या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 11 May 2015

विनवणी

कधी उगवल सांग
माझ्या अंगनी दिवस
देवाजीच आता सांग
कधी संपल अवस


झालं निजुर व पाय
मिरुगाला धाडा जरा
करा किरपा इतकी
ढेकळांची साय करा.....

दारी हंबरे गोधन
आत स्फुंदते धनीन
नका बघू अंत देवा
गरिबाची लाज ठेवा

माझं चुकलं माकलं
माफी देवाजीच्या दारी
लिंब चिंच न जांभळ
लावीन जी बांधावरी

नाही सांगत मी खोटं
पाणी दाटलं डोळ्यांत
मातनार आता नाही
चुक आलीय ध्यानात

हात जोडून व देवा
इतुकीच विनवणी
लेकरांच्या मुखामंदी
पडूद्या की अन्नपाणी

   सौ गितांजली शेलार 

Monday, 30 March 2015

एक खांदा हवा



मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी
मरगळलेल्या मनाला
परत रिझवण्यासाठी...

धुत्कारल्या माझ्या जीवाला
विस्कटलेल्या या बटेला
विखुरलेल्या त्या माळेला
परत सजवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी...

दु:खाला देण्या एक स्वल्प
उद्याच्या सुखाचे संकल्प
स्वप्नांचे रेखीव शिल्प
परत बनवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी...

सृष्टीने दिलेलं औदार्य
अस्ताला निघालेला सूर्य
सोडून चाललेले धैर्य
मनी एकवटण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी ...
               -संध्या §

Sunday, 1 March 2015

भांडण

   दिवस उगवताच आग ओकत येणारा दिनकर , धुलीकणांनी मलीन झालेल्या वृक्ष वेली , तप्त अशी मृत्तिका आणि इकडून तिकडे तहानेने व्याकुळ होवून पळणारे सजीव , वसुंधरेचे काळीज उद्विग्न करीत होते . पाखरांचे थवेच्या थवे झाडांच्या पानांची सावली शोधून दमून शेवटी माणसाच्या घरांचा आधार घेत होते . ते पण थोडा वेळ लगेच कुणी त्यांना तिथून हाकलून काढीत होते . असा क्रोधीत होता दिनकर कि दुपारी तर डोक्यात , पोटात , अंगावर आणि संपूर्ण सृष्टीवर जणू रखरख पेरीत होता . धुलीकणांनी कोंडलेले श्वास वृक्ष वेली जबरीने मोकळा करण्याचा असफल प्रयत्न करीत होती . कधी पवनाची कृपा झाली तर थोडा श्वास कसातरी मोकळा होत होता . आटलेले तलाव , नद्या अंगावरच्या भेगा सावरीत कशीतरीच दिसत होती . भेगाळलेल्या जमिनी कोरडा टाहो फोडीत होत्या… वसूचे काळीज अधिकच हळवे करीत होत्या ! थंडीच्या दिवसात इतका प्रेमळ असणारा दिनकर , त्याचा अचानक असा क्रोधाग्नी का भडकावा हेच तिला उमगत नव्हते . प्रेमाच्या गुलाबी थंडाव्यासारखा त्याचा क्रोधही सोसला असता तिने , परंतु लेकरांचा जीव घेणारा हा कसला राग ? लेकरे तर त्याचीही न ? मग ? कुठला बाप असा रागवत असेल कि स्वत:च्याच पिलांना होरपळून मारीत असेल ? तिच्या जीवाची मात्र खूप खूप उलघाल चालली होती . त्याला का असा वागतोस असे विचारले तर उगीच अधिक क्रोधीत व्हायचा … मन व्याकुळ झाले होते पण नेत्रात टिप्पूस उतरावा इतकेही जल तिच्यात बाकी नव्हते . किती हा क्रोध … बस करा दिनकर बस करा … नाही नाही आता गप्प बसून चालणार नाहीच … बोलावेच लागेल आपल्या लेकरांसाठी तरी बोलावेच लागेल … ते बाप असतील पण मी आई आहे … माझे हृदय फाटणार न त्या लेकरांची टाहो ऐकून ?
"दिनकरा , दिनकरा … का असे क्रोधीत झालात दिनकरा ?" डोळ्यात प्राण आणून वसूने शेवटी विचारलेच.
"तू मला विचारतेस वसू ? मला ?" कपलावरच्या रेषा अधिकच दीर्घ करत दिनकर तिच्यावरच प्रश्न फेकू लागला . तप्त झालेली वसू आता खूपच हळवी झाली … डोळ्यातील आर्जवे तो वाचू शकत होता , त्याने तो घायाळही झाला पण त्याचा क्रोध त्याहीपेक्षा जास्त होता .… तिच्या प्राणप्रियाला तिची तगमग समजू नये याचे अतीव दु:ख तिला कातर कातर करीत होते . तिचा श्वास अधिक अधिक वाढू लागला . पण येणारा तो वाराही तप्तच येत होता आणि तडफडणाऱ्या जीवांना जास्तीच वेदना देत होता . तिचा दोलायमान झालेला जीव शेवटी लेकारांपाशी येवून स्थिर होऊ लागला …. आणि कठोर होत तिने शेवटी त्याला प्रतिप्रश्न केलाच ,
"दिनकरा तुम्हाला नाही दिसत तुमच्या क्रोधाग्नीने होरपळणारी तुमची लेकरे ? त्यांचा जीव घेवूनच थांबणार आहात का तुम्ही ?"
"वसू तू मला भावनेच्या आहारी घालू नकोस पण आज जे ते भोगत आहेत त्यांच्याच कर्माची फळे आहेत , आणि इथे जर समज नाही दिली तर ते तुलाही घेवून नष्ट होतील ." क्रोधीत दिनकर हळवा झाला होता आणि त्याचे वसूबद्दलचे प्रेमच त्याला असे करणे भाग पाडत होते …
"माझ्या लेकरांसाठी माझे सर्वस्व संपले तरी चालेल मला ! आणि असेही त्यांच्याशिवाय अर्थच काय आहे हो धरेला ?" वसू फुरंगटून बोलली .
"वसू …. मातृप्रेमाने अंध होवून जावू नकोस … तुझा शेवट व्हायच्या आधी त्यांचा शेवट आहे मग तूच ठरव या स्वार्थी मानवासाठी तू आपल्या इतरही लेकरांचा बळी देणार आहेस का ?" क्रोधाने थरथरत दिनकर जवळजवळ ओरडलाच . त्याच्या ओरडण्याने कंपित होत वसुही अधिकच हट्टाला पेटली .
"म्हणजे मानवाने सारे केले … असे म्हणता … इतर लेकरांनी का भोगावे म्हणता आणि स्वतः काय करता हो … मानवाच्या आधी बाकीच्या जीवांनाच तुम्ही आधी वेठीस धरले आहे … आणि लेकरू चुकले म्हणून तुम्ही त्याचा जीवच घ्यावा हा कुठला न्याय ?"
"वसू … न्यायाची गोष्ट मला शिकवू नकोस … तू फक्त बघत राहा थोड्यांच्या जाण्याने जर सार्यांना सुख मिळणार आहे तर त्यासाठी थोड्यांचे बलिदान द्यायलाच हवे …." 
"मी माझ्या जीवात जीव आहे तोवर असे नाही होऊ देणार … मग तुम्ही दुरावलात तरी चालेल मला !" कठोर शब्दात वसूने दिनकरला ऐकवले खरे पण आतून ती उसवत चालली होती , तिचे हृदय आक्रंदत होते … प्रियाच्या विरहविचारांनी विदीर्ण होत होते …. वरून वज्राप्रमाणे कठीण दिसणारी वसू आतून ढवळून निघाली होती … परंतु लेकरांसाठी असेही निर्णय घ्यावे लागतीलच … स्वतःच्या प्रेमाचा बळी द्यावाच लागेल … नाही नाही मी आता माझ्या पिल्लांना न्याय मिळवून देणारच …
"वसू … वसू अशी नको करू … अग मी का कुणी त्यांचा शत्रू आहे …. ठीक आहे … जशी तुझी इच्छा . पण एक लक्षात ठेव माझ्याशिवाय तुही जिवंत राहू शकणार नाहीस आणि तुझी माझी पिलेही … "आधी हळवा झालेला दिनकर पुन्हा कठोर होऊन तिला धमकावत बोलला .
"तुमच्यासोबत राहून मरण्यापेक्षा तुमच्याशिवाय मरणे पत्करू आम्ही … कमीत कमीत बापाचा आधार नव्हता म्हणून जीव गेला असे तरी म्हणतील सारे !" रागाने थरथरत असलेली वसुही आता प्रत्येक शब्दाला शब्द फेकत होती .
"तुही माणसाच्या स्रीसारखी वागू लागलीस न ? पण लक्षात ठेव या साऱ्या विनाशाला माणसाच्या मुर्खपणासारखे तुझे आंधळे प्रेमही कारणीभूत असेल … " रागाने रक्तवर्णी होत दिनकर बोलत होता . त्याचा तांबूस चेहरा रागाने आणि दु:खाने लालबुंद झाला होता .
"मी तरी मानवी स्रीसारखे वागत आहे पण तुम्ही तर मार्जर नरासारखे स्वतःच्या पिलांनाच गिळायला निघालात … " फणकाऱ्याने  वसू बोलली आणि धुळीचे लोट पुन्हा उधळू लागली … जेणेकरून या कठोर प्रियाचे तोंडही तिला दिसू नये .
"वसू  ……. " रागाने चरफडत दिनकर असंख्य तप्त किरणे धरेकडे फेकत राहिला … तरीही त्याचा क्रोध अजून वाढतच होता .  वसूच्या सर्वांगाची लाही लाही होऊ लागली . दिनकर वसुची सारी लेकरे आडोसा शोधात लपू लागली … आणि या आपल्या मातापित्याच्या भांडणात आपला जीव तर जाणार नाही ना ? या भीतीने वसूच्या कुशीचा आधार घेवू लागली …. धुळीच्या लोटांनी वसू साऱ्यांना पांघरून घालू लागली पण ते तप्त पांघरून त्यांना अधिक कासावीस करू लागले . शेवटी वसूने तिच्या भावांना निरोप पाठवून बोलावून घेतले .
भगिनीचा निरोप मिळताच प्रथम पवन धावतच आला , मागोमाग मेघानेही हजेरी लावली . तिने तिची सारी व्यथा  कोरड्या पडलेल्या नेत्रांनी आणि ओलावलेल्या शब्दांनी दोघांना ऐकवली . तिच्या शरीराच्या दाहाचा आधी इलाज करायचे दोघांनी ठरवले आणि पवनाच्या मदतीने मेघाने तिच्याभोवती अभ्राचे अच्छादन तयार केले . क्षणात वसू दिनकराच्या नजरेआड झाली . मावळतीला झुकलेल्या दिनकराच्या मनातही कातरवेळीची हुरहूर दाटून आली आणि लांब उसासे टाकत तो फक्त म्हणाला , "वसू … "
" वसुताई , तू हि गोष्ट आधीच आमच्या कानी घालायला हवी होती ." डोळ्यातली आसवे टिपत पवन म्हणाला.
"हो वसुताई , पण जाऊ देत अजूनही वेळ गेलेली नाही . आपण वरुणाला बोलावू आणि आधी तहानलेल्या लेकरांना थोडा ओलावा देवूत . " मेघाने पवानाच्या शब्दांना होकार भरत आपले म्हणणे मांडले . त्याचा सल्ला दोघानाही पटला . कारण तहानेने व्याकुळ झालेल्या लेकरांना आधी शांत करणे गरजेचे होते .
   वसुताईच्या मायेखातर आलेल्या वरुणाने स्वतःचे काम चोख बजावले आणि सारे नियम धाब्यावर बसवत उन्हाळ्यात पाऊस बरसू लागला . व्याकुळ झालेल्या जीवांना मात्र आता कुठे हायसे वाटू लागले . त्यांची चूक अजूनही माणसाच्या लक्षात आली नव्हती . आईच्या पदराआड सारी सुरक्षित होती . आताची वेळ टळली होती परंतु भविष्यातील अनेक अडचणी कश्या सोडवायच्या हा खूप मोठा प्रश्न होता .
  तीन चार दिवस झाले मेघाचे अच्छादन अजूनही तसेच होते . आणि दिनकराची उष्णता नव्हती म्हणून वरुणाला बरसणे भाग होते . इतक्या दिवसात दिनकराचा काहीच निरोप नव्हता . आठ दिवस झाले तरी दिनकराचा काहीच निरोप येत नव्हता . व्याकुळ वसू मात्र ओलावल्या नेत्रातून अविरत टिपे गाळत होती . तिचे शांत मन आता दिनकराच्या भेटीसाठी धावा करत होते . गारठलेली माणसे आजारी होऊन तर कुणी काठ सोडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याबरोबर वाहून तर कुणी गारपीटमध्ये सापडून मरत होती . वसूचे विरहाने आणि दु:खाने व्याकुळ हृदय फक्त टिपे गाळण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत . पश्चातापाने दग्ध मन बाहेरच्या गरव्यानेही थंड होत नव्हते . राहिल्यासाहिल्या झाडांची पानेही आता पिवळी पडली होती . त्यांना गरज होती पित्याच्या प्रेमाची पण …. प्राण्यांनी तर कधीचे शेवटचे श्वास मोजायला सुरुवात केली होती .
     'वसू अजून किती दिवस तू असा खोटा अभिमान कुरवाळत बसणार आहेस ? तुम्हा दोघांच्या हट्टापायी आजून किती जीव जाणार आहेत ? पण दिनकरानेही आपल्या लेकरांचे रक्षण करायला हवेच न ? किती साद घालीत आहेत हि माणसे सूर्यदेवाला पण कसे यांचे हृदय पिळवटत नसेल ? पण मी का बोलावत नाही दिनकराला ? मीच साद घालायला हवी …. खरच … आणि वसू पवनाच्या गळी पडून हुस्मरून रडू लागली . ….
"दिनकरा … पुरे आता … माझ्यासाठी नको पण लेकरांसाठी …"
आणि चमत्कार व्हावा तसा काही वेळात पोपटी रंगाचे वस्र ल्यालेल्या वसुला आपल्या शीतल कोवळ्या किरणांनी आलिंगन देत दिनकराचे आगमन झाले . वसुला वेढलेल्या मेघाने कधीच आपला मुक्काम हलवला होता आणि पवन हलक्या थंडाव्याचा शिडकाव दोघांच्या अंगावर करत त्यांना चिडवत होता … मात्र दोघांच्या मनात एकच काळजी सलत होती … यातून मानवाने काही बोध घेतला असेल का ?

Tuesday, 17 February 2015

ताक

  ताक ! हि अशी गोष्ट कि लहानपणी ती प्रत्येक घरात असणारच ! आज दुधाचेच भेटणे मुश्कील तर ताकाची काय व्यथा ..चहा आला तरी त्यात थोडे दुध जास्त पाणी . बळेच तो पाण्याचा चहा नरड्याखाली ढकलायचा . शहरात तर हीच स्थिती . खेड्यांमध्ये थोडी बरी परिस्थिती , कमीतकमी तिथे पिशवीचे दुध नसते . तशी मी अश्या गावात राहते जिथल्या मातीला खेड्याचा सुगंध आहे आणि आभाळाला शहराचा रंग आहे ! म्हणून  पाणी न मिसळेले दुध आम्हाला सहज उपलब्ध आहे . आणि त्यावर साय तर अशी जाड चांगली येते . पण माझे तोंड बांधलेले आहे कारण वजन ! बरे लेकरांना दुध गाळून दिले तरच पिणार , मग काय त्या सायीचे विसर्जन प्रत्येक दिवशी दह्यात . मला साय खायला खूप आवडायची , म्हणजे आवडते पण . लहानपणी आईची नजर चुकवून चुलीवर कोळशाच्या धगीवर उकळणारे ते दुध आणि त्यावर आलेली ती साय भेटली कि अमृत भेटल्याचा आनंद ! आज चणे आहेत पण दात गेले .. मग आता माझ्याकडे साधारण आठवड्यात दह्याचे पातेले भरते . मग ताक !
          ताक करणे खरच म्हणजे खरंच खूप आनंददायी असते . अगदी कृष्णाच्या गोकुळात गेल्याचा भास होतो. दह्याचे पातेले फ्रीजमधून बाहेर काढले कि पहिली आठवते माझी आजी . रंगाने उजळ , नऊवारी साडी , चोळी घातलेली , चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा भरगच्च , पण एक लाजरे हसू त्यांना षोडशीपेक्षाही सुंदर करत होते . अशी माझी आजी ताक करायला लागली कि जणू मथुरेची यशोदा भासे . मागच्या दारातल्या आंब्याच्या झाडाला रवी अडकवण्याची दोरी होती . स्वच्छ सारवलेली जमीन आणि एका डब्यात आजी ताक करे . ती रवीची लयबद्ध हालचाल , आणि डब्यातल्या ताकाचे त्याबरोबर उसळणे . जणू एखादी लावण्यवती रस्त्याने ठुमकत चालत आहे आणि भोवतालची गर्दी उगीच आनंदाने , हर्षाने  उसळत आहे ! अलगद त्या लोण्याने डोके वर काढावे आणि आजीने ते मोठ्या नजाकतीने , हातांवर नाचवत वर काढावे . ते धुवून घेणे हि पण एक कलाच बर का ! कारण ते हाताला चिकटलेले लोणी , मऊ अगदी सोडवत नाही पण हळुवारपणे ते पातेलेल्या पुसत राहावे . बोटांच्या मध्ये साचलेले ते लोणी लहानपणी जेंव्हा आजी भावाला चाटावी  न तेंव्हा मी लहान का नाही याचा खूप खेद होई , आणि मग वाटे मी रांगत असेल तेंव्हा आजी मलाही चाटवत असेल ! शेवटी ती तो गोळा फिरवत फिरवत मस्त गोल करायची . त्यात बोट घालणे म्हणजे एक मनात रुंजी घालणारी खोडी ... पण ते केल्याशिवाय मी काही हलत नसायची ...मग हळूच ते बोट तोंडात ..काय चव होती ...सांगणे तसे अवघडच ! पण आठवले न कि मनीमानसी आनंद दाटतो .. आणि एक स्मिताची रेषा चेहऱ्यावर उमटते , आजही !
         आताही जेंव्हा जेंव्हा मी ताक करते तेंव्हा मला हे सारे जसेच्या तसे चित्रपट पहावा तसे नजरेसमोरून जाते .. हे वाचणाऱ्या किती जणींनी हा हर्ष अनुभवला असेल , ताक करण्याचा पण मी जेंव्हा ताक करत असते तेंव्हा फक्त एक स्मित असते मनात आणि मुखावर .. मग कुणीतरी म्हटलेले आहे , 'ताक करणारी स्री  पहिली ना गोकुळातली ती समाधानी यशोदा आठवते , एक सुखी , समाधानी स्री आठवते ...' हे सत्य आहे सख्यानो ! एकदा ताक करून पहाच ...गोकुळात आहात असे वाटेल ! 


Friday, 13 February 2015

एक मैत्रीण

    प्रत्येकाच्या जीवनात सुखदु:खाचे लपंडाव चालूच राहतात . पण माझ्यासारखे काही असतात ज्यांना होऊन गेलेल्या घटना , भोगून झालेले दु:ख पुन्हा पुन्हा आठवून कष्टी होणारे . सतत झाले ते आठवून आज  शून्य जगत  राहिले . सारे आप्तेष्ट त्याची जाणीव करत . जीवन प्रवाही आहे , थांबू नये असेही सांगत . पण सारखे स्वताचे आयुष्य कुणापुढे उघड करत राहावे असे खचितच कुणाला वाटत नाही . नवरा , आई वडील आणि प्रियजन आपल्या या निराश विचारांनी कष्टी होतील म्हणून त्यांना सांगवत नाही . मला नाही माहित कि प्रत्येकाच्या आयुष्यात असे होते कि नाही परंतु मला बऱ्याचदा अश्या घटनांना सामोरे जावे लागते . अश्या क्षणी गरज असते अश्या एका नात्याची जे जवळ तर असते पण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग नसते . आणि मैत्रीशिवाय असे कुठले नाते आहे असे मला वाटत नाही !
     मग अशीच एक मैत्रीण भेटली व्हाटस अपवर , तिच्या happy quotes या ग्रुपवर ! रोज सकाळी मनाला उभारी देतील असे तिचे quotes वाचून आपोआप मन शांत होते . रोजच्या व्यापात होरपळून जाणारे जीवन पुन्हा उमलून येते . कधी मन निराश होते कि मी इतके कष्ट घेते सार्यांसाठी तरी कुणाला त्याचे काहीच नाही ! तेंव्हा ती सांगते निष्काम कर्मच खरा आनंद देते , आणि मन पुन्हा स्वच्छ होते . कधी कुणी जवळच्या व्यक्तीने दुखावले असते ...खूप खूप राग येतो ! तेंव्हा हळूच सांगते स्वतःसाठी जग कि ग ! कधी उगाच रागाची रेषा चेहरा भरून टाकते , मग ती सांगते हास्याने स्वतःचे आणि सभोवताली असलेल्या साऱ्यांचे जीवन उजळून टाक ! वेदना काळजाला कापते तेंव्हा ती म्हणते जिथे सुख सर्वदा थांबत नाही तिथे दु:खाची काय बिशाद !
           धन्यवाद माझ्या न भेटलेल्या मैत्रिणी .....तुझ्यासाठी हे काव्यपुष्प !


एक मैत्रीण

एक मैत्रीण मला आंतरजालावर भेटलेली
तिथेच तिच्या सुजनत्वाची ओळख पटलेली

सुखदु:खात आजवर हरवलेली हयात
दु:खाचा भ्रम फक्त रुतलेला मनात
सुखाचे कवडसे दाखवून मला गेलेली
एक मैत्रीण ...

नैराश्य कवटाळले सोडून दिली उमेद
कालच्याच रस्त्यावर शोधत होते प्रमोद
अभिनव पथाचा ठाव देऊन गेलेली
एक मैत्रीण ....

अवहेलनेने विदीर्ण झाले जेंव्हा काळीज
दडलेली आहे तुझ्याही अंतरात वीज
स्व: साठी जगून बघ , सांगून मला गेलेली
एक मैत्रीण ...

जिथे असशील , तिथे चांदणी होऊन रहा
रुसलेल्या क्षणी जन्माचे मोल सांगत जा
दुवा , राहो तुझ्या जीवनात पुष्पे उमललेली
एक मैत्रीण ...
               संध्या §


      

Wednesday, 4 February 2015

तूच एक

तुझ्यासाठी असतील कैक
माझ्यासाठी तूच एक
तू खूप साहिलस मला
खिदळताना पाहिलस मला
तू सावरलस , कधी ऐकवलंस
माझ्यासोबत धडपडलास पण
आणि हातातला हात सोडलास
शेवटी दुरावलास सुद्धा ...
तुझ्यासाठी असतील रे कैक
माझ्यासाठी फक्त तूच तू एक
मी तिथेच कोसळले , पुरती संपले
तुझ्याचसाठी निशीदिन तरसले
उठून धावले , पुन्हा धडपडले
धूळ होऊन धुळीत मिसळले
वारा आला , अंगाला स्पर्शून गेला
डोळे उघडले समोर पहिले रे तुला
बेफाम झाले , पुन्हा धावू लागले
तुझ्यामागे ..
दम नाही रे लागला
एका जागी तू उभा राहिलास
अन हात पसरलेस माझ्याकडे
मी पुन्हा धावले जिवाच्या आकांताने
न्हाऊ घालणार होते प्रेमाच्या स्पर्शाने
मी हात लावला ,
तू मात्र तसाच हात पसरून उभा
मी तुझा चेहरा ओंजळीत धरला
तू माझ्याकडे बघत नव्हतास
नजर दुसरीकडेच लावून होतास
तिथे ती होती हात तुझ्याकडे पसरून
दोघे बिलगलात अस्तित्व माझे विसरून
मी मागे फिरले , रडत कुढत तुला दुषणे देत
एका जागी ठेचाळले
माती बाजू करून पहिले
तर ....
तिथे माझा निष्प्राण देह होता ...
पाहून खूप हसले , वेड्यासारखी
ऐकणारे कुणी नव्हते तरी
मोठ्याने ओरडून म्हटले ...
बघ बघ ..
तुझ्यासाठी असतील रे कैक
पण माझ्यासाठी न फक्त तूच आणि तूच एक ....

         -संध्या §.

Wednesday, 3 December 2014

मुंगसा मुंगसा ...

आज सकाळी थंडीने कुडकुडत होता तरी सत्योम जास्तच बोलत होता . बोलले तर तो थांबतच नाही आणि नाही बोलले तर मग शंकित होतो आणि सारखा विचारत राहतो .. ‘का ग मम्मी तू रागावलीस का ?’ म्हणून मग बोलावेच लागते . आज त्याला काय आठवले माहित नाही पण अचानक मुंगसाची आठवण झाली . तो अर्धवट वाक्य बोलत होता . मुंगसा ...काहीतरी असेच .
 त्यावरून माझे मन अचानक भूतकाळात भटकंती करू लागले . तसे आमचे सर्व भावंडाचे बालपण खूप आनंदात गेले . शेतकरी तरी सुसंकृत आणि आर्थिक दृष्ट्या सर्वसाधारण म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला जन्म ..तसे काही कमी नाही आणि अवांतर जास्त पण मिळत नव्हते . प्राथमिक गरजा तेव्हढ्या पूर्ण होत . आमचे आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ जेंव्हा वेगळे झाले तेंव्हा ते सर्व गाव सोडून रानात राहू लागले . रानही जवळच्या कर्जत बहिरोबावाडी रस्त्यावर .. म्हणून मग वाडीतून कर्जतला जाताना रोडच्या दोन्ही बाजूला त्यांनी घरे बांधली . वाडीचे अंतर एक ते दीड किमी आणि कर्जत पाच किमी . आम्ही सातवीपर्यंत वाडीच्या केंद्रशाळेत जात असू . तीन चार घरची मुले म्हणजे बराच मोठा ग्रुप तयार होई . कुणी लहान कुणी मोठे ...सगळ्यात मोठे जे कुणी असेल ते ग्रुप चे नेतृत्व करी . मग गप्पा गोष्टी करीत आम्ही सारे शाळेत जात असू . सकाळी साडेसात ते दुपारी बारा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी पाच ..असे चार वेळा दिवसातून हे दीड किमी अंतर आम्ही येत जात असू . शिस्त बाकी शिस्त असे . वाहतुकीचा रस्ता असूनही कधी कुणाला अपघात झालेला आठवत नाही . वाहतूक चालू असेल तर एका बाजूने सारे चालत . पण तरी या शिस्तीखाली आमचे बालपण दबलेले मला आठवत नाही . आम्ही तितक्या गमतीही करत असू ..म्हणून या इतके अंतर पार करून शाळेत जाण्याचा कुणाला कधी कंटाळा आला नाही .. ती आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी असायची . म्हणून आजही त्या गमती आठवल्या कि आपोआप ओठांवर हसू आल्याशिवाय राहत नाही ...
  आज ते सारे आठवायला कारण मुंगुस ! आम्ही शाळेत जात असू तेंव्हा साधारण रोज एखादे तरी मुंगुस दिसे . आणि मग ज्या कोणाला दिसे तो मुलगा मुलगी सर्वाना थांबावी आणि म्हणे ‘ मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पत .’ आणि आश्चर्य असे कि ते मुंगुस असे बोलल्यावर तोंड दाखवल्याशिवाय पुढे जात नसे ! याचे खूप आश्चर्य मला आजही वाटते . अनेक प्रश्न आजही पडतात . इतके घाईने पळणारे मुंगुस असे अचानक का थांबत असेल ? त्याला आम्ही इतक्या लहान आवाजात बोललो तरी कसे ऐकू जात असेल ? बर जरी योगायोग म्हणावा तर हा योगायोग साधारण रोजच का घडत असेल ? पण आम्ही इतकी भावंडे मोठी झालो कुणी हे कोडे उलगडले असेल असे मला तरी नाही वाटत ..
   मी सत्योमला सकाळी अंघोळ घालताना हि आठवण सांगितली .
“आम्ही लहानपणी शाळेत जात असू न तेंव्हा मुंगुस दिसले कि आम्ही म्हणायचो ‘मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पत ..’ आणि मग ते किती घाईत असले तरी तोंड दाखवल्याखेरीज पुढे जात नसे !”
“का ग मम्मी ते तोंड दाखवत असे ?”
“त्याला रामाची शप्पत घातली म्हणून .”
“मग म्हणून का दाखवी ?”
“तो रामाचा भक्त असेल .”
“मग सापाला जर शंकराची शप्पत घातली तर साप पण तोंड दाखवील का ?”
“....”
“आणि मग तुम्ही त्याला रामाची शप्पत घालून तुमचे काही काम का करून घेत नव्हते ?”
“......”
“जसे कि होमवर्क ...”
आता मात्र मला हसू आवरणे अशक्य होते ...

खरंच त्या वेळी आम्ही लहान होतो पण तेंव्हा कुणालाच कधी सुचले नाही हे मुंगुस इतके ऐकते तर आपण आपला होमवर्क याच्याकडून करून घ्यावा .....