या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 23 June 2014

गुरु !

    काही क्षण असे येतात , क्षणात  संपूनही  जातात , कधी संपले हे कळायच्या आत ते भूतकाळ होतात . असे काही निखारे पदरात टाकून जातात कि का झाले ? कसे झाले ? असे केले असते तर टाळले गेले असते का ? मला आज सुचते आहे तेंव्हा का नसेल सुचेल ? प्रश्न आणि अनेक उत्तरे परंतु ती उत्तरे द्यायची वेळही निघून गेलेली ! पण ती वेळच अशी येते कि सारी बुद्धी त्यावेळी निकामी होती काय ? किंवा कसली अशी भूल पडली त्या वेळी ? या प्रश्नांनी आधी मन हैराण होते आणि मग उदासीन ! उदासी इतकी अमर्याद असते कि आपल्या जीवनाला निरर्थक ठरवण्यापर्यंत मनाची मजल जाते .
     खरच जीवन निरर्थक आहे का ? कुणाच्या जीवनातील अस्तित्वामुळे त्याला अर्थ येतो का ? कुणाच्या नाराज होण्याने ते तिथेच थांबते का ? या प्रश्नांची उत्तरे नाहीपाशी येऊन थांबतात ! जर याचे उत्तर नाही आहे तर जीवनातील अर्थ म्हणजे काय ? तो त्याला कसा द्यायचा ? हि विद्या या मनुष्याला कोण शिकवणार ? कि जीवनाच्या शेवटीच हे सत्य उमगणार का ? आणि जर तेंव्हा हे कळणार असेल कि आपण का जगतो तर तेंव्हा वेळ निघून गेलेली असेलच न ?
   हे जीवनाचे सार , सत्य वेळेआधी उलगडणे हि आजच्या तरी काळाची गरज झाली आहे ...समाजात कलीने पाय रोवलेले असताना या आयुष्याच्या नावेला पैलतीर दाखवणारा असा एकच  आहे आणि तो आहे तो परमात्मा ! पण तो भेटणार कसा ? अनेक तपे करूनही त्याची प्राप्ती नाही ! पण त्याच दयाळू ईश्वराने हे ज्ञान उलगडून दाखवले गीतेमध्ये ! तीच गीता माणसाला  जीवनाचा खरा अर्थ सांगते . जे अनेक प्रयोगांनी शास्त्रज्ञांना उमजले नाही ते गीता सांगते . पण गीतेचे हे क्लिष्ट ज्ञान मराठीत समजावले ते जगद्गुरू ज्ञानेश्वर माउलींनी ! आणि तेच अमृत अनुभव सामान्यजनांना भरवले ते गुरूंनी !
    मी माझे रोजचे काम आणि नाती सांभाळण्यात अशी कसरत करत होते कि त्यापलीकडे काही विश्व आहे हेच जणू काही मला ज्ञात नव्हते . परमेश्वराची आराधना करायची ती आपली भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी इतकेच मी करत होते . हे प्राप्त झाले कि ते दे म्हणून त्याची आराधना , उपास ,यात्रा यातच जीवन  अडकून पडलेले . हे करत असताना देवाने मला हे दिले नाही म्हणून त्याचा दु:स्वास करण्यापर्यंत मन धजले . पण या कर्मकांडातून बाहेरचा मार्ग दाखवला आमच्या परमपूज्य गुरूंनी ! ह.भ.प. गोरखनाना शेलार ! आम्ही त्यांना फक्त नाना म्हणायचो . तसे पहिले तर त्यांचे फक्त एकच प्रवचन मी ऐकले . ते भेटले मला ते प्रत्येक वेळी पेशंट म्हणून . पण त्या काही मिनिटांच्या भेटीत ते असे काही सांगत कि ते मनाला स्पर्शून जाई . प्रत्येक वेळी असे काहीतरी शिकवून जात , कि त्या वेळी ते उमजत नसे परंतु जेंव्हा निवांत त्यांच्या बोलण्याचा विचार करत बसे तेंव्हा कळायचे कि नाना आपल्याला शिकवून गेले !
    मागच्या गुरुपौर्णिमेच्या वेळी माझी मनोमन खूप इच्छा होती कि नाना सर्वांना अनुग्रह देतात मग मी पण या वेळी घेणार . बाकीच्या जाणाऱ्यांना मी मला न्या म्हणून सांगितलेही परंतु गाडी दारात आली आणि माझ्याकडे  डिलेव्हरीसाठी एक पेशंट आली . मन खूप हिरमुसले , परंतु मी न जाता ते पेशंट पहिले . त्यानंतर साधारण दोन दिवसांनी नाना आजारी असल्याने आमच्याकडे आले . मी मनातील खंत बोलून दाखवली . मला अनुग्रह हवा होता . नानांनी बाकीच्या गोष्टी बोलून झाल्यावर शेवटी सांगितले तुमची हि सेवा हीच ईशसेवा आहे ! त्या वेळी मला काही समजले नाही , परंतु रात्री झोपेची आराधना करत असता तो प्रसंग पुन्हा आठवला आणि मला माझा अनुग्रह मिळाला !
    त्यानंतर बऱ्याचदा ते घरी आले अनेक विषयांवर चर्चा झाली . मी एक ज्ञानेश्वरीची प्रत आणली होती आणि देव्हाऱ्यात ठेवली होती . ती नानांनी पहिली . आम्ही त्यांना विचारत होतो काय वाचत जाऊ म्हणून , त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरी ! नाही जमले वाचायला तर फक्त रोज एकदा डोके टेकवा त्यावर !
    मला नेहमी आश्चर्य वाटे कि एक सोफ्टवेअर इंजिनिअर या मार्गाकडे वळू शकतो आणि तेही त्यामध्ये इतके गाढ ज्ञान संपादन करू शकतो तेही नोकरी सांभाळून !
    एका दशक्रिया विधीला गेले असता तिथे मला एक हरिपाठाचे एक पुस्तक भेट मिळाले . मी या आधी हे पुस्तक पाहिलेही नव्हते , फक्त ऐकून होते . ते त्या वेळी मी तसेच ड्रोवर मध्ये टाकले , नंतर अश्याच एका निवांत वेळी मी वाचू लागले . जास्त काही समजत नव्हते परंतु वाचले . नंतर नाना सर्दी आहे म्हणून दवाखान्यात आले . त्या वेळी नानांनी विचारले काही वाचता का ? त्यांना नमस्कार करत मी म्हटले नाना हरिपाठ वाचते पण समजत नाही .. नाना बोलले कि समजत नसेल तरी वाचत राहा ...नक्की समजेल . ते त्यांचे शेवटचे शिकवणे ठरले . त्या आजाराने ए आर डी एस चे रूप घेतले आणि त्यातच नानांची प्राणज्योत मालवली . ....
                      माझिया मनीचा जाणोनिया भाव तो  करी उपाव गुरुरावो //१ //
                       आवडीचा मंत्र सांगितला सोपा / जेणे नोहे गुंफा कोठे काही //२//