या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 7 September 2020

मी एक स्त्री आहे !

मी एक स्त्री आहे ! 
मला नकोय वेगळेपण त्यासाठी
मला वेगळी रांगही नकोय
आणि नकोय वेगळी सीट बसमधली 
वेगळा डबा रेल्वेचा ..
आदराची भीकही नको 
आणि नकोय नागवं करणं चौकाचौकातून 
(आता तसंही चौक नाही लागत 
लागते गलिच्छ , स्वार्थांध निलाजरी बुद्धी आणि मोबाईल वा टीव्हीची स्क्रीन )
मला नकोय आई म्हणून मखरात बसणं 
आणि बायको म्हणून पायाखाली तुडवणं 
मला नकोय लेक होऊन सर्वांचं कौतुक 
आणि नकोय घरादाराच्या अब्रुचं ओझं माझ्या एकटीच्याच डोक्यावर ! 
माझंही मुक्त आकाश हवंय मला ..
जिथे जबाबदारीही माझी असेल 
आणि परिणामही असेल माझाच ! 
           डॉ संध्या राम शेलार 

Monday, 11 May 2020

शब्द शोधत जगावं

जगणं अवघडून उभं राहिलं की , 
आपलं आपणच उमजून घ्यावं  
आपल्याच प्रश्नांची उत्तरं शोधत 
बोलता बोलता निशब्द व्हावं 
जावं खोलवर रूतत भूतकाळात 
आणि शोधावित नव्यानं 
जगण्याची कारणं ..
सापडली ती तर जगणं आपली म्हणावं 
नाहीतर .....
सुर्योदयानं संपणार्या अंधाराला आठवावं 
फुटू द्यावेत धुमारे वाळलेल्या खोडावर 
सुर्योदयाची वाट पाहात ..शब्द शोधत जगावं ! 

Friday, 8 May 2020

दारूबंदी आणि करोना

  परवापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे . सर्वत्र दारूदुकानांना चालू ठेवण्यासाठी मिळालेल्या शासकीय परवानगीमुळे समर्थनार्थ असमर्थनार्थ प्रतिक्रिया प्रत्येकजण मांडत आहे . ढासळनारी अर्थव्यवस्था हे कारण सरकारने दिले असले तरी चर्चा करणारे अनेक कारणे सांगत आहेत . कुणाला काळजी आहे अनेक दिवस दारू न मिळाल्याने होणार्‍या त्रासाची तर कुणाला वाटते दारू प्रमाणात पिल्याने काय होणार आहे ? दारू म्हणजे फळांचा रस तर आहे ! काहीजण दारूला प्रतिष्ठा देवू पाहत आहेत . अनेकांनी दारूचा इतिहास सांगून त्याची भलामन केली . आपले देवदेवता पितात , पूर्वज घ्यायचे वगैरे . कुणाला श्रमपरीहारासाठी हवी आहे . अनेकांनी मानसिक आरोग्याचे कारण पुढे केले . करोंनामुळे आलेले मानसिक तणाव कमी व्हावेत ही काहींची इच्छा आहे . काहीजनांना कुटुंबासोबत (बायको ) राहून होणार्‍या भांडणावर दारू हा इलाज वाटतो . सरकार म्हणते राज्याची बिकट आर्थिक अवस्था सावरण्यास दारूच्या विक्रीतुन मिळणारा महसूल गरजेचा आहे . दारू पिणारे , विकणारे आनंदात आहेत . अनेक विनोद केले जात आहेत . दारूडे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत वगैरे .

   ज्या देशाच्या इतिहासात महात्मा गांधी हे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते . ज्या गांधी विचारांनी भारताच्याच नाही तर त्यानंतर स्वतंत्र झालेल्या प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली आहे . तळागाळातील प्रत्येक व्यक्ती जोवर दु:खात आहे अडचणीत आहे तोवर माझे कार्य चालूच राहील असे गांधीजी नेहमी म्हणत . गांधीजींचे दारूबंदीचे काम सर्वश्रूत आहेच . त्यांचे याविषयी योगदान खूप मोलाचे आहे . नशा केल्याने त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान तर होतेच परंतु त्यांच्या मुलांचे स्रियांचे अनन्वित छळ होतात . नशेमुळे क्रियाशीलता संपुष्टात येते . आर्थिक संकटाचा त्या कुटुंबाला सामना करावाच लागतो परंतु उपासमार सुद्धा होते . समाजातील शोषित स्रियांच्या जीवनात आनंद यावा , मुलाबाळांची उपासमार होऊ नये म्हणून गांधीजींनी दारूबंदीचेही आवाहन केले होते . या त्यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असे . असाच एक उल्लेख गांधीजींना लिहीलेल्या म्हैसूर राज्यातील होल्लीकेरी येथील एका पत्रलेखकाने केला आहे . तो म्हणतो , “माझ्या रानी परज जमातीच्या लोकांनी दीड महिन्यापासून ताडी व इतर मादक पेये पिण्याचे पुर्णपणे सोडून दिले आहे . कुणी जर नशा करण्याचा प्रयत्न केला तर गावाचे नाईक , यजमान आणि करभान यांच्याकडून दखल घेऊन कडक शासन केले जाते . यामुळे झोपड्यात आता भांडणे होत नाहीत . त्यांच्या बायका आनंदाची बातमी देतात . त्यांचा काळ शांततेत चालला आहे .” या पत्राला उत्तर देताना गांधीजी त्यांचे अभिनंदन करतात . शुद्धीकरण चळवळीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक करतात . 1921 च्या चळवळीचा उल्लेख करून ते म्हणतात की त्यावेळी घडले त्याप्रमाणे पुन्हा हे लोक नशेकडे वळू नयेत म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत . त्यासाठी त्यांना चरख्याचा आश्रय घ्यायला लावायला हवा . त्यामुळे त्यांचे कापडावर खर्च होणारे पैसेही वाचतील आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील . दारुवर खर्च होणारा पैसा पण वाचेल . गांधीजी पुढे जावून हेही सांगतात की नशामुक्ती इतकेच ध्येय नाही तर व्यसनांचे उच्चाटण झाल्याचा अहवालही आपण द्याल याची मला उत्सुकता आहे .

  या पत्रानंतर बनसाडा संस्थांनातील रानी परज चौकशी समितीचा अहवाल आहे . तो वल्लभभाई पटेल यांनी या संस्थांनातील 47 गावांना भेटी देऊन काढला आहे . यात ते महाराजसाहेबांच्या प्रजेच्या प्रती केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख करतात . त्याचे गांधीजी कौतुकही करतात . परंतु ते महाराजसाहेबांना सांगतात , “ जोवर आपण दारूच्या व्यापारातून प्राप्ती करणे आवश्यक मानतात तोवर तुम्ही जे काही तुमच्या माणसांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे . बनसाडा प्रदेशाला लागून असलेल्या ब्रिटिश , गायकवाड व धरमपुर या तीन शेजारी प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे तुमच्या संस्थांनाला दारूबंदीचे धोरण यशस्वी करणे अवघड जात आहे . ही गोष्ट खरी आहे . पण महान गोष्टी महान त्यागावाचून आणि महान उपाययोजना केल्यावाचून अमलात आणता येत नसतात . आपल्या संस्थांनाला संपूर्ण दारूबंदी जाहीर करून या कामी पुढाकार घेता येईल . इतकेच नव्हे तर शेजारच्या राज्यात दारूबंदीकरता चळवळ करणेही शक्य होईल . मुख्य गोष्ट दारूपासून मिळणारा महसूल सोडून देण्याला तयार होण्याची आहे . या बाबतीत लागलीच हाती घ्यायचा उपक्रम म्हणजे , मद्यपानाला बळी पडलेल्या जमातीत जोराचा मद्याविरोधी प्रचार चालविण्याव्यतिरिक्त हा महसूल इतर कोणत्याही कामी , मग ती कामे कितीही प्रशंसनीय असली तरी , वापरायचा नाही असे ठरविणे हा होऊ शकेल . कोणत्याही संस्थांनाला आपल्या लोकांनी या दुर्व्यसनाचा त्याग करावा असे मनापासून वाटत असेल , त्याला या दुर्व्यसनात लोळत पडणे कायद्याने अशक्य करून स्वस्थ बसता येणार नाही , त्याला त्या दुर्व्यसनाचे मूळ शोधून लोकांनी त्याचा त्याग करण्याविषयीचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल . दारूबंदीचे कोणतेही धोरण जर मी सुचविलेल्या स्वरुपाच्या रचनात्मक कार्याच्या जोडीने अमलात आणण्यात आले तर त्या धोरणांचा परिणाम त्या लोकांची आणि त्यांच्याबरोबरच त्या संस्थानाची उतरोत्तर अधिक भरभराट होण्यातच खात्रीने होणार . संपूर्ण दारूबंदी अमलात आणण्याच्या दृष्टीने जगात हिंदुस्तान हाच सर्वात आशादायक देश आहे याचे साधे कारण आहे की , येथे व्यसनासक्ती ही प्रतिष्ठेची किंवा छानछौकीची गोष्ट मानली जात नाही आणि ती काही विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे !” ( महात्मा गांधी यांचे संकलित वाङ्मय खंड 34 )

     वरील गोष्टीवरून आधी केलेल्या सर्व दारू / व्यसनविषयक समर्थनाची उत्तरे गांधीजींनी आधीच दिलेली आहेत . खरेतर उच्चमध्यमवर्ग सोडला तर दारू आणि इतर व्यसनांमुळे कुटुंबातील स्रिया आणि मुलांची होणारी परवड अत्यंत क्लेशकारक आहे . मागे काही दिवसापूर्वी अशीच एका सासू सून आलेल्या . त्या मुलीचा नवरा हातभट्टीची दारू पिल्याने गेला होता . त्या दोघीही सासूसुनेनी बरे झाले मेला कमीतकमी लेकरबाळांच्या मुखात घास जातोय आता अशी प्रतिक्रिया दिली . जेंव्हा एक आई आणि बायको अशी बोलत असेल तेंव्हा खरोखर त्यांना या व्यसनाधीन मुलाचा / नवर्‍याचा किती छळ सहन करावा लागत असेल याचा विचारही करवत नाही . बरे श्रमपरिहार म्हणून मजूर घेत असेल तर त्याच वेळी त्याची बायकोही तितकेच काम करत असते मग तिचा श्रमपरिहार कसा होणार ? काही आदिवासी स्रिया अशी व्यसने जरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांचे होणारे शोषण कुणी का पाहू शकत नाही . बापाचे अनुकरण मुलगा नकळत्या वयात करू लागतो आणि वयाची पंचविशी होण्याआधीच संपतो . समाजातील तरुणांना निष्क्रिय करणारी दारू राजरोस मिळू लागली तर खरोखर आपल्या देशाची भरभराट होईल का ? आताच्या करोंनाच्या पार्श्वभूमीवर जर हे दारू पिऊन संतुलन हरवलेले लोक रस्त्यावर फिरून /पडून करोंनाचा प्रादुर्भाव वाढवणार नाही का ? आणि जर असे झाले तर आजवर ज्या लोकांनी प्रामाणिकपणे लॉकडावून पाळले , ज्या पोलिस डॉक्टर आणि इतर यंत्रणांनी स्व:ताचे जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांचे प्रयत्न मातीमोल होणार नाही का ?  एसी मध्ये बसून समर्थन करणारे यांना एकच आवाहन करावेसे वाटते की , त्यांनी अशाप्रकारे उध्वस्त होणार्‍या दहा कुटुंबाची तरी जबाबदारी घ्यावी आणि मग दारूबंदीला विरोध करावा . माझ्या एक वकील स्नेही दिलशाद मुझावर कोल्हापूरच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत . त्या दारुमुळे होणार्‍या मुलांच्या आणि महिलांच्या दुर्दशेचे शोषणाचे वर्णन करीत होत्या . ऐकून ज्या गोष्टी अस्वस्थ करतात त्या जगताना त्या लोकांची काय अवस्था होत असेल . व्यसनाधीनतेमुळे वाढणारी गुन्हेगारी , घरगुती हिंसा याला शासन फक्त कायदे करून आळा घालू शकत नाही . कारण निम्यापेक्षा जास्त गुन्हे पोलिसांपर्यंत जातच नाहीत . जे जातात त्यातही न्याय मिळणारे कितीतरी अल्प आहेत . महसुलाचे कारण पुढे करणे योग्य नाही . महसुलाचे तेच एकमेव साधन नाही . आणि ज्यांच्या सोईसाठी हा महसूल गोळा होईल त्यांचे आणखी हाल वाढणार असतील तर याला अर्थ तरी काय ? हे म्हणजे पेशंट नाही म्हणून डॉक्टरने निरोगी माणसांच्या किडन्या  विकण्यासारखे झाले ! महसुलासाठी जर सरकार दारुविक्रीला परवानगी देत असेल आणि आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत असेल तर सरकारला गांधीजींच्या त्या शब्दांची आठवण करून द्यावीशी वाटतेय , “ जोवर दारूच्या व्यापारातून प्राप्ती काढणे आवश्यक मानतात तोवर ते जे आपल्या लोकांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे !” 


Wednesday, 8 April 2020

मला का वाटलं !

मला का वाटलं ....
माझी वेदना तुझ्या डोळ्यातून झरत होती ..
कुठेतरी खोलवर आतमधे जी सलत  होती ...
न सांगायचे ठरवलेही होते ..
मला न्याय नकोच आहे आता ...
मरणाने शांतपणे यावं आणि कुरवाळत जवळ घ्यावं ..
इतकीच आस होती ...
माझे अश्रूही  गेलेत सुकून ...
मागत नाहीत ते मुक्तीचं दान हल्ली ...
पण फिरतात माझ्या कणाकणात ....
बारीकशी सल होऊन ...
झुरतात ते दिवसरात्र ...
विझलेली आग होऊन ...
संपलेल्या आयुष्याची इतकीच खूण बाकी होती ...
तरीही मला का वाटलं ...
माझी वेदना तुझ्या डोळ्यातून झरत होती ...
जीवनाच्या यशाचा लिहीला जाईल इतिहास जेव्हा ...
अपयशाची कारणे माझ्या मातीआड गाडली जातील ...
हीच एक आशा मला पुनःपुन्हा सावरत होती ...
डॉ संध्या शेलार .

Thursday, 5 September 2019

तुझ्यापासून

तुझ्या आठवणींची आता सुरुवात तुझ्यापासून
मला नवी कविता सुचली अर्थात तुझ्यापासून


कालचे काही क्षण मनात गोठून गेलेले 
आता रोज त्यांची उजळणी, लपवून तुझ्यापासून


तू भेटल्याने नव्याने भेटलेले मला तरुणपण
माझ्या छोट्या गोष्टीही आणते मिरवून तुझ्यापासून


ओढ, उत्सुकता आणि तुला जाणून घेण्यातला नवेपणा
नव्या  प्रेमाचा गंध येई बहरून तुझ्यापासून


छान प्रेमाच वाटल्या  अन मिळालेल्या कौतुकाचं ही
नातं देईल बळ दोघांना, माझ्यापासून, तुझ्यापासून


भविष्य काही असो अन काही असोत पुढच्या गोष्टी
माझा आनंद आभाळभर, अन त्याचा उगम तुझ्यापासून.......... 


Saturday, 24 August 2019

आठवण

मनाने मनाशी कितीदा हसावे
किती हे बहाने किती मी फसावे

हसावे रडावे पुन्हा सावरावे
कितीदा नव्याने जीवा गुंतवावे

तुझे शब्द सारे तुझे ते इशारे
पुन्हा यौवनाने परतून यावे

जाशील कितीदा येशील कितीदा
कितीदा मनाने पुन्हा पालवावे

हळव्या क्षणांचे रोमांचित किस्से
तनाने मनाने किती जागवावे

तुझ्या आठवांचा सुगंधित वारा
लपेटून गात्रांस संपून जावे

      डॉ संध्या राम शेलार .

Monday, 11 June 2018

दहावीचे मार्क ..वास्तव कि फुगवटा ?

          मागील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र शुभेछ्यांचा वर्षाव पडू लागला . अगदी काही विद्यालयांचा निकाल तर १०० % लागला . सोशल मिडीयावर तर अनेक निकाल पोस्ट होऊ लागले . बहुतेक विध्यार्थी हे ८० % च्या वर गुण मिळवलेले  होते . २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १६,२८,६१३ विध्यार्थी परीक्षेला बसले होते . त्यापैकी ४,०३,१३७ विध्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत , ५,३८,८९० विध्यार्थी प्रथम श्रेणीत ; ४,१४,९१४ विध्यार्थी द्वितीय श्रेणीत ; ९९,२६२ विध्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . राज्यात एकूण १२५ विध्यार्थ्यांना १०० % गुण आहेत . ६३,३३१ विध्यार्थ्यांना ९० % पेक्षा जास्त गुण आहेत . संपूर्ण महाराष्ट्राचा  निकाल हा ८९.४१ % इतका लागला आहे . अशा प्रकारे निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ नाही . गेली काही वर्ष ही एक परंपराच निर्माण झाली आहे . २० वर्षापूर्वी बहुतेक शाळांत प्रथम क्रमांक हा ८० -९० % च्या दरम्यानच असायचा . परंतु आज सगळ्याच शाळांमधून ९० % चा हा आकडा १० तरी विद्यार्थ्यांनी पार केलेला असतोच ! आश्चर्य म्हणजे निम्म्या मुलांना प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त असते . खरोखर आजचा विध्यार्थी इतका हुशार झाला आहे का ? कि हा मार्कांचा फुगवटा आहे ? असे प्रश्न उपस्थित व्हावेत इतकी परीस्थिती कठीण निर्माण झाली आहे का ? हो तर का ?
   निकालानंतर सोशल मिडीयावर अनेक मेसेज फिरत राहिले . काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे , काही विनोदी तर काही या फुगवट्याबद्दल शंका उपस्थित करणारे होते . अनेक जाणकार यावर चर्चाही करत होते . आणि त्यांना मुलांच्या भविष्याविषयी काळजीही वाटत होती . कितीतरी जण मुलांच्या डोक्यावर टांगलेल्या स्पर्धेने व्याकुळ होत होते तर कुणाला त्यांचे कोमेजणारे बालपण व्यथित करीत होते . तरीही ही स्पर्धा नाकारणे बहुतेक लोकांना स्वतःसाठीही शक्य नव्हते . असे का झाले याचा विचार करायला आज पालकांनाही वेळ नाही आणि त्यामुळे थोडावेळ व्यथित होणार्या समाजालाही नाही . मग त्या प्रश्नामधून बाहेर पडण्याची उपाययोजना होणे तर अधिक क्लिष्ट होत चालले आहे . बुद्धीला श्रेष्ठत्व देताना श्रमाची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे . आजही बंद दाराआड काम करणाऱ्याला श्रेठत्व दिले जात आहे . आणि कष्टापासून तरुणांना दूर नेले जातेय . आरोग्यसंपन्न आयुष्य ही संकल्पना नामशेष होऊन संपन्न आयुष्य हेच सर्वांचे ध्येय होतेय . आर्थिक संपन्नता प्राप्त करणे इतकेच ध्येय मुलांच्याही पुढे ठेवले जात आहे . कुणीही पालक मुलांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी उत्सुक नसतात , शाळांचे निकाल टक्क्यांमध्ये पाहून मुलांना शाळेत प्रवेश घेतला जातो . शाळेचे मैदान किती मोठे आहे हे पहायलाही कुणाला वेळ नसतो . काही शाळा तर गुराढोराप्रमाणे मुलांना वर्गामध्ये कोंबत असतात .  शेळ्यामेंढ्या सारखी पळणारी ही मुले खरोखर एक सुदृढ समाज निर्माण करू शकतील ? हा प्रश्न सतत मनाला पोखरत राहतो !
   या मागच्या कारणांचा जर पाठपुरावा केला तर एक भयाण अशी व्यवस्था यामागे असल्याचे दिसते . सारे अगदी बेमालूमपणे घडवून आणले जात आहे . या धूळफेकीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही . पालकांना आपले पाल्य ८० % च्या घरात गेले कि अनेक मोठी स्वप्ने दिसू लागतात . कारण त्यांच्या वेळी हे मार्क वर्गात पहिल्या आलेल्या विध्यार्थ्याचे असत आणि तो आज कुठेतरी तथाकथित यशस्वी असतो . पालकांच्या अपूर्ण स्वप्नांना पुन्हा पालवी फुटू लागते . मोठी स्वप्ने मोठी रक्कम मागतात . त्यासाठी हे पालक राबराब राबतात . पाल्य ८० % मिळवते . मग पालक डॉक्टर , इंजिनियर , सरकारी अधिकारी आणि तत्सम मोठ्या पदांची अपेक्षा बाळगून मुलांना स्पर्धेत उतरवत राहतात . त्यासाठी भलीमोठी जाहिरात करणारे क्लासेस त्यांच्या स्वप्नांना आणखी प्रोत्साहन देत राहतात . मग क्लासची अधिक फी त्यांच्यासाठी उद्याच्या यशाचे (?) हप्ते  ठरते . कुणीही आपल्या पाल्याच्या बुद्धिमत्तेचा आवाका तपासण्याचा प्रयत्न करीत नाही ,कारण त्याच वेळी सारे पालक आपला आर्थिक आवाका निर्माण करण्यात व्यस्त असतात . मागे एकदा असेच एका सहकार्यांना दुसरा मुलगा झाल्यावर मी सहज प्रश्न केला आता भरपूर मालमत्ता करावी लागेल ? त्यावर त्यांनी एक छान प्रतिप्रश्न केला, ‘ आपणच जर सारे करून ठेवले तर मुलांनी काय करायचे ?’ वास्तविक हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडायला हवा !
  बरं इतका आटापिटा करूनही मुले बारावी परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत . दहावीत सर्वाधिक गुण मिळवणारी मुले बारावीत लांब फेकली जातात . अटीतटीने जरी मार्क मिळवले तरी ते अपेक्षेपेक्षा खूप कमी असतात . NEET , IIT JEE , AIIMS , MHTCET यासारख्या परीक्षेत तर खूप कमी मुले टिकतात . आणि जी जवळपास गेलेली असतात ती पुन्हा स्वप्नांच्या मागे लागतात . भलीमोठी डोनेशनची रक्कम घेऊन . बरीच मुले तिथेही टिकत नाहीत . ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांना सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावू लागते . MPSC UPSC करणारी बरीच मुले हे बारावीत कमी मार्क असल्याने डॉक्टर इंजिनिअर होता न आलेली असतात . तीही या स्पर्धेत मागे पडतात .
  यात सगळ्यात बिकट अवस्था होते ती ग्रामीण युवकांची ! एकतर शेती किंवा मजुरी करणाऱ्या ग्रामीण लोकांना भरमसाठ फी भरणे अशक्य असते . शेतीच्या अविश्वासू उत्पन्नावर जगणे किती अवघड आहे हे या मुलांनी आधीच अनुभवलेले असते . त्यात एखादा यशस्वी झालेला त्यांना संपन्न उद्याची स्वप्न दाखवत असतो . अभ्यासाच्या बोज्यामुळे ही मुले शेतीपासून आधीच दुरावलेली असतात . आणि आईवडीलही मुलांना शेतीत उतरू देण्याच्या मानसिकतेत नसतात . कारण शेतीचे सारेच रामभरोसे . शेवटी काही मुले यशस्वी होतात परंतु जवळजवळ ८० % मुले ही काहीही न मिळवता माघारी येतात . अशा मुलांपुढे आयुष्य आ वासून उभे असते , कष्ट करणारे आईबाप थकलेले असतात . जबाबदारी आता या मुलांवर असते . छानछौकी राहण्याची सवय , लग्नाच्या घोडेबाजारात नसलेली पत ,आणि शेतीची कामेही येत नाहीत , इतर औद्योगिक शिक्षणही घेतलेले नसते .त्यात  आरोग्याकडे आजवर केलेले दुर्लक्ष त्यांना शारीरक दृष्ट्याही कमजोर ठेवते . कष्टाची कामे करणे अशक्य होऊन जाते . ही निराशा या मुलांचे आयुष्य कोमेजून टाकते . आणि व्यसनाधीनता त्यांना पोखरून टाकते . यशाने सुरु झालेली ही अयशस्वी कारकीर्द घेऊन ही मुले उद्वेग आणणारे , नाकर्तेपणाचे आयुष्य जगत राहतात . हे कुठेतरी थांबायला हवे . दहावीच्या मार्कांचा हा कृत्रिम फुगवटा या नव्या पिढीचे कधीही भरून न येणारे मानसिक शारीरक नुकसान करतो आणि उरतो एक पोखरलेला समाज !
     शिक्षणसंस्थांचे बाजारीकरण आणि कोचिंग क्लासेसचे स्तोम या गोष्टी जर यामागे असतील तर वेळीच याला आळा घालायला हवा . नाहीतर राजकारण्याचे कुरण होणारी शिक्षणक्षेत्रे कधीही उज्ज्वल भारत घडवू शकणार नाही! यात जितकी जबाबदारी शासनाची आहे त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी पालकांची आहे . कारण आपलं मुल हे स्पर्धेचं घोडं बनवायचं कि एक संवेदनशील समाजप्रती जागरूक माणूस ते आपणच ठरवायचं आहे .