या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !
Showing posts with label आवडलेली पुस्तके. Show all posts
Showing posts with label आवडलेली पुस्तके. Show all posts

Wednesday, 10 February 2016

जोहार -सुशील धसकटे यांची एक वास्तवदर्शी कादंबरी

‘जोहार’ एक असा शब्द जो काळाच्या ढिगाखाली गाडला गेला . साठ हजार वर्षांची ओळख सांगणारा हा शब्द !  अर्थ साधा , ‘ नमस्कार’ इतकाच पण त्याला वापरताना ‘मायबाप’ जोडले संत चोखोबा यांनी ..आणि त्याची ओळख दीनवाणी गरीबाची हाक झाली .. मी पुस्तक वाचायला घेतले , अजून सुरवात करीतच होते , ओपीडी जसा वेळ मिळेल तशी वाचत असते मी , मग पुस्तक टेबलवरच असते , अनेक जणांनी तो शब्द वाचला आणि प्रतिक्रिया दिली ..काय डॉ काय वाचताय , आता कुठे उकरून काढता ..आता कुणी दीनवाणे नाही आणि नम्र सुद्धा नाही ! उकरून काढता ? हे मनात घोळत राहिले , आणि जशी वाचत गेले तशी उकरून काढलेली ही मुळे मला दिसू लागली .
 तिसऱ्या प्रकरणातील शेवटचे मल्हारेया सीक्षापण वाचले आणि साऱ्या गोष्टींची उकल झाली . मल्हारच्या मनातील खळबळ , मुळांना सोडून उंच वाढणाऱ्या समाजाने उडवलेली त्याच्या प्रश्नातून व्यक्त होते आणि सर्वज्ञ गोसावी (श्री चक्रधर स्वामी ) यांनी  केलेलं त्याचे विश्लेषण अत्यंत मर्मभेदी वाटले मला ..कारण तिथेच त्या कादंबरीची उंची लक्षात आली आणि तिला मुळांना घट्ट करणारी ही सामाजिक कादंबरी मनात अनेक तरंग निर्माण करून गेली . ते सर्वाज्ञांनी  केलेलं विवेचन मुद्दाम इथे द्यावे वाटते ..
सर्वज्ञ  म्हणतात , “ बुड नाइ : त्याले आधारू कायसेनि ? : शेंडा उंच भासे : वरवर : अल्पायुषी : तकलादू : जादा टिकत ना : बुड म्हणजे मूळ : नाळ : तेणे जितुके खोलखोल खोल : तितुकी समृद्धीची ओल चिरंतन : सत्वयुक्त : टिकावू : म्हणून बुडाची जाणीव होआवी की :”
 आजच्या भरकटलेल्या समाजव्यवस्थेचे परिपूर्ण चित्रण विश्लेषणासह लेखकाने कादंबरीत केले आहे , आणि तेही ग्रामीण , समजणाऱ्या बोली भाषेत ..म्हणून माझ्यासारख्या शहरी , ग्रामीण भागाचा अनुभव घेणार्याला तर ती जास्त भिडते . वास्तववादी चित्रण करताना लेखकाने कुठलीही अतिशोयोक्ती तर केली नाहीच पण जिथे ते सत्य नागडे करू शकतील तिथे न बुजता त्यांनी केले आहे ..म्हणूनही ही कादंबरी वास्तव शब्दांकित करते . आजच्या समाजातील अराजकता ही समाजाने मुळांची जोपासना न करता फक्त आभाळाला आपले केल्यामुळे आहे . आणि इथेच माणसाने त्याच्या आणि सर्व सृष्टीच्या विनाशाची बीजे पेरली आहेत .
    माझ्या वरील सांगण्यावरून असे वाटेल की लेखकाचे विचार प्रतिगामी तर नाहीत ? पण सांगतांना अत्यंत आनंद वाटतोय की प्रतिगामी आणि पुरोगामी दोन्ही मधील चांगल्याची सांगड घालूनच चिरंतन समृद्ध संस्कृती निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी मानवतावादी दृष्टीकोन ठेवणे जास्त उचित असेल . आजच्या समाजच्या चंगळवादी भूमिकेवर टीकास्र सोडतानाच ते समाजातील जास्त आणि कमीचा फटका या समाजव्यवस्थेला कसा बसत आहे हेही सांगतात . इतके सांगतांना कुठेही कादंबरी रटाळवाणी होत नाही . फक्त शिकवण न राहता ती कादंबरी आहे , ही जाणीव प्रत्येक ठिकाणी येते .
  शहरी आणि ग्रामीण भागातील विरोधाभास रेखाटताना कुठेही त्यात अतिरंजन तर जाणवत नाहीच , पण वास्तव जास्त जवळ जावून पाहत आहोत असेच वाटते . दिशाहीन समाजाचे चित्रण करताना राजकारण , शिक्षणक्षेत्र ,साहित्य, कृषिक्षेत्र आणि समाजतील बीभत्स रूप प्रत्येक ठिकाणी चित्रित होते . या कादंबरीत ग्रामीण भागातील , मल्हार या विध्यार्थ्याचे एम ए  ते एम फील पर्यंतचे वर्णन आहे . त्याचे मित्र आणि तो यांच्यातील संभाषण जेंव्हा समाजातील अंदाधुंद दाखवते त्याच वेळी त्या मुलांची त्याला विरोध करून पुढे जाण्याची मानसिकता जास्त कौतुकास्पद आहे ..समाजातील विषमतेने , सामाजिक प्रश्नांनी , जातिभेदाच्या स्तोमाने विचलित झालेली ही तरुण मने मांडताना कुठेही एकसुरीपणा नाहीच पण त्यांच्या मनातील गोंधळ ,आणि शंका लेखकाने बारकाव्याने मांडल्या आहेत .
 ग्रामीण महाराष्ट्रातील पाणीटंचाई , गरिबी , नैतिक मूल्यांना दिली जाणारी मूठमाती , राजकारणासाठी होणारी समाजाची दिशाहीन फरफट , स्रीयांच्या पिळवणूकी बरोबर स्री स्वातंत्र्याच्या नावाखाली  होणारी कुटुंबाची होरपळ सांगताना कुठेही एकांगीपण जाणवत नाही . अशी ही समाजाचे सर्व बाजूंनी विवेचन करणारे लेखन आहे आणि हे वास्तववादी लेखन म्हणूनच मनाला अस्वस्थ करून तर जातेच पण विचार करायलाही भाग पाडते . आणि हेच या कादंबरीचे यश आहे . लेखकाची मुळांना न सोडता होणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची आस प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेते ..कारण सर्वज्ञ गोसाव्याच्या सांगण्यानुसार समृद्धी असलेला समाज उंच गेला तरी मुळे किती खोलवर रुजली आहेत यावरच त्याचे चिरंतन अस्तित्व टिकणार आहे !
    भुषण राक्षे यांनी , ‘महानुभाव - वारकरी , महात्मा फुले - शाहू - शिंदे - सयाजीराव - गांधी - साने गुरुजी - आंबेडकर - लोहिया - शरद पाटील - नेमाडे या विचार परंपरेचे बोट घट्ट पकडून , त्यांना स्वतः च्या जाणीव - नेणिवेत मुरवत मल्हारने भवतालच्या अशाश्वत - आभासी वास्तवात मिसफीट होऊनही सकारात्मक तेने केलेल्या स्वतंत्र प्रवासाची ही हकीकत प्रत्येकालाच अस्वस्थ करणारी व प्रत्येकासमोर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे …’  या सार्थ शब्दात सांगितले आहे या कादंबरीबद्दल !
         डॉ संध्या राम शेलार .

Thursday, 4 February 2016

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव .

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव यांचा कवितासंग्रह आज वाचण्यात आला .  एकदा पुस्तक हाती घेतले आणि बालिकाजींच्या स्वतःबद्दलच्या पहिल्याच लेखात आपल्याला त्या जिंकून घेतात आणि उत्तम कांबळे यांच्या अभिप्रायाने तर कधी एकदा कवितेची पाने उघडते असे होऊन जाते . आणि वाचताना वाटतेही की डोंगर पोखरून उंदीर तर निघणार नाही ! पण जशी जशी वाचत गेले तशी ती मुक्तछंदातील साध्या , ओळखीच्या आणि रोजच्या वापरातील शब्दांनी गुंफलेली कविता काळजाचा ठाव घेते . प्रत्येक कविता त्यांनी भोगलेल्या वेदनेचा हुंकार तर वाटतेच पण पण जगलेलं आयुष्य इतक्या प्रामाणिकपणे मांडणारी ही पोलीस कवयित्री मनात जागा करून जाते , एक माणूस म्हणून !
   उत्तम कांबळे यांनी त्यांच्या विश्लेषणात कविता खूपच छान अशी समजावली आहे . अवघड शब्दांचे जंजाळ नसणारी ही कविता सर्वसामान्य माणसाला जवळची वाटावी अशीच आहे . ‘ ज्योतीरावतात्या’ या त्यांच्या पहिल्याच कवितेत पोलीस वर्दीच्या आतील संवेदनशीलता दिसते आणि मन त्यांच्याशी जोडले जाते .
ज्या बुधवारपेठेत
पोत्यात भरून आणायचे बाईला शिक्षणासाठी
तिथं धंद्यासाठी उतरताना बायांच्या गाड्या पाहून
चेचून घ्यावेसे वाटतात डोळे .....
किती व्याकुळ प्रतिक्रिया आहे ? खरंच ते पाहताना साधी सभ्य शिकलेली बाई डोळे झाकूनच घेईल पण त्यांना कवयित्रीला त्यांच्या ड्युटीमुळे याकडे डोळेझाक करताच येत नाही , परंतु तिचे संवेदनशील मन ड्युटीवर येताना घरी ठेऊन यायची गोष्ट नाहीच न ?
   पोलिसांबद्दल सर्वसामन्यांच्या मनात असलेली एक दरी , त्यांच्याकडे माणूस नाही तर कुणी कर्तव्यपरायण व्यक्ति म्हणून पाहण्याची लोकांची असलेली दृष्टी कवयित्रीला त्रास देते आणि ती आवाहन करते आम्हालाही माणूस म्हणून ओळख द्या कारण या वर्दीच्या आत तुमच्यासारखाच माणूस आहे मन घेऊन जगणारा ! आणि ते त्यांनी यथार्तपणे मांडले आहे ‘हसण्यामागचे कारण’ मध्ये . पोलीस म्हणून शूद्र अशा नजरेने पाहणारा हा समाज त्यांना हेलावून टाकतो आणि त्या शिवाजीराजांना दान मागतात लढण्याचे ‘मार्गदर्शन कराल का ?’ मध्ये ! ‘ नाती’ या कवितेत वर्दीशी कामासाठी नाते जोडणाऱ्या लोकांचा धिक्कार करते आहे तीच आणि सांगते नजरच बदलली सर्वांकडे
पाहण्याची जेंव्हा हा नात्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला ..
  वरिष्ठांकडून आणि काही वरवरच्या मनाने समाजसुधारक असलेल्या लोकांकडून जेंव्हा त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल शंका व्यक्त झाली तेंव्हा त्यांनी वर्दीच्या आत माणूस आहे हे पोटतिडकीने सांगितले आहे ..या हजेर्या म्हणजे ..असाच अर्थ होतो याचा ..तेंव्हा कसं वाटलं असतं  साहेब ..यासारख्या कवितांमधून .ड्युटीच्या वेळी हजार होण्यासाठी एका बाईला करावी लागणारी धावपळ आणि तिची मुलांच्या संगोपनासाठी गैरहजर राहण्यामुळे झालेली अगतिकता त्यांनी अत्यंत प्रभावीपणे रेखाटली आहे ...शेड्युल आणि मन भरून येतं तुझ्या आठवणीने ..मध्ये ...
   लोकांनी केलेली वांझोटी चौकशी त्यांच्या त्रासाबद्दलची ‘ड्युटी’ त रेखाटली आहे . ‘सर लायसन द्या’ मध्ये उन्मत्त नागरिक अगदी हुबेहूब सांगितला आहे . ‘इतभर पोट’ मध्ये शरीरविक्रय करणारी अगतिक वेश्या मनाला अंतर्मुख करून जाते .आणि हीच कवयित्री सावध करते साऱ्यांना , की अन्याय करून दमला नसलात तरी मी आता शिकली आहे प्रतिकार करायला ..तेंव्हा सावधान ! सांगते नजर उंचावून .. ‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’त ...
  कष्टाने प्राप्त स्वातंत्र्याची विटम्बना पाहून सारे स्वातंत्र्यवीर रडताना दिसतात या संवेदनशील कवयित्रीला ..स्वातंत्र्य ..मध्ये . बाई म्हणून जगताना किती कशी अवहेलना झाली हे त्यांनी परंपरा , आई , गुमान मान्य करा , बिनडोक साले , परिवर्तन , बाईला नागवाण्याची सवय , सौदा , फस्टह्यांड , स्वतःला दोष देत मध्ये यथार्थ रेखाटली आहे .. फस्टह्यांड मधील एका प्रश्नाने तर कुत्सिक हसू येते या पुरुषप्रधान मानसिकतेचे ..ती आळ घेणाऱ्या पुरुषालाच विचारते , “मला एव्हढच सांगा , सेकंडह्यांड बाईला ओळखणारा तू फस्ट ह्यांड पुरुष कसा रे ?”
  भेटलेल्या मेहबूब च्या चेहऱ्यात तिला जगण्याची उकल होते आणि बाबा तुम्हीच सांगा मधील ‘ आता मागते तुमचा आधार
पण तुम्ही धर्मांतर तरी केलं
मी करू शकणार आहे का लिंगातर साऱ्या जणींच
हा प्रश्न हवालदिल करतो आणि स्रीच्या समाजातील विषम स्थानाबद्दल असलेली तिची अगतिकता दाखवतो ...
    पण खरे सांगू बालिकाजींची कविता कुठे भावते तर त्यांच्या पहिल्या पानावरील कविते ...या कवितेमध्ये ! समाजाचे काळे अंग दाखवून वाह वाह घेणाऱ्या , आणि क्षणोक्षणी प्रसवणार्या त्या वांझ कवितांचे सृजन करणाऱ्या कवींमध्ये बालिकाजी नाहीत हे पाहून विशेष आनंद होतो ! ती कविता मात्र पूर्ण देत आहे इथे ...
कविते ...
कविते तू आलीस ?
ये बस ..
खूप मिनत्या केल्यास
म्हणून हे वरवरचं बोचकं खोलते तुझ्याजवळ
अडगळीची खोली बंदच राहू दे
या वरवरच्या चिंध्या विस्कटते तुझ्याजवळ
हा नुसता तवंग आहे
तळ आणि गाळ राहू दे शाबूतच
फुरसतीने ये कधीतरी त्याच्यासाठी
तसं माझ्या जगण्याचं आणि भोगण्याचं
प्रदर्शन मांडायची हौस नाहीये मला
माझी अशीही इच्छा नाही
की , तू बोर्डावर जावस
लोकांनी वाह ! वाह ! म्हणावं , टाळ्या पिटावं तुझ्यावर
आणि बाजार भरवावास तू माझ्या नावानं
अशा कुटील हेतूने आली असशील तर ,
खबरदार ! माझ्या दारात पाऊलही नको टाकू टाकू
     बालिका ज्ञानदेव .
अशा या सच्च्या कवयित्रीचे या अप्रतिम आणि बोलक्या कवितासंग्रहासाठी मनपूर्वक आभार आणि एक बालिकाजी हा जर तवंग इतका काळजाला चिरणारा आहे तर आम्हाला प्रतीक्षा आहे तुमच्या तळागाळातील कवितेची !
  कवयित्री कॉनस्टेबल आहेत ..मी जेंव्हा कवितासंग्रह वाचून भारावून त्यांना संपर्क केला तेंव्हा त्यांनी आभार मानून ड्युटीसंपल्यावर बोलते असे सांगितले तेंव्हा अतिशय अभिमान वाटला या सावित्रीच्या लेकीचा ...सलाम बालिकाजी ...सलाम

      डॉ संध्या राम शेलार .