आई हे जसे मुलांसाठी एक गजबजलेलं गाव असते तसे मुल आईसाठी गजबजलेलं शहर आहे म्हटले तरी चालेल . त्याची जन्मल्यापासूनची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आई आपल्या हृदयात जपून ठेवत असते , शेवटच्या श्वासापर्यंत ! आमची आजी वडील आत्या चुलते यांच्या जन्मापासूनच्या आठवणी सांगायच्या , मला नेहमी आश्चर्य वाटे आजी कसे इतके सारे ध्यानात ठेवत असेल ? तेही एक मुलाचे ठीक आहे तिला तर पाच मुले आणि लहानपणी तापाने गेलेला एक , अशा साऱ्यांच्या साऱ्या आठवणी ती सांगे ! पण आज जेंव्हा मी आई आहे एका दहा वर्षाच्या मुलाची तेंव्हा लक्षात येते कि कालची भाजी काय होती हे लक्षात न राहणारी मी बाळ लहान असताना त्याने पहिल्यांदा काय खाल्ले , त्याला काय आवडे , तो पहिला शब्द काय बोलला सारे सारे मनात जपून आहे एखाद्या अनमोल दागिन्यासारखे !
परवा बातम्या पाहत होते , अचानक एक बातमी काळीज चिरून गेली .. एका सुशिक्षित , मोठ्या पदावर विराजमान असलेल्या आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला bat ने मारून खून केला .. मन क्षणभर सुन्न झाले , असे वाटले कि उगीच टी व्ही वाले बातम्यांचा बाजार मांडून बसतात , स्वतःचा बाजार वाढवण्यासाठी ! पण प्रत्येक वाहिनीवर तीच बातमी ठळक अक्षरात झळकत होती . डोळे आपोआप गच्च झाले , मन एकदम अस्थिर बनले , क्षणभर काहीच सुचेना .. तशीच बसून राहिले थोडा वेळ .. काम बाकी होते पण मन कशातच लागत नव्हते .. बातम्यात दाखवलेले ते मुल ..किती निरागस ..कपाळाला गंध लावलेला तो फोटो .. अजून जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असणारा तो बाळ काळाच्या पडद्याआड गेला होता ! आणि कसलेही भाव चेहऱ्यावर नसलेली , पोलीस स्टेशन मध्ये जमिनीवरच मांडी घालून बसलेली ती सुशिक्षित आई ! आई ........ किती सुमधुर शब्द आणि जगाचे सारे दु:ख जिच्या पदराखाली विलीन होते ती आई .. कशी , का धजावली असेल पोटच्या पिल्लाला मृत्युच्या दारी सोडायला ? तिच्या जाणीवा अशा कशा बधीर झाल्या असतील . मुलाला एक चापट मारली तर दिवसभर रडणारी मी .. .. लिहितानाही डोळे गच्च झालेत माझे ! असे कसे त्या माउलीचे हृदय दगड बनले असेल .. जी आई साऱ्या जगाच्या ९ महिने आधीपासून त्या जीवाशी सर्व शक्तीनिशी जोडली गेलेली असते तिने असे करावे ..किती कित्त्ती प्रेमाचे , मायेचे, आपुलकीचे, दु:खाचे , रागाचे क्षण त्या दोन जीवांनी एकत्र जगलेले असतात .. त्याच्या त्या जन्मलेल्या निरागस चेहऱ्यापासून ते त्याच्या त्या नाविन्यपूर्ण हालचाली , त्याची ती इवलीशी गोड प्रत्येक अवयवाची ठेवण , त्याची ती मऊशार कोवळी त्वचा .. अनेकदा त्याला स्पर्श करायला भाग पाडणारे ते त्याचे गोजिरे रूप ! काहीच आठवले नसेल तिला ? त्या कोवळ्या जीवाला मृत्युच्या दारी सोडताना ? कितीही मोठे झाले तरी लेकराच्या स्पर्शाने हुरळून जाणारे मातृहृदय कुठे ठेवले असेल तिने .. देवा तुला एकाच विनंती आहे , प्रार्थना आहे ..अगदी मनाच्या , हृदयाच्या आतून .. मुलाला , मुलीला आईचा बळी घेणारा बनवलेस ना , या कलीयुगातील अनर्थ म्हणून तरी मी तुला दोष देणार नाही परंतु जिने जीवन दिले त्या मातेचे हृदय असे पाषाणाचे नको करूस ...
माझ्या जीवनातील एक चांगली आठवण इथे सांगावीशी वाटते .. आई मुलासाठी काय असते आणि मुल आईसाठी किती आनंद असते .. रागाचे अनेक प्रसंग येतात आयुष्यात पण त्याच्या प्रेमळ स्पर्शात ते कसे विरघळून जातात ही प्रत्येक आईची आठवण असते ...
माझी आठवण
गजर वाजत होता पण आज काही अंग उचलुच वाटत नव्हते बेडवरून. सकाळी आवरायची घाई नसली कि मन आपोआप आळशी होते. मग उगीच कंटाळा येतो , आणि लवकर उठावे लागते या गोष्टीचा रागही येतो . का बरं माणसाचे मन असे असेल ? आणि ज्या दिवशी कामाची धावपळ त्या दिवशी आपोआप जाग येते , पण आज काही केल्या उठून बसावे वाटेना . मग वाटले जाऊ देत आज शनिवार आहे कुठे शाळा आहे मुलांची झाला थोडा उशीर तर होऊ देत, अजून अर्धा तास तरी पडून राहते . पण आमचे सत्योम दादा नेमक्या वेळी आमच्या मनसुब्यांवर पाणी सोडणार हे ठरलेले . शाळा असेल त्या दिवशी सात वाजले तरी ओरडून उठवावे लागते आणि नसेल शाळा तर मग मात्र सरकार सहा च्या आधीच उठणार ! त्याला शाळा नसलेल्या दिवशी जाग का येते ? या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळाले नाही ! जसे कि आई जेवायला बसली कि लहान मुल का रडते ? कुत्र्याचे शेपूट सरळ का होत नाही ?.......अश्या अनेक प्रश्नांसारखे !
आजही माझ्या झोपेच्या सुखाची वावडी करून
सत्योम बाळ उडवणार हे मात्र नक्की , काही वेळा न इतका राग येतो असे वाटते पोराच्या
दोन कानाखाली काढाव्या आणि गप्प पड म्हणून ओरडावे , पण मग प्रश्नांची अशी शृंखला
सुरु होते कि झोपेचे खोबरे कधी झाले हेच कळत नाही !
“मम्मी” एक हात
पोटावर टाकत बाळराजाच्या झोपेची सांगता झाली ! मग मात्र एकदम खुश होऊन पोराने हळूच माझ्या गालावर
ओठांचा स्पर्श केला , जणू मोरपीस फिरले गालावर ! मी सुंदर स्वप्नातून जागी होतेय
असे वाटले आणि मन एकदम प्रसन्न झाले !
“का
रे पिलू ?”
“माझी
मम्मी न मला खूप आवडते”
“?”
कुतूहलाने मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले .
“या
जगात माझी सर्वात सुंदर , सर्वात प्रिय गोष्ट कुठली असेल तर माझी मम्मी .” झोप
उडाल्याचा राग कुठच्या कुठे निवळला ..झुळझुळ झऱ्याच्या नितळ पाण्यासारखे मन स्वच्छ
झाले आणि खळखळ डोळ्यातून वाहू लागले ....
2 comments:
Wa...khup chhan..!
धन्यवाद ..
Post a Comment