या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 12 December 2022

बाया

बाया करतात बाराही महिने व्रतवैकल्ये..
बिघडल्या प्राक्तनाचा फेर बदलावा म्हणून..
तो मात्र तसाच पिळत राहतो तिला आतबाहेर! 
तिची श्रद्धा अफाट.. सातातले सात दिवस आळवत राहते ती... साऱ्याच देवांना...
कुणालाच नाही घाम फुटत ...ना देवघरात ना घरात ...
बाकी बाया सांगत राहतात ..
नवी नवी व्रते.. कुणी सांगत नाही .. स्वातंत्र्याचे गाणे ...
युगेयुगे ते गायलेच नाही कुठल्या बाईने! 
बयो तू तुझी हो ...गा तुझेच गीत ...
बिघडलेला फेरा कर सरळ धैर्याने..तुझे प्राक्तन तूच लिही...तुझ्या स्वतंत्र शाईने... 
सृष्टीच्या निर्मातीला नाही शोभत हतबल होणे ..
आता हो निऋतिची लेक ..
हो सम्राज्ञी तुझ्याच जन्माची ! 
तुझ्यात वसली आहे नियती आणि दैव तुझे !  
                 

Monday 5 December 2022

जीवन खरंच सुंदर आहे !

          आयुष्य  सुंदर आहे ! ते जेंव्हा आनंदाने बागडत असेल , जगणं माझं आहे असे वाटेल . हे जीवन अनेकदा नकोसं होतं . दुःखाचे , अपमानाचे , कठीण प्रसंग जेंव्हा येतात तेंव्हा हेच आयुष्य संपावे इथवर आपले विचार आणि परिस्थिती आपल्याला नेते . अशा प्रसंगात अनेक आशावादी घटना सोबत घडतात आणि पिचलेल्या या जीवनाला धुमारे फुटू लागतात .  जगण्याच्या धावपळीत कधी असे सखे भेटतात कि पुन्हा आयुष्याने , जगण्याने भरारी घ्यावी . कधी साध्या सरळ घटना नवे आयाम देत राहतात आपल्या जगण्याला .. त्या घटनामधील सहभाग तर आणखी सुखावून जातो . अन्न, पाणी , निवारा या मुलभूत गरजा प्रत्येक सजीवाच्या असतातच . त्या पूर्ण झाल्या कि आणखी एक गरज असते ती प्रत्येक जीवन त्याच्या सर्व शक्यतांसह उमलून , फुलून यावे यासाठीची वातवरण निर्मिती असणे ! तो प्रत्येक सजीवाचा अधिकार आहे . 

       या दिवसांमध्ये opd थोडी शांतच असते तेंव्हा बाहेर डोकावण्याला अनेकदा वेळ मिळतो . कालपासून एक साधारण दोन महिन्यांचे एक कुत्र्याचे तांबडे पांढरे  पिलू दोन्ही बाजूच्या रस्त्यावर , चौकात आणि हॉस्पिटलच्या समोरच्या झाडांच्या आसपास भटकत होते . संपूर्ण त्वचा हाडांच्या सापळ्याला चिकटलेली , पोट खपाळी गेलेले , डोळ्यात एक प्रकारचा अविश्वासाचा भाव , गळ्यात वळलेल्या चिंध्यांची दोरी बांधलेली . त्या दोरीमुळे आधी वाटले हे कुणीतरी पाळलेले पिलू असेल परंतु ते कालपासून कुठेच गेले नाही . इथेच चौकात फिरत होते . बहुतेक कालपासून उपाशीच होते . त्याला काही खायला द्यावे या हेतूने आम्ही त्याला यु यु करून आवाज दिला कि ते जास्त वेगाने लांब पळू लागले . त्याच्या नजरेतला अविश्वास आणि भीती काळजाला कापत होती . मग आम्ही जास्त निर्धाराने त्याला खायला घालायचा चंगच बांधला . त्याला जेंव्हा भाकरी दाखवून बोलावू लागलो तेंव्हा मात्र ते लांब उभे राहून आम्हाला बघू लागले . त्याला खायला टाकून आम्ही बाजूला गेलो आणि त्याने ती भाकरी उचलून नेऊन बाजूला जाऊन खाल्ली . गटारीचे पाणी पिऊन समोरच्या बंद डेअरी समोर जाऊन झोपले . रस्त्याने दुसरी कुत्री आली कि हे पिल्लू भिऊन बाजूला जाऊन बसे . त्याच्यावर इतर प्राणी आणि माणसे यांच्याबद्दलची भीती , अविश्वास त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत होता  . शेवटी त्याचा विश्वास जिंकायला आम्ही यशस्वी ठरलो आणि हॉस्पिटल बंद करायच्या वेळी ते दारात येऊन शांत पहुडले . जवळून पाहताच ते अधिकच कृश दिसत होते . काही दिवसापासून बहुतेक ते अर्धपोटी असावे . कुणीतरी पाळलेले पिलू रस्त्यावर सोडले होते . बहुतेक त्या माणसांकडून त्याची छळवणूक पण झाली असावी म्हणून ते माणसांपासून लांब पळत होते . एक केविलवाणा जीव रस्त्यात भीतीने , उपाशीपोटी अन्न शोधात भटकत होता . लवकरच आई वेगळा झालेला आईच्या कुशीची उब तर शोधत  नसेल ?

       रात्री हळूच दुध चपातीचा काला दाराबाहेर सरकवला . आधी भीतीने ते पिलू बाजूला झाले पण नंतर खाणे आहे पाहिल्यावर त्या दुध चपातीवर तुटून पडले . अधाशीपणे त्याने ते सारे संपवले . आणि बाजूच्या पोत्यावर जाऊन ते पहुडले . आम्ही ते पोते त्यासाठीच कोपऱ्यात टाकून ठेवले होते . मीही समाधानाने झोपी गेले . दुसऱ्या दिवशी मात्र आमची वाट बघत ते दारातच बसून होते . सकाळी पुन्हा दुध काला दिला . पोटभर खाऊन ते इकडे तिकडे हुंदडत राहिले . आम्ही कुणीच त्याला इजा पोहचवणार नाही याची खात्री त्याला दुपारपर्यंत पटली आणि ते आमच्या जवळ फिरू लागले , बाहेर गेल्यावर पायात घुटमळू लागले . जरी कृश होते तरी अत्यंत देखणे काजळ भरल्यासारखे डोळे , मोहक चेहरा त्याला जवळ घ्यायला भाग पाडत होता . शेवटी आम्ही जवळ घेऊन त्याच्या मानेचा तो दोर काढला आणि पाहिले तर ती होती ..तो नाही ! तेंव्हाच लक्षात आले त्या दोरामागचे कारण . कुणीतरी कुत्रे (male dog ) म्हणून त्याला पाळले आणि ती 'ती ' आहे हे कळल्यावर 'ति'ला रस्त्यावर सोडले . या अशा प्राण्यांचे आयुष्य खूप भयानक असते . कारण आधी ते पाळीव असतात तेंव्हा त्यांना अन्नासाठी झगडावे लागत नाही आणि बाहेरच्या इतर भटक्या कुत्र्यांसारखे माणसे आणि भटक्या प्राण्यांच्या हिंसेलाही सामोरे जावे लागत नाही . मग अन्न शोधणे आणि प्रतिकार करणे या दोन्ही गोष्टी या प्राण्यांना जमत नाहीत . आधी पाळलेली आणि नंतर रस्त्यावर सोडलेले हे प्राणी जगण्यासाठीचे झगडणे न शिकल्यामुळे रस्त्यावर मरून पडतात . त्यांची सगळ्यात मोठी वेदना असते त्याच्या मालकाने केलेला विश्वासघात ! आणि तेच त्यांच्या मृत्यूचेही कारण असते . म्हणून सो कॉल्ड प्राणी -प्रेमींनी असे करू नये . तुमच्या मौजेसाठी , उपयोगासाठी एखाद्या मुक्या जीवासोबतखेळू नये . 

      दुसऱ्या दिवसापासून मात्र आमचा हा नवा मित्र चांगलाच मोकळा वागू लागला . आल्यावर पायात घोटाळणे , मागे मागे फिरणे , लांब जाऊन शी शु उरकणे , हॉस्पिटलच्या आवारात इतर प्राण्यांना येऊ न देणे . एकूणच त्याच्या देहबोलीत झालेला हा अमुलाग्र बदल आम्हाला विशेष सुखावून गेला . शेपूट खाली घेऊन भिऊन इकडे तिकडे फिरणारे , अविश्वासाने जवळ न येणारे हे पिल्लू आज विश्वासाने , शेपूट वर फडकावत सगळ्या आवारात फिरत होते जसे कि हे सर्व त्याच्यासाठीच बनले आहे ! जीवन आता खरंच सुंदर आहे !