सांजवेळ
Monday 12 December 2022
बाया
Monday 5 December 2022
जीवन खरंच सुंदर आहे !
आयुष्य सुंदर आहे ! ते जेंव्हा आनंदाने बागडत असेल , जगणं माझं आहे असे वाटेल . हे जीवन अनेकदा नकोसं होतं . दुःखाचे , अपमानाचे , कठीण प्रसंग जेंव्हा येतात तेंव्हा हेच आयुष्य संपावे इथवर आपले विचार आणि परिस्थिती आपल्याला नेते . अशा प्रसंगात अनेक आशावादी घटना सोबत घडतात आणि पिचलेल्या या जीवनाला धुमारे फुटू लागतात . जगण्याच्या धावपळीत कधी असे सखे भेटतात कि पुन्हा आयुष्याने , जगण्याने भरारी घ्यावी . कधी साध्या सरळ घटना नवे आयाम देत राहतात आपल्या जगण्याला .. त्या घटनामधील सहभाग तर आणखी सुखावून जातो . अन्न, पाणी , निवारा या मुलभूत गरजा प्रत्येक सजीवाच्या असतातच . त्या पूर्ण झाल्या कि आणखी एक गरज असते ती प्रत्येक जीवन त्याच्या सर्व शक्यतांसह उमलून , फुलून यावे यासाठीची वातवरण निर्मिती असणे ! तो प्रत्येक सजीवाचा अधिकार आहे .
या दिवसांमध्ये opd थोडी शांतच असते तेंव्हा बाहेर डोकावण्याला अनेकदा वेळ मिळतो . कालपासून एक साधारण दोन महिन्यांचे एक कुत्र्याचे तांबडे पांढरे पिलू दोन्ही बाजूच्या रस्त्यावर , चौकात आणि हॉस्पिटलच्या समोरच्या झाडांच्या आसपास भटकत होते . संपूर्ण त्वचा हाडांच्या सापळ्याला चिकटलेली , पोट खपाळी गेलेले , डोळ्यात एक प्रकारचा अविश्वासाचा भाव , गळ्यात वळलेल्या चिंध्यांची दोरी बांधलेली . त्या दोरीमुळे आधी वाटले हे कुणीतरी पाळलेले पिलू असेल परंतु ते कालपासून कुठेच गेले नाही . इथेच चौकात फिरत होते . बहुतेक कालपासून उपाशीच होते . त्याला काही खायला द्यावे या हेतूने आम्ही त्याला यु यु करून आवाज दिला कि ते जास्त वेगाने लांब पळू लागले . त्याच्या नजरेतला अविश्वास आणि भीती काळजाला कापत होती . मग आम्ही जास्त निर्धाराने त्याला खायला घालायचा चंगच बांधला . त्याला जेंव्हा भाकरी दाखवून बोलावू लागलो तेंव्हा मात्र ते लांब उभे राहून आम्हाला बघू लागले . त्याला खायला टाकून आम्ही बाजूला गेलो आणि त्याने ती भाकरी उचलून नेऊन बाजूला जाऊन खाल्ली . गटारीचे पाणी पिऊन समोरच्या बंद डेअरी समोर जाऊन झोपले . रस्त्याने दुसरी कुत्री आली कि हे पिल्लू भिऊन बाजूला जाऊन बसे . त्याच्यावर इतर प्राणी आणि माणसे यांच्याबद्दलची भीती , अविश्वास त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत होता . शेवटी त्याचा विश्वास जिंकायला आम्ही यशस्वी ठरलो आणि हॉस्पिटल बंद करायच्या वेळी ते दारात येऊन शांत पहुडले . जवळून पाहताच ते अधिकच कृश दिसत होते . काही दिवसापासून बहुतेक ते अर्धपोटी असावे . कुणीतरी पाळलेले पिलू रस्त्यावर सोडले होते . बहुतेक त्या माणसांकडून त्याची छळवणूक पण झाली असावी म्हणून ते माणसांपासून लांब पळत होते . एक केविलवाणा जीव रस्त्यात भीतीने , उपाशीपोटी अन्न शोधात भटकत होता . लवकरच आई वेगळा झालेला आईच्या कुशीची उब तर शोधत नसेल ?
रात्री हळूच दुध चपातीचा काला दाराबाहेर सरकवला . आधी भीतीने ते पिलू बाजूला झाले पण नंतर खाणे आहे पाहिल्यावर त्या दुध चपातीवर तुटून पडले . अधाशीपणे त्याने ते सारे संपवले . आणि बाजूच्या पोत्यावर जाऊन ते पहुडले . आम्ही ते पोते त्यासाठीच कोपऱ्यात टाकून ठेवले होते . मीही समाधानाने झोपी गेले . दुसऱ्या दिवशी मात्र आमची वाट बघत ते दारातच बसून होते . सकाळी पुन्हा दुध काला दिला . पोटभर खाऊन ते इकडे तिकडे हुंदडत राहिले . आम्ही कुणीच त्याला इजा पोहचवणार नाही याची खात्री त्याला दुपारपर्यंत पटली आणि ते आमच्या जवळ फिरू लागले , बाहेर गेल्यावर पायात घुटमळू लागले . जरी कृश होते तरी अत्यंत देखणे काजळ भरल्यासारखे डोळे , मोहक चेहरा त्याला जवळ घ्यायला भाग पाडत होता . शेवटी आम्ही जवळ घेऊन त्याच्या मानेचा तो दोर काढला आणि पाहिले तर ती होती ..तो नाही ! तेंव्हाच लक्षात आले त्या दोरामागचे कारण . कुणीतरी कुत्रे (male dog ) म्हणून त्याला पाळले आणि ती 'ती ' आहे हे कळल्यावर 'ति'ला रस्त्यावर सोडले . या अशा प्राण्यांचे आयुष्य खूप भयानक असते . कारण आधी ते पाळीव असतात तेंव्हा त्यांना अन्नासाठी झगडावे लागत नाही आणि बाहेरच्या इतर भटक्या कुत्र्यांसारखे माणसे आणि भटक्या प्राण्यांच्या हिंसेलाही सामोरे जावे लागत नाही . मग अन्न शोधणे आणि प्रतिकार करणे या दोन्ही गोष्टी या प्राण्यांना जमत नाहीत . आधी पाळलेली आणि नंतर रस्त्यावर सोडलेले हे प्राणी जगण्यासाठीचे झगडणे न शिकल्यामुळे रस्त्यावर मरून पडतात . त्यांची सगळ्यात मोठी वेदना असते त्याच्या मालकाने केलेला विश्वासघात ! आणि तेच त्यांच्या मृत्यूचेही कारण असते . म्हणून सो कॉल्ड प्राणी -प्रेमींनी असे करू नये . तुमच्या मौजेसाठी , उपयोगासाठी एखाद्या मुक्या जीवासोबतखेळू नये .
दुसऱ्या दिवसापासून मात्र आमचा हा नवा मित्र चांगलाच मोकळा वागू लागला . आल्यावर पायात घोटाळणे , मागे मागे फिरणे , लांब जाऊन शी शु उरकणे , हॉस्पिटलच्या आवारात इतर प्राण्यांना येऊ न देणे . एकूणच त्याच्या देहबोलीत झालेला हा अमुलाग्र बदल आम्हाला विशेष सुखावून गेला . शेपूट खाली घेऊन भिऊन इकडे तिकडे फिरणारे , अविश्वासाने जवळ न येणारे हे पिल्लू आज विश्वासाने , शेपूट वर फडकावत सगळ्या आवारात फिरत होते जसे कि हे सर्व त्याच्यासाठीच बनले आहे ! जीवन आता खरंच सुंदर आहे !
Friday 10 December 2021
मौन
Saturday 24 July 2021
सिंबा द किंग
Sunday 17 January 2021
तुझ्या जगण्यासाठी
ते उभ्या करतील तत्वज्ञानाच्या भिंती .
तू लढत असशील रोजच्या जगण्यासाठी ..
ते सिद्ध करतील ..
तुझी लढाई कशी आहे समाजशास्त्राच्या बाहेरची
पण तरी तू लढत राहशील ..तुझ्या जगण्यासाठी ..
तुझा आक्रोश नाही पोहचणार त्यांच्या कानापर्यंत
कारण त्यांनी भिंतींवर छत आणि दरवाजेही बनवले असतील ..
तुझे एकेक अंग तुटत राहील ..तू धडपडत राहशील जगण्यासाठी..
तरी तू सांगत राहशील ..
तुझ्या एकाकी लढाईची कथा …
तुझ्या जगण्यातील त्यांचा राक्षस आता मोठा होईल ..
आक्राळविक्राळ …
तुझ्या आणि त्यांच्याही भिंती डगमगतील आणि जमिनोदस्त होतील ..
तु अजूनही लढत असशील रोजच्या जगण्यासाठी…
ते मात्र गाडले जातील ..भल्यामोठ्या तत्वज्ञानाखाली !
Thursday 8 October 2020
मनात ठाण मांडून बसणारा कवितासंग्रह , ' सगळं उलथवून टाकलं पाहिजे '
हार्मिस प्रकाशनने 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे ' हा देवा झिंजाड यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केला आहे . तो मिळाल्यावर वाचायला थोडा वेळ लागला परंतु सुवर्णाताईने आधीच पुस्तकावर अभिप्राय त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहिला होता तेंव्हाच पुस्तक वाचण्याची उत्सुकता होती . म्हणून जसा वेळ मिळेल तशी एक एक कविता वाचत गेले . टायघाल्या ही कविता आधीच वाचण्यात आणि ऐकण्यात होती . ग्रामीण जीवनात शेतकरी हा अविभाज्य भाग त्याच्या आयुष्याची परवड आणि त्याबद्दल शहरी मनाची असंवेदनशीलता याचे अगदी रांगड्या भाषेत वर्णन करणारी हि कविता तेंव्हाच मनाच्या कोपऱ्यात घर करून गेलेली . ' गाडग्यामडक्यात गोमतार साठविणाऱ्या अन रक्त आटवून बाटूक जगवणाऱ्या डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी गावठी गाईचंच काळीज लागतं ' गावातील जगणं जितकं पोटतिडकीने मांडले आले तितकेच रागाने कवी विचारतात ' घराघरात भांडणं लावणाऱ्या एकता कपूर मालिका पाहताना ओघळणारं पाणी काय कामाचं '
ग्रामीण जीवन रेखाटताना ग्रामीण स्त्री सर्वाधिक शोषित आहे . तिच्यावर केलेल्या बऱ्याच कविता कवीच्या संवेदनशील मनाची आणि त्यांनी सोसलेल्या वेदनांची साक्ष देतात . अगदी साध्या , रोजच्या जीवनातील दुर्लक्षित अशा वस्तूंचा / गोष्टींचा आधार घेत ग्रामीण स्त्रीच्या दुर्लक्षित वेदनांचे वर्णन कवी करतात . चुंबळ ही तशीच कविता . ' ओझ्याखालची चुंबळ आणि चुंबळीखालची बाई .. अवस्था दोघींची सारखीच होई ..' पुढे कवी म्हणतात , 'एकदा चपटी झाली कि कायमची अडगळीत फेकून दिली जाते .' हे यथार्थ असे स्त्रीजीवनाचे वर्णन आहे . कवीच्या डोळ्यांनी पाहिलेली ही स्त्री किती पुरूषहृदयांना हळवं करत असेल ?
बैल आणि शेतकरी यांच्यातील नातेही जितके विलोभनीय तितकेच हळवे आणि प्रेमळही असते . ' अर्धी बादली ' ही कविता त्याच नात्याचे मनाला स्पर्शून जाणारे वर्णन करते . कवीचा स्रियांसाठीचा आणि विशेषतः शोषित स्रियांबद्दलचा आशावाद अजून कायम आहे . म्हणून इंदिरा या त्यांच्या कवितेत ' आणि घडावी एखादी तरी इंदिरा गावाबाहेरच्या इंदिरा आवास योजनेतून .. ' . आताच्या दिखाऊ जमान्यात दिखाऊ गोष्टींचे जे स्तोम माजलेय त्याने महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्याही व्यापून टाकल्या आहेत . आणि म्हणून भीती वाटतेय कवीला , ते डीजे या कवितेत म्हणतात , 'ह्या दिखाऊपणाच्या भडक युगात डीजेवाले महापुरुषांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरतील .' कवी फक्त बंडखोर लेखन करून थांबत नाहीत तर म्हणतात , 'काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथवून टाकलं पाहिजे ' माणसाचे आयुष्य जेंव्हा भोगत सहन करत वेदनेच्या अत्युच्य कड्यावर जाते तेंव्हा त्याला उलथवून टाकण्याची बदलवून टाकण्याची उर्मी झपाटून टाकते . हा कवितासंग्रह अशाच अत्युच्य वेदनांचा कडेलोट झाल्यावर निर्माण होणाऱ्या मनोअवस्थेतून साकार झालाय हे प्रत्येक कवितेत जाणवत राहते . ती वेदना ते कष्ट तो आशावाद आपल्या नेणिवेत साठत जातो . पांढरपेशा समाजावर ओढलेले ओरखडे आपल्या काळजावर कधी उमटतात हे समजतच नाही . कवीचे दुःख वेदना कधीच आपले होऊन जातात आणि उलथवून टाकण्याच्या , बदल करण्याच्या आशा उभारी घेऊ लागतात , उगवू लागतात मनातून !
शहरी मनातील बोथट होत गेलेल्या संवेदनांची प्रचिती बऱ्याच कवितांमधून येते . कवीची शहर आणि ग्रामीण जीवनाची दरी दाखवण्याची आणि ती सांधण्याची तळमळ प्रत्येक कवितेत दिसते . ' केली जाते बेडवर पडल्या पडल्या बिनदिक्कतपणे समीक्षा गादीवाफ्यांवर भाजी खुडणाऱ्या हातांची ' . श्रीमंत तुकडे अशीच एक कविता , ' पण होतात तेव्हा अनंत वेदना आतड्याला जेव्हा बघतो मी शिळ्या भाकरीचे श्रीमंत तुकडे डस्टबिनमधे ...' म्याकडोनाल्ड जातीच्या जिभा मधे कवी लिहीतात ' मिल्कशेक पिणार्या ह्या शहरी तोंडांना कधीच नाही कळणार गायीचे पाय बांधून पिशवीत भरून पाठवलेलं अमृत ..अन टूळटूळीत डोळ्यानं पहात पहात एका दुधाच्या घोटासाठी रडणारी लहान लहान वासरं '.डोळ्यात आपोआपच पाणी आणणारं हे काव्य काळजात ठाण मांडून बसतं !
आईच्या संस्कारात वाढलेल्या कवीला फक्त आईचं नाही तर सगळ्या बायांचं दुःख दिसतं आणि शब्दाशब्दातून थरथरत राहतं . चिंचा बोरी या प्रतिकात्मक रूपात त्या अवतरतात कवितेत . कधी चुंभळीचं आणि बाईचं दुःख एक होतं . कुमारी जी नासवली जाते याचे मनाला घायाळ करणारे काव्य उमटते ' गांडूरोग ' या कवितेत . ' कवटी फुटल्यावर तिची आई एकटीच गेली तडातडा चालत रानात झाडपाल्याचं औषध आणायला लेकीच्या कोवळ्या मायांगावर लावण्यासाठी ..'.भुंड्या हातांनी या कवितेत आलेली आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या बायकोची वेदना आणि तरीही हार न मानता तिचं आयुष्याला भिडणं निशब्द करून जातं ..कवीनं विचारलेला प्रश्न ' पण करते का कधी माती आत्महत्या ?' विचार करायला भाग पाडतो . पुढे जाऊन उत्तरही कवीच देतात म्हणतात ' सावरत राहते त्याच्या स्वप्नातील शिवार तिच्या भुंड्या हातांनी ...' काळ्या आईला विकणार्या गुंठाधारकांवरही कवीच्या शब्दांचा आसूड वार करतो . कवी खेदाने म्हणतात ,' तरी म्हणत नाही तिला कुणी हल्ली काळी आई ह्या गुंठापुजकांच्या टोळीत ..' ' पदर ' ही कविताही अशीच पाळीत नाकारलेल्या स्त्रीची व्यथा मांडणारी . ग्रामीण भागात देवीच्या उत्सवात अनेक बायका देवीला विटाळ होतो म्हणून पाळी आलेल्या बायकांना लांब बसवतात . कुठल्याच कामात आणि उत्सवात त्यांना सामील केले जात नाही . त्या स्त्री देवतांना प्रश्न विचारायला न भिणारा कवी म्हणतो , 'ऍलर्जी आहे का तुमच्या भरजरी पदराला ? पदर आलेल्या बायकांची ?' पुढे जाऊन कवीच सांगतो , ' अगं ...अवघ्या जगाला जगवणारी माती मानत नाही विटाळ मग तू मातीपेक्षा मोठी आहेस का ? '.कावळा शिवला की ..ही कविताही याच आशयाची ..' पण कावळा शिवला की परत परत गोधड्या रूढीपरंपरांच्या दारात मारून मुटकून बसवल्या जातात .' बांगडी कविताही स्त्रीच्या जीवनाचे वर्णन करणारी आहे . स्त्रीचे दुःख गरीब श्रीमंतीच्या बाहेरचे आहे . म्हणून कवी म्हणतात ,' गरीब असो वा श्रीमंत सदैव..त्याच परिघात किणकिणत राहते बांगडी ' .
असा हा कवी देवा झिंजाड यांचा कवितासंग्रह नक्कीच वेगळा आहे . ग्रामीण शहरी जीवन , ग्रामीण स्त्री जीवन , मुर्दाड समाजव्यवस्था , राजकीय उदासीनता , स्त्रीयांच्या जीवनातील व्यथा , उतारवयात आलेली लाचारी अशा अनेक प्रश्नांना आपल्यासमोर मांडतो हा कवितासंग्रह ! आणि कवी आता बदल हवा ही जाणीव मनामनात पेरतात ..सगळं उळथवून टाकलं पाहिजे म्हणत मनात ठाण मांडून बसते ती देवा झिंजाड यांंची कविता !. संग्रही असावाच असा कवितासंग्रह ..जो या दिशाहीन काळात उलथवून उभं राहण्याची प्रेरणा देईल !
डॉ संध्या राम शेलार .