या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday 19 November 2011

गोष्ट एका चिमण्याची !

        चिमणा आणि चिमणी ...त्यांची हि कहाणी ! प्रत्येक सजीव त्याच्या संवेदना घेऊन जन्माला येतो . त्याची सुख, दु:ख, वेदना ,हर्ष सर्वकाही त्याच्या बरोबर येते आणि त्याच्याबरोबर संपते . सर्वजन ,जे सजीव ते आपल्या भावना एकमेकांशी  वाटून घेतात फक्त त्या आपल्यासारख्या माणसाला कळत नाहीत ...कि बऱ्याचदा कळून घेत नाहीत ! पाठीत काठी घातली कि बैल कळवळत असेलच कि ...पण त्याच्या भावना आपण समजूनही दुर्लक्ष करतो, आणि त्याने पुढ जाव म्हणून मारताच राहतो ! तसच आपल्या उघड्या खिडकीतून येणाऱ्या चिमनीच ...दोन दाणे टिपायच्या आधीच तिला काही तरी भिरकावून मारलच समजा !
     बाळाच्या चाहुलीने दोन्ही जीव आनंदून गेले होते. ती अंडी उबवण्यात चिमणीचा पूर्ण दिवस जात होता. आणि तिची काळजी घेण्यात ,तिच्या चाऱ्याची सोय करण्यात त्या चीमण्याचा दिवस सरत होता .त्यांच्या उत्साहाला उधान आलं होतं .त्याचं जगणं आनंदाने व्यापून टाकले होते . त्या चिमणपाखराच्या येण्याच्या नुसत्या चाहुलीने तिच्या पंखामध्ये एक प्रेमाची उब भरून राहिली होती .ती आता आई होणार होती आणि तो बाप ! घरटे बांधताना त्यांनी चारही बाजूने जाड अशी आंब्याची फांदी राहील याची काळजी घेतली ,ते झाडही उंच असल्याने मुले वर येण्याचा प्रश्न नव्हता कारण माणसाचीच  जात आपल्याला संकट आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती !
''चिमणे , घरटे झाले मनासारखे ! आणखी काय लागेल ग पिलाला ?''
''चिमण्या ,तू एव्हडे कष्ट घेतोस ,इथ बसून जीव व्याकुळ होतो रे !''
''अग,चिऊ तुला पण माहित आहे तू किती खपलीस आतापर्यंत घरट्यासाठी ते ? आता पिलुसाठी तर चाललंय हे ! मग का बर खिन्न होतेस ? आता तर तुझ्या आनंदाने आपल् पिलुही आनंदी जन्मणार आहे ! त्याच्या सुखासाठी तर आपण खपतोय ना ?''
''हो रे ,पण ''
''आता पण नाही नि बिन नाही ,मी चाललोय काळजी घे अंड्याची ,तो कावळा भारी खोडकर आहे ''
''बर बाबा , ये लवकर मी आणि आपल् येणारं पिलू तुझी वाट पाहू ! ''लाजत चिमणी बोलली .
    भुर्रर्र चिमणा उडाला .आज थोडे पुढे जाऊन पाहू आणखी काय वेगळ मिळाले तर आणू पिलासाठी . किती काळजी करते हि चिऊ ? तिच्यासाठी आणि पिलासाठी कष्ट घेणे काय थकवा देणार आहे त्याने तर मला आणखी  उत्साह वाटतो ! हे कसं समजत नाही तिला ? तिची काय चूक ? ती तर किती प्रेम करते माझ्यावर ! मागे असंच माझे पंख जखमी होते त्या माणसाच्या पिलाने पकडल होत मग त्याच्या कचाट्यातून बळेच जीव वाचवत निसटलो ! किती कष्ट पडले तिला पण तिचा थकवा  कधीच दाखवला नाही तिने ,उलट मला बर वाटावं म्हणून ती सतत उत्साही असायची !सगळे दाणे पण असे पौष्टिक आणायची कि दहा दिवसात ती जखम भरून आली ! अरे खाली ते पांढर काय दिसतंय त्या झाडाच्या फांद्यांना ? चल बघतोच .तो एका मोठ्या झाडावर पानामागे बसला . बऱ्याच बायका आणि पुरुष तिथे कापूस वेचत होती .तो बसलेल्या झाडाखाली एक मोठा ढीग झाला होता ,त्यावर त्या माणसाची पिले लोळत होती त्याला वाटलं हा कापूस नक्कीच मऊ असणार! अंड्याच्या खाली टाकला तर ? काड्या तरी रुतणार नाहीत चिऊला आणि पिलूला ... खूप लांब आहे पण नेउयाच ! भुर्रर्र करत चिमणा कापूस जितका नेने शक्य आहे तितका तो नेऊ लागला . चिमणी खूप खुश झाली ती मऊ दुलई पाहून! तो अनेक चकरा मारून दमला मात्र त्याचा उत्साह कमी होत नव्हता . 
''बस झालं आता ! छान दुलई आहे ''चिऊ 
''नाही ग अजून थोडे आणतो म्हणजे मग काळजीच मिटली ''
''अरे पण आभाळ लाल झालं ,उजेड संपेल आता ''
''अग् माणस तो कापूस घेऊन जातील ,आलो लगेच ''
''अरे ........''
तीच न ऐकताच तो भूर्रर्र उडाला !
तिथे सगळा कापूस पोत्यात भरून झाला होता .शेवटच पोत भरणे चालू होते ,प्रत्येकाला घाई होती घरी जाण्याची म्हणून एक एक पाटी कापसाची घाईने आत पडत होती . चीमण्याने भुर्र जाऊन आतला एक धागा उचलून उडायला आणि कापसाची भरलेली पाटी पडायला एकच वेळ ! त्यातून बाहेर येण्याचा असफल प्रयत्न .... वरून परत एक पाटी ....घुसमट .......मृत्यू .....चीउचे वाट पाहणे ...उपास ...विरह ...मृत्यू ....अंडी भेगाळलेली...पिलांचे येणे ...आई बापाशिवाय एकाकी जगणे ............

No comments: