या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 10 October 2012

नाते तुझे अन माझे

नाते तुझे अन माझे
हृदयातून अंकुरले
प्रेमाच्या सहवासाने
उमलून फुल झाले

सावलीच्या आवडीने
चिमण्या विसावला तू
शीतल मम सावलीने
 पाखरा हरखला तू

माझिया छायेचा पिला
तुज असा मोह झाला
सुगंधी मज फुलांची
ओढ तुझ्या अंतरीला

चिमण्याच्या बाळलीला
बघण्यात दंग झालो
निरागस या हास्याला
पाहण्यात गुंग झालो

क्षणांमध्ये मधुर त्या
बेधुंद असा जगलो
सह्जीच वार्धक्या त्या
विसरून बघ गेलो

अंत समयास परी
काळ नाही विसरला
गेली पर्ण पुष्पे सारी
मम देह शुष्क झाला

तू व्याकुळल्या पाखरा
घिरट्या नकोस घालू
लाभणार नाही आता
सुखाचा हिरवा शालू !!!

       दोन प्रसंग मला या कवितेची प्रेरणा देवून गेले , हे प्रसंगही बऱ्याच अंतराने घडले जवळजवळ दोन तीन महिन्याच्या पण असे मनात गुंतून राहिले कि दुसरा घडला आणि कविता पूर्ण करून गेला . एकदा अशीच संध्याकाळी मागच्या गच्चीत बसले होते . थोड्या अंतरावर एक निष्पर्ण झाड होते . मावळता दिवस पाहत बसलेली , दिवस मावळून गेलेला आणि अंधार होत होता . शक्यतो या वेळी पक्षी नसतात आभाळात फिरणारे म्हणजे नव्हतेच . पण एक पाखरू त्या निष्पर्ण झाडावर घिरट्या घालत होते . म्हणजे जायचे , परत यायचे असे अनेकदा म्हणजे लक्षात येण्यासारखे जवळजवळ वीस पंचवीस वेळा तरी असेल .
       या नंतर मी थोडे कडवे मनात तयार केलेले त्याच वेळी आणि घरात येवून पुन्हा एका वहीवर उतरून काढले . तीनेक महिने झाले या गोष्टीला , ओपीडीत पेशंट पाहत होते . एक बाबा आले ८० वय असेल आत आले एकटेच होते . त्यांना टेबलवर चढून झोपणे अशक्य होते मदतीशिवाय . सिस्टर आणि मी मदत करून वर चढवले आणि तपासून त्यांना औषध द्यायचे होते पण त्यांना ब्लड प्रेशर साठी एक गोळी चालू ठेवणे गरजेचे होते हे त्यांच्या ध्यानात नाही राहायचे म्हणून मी सिस्टरला सांगितले त्यांचे कुणी बसले असेल तर बोलाव त्यांना सांगते , तर बाबा रडायला लागले . " बाई , काय सांगू तुला आता पर्यंत तीन चार वेळा मी आलो तर कुणीच नसते सोबत , मुलांना गरज नाही म्हाताऱ्याची नातवंडे येतात अरे बाबा चल चल करून तर दारात सोडून निघून जातात . एक मुलगी आहे तुझ्यासारखी देते येत जाता पैसे त्यावर चालतो दवापानी . माझ्या नावावर भरपूर जमीन आहे , उस जातो पोरांच्या नावे पैसे पण त्यांच्या खात्यावर , जमीन दुसऱ्या कुणाला कष्टायला दिली तर किती पण पैसे येतील पण कुठे म्हातारपणी असं भांडत बसू , आणि हसू करून घेऊ भावकीत . बर आहे झाकली मुठ सव्वा लाखाची , कधीतरी जायचे असेच !" ते घिरट्या घालणारे पाखरू चमकून गेले मनात आणि ती वही काढून मी पूर्ण केली कविता !
       प्राण्यांना पण केलेल्या उपकाराची जाण असतें माणसाला ती कधी येईल ?

Monday 8 October 2012

का कुणास ठाऊक ?

    अनिमिष नेत्रांनी तो खळाळता समुद्र न्याहाळत होती स्मृती ! उनाड वारा सागराच्या पोटात हळुवार गुदगुल्या करत होता आणि तो रत्नाकरही लहान मुल होवून खळखळून हसत होता , भोवती कुणी पाहते आहे याचे भानच जणू नव्हते त्याला ! जसा तो हसे पवनराजा आणखी चेकाळत होता , त्या दोघांची मस्ती मात्र संपत नव्हती , ती प्रत्येक लाटेत उमटत होती आणि ती चहाडखोर लाट ते येवून किनाऱ्याला सांगत होती ..स्मृती मात्र त्या लाटेला समजावत होती ..' अगं लहान मोठ्या कुणीही आनंद असाच उपभोगायचा असतो निर्मल मनाने !प्रत्येक जीवाला ती जणू ओढच असते बघ ..निखळ हास्याची ! कुणी या निर्मल हसण्याला मनाच्या अश्या एका अडगळीच्या कप्प्यात फेकून देते तर कुणी नयनात साठवून ठेवते ! आणि जीवनातील प्रत्येक क्षणात मुखकमलावर सांडून देते !' ती लाटही मग समाधानाने तिच्या पायाखालची रेत घेवून पुन्हा सागरात परतली !
     स्मृती जणू आईची झेरॉक्स कॉपीच होती , पण तिच्या अंतरंगातील कोमल निर्मल विचार हि ती स्मृतीच्या हृदयात पेरून ती कधीच स्मृतीला पोरकी करून गेली होती , स्मृतीचे बालपण भर दुपारच्या त्या रुक्ष आणि रखरखीत रस्त्याप्रमाणे करून ! खूप मोजकी प्रेमाची आपुलकीची नाती तिच्या आयुष्यात होती , दुपारी असणाऱ्या विरळ वाहतुकीसारखी ...दुपारी तळपणारा सूर्य जसे फोड उठवतो त्या काळ्या डांबरीवर तशी रोज नव्यानेw येणारी दु:ख्खे तिच्या मनावर वेदनांनचे फोड उठवत होती ..तिच्या मनाला रोज अधिक कठोर बनवत होती ! एखादे वाहन थांबावे तसे लोक तिच्या आयुष्यात येत होते पण काही स्वार्थ ठेवूनच , बिघडलेली गाडी ग्रीस आणि घाण ठेवून जाते तशी ती माणसे तिला वेदना ठेवून निघून जायची ...तिच्या भावनांना अधिक कठोर करत आणि तिचे हसणे हिरावून घेत ...या रखरखीत आयुष्यात आईचे शब्द तिला श्रावणसरी होवून भिजवत , मग वेदनाही ती हसत रिचवत जात होती , पुढे पुढे चालत होती ! सरींचा तो थंड स्पर्श तिला आठवण  द्यायचा तिच्या आईच्या मायाळू मनाने तिच्यावर शिंपलेल्या शब्दांचा , ते शब्द ती उराशी कवटाळून होती , कुठल्याही क्षणी ती ते विसरत नसायची . आईने सांगितलेले , 'बेटा खूप शिक ..शिक्षणाने सर्व मिळेल तुला ,आदर ,धन , समाधान , ज्ञान आणि प्रेमही .' याच एका आश्वासनावर ती कष्ट करत होती . मात्र कष्टाचे उठणारे व्रण तिला कठोर बनवत होते .. कठोर शब्द ..कठोर चेहरा .. कठोर शिस्त ...
       कष्टाचा मार्ग कितीही काटेरी असला तरी, तो कधी अश्या विजयी वळणावर येवून स्थिरावतो ,तिथे घामाचे  मोती होतात ! जसे उष्णतेने पाण्यापासून ढगांचा पुंजका होतो आणि थंडीने बर्फ ...दोन्ही शुभ्र ..प्रत्येक नजर कौतुकाने त्यावर स्थिरावते, त्या जीवाला झालेल्या कष्टांचा विसर पाडते ...आणि ते मन अतिआनंदाने समाधानाने फुलत जाते ! काही क्षणांसाठी ! परत घाम ..मेघाचे पाणी ...बर्फाचे पण पाणी ...कष्टाच्या मार्गावर विसावलेला जीव पुन्हा ते सुखाचे वळण सोडून पुढे चालू लागतो ..किती क्षणभर सुख ! स्मृतीने तेही अनुभवले जेंव्हा ती दहावीत पहिली आली ..बारावीत आली ...आणि कला शाखेच्या पदवीत तर पूर्ण विद्यापीठात पहिली आली ! तिच्या कष्टाचे भरभरून फळ वरचा तिला देत होता मात्र एकटेपणाचा शाप तिचे आयुष्य व्यापून उरला होता !
       आता काकाची आणि मामाची मुले मोठी झाली होती ..त्यांच्या दृष्टीने ती आपले पडेल ते काम करणारी ताई होती फक्त ! मामाकडे बिनसले कि काकाकडे आणि काकू काही बोलली कि मामी , हि तिची ससेहोलपट मात्र थांबत नव्हती निलगिरीच्या ताडमाड झाडाप्रमाणे जास्त वारा आला कि जमिनीला टेकायला यायची, आता मोडते कि काय असा भास व्हायचा ..आणि वादळ शमले कि पुन्हा पहिल्यासारखी ताठ उभी राहायची !
         तिच्या वाढत जाणाऱ्या वयाबरोबर वाढत जाणारे रूप तिला शाप भासावे असे प्रसंग तिच्या आयुष्यात उभे राहत गेले . उमलणाऱ्या हजारी मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे असणाऱ्या तिच्या प्रेमभरल्या भावना तिने कधी दिसू मात्र दिल्या नाही , वरचे रूप तिला इतके क्लेशदायक होते तर तिच्या सुगंधित मनाचा दरवळ पसरला तर तिला खुड्णारे अनेक हात जन्माला येतील हि भीती तिच्या जीवाचा थरकाप करत होती . सागरातील लाटांप्रमाणे उसळणाऱ्या प्रेमभावनांना तिने इतके कोंडून टाकले कि एखाद्या डबक्यासारखे स्वरूप त्याला आले . एखाद्या व्यक्तीने सुंदर पुष्प समजून जवळ जाण्याचा प्रयत्न करावा आणि गुलाबाच्या फुलाला हात घालायच्या आधी काटेच टोचावे अशी अवस्था व्हायची तिच्या जवळ जाणाऱ्या तरुणाची . तिच्या शब्दांनी घायाळ झालेला तो युवक परत त्या रस्त्याला कधी जायचा नाही ! तिच्या या स्वभावाला शाळेतले सर्वजन ओळखून होते म्हणून कामाशिवाय तिच्याशी बोलणे सर्वजण टाळायचे . काकूला मात्र वाटायचे कसे होईल या पोरीचे ? लग्न होईल कि नाही ? कोण हिला जवळ करणार ? स्मृती मात्र ओळखून होती हे वांझोटे प्रेम ! कारण कितीही वेळा ती बोलली तरी किती  प्रेम आणि तळमळ या बोलण्यात आहे याचे मोजमाप इतक्या दिवसाच्या सहवासात स्मृतीने केले होते ! पण विनातक्रार ती या लोकांबरोबर आयुष्य काढत होती ...
         एकदम डोंगळे निघावेत आणि थोड्या वेळाने आले तसे गुडूप व्हावे तसे सकाळी मोकळे असलेले शाळेचे पटांगण क्षणात भरून जायचे आणि बेल झाली कि पुन्हा मोकळे व्हायचे , अश्या अनेक विचित्र कल्पना स्मृतीच्या मनात येवून जायच्या आणि मनाशीच ती हसायची मात्र चेहऱ्यावर उमटू देत नव्हती . डोंगळयाप्रमाणे अस्ताव्यस्त आयुष्य असलेली ती अकरावी बारावीची मुले मुली स्मृतीला भासायची , न गेलेल्या जीवनाचे दु:ख न येणाऱ्या आयुष्याची चिंता ! आलेला दिवस इतर मुलांबरोबर काहीतरी कीडमिड करण्यात संपवीत होती . या घोळक्यात अर्पितासारखी काही होती ज्यांना काही शिकण्याचा ध्यास होता आणि त्यासाठी ती धडपडत होती ...पण क्वचित ... कानाच्या भिंती फाडत जाईल अशी कर्णकर्कश्य बेल वाजली कि सारे डोंगळे एकामागे एक त्या दोन मजली  शाळेच्या इमारतीत लुप्त होवून जायचे . मग फक्त हळू आवाज कानात घुमत राहायचे ..एकमेकात गुंतलेली गुंतवळ जणू ..ते आवाज ओळखण्याचा प्रयत्न हि करायची स्मृती पण त्या आवाजाचे शब्द काही तिला उमगायचे नाही . नंतर हा शब्द ओळखण्याच्या खेळ बोर होई तिला .
    जे ते शिक्षक वर्गावर गेले कि हे सगळे आवाज शांत होवून जायचे . स्मृतीलाही पहिला तास ठरलेला होता ..सोम मंगळ बुध आकराविवर आणि उरलेले दिवस बारावी . स्मृती ला खूप आवडायचे शिकवायला , मराठी भाषेचे भांडार विध्यार्थ्यांपुडे खुले करताना एका अनामिक प्रेरणेने ती भारलेली असायची . मुलेही भारल्यासारखी तिचे शब्द कानात साठवायची . प्रत्येक कविता वा पाठ वा व्याकरणहि नाविण्याने शिकवणे ,त्याच्या मुळाशी जाणे आणि उमजेल अश्या भाषेत शिकवणे सर्व मुलांना आवडायचे . ती मुलांची आवडती स्मृती म्याडम  होती पण फक्त वर्गाच्या आत बाहेर गेली कि परत ती दगड बनून जायची . वर्गाच्या नंतर कुणी शंका विचारायला आले कि असे फटकारायची कि परत त्या मुलाची हिम्मत नाही व्हायची असा आगावूपणा करण्याची !
      त्या दिवशी तिचे पेपर चेकिंग चे काम जास्त वेळ चाललेलं , उद्याच लगेच पेपर द्यायचे होते . असेही घरी गेल्यावर तिला ते जमणार नव्हते , स्टाफरूम मध्ये बसून बराच वेळ तिचे हे काम चाललेले , वेळेचे भानच नाही आले तिला . जेंव्हा सर्व स्टाफरूम शांत झाली तेंव्हा उरलेले काम घरी घेवून जाण्याशिवाय पर्याय नव्हता . तिने तसाच उरलेला गठ्ठा पर्स मध्ये भरला पण छत्री हाती नाही लागली तिला म्हणजे नेहाने घेतली . या पोरीला कळत कसे नाही माझी अडचण होईल , कमीत कमी सांगण्याचे तर सौजन्य हवे . काही बोलले तर काकू आकाश पाताळ एक करते , आता काय करू ? बाहेर आभाळ गच्च झालेलं आता कोसळेल या बेतात ! क्षणभर विचारात गुंतली पण संकटे तिच्या मार्गात कधी अडथळा झाली नव्हती हे तर किती शुल्लक ! लगेच तिने भिजतील अश्या वस्तू प्लास्टिक पिशवीत भरल्या आणि पर्स मध्ये टाकल्या आणि एक समाधान तिच्या चेहऱ्यावर उमटले , अगदी क्षणभर , आकाशातल्या विजेसारखे ! कुणी पाहत तर नाही न हे विचार पुन्हा तिला स्तब्ध करून गेले . काहीतरी चोरल्यासारखे तिचे मन अपराधी बनून राहिले ! आनंद चोरल्याचा अपराध ! ती आजूबाजूला पाहत बस स्टोप कडे चालू लागली . झोपेत शांत पहुडलेलं बाळ उठून इतके उद्योग करते याचे आश्चर्य एका आईला वाटावे तसे शाळेत शांत असणारी मुले हुंदाडताना बाहेर पहिली कि स्मृतीला तसेच वाटे , मग ती मनाशीच हसायची , पण पुसटशी लकेर तिच्या गोऱ्यापान नितळ चेहऱ्यावर दिसायची नाही . स्वताच्या भावना आताच ठेवायची कला मात्र ती आई गेल्यापासुनच शिकली होती . जणू त्या कोवळ्या वयात पुढच्या जीवनाची चित्रे तिनी तेंव्हाच पहिली होती !
      आज पाऊस चालू हता रिमझिम आणि बसही नव्हती येत , ती वाट पाहून कंटाळून गेली . ते मधेच ठिबकणारे स्टोप चे छत ,ते गंजलेल्या पत्र्याचे पडणारे तपकिरी पाणी तिच्या ड्रेसवर डाग पडत आहेत हे लक्षात येताच ती बाहेर येवून उभी राहिली . आता मात्र गार वारा पण तिला छेडू लागला , ती थरथरत तशीच उभी होती . एक सफेद गाडी तिच्याजवळ सावकाश येवून थांबली .
" म्याडम , म्याडम या न प्लीज ." अर्पिता होती ती !
" नको गं येईल बस आता , thanks !" तिलाही माहित होते बस उशिरा आहे पण असे सहजी कुणाचे उपकार कसे घ्यायचे , परतफेड करावी लागतेच न कधीतरी . पण आता अर्पिता खुपच आग्रह करत राहिली , त्यांच्या या संभाषणात ड्रायव्हिंग सीट वर बसलेल्या युवकाने सहभाग घेतला
" चला न सोडतो खरेच ." तो सभ्यपणे म्हणाला .
म्हणजे नक्कीच तो ड्रायव्हर नव्हता , ओझरत्या नजरेने तिने त्याला न्याहाळले . उंच ,थोडा सावळाच ...जरा जास्तच सावळा ...तसा थोडा काळा , पण रुबाबदार आणि देखणा दिसत होता .
" म्याडम हा माझा शरददादा , अरे दादा या माझ्या स्मृती म्याडम , मराठी खूप छान शिकवतात "
"अग् बास , नंतर सांग , आधी त्यांना आत तर येऊ देत , बघ पाऊस पडतोय वरून "
मग मात्र दोघा बहिण भावाचे बोलणे तिला मोडवले नाही , तसेही त्यांना तिच्या घरावरून पुढे जायचे होते . ती मागच्या सीटवर बसली , अर्पिता खूप खुश होती , तिच्या सर्वात आवडत्या म्याडमला ती मदत करत होती आणि त्याहीपेक्षा महत्वाचे त्यांनी ती मदत स्वीकारली होती ! त्यात भर म्हणजे तिच्या आवडत्या कृष्णकमळाला आज फुल येणार होते , टपोरी झालेली कळी पण तिने पाहिलेली सकाळी . कधी कधी सगळ्याच गोष्टी कश्या बरे एकत्र येवून आनंद द्विगुणीत करत असतील ! आले तर सुखाचे एकापाठोपाठ एक क्षण येत राहतात , फुलराणीच्या डब्यासारखे ! तिचा निरागस हर्ष स्मृती न्याहळत होती ,
                                  लहानपण देगा देवा
                                  मुंगी साखरेचा रवा
                                  ऐरावत रत्न थोर
                                  त्याशी अंकुशाचा मार
     मघाशी अंगाला झोंबणारा पाऊस आता काचेतून कसा आल्हाददायक भासत होता , मनात अनेक कवितांचे पेव तयार करत होता , तशी तिला आवड होती यमक जुळवायची पण पूर्ण कविता करण्याच्या भानगडीत ती पडली नाही कधी . तिला अर्पिता काही विचारात होती ती उत्तरे पण देत होती , पण मनातले विचार मात्र संपत नव्हते ... जणू दोन जीवने ती जगत होती त्या क्षणी ..
आता मात्र अर्पिताचा शरददादा तिच्यावर रागवला ," किती प्रश्न विचारतेस , शाळेत उत्तरे देवून आधीच कंटाळल्या असतील त्या आणि तू तोच पाठ बाहेर पण चालू ठेव "
स्मृतीच्या मनातही हेच होते पण उपकाराखाली दबलेली ती बोलू शकत नव्हती आणि त्या अल्लड मुलीला दुखवावे असे पण तिला अजिबात वाटत नव्हते , आवडत्या व्यक्तीचा त्रासही हवासा का वाटतो माणसाला !
" असू देत लहान आहे अजून ती ." स्मृतीने तिचे समर्थन केले , " आम्हाला पण सवय असतेच कि शाळेचे पेपर घरी नेवून तपासायची " या तिच्या बोलण्यावर शरद खळखळून हसला , अगदी त्याच्या निरागस बहिणीला शोभेल असे ! खरंच त्या दोघा बहिण भावात तिला एक गोष्ट सारखी जाणवली , ते त्यांचे निरागस चेहरे जणू एक छानस  गिफ्ट दिले होते देवाने त्यांना जन्माला घालताना ! पण तो हसला का माझ्या बोलण्यावर ? असे काय होते हसण्यासारखे ? चौकातून गाडी वळली आणि तिला जाणीव झाली घर जवळ आल्याची मग तिने शेजारी पडलेली पर्स उगीच नीट करत मांडीवर घेतली आणि ओढणी सावरत राहिली . घर आल्याची खुण तिने अर्पिताला केली .
 " दादा गाडी थांबव न , त्यांना उतरायचे आहे " अर्पिता .
" हो थांबतो हं " गाडी रस्त्याच्या बाजूला घेत तो बोलला . ती उतरली .
" आभारी आहे " तिने आभार मानले पण घरी या म्हणने कटाक्षाने टाळले . तिलाही माहित होते , त्यांना घरी नेले तर साधारण शंभरेक प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागणार होती . अशी एक न अनेक बहाणे होत राहिले आणि अर्पिताची जवळजवळ आठ दहा वेळा तिने लिफ्ट घेतली .
      मावळणाऱ्या सूर्याचे केशरी किरण स्टोप जवळच्या झाडांच्या फांद्यातून झिरपत होते , ते अंगावर घेत अशीच ती बसची वाट पाहत थांबलेली . का कुणास ठावूक पण मनात शरदचे विचार झिम्मा खेळत होते आणि एक थंड वाऱ्याची लहर अंगावरून गेल्यासारखे सुखावत पण होते . किती छान आहेत शरद , आई वडील नाहीत तरी ते दोघांची जागा घेवून ते अर्पिताला सांभाळत आहेत . नोकरी तर होतीच पण घरहि एखाद्या चपखल गृहिणीसारखे सांभाळत आहेत . त्यांच्या या धावपळीत त्यांनी स्वताचे भावनिक रूपही तसेच जोपासले आहे . त्यांचे वाचन तर किती आहे , मराठी इंग्रजी सर्व ते वाचतात , म्हणूनच तर ती त्यांच्याशी बोलती झाली . त्यांच्या त्या ज्ञानाने तर ती किती प्रभावित झाली , कुणाला वाटणार पण नाही कि इंजिनिअर आहेत तरी इतके मराठी जाणतात . ती त्याच्याच विचारात गुंतलेली होती आणि सावकाश येवून शरदची गाडी तिच्याजवळ येवून थांबली . पण पुढे अर्पिता नव्हती ! मग मात्र ती थोडी मागे सरकली .
" या ना " पुढचे दार उघडत शरद सभ्यपणे म्हणाला .
" नको , येईल हो बस आता " स्मृतीला त्याच्या एकट्याबरोबर जाणे जरा अवघडल्यासारखे वाटले आणि ते भाव तिच्या नकळत चेहऱ्यावर उमटलेही , आज तिच्या मनाने बुद्धीवर ताबा मिळवला होता ! का कुणास ठावूक ? ती त्याचा आग्रह मोडू शकली नाही आणि आज ती अर्पिताच्या जागी पुढे बसली , त्यांच्या शेजारी ! स्मृतीचे बावरलेपण ती लपवू शकत नव्हती. पण आज तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग तो आरश्यात पाहू शकत नव्हता कारण आज ती शेजारी होती त्याच्या ! चिखलात मनसोक्त नाचून झाल्यावर जसे पाय दुखरे बनतात तसे तिचे पाय उगीच दुखरे बनले होते , पायांना गोळे वर सरकत होते का कुणास ठावूक ? बाहेरच्या गाड्यांचे आवाज कानावर आदळत होते , गाडीत मात्र पूर्ण शांतता...
" तुम्हाला भीती वाटली का आज ? कि या एकट्या पुरुषाबरोबर कसे जावे " शांतता भंग करत शरद बोलला , मघाशी त्याने तिच्या मुखकमलावर लज्जेचे भाव टिपले होते ..
" नाही तसे काही नाही " ती भानावर येत बोलली .
" तुम्हाला खोटे बोलता येत नाही " शरद हसत म्हटला .
" नाही मी खोटे कुठे बोलले ?" थोडी लाजत ती बोलली . सर्वांसमोर वाघीण असणारी स्मृती आज गाय कशी झाली होती ! प्रश्नाचे उत्तर ती दुसऱ्या मनात शोधात होती ...
" मग रोज मी जो निर्विकार चेहरा मी आरश्यात न्याहाळायचो ,त्या मुखकमलावर आज लज्जेचे भाव का उमटले मी बसा म्हटल्यावर ?" आरष्याकडे इशारा करत तो बोलला .
आता मात्र स्मृतीचे हळदीच्या रंगाचे गाल गुलाबाच्या पाकळ्या कुस्करल्या सारखे गुलाबी बनले , का कुणास ठावूक ?
ती उगीच पायाची बोटे एकमेकांवर घासत राहिली त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता , आणि तोही मनाशी हसला कारण त्यालाही हेच अपेक्षित होते . एखादी नवयुवती तिचे गुपित उघड झाल्यावर भांबावून जाते तशी स्मृतीची अवस्था तो तिरप्या नजरेने न्याहळत होता, दोनच मिनिटात चौक येणार आणि गाडी वळणार होती , त्यांचा तो सुगंधित , उल्हासित सहवास संपणार होता ..
" उद्या रविवार आहे , तुम्हाला पण सुट्टी आहे आणि मला पण . मला तुमच्याशी काही बोलायचे आहे , इथल्या जवळच्या बीच वर याल का ?"
ती गप्प होती . तोच पुढे आजिजीने बोलला ," प्लीज या ना , काही गोष्टी वेळेत नाही झाल्या तर उगाच आयुष्य भरकटत जाते , आणि असेही आपल्या दोघांच्या मनातले गुज आपल्या दोघांनाच शेअर करावे लागेल , कारण आपल्यासाठी बोलणारे कुणीच नाही , हो ना ?"
" हो येईल मी " स्मृती बोलली पण तिचे हात ओलेच होत होते .
" मग उद्या चार वाजता प्लीज ," तो काही जिंकल्याच्या आनंदाने आर्जव करत राहिला .
      काळ घरीं आल्यापासून ती वेगळ्याच धुंद विचारात मग्न होती , तिचे हळुवार दुसरे मन तिला सारखे प्रश्न विचारात होते , काय बोलायचे असेल त्यांना ? ते  प्रेमाचा उच्चार करतील का त्यांच्या  बोलण्यात कि असेच वेळ घालवण्यासाठी बोलावले असेल त्यांनी ? पण कसे बोलले ते काल , म्हणे रोज मी तुला न्याहाळत होतो आरश्यात , निर्विकार आहे म्हणे मी , कसे असे इतके कडू स्पष्टपणे बोलतात ते ? तो माझा हात हातात घेईल त्या उसळत्या सागरसाक्षीने , विचारानेच हृदयात कळ उमटते आहे , प्रत्यक्ष काय होईल ? एक ना अनेक रोज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर क्षणात देणारी स्मृती तिच्या दुसऱ्या मनाला हेही विचारात होती , मी आज निरुत्तर कशी ?
      आज तो क्षण अनुभवणार होती ज्या क्षणाची तिच्या दुसऱ्या मनाने इतके दिवस वाट पाहिली होती , कुणाला कळू न देता एका योगीनिसारखी... उसळणारा समुद्र जो रोज तिला भेडसावणारा वाटायचा आज खूप हळवा , प्रेमळ आणि भावपूर्ण वाटत होता , आज तिचे मनहि त्याच्या लाटांशी बोलत होते , का कुणास ठावूक ? आज तिच्या जीवाला ओढ लागली होती सुखांची , सुखाच्या क्षणांची , त्या लाटांचे थंड तुषार तिला पुन:पुन्हा रोमांचित करत होते , इतकी गुंग होती कि तिच्यामध्ये जणू फुलात विरघळलेला सुगंध ! शरद जवळ येवून बसल्याची चाहूलहि तिला जाणवली नाही ...
" स्मृती " तिने चमकून पहिले , शरद तिच्या अगदी जवळ वाळूत येऊन बसला होता .
" कुठे हरवलीस इतकी ? पण खरे सांगू तुझे हे तुझ्यात विरघळणे मला खूप भावते , आणि तुझ्याबरोबर तुझ्या त्या विश्वात मी पाय ठेवावा असे सारखे वाटत ," एका चिरंतन ओढीने तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता . तीही गुंतून राहिली त्याच्या नजरेत आणि हृदय कानात एकवटून ऐकू लागली त्याला , अशी कशी भारली ती आज , का कुणास ठावूक ?
" तुझ्या त्या स्वप्नील डोळ्यात मला असेच गुंतून राहावे वाटते , तुझ्याबरोबरच्या सहजीवनाच्या विचारांत मी नकळत गुंगून जातो आणि माझ्या भोवती तुझे अस्तित्व शोधत राहतो , भेटलीस तेंव्हापासून खोलवर रुतलीस आणि आता अशी रुजलीस मनात कि तुझ्याशिवाय क्षणही शाप वाटतो , खरंच का ग स्मृती प्रेम असं असतं मला कुणी सांगितलच नाही पण तू भेटलीस तसे असेच वाटते कि हेच प्रेम आहे , आई वडिलांनी दिलेले प्रेम कळावे या आधीच ते गेले आणि रुक्ष जीवन जगलो अर्पितासाठी , पण तू भेटलीस आणि निष्पर्ण पांगारयाला रक्तवर्णी फुलांचा बहर यावा तसे माझे मन बहरले " तो बोलायचा थांबला तरी तशीच ती त्याच्या नजरेत नजर गुंतवून बसून राहिली . एक लाट त्यांच्या पायात येऊन गुंतली आणि त्यांना भानावर आणत पुन्हा खिदळत समुद्रात परतली . ती उगीच लाजली आणि पायाची बोटे न्याहाळू लागली , त्या गौररंगी बोटांवर आता काळसर वाळूचे कण तिचा रंग किती सुंदर आहे हे दाखवू लागले . ती काहीच बोलत नव्हती पण शरद मात्र बांध फुटून वाहणाऱ्या पाण्यासारखा अस्वस्थ होता आणि बोलत होता . वास्तवात येत तो जरा प्रक्टीकली बोलू लागला ,
" स्मृती मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो , तू जर माझ्या आयुष्यात आलीस तर तुला सुखी आनंदी करण्याचाच अविरत प्रयत्न करील , पण तरी मला वास्तव जे तुला थोडे विचित्र वाटेल ते तुझ्यापासून लपवायचे नाही . त्यानंतर तुझे जे काही उत्तर असेल ते मी आनंदाने स्वीकारेन , तुझा नकार सांगताना मला काय वाटेल याचा विचार करू नको कारण जीवन कितीही स्वप्नील विचारांनी भरलेले असले तरी ते वास्तवातच जगावे लागते "
त्याचे हे रुक्ष बोलणे हवेत विहरणाऱ्या स्मृतीला उगीच कडू कारले तोंडात ठेवल्यासारखे भासले , पण क्षणात त्याने डावा पाय गुढग्यापर्यंत उघडा केला आणि खिन्न होऊन सांगू लागला ,
" आई बाबा ज्या अपघातात गेले तो अपघात माझा डावा पायही घेऊन गेला आणि या कृत्रिम पायाने मी चालता झालो . मला माहित आहे तुलाही मी आवडतो पण प्रत्येक आवडणाऱ्या व्यक्तीची एक अशी गोष्ट असते कि ती दु:ख देवून जाते . म्हणून मी स्वताला बरेच आवरले पण जेंव्हा तुझे माझ्यासाठी आरक्त झालेले गाल पाहिले तेंव्हा राहवले नाही . मग ठरवले कितुला वास्तव मान्य असेल तर तुझ्याबरोबर मला माझे आख्खे आयुष्य जगायचे , पण निर्णय सर्वस्वी तुझा असेल ."
त्याचे बोलून झाले होते पण क्षणभर सर्व शांत होते फक्त तो सागर उसळत होता आणि लाट किनाऱ्याला आणत होता ...ती हे सर्व ऐकताना फक्त शरदला पाहत होती आणि तिची दोन्ही मने आज प्रथमच विचारविरहित बनली होती ! अगदी स्वच्छ शुभ्र कोऱ्या कागदासारखी , तिच्याही नकळत अश्रूंची फुले तिच्या हळदीरंगाच्या गालावर ओघळू लागली आणि ती शरदच्या कुशीत शिरून त्याला घट्ट बिलगली ,त्याचे बाहुही तिच्या भोवती गुंफले गेले आपोआप ...दोन दुख्खी मने आज सुखाने भरून वाहत होती ...
पायाखाली लाट येत होती आणि समुद्रात थोडी रेती घेऊन परत होती ....का कुणास ठाऊक ??       

Sunday 16 September 2012

त्या वाटा

त्या वाटा सोनेरी झालेल्या
उगवतीचे रंग माझ्या ,
जीवनात घेवून आलेल्या
ना रुतणारया काट्यांची भीती
ना टोचणारया खड्यांची
आणि सुखाच्या सावल्या
बाजूच्या तरूंनी दिलेल्या
त्या वाटा ...

वाटांनाही माहित फक्त
तुझ्याच घराची चौकट
नागमोडी वळणे घेत ,
त्याही मजसवे तिथे
पोहचत्या झालेल्या
त्या वाटा ...
पायाखालच्या मखमली
गवतावर , ते थेंब दवाचे
विखुरलेले ,
भिजलेली वस्रे स्वर्णरंगी
ओलेत्यानेच त्या मजसवे
उंबऱ्यापर्यंत चाललेल्या
त्या वाटा ...
पाहून दोघांचे मिलन
पुर्वाही बहरली बघ
स्वर्णकेशरी वस्रे लेवून ,
तीही आली बघ
बघ दाही दिश्याही
मोहरून स्वर्णरंगी रंगलेल्या
त्या वाटा ... 

Saturday 8 September 2012

दगड

एक होता दगड
स्वप्न त्याला पडले
बघ किति सुंदर आकार 
आहेत तुझ्यात दडले

का कमी लेखतो स्वत:ला
आहेस तु सर्वात वेगळा
बघ माझ्या स्पर्शाची जादु
संपेल ही अवकळा

दगड हर्षला आनंदाने
स्वप्नात त्या बुडाला
ओळखले मलाही कोनी
वाट पाहु लागला

रखरख
त्या उन्हात जेव्हा
स्वप्न त्याचे भंगले
म्हनाला मग तो स्वत:ला
गड्या आपण दगडच चांगले!!

Tuesday 4 September 2012

सांजप्रिया


छुमछुम सांज
आज आलीच नाही 
खळखळ हास्यात 
मने न्हालीच नाही


झिरपणारे रंग
पसरलेच नाही
मनमोहक काव्य
ऐकवलेच नाही


झपापणारी पावले
नभी उमटलीच नाही
केशरी किरणांना
अंगणी विखुरलेच नाही


हुरहूर मनाची
तिने पाहिलीच नाही
किरकिर जीवाची
तिने साहिलीच नाही


सळसळनाऱ्या तरुला
कुरवाळलेच नाही
झुळझुळनाऱ्या झऱ्याला
रंगवलेच नाही


थकलेल्या जीवाला
सुखावलेच नाही
उडणाऱ्या पाखराला
झोपावलेच नाही


पसरलेल्या दाट मेघाने
सांजप्रीयेला आज
भेटवलेच नाही
आज भेटवलेच नाही .....


Thursday 30 August 2012

तुझे माझ्यात मिसळणे

तुझे माझ्यात मिसळणे योगायोग नाही
नदी तरी आणखी कुठे जाणार ?
तुला भेटण्याची घाई नाही
शेवटी तु माझीच तर आहे होणार !

कळते ग तुझ्याही लहरींना
ओढ आहे माझ्याच लाटांची
म्हणून मीही निश्चिंत , ना
तमा तुझ्या लांबलेल्या वाटांची !

दिसते उचंबळणारे तुझे काळीज
वाहत्या तव खळखळ प्रवाहात
उशीरही तुझा सोसेल मज
विरेल खारटपणा गोड पाण्यात !

शांत निळाशार माझ्या जलात
असे तृप्तता तुझ्या वेगाला
कधी व्याकुळते मन माझेही
म्हणती समुद्र आला भरतीला !



Wednesday 29 August 2012

दोन टोके

जन्म अन मृत्यू
टोके दोन आयुष्याची
लांब आखूड रेघांच्या
उरी का आशा जगण्याची?

सुख अन दु:ख
एकत्र कसे नांदतात?
संकटात माणसं
दैव का कोसतात?

हासू अन आसू
नयनी कसे कळती?
अश्रू विझवण्या तरी
सारे वेदनेत का जळती?

प्रश्न अन उत्तरे
माहित ज्याची त्याला
उत्तरे समजूनही
जीव विटती का जगण्याला ?

Friday 15 June 2012

उसनं जगणं

उसनं जगणं
नाही न पटत
जीवन असंही
ना खरं वाटत

ओठात पेरले
उसनेच हासू
अंतरी जपले
सच्चे मात्र आसू

खोट्याच सुखांना
आनंदे भोगता
खऱ्या संवेदना
खोलात दाबता

वेदना असह्य
चेहरा खुल्लेला
आत्माराम तेंव्हा
बुद्धीला बोल्लेला

गर्भातला लाव्हा
धरेला व्यापिल
उसन्या जीवना
रक्षेत झाकिल...   

Wednesday 25 April 2012

पण का ?

का व्याकुळल्या मनाला 
आठवणी घेरून जाती
का जडावल्या पापान्याखाली 
जागरणे पेरून जाती 

का उसवल्या नभाला 
जोडण्याचा छंद मनाला 
का बिघडल्या वगाला
रचण्याचे वेड जीवाला 

का निष्पर्ण वृक्षाला 
पालवीची आस आहे 
का संपणाऱ्या जीवनाला 
उगवण्याचा ध्यास आहे 

का न संपणाऱ्या वाटेवरी 
पावले चालता ना थकती
का उगवणाऱ्या सुर्यासंगे 
नव्याने दिवसाची गणती 

का शिशिरात गळाले पान ते 
वाऱ्यासवे आकाशी झेप घेते 
पण का सुखाचे स्वप्न माझे 
कार्पुरासम विरुनी जाते ....

Friday 20 April 2012

माझे मुल

एक नाजूक सुगंधी फुल 
मंद वाऱ्याने डुलणारे डुल

किती कला चिमण्या अंगी 
सर्व रमती त्याच्याच रंगी 
बाळकृष्ण माझा ,
सुखाची नांदी ...
एक नाजूक सुगंधी फुल ...

खेळ किती अनोखे तयाचे
वेड मला उमजून घ्यायचे 
बाळकृष्णाला माझ्या,
वेड जादुई दुनियेचे ...
एक नाजूक सुगंधी फुल ...

झोपता दिसे रूप सोज्वळ 
रिती निरागसतेची ओंजळ 
मम बाळकृष्णाच्या, 
बाललीला अवखळ ...
एक नाजूक सुगंधी फुल ..

आजीच्या अंगाईची ओढ 
आजोबांचे सर्व अजब लाड 
माझा बाळकृष्ण ,
आहेच असा मधाहून गोड ...
एक नाजूक सुगंधी फुल ...
असे सुरेख गोंडस माझे मुल ...

 

Sunday 8 April 2012

पाऊस पडून गेल्यावर

  पाऊस हि जशी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट तसे पाऊस पडून गेल्यावर भेटणारा निसर्ग माझा सगळ्यात जीवश्चकंठश्च सखा ..खूप खूप आवडीचा ...अनेकदा खूप आतुर असते मी त्याला भेटायला ...जणू तो गवसल्यावर मी पुन्हा उमलून येणार आहे ...आणि तसे होतेही , मन असे भरून येते उत्साहाने कि सर्व भोवताल सुख पेराल्यासारखा भासतो ...प्रेमाच्या स्पर्शासाठी आसुसलेली मने जशी मोहरून जातात ...धुंद होतात ...सर्व जगाला विसरून स्वत:मध्ये हरवून जातात ..त्यांना काही सोयरसुतक राहत नाही कुणी काय बोलेल याचे ...तशी मी विसरून जाते स्व आणि विरघळून जाते त्या मनमोहन निसर्गात ...
   अजून छान आठवते मला, शाळेतून आल्यावर पाऊस पडलेला असेल तर जेवणाच सुद्धा भान नाही तशीच उधळायचे म्हणा न ...पश्चिमेला चालत राहायचे ...उजाड माळरान पण त्या वरुणाने त्यालाही असे स्वच्छ केलेले कि पिवळ्या पडलेल्या त्या गवताच्या काड्या चक्क सोनेरी दिसायच्या आणि त्याच्यावर पडलेल्या त्या सूर्यकिरणांनी पुन्हा प्रकाश परावर्तीत करत आहेत असे भासायचे .. अनेकदा कुणाचा दागिना पडला असे वाटून मी त्यांना हातात पण घेवून पाहायची ..त्या काड्यांचा मऊ लीचापिचा स्पर्श मला अनेकदा त्यांना परत परत उचलण्यासाठी भाग पडायचा ...कितीदा मी पुन्हा पुन्हा फसायचे, त्यावर पडलेले ते थेंब मला अंगठीतले खडे भासायचे.
    काही ओघळी वाहत असायच्या तर काही वाहिलेल्या पाण्याचे ठसे दाखवायच्या ...माझी मीच विचार करायचे पाण्याचे कुठे ठसे असतात का, आणि मनाशीच हसायचे ...पण त्या खुणा असतात हि गोष्ट जशी मोठी होत गेले तशी उलगडली ..गढूळ पाणी आधीच वाहून गेलेले असायचे आणि आता स्वच्छ ,नितळ पाणी बघितले कि ओंजळ भाराविशी वाटायची ,वाटले ते केले नाही तर ते लहानपण कसले ? मग चप्पल काढून हळूच त्या पाण्यात पाय घालायचे ,ती मऊ माती जणू पायाला मखमल भासायची , मग त्या ओघळीने पुढे पुढे चालत जायचे सावकाश त्या मऊ मखमलीचा स्पर्श अनुभवत काहीतरी वेगळे वाटायचे ...अंगभर शहारा आणायचा तो स्पर्श ..मऊ मातीचा सुगंधी स्पर्श ..
      धूतलेल्या गवतासारखे धुतलेले दगड आणि लहान मोठ्या शिळा पण जवळ बोलवायच्या मला ..बघ मीही सुंदर आहे म्हणून ! त्या हिरव्या पिवळ्या गवतातले ते काळे दगड वेगवगळ्या आकारांचे - कुणी पूर्ण गोल तर कुणी वरून चपटे जणू बसायला तयार झाले आहेत ते .. मग खेळ सुरु व्हायचा या दगडावरून त्या दगडावर ... ते दगड पण साडीवरच्या बुंदक्याप्रमाणे वाटायचे


   पहिल्या पावसात ते शिवार धुतलेले पिवळे वस्र पांघरल्यासारखे वाटायचे मग दिवस थोडा कलला कि केशरी पिवळा एकत्र झालेल्या त्या रंगाला अजून काही उपमा मला तरी सुचली नाही पण डोळे दिपून जायचे , आणि वेड लागायचे त्या रंगांना डोळ्यात साठवायचे ...नंतरच्या पावसात मात्र धरती जणू ते पिवळे वस्र फेकून हिरवे नेसायची ...त्या हिरवाईवर उडणारी फुलपाखरे ...त्यांच्या मागे पळणे ...त्यांच्या पंखांचे रंग पहायचे आणि ते मोजायचे ..पुन्हा नवे फुलपाखरू ..पुन्हा नवे रंग ..नुकतीच उमलेली ती रानफुले इतकी लोभस असायची कि कोशातून आताच बाहेर आली आहेत आणि उत्सुकतेने या अतिसुंदर दुनियेला अनिमिष नेत्रांनी न्याहाळत आहेत ,जणू हे जग आताच नव्याने बनले आहे फक्त त्यांच्यासाठी ! मग मलाही त्या फुलांच्या विविधतेचे खूप नवल वाटायचे ..काही लाल ,गुलाबी ,जांभळी ,पांढरी ,पिवळी .... काही लहान अगदी डोळे जवळ नेवून पाहायला लागायची तर काही मोठी ..काही कानातल्या कुड्या बनायची तर काहींच्या बुंध्याचा रस गोड लागायचा ..काही फुलांना एकत्र गुंफून वेणी बनायची तर काहींना एकात एक करून छान चक्र बनायचे ...
       किती नवलाई आहे हि! सुखाच्या राज्याची जणू राणी बनायचे मी त्या नाविण्यात हरविलेली ..त्यापासून दूर ओढणारी प्रत्येक व्यक्ती मला शत्रू वाटायची .. तोच तो मावळणारा दिवस ...आवडायचा पण त्याने तिथेच  थांबावे असे वाटायचे , पण तो कसला थांबतो ...तेंव्हा मात्र त्याचा खूप खूप राग यायचा ...माझा तो शत्रू बनायचा ..आणि अंधाराला मग तो पाठवून द्यायचा या माझ्या स्वर्गाला झाकायला ...

Thursday 5 April 2012

मन माझे स्वप्नाळू ...

मन माझे स्वप्नाळू ,
कसे किती आवरावे...

कधी वाटते फुलपाखरू व्हावे
फुलांच्या सुगंधात न्हावून
एकेक पाकळीला विलग करत जावे
त्यांच्या मधुरसाला प्राशून,
हृदयीचे रंग त्यांच्या,पंखावर पेरावे
मन माझे ...

कधी वाटते पक्षी व्हावे
वृक्षवेलींवर रमतगमत
प्रत्येक कडूगोड फळाला चाखत जावे
पंखांमध्ये बळ भरून ,
उंच उंच जात, आकाश त्यावर पेलावे
मन माझे ...

कधी वाटते सरिता असावे
खळखळ पाणी उरी घेत
वळणावळणावर नाचत गात हुंदडावे
मलीन काठांना स्वच्छ धुवून,
हरेक जीवाला तृप्त करत, पुढेपुढे चालावे
मन माझे ...

पुन्हा फिरून वाटते माणूसच असावे
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर
मातीला स्पर्शून पुन्हा आभाळ कवेत घ्यावे
रडणाऱ्याचे अश्रू पुसून,
हसणाऱ्याला हसवत, सुरेल जीवनगीत गात जगावे
मन माझे ...  


वळीव

उन्हाची वाढता धग
जीवांची होई तगमग
अंगाची झाली लाही
रखरखीत दिशा दाही

घामाच्या धारा वाहती
जीव सावली पाहती
सावलीही घामेजलेली
धरा वरुणाला आसुसलेली

वारा वाही सुसाट
वृक्षवेली करी सपाट
मेघांचा गडगडाट
विजांचा कडकडाट

थेंब बरसती पावसाचे
चुंबन घेण्या धरतीचे
पाहून त्यांचे मिलन
हरखून जाई जीवन

करीत मातीची साय
पाऊस येवून जाय
होती तृप्त सर्व जीव
येत सुखकर वळीव ...

Sunday 1 April 2012

मोकळा श्वास

काही नको देवा मला
हवा फक्त असा सहवास 
दमले जरी काम करताना 
मिळेल एक मोकळा श्वास 

उन्हातान्हात तापताना 
वाऱ्यापावसात भिजताना 
पाण्याशिवाय रुजताना 
जीवाला असेल एक आस 
मिळेल एक मोकळा श्वास 

अंत न तनाच्या वेदनेला 
रस्ता ओळख नसलेला 
जवळ करताना अंधाराला 
जीवाला असेल एक आस 
मिळेल एक मोकळा श्वास

भविष्य धुके पांघरलेले
भोवती वन निष्पर्ण झालेले
वाळवंट चौफेर पसरलेले
तरी जीवाला एक आस
मिळेल एक मोकळा श्वास

काही नको देवा मला
हवा फक्त असा सहवास
दमले जरी काम करताना
मिळेल एक मोकळा श्वास ...

Friday 30 March 2012

मी आई

खरच प्रत्येकाला किती कौतुक
आपल्या प्रेमळ आईचं
मलाही वाटतो अभिमान
तिच्यासारखं माझ्या दिसण्याचा

किती जणांना लाभते भाग्य
तिची प्रतिमा होवून जगण्याचे
मीही करते पराकाष्ठा प्रयत्नांची
तिच्यासारखं सोज्वळ वागण्याचे

पण कसे बनता येईल
स्वतःच स्वतःची आई
विचार मनाला पोखरता
जीव नाराज होवून जाई

पण मीही तिच्यासारखी ,
निराशेला जागा मनी नाही
पुन्हा नवचैतन्याची पहाट
मनाने धरली पुन्हा नवी वाट

मीही नक्की होईल, गोंडस
एका पिलाची माऊली
आणि उन्हातान्हात, संकटात
बनेल त्याची सावली...


एक झाड

एक झाड त्या तिथे
उजाड माळरानाच्या
एका कोपर्यात ...

अनेक वर्ष वाट
पाहत असेल कुणाची
होत असेल का होरपळ
त्याच्याही मनाची

प्रत्येक ऋतूने आपली
ओळख त्याला देऊ केली
त्यानेहि मग ती स्वताची
म्हणून जगाला दाखवली

येणारा प्रत्येक जीव
सावलीत त्याच्या रमला
त्याच्याच जीवाचा आनंद
त्यांच्या सुखात पहिला

कोलाहलापासून जगाच्या
दूर आहे त्याचे विश्व जरी
निवांत आहे भोवताल, मेघांचा
गडगडाट भरला खोल उरी

अर्धे आयुष्य सरले
अर्धे अजून आहे बाकी
प्रश्न त्याला पडला आहे
मिळेल कुणी सहप्रवाशी
शेवटपर्यंत ....

एक झाड त्या तिथे
उजाड माळरानाच्या
एका कोपर्यात ...

Thursday 29 March 2012

अर्थ तुझ्यामुळे जीवनाला..

तुला माहित आहे काय दिलेस तू मला ?
उजाड माळरानावर अंथरलेस हिरवाईला

स्वप्नांच्या सागरात बुडताना, 
जेंव्हा श्वासही मला सोडून चाललेला 
अचानक जवळ घेत धरलेस हाताला.. 
तुला माहित आहे काय दिलेस तू मला ?

नियतीच्या घावाने व्याकुळले मन होते,
पाहत तुकड्यांमध्ये विखुरलेल्या सुखाला
नकळत,हळुवार पुसलेस ओघळत्या अश्रुला.. 
तुला माहित आहे काय दिलेस तू मला ?

जीवनाच्या प्रत्येक कसोटीत बुद्धीही 
हतबल जेंव्हा, फक्त अनुभवले हारण्याला
अंधारल्या मम मार्गात विखुरलेस प्रकाशाला..
तुला माहित आहे काय दिलेस तू मला ?

आनंदाने ओतप्रोत , सुगंधाने भरून
उरलेले पुष्प ,आणि बहरलेल्या तरुला
सगळेच जवळ करतात रे तू धैर्य दाखवलेस
आणि केलेस आपलेसे मजसम निराशेला..

खरच सांगते माझ्या आयुष्याच्या
वादळात हरवलेल्या नौकेला
तुझ्या येण्याने एक छान किनारा लाभला ..
म्हणून माझ्यासाठी श्वास तू अर्थ तुझ्यामुळे जीवनाला ....

Wednesday 28 March 2012

जॉगिंग ग्रुप

      ''अलका , ए अलका अग उठ न ,किती वेळ झाला तो गजर वाजतो आहे .'' माधवराव चष्मा उशीखाली चाफत बोलले . पण काकी काही उठण्याच्या मनस्थितीत नव्हत्या उलट काकांना समजावत म्हणाल्या ,''अहो असे काय करता , आता काही ऑफिसला जायचे नाही ,कालच रिटायर झालात तुम्ही ..आता उशिरापर्यंत झोपायची सवय करा , लवकर उठून तरी काय करणार ?'' काकींच्या या प्रश्नावर माधवरावांना काही उत्तर सुचले नाही . हाती आलेला चष्मा घालून तसेच येवून खिडकीत उभे राहिले . माधवराव आयुष्यात कधी काम नाही म्हणून कंटाळवाणे दिवस घालवणाऱ्यानपैकी नव्हते ..आजच्या तरुणाला लाजवेल असे चैतन्य त्यांच्या नसांमध्ये भिनलेले होते .. म्हणूननच काकींचे बोलणे त्यांनी फक्त ऐकले आणि डोक्यातून बाजूला केले .. 
      असे बसून चालणार नाही ..काहीतरी करणे गरजेचे आहे ..नाही तसे पर्याय शोधला तर मोकळे मन भूताटकिचे घर बनायला वेळ लागणार नाही ... माझ्या आवाक्यातले एकतरी काम असेलच  कि ? पैश्यासाठी नाही पण वेळ घालवण्यासाठी किंवा एखादा छंद म्हणून का असेना ..कारण अश्या बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या राहून गेल्या वेळ नाही म्हणून , मग आता वेळ आहे तर करू या ती पूर्ण ! लगेच गडबडीने त्यांनी अंघोळ आवरून स्वताच चहा करून घेतला आणि चप्पल पायात सरकवत म्हणाले ,''अलका मी येतो ग जरा फिरून , आलो तासाभरात .'' काकींनी डोळे उघडले आणि मनाशीच पुटपुटल्या ,''गप्प बसतील ते माधवराव कसले ?'' आणि काकांचा असा एकेरी उल्लेख केला म्हणून मनाशीच लाजल्या ..
     डोळ्यांवर चष्मा , कुर्ता पायजमा आणि मागे बांधलेले हात ..इकडे तिकडे न्याहाळत माधवराव रस्त्याच्या कडेने चालत होते , सकाळची वेळ असल्याकारणाने रस्ता तसा निर्मनुष्यच होता ..कुठेतरी एखाद्या वाहनाची ये जा ,तर कधी एखादी सायकल चाललेली . एखादी ओळखीची व्यक्ती दिसली कि मधून मधून मागे बांधलेले हात समोर जोडून नमस्कार करत अगदी रमत गमत माधवराव चालत होते ... इतका मोकळा श्वास ते आज प्रथम अनुभवत होते .. न कसली घाई न कसली गडबड ..जिथपर्यंत पाय दमत नाहीत तिथपर्यंत चालायचे ...बस ...फक्त चालायचे ..
      घरी खुशीत आलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून काकी ओळखून गेल्या कि आता हि स्वारी रोज सकाळी फिरायला जाणार ..पण याचे त्यांना समाधान वाटले कि करमणुकीचे एक साधन तर मिळाले यांना .. आता हा रोजचा नियमच बनला .सकाळी काही दिवस माधवराव एकटेच फिरायला जात पण आठ दहा दिवसांनी त्यांचे सहकारी वाढले . मग महिनाभरात तेरा जणांचा एक ग्रुप तयार झाला ,ते इतर वेळीही एकत्र येऊ लागले . मग काय एक क्रिकेट टीम तयार झाली ,नामकरण झाले ''जॉगिंग ग्रुप '' कारण ते भेटले ते जॉगिंगमुळे ... सगळ्यांचे स्वभाव भिन्न पण एकत्र अगदी लहान मुलांप्रमाणे वावरत ,तसेही म्हातारपण म्हणजे परतून आलेले बालपणच कि ..मग हळू हळू त्यांनी समाजकार्य चालू केले अगदी गल्ली ,रस्त्यांची सफाई पासून ते वर्गणी करून काही कार्यक्रम ठेवणे ... एक न अनेक .. या वयातही तरुणांप्रमाणे त्यांची मैत्रीही बहरत होती .. अगदी कॉलेजमधल्या मुलांनप्रमाणे ..
      एका कार्यक्रमाचे आयोजन चालू होते .. पण माधवराव आणि सावंत काकांचे एकमत होत नव्हते .. बोलण्याबोलण्यात वाद वाढत गेला .. आवाजाची वाढलेली धार पाहून थिटेनाना बोलले, ''नका भांडू रे लहान मुलांसारखे , काहीतरी सुवर्णमध्य काढू आपण , आणि काय रे माधव आपण पिकली पाने कधी गळून जाऊ नाही रे कळणार मग वाईट वाटत राहील पण भेट नाही . आजचा दिवस सुखाचा करणे हेच फक्त आपल्या हातात ,गोड बोलायला वेळ नाही जिथे तिथे भांडता काय रे .. आणि खिळखिळी झालेली हि शरीरे मनाच्या चैतन्यामुळे तग धरून आहेत तर परत चैतन्य हरवून बसायचे का ? सांगा सावंत .'' आता मात्र शांतपणे सर्वजन थिटे नानांचे बोलणे ऐकत होते , सगळेच काहीवेळ स्तब्ध झाले ...अंतर्मुख झाले . सर्वांच्या मनावरील पकड पुन्हा आवळत थिटे नाना बोलू  लागले ,'' खरच नाही असे वाटत तुम्हा सर्वांना कि किती आयुष्य बाकी आहे आणि आपल्याला हसायला वेळ नाही मग भांडण काढून पुन्हा रडायचे ते का ? आज बहरलेला तरु उद्या निष्पर्ण होणार आहे , कोपऱ्यावरच्या पडक्या वाड्याची जागा उंच इमारत घेणार आहे .. जे आज आहे ते उद्या असेलच असे नाही मग या जॉगिंग ग्रुप मधला एकेकजन गळून जाणार आहे .. नका रे असे करू आजचा दिवस जगून घ्या ... '' नाना उठले आणि काठी टेकवत चालू लागले .. सगळे निशब्द होवून नाना गेलेल्या दिशेकडे पाहत राहिले .. हळूहळू प्रत्येकजण उठून गेले , माधवराव मात्र बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि या क्षणभंगुर आयुष्याबद्दल विचार करत राहिले .. खरच मी आज दुखावलेली माणसे .. त्यांना बोललेले शब्द पुन्हा माघारी घेऊ नाही शकत मग का असे कटू बोलावे .. ज्याचे त्याचे विचार वेगळे ,संदर्भ वेगळे मग मी म्हणतो तेच योग्य आहे असे का मानावे प्रत्येकाने ..नाही मी सावंत काकांची माफी मागेल मी जरा जास्तच बोललो म्हणून ...
    माधवराव सावंतांच्या घरी गेले , दार वाजवायच्या आत सावंत बाहेर आले पण त्यांचा चेहरा बावरलेला होता ,''माधवराव चला लवकर , नानांना हॉस्पिटलमध्ये नेले आहे . जवळच हॉस्पिटल असल्याने सर्वजन तिथे जमा झालेले . पण सर्व संपले होते .. उपचार मिळण्यापूर्वीच नानांचे जीवनकार्य आटोपले होते ... माधवराव आज प्रथम खूप रडले ..त्याना स्वताच्या भावना आवरणे कठीण जात होते .. सावंत त्यांच्या जवळ आले आणि पुन्हा दोघांना हुंदका दाटून आला .. एकच विचार मनात येत होता ..
                        आज बहरलेला तरु उद्या निष्पर्ण होणार आहे 
                        कोपऱ्यावरच्या पडक्या वाड्याची जागा उंच इमारत घेणार आहे ....




 

Monday 5 March 2012

पुन्हा जगताना

तुम्ही कधी पाहिलंय स्वताला पुन्हा वाढताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

आईच सारे विश्व ,तिच्याच भोवती रमताना
मला हे दे आणून बाबा,नाही दिले कि रुसताना
तुम्ही पाहिलंय कधी स्वताला मनमौजी जगताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

शाळेचा कंटाळा ,दांडी मारून खेळण्यात गुंतताना
राहिलेली शेवटची गोळी मित्रांसोबत एकत्र खाताना
तुम्ही पाहिलंय स्वताला असा आनंद गोळा करताना 
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

शाळेतल्या विनोदावर घरी येवून पोटभर हसताना
दादाने मारले बाबा रागावले आईच्या कुशीत रडताना
तुम्ही पाहिलंय स्वताला इतके निरागस वागताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

मी मात्र बघितलय स्वताला पुन्हा वाढताना
माझ्या पिलासोबत पुन्हा त्याच गोष्टी बघताना
पुन्हा तीच सुखे तीच दु:ख्खे तेच प्रेम उपभोगताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना



धन्यवाद माझ्या प्रिय बाळ सत्योम , गेलेले निरागस आयुष्य पुन्हा तुझ्यासोबत जगणे तुझ्यामुळे शक्य झाले. आजच्या वाढदिवसाच्या अगणित शुभेछ्या तुझ्यासाठी !  


                                               झोपेत जेवताना सत्योम !

Saturday 3 March 2012

स्वप्नात हरवलेलं मन

स्वप्नात हरवलेले एक मन
वास्तवाचे नव्हते जराही भान 
एका प्रेमळ शब्दाने भारले तिला 
नव्हती कमतरता मग सुखाला

त्याचे असणे 
प्रेमाची हिरवळ 
सुगंधाचा दरवळ 
भावनांची दाटी 
फक्त त्याच्यासाठी 

त्याचे नसणे 
जीवाची होरपळ 
भेटीसाठी तळमळ 
उठता विरहाचे रान 
उडून जाती तिचे प्राण 

स्वप्नातून मन जागं झालय
त्याने वास्तवाचं भान दिलय
सुखाने त्याचं घर भरलंय
त्याच्या सहवासात मन रमलय!   


Thursday 9 February 2012

मी अन तू

मी खळखळनारी नदी 
तू स्थिर समुद्र
मी गहिवरली कातरवेळ 
तू शांत रात्र 

मी भरकटली कविता 
तू तिचा गहिराअर्थ 
मी असह्य किंकाळी 
तू एक हाक आर्त 

मी उमलते कमळ
तू  मंद दरवळ 
मी वारा उनाड 
तू न हलणारे झाड 

मी काळजाची धडधड 
तू ह्रिदयीची कळ गोड 
मी उतरणीचा घाट
तू वळणाची पायवाट 

मी लुकलुकती तारका लोभस 
तू उगवणारा चंद्र सावकाश
मी एक अवखळ कल्पना
तू मनीची गंभीर भावना

वरून दिसले जरी वेगळेपण
एकमेकांसाठीच बनलो आपण
म्हणून मलाही पटते,
तुझे मीपण माझे तुपण
खरच नाही वेगळे आपण 

Monday 6 February 2012

आहे सर्व तरी

आहे सुंदर घर आंगण,
पण रांगोळ नाही.
फुलला छान बगीचा.
तुळस कोमेजून जायी.

आहे सुंदर देव्हारा,
पण देव पारशेच राही.
आहे गाण्यांचा गोंगाट फार,
तुझे गुणगुणणे नाही.

आहे स्वच्छ फरशी,
पण थोडी  धूळ आहे बाकी.
शर्टावरचा  एक डाग,
का तुझी वाट पाही.

ओळखतात सर्व मला,
पण जाणणारे कुणी नाही.
आहेत मानसे  नाती नाही,
घर आहे पण घरपण नाही.

जपले मुद्दाम एक व्यसन,
तुझ्या धाकाची वाट पाही.
तू नसली तरी चालू आहे जगणे,
मग का मन तुझी वाट पाही ?




आपण बदलायला हवं

वेळ आली आहे ,
आतातरी आपण बदलायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

सरंजामशाही डोईजड होत आहे
आपल्या अस्तित्वालाच छेद देत आहे
लोकशाहीच रोप वाढवायलाच हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

आपलं मत आपली अस्मिता आहे
तीच नसेल तर जगणेच व्यर्थ आहे
आपलं जीवन आता तरी सावरायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

 भाषा चालू आहे अरेरावीची
अस्फुट भावना कोंडल्या मनीची
आता तरी स्वताला उघड मांडायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

आज आपल्या अजून हातात आहे
आज सुपात उद्या जात्यात आहे
आता तरी क्षणाच्या लोभाला आवरायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबावायला हवं

अस्वस्थ समाजमन व्यक्त व्हायला हवं
वेळ आली आहे ,
आतातरी आपण बदलायला हवं
खरच मनापासून वाटतं,
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं ........

Friday 3 February 2012

तू अन मी

माझे तुपण
अन तुझे मीपण
खरेच सांग
वेगळे आहोत का आपण


रुतला काटा जरी
वेदना तुझ्या उरी
माझ्यासाठी जगते
मरते  कितीदा तरी.


पाठ फिरवली तरी
ठेवून आशा  न्यारी
तेवत ठेवली ज्योत
दुःखाच्या वादळवारी


आला सांजवारा
वारला दु:खाचा पसारा
माझ्यासाठी जगलीस
हाती घेवून निखारा


कळले मला प्रेम तुझे
तुझ्यासाठी झुरले मनहि माझे
खर सांगतो एकच स्वप्न पहिले
असावे छान घरटे तुझे नि माझे


म्हणून तुला विचारतो
माझे तुपण
अन तुझे मी पण
खरेच सांग
वेगळे आहोत आपण?






Friday 27 January 2012

सावली तुझी मी

माझ्या वेदनेच्या उरात काळरात्र दडलेली
म्हणून तुझ्या जीवनात सुखस्वप्ने घडलेली


रात्रभर तुझ्या दारात दु:खे रेंगाळलेली
मी पहाटेच उठून ती केसात माळलेली
म्हणून तुझी सकाळ मोगऱ्याने गंधाळलेली


होती काही मने तुझ्यासाठी कडवटलेली
मी लाली बनवून त्यांना ओठी रंगवलेली
म्हणून ती मनेही तुझ्यासाठी मधाळलेली


तुझ्या नशिबाची पाटी अस्ताव्यस्त रेघाटलेली
माझ्या कपाळीच्या कुंकात नीटनेटकी एकवटलेली
म्हणून सुखसंपदा तुझ्या प्राक्तनात समेटलेली 


निराशेची वलये तुझ्या मनी दाटून आलेली
मी बनवून चुडा त्यांना हाती ल्यालेली
म्हणून तुझी प्रत्येक पहाट प्रसंन्न झालेली


तुझी पावले गुंतागुंतीच्या रस्त्याने कोलमडलेली
त्यांना आवरताना जोड्व्याची बोटे माझी ठेचाळलेली
म्हणून अवघड पायवाट तुझी सरळ रेषेत सावरलेली


तरीही प्रश्न पडतो जन्मोजन्मी तू मला लाथाडलेली
माझ्या पदरानेच तुला उन्हात सदैव सावली दिलेली
का तरीही आयुष्यभर तुझी सावलीच बनून  राहिलेली ?

Monday 23 January 2012

तुझ्याशिवाय जगताना

तुझ्याशिवाय जगताना मला खूप त्रास होतो
अवतीभवती वावरतोस असा सारखा भास होतो

दूर तू जाताना काहीही कारण सांग
मात्र प्रेम तुझे कधी नाकारू नकोस
प्रेमभारल्या तुझ्या शब्दांचा माझ्यासाठी श्वास होतो

वेदनेने भरलेल्या माझ्या जगात
आभासी अस्तित्व तुझे कधी नाकारू नकोस
जादूभरल्या तुझ्या असण्याने येथे सुखाचा वास होतो


तू इथेच असावे अट्टहास नाही माझा
स्वप्नातल्या प्रणयात तुझे येणे नाकारू नकोस
भारावल्या तुझ्या येण्याने जसा कृष्णराधेचा रास होतो

म्हणून सांगते मनातल्या माझ्या प्रेमात
आणि दिवास्वप्नात असणे तुझे नाकारू नकोस
कारण
तुझ्याशिवाय जगताना मला खूप त्रास होतो
अवतीभवती वावरतोस असा सारखा भास होतो

Sunday 22 January 2012

तूच सांग !

तुझ्या बरोबर असण्याची अशी सवय झाली
माझ्या आयुष्याचा ती नियमच बनली
कळत नाही तुला कशी रे विसरू
तूच सांग मग ,
त्या सुंदर स्वप्नांना  कशी दूर करू

तुझ्या येण्याने मनाला फुटले नवे धुमारे
मी सदैव तुझीच छळतोस मला का रे
माझे जीवन तू आहेस नको असे नाकारू
तूच सांग मग ,
त्या सुंदर स्वप्नांना कशी दूर करू

पुसट तुझ्या स्पर्शाने मधुरसात नहाले
जन्माचा माझ्या सखा तू का मला अव्हेरले
तू म्हणाला होता सुखी एक घरटे साकारू
तूच सांग मग ,
त्या सुंदर स्वप्नांना कशी दूर करू

शब्द तुझे गीत माझे मैफिल तू सजवली
का विरहगीताच्या अश्रुत मला भिजवली
तू सांगितले होते विश्व दोघांचे प्रेमगीताने भरू
तूच सांग मग ,
त्या सुंदर स्वप्नांना कशी दूर करू

माझे चित्र उद्याचे मनमोहक रंगानी रंगवलेस
थोड्या रागासाठी का काळ्या रंगाने झाकलेस
तूच दाखवलेस अनेकरंगी प्रणयचित्र आकारू
तूच सांग मग ,
त्या सुंदर स्वप्नांना कशी दूर करू   

Saturday 21 January 2012

पहिल्या प्रेमातले अश्रू

प्रेमासाठी जगावे पहिल्यांदाच वाटले
पाहिल्या या प्रेमात का अश्रू नयनी दाटले 

वर्षभर उन्हात मातीचा कणनकण तापला 
वळीव बरसला तिला लोणी करून गेला 
सुखावली ती अशी कि सुगंधून गेली 
फुलेल फळेल नशीब बदलेल झाले कि ओली
सुखाचे दिवस थोडे का नाही कळले 
पहिल्या या प्रेमात का अश्रू नयनी दाटले 

शिशिराने लुटून नेले बहरल्या तरुला 
वसंत आला पर्णपुष्पाने तो नटला 
गर्द पालवी मनाला त्याच्या भुलवी 
फुलांचा बहर मंद वारा फांद्या झुलवी 
सुखाचे दिवस थोडे का नाही कळले 
पहिल्या या प्रेमात का अश्रू नयनी दाटले 

चातक पाही वाट नदीचे कोरडे काठ 
मन आनंदाने भरले मेघांची गर्दी दाट 
चातकाचे ओले ओठ भरली सरिता काठोकाठ 
संपली त्याची वाट तिला तर मार्ग तिचा पाठ
सुखाचे दिवस थोडे का नाही कळले 
पहिल्या या प्रेमात का अश्रू नयनी दाटले 

मीही  तरसले खूप खऱ्या प्रेमाला 
कुणीतरी केले टकटक बंद मनाला 
उमटली गोड लहर एक अंतरी 
कृष्णाची त्या झाले राधा बावरी 
प्रेमासाठी जगावे पहिल्यांदाच वाटले 
पहिल्या या प्रेमात का अश्रू नयनी दाटले  

Thursday 19 January 2012

न उलगडलेले कोडे

माझ्या मनात उमटलेले शब्द तुला कसे रे कळतात                                                                                                    दोन समांतर रेषा अश्या कश्या एकमेकींना मिळतात?                                                                                                       न उलगडलेले कोडे हे एक !

तुझ्या स्वप्नातले दिवे माझे घर कसे रे उजळतात
दोन ध्रुव पाहिले कधी असे एकमेकांना भेटतात?
न उलगडलेले कोडे हे एक !

माझ्या कल्पनेतले घर तुझे हात कसे रे सजवतात
दोन प्रभार असे कसे एकत्र नांदतात ?
 न उलगडलेले कोडे हे एक !

तुझ्या उरीच्या वेदना माझे आभाळ का रे झाकोळतात
दोन तीर नदीचे पाहिले कधी एकमेकांशी जुळतात ?
न उलगडलेले कोडे हे एक !

माझ्या प्राक्तनातील ठसे तुझ्याही प्राक्तनात कसे रे उमटतात
क्षितिजावर आकाशधरा असे कसे गुजगोष्टी करतात ?
न उलगडलेले कोडे हे एक !

तुझ्या हास्याचे तुषार माझे ओठ कसे रे विलग करतात
पाण्यावरही पाहिल्या कधी अग्नीच्या ज्वाला पेटतात ?
न उलगडलेले कोडे हे एक !

करशील का रे मदत मला हे कोडे सोडवायला
बघ मग नाही लागणार वेळ सुखाचा संसार घडवायला !

                

Tuesday 17 January 2012

प्रीतीचा बागीचा

               केवड्याचा वास 
               तुझा रेशमी श्वास 
               मोगऱ्याचा गंध 
               तुझ्या प्रेमात धुंद 


               अर्धोम्लित कमळ 
               तुझ्या खूप जवळ 
               फुलली रातराणी 
               तुझ्यामाझ्या अंगणी 


               जास्वंदाचे बहु रंग 
               हवा तुझाच संग    
               निशिगंध सफेद 
               असावी तुझ्या कवेत 


               उमलली जाई जुई 
               झाले तुझीच सई
               लालचाफ्याचे फुल 
               पडली कशी तुझी भूल 


                बहरला गुलमोहर 
                सदैव तूच समोर 
                शेवंतीची दाटी 
                तुझे गीत ओठी 


                झेंडूच्या दाट माळा
                तुझ्या गळ्यात गळा 
                फुलली अबोली बोलेना 
                तुझ्याविना करमेना 


                गर्द टपोरा गुलाब 
                तूझा माझा मिलाप 
                असा सुंदर बागीचा                          
                तुझ्या माझ्या प्रीतीचा 

Monday 9 January 2012

उपवास

    ''रमा, चल लवकर आज आपण बाहेर जाऊ ,किती वेळ लागेल आवरायला?'' समीर खुशीत होता आज ! त्याने ठरवले कि आजचा पूर्ण दिवस रमाबरोबर घालवायचा . तिने आतापर्यंत कसलीही अपेक्षा न ठेवता त्याची आणि त्याच्या प्रत्येक जवळच्यांना समाधानी ठेवले होते . तिच्या अस्तित्वाने घराचा प्रत्येक कोपरा सदा सर्वकाळ उजळलेला होता . लग्न होवून एक वर्ष झाले पण सामीरपेक्षा ती सर्वांच्या जवळची ! प्रत्येकाचे करताना ती दमत  नव्हती ,दमली तरी दाखवत नव्हती !
    स्री एकदा संसारात विरघळली कि तिला चार भिंतीबाहेरच विश्व जरी काही वेळ मिळाले तरी तिच्या कानात घरच्या राहिलेल्या कामांची गुंजारव चालू असते. ती मनाला वाटूनही घरच्या गोष्टी सोडू शकत नाही, मग तिला कोणी सांगो अगर न सांगो ती सदा न कदा तिच्या कामांच्या काळजीतच राहणार! तशीच रमा कधी ती आली सासरी आणि कधी विरघळून गेली तिच्या संसारात तिला कळलेच नाही ! सुखाच्या वाटेवर कधी काटे सापडले पण ती त्यांना बाजूला सारून पुढे चालतच राहिली न भिता आणि न रुसता रागावता ! समीर तसा मितभाषी आणि हि बडबडी पण तिच्या त्या शब्दांमध्ये तो गुंतून जायचा ,घरी असला तर तिच्या आजूबाजूला घुटमळत असायचा तिची अखंड बडबड ऐकत ! आईंना मात्र तिला सारखे बोलताना पहिले कि राग यायचा विनाकारणच त्या तसे तिला सांगतही काहीवेळ गप्प कि परत चालू ! तिच्या बोलक्या नि मनमोकळ्या स्वभावाने ती सर्वांची लाडकी वहिनी ,मामी ,सून ,नातसून आणि ताई तर झालीच पण समीरची प्रिय बायकोही झाली !
      पण प्रत्येक हात जसा पुढून उजळ आणि मागच्या बाजूने थोडातरी काळपट असतो तसा माणसाचा स्वभाव ,जसा चांगला तसा थोडा विचित्रहि असतोच ! रमाच्या मनात काही गोष्टी इतक्या घट्टपने मुरल्या होत्या कि ती त्या सोडायला कुठल्याही सबबीवर तयार नसायची. त्यातलीच एक सवय तिचा देवभोळेपणा ! काही खुट्ट झाले कि झाले तिचे देवाच्या मागे लागणे सुरु ....त्यात समीरला ताप जरी आला तरी ती घाबरून जायची आणि देव पाण्यात ठेवून बसायची ! समीरला हे असले वागणे रुचायचे नाही ,देवळात जावून हात न जोडणार्यापैकी तो एक पण बायकोचे हे असले वागणे तो जळफळत सहन करायचा! पण ती काही बदलत नव्हती ....
''काय हो असे ओरडताय,आधी दाराच्या आत तर याल कि नाही .''रमा .
''अग् आज मला पूर्ण दिवस सुट्टी आहे ,आज आपण बाहेर जाऊ आणि फिरू ,पिक्चर बघू बाहेरच जेवू ,नाहीतरी तुला अजून कुठे नेलेच नाही लग्न झाल्यापासून ,आवरतेस ना ,लवकर आटप.''
''अहो पण ,कस शक्य आहे ''
''काही सांगू नकोस मी खूप काही ठरवून आलो आहे ,कुठे कुठे जायचे काय पहायचे ,पिक्चरचे तिकीट पण आणले आहेत ,मी तुझे काही एक ऐकणार नाही .''
''मी काय म्हणते ,आपण उद्या जाऊ कि .''
''वेडी आहेस का बॉस काय रोज रोज थोडीच सुट्टी देणार आहे ?आणि तिकिटांचे काय ?''
''उद्या सुट्टी नसेल तर रविवारी जाऊ ,आणि तिकीट द्या कुणालाही ,भावोजी आहेत ताई आहेत जातील ते ''
''तू येणार आहेस का नाही ?'' आता मात्र समीर चांगलाच कावला होता ,तिने ओळखून घ्यायला हवे होते पण ती नेहमीप्रमाणे तिच्या कामात आणि नादात गुंग होती आणि काही विचार न करता ,त्याच्याकडे न पाहता ती बोलून गेली ''नाही जमणार हो ,माझी कामे संपणार नाहीत आणि माझा  उपवास आहे ,मंगळवार ,देवीच्या देवळात जायचे आहे परत सर्व आटोपल्यावर ,नाही येऊ शकत मी .तुम्ही अस करा न ताई आणि भावोजींना तिकिटे द्या आणि सुट्टी आहे तर घरी आराम करा एक दिवस ,मी काहीतरी चटपटीत खायला करते तुम्हाला करू न ?''
''मुर्ख बाई ,तू नको अक्कल शिकवू मला ,जा काय करायचे ते कर मी जातो बाहेर .'' आज प्रथमच अश्या भाषेत समीर बोलला ,रमाने त्याच्याकडे पहिले तर तो रागाने थरारत होता . या शब्दांनी रमाही दुखावली आणि सरसर गंगा डोळ्यातून गोबऱ्या गालावर ओघळू लागल्या ,नाकाचा शेंडा लाल झाला ती आता हुसमरू लागली पण समीर चांगलाच वैतागला नि पाय आपटीत घराबाहेर पडला ...
     प्रथमच समीरचा राग पाहून रमा चांगलीच भांबावली ,त्याला समजून सांगावे तर तो बाहेर गेल्याने तेही शक्य नव्हते ,काय करावे ते तिला सुचेचना. ती फक्त रडत राहिली दिवसभर ,काय चुकले माझे ? मी अचानक कशी जाणार होते ,घरातली कामे कुणी केली असती ? आईंना किती त्रास झाला असता ? समीर समजून का घेत नाहीत ? आपण दोघेच का आहोत घरात ? बाकीच्यांनाहि विचारयला हवे कि ,हे कळत कसे नाही ह्यांना ? एक न अनेक प्रश्न स्वताला विचारत आणि रडत ती पूर्ण दिवस घरकामे हातावेगळी करत होती .अनेक काटे तिने आतापर्यंत तिने बाजूला केले पण आज तिच्या प्रिय समीरचा राग कसा घालवायचा हा मोठा प्रश्न होता आणि आज तर संसारातले पहिले वहिले भांडण होते .ती खुपच एकटेपणा अनुभवत होती त्यात लागोपाठ आलेला उपवास ! शरीरापेक्षा मनाचा थकवा तिला जास्त जाणवत होता ...त्याच विचारात ती देवळात जावून आली ,आणखी नवस वाढविले तिच्या प्रिय पतीचा राग जावा म्हणून ,पण देव ऐकेल तर न ...एकवेळ देवाने ऐकले असते पण पतीदेव मात्र भलतेच भडकलेले !
''वहिनी नको ग काळजी करू ,किती रडशील ? येईल दादा परत ''
''अहो ताई आता तिन्हीसांज झाली ,का हो आले नाही हे अजून ,इतके हो काय चुकले माझे ?''
''काही नाही ग वहिनी तुझे काही चुकले नाही ,तू किती छान आहेस बर तो थोडावेळ रागावेल पण तुला पाहून त्याचा राग कुठच्या कुठे उडून जाईल बघ ,आधी तू फ्रेश हो आणि छान काहीतरी जेवण बनव, तुझे सौंदर्य आणि सुग्रास जेवण म्हटले तो खुश झालाच म्हणून समज !''
''हे हो काय ताई'' लाजत रमा म्हणाली खरी पण तिला हे प्रपोजल खुपच भावले ! खरच किती सुंदर असते हि नात्यांची विन एका धाग्याला गाठ पडली कि बाकीचे ती सोडवण्यासाठी लगेच धावून येतात ....जास्त धागे घेवून विणताना थोडे अवघडते पण विन अशी सुंदर बनते कि पाहणार्याने पाहत राहावे !
    रमा जोमाने कामाला लागली ,आणि काही तासात छान बेत केला तिने पण अजून समीरचा पत्ताच नव्हता ,आता मात्र तिचे राहिलेसाहिले अवसानसुद्धा गाळले ,सर्वांची जेवणे उरकली ती त्याची वाट पाहत तशीच थांबली ,आईंनी आणि बाबांनी आग्रह केला तिला जेवणाचा पण ती फक्त रडतच राहिली मग त्यांनीहि माघार घेतली .ती रडत तशीच झोपी गेली रात्री उशिरा बेलच्या आवाजाने जागी झाली तर समीर दारात ...तिच्याकडे एक कटाक्ष न टाकता सरळ त्याने बेडरूम गाठली आणि झोपी गेला तिला काही न विचारता ...ती त्याला जेवणाचे विचारू लागली ...ताट आणेपर्यंत तो झोपलेला ...उठवावे तर परत चिडायचे म्हणून ताट झाकून उपाशीच तीही शेजारी झोपली ......
     सकाळ अशीच अबोल चालू झाली, रमाची तर ताकतच नव्हती अवाक्षर काढण्याची कारण पहिल्यांदा ती समीरचा राग अनुभवत होती ...आज ताईनेच त्याला चहा नाश्ता दिला . 
''दादा तू बोललास वहिनीशी रात्री ,ती जेवली का ? कालचा तिचा उपवास ,रात्री आमच्याबरोबर नाही जेवली म्हणाली तू आल्यावर जेवेल !''
समीर ताईकडे बघायला लागला पण काही बोलला नाही परत ताईच सांगू लागली ,''दिवसभर रडत होती आई बाबा मी समजावले तेव्हा कुठे थोडी शांत झाली पण स्वयपाक करून परत एकटीच बसली कोणाशी बोलली पण नाही ''
''अग् पण मी रोज म्हणतो का हिला चल ,कालच म्हणालो न ,त्याचाही राग नाही ग पण ती उपवास म्हणली आणि माझे डोके भडकले ,काय ते तीच चालू असते देव जाने ,कधी वाटले जवळ जावे तर हिचा आपल् उपवास आहे ,सारखे ते देव धरून बसायचे ,मला काही किंमत आहे का ?''
''हो रे दादा ,पण तिच्या एका चुकीच्या गोष्टीसाठी तू तिचे शंभर चांगले गुण दृष्टीआड करतोस !हे चुकीचे नाही का ?''
''हो ग पण तिने थोडे समजून घेणे गरजेचे आहे न ''
''आहे तरी पण तू समजून घे ,खूप गोड आहे रे ती ! लगेच जा आणि बोल तिच्याशी नाहीतर दिवसभर ती जेवणार नाही ''
   समीरला उशीर झाला होता पण ती दिवसभर उपाशी राहिली असती ,तो हळूच तिच्या मागे जावून उभा राहिला तिला जवळ ओढत कानात कुजबुजला ,''सॉरी सोनू ,चुकलोच मी !''
''नाही हो ,मीच खूप वेंधळी आहे ,तुम्हाला समजूनच घेत नाही ,माझीच बडबड चालू ठेवते ,मला माफ करा ''आणि त्याला बिलगून परत रडू लागली .त्याने हळूच तिचे अश्रू पुसत मिस्कीलीने म्हणाला ,''पुढचा मंगळवार आपण दोघे उपवास करू चालेल ना ?'' ती मात्र गालातल्या गालात हसू लागली ...  

Saturday 7 January 2012

अस्तित्व

        शोधते आहे अस्तित्व माझे मी 
        घरातील चार भिन्तींच्या मध्ये 
        घराबाहेरील स्वच्छ अंगणामध्ये 
        तुळशीवृन्दावनाच्या पायामध्ये 


        शोधते आहे अस्तित्व माझे  मी 
        प्रत्येक जपलेल्या नात्यामध्ये 
        वाढविलेल्या गोंडस फुलामध्ये 
        त्यांना सुखी केलेल्या क्षणांमध्ये


        शोधते आहे अस्तित्व माझे मी
         क्षणोक्षणी  केलेल्या त्यागामध्ये 
        नको असताना भोगलेल्या भोगामध्ये  
         माझ्यावरच्या विनाकारण रागामध्ये 


        शोधते आहे अस्तित्व माझे मी  
        शब्दकोशातील स्रीच्या व्याख्येमध्ये 
        गहिवरलेल्या असंख्य  गीतांमध्ये 
        ललनेवरील सौंदर्यकथांमध्ये 


         शोधते आहे अस्तित्व माझे मी 
         आहे आशा सापडेल नक्की मला मी 
         अरे सापडले कि, अंधारलेल्या रात्रीमध्ये 
    चुरगळलेल्या सुखस्वप्नफुलांच्या  शय्ये मध्ये.

Sunday 1 January 2012

बंधन

          कधी कधी हव असतं जगात 
          प्रत्येकाला मोहमयी बंधन 
          कारण सौंदर्य तेव्हाच खुलतं
          जेव्हा लाभत प्रेमाचे कोंदण


          उरात सुगंध साठवते कळी
          हळुवार सूर्यस्पर्शाने उमलते 
          सुवासिनीच्या कुंकू भाळी
          जन्मभर तिला भुलवते 


          दिवसरात्र धरा राहते फिरत 
          रविमिलना ती  आसुसलेली
          प्रेमीयुगुल एकमेकांना बघत 
          मने त्यांची शृंगारलेली 


          वेलीची घट्ट विन झाडाला 
          त्याचे असणेही टाकते झाकून 
          संसाराची ओढ दोन जीवांनला
          स्वप्नही जातात एक होवून 


          सरिता मिळे सागराला 
          पाणी ढग होवून बरसते 
          जीव गुंतती जन्ममरणाला 
          मन मात्र बंधनाला तरसते !