी अशीच एका सासू सून आलेल्या . त्या मुलीचा नवरा हातभट्टीची दारू पिल्याने गेला होता . त्या दोघीही सासूसुनेनी बरे झाले मेला कमीतकमी लेकरबाळांच्या मुखात घास जातोय आता अशी प्रतिक्रिया दिली . जेंव्हा एक आई आणि बायको अशी बोलत असेल तेंव्हा खरोखर त्यांना या व्यसनाधीन मुलाचा / नवर्याचा किती छळ सहन करावा लागत असेल याचा विचारही करवत नाही . बरे श्रमपरिहार म्हणून मजूर घेत असेल तर त्याच वेळी त्याची बायकोही तितकेच काम करत असते मग तिचा श्रमपरिहार कसा होणार ? काही आदिवासी स्रिया अशी व्यसने जरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांचे होणारे शोषण कुणी का पाहू शकत नाही . बापाचे अनुकरण मुलगा नकळत्या वयात करू लागतो आणि वयाची पंचविशी होण्याआधीच संपतो . समाजातील तरुणांना निष्क्रिय करणारी दारू राजरोस मिळू लागली तर खरोखर आपल्या देशाची भरभराट होईल का ? आताच्या करोंनाच्या पार्श्वभूमीवर जर हे दारू पिऊन संतुलन हरवलेले लोक रस्त्यावर फिरून /पडून करोंनाचा प्रादुर्भाव वाढवणार नाही का ? आणि जर असे झाले तर आजवर ज्या लोकांनी प्रामाणिकपणे लॉकडावून पाळले , ज्या पोलिस डॉक्टर आणि इतर यंत्रणांनी स्व:ताचे जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांचे प्रयत्न मातीमोल होणार नाही का ? एसी मध्ये बसून समर्थन करणारे यांना एकच आवाहन करावेसे वाटते की , त्यांनी अशाप्रकारे उध्वस्त होणार्या दहा कुटुंबाची तरी जबाबदारी घ्यावी आणि मग दारूबंदीला विरोध करावा . माझ्या एक वकील स्नेही दिलशाद मुझावर कोल्हापूरच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत . त्या दारुमुळे होणार्या मुलांच्या आणि महिलांच्या दुर्दशेचे शोषणाचे वर्णन करीत होत्या . ऐकून ज्या गोष्टी अस्वस्थ करतात त्या जगताना त्या लोकांची काय अवस्था होत असेल . व्यसनाधीनतेमुळे वाढणारी गुन्हेगारी , घरगुती हिंसा याला शासन फक्त कायदे करून आळा घालू शकत नाही . कारण निम्यापेक्षा जास्त गुन्हे पोलिसांपर्यंत जातच नाहीत . जे जातात त्यातही न्याय मिळणारे कितीतरी अल्प आहेत . महसुलाचे कारण पुढे करणे योग्य नाही . महसुलाचे तेच एकमेव साधन नाही . आणि ज्यांच्या सोईसाठी हा महसूल गोळा होईल त्यांचे आणखी हाल वाढणार असतील तर याला अर्थ तरी काय ? हे म्हणजे पेशंट नाही म्हणून डॉक्टरने निरोगी माणसांच्या किडन्या विकण्यासारखे झाले ! महसुलासाठी जर सरकार दारुविक्रीला परवानगी देत असेल आणि आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत असेल तर सरकारला गांधीजींच्या त्या शब्दांची आठवण करून द्यावीशी वाटतेय , “ जोवर दारूच्या व्यापारातून प्राप्ती काढणे आवश्यक मानतात तोवर ते जे आपल्या लोकांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे !”
No comments:
Post a Comment