या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Sunday 31 May 2015

व पू जागर शब्दांचा स्नेहमेळा

पहिला पाऊस , पहिलं प्रेम , पहिलं सारं काही मग त्याचा चांगला वाईट कसाही अनुभव आला तरी ते निरअतिशय सुंदर असतं . आठवणींच्या चांगल्या वाईट रसकथांनी भरलेलं आभाळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतच म्हटले तरी वावगे ठरणारच नाही . कधी तरल स्वर तर कधी कर्णकर्कश्य किंकाळी ...तर कधी दिर्घ शांतता .. पण जेव्हा ते  आठवणींनी भरून आलेलं आभाळ रितं होतं ना एखाद्या निवांत क्षणी तेव्हा नुसतं मनच उजळत नाही तर आत्म्यालाही ते प्रकाश देवून जातं ..
   माझ्याही आयुष्यातील सार्या पहिल्या आठवणी कधी पाऊस तर कधी रूक्षता देऊन जातात . पण त्यांच पहिलेपण अजून सरता सरत नाही .
असाच एक सुवर्णक्षण काल माझ्या आयुष्याला प्रगल्भ आणि अनुभवसमृद्ध करून गेला .दिग्गज  कवी लेखकांच्या त्या समृद्ध मैफीलीत माझे आयुष्य उजळत आहे असेच वाटत होते . मनाला प्रकाशमय करणारे ते क्षण मी पहिल्यांदा अनुभवत होते  . आयुष्य एका चौकटीत जगणारी मी त्या क्षणी वर्तुळातील मोकळीक जगत होते . खरंच फक्त भांबावले होते . गतीमान ह्रदयस्पंदनांना कसे आवरावे ?  कुणी पाहील का माझे बावरलेपण ? हेरलेच ! शुभाजी तुम्ही !
  हे पहिलं वहिलं  पुनवचांदणं त्याच्या शितल प्रकाशाने माझे जीवन परिपूर्ण करेल याबद्दल मन निशंक आहे ! 
  काल स्नेहमेळाव्यात प्रवेश करताना मन खुप कातर झालं होतं . परंतू त्या प्रेमभरल्या स्निग्ध स्वागताने जीव हरकून गेला . प्रत्येकजण ओळख करून घेताना कुणी खुप जीवलग आहे असेच मन वारंवार सांगत होते .  हा आपलेपणा आपण घरच्या कार्यक्रमातच अनुभवतो फक्त ! एका प्रेमळ घराचाच हा स्नेहमेळा होता .
    कवी हनुमंत चांदगुडे त्यांचे नाव आपोआपच मनात कायम होते त्यांची कविता वाचली की ! तशी मनात एक धाकधूक . . . किती मोठं वलय या नावाभोवती . . . ओळख होताना जाणवले त्यांचे माणुसपण . . विनम्र व्यक्तीमत्व ! ऊंचावर असणार्यांचे पाय हातभर हवेत असतात परंतू सरांचे पाय मात्र या लोकप्रियतेच्या ऊंचीवर असून जमिनीवर ... नव्हे जमिनीत रूतलेलेच ...
                        ऊंज पर्वतासारखी
                        माझी एक सवय आहे
                        हात जरी गगनाला
                        धरेत मूळ घट्ट आहे
यापेक्षा वेगळे तुम्ही नाहीच सर . आणि आमच्या कवितेच्या मदतीला धावून येणं ... खरंच तुमच्याबद्दल आदरयुक्त आपलेपणाच वाटतो आहे . तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल तर आम्ही नवागताने काय बोलावे .. प्रत्येक ओळीनंतर फक्त वाह .... इतकेच !  तुमच्या अनुभवाचे आणि तुमचे आशिर्वाद  सदैव रहावे ईतकीच ईच्छा !
    डॉ शिवाजी काळे ... माझा जवळचा मित्र . त्याची काव्यप्रतिभा म्हणजे बांबूच्या त्या वनासारखी ... ऊगवतानाच आभाळ कवेत घेणारी . मी त्याला नेहमी म्हणायचे मला पहायचंय तुला मोठा कवी झालेलं .. त्याने पहिल्या मैफिलीतच गरूडभरारी घेतली . सलाम शिवाजी ... तुझ्या साठी एक वेगळा लेखच लिहायचा आहे ... एकच सांगते .. मला तुझी मैत्रीण म्हणवून घेणे अभिमान वाटतो ......
    कवी श्रीकुलजी ... अचानक दाटलेल्या मेघांनी बरसून सारं सौंदर्य क्षणात निर्माण करावं अशी तुमची कविता ... भेटताच आपलीशी वाटते . तुम्ही अचानक आलात आणि कवितेबरोबरच तुमचा आवाज किती मंञमुग्ध करतो याचा विलक्षण अनुभव मन स्पर्शून गेला ... एस टी महामंडळाची नोकरी करून समृद्ध ठेवलेली तुमची कविता म्हणजे अप्रतिम ...
    डॉ शुभाजी लोंढे .. आपका तो क्या कहना ... सही आवाज आणि  काव्य तर अप्रतिम ..
हिंदीवरची तुमची पकड कौतुकास पाञ आहेच ... तुमचं ते कौतुक करणं मनाला ऊभारी तर वाटतेच परंतू तुमचे प्रेमळ शब्द जीवाच्या जास्त जवळ आणतात तुमच्या ...
   कवयिञी डॉ रेवती संत ... सौंदर्य , रसिकता ,कल्पकतेचा , सर्जनाचा सुंदर मिलाफ म्हणजे रेवतीजी ... तुमची कविता मनाला भिडते . तुमचे प्रेमभरले शब्द तुमच्याशी जवळीक करण्यास भागच पाडतात . ..
     संगिताजी काकडे ... पाहताच ती बाला ... खरंच याचीच आठवण झाली ... आणि तुमचे वक्तृत्व भन्नाटच .. काय बोलणार .. मी लिहीते परंतू शब्द माझ्या वाणीपासून दूर पळतात .. तुम्ही मात्र शब्दांना अलगद निवडून कशा जिव्हेवर सजवता शिकवाल मला ? 
      कवी विपुलजी .. रसायन ... कवितेचेही रसायन असे जुळवता .. जीव कातर होतानाच हास्यकळ्या कधी पेरता तेच उमगत नाही .. तुमचे पुस्तक मिळवून नक्की वाचायचे आहे ...
     मेघाजी .. तुमची कविता इतकी आपली वाटते जणू मीच माझी भावना शब्दांकित करते आहे . तुमची उत्सुकता , ते भारावलेपण .. खरंच मनाचा एक कप्पा तुमचाच ..
     योगिताजी .. शब्द उणे तुमच्यापुढे .. शिघ्रकविता ... इतकी शिघ्र फक्त तुम्हीच ... सलाम ..
त्यातच तुमच्या स्वभावातील आपुलकी ... अधिक माणसे म्हणूनच तुमच्याशी जोडली जात असतील .. मीही जोडले गेले ..
                    माधुरी तुझ्या साठीच फक्त ... 
                   बहिणी बहिणी जन्मांतरीच्या
                    मैत्रीच्या नात्याने जोडलो
                   हसत खेळत रागवत रूसत
                   जणू गौरायाच घडलो
  गुरू आणि सौ गुरू तुम्ही खरंच इतके उत्साही जोडी पाहीलीच नव्हती.. तुमच्यासारखे रसिक असतिल तर काय हवे लिहीणार्यांना ...
  श्री आणि सौ जाधव छान जोडी . युवराजजी वक्तृत्व छानच .. तुम्ही देऊ केलेल्या संधीचा आम्हा नवागतांना नक्कीच फायदा होईल . धन्यवाद .
    डॉ सुवर्णसंध्याजी धुमाळ .. तुम्ही
काय काय बोलू तुमच्याबद्दल . खरंच समजत नाही . एक संपूर्ण लेख लिहीला तरी पुरेसे नसेल . तुमचे शब्द प्रेरणास्थान आहे आमचे .. आता इतकेच सांगेन .. तुमची जिवीधा परी आहे .
   सुहास एक चांगला मित्र तर आहेसच .. चारोळ्या .. तुझी शायरी वा ..
    विशालजी माने .. तुम्हाला लक्ष लक्ष प्रणाम .. तुमची चित्रकला .. तुमची दैदिप्यमान आशा ... प्रतिभेनेही तुमच्यापुढे लोटांगन घ्यावे अशी जिद्द ... आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत ... लवकर तुमचे चालण्याचे स्वप्न पुर्ततेस जाणार आहेच .....
  आता एक अशी जोडी ... वृषालीजी आणि दादा म्हणजे डॉ सुजित अडसूळ .. वृषालींजीनबद्दल आधीच एक पोस्ट टाकलेली आहेच . मैत्रीण .....
सुजित सर म्हणजे आम्हा सर्वाना जोडणारा दुवा . वैयक्तिक माझ्या तरी आयुष्यात व्यासपीठ लाभने तुमच्यामुळे शक्य झाले दादा . धन्यवाद ..
  प्रेमराज तुमचं कौतुक करावं तितकं कमीच .. तारूण्यातही अनुभव आणि बुद्धीमत्तेने खळखळ वाहणारा निर्मळ झरा . तुमच्या सर्व आकांक्षा फलित होवो हीच प्रार्थना ...
अशा या सर्वांच्या अथक परिश्रमातून साध्य झाला तो व पू जागर शब्दांचा चा स्नेहमेळा ...
    सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार ... तुम्ही माझे पहिलेपण ऐकून त्याला भरपूर दाद दिलीत ... मला हे पहिलेपण नक्कीच प्रेरणादायी असेल .


Wednesday 27 May 2015

नकोसा पाऊस

आताशा पाऊस नकोसा होतो
थंडावा असा अंगावर येतो
उगीच काळीज कोरीत जातो

तुझ्या श्वासांचा स्पर्श आठवतो
हळु ह्रदयी लय वाढवतो
तनाची उब कानात काढतो
आताशा ...

डोळ्या तुझ्या असा मेघ दाटतो
प्रितीत मजला चिंब करतो
क्षणिक सारे ! तिथेच मी थिजतो
आताशा .....

पाऊस मग पुन्हा चेकाळतो
मनी असे ओरखडे ओढतो
आठवांनी जीव थरथरतो
आताशा ....

जाता जाता हूरहूर लावतो
काहूर हे काळजात दाबतो
निर्माल्यस्मृती नदीत सोडतो
आताशा ....

   संध्या 

Monday 11 May 2015

विनवणी

कधी उगवल सांग
माझ्या अंगनी दिवस
देवाजीच आता सांग
कधी संपल अवस


झालं निजुर व पाय
मिरुगाला धाडा जरा
करा किरपा इतकी
ढेकळांची साय करा.....

दारी हंबरे गोधन
आत स्फुंदते धनीन
नका बघू अंत देवा
गरिबाची लाज ठेवा

माझं चुकलं माकलं
माफी देवाजीच्या दारी
लिंब चिंच न जांभळ
लावीन जी बांधावरी

नाही सांगत मी खोटं
पाणी दाटलं डोळ्यांत
मातनार आता नाही
चुक आलीय ध्यानात

हात जोडून व देवा
इतुकीच विनवणी
लेकरांच्या मुखामंदी
पडूद्या की अन्नपाणी

   सौ गितांजली शेलार