या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday 5 November 2011

पिसाळलेला

      धाय मोकलून रडत होती सुनिता .काय करणार कारभाऱ्याला काय बी उप्योग होणार नाही म्हनत्यात दागदर. आस कस होईल म्हणावं त्यास्नी? सकाली त चांगला व्हता पाणी गीलता नाय येत म्हणत व्हता . आस काय बाय बरलत सुनिनी आख्खा भिलवाडा गोला केला ....दिउरुसी म्हणत व्हता त्यो वड्याला गेला तवा त्या बुडून मेल्याल्या किसन्यानी त्येला झपाटला इयक कोंबड आन रोट टाकायला सांगितला त्ये बी केलं पर आज त्येस्नी पाणी बी गली उतरणा मग मालक ऐकना त्येनी गाडीवर टाकला नी दवा आणायला नेला पर आस कसं दागदर म्हनत्यात त्येचा उल्गाडा तिला होत न्हवता ती मोठ्यान रडून झुम्बरीच्या गळ्यात पडत व्हती आन कारभारी मातूर सव्ताला घरात डांबून घेऊन अंधारात जाऊन बसत व्हता . मधीच पाणी मागायचा नी कुणी गिलास फुड केला कि मोठ्यान आरडत दारामाग लपायचा.........
       म्हाद्या भिल कामाला वाघ गडी, पाहिल्यापास्न एकाच मालकाकड टिकून व्हता . मालक बी त्येच्यावर सगळ काम टाकून निर्धास्त व्हता .त्येच्या या इमानापायी मागल तवा मालक पैका देयचा. सुनी आन त्येची आय , कवा पटल नाय म्हणून मोठा पोरगा भाऊ झाला आन त्येनी वायली चूल मांडली . नन्तर त्येला मनी , संत्यु आन भिंगरी झाली . सगल्या पोरास्नी त्यो सालत धाडीत व्हता . सवता मरुस्तवर काम करायचा पर पोरास्नी कवा कुणाचा बांध चढू दिला नाय त्येनी .
        पंधरा दिस झालं उसाचं पाणी रातभर देऊन म्हाद्या घरी निगाला तवा कायतर पायास्नी मऊ लागलं कुई आवाज आला त्यो बी लई बारीक खाली नजर गिली त एक कुत्र्याच पिलू .. का कुणास माहित पर त्येला दया आली  नी त्येनी त्ये पिलू घरी नेलं त्येस्नी भाकर टाकली ,पाणी पाजल. भिंगरी पळत आली आन पिलासंग खेळाया लागली . भाऊ ,मनी बी गोला झाली . म्हाद्यानी तवर सगळ आवरून भाकर खाल्ली आन संग भांधून बी घीतीली . बाहीर आला त सगळी पोरं त्या कुत्र्याला छळीत व्हती त्येनी पोर हाकाल्ली पिलू झापाखाली झाकून कामाला गेला . दुपारी आला त मनिनी पिलू काढाल व्हतं पिलाच तंगड धरून वढीत व्हती त्ये पिलू मातर किविलवान क्या क्या करीत व्हतं . मनी तंगड वढायची आन संत्या कान वढायचा आता पिलू गुरगुर कराया लागल आन वाचकून संत्याला चावल संत्यानी सोडलं त मनिला चावल . मनिला चावल म्हणून महादूनी धरून फेकाया लागला त त्येला बी धरलं कि ! संत्यानी एक चिपाड आणल आन कुत्र्याला माराय लागला कसं बस सुनिनी त्ये सोडावल आन झापाखाली डालल. सगळी जिकड तिकड झाली . सुनिनी सांजच्याला झापाखाली थुडी भाकर आन पाणी सरकवलं . 
     सकाळ्च्याला सालत जायच्या आन कामाला जायच्या घाईत कुणी कुत्र्याकड फिरकल नाय आन कालचा राग आन भ्याबी होतंच कारण पिलू बारीक व्हतं पर लचक चांगलं मोठ काढाल व्हतं! सुनीच काम आवरलं , कुत्र्याच ध्यान झालं म्हनुन्श्यान झाप काढला त कुत्र गपगार , हलून बघितलं पर त्ये काय हलणा . दुपारी महादू आला त्येला दाखिवल . महादुला त्ये बघून घाम फुटला . त्येनी काय ते वलिकल . त्याच पायी मालकच घर घाटल आन मालाकाकून पैका घितला . मनी आन संत्याल्या संग घेऊन तालुक्याचा दवाखाना गाठला . पैका कमी पडला म्हणून त्येनी संत्या आन मनिला सुई घीतली त्यो मातूर तसाच आला . आज उद्या करून त्येची सुई घियाची राउन गिली . कामाच्या नादात त्यो बी इसरून गेला . 
       पाच दिसापासून त्यो खायचा कमी पडला . सुईच्या भ्यापायी इलाज कराय नको म्हणायचा . मालक सवता नेतो म्हणाला पर ह्यो काय गेला नाय . सुनिनी भगत बी केला पर म्हाद्या काय उलगडणा . दार लाऊन बसाय लागला ,पाणी घिना मग मालकांनी गाडीत टाकला आन दवाखान्यात नेला . गाडीत बसला पर डोळ् खुल करून उजेड त्येन बगितला नाय . दागदरनी तपासला आन सुनीला इचारल कुत्र चावल व्हत का ? सुनी म्हणली हाव चावल व्हत कि !  दागदरनी मालकाला आत बोलून सांगितलं त्यो पिसाळलेला हाय , एक दिवस फक्त !
         मालकांनी घरात आणून टाकला ,सुनीच्या हातात पैका ठीवला आन डोल्यास्नी पंच्या लाऊन निगुन गेल ...सुनी मातर आरडत व्हती , म्हाद्याला  भान नव्हत ,पोर टकामका बगत हुती आन भिलवाडा वाट बगत व्हता म्हाद्या कवा मरायचा ... त्येंना माहीत व्हत ह्यो चुकून आपल्याला चावला त आपल बी काय खर नाय . एक म्हातारी उठली आन दाराला भाहीरून कडी घातली आन सुनिजवळ येऊन बसली ....

No comments: