या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 26 August 2015

अथांग

माझे अथांग हे जल
परि भरलेले मन
अर्पिलेले श्रीफल
बघ येई परतून

दैव देते खुप सारे
हवे तेव्हडेच घ्यावे
हाव कधी ना संपते
ज्याचे त्याला पुन्हा द्यावे

होय माणसा माणूस
तुला कळू दे रे रीत
प्रत्येकाला मिळो घास
नको वागू विपरित

मोठा हव्यास हा तुझा
घाल आवर रे त्याला
रिता होणार हा आहे
उद्या भरलेला पेला

कौतुक तुला भारी
माझ्या माघारी देण्याचे
भरल्या ओंजळीला
बंद मार्ग हे येण्याचे

नको ओंजळ फुलांची
नको दान श्रीफळाचे
नको दुर्घंदित करू
निर्माल्यने जल माझे
   संध्या .

Friday 21 August 2015

सुवर्णसंध्या ..माझी प्रेरणा

आदरणीय सुवर्णसंध्याजी ,

         गेले अनेक दिवस तुमच्याबद्दल लिहिणे मनात होते . पण आजच्या तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिहिण्यासारखा सुवर्णयोग नक्कीच कुठला नसेल ! मला तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो जेंव्हा तुम्ही माझ्या संवेदनशील असण्यावर दिलेली प्रतिक्रिया आणि माझ्या लेखनाचे केलेले कौतुक .. पुन्हा तेच सांगण्यासाठी केलेला फोन .. आज साऱ्यांनी तुमच्याबद्दल कौतुकाने लिहिले आहे ..आणि सारे किती सत्य आणि मनापासून नव्हे मनाच्या आतून लिहिलेय जागरकरांनी हे सांगणे न लगे .. तुम्ही आहातच तशा ! प्रत्येकजण जो तुम्हाला भेटेल त्याच्या मनात तुमच्याबद्दल नकळत आदरमिश्रितकौतुक उभे रहाते आणि खोलवर बिंबले जाते .. कायमचे ! मी आज इथे तुमचे माझ्या आयुष्यातील स्थान सांगणार आहे कारण तुमचे अनेक पैलू आहेत जे उलगडणे एका लेखात नक्कीच शक्य नाही .
     मी काही पहिल्यापासून लिहिणारी नाही किंवा आयुष्यातील इतर धावपळीला बाजूला ठेवून पूर्ण झोकून साहित्याचा व्यासंग करणारी कुणी विदुशीही नाही . आहे एक संसारात , व्यवसायात आणि नातेवाईकांच्या गराड्यात हरवलेली एक अशी स्री जिला तिच्या घराच्या चार भिंतीबाहेरील जग अपघातेनेच कळते . या सुरक्षित आयुष्यात असे अपघात घडले आणि मी संवेदनशील होवून लिहू लागले . त्यात माधुरी आणि सुजित दादांच्या माध्यमातून तुमच्याशी परिचय झाला आणि प्रेमाचे जिव्हाळ्याचे हे नाते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम नाते बनले .. असेही प्रत्येक नात्याला नाव हवे असे काही नाही परंतु माझ्या मनात तुम्ही गुरुस्थानी असलेली मैत्रीण आहात ! जिथे जिव्हाळ्याचे सारे बोलूही शकते आणि जिथून सतत प्रेरणादायी , मार्गदर्शक , सर्वोत्तमाच्या निर्मितीसाठी लागणारे सारे काही मला मिळते . .. माझे लेखन फक्त भावनिक पातळीवर होते , ते कसे चांगले आहे हे तुम्ही आधी सांगितलेत आणि हळुवारपणे हेही समजावलेत कि ते अभ्यासपूर्ण असायला हवे .. कळत नकळत (त्या वेळी ) तुम्ही जे मार्गदर्शन केले , जे दुवे सांगितले लिहिण्यासाठी ते वाचल्यावर माझ्या लक्षात आले मी किती कुंपणात लिहित होते ,,त्या कुंपणाबाहेर जावून .. अभ्यासूपणे लिहून .. ज्या स्रीयांची दु:खे मी सांगत आहे त्यांना न्यायही मिळवून देऊ शकते .. त्याच वेळी तुमच्याबद्दल एक न कधी लयाला जाणारी आदरभावना मनात वृद्धिंगत झाली .. मैत्रीच्या नात्याने हळुवारपणे तुम्हीं माझ्या प्रेमळ गुरुही बनलात ..
          तुमच्या आयुष्यातील चढउतरांबद्दल मी सतत इतरांकडून ऐकत आले परंतु इतक्या वेळा संभाषण होवूनही तुम्ही कधीच ते बोलल्या नाहीत .. तुमची सर्व क्षेत्रातील अभ्यासू दृष्टी सतत तुमच्या बोलण्यातून मला दिसायची ..अभ्यासू दृष्टी तर सारेच जोपासतात परंतु तुम्ही कृतीतून त्याला आकार देत आहत यासारखी स्पृहणीय गोष्ट कुठलीच नसेल ..बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !
             स्वत:च्या मर्यादांना कधीच कुंपण होऊ देऊ नका , त्यांच्या बाहेरचे जग पाहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे ..त्या मर्यादा ओलांडून पुढे जायलाच हवे आणि त्यातूनच स्व:उत्कर्ष साधणार आहे ..तुमच्या सांगण्यातून ..तुमच्या जगण्यातून मी हे नक्कीच घेत आहे .. आजवर कुंपणात गुंतलेली मी.. खरा खुरा प्रयत्न करत आहे स्वतःसाठी जगण्याचा ..अंगीच्या कलेला जोपासण्याचा .. तत्वांना मुरड न घालता त्यांचे संगोपन करण्याचा ..विवेकबुद्धी जागृत ठेवून नवे ते आत्मसात करून विवेकवादी विचारांनी समृद्ध होत विवेकपूर्ण समाजनिर्मित्तीत स्वतःच्या लेखनातून आणि कृतीतून भर घालण्याचा ... तुमची सदैव ऋणी असले मी तुम्ही दिलेल्या जीवनदृष्टीबद्दल ........
            तुमच्या आयुष्यातील या संस्मरणीय क्षणी माझ्या शुभेछ्या जरी यत्किंचित असतील तरी त्या नक्कीच माझ्या आतील आवाजाच्या आहेत .. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेछ्या ... आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिछ्या ...
                               - डॉ. सौ . संध्या राम शेलार .
 सुवर्णसंध्याजी विषयी आमच्या व पु जागर वर आलेल्या काही वाढदिवसाच्या शुभेछ्या इथे देत आहे .

  डॉ . शिवाजी काळे -


कवी हनुमंत चांदगुडे -

डॉ . सुजित अडसूळ -
मा. सुवर्णसंध्याजी .
आज आपला वाढदिवस आहे .
आपण समाजासाठी , निसर्गासाठी , पर्यावरणासाठी जे काम करत आहात त्याला तोड नाही . येणारा प्रत्येक दिवस आपणास अखंड उर्जा देत राहो .
मराठी साहित्यात एक उत्तम समीक्षक म्हणून आपले स्थान आहे . नवोदित कवी व लेखकांना आपण सतत मार्गदर्शन करताना संदेश हि देता . त्यामुळे आपला फ्यानक्लब आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने प्रतीक्षा करतो .
घरच्या सर्व आघाड्या पेलत सर्वच प्रांतात आपण सहज वावरत असता .
आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपला प्रत्येक क्षण इतरांना जगण्याची प्रेरणा देवो . हीच शुभेछ्या ...

डॉ . शुभा लोंढे-
 सुवर्णसंध्याजी

एक दिलदार सखी
माझ्या जागराची शान
काय वर्णावा तिचा महिमा
वाखाणण्याजोगा अपूर्व बाणा
कवीच्या प्रेरणाची स्वर्णकिरण
करी सदर मार्मिक विश्लेषण
समीक्षक व्याख्याती किती हे आभूषण
भरकटलेल्या समाजाची आशा
प्रत्येकाच्या सुखदु:खांची मनीषा
लाखोंची प्रेरणा अन उत्कर्षा
स्ववेदनेला तारले हरल्या निराशा
निसर्गाचे देणे त्यांनीच बहरावे
पक्ष्यांच्या विकासा धडपडावे
पोषक सुखसोईने त्यांना उभारावे
संवर्धन निसर्गाचे आदर्श जोपासावे
मायेच्या ममतेने ममतेने करी
सर्वांच्या लिखाणाचे कौतुक
शब्द शब्दात झळके विलक्षण
तेजाचे अपार प्रेम स्नेह सहेतुक
सदैव बहरावी तुझी प्रतिभा
चमकावी बुद्धी तेजाची आभा
अनंत भरारी घेवून आकाशी
मनिषा तव उदंड आयुष्य लाभो
 डॉ शुभा प्रशांत लोंढे .

सुनिता -
सुवर्णसंध्याताई ,
तुमच्यासारख्या निसर्गप्रेमी व्यक्तीचा वाढदिवस श्रावणात असणे किती सुंदर योगायोग !  जगायला शिकवणाऱ्या श्रावणाने अशी तुमच्यासारखी संवेदनशील कर्तव्यदक्ष माणसे बहाल केली . आपली लेखणी सदैव बहरत राहो श्रावणातील हिरवाईसारखी ..तुम्ही आमच्या लेखणीची प्रेरणा आहात . तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ..आरोग्य लाभो ..

डॉ माधुरी बोथटे -


अशा अनेक शुभेछ्या आहेत वेळेअभावी इतक्याच सांगितल्या ..




Saturday 15 August 2015

उतराई

ज्यांनी माझ्या सुखाची
ईच्छा व्यक्त केली
त्यांनीच मला नेहमी
आहेत दुःखे दिली

दोष तुझा नाही
प्राक्तनच माझे
आयुष्यभर आहे
वाहने हेच ओझे

प्रेमाची जवळीक ती
नको ते देणे घेणे
पावसाच्या आधीच
नशीबी विरहगाणे

शरदाचे चांदणे
जीवनावर शिंपलेस
श्रावणसरींनी त्या
चिंब भिजवलेस

आभारी म्हणून तुला
ऋणांना नाही लाजवत
माफी जरूर दे मला
तुझे जीवन नाही सजवत
       संध्या .

Sunday 9 August 2015

बाळ

   
    आई हे जसे मुलांसाठी एक गजबजलेलं गाव असते तसे मुल आईसाठी गजबजलेलं शहर आहे म्हटले तरी चालेल . त्याची जन्मल्यापासूनची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आई आपल्या हृदयात जपून ठेवत असते , शेवटच्या श्वासापर्यंत ! आमची आजी वडील आत्या चुलते यांच्या जन्मापासूनच्या आठवणी सांगायच्या , मला नेहमी आश्चर्य वाटे आजी कसे इतके सारे ध्यानात ठेवत असेल ? तेही एक मुलाचे ठीक आहे तिला तर पाच मुले आणि लहानपणी तापाने गेलेला एक , अशा साऱ्यांच्या साऱ्या आठवणी ती सांगे ! पण आज जेंव्हा मी आई आहे एका दहा वर्षाच्या मुलाची तेंव्हा लक्षात येते कि कालची भाजी काय होती हे लक्षात न राहणारी मी बाळ लहान असताना त्याने पहिल्यांदा काय खाल्ले , त्याला काय आवडे , तो पहिला शब्द काय बोलला सारे सारे मनात जपून आहे एखाद्या अनमोल दागिन्यासारखे !
   परवा बातम्या पाहत होते , अचानक एक बातमी काळीज चिरून गेली .. एका सुशिक्षित , मोठ्या पदावर विराजमान असलेल्या आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला bat ने मारून खून केला .. मन क्षणभर सुन्न झाले , असे वाटले कि उगीच टी व्ही वाले बातम्यांचा बाजार मांडून बसतात , स्वतःचा बाजार वाढवण्यासाठी ! पण प्रत्येक वाहिनीवर तीच बातमी ठळक अक्षरात झळकत होती . डोळे आपोआप गच्च झाले , मन एकदम अस्थिर बनले , क्षणभर काहीच सुचेना .. तशीच बसून राहिले थोडा वेळ .. काम बाकी होते पण मन कशातच लागत नव्हते .. बातम्यात दाखवलेले ते मुल ..किती निरागस ..कपाळाला गंध लावलेला तो फोटो .. अजून जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असणारा तो बाळ काळाच्या पडद्याआड गेला होता ! आणि कसलेही भाव चेहऱ्यावर नसलेली , पोलीस स्टेशन मध्ये जमिनीवरच मांडी घालून बसलेली ती सुशिक्षित आई ! आई ........ किती सुमधुर शब्द आणि जगाचे सारे दु:ख जिच्या पदराखाली विलीन होते ती आई .. कशी , का धजावली असेल पोटच्या पिल्लाला मृत्युच्या दारी सोडायला ? तिच्या जाणीवा अशा कशा बधीर झाल्या असतील . मुलाला एक चापट मारली तर दिवसभर रडणारी मी .. .. लिहितानाही डोळे गच्च झालेत माझे ! असे कसे त्या माउलीचे हृदय दगड बनले असेल .. जी आई साऱ्या जगाच्या ९ महिने आधीपासून त्या जीवाशी सर्व शक्तीनिशी जोडली गेलेली असते तिने असे करावे ..किती कित्त्ती प्रेमाचे , मायेचे, आपुलकीचे, दु:खाचे , रागाचे क्षण त्या दोन जीवांनी एकत्र जगलेले असतात .. त्याच्या त्या जन्मलेल्या निरागस चेहऱ्यापासून ते त्याच्या त्या नाविन्यपूर्ण हालचाली , त्याची ती इवलीशी गोड प्रत्येक अवयवाची ठेवण , त्याची ती मऊशार कोवळी त्वचा .. अनेकदा त्याला स्पर्श करायला भाग पाडणारे ते त्याचे गोजिरे रूप ! काहीच आठवले नसेल तिला ? त्या कोवळ्या जीवाला मृत्युच्या दारी सोडताना ? कितीही मोठे झाले तरी लेकराच्या स्पर्शाने हुरळून जाणारे मातृहृदय कुठे ठेवले असेल तिने .. देवा तुला एकाच विनंती आहे , प्रार्थना आहे ..अगदी मनाच्या , हृदयाच्या आतून .. मुलाला , मुलीला आईचा बळी घेणारा बनवलेस ना , या कलीयुगातील  अनर्थ म्हणून तरी मी तुला दोष देणार नाही परंतु जिने जीवन दिले त्या मातेचे हृदय असे पाषाणाचे नको करूस ...
        माझ्या जीवनातील एक चांगली आठवण इथे सांगावीशी वाटते .. आई मुलासाठी काय असते आणि मुल आईसाठी किती आनंद असते .. रागाचे अनेक प्रसंग येतात आयुष्यात पण त्याच्या प्रेमळ स्पर्शात ते कसे विरघळून जातात ही  प्रत्येक आईची आठवण असते ...

                                 माझी आठवण
   गजर वाजत होता पण आज काही अंग उचलुच वाटत नव्हते बेडवरून. सकाळी आवरायची घाई नसली कि मन आपोआप आळशी होते. मग उगीच कंटाळा येतो , आणि लवकर उठावे लागते या गोष्टीचा रागही येतो . का बरं माणसाचे मन असे असेल ? आणि ज्या दिवशी कामाची धावपळ त्या दिवशी आपोआप जाग येते , पण आज काही केल्या उठून बसावे वाटेना . मग वाटले जाऊ देत आज शनिवार आहे कुठे शाळा आहे मुलांची झाला थोडा उशीर तर होऊ देत, अजून अर्धा तास तरी पडून राहते . पण आमचे सत्योम दादा नेमक्या वेळी आमच्या मनसुब्यांवर पाणी सोडणार हे ठरलेले . शाळा असेल त्या दिवशी सात वाजले तरी ओरडून उठवावे लागते आणि नसेल शाळा तर मग मात्र सरकार सहा च्या आधीच उठणार ! त्याला शाळा नसलेल्या दिवशी जाग का येते ? या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळाले नाही ! जसे कि आई जेवायला बसली कि लहान मुल का रडते ? कुत्र्याचे शेपूट सरळ का होत नाही ?.......अश्या अनेक प्रश्नांसारखे !
   आजही माझ्या झोपेच्या सुखाची वावडी करून सत्योम बाळ उडवणार हे मात्र नक्की , काही वेळा न इतका राग येतो असे वाटते पोराच्या दोन कानाखाली काढाव्या आणि गप्प पड म्हणून ओरडावे , पण मग प्रश्नांची अशी शृंखला सुरु होते कि झोपेचे खोबरे कधी झाले हेच कळत नाही !
“मम्मी” एक हात पोटावर टाकत बाळराजाच्या झोपेची सांगता झाली ! मग मात्र एकदम खुश होऊन पोराने हळूच माझ्या गालावर ओठांचा स्पर्श केला , जणू मोरपीस फिरले गालावर ! मी सुंदर स्वप्नातून जागी होतेय असे वाटले आणि मन एकदम प्रसन्न झाले !
“का रे पिलू ?”
“माझी मम्मी न मला खूप आवडते”
“?” कुतूहलाने मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले .
“या जगात माझी सर्वात सुंदर , सर्वात प्रिय गोष्ट कुठली असेल तर माझी मम्मी .” झोप उडाल्याचा राग कुठच्या कुठे निवळला ..झुळझुळ झऱ्याच्या नितळ पाण्यासारखे मन स्वच्छ झाले आणि खळखळ डोळ्यातून वाहू लागले ....