या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday, 15 November 2011

अव्यक्त !

 रोजची सकाळ स्मितासाठी प्रसन्न असायची , तिला कधी नाराज आणि दु:खी कधी कुणी बघितलं नव्हत ! सतत हसतमुख आणि गप्पा मारायला तर विचारू नका , पाच मिनिटाच्या संभाषणात ती इतकी आपली वाटायची कि परत माणूस भेटल तर बोलल्याशिवाय पुढ जातच नसे ! काही लोक पाण्यात विरघळनाऱ्या साखरेसारखी तर काही पाण्यात विरघळनाऱ्या मिठासारखे असतात! मीठ खारटपणा ठेऊन जात तर साखर गोडपणा ! दोन्ही कायम लक्षात राहतात पण एक वाईट म्हणून तर एक चांगल म्हणून! तशी हि साखर होती ! तिच्या गोडपनाणे ती प्रत्येकाची गोड आठवण असायची ! 
    ज्याच्या आयुष्यात कायम एक सुरक्षित चौकट असते त्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत हे जग सुंदर भासतं आणि जगातली माणस प्रेमळ! तसच स्मिताच होतं,तिला तिच्या घरात प्रेम प्रत्येक नात्याकडून मिळाले.तशी तिला नाती पण सर्व मिळाली ,आत्या ,काका ,काकी ,मावशी ,मामा ,मामी ,भाऊ ,बहिण !आणि प्रत्येक नात्याने तिला भरभरून प्रेम आणि एक सुरक्षित आयुष्य दिले ! तिला बहिस्त जगाचे खरे रूप कळलेच नव्हते ! अशी हि एक आनंदी ,समाधानी मुलगी ! तिला बाहेर जाण्याची वेळ आली ते तिच्या उच्चशिक्षणासाठी! तिथेही तिच्या मनमोकळ्या स्वभावाने तिने सर्वांना आपलसं केलं नाही तर नवल ! 
     साधारण महिन्यापूर्वी तिची एक प्रोजेक्टच्या निमित्ताने एका सिनियरशी  ओळख झाली ,सौरभ तो ! सीनियर्स मध्ये तो सुंदर आणि सुस्वभावी मुलगा ,थोडा अलिप्त आणि अबोल ! काम आणि तो बाकी तो कुणाला जवळ करत नसे ! प्रत्येक कॉलेजमधली मुलगी त्याच्याशी मैत्री करायला उस्तुक पण तो काही कुणाला वाऱ्यालाही उभं करत नसे . इतर मुलींचं त्याच्या राजबिंड्या रुपाला पाहून जवळ येणं त्याला कधी भावलच नाही ! स्मिताने मात्र त्याच्या मुलींविषयीच्या कल्पनांना छेद दिला ! तो सिनियर होता पण ती कधी घाबरली नाही तिने शेवटी त्यालाच बोलत केल! त्यांची मैत्री चार पाच दिवसात एका सुंदर वस्त्राची घट्ट विन बनली ...आणि अशी बहरली कि .... मग फोनवर गप्पा कॉलेजबाहेर भेटणे ....तासन तास बरोबर घालवले तरी स्मिताला रात्री फोनवर बोलल्याशिवाय चैन पडत नसे ! 
''स्मिता , नक्की मैत्रीच आहे ना ?'' रूममेटचे प्रश्न ! 
'' तुम्ही दुसरा विचार करूच शकत नाही का ?''
''नाही ग ,रागावू नको पण तुझी ओढ पहिली कि वाटत ...''
''नको काही वाटून घेऊ , आम्ही फिरतोय म्हणजे मी त्याला आपल शहर दाखवत आहे . तो लांबचा आहे त्याच्या कंप्लीशन नन्तर तो आता जाणार आहे आणि परत नाही येणार ! आम्ही फक्त चांगल्या आठवणी गोळा करतोय ओ के ''
'' सॉरी पण जपून राहा .''
''बर येऊ ,त्याला रिझर्वेशन करायचं आहे उशीर होत आहे ,परवा जाणार आहे सौरभ ,बाय !''
धावत ती बाहेर आली तर सौरभ होताच . दोघांनी रिझर्वेशन करून पायीच रोडवर चालत राहिले ! दिवस मावळला पण त्यांचे पाय थकले नाहीत कि गप्पा संपल्या नाहीत ! रात्री हॉस्टेलवर जाताना ती अस्वस्थ होती पण तिला वाटायचं तो परत भेटणार नाही म्हणून कदाचित ... पण उद्याचा दिवस येउच नये आणि रात्र संपूच नये अस वाटतंय रे सौरभ हे तिने फोनवर त्याला सांगितलं .या विचारांमध्ये कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही !
   सकाळी जडावलेल्या डोळ्यांनी ती उठली .आवरून कॉलेजमध्ये गेली.सौरभ आज रात्री आठच्या बसने जाणार होता म्हणून दुपारचं जेवण ते एकत्र घेणार होते . जेवताना त्याने मराठी गाण्यांची एक सी डी त्याने तिला भेट दिली . सतत बडबडणारी स्मिता शांत होती आणि सौरभ अस्वस्थ दिसत होता .....त्यांची दुपार अशीच अबोल गेली पण या अनामिक ओढीचा उलगडा मात्र तिला झाला नाही ....
  त्याचा प्रवास लांबचा म्हणून मध्ये काही खाऊ नकोस मी तुला डबा देते अस तिनेच बजावलं त्याला ! डबा घेऊन सात वाजता ती पोहचली सौरभ आलाच होता त्याचा मित्र होता बरोबर ,तिने डबा दिला आणि गाडी येण्याच्या दिशेने पाहू लागली .
'' आज बोलणार नाहीस , बडबडीच यंत्र बिघडल का ?''
''तू थांबू नाही शकत ?'' डोळ्याच पाणी पुसत तिने सवाल केला .
''तस काही कारण नाही ना ?''
''कारण शोधलं तर सापडेल कि !''
''नाही ग पण आई बोलावते आहे ''
''मीही थांब म्हणते ना !''
''सौरभ बस आली '' मित्राने आवाज दिला .मित्रानेच त्याच समान उचललं आणि गाडीत ठेवलं.
'' तू खरच थांब म्हणत असशील तर थांबतो '' सौरभ !
''नाही रे '' ती 
''चला बसा लवकर '' बस ड्रायव्हर 
सौरभने तिच्याकड पाहिलं तिचे पाणावलेले डोळे बघून तोही अस्वस्थ झाला ... तिने एक गुलाबाचं फुल दिल ...त्याने घेतलं ...
''थांबू का ?''
  कस सांगणार होती थांब म्हणून तीच प्रेम आहे हे कळल तिला ...पण त्याच काय त्यालाही वाटत असेल असंच ...नसेल तर ? तस नसेल तर ...तो काय विचार करेल माझ्याबद्दल ! नको व्यक्त व्हायला ...नको ....
''बाय ...''तिच्या नकळत ती बोलून गेली ...बस गेली ...ती पाठमोऱ्या बस कडे न पाहताच झप झप पावले टाकत ती निघाली  .... बेडवर पडून खूप खूप रडली ...रूममेट समजली काय ते !

Thursday, 10 November 2011

मेसेज

       धापा टाकत प्रतिभा पळत होती ....शेवटी एकदाची रेल्वे सापडली ती घाईने आत चढली पण क्षणात थोडी नर्व्हस झाली कारण तो डबा महिलांचा नव्हता . बसण्यासाठी जागा नव्हती ती उभीच होती . धावत येऊन रेल्वे पकडल्याचा आनंद मिळायच्या आधीच नव संकट दत्त म्हणून उभं! का असं होत असेल? कधी असं वाटत नकोच ती सुखं जी नवीन अवघड वाटेची चाहूल असतील ! कष्टाने मिळवलेल्या एखाद्या वस्तूचा वापर करायच्या आधीच ती बिघडावी ! जे मिळवलं ते कधी लाभलच नाही ! सटवाईने माझ्याच कपाळी असं नशीब का लिहावं ? जसं कळायला लागलं तसं प्रतिभाने हा प्रश्न अनेकदा स्वत:ला विचारला पण उत्तर कधी मिळाल नाही ! पण ज्या प्रश्नांची उत्तरे नसतात तेच प्रश्न माणसाला जास्त प्रिय !  
       पुढच्या स्टेशनला उतरून डबा बदलायचा हे ती ठरवून होती. म्हणून ती दरवाजाजवळ जाण्याच्या विचारात होती .पुढे सरकायला लागली तर पुढचा तरुण तिला पुढे जाऊ देत नव्हता,मागचा मागे सरू देत नव्हता . तिला दरदरून घाम फुटला ,हात पाय लटलटू लागले, संपूर्ण शरीर क्षणात घामाने ओलं होऊन एकदम थंड पडलं! पुढचा मार्ग ...विचार करायच्या आधी एकाने तिच्या कमरेला हात घातला, जिवाच्या आकांताने तिने तो झिडकारला पण ...तिचा जीव तो काय असणार दिवसातून एक चपाती फक्त ! तितक्यात पाठीमागून एक तरुण पुढे झाला आणि त्याने चौकडीला बाजूला व्हा म्हणून खुणावलं . 
''काय रे , कोण तुझी?''चौकाडीतल्या एकाने उर्मटपणे सवाल केला . त्याचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आत एक दमदार ठोसा त्याच्या तोंडावर बसला ,नाकातून रक्त वाहायला लागलं , त्याची मानगुट धरून त्या तरुणाने स्वतःच आय कार्ड त्याच्या समोर धरलं.
''माफ करा साहेब .'' इतकाच बोलून तो बाजूला झाला. प्रतिभा मात्र थरथर कापत होती डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते . त्या तरुणाने पुढे होऊन तिला खिडकीजवळ जागा करून दिली आणि तो तिच्या शेजारी बसला.ती पुरती गर्भगळीत झाली होती ,अजूनही थरथर थांबत नव्हती .
'' मी इंस्पेक्टर अमोल गायकवाड, तुम्हाला भिण्याचे अजिबात कारण नाही , मी मुंबईपर्यंत आहे तुमच्या सोबत ,शांत व्हा !''
''धन्यवाद !'' इतकच बोलू शकली प्रतिभा , आणि डोळे पुसत बाहेर पाहू लागली. मनातलं काहूर मात्र अजून शांत होत नव्हत. आई आजारी पडली आणि सर्व कामे हि थोरली असल्यामुळे हिच्या अंगावर पडली ,पण तिने कधी ओझं मानलं नाही ,कर्तव्य समजून तिने सर्व जबाबदारी पेलली . काम बघून तिने पदवी संपादन केली . आईच आजारपण , प्रदीप आणि पल्लवीचे शिक्षण ,बाबांची नोकरी सगळं ती आत्मीयतेने करत होती ! स्वतासाठी मात्र तिच्या आयुष्यात जागा नव्हतीच ! इतर मुलींप्रमाणे तिला स्वप्नात राजकुमार कधीच दिसला नाही ! स्वप्न पडायला झोपच कधी पूर्ण झाली नाही...पदवी पूर्ण झाल्यावर तिला वाटायचं काहीतरी कोर्स करावा म्हणजे एखादी नोकरी बघता येईल ,तेव्हडाच हातभार ! आता पल्लावीची मदतही होत होती तिला, पण नियतीला काही वेगळच करायचं होतं...एक दिवस बाबा अपघातात गेले ...ती खूप खूप रडली ...प्रदीप ,पल्लवी आणि आई यांच्याकडे पाहून पुन्हा उभी राहिली ! बऱ्याच प्रयासाने तिला बाबांच्या जागी ,अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळाली ....पण रोज पुण्याला जा ये करावं लागणार होतं ! पण ती कुठल्या कष्टाला पाहून मागे फिरणार नव्हती !
''एक्सक्युज मी , हा घ्या चहा, पाणी देऊ का ?बर वाटतंय का आता ?''
''हो , बर वाटतय ,आणि नको आभारी आहे !''ती भानावर येत उत्तरली .
''अहो घाबरू नका ,मी काही गुंगीच औषध नाही देत तुम्हाला ,कमीत कमी समाजाचा रक्षक म्हणून तरी विश्वास ठेवा !''अमोल हसत बोलला .
''नाही हो ,तसं नाही पण मी चहा घेत नाही ,आणि मी कशाला अविश्वास दाखवेल ? उलट तुम्ही माझी खूप मदत केली आहे ,तुम्ही नसता तर ...''तिचे डोळे परत पाणावले .
''प्लीज रडू नका बुवा ,आणि एकदा चहा पिऊन तर बघा कसं फ्रेश वाटतंय ते .''
''बर घेते !'' हसत प्रतिभा उत्तरली.
''तुम्ही रोज अप डाऊन करता का ?''
''हो ''
''मी ,सुटी असल्यावर जातो घरी , तेव्हडाच आईला आनंद होतो , तू नाही आलास कि घर खायला उठत म्हणते !''
''तुम्ही कुठ असता ?''प्रतिभा कुतूहलाने विचारू लागली .
''शिवाजीनगर पोलीस स्टेशन !''
''काय , मीही तिथेच आहे ,वेधशाळेत क्लार्क आहे .''
''गुड , भेट होणार म्हणायचं आपली परत !''
''हो ''
''काही आक्षेप नसेल तर नाव समजेल आपलं?''
''नक्की , मी प्रतिभा,प्रतिभा कदम. ''
''छान !''मनाशीच हसत अमोल म्हणाला .
''काय ?''
'' काही नाही, कोण कोण आहे घरी ?''
''आई ,छोटा भाऊ प्रदीप ,बहिण पल्लवी ''
''वडील ?''
''ते सहा महिन्यापूर्वी अपघातात गेले .''
''ओ नो .''
.
.
.
मग दर शनिवारी ते एकत्र येऊ लागले आणि सोमवारी एकत्र जाऊ लागले!प्रतिभा अमोलच्या आई बाबांकडे जाऊ लागली .अमोलनेही तिच्या घरच्यांशी जवळीक केली . एका छोट्या ओळखीच्या बीजाचे रुपांतर प्रेमाच्या एका सुंदर वेलीत कधी झाले ते दोघांना उमगलेच नाही ...आज सुट्टी आहे म्हणून अमोलच्या आई तिच्या आईला भेटायला येणार होत्या . तिने हि गोष्ट फक्त आईला सांगितली होती .ती घर नीटनेटक आवरून आईजवळ बसली ,तितक्यात पल्लवी पळत आली ,''ताई अमोल आलेत !'' आणि एक चिमटा काढून वेडावत पळून गेली . त्यांच्यातल्या नात्याची चाहूल आता मुलांनाही लागली होती . आणि म्हणूनच आईला प्रतीभाच्या लग्नाची घाई झाली होती ,तसं ती म्हनालीही होती प्रतिभाला ! 
''येऊ का आत प्रतिभा ?''अमोलच्या आईच्या खणखणीत आवाजाबरोबर प्रतिभा घाईने बाहेर आली .
''या ना आई .''
''आणि मी '' अमोल पुढे होत बोलला. त्याला पाहून उगाचच रेल्वेचं इंजिनाची धडधड छातीत जाणवली, रोज ती त्याला भेटायची पण आजच्याइतकी अस्वस्थता तिला कधी जाणवली नव्हती. चहा -पाणी झालं,अमोलच्या आई तिच्या आईची चौकशी करत होत्या .इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या .अमोल मात्र एकटक तिच्याकडे पाहत होता आणि ती कधी नजर टाकत होती आणि कधी चुकवत होती ,पायाच्या अंगठ्याने उगाचंच फरशीवर घासत होती . 
''प्रतीभाची आई , मी आज वेगळ्याच कारणासाठी आले आहे .''
''बोला न ताई '' आईने अजीजीने विचारले .
''मी अमोलसाठी प्रतिभाला मागणी घालायला आले आहे  , हा पण तुम्हाला काही आक्षेप नसेल तर !''
''नाही हो , आक्षेप कसा असेल !''
प्रतिभा मात्र विस्मयाने अमोलकडे पाहू लागली ,हे होणार याची तिला कल्पना होती पण असं अचानक ...
    प्रदीप बाहेरून आला .आईने त्याला जवळ बोलावून दुपारचा प्रसंग सांगितला .सर्वांना तो खुश होईल अशी अपेक्षा होती पण तो काहीच बोलत नव्हता आणि खाली मान घालून बसला .प्रतिभा किचनमध्ये होती तिला ऐकू जाईल अस मोठ्याने प्रदीप आईला बोलू लागला ,''मला वाटलच हि असंच स्वार्थ साधणार ,तीच झालं ! आपलं काय ? बाबांच्या जागी हि लागली कामाला, लग्नानंतर पगार देणार नवऱ्याला , माझी पदवी झाली पण नोकरी नाही ,तुझं आजारपण काय करायचं सांग ?''
''अरे प्रदीप ,असं का बोलतो ? तिने काय असंच रहायचं का ? एकदा वय झालं कि कोण करणार ताईशी लग्न ? चांगल स्थळ आहे ! आणि लागेल कि तुला नोकरी ? ''
''कर काय करायचं ते , शेवटी मीच वाईट !भीक मागायला लागेल तेव्हा कळेल ?'' तावातावाने तो बाहेर निघून गेला . प्रतिभाचा सकाळपासून फुललेला चेहरा क्षणात काळवंडला. पुन्हा तोच प्रश्न तिला सतावू लागला.मीच का ? आज तिचे अश्रुही आटले होते . ज्यांच्यासाठी कधी सुखाला जवळ फिरकू दिल नाही ,त्यांनी असं बोलावं! का मला सुख लाभत नाही ? आता कुठे खळखळून हसायला शिकले होते तर ...क्षणात विचार आला सांगाव अमोलला नको म्हणून ...नको ते सुख मला ...फोन हातात घेतला ,तर अमोलचा एक मेसेज आलेला -
  Treat every one wid love ,
   Even those who hurt u ,
   Not b'coz they r not nice,
   Simply b'coz u r not bad....!!!
मेसेज वाचून तशीच उशीत डोक खुपसून रडू लागली...मनमोकळ ...तिने लगेच अमोलला फोन केला. 
''हेलो ''
''हाय स्विटी!''
''मी हि नोकरी सोडली तर चालेल ?''
''मीही तेच सांगणार होतो तुला ! आणि हो ती जागा प्रदीपला मिळवून देऊ म्हणजे त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटेल !''
''थांक्यू अमोल ,आता माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे ...आता माझ्या आयुष्यात फक्त सुखच येणार आहे ...हो न अमोल ?''
अमोल काही अर्थबोध झाला नाही पण तो ठामपणे उदगारला ,''नक्की स्विटी ,अगदी नक्की ...मी तुला फक्त सुखच देणार आहे !''

Sunday, 6 November 2011

काट्याच्या झाडावरचं फुल

           रुतणारे दगड आणि बोचणारे काटे संपतील का कधी? जीवनाशी पैजा  घेत चालतेच आहे एका निवाऱ्याची आणि निवांत विसाव्याची वाट बघत ..... देवालाही साकडं घातलं दे मला प्रेमाचा पाऊस ज्यात भिजून आत्तापर्यंतच्या वेदना ,थंडाव्यासाठी आसुसलेल्या, तुझा स्पर्श होताच उडून जाऊ दे त्या रुईच्या म्हातारीसारख्या माझ्या दृष्टीपलीकडे .........पण तोही नाही बरसला ....वाटल असेल काही काम माझ्याही पेक्षा गरजेच ...कदाचित माझ्याही वरचढ असेल त्याचं दु:ख ....परत येशीलच कि .... मी वाट पाहीन ...तसंही वाट पाहून मिळालेलं सुख किती गोड असतं ते त्या चातकानी सांगितलं होत मला ! या उल्हासित आठवाणे परत व्यापून टाकल मन माझं...बारा महिने नाही त्याही पेक्षा जास्त प्रतिक्षेची तयारी केली त्याने ! त्या रसभरीत स्वप्नांनी प्राण पेरले कणा कणात ! उद्या नक्की माझ्या दारात सुखाचं झाड उगवणार होत ! स्वप्नांच्या या गरुडावर स्वार होऊन कधीच गेलं ते विश्वाच्या भ्रमनासाठी! त्याला वरून सगळ सुजल सफल दिसत होत ! थंडगार आंब्याचं झाड , रसरसलेल्या फळांनी बहरलेलं, वाटलं जावं जवळ त्याच्या ...गेले तिथं एका फांदीवर विसावलेही ...भळभळ वाहणारी जखम तिथेही होती ...विचारलं त्या आंब्याच्या झाडाला ....इतका सुखी तू रसरसलेली फळ आणि थंड हिरवी पान काय दु:ख आहे तुला ? माझ्या फळांसाठी मारतात दगड मुलं आणि करतात रक्तबंबाळ मला .. या जखमा वागवत मीही मोठा झालो ! लहान असताना वाटायचं फळ आल कि काय सुख पण आता ....कधी फळे संपतील याची वाट पाहतोय .........डोळ्यांच्या कडा पुसत उठले ! परत जागेवर आले ...आता ठरवलंय नाही वाट पाहणार सुखाची ,प्रेमाची ....जर भेटणार असेल याहीपेक्षा मोठी वेदना तर नको कोसळू पावसा ...आज उमलेलं फुल उद्या सुकनारच कि ! म्हणून जगून घेणार आहे मी आज ....आता ठरवलंय त्या दगडांना आणि काट्यांना कवेत घेऊन खेळणार आहे त्या वाऱ्याशी ! आणि झेपावणार आहे आभाळाकडे त्यालाही कधीतरी दया येईलच कि ..........
         

Saturday, 5 November 2011

पिसाळलेला

      धाय मोकलून रडत होती सुनिता .काय करणार कारभाऱ्याला काय बी उप्योग होणार नाही म्हनत्यात दागदर. आस कस होईल म्हणावं त्यास्नी? सकाली त चांगला व्हता पाणी गीलता नाय येत म्हणत व्हता . आस काय बाय बरलत सुनिनी आख्खा भिलवाडा गोला केला ....दिउरुसी म्हणत व्हता त्यो वड्याला गेला तवा त्या बुडून मेल्याल्या किसन्यानी त्येला झपाटला इयक कोंबड आन रोट टाकायला सांगितला त्ये बी केलं पर आज त्येस्नी पाणी बी गली उतरणा मग मालक ऐकना त्येनी गाडीवर टाकला नी दवा आणायला नेला पर आस कसं दागदर म्हनत्यात त्येचा उल्गाडा तिला होत न्हवता ती मोठ्यान रडून झुम्बरीच्या गळ्यात पडत व्हती आन कारभारी मातूर सव्ताला घरात डांबून घेऊन अंधारात जाऊन बसत व्हता . मधीच पाणी मागायचा नी कुणी गिलास फुड केला कि मोठ्यान आरडत दारामाग लपायचा.........
       म्हाद्या भिल कामाला वाघ गडी, पाहिल्यापास्न एकाच मालकाकड टिकून व्हता . मालक बी त्येच्यावर सगळ काम टाकून निर्धास्त व्हता .त्येच्या या इमानापायी मागल तवा मालक पैका देयचा. सुनी आन त्येची आय , कवा पटल नाय म्हणून मोठा पोरगा भाऊ झाला आन त्येनी वायली चूल मांडली . नन्तर त्येला मनी , संत्यु आन भिंगरी झाली . सगल्या पोरास्नी त्यो सालत धाडीत व्हता . सवता मरुस्तवर काम करायचा पर पोरास्नी कवा कुणाचा बांध चढू दिला नाय त्येनी .
        पंधरा दिस झालं उसाचं पाणी रातभर देऊन म्हाद्या घरी निगाला तवा कायतर पायास्नी मऊ लागलं कुई आवाज आला त्यो बी लई बारीक खाली नजर गिली त एक कुत्र्याच पिलू .. का कुणास माहित पर त्येला दया आली  नी त्येनी त्ये पिलू घरी नेलं त्येस्नी भाकर टाकली ,पाणी पाजल. भिंगरी पळत आली आन पिलासंग खेळाया लागली . भाऊ ,मनी बी गोला झाली . म्हाद्यानी तवर सगळ आवरून भाकर खाल्ली आन संग भांधून बी घीतीली . बाहीर आला त सगळी पोरं त्या कुत्र्याला छळीत व्हती त्येनी पोर हाकाल्ली पिलू झापाखाली झाकून कामाला गेला . दुपारी आला त मनिनी पिलू काढाल व्हतं पिलाच तंगड धरून वढीत व्हती त्ये पिलू मातर किविलवान क्या क्या करीत व्हतं . मनी तंगड वढायची आन संत्या कान वढायचा आता पिलू गुरगुर कराया लागल आन वाचकून संत्याला चावल संत्यानी सोडलं त मनिला चावल . मनिला चावल म्हणून महादूनी धरून फेकाया लागला त त्येला बी धरलं कि ! संत्यानी एक चिपाड आणल आन कुत्र्याला माराय लागला कसं बस सुनिनी त्ये सोडावल आन झापाखाली डालल. सगळी जिकड तिकड झाली . सुनिनी सांजच्याला झापाखाली थुडी भाकर आन पाणी सरकवलं . 
     सकाळ्च्याला सालत जायच्या आन कामाला जायच्या घाईत कुणी कुत्र्याकड फिरकल नाय आन कालचा राग आन भ्याबी होतंच कारण पिलू बारीक व्हतं पर लचक चांगलं मोठ काढाल व्हतं! सुनीच काम आवरलं , कुत्र्याच ध्यान झालं म्हनुन्श्यान झाप काढला त कुत्र गपगार , हलून बघितलं पर त्ये काय हलणा . दुपारी महादू आला त्येला दाखिवल . महादुला त्ये बघून घाम फुटला . त्येनी काय ते वलिकल . त्याच पायी मालकच घर घाटल आन मालाकाकून पैका घितला . मनी आन संत्याल्या संग घेऊन तालुक्याचा दवाखाना गाठला . पैका कमी पडला म्हणून त्येनी संत्या आन मनिला सुई घीतली त्यो मातूर तसाच आला . आज उद्या करून त्येची सुई घियाची राउन गिली . कामाच्या नादात त्यो बी इसरून गेला . 
       पाच दिसापासून त्यो खायचा कमी पडला . सुईच्या भ्यापायी इलाज कराय नको म्हणायचा . मालक सवता नेतो म्हणाला पर ह्यो काय गेला नाय . सुनिनी भगत बी केला पर म्हाद्या काय उलगडणा . दार लाऊन बसाय लागला ,पाणी घिना मग मालकांनी गाडीत टाकला आन दवाखान्यात नेला . गाडीत बसला पर डोळ् खुल करून उजेड त्येन बगितला नाय . दागदरनी तपासला आन सुनीला इचारल कुत्र चावल व्हत का ? सुनी म्हणली हाव चावल व्हत कि !  दागदरनी मालकाला आत बोलून सांगितलं त्यो पिसाळलेला हाय , एक दिवस फक्त !
         मालकांनी घरात आणून टाकला ,सुनीच्या हातात पैका ठीवला आन डोल्यास्नी पंच्या लाऊन निगुन गेल ...सुनी मातर आरडत व्हती , म्हाद्याला  भान नव्हत ,पोर टकामका बगत हुती आन भिलवाडा वाट बगत व्हता म्हाद्या कवा मरायचा ... त्येंना माहीत व्हत ह्यो चुकून आपल्याला चावला त आपल बी काय खर नाय . एक म्हातारी उठली आन दाराला भाहीरून कडी घातली आन सुनिजवळ येऊन बसली ....

Wednesday, 2 November 2011

भारतीयाला अभिमान वाटावा अस काही

बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं पुस्तक हाती लागल आहे 'किमयागार ' ! अच्युत गोडबोलेंनी पहिल्या लेखात प्राचीन भारताचे विज्ञानाला असलेले  योगदानाचे वर्णन केले आहे . त्यातील काही गोष्टी माहित आहेत पण त्याचा  पूर्ण इतिहास वाचताना आश्चर्य तर वाटतेच पण उस्तुकता ताणली जाते . आपल्या पूर्वजांचे हे विस्तृत ज्ञान तेही इतर जगाच्या आधी! अभिमान वाटतो .
    इ.स .पूर्व १५०० या सुमारास लिहिली गेलेली 'शल्वसुत्रे' या शल्वसुत्रांमध्ये पायथागोरसचा सिद्धांत लिहिलाय , पाय ची किंमत सांगितली आहे पण कारण दिलेलं नाही . महर्षी कणाद यांनी ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अणुविषयी तर्क केले होते . शून्याची कल्पना भारताने जगाला दिली आहे ! पाचव्या शतकातील आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल आहे ,स्वताच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्याभोवतीहि फिरते हेही जगाच्या आधी सांगितलं विशेष म्हणजे पृथ्वीचा परीघ त्यांनी गणिताने काढला (३९७३६किमी) आज तो ३९८४३किमी इतका आहे ,याच्याही पुढे जाऊन एका वर्षात ३६५ दिवस ,६ तास ,१२ मिनिटे आणि ३० सेकंद असतात हेही काढाल होतं!
      याशिवाय १२ व्या शतकातील भास्कराचार्य यांचेही गणितात खूप मोठे योगदान आहे ! वैद्यकीय शाखेत आयुर्वेद तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेते ! वेदकाळातील विद्यापीठे ,तक्षशिला,नालंदा आणि वाराणसी !
        लेखकांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे पण यानंतर आतापर्यंत खुंटलेल्या प्रगतीबद्दल खेदही व्यक्त केला आहे ! 

Monday, 17 October 2011

पत्रास कारण कि

                                                  //श्री//                             

१७/१०/२०११                                                                                          सौ गीतांजली शेलार 
सोमवार                                                                                                                सांजवेळ 


                                     आदरनीय,
                                                 माझ्या बाळाचे गुरुजन ,
                                                       स. न .वि .वि . पत्रास कारण कि ,
माझ्या हृदयातील ज्या लहरींच्या प्रेरणेने हृदयाची हालचाल चालू आहे त्या लहरींचा निर्माता, माझ्या संधीकाली असणाऱ्या आयुष्याचा आधार, माझ्या मनाचा आनंद असणारा माझा बाळ मी त्याच्या पुढील जडणघडणी करता तुमच्याकडे सोपवताना माझ्या मनातील माझ्या स्वप्नांची, माझ्या अपेक्षांची जी काही यादी म्हणा हव तर ती मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणून तुमच्या अमूल्य अशा वेळेतील काही मिनिटे माझा हा पत्रप्रपंच वाचण्यासाठी द्यावा हि नम्र विनंती!
       माझ्या मनातील या ताऱ्याला, माझ्या आयुष्यातील स्वप्नांच्या या वेलीला आकाशाला गवसणी घालायची कला शिकवा !ज्यामुळे तो फक्त माझ्याच मनातील तारा न राहता समाज्यातील दीनदुबळ्या प्रत्येक घटकाच्या मनातील स्वप्नांचा वेलु बनेल ! त्याला बाराखडी शिकवताना क -कमळाचा ख -खगाचा आणि ग -गवताचा नक्की शिकवा,हे शिकवताना त्याला हा निसर्गच आपला निर्माता आहे याची अवहेलना करताना तुला तेवढच दु:ख होऊ दे जेव्हड तुला तुझ्या आई बाबाची अवहेलना होताना होईल हेही नक्की   शिकवा! फुलपाखरू जसं लहान मोठ्या प्रत्येक फुलातील मधुरस प्राशन करून आपल्या पंखांवर अनेक रंग घेऊन जशी आनंदाने बागडतात तसं प्रत्येक क्षणातील लहान मोठं सुख जगायचं कसं हे शिकवा म्हणजे त्याच आयुष्य फुलपाखराच्या पंखान्प्रमाणे विविधरंगी होईल ! 
        खळखळ वाहणारा निर्झर जसं त्याच्या शुद्ध पाण्याने काठावरील प्रत्येक सान थोराची तहान भागवण्यात धन्यता मानतो तसं यालाही प्रत्येक अबालवृद्धाची काठी होऊन सेवेच्या आणि प्रेमाच्या निर्मळ जलाने त्यांची तृषा शांत करताना निरपेक्ष भावना उरी कशी जपावी हे शिकवा ! नदी जसं डोंगराच्या कड्यावरून कोसळल्यानंतरहि तिचा प्रवाह अखंड चालू ठेवते आणि स्वताची वेदना उरी साठवून भोवताल हिरवाईच्या नवचैतन्याने नटवून पुढे चालत राहते तसं त्यालाही सांगा निराशेच्या गर्तेत गेल्यावरही स्वताच्या वेदनेच भांडवल न करता जवळच्या गरीबांच जीवन सुखाच्या हिरवळीने व्यापून टाक, स्वताचा प्रवास न थांबवता ! 
        पाखरू जसं दिवसभर चाऱ्यासाठी हिंडून सायंकाळी घरट्याकडे झेपावते तसं तुही संपूर्ण जगातील ज्ञान मिळवण्याच्या नादात स्व:तच्या  मूळ घरट्यात परतायचं असतं हे कधी विसरू नकोस! आणि तुझी ज्ञानार्जनाची भूक भागविण्यासाठी काही क्षणांसाठी दूर जाताना भांबावून जाऊ नये हेही शिकवा माझ्या पिलाला! डोंगर जसं वाऱ्यावादळात जराही विचलित न होता भक्कम राहतो तसं तुही या समाजाने निर्माण केलेल्या चक्रीवादळात हरवून न जाता बरोबरच्या आणखी चार जणांना घेऊन कसं तटस्थ रहायचं हेही नक्की शिकवा ! 
         त्याला हे सांगा कि फणसा नारळाप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनात असतो  एक हळवा गोडवा जो मिळवायचा असतो न थकता त्याचे काटे काढून व कडक करवंटी फोडून ! थकु नकोस हे करताना कारण कष्ट करून जी गोष्ट मिळवशील ती तुला फक्त सुख नाही देणार तर आत्मसुख देणार आहे ! कितीही छोटा जीव असलास तू, तरी तुझ्यासारख्यांना  एकत्र घेऊन कितीही मोठं कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असते आपल्यात! हे पटवून देताना मुंग्यांच्या एकीने कसं भलमोठ वारूळ तयार होत हेही दाखवा त्याला!
          त्याला शिकवा कितीही मोठा तरु बनलास समाजाच्या, दृष्टीने तरी वेलींनाअंगाखांद्यावर घेऊन त्यांनाही आकाशाजवळ नेऊन सोड त्या अशोकवृक्षाप्रमाणे !आणि त्याचवेळी तुझी मूळहि घट्ट कर जमिनीत त्या वटवृक्षाप्रमाणे!  त्याला शिकवा शोधायचं असत या निसर्गाच्या कुशीत लपलेल सत्य, जे आपल जीवन संमृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करेल ! त्याला हेही सांगा आपला निर्माता असणाऱ्या निसर्गाने बनविली आहे प्रत्येक गोष्ट माणसाच्या भल्यासाठी फक्त कसं ते आपण ओळखायच असत ! 
          माजलेल्या भल्यामोठ्या हत्तीला जसं छोटी मुंगी काबू करू शकते तसं तू कितीही लहान असलास तरी तुझी सत्याची आणि प्रेमाची ताकत अगडबंब अशा संकटालाही वेसन घालू शकते हे त्याला समजावून सांगा! 
तुम्हाला मी माझा संगमरवरी दगड सुपूर्द केला आहे त्याला तुम्ही पायरीचा आकार दिलात तर मी समजेन माझा बाळ ज्ञानेश्वर बनला म्हणून नक्की तुम्हाला दुवा देईन! त्यातून तुम्ही कळस घडवला तर मी समजेन तुम्ही तुकाराम घडवला आणि तुम्हाला दुवा देईन ! आणि तुम्ही त्याची मूर्ती घडवली तर मी समजेन तुम्ही राम ,कृष्ण किंवा शिवाजी राजे घडवलेत आणि तुम्हाला दुवा देईन ! 

                                                                                              -तुमची कृपाभिलाषी 
                                                                                                      सौ गीतांजली शेलार.

                                                                                          
                     

Wednesday, 12 October 2011

माझी जगावेगळी प्रेमकहाणी !

     आज गजर होण्याच्या आधीच जाग आली. पहाटेचे साडे चार वाजले होते, उजाडायला अजून बराच वेळ होता म्हणून या कुशीवरून  त्या कुशीवर वळत होतो पण झोपेला काही माझ्या डोळ्यांचा पत्ता गवसत नव्हता! काळजी   मग ती येणाऱ्या सुखद क्षणाची असो अथवा लहान मोठ्या संकटाची, मनात तितक्याच ताकतीच काहूर निर्माण करायला पुरेशी असते. रात्री बापूंचा फोन आल्यापासून मनाची हर्षित अवस्था मित्रांपासून लपता लपत नव्हती, कशी लपेल मी कधीचा मनाशीच हसत होतो, जेवतानाही मन जेवणात नव्हतच! शेवटी न राहवून विलास म्हणालाच,''आम्हाला कळेल का या आनंदचे कारण?''
''अरे काही नाही उद्या बापू आणि दादा येणार आहेत दादाला मुलगी पाहायला आम्ही जाणार आहोत.''
'' तू असा काही वागतो आहेस कि मला वाटल तुलाच मुलगी पाहायची आहे!''
'' नाही रे, आमच्या चौघांच्या घरात हे नवीन माणूस म्हणजे थोडी उस्तुकता असणारच ना ? त्यात मला बहिण नाही, म्हणून रे बाकी काही नाही!''
       सगळ्यांच्या आधी उठून चहा, नाश्ता उरकून बसलो. बाल्कनीत येऊन बापू आणि दादाची वाट पाहत होतो. समोरच्या मोकळ्या मैदानात होस्टेलची मुलं क्रिकेट खेळत होती .
सुहास मला हाक मारत होता ''चल ना विकास''
''नको रे सुहास त्याची इस्री मोडेल कपड्यांची, आज वहिनी पाहायची आहे आम्हाला'' माझ्या आधी विलास उत्तरला. सगळे हसत निघून गेले . त्यांचा खेळ मी बाल्कनीतून बघत होतो..
''विकास ,ये विकास  आवरल का रे ''बापूंची हाक. मी वाकून बघितलं तर दोघेही आले होते मी धावत खाली गेलो दादाच्या मस्करीचा एकही चान्स मला सोडायचा नव्हता. गेल्या गेल्या दादाला मिठी मारली,''काय मग नवरदेव, चला लवकर वहिनी वाट पाहत असतील'' थोडसं हसून दादाने स्वताची सोडवणूक केली नि उत्तर न देता गाडीत जावून बसला. तो अबोल आहे पहिल्यापासून पण असं.....जाऊ दे न हा कदाचित लाजत असेल आणि आहे त्याचा स्वभाव नको त्या गोष्टीच ओझं मानगुटीवर घेऊन रडत बसण्याचा ... पण आज मात्र मी फुल मूडमध्ये होतो ... आज बापू नि आई कुणाच मी ऐकणार नव्हतो. माझी बडबड ऐकून बापू मनापासून दाद देत होते ...शेवटी त्यानीही हि वेळ आतुरतेने इच्छिली होतीच कि ...एक तास पूर्ण प्रवासात मी दादाची मस्करी करण्यात इतका दंग होतो कि त्याच्या काय भावना आहेत, काय स्वप्न आहेत हेही जाणून घ्यावं हे भान उरलं नाही. माणूस स्वानंदात इतका बुडून जातो कि समोरचं माणूस खरोखर आपल्या सुखात समाधानी आहे कि नाही याचा त्याला विचारही करावासा वाटत नाही मग तो तुमचा कुणीही असो...मी याला अपवाद कसा असेल!   
   आम्ही तिथे पोहचताच जंगी स्वागत झालं. हळूच दादाला कोपर मारला नि कुजबुजलो,''स्वागत जावईबापू!''
बैठकीची खोली नीटनेटकी सजवलेली, गर्भश्रीमंती प्रत्येक वस्तू पाहून लक्षात येत होती . चहापान झालं . मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला . मुलीचा भाऊ तिला घेऊन बैठकीत येत होता सर्वांच लक्ष्य तिकडे नि मी दादाला कोपरखळ्या मारण्यात गर्क! मुलगी समोर येऊन बसत होती तो मी तिला पाहिलं नि हातभर वर उडालो...जो चेहरा मी गेली दोन वर्ष मनाच्या कोंदणात ठेऊन पूजत होतो नि माझ्या वहीत फक्त तिच्याच सौंदर्याच्या वर्णनाने पानेच पाने भरली होती, जी माझ्या हृदयातील मंदिरात स्थानापन्न झालेली देवता होती, जिच्यासाठी मी सर्वकाही विसरून तासन तास तिच्या फक्त एका दर्शनासाठी कॉलेजच्या गेटमध्ये बसून असायचो ती माझी स्वप्नपरी,माझी प्रिया, माझी ह्रिदयचोर कोमल होती.... माझ्या मनाच्या या देवतेला या क्षुद्र जीवाबद्दल काहीच माहित नव्हत मी आपला एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेला एक प्रेमवीर होतो ज्याचं प्रेम त्याच्या मनाच्या नि वहीच्या बाहेर कधी आलच नव्हतं...पण आज असं काही समोर उभं राहील हे माझ्या कधी स्वप्नीही नव्हतं! रात्रीपासून हवेत उडणारा मी धाडकन जमिनीवर आदळलो होतो .... अशा ब्रह्मसंकटात सापडलो होतो कि ....अचानक आलेल्या वळीवाने बहरलेला गुलमोहर लुटून नेला .......................मी मात्र न वर्णिता येईल अशा संभ्रमात अडकलो होतो.............
    त्यानंतर काय झालं, मी कसा घरी आलो ,दादा काय बोलला हे आठवत नाही. मी एका अशा अवस्थेत होतो कि दुसऱ्या दिवशी जरासा भानावर आलो .तोपर्यंत हे काय झालं , दादाऐवजी दुसरा कुणी असता तर भांडून,विनंती करून कसही मी तिला मिळवलच असतं पण जर दादाने होकार दिला तर? का देईल तो नकार? इतकी सुंदर, सालस मुलगी तो नको म्हणणार नाही ,आणि ती जर वहिनी म्हणून घरात आली तर मी स्वतःला संभाळू शकेल का ? बर झालं मी कुणालाही माझी हि प्रेमकहाणी सांगितली नाही. कमीत कमी मी एकटाच सहन करणारा असणार आहे..... हो पण आता माझ्या आयुष्यातील लग्न हि गोष्ट मी काढून टाकणार! तिच्याशिवाय दुसरी कुणी ....नाही विचारही मनात आणू शकत नाही ! काय करू ...माझ्या मनाची हि अवस्था कुणाला सांगू ! आईला ...नको ,कि बापूंना ...,कि विलासला ...नको बाहेरच्या माणसाला नको ..काय करू ...अस वाटत होतं डोक्याचे सगळे केस उपटून काढावेत ,भिंतीवर डोक आपटाव कि ....
    दिवसभर कॉलेजला गेलो नाही ,न जेवता तसाच पांघरुन घेऊन झोपून राहिलो . मित्रांनी कमेंट केल्या पण त्या समजण्याच्या पलीकडे मी गेलो होतो,शेवटी तीही कंटाळून कॉलेजला गेली. चारच्या दरम्यान बापूंचा फोन आला, त्यांनी जे सांगितलं त्याने मला काय कराव काही कळत नव्हत. दादा नाही म्हणत होता लग्न करायला, बापू सांगत होते त्याला समजाव म्हणून! आता मी कस समजावणार होतो देव जाणे ! दादा इतक्या सुंदर मुलीला का नाही म्हणत असेल? मी काल येताना काही बरळलो तर नाही? तसं बापूनी सांगितलं असत मला, काय झालं दादाला, कुणी दुसरी? त्याने मला सांगितलं असतं, कदाचित लाजला असेल, पण आईला नक्की सांगितलं असतं ...मला आनंद होत होता पण वाईटहि  वाटत होत तिला नकार कळल्यावर ती आमचा सर्वांचा तिरस्कार तर करणार नाही? एक ना अनेक शंका माझं मन पोखरत होत्या.
     दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटमध्ये थांबायचं धाडस झालं नाही पण म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसं ती माझ्या समोर आलीच! पण ती हवीशी वाटणारी एक रमणी होती , माझी? कोमल होती. पर्वाची ओळख लक्षात ठेऊन तिने एक हसरा कटाक्ष माझ्याकडे टाकला ,माझ्या शरीरात एक गोड ,हवीशी वाटणारी वेदना सरसरून अंगभर पसरली , क्षणभर कोमल मोरपीस चेहऱ्यावर फिरतोय असं भासलं ! भानावर आलो तर तिथ कुणीच नव्हत..मनाचं हे सुख क्षणभर राहील! वाटल तिला उद्या नकार कळला तर काय होईल ? देवाला माझी दया कधी येईल का ? तसाच परत होस्टेलला आलो . आपण कितीही अस्वथ असलो तरी जगापासून मनाची हि होरपळ लपवाविशीच वाटते, डोक्यावर पांघरून घेतलं कि कुणाला काही कळणार नाही असच वाटत  राहते ... पण लपवल्याने  प्रश्न अनुत्तरीत राहण्याची भीती जास्त ! जखमेची खपली न काढता कितीही औषध लावलं तरी जखम बरी थोडीच होणार आहे ,जखम बरी होण्यासाठी खपलीखालची ठसठसणारी घाण निघणे गरजेचे ! आईनेच हे कधीतरी सांगितलं होतं ! मी लगेच उठलो नि बापुना  फोन केला .
''बापू, मी बोलतोय, विकास''
''अरे हा बोल विकास, अरे हो तुला सांगायचं राहील ,अरे तुझ्या दादाने दुसरीच मुलगी पहिली आहे म्हणून तो लग्नाला नकार देत होता , सकाळीच आईला सर्व सांगितलं त्याने आणि फोटोहि दाखवला मुलीचा, सुरेख आहे मुलगी आणि शिकलेली सुद्धा , तीन वर्षापासून चाललय पण दादाने मागमूस लागू दिला नाही ,आईला आणि मला वाईट वाटल ...एव्हडे मैत्रीचे संबंध ठेऊन मुलांना आपण जवळचे वाटत नाही म्हणून ...पण जाऊ दे त्याचा आनंद तोच माझाही म्हणजे आपला सर्वांचा रे , तुला फोन करणार होतो पण म्हटल तू कॉलेजांत असशील ...बर तू का फोन केलास? ''
''.....''
''सांग न विकास , काय झालं ?''
'' काही नाही बापू , तुम्ही नकार कळवला ?''
''नाही , म्हटल प्रत्यक्ष जाऊन सर्व सांगाव नि झाल्या गोष्टीबद्दल माफी मागावी ''
''तुम्ही जायच्या आधी माझ्याकडे याल का ?''
''हो येईल बाळा, काही काळजीच नाही ना?''
''नाही बापू ,आल्यावर बोलेन मी ''
''ठेऊ मग ''
''हो ,आणि होस्टेलमध्ये या ''
''बर बर ''
फोन ठेवला पण डोक्यावरच भलमोठ ओझं कमी झाल्यासारख भासल ,पण आता पुढच्या मोठ्या परीक्षेची तयारी करायची होती ती म्हणजे बापूंना सर्वकाही खर सांगण्याची .....
       आजची सकाळ पावसात धुवून निघालेल्या झाडासारखी स्वच्छ, मोकळी वाटत होती . एक वेगळाच विश्वास मन भरून उरला होता ...मी आजची परीक्षा नक्की पास होणार ....कदाचित माझ्या अर्ध्या बोलण्याने बापू झोपू शकले नसावेत म्हणून लवकर उठून आठ वाजता होस्टेलच्या वेटिंगररूम मध्ये आल्याचे निरोप माळीकाकाने आणला. सर्व आवरून मी खाली गेलो ,बापू वाटच पाहत होते .
''चला बागेत बसू ''
''बोल विकास ,काय झालं आता रात्रभर मी आणि तुझी आई झोपलो नाही, काही आजारी नाहीस ना ? का कुणी त्रास देत तुला? परीक्षेच टेन्शन अजिबात घेऊ नकोस , एक ऐवजी दोन वर्ष लागू दे मी आहे ना , पण मुलांनी सुखी असाव एव्हडच वाटत रे , बोलं रे बोल आणखी उत्कंठा नको लावूस.''
'' नाही बापू माझी काही काळजी करू नका, आणि कॉलेजच म्हणाल तर मी नक्की चांगल्या मार्कांनी पास होणार आहे, पण आज मला काही मागायचं आहे ,आणि हो तुम्हीही तुम्हाला आवडल तर होकार द्या.''
''....बापू मला आपण पाहायला गेलेलो ना ती मुलगी आवडते ,दोन वर्षापासून मी तिच्यावर प्रेम करतो पण तिला काय कुणालाच सांगण्याच धाडस मला झालं नाही ,त्या दिवशी दादाची नवरी म्हणून तिला पाहिलं नि मी गळूनच गेलो , पण नन्तर कुणाला न सांगता मनात ठेवण्याचा निर्णय घेतला पण दादाचा नकार समजल्यावर  पुन्हा अस्वस्थ झालो नि विचार करून करून शेवटी तुम्हाला सांगण्याच ठरवल कारण तुम्हीच सांगता ना विचारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत म्हणून ! बापू नकार सांगण्यापेक्षा तुमच्या लहान मुलासाठी मागणी नाही घालू शकत तुम्ही ! प्लीज बापू , हीच वेळ आहे तिला सांगण्याची कारण मी तिच्या समोर गेलो कि माझी वाचाच बंद होते ! तुम्ही माझे वडील तर आहात पण माझे मित्रही आहात ,तुम्हीच मला या संभ्रमातून बाहेर काढू शकता ! कराल ना बापू एव्हड ,प्लीज मला समजून घ्याल ना ?''
बापू उठले नि मला कडकडून मिठी मारली ,नि डोळ्याच पाणी पुसत म्हणाले ,'' मलाही ती मुलगी सून म्हणून आवडली होती रे, पण तुला कुठल्या तोंडाने विचारावे हेच कळत नव्हत , वाटल तु काही वेगळा विचार तर करणार नाहीस, पण त्या विधात्यालाच काळजी रे सगळ्याची! माझ्या मनातल बोललास बाळा ,मनातल बोललास! आत्ता जातो नि त्यांना सांगून येतो .''
मी गपकन वाकलो नि बापूंचे पाय धरले , त्यांनी परत मला उराशी कवटाळल . परत यायला उशीर झाल्याने , फोन करूनच बापुंनि त्यानीही हि गोष्ट आनंदाने स्वीकारल्याच सांगितल .....
     आज आवरून कॉलेजच्या गेटमध्ये बसलो, ती  येण्याच्या दोन तास आधी ! ती ...आली....एक हसरा  कटाक्ष ....मी घायाळ ..........ती लाजली नि क्लास पर्यंत जाईपर्यंत खाली घातलेली मान वर केली नाही !  विलास ,सुहास सर्वजण प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होते ,पण मी मात्र ..............................................