या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday 10 November 2011

मेसेज

       धापा टाकत प्रतिभा पळत होती ....शेवटी एकदाची रेल्वे सापडली ती घाईने आत चढली पण क्षणात थोडी नर्व्हस झाली कारण तो डबा महिलांचा नव्हता . बसण्यासाठी जागा नव्हती ती उभीच होती . धावत येऊन रेल्वे पकडल्याचा आनंद मिळायच्या आधीच नव संकट दत्त म्हणून उभं! का असं होत असेल? कधी असं वाटत नकोच ती सुखं जी नवीन अवघड वाटेची चाहूल असतील ! कष्टाने मिळवलेल्या एखाद्या वस्तूचा वापर करायच्या आधीच ती बिघडावी ! जे मिळवलं ते कधी लाभलच नाही ! सटवाईने माझ्याच कपाळी असं नशीब का लिहावं ? जसं कळायला लागलं तसं प्रतिभाने हा प्रश्न अनेकदा स्वत:ला विचारला पण उत्तर कधी मिळाल नाही ! पण ज्या प्रश्नांची उत्तरे नसतात तेच प्रश्न माणसाला जास्त प्रिय !  
       पुढच्या स्टेशनला उतरून डबा बदलायचा हे ती ठरवून होती. म्हणून ती दरवाजाजवळ जाण्याच्या विचारात होती .पुढे सरकायला लागली तर पुढचा तरुण तिला पुढे जाऊ देत नव्हता,मागचा मागे सरू देत नव्हता . तिला दरदरून घाम फुटला ,हात पाय लटलटू लागले, संपूर्ण शरीर क्षणात घामाने ओलं होऊन एकदम थंड पडलं! पुढचा मार्ग ...विचार करायच्या आधी एकाने तिच्या कमरेला हात घातला, जिवाच्या आकांताने तिने तो झिडकारला पण ...तिचा जीव तो काय असणार दिवसातून एक चपाती फक्त ! तितक्यात पाठीमागून एक तरुण पुढे झाला आणि त्याने चौकडीला बाजूला व्हा म्हणून खुणावलं . 
''काय रे , कोण तुझी?''चौकाडीतल्या एकाने उर्मटपणे सवाल केला . त्याचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आत एक दमदार ठोसा त्याच्या तोंडावर बसला ,नाकातून रक्त वाहायला लागलं , त्याची मानगुट धरून त्या तरुणाने स्वतःच आय कार्ड त्याच्या समोर धरलं.
''माफ करा साहेब .'' इतकाच बोलून तो बाजूला झाला. प्रतिभा मात्र थरथर कापत होती डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते . त्या तरुणाने पुढे होऊन तिला खिडकीजवळ जागा करून दिली आणि तो तिच्या शेजारी बसला.ती पुरती गर्भगळीत झाली होती ,अजूनही थरथर थांबत नव्हती .
'' मी इंस्पेक्टर अमोल गायकवाड, तुम्हाला भिण्याचे अजिबात कारण नाही , मी मुंबईपर्यंत आहे तुमच्या सोबत ,शांत व्हा !''
''धन्यवाद !'' इतकच बोलू शकली प्रतिभा , आणि डोळे पुसत बाहेर पाहू लागली. मनातलं काहूर मात्र अजून शांत होत नव्हत. आई आजारी पडली आणि सर्व कामे हि थोरली असल्यामुळे हिच्या अंगावर पडली ,पण तिने कधी ओझं मानलं नाही ,कर्तव्य समजून तिने सर्व जबाबदारी पेलली . काम बघून तिने पदवी संपादन केली . आईच आजारपण , प्रदीप आणि पल्लवीचे शिक्षण ,बाबांची नोकरी सगळं ती आत्मीयतेने करत होती ! स्वतासाठी मात्र तिच्या आयुष्यात जागा नव्हतीच ! इतर मुलींप्रमाणे तिला स्वप्नात राजकुमार कधीच दिसला नाही ! स्वप्न पडायला झोपच कधी पूर्ण झाली नाही...पदवी पूर्ण झाल्यावर तिला वाटायचं काहीतरी कोर्स करावा म्हणजे एखादी नोकरी बघता येईल ,तेव्हडाच हातभार ! आता पल्लावीची मदतही होत होती तिला, पण नियतीला काही वेगळच करायचं होतं...एक दिवस बाबा अपघातात गेले ...ती खूप खूप रडली ...प्रदीप ,पल्लवी आणि आई यांच्याकडे पाहून पुन्हा उभी राहिली ! बऱ्याच प्रयासाने तिला बाबांच्या जागी ,अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळाली ....पण रोज पुण्याला जा ये करावं लागणार होतं ! पण ती कुठल्या कष्टाला पाहून मागे फिरणार नव्हती !
''एक्सक्युज मी , हा घ्या चहा, पाणी देऊ का ?बर वाटतंय का आता ?''
''हो , बर वाटतय ,आणि नको आभारी आहे !''ती भानावर येत उत्तरली .
''अहो घाबरू नका ,मी काही गुंगीच औषध नाही देत तुम्हाला ,कमीत कमी समाजाचा रक्षक म्हणून तरी विश्वास ठेवा !''अमोल हसत बोलला .
''नाही हो ,तसं नाही पण मी चहा घेत नाही ,आणि मी कशाला अविश्वास दाखवेल ? उलट तुम्ही माझी खूप मदत केली आहे ,तुम्ही नसता तर ...''तिचे डोळे परत पाणावले .
''प्लीज रडू नका बुवा ,आणि एकदा चहा पिऊन तर बघा कसं फ्रेश वाटतंय ते .''
''बर घेते !'' हसत प्रतिभा उत्तरली.
''तुम्ही रोज अप डाऊन करता का ?''
''हो ''
''मी ,सुटी असल्यावर जातो घरी , तेव्हडाच आईला आनंद होतो , तू नाही आलास कि घर खायला उठत म्हणते !''
''तुम्ही कुठ असता ?''प्रतिभा कुतूहलाने विचारू लागली .
''शिवाजीनगर पोलीस स्टेशन !''
''काय , मीही तिथेच आहे ,वेधशाळेत क्लार्क आहे .''
''गुड , भेट होणार म्हणायचं आपली परत !''
''हो ''
''काही आक्षेप नसेल तर नाव समजेल आपलं?''
''नक्की , मी प्रतिभा,प्रतिभा कदम. ''
''छान !''मनाशीच हसत अमोल म्हणाला .
''काय ?''
'' काही नाही, कोण कोण आहे घरी ?''
''आई ,छोटा भाऊ प्रदीप ,बहिण पल्लवी ''
''वडील ?''
''ते सहा महिन्यापूर्वी अपघातात गेले .''
''ओ नो .''
.
.
.
मग दर शनिवारी ते एकत्र येऊ लागले आणि सोमवारी एकत्र जाऊ लागले!प्रतिभा अमोलच्या आई बाबांकडे जाऊ लागली .अमोलनेही तिच्या घरच्यांशी जवळीक केली . एका छोट्या ओळखीच्या बीजाचे रुपांतर प्रेमाच्या एका सुंदर वेलीत कधी झाले ते दोघांना उमगलेच नाही ...आज सुट्टी आहे म्हणून अमोलच्या आई तिच्या आईला भेटायला येणार होत्या . तिने हि गोष्ट फक्त आईला सांगितली होती .ती घर नीटनेटक आवरून आईजवळ बसली ,तितक्यात पल्लवी पळत आली ,''ताई अमोल आलेत !'' आणि एक चिमटा काढून वेडावत पळून गेली . त्यांच्यातल्या नात्याची चाहूल आता मुलांनाही लागली होती . आणि म्हणूनच आईला प्रतीभाच्या लग्नाची घाई झाली होती ,तसं ती म्हनालीही होती प्रतिभाला ! 
''येऊ का आत प्रतिभा ?''अमोलच्या आईच्या खणखणीत आवाजाबरोबर प्रतिभा घाईने बाहेर आली .
''या ना आई .''
''आणि मी '' अमोल पुढे होत बोलला. त्याला पाहून उगाचच रेल्वेचं इंजिनाची धडधड छातीत जाणवली, रोज ती त्याला भेटायची पण आजच्याइतकी अस्वस्थता तिला कधी जाणवली नव्हती. चहा -पाणी झालं,अमोलच्या आई तिच्या आईची चौकशी करत होत्या .इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या .अमोल मात्र एकटक तिच्याकडे पाहत होता आणि ती कधी नजर टाकत होती आणि कधी चुकवत होती ,पायाच्या अंगठ्याने उगाचंच फरशीवर घासत होती . 
''प्रतीभाची आई , मी आज वेगळ्याच कारणासाठी आले आहे .''
''बोला न ताई '' आईने अजीजीने विचारले .
''मी अमोलसाठी प्रतिभाला मागणी घालायला आले आहे  , हा पण तुम्हाला काही आक्षेप नसेल तर !''
''नाही हो , आक्षेप कसा असेल !''
प्रतिभा मात्र विस्मयाने अमोलकडे पाहू लागली ,हे होणार याची तिला कल्पना होती पण असं अचानक ...
    प्रदीप बाहेरून आला .आईने त्याला जवळ बोलावून दुपारचा प्रसंग सांगितला .सर्वांना तो खुश होईल अशी अपेक्षा होती पण तो काहीच बोलत नव्हता आणि खाली मान घालून बसला .प्रतिभा किचनमध्ये होती तिला ऐकू जाईल अस मोठ्याने प्रदीप आईला बोलू लागला ,''मला वाटलच हि असंच स्वार्थ साधणार ,तीच झालं ! आपलं काय ? बाबांच्या जागी हि लागली कामाला, लग्नानंतर पगार देणार नवऱ्याला , माझी पदवी झाली पण नोकरी नाही ,तुझं आजारपण काय करायचं सांग ?''
''अरे प्रदीप ,असं का बोलतो ? तिने काय असंच रहायचं का ? एकदा वय झालं कि कोण करणार ताईशी लग्न ? चांगल स्थळ आहे ! आणि लागेल कि तुला नोकरी ? ''
''कर काय करायचं ते , शेवटी मीच वाईट !भीक मागायला लागेल तेव्हा कळेल ?'' तावातावाने तो बाहेर निघून गेला . प्रतिभाचा सकाळपासून फुललेला चेहरा क्षणात काळवंडला. पुन्हा तोच प्रश्न तिला सतावू लागला.मीच का ? आज तिचे अश्रुही आटले होते . ज्यांच्यासाठी कधी सुखाला जवळ फिरकू दिल नाही ,त्यांनी असं बोलावं! का मला सुख लाभत नाही ? आता कुठे खळखळून हसायला शिकले होते तर ...क्षणात विचार आला सांगाव अमोलला नको म्हणून ...नको ते सुख मला ...फोन हातात घेतला ,तर अमोलचा एक मेसेज आलेला -
  Treat every one wid love ,
   Even those who hurt u ,
   Not b'coz they r not nice,
   Simply b'coz u r not bad....!!!
मेसेज वाचून तशीच उशीत डोक खुपसून रडू लागली...मनमोकळ ...तिने लगेच अमोलला फोन केला. 
''हेलो ''
''हाय स्विटी!''
''मी हि नोकरी सोडली तर चालेल ?''
''मीही तेच सांगणार होतो तुला ! आणि हो ती जागा प्रदीपला मिळवून देऊ म्हणजे त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटेल !''
''थांक्यू अमोल ,आता माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे ...आता माझ्या आयुष्यात फक्त सुखच येणार आहे ...हो न अमोल ?''
अमोल काही अर्थबोध झाला नाही पण तो ठामपणे उदगारला ,''नक्की स्विटी ,अगदी नक्की ...मी तुला फक्त सुखच देणार आहे !''

6 comments:

Anonymous said...

Khup chan vatali katha. Jagat niswarthi lok ahet mhanunach manusaki ahe as vatat.

सौ गीतांजली शेलार said...

धन्यवाद शुभांगी ब्लॉगला भेट दिल्याबद्दल !

भोवरा said...

छान मांडणी केली आहे कथेची. वाचून छान वाटले.

सौ गीतांजली शेलार said...

धन्यवाद भोवरा ,ब्लॉगला भेट दिल्याबद्दल ! तुमची प्रतिक्रिया नक्कीच माझा हुरूप वाढवणार आहे !

किमंतु said...

Hi,

This is Kimantu. I am editor of Aanandrutu E-Magazine. Recently read your blog. Its very nice. Especially I like your short stories. With your permission may I publish your stories with Aanandrutu E-Magazine? Please let me know asap.

Thanks & Regards
Kimantu

Official Website:
http://aanandrutu.com/

Official E-Mail Address:
aanandrutu@gmail.com

Facebook Page:
https://www.facebook.com/Aanandrutu

Facebook Profile link:
https://www.facebook.com/kimantu

किमंतु said...
This comment has been removed by the author.