या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 20 July 2011

कळकटलेलं आयुष्य

        ''मीरा, ऐ मीरा चल ना आता, कीती वेळ लावतेस?'' रोहीणी नाराजीत मीराला बोलवू लागली. तीच्या उत्तराची वाट न पाहता मीराचा टिफिन उचलून ती कॅन्टीनकडे  चालू लागली. मीराने पटकन टेबल आवरलं धावत रोहीणीला   गाठलं, नेहमीच्या कोपऱ्यातल्या टेबलावर दोघीही जाऊन बसल्या. तशी त्यांची ओळख या ऑफिसमध्ये कामाला लागल्यापासून, साधारण दोन वर्ष झाली. दोघींच्या स्वभावात टोकाची तफावत पण मैत्री.. खूप घट्ट! दोघी गावाकडून आलेल्या, मीरा तिच्या मामाकडे राहत होती तर रोहीणी होस्टेलमध्ये! दोघी आई वडिलांपासून दूर, एकटेपणा जाणवायचा पण त्या एकमेकींचा भक्कम आधार होत्या.
      दहा मिनिट झाली तरी रोहीणी एक शब्दही बोलत नव्हती. जेवणही मनापासून करत नव्हती, कुठेतरी हरवलेली. शेवटी शांततेचा भंग करत मीरा म्हणाली,''कुठे हरवलीस? झालं काय ते तर सांगशील? माझं काही चुकलं का?''
        ''नाही, नाही,'' भानावर येत रोहीणी पुटपुटली.
        काहीतरी बिघडलय हे मीराने हेरलं होतं.. तिला बोलतं करणं गरजेचं होतं, नाहीतर ही बया परत झोपेच्या गोळ्या चालू करील. आता कुठेतरी गाडी रुळावर आली होती, तर परत हीच गप्प बसणं चालू झालं मीरा मनाशीच विचार करत होती.
        ''रोहीणी, मला नाही सांगणार''
        ''मीरा, तसं नाही गं पण मला कंटाळा आलाय आता वाटतं बस झालं हे रहाटगाडगं''
         ''अग, पण असं म्हणून कसं चालेल''
         ''मग, काय करू तूच सांग, थोडा तरी बदल नको का गं?''
        ''हो, मान्य आहे पण एवढी चांगली नोकरी सोडून चालेल का? नोकऱ्या काय रस्त्यावर मिळतात का?''
        ''नाही गं''
        ''पटतय ना, मग असं का वागतेस?''
        ''तुला नाही कळणार, तु काय घरी गेलीस कि मामाची मुलं आहेत, मामा मामी आहेत, दिवसभरचा कामाचा ताण घराच्या वातावरणात विरघळून जात असेल.''
         ''असं तुला वाटतं, मी रोज येताना माझा डबा तर करतेच पण मामाचा मामाच्या मुलीचा पण करते आणि घराचा स्वयपाक पण आवरून येते, एक दिवस जमलं नाही तर मामी चार दिवस बोलत नाही, बोल आता! आणि हो घरी गेल्यावर मुलांच्या अभ्यासासाठी टीवी बंद, कपड्यांना इस्त्री करणं आणि अशी बरीच काम, कधी झोपेची वेळ होते कळतसुद्धा नाही, परत सकाळी उठण्याची धास्ती! माझा दिवस कुठे सुरु होतो नि कसा संपतो? या राहटगाडग्याचा विचार करायला वेळच कुठे आहे?''
         ''तुला वेळ नाही पण मला आहे ना?''
         ''वेळ घालवण्यासाठी या शहरात कमी का गोष्टी आहेत?''
         ''हो,पण मला ह्या वेळ घालवू गोष्टी नको आहेत. ज्याने मनाला सुख समाधान मिळेल असं काहीतरी....''
         ''ती गोष्ट तुझ्याजवळ येऊन तुला सांगणार आहे का? माझ्यात तुझं सुख आहे म्हणून, तूच ते शोधायला नको का? तू जर भोवताली डोळे उघडे ठेऊन पाहिलस तर प्रत्येक गोष्टीत तुला आनंदच गवसेल त्यासाठी तुला तुझ्या डोळ्यावर आलेला आळसाचा पडदा काढावा लागेल!''
          ''झालं तुझं तत्वज्ञान चालू''
         ''रोहीणी, ए रोहीणी, एक ऐक ना,तू चिडू नकोस पण तूच विचार कर जे विचार तुला दु:खाच्या दरीत लोटताहेत ते सोडून दे ना! प्रत्येक क्षण जगायला शीक! जेव्हा तुझ्या मनातलं हे निराश विचारांचं मायाजाल तू धुडकावशील तेव्हा तुला भोवतालच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक कामात एक प्रेरणा लाभेल जी तुझं आयुष्य नक्कीच सुखमय करेल, आनंदी करेल! तेव्हा तुला,
                                 पावसाच्या प्रत्येक थेंबात,माणसाच्या प्रत्येक शब्दात 
                                 गर्दीतल्या प्रत्येक मुलात,बागेतल्या प्रत्येक फुलात 
                                 तुझ्या प्रत्येक कामात,आणि मेसच्या रोजच्या डब्यात...
                                 तुझ्या मनाचा आनंद गवसेल!
उत्साही राहिल कि सगळ जग आपलं वाटू लागतं, झोपेनं शरीराचा थकवा जाईल पण मनाचं काय? मनाचा थकवा घालंवत ते फक्त मनापासून केलेलं काम! आणि जो माणूस काम करतो तोच सर्वांना प्रिय असतो!तू गोड बोललीस तर बाकीचे तुला समजून घेतील, तुझ्याशी चांगलं वागतील, पण प्रत्येकवेळी तुझं रागावणं तुला माणसांपासून दूर घेऊन जाईल! तू जसं सर्वाना देशील तेच सर्वजन तुला देतील. मग तुला उशिरा येणाऱ्या बसचा राग येणार नाही नि रागवनाऱ्या बॉसचाही नाही.आपल्यातला उत्साह आनंद दुसऱ्यालाही उत्साही आनंदी बनवतो, या विचारांनी आपलं आयुष्य नक्कीच जगण्याजोग वाटेल. तुला आठवत असेल न्युटनने सांगितलेले नियम फक्त वस्तूनाच लागू होतात असं नाही माणसांही होतात. कुठला सांग बर?''
           ''actions & reactions are equal & apposits''
           '' कळतंय ना मग वर्तनात कधी आणणार ?''
           ''चल अगदी आत्तापासून'' 
      सुट्टी संपायला पाचच मिनिट होते.बोलण्याच्या नादात त्या जेवणही विसरल्या,घाईने जेवून त्यांनी धावत ऑफिस गाठलं. आपापलं टेबल पकडलं आणि कामाला लागल्या. रोहिणीचा उत्साह सर्वांच लक्ष्य वेधून घेत होता. भरून आलेलं आभाळ पाऊस पडून गेल्यावर जसं निरभ्र दिसत तसं तेज आज रोहिणीचा चेहरा उजाळत होतं!जेवणानंतर काम करताना रोज डुकल्या खाणारी रोहीणी प्रत्येक काम आज प्रसन्न मनाने उरकत होती.आज वेळेवर काम उरकलं, सुट्टी झाली. आज बस चुकणार नव्हती. मीराचे शब्द आठवत ती बस थांब्यावर आली. रोजचा कंटाळवाणा बस थांबा आज नकोसा वाटत नव्हता. ''का बर?'' रोहीणी मनालाच म्हणाली मैत्रिणीचे प्रेमाचे दोन शब्दही दु:खाच्या दरीतून बाहेर काढायला पुरेशे असतात नाही का?
     जवळच एक कळकटलेल्या कपड्यांचा माणूस, नाही भिकारीच तो! पण त्याच्या हातात भांड नव्हत कि काखेला मळलेल्या कपड्यांची पिशवी नव्हती. कदाचित तो वेडा असावा. साधारण चाळीसच्या घरातील तो वेडा, का बर वेडा झाला असावा? मनाशीच रोहिणीने प्रश्न केला पण उत्तर मिळणार होतं का? सुरवातीला त्याला पाहून तिला कससच झालं पण नंतर त्याच्या हालचाली ती न्याहाळू लागली. तो स्वताशीच काहीतरी बोलत होता. भाषा परिचयाची नव्हती, तिला काही समजल नाही.
      त्याने भोवतालचा सर्व कचरा हाताने गोळा केला आणि जवळच्या कचराकुंडीत टाकला.त्याची साफसफाई रोहीणी भान हरखून बघत  होती तिला बस गेलेली कळलीच नाही. सर्व जागा स्वच्छ झाल्यावर वेड्याने तिच्यापुढे हात पसरला, पोटाकडे हात दाखवत भूख लागल्याची खुण केली. तिने दहा रुपये त्याच्या हातावर टेकवले पण त्याने ते परत केले. तिने जवळच्या गाडीवरून केळी घेऊन वेड्याला दिली, मग स्वारीने ती आनंदाने घेतली, अधाश्यासारखी खाल्ली, पुढे चालू लागला.
      आत्ता कुठे बाई भानावर आल्या, बस गेल्याची जाणीव झाली पण खंत नव्हती. आज तिला जीवन समृद्ध करण्याची एक सोपी पायवाट सापडली होती. तीच मन समाधानाने ओसंडत होतं! डोळ्यासमोरून वेडा हलत नव्हता! जर एक भान नसलेला एक माणूस जग सुंदर करण्याच्या मागे लागला आहे तर आजचे आपण तरुण बुद्धी आणि शरीर शाबूत असताना आपलं जीवन आनंदमय करू शकत  नाही? का बर? करू शकतो! नक्की करू शकतो! गरज आहे ती फक्त मनावरच निराशेच मळभ हटवण्याची! मीराचेच शब्द तिच्या मनात प्रतिध्वनित होत होते.....आज एका कळकटलेल्या आयुष्याने तिला तीच आयुष्य सुखी करण्याची नवी उमेद दिली होती.......