या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 25 January 2016

खरंच गुलामगिरी संपली आहे का ?

“उठा स्वतंत्र भारताच्या नागरिकांनो , साडे पाच वाजले ..साडे सहा ला तर बस येईल .” बाळाच्या अंगावरची रजई ओढत मी म्हणाले खरी पण इतक्या गारठ्यात त्याला उठवणे मलाही जीवावर आले होते . त्याने पुन्हा पांघरून ओढून घेतले .
“अरे , आज २६ जानेवारी पिलू , शाळेत नाही का जाणार तू ? आज ध्वजारोहण करायचे ना ?” लगेच गडबडीत स्वारी उठून बसली .
“तुला रात्री सांगितले ते ध्यानात आहे ना मम्मी ?” डोळे चोळतच स्वारी बोलू लागली .मीही तोंड वाकडे करून विचारले नजरेनेच काय रे ?
“अशी कशी विसरते तू ? अगं मम्मी मी नाही का सांगितले आणि तू प्रॉमिस पण केलेस की ध्यानात ठेवीन .” तक्रारीचा सूर उंच झाला जरा .
“बरं बाबा , मी तरी काय काय ध्यानात ठेवणार रे , सॉरी पण तू कित्ती गोष्टी सांगतो , सगळ्या नाही लक्षात राहत बघ .” त्याने मग लाडीगोडी लावत जवळ येत सांगितले ,  “अगं , आपल्या दवाखान्याशेजारी एकही झेंडा पडलेला दिसायला नको , दिसला तर मग उचलून ठेवशील असे म्हणाली ना तू ?” मग माझ्या मेंदूत क्लिक झाले . होरे मी म्हणाले खरी ..त्यावेळीच त्याने आणखी एक हट्ट केला होता ..तू तुझा व्हाटस अप चा प्रोफाईल बदलून तिरंगा लावायचा . पण माझ्या एका प्रश्नाने त्याला थोडे गडबडून टाकले . का रे बाळा , फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच देशावर प्रेम करायचे का ? तो थोडावेळ चुळबुळ करत राहिला आणि मग म्हणाला , नाहीच गं , मग तू असे कर की वर्षभर तुझा प्रोफाईल तिरंगा ठेव ! किती सोपे उत्तर शोधले रे बाळा तू ..पण इतके सोपे नाहीच सर्व ! फक्त तिरंग्याचा अवमान न करणे इतकीच देशभक्ती का ? किती संकुचित जगतो आहोत आपण ..देश म्हणजे काय ? तो फक्त सरहद्दीतच कायम करायचा का ? की सरहद्दीच्या आतील सर्व जीव समानतेचा धडा गिरवत जगत आहेत यावर देश कायम करायचा ..ही जी माणसामाणसातील दरी आहे ती सरहद्दीच्या बाहेर का संपते ? माणूस म्हणून आपले काहीच अस्तित्व नाही का या भूतलावर ? एक ना अनेक प्रश्नांनी धिंगाणा माझ्या मनात चालू केला , अरे पण विचारात हरवून जमणार नव्हतेच मला ! मुलांचे आवरून त्यांना दूध देवून गाडी येण्याच्या वेळी तैय्यार केले . मुले गेलीही ..पण काम चालू असताना त्या एकांत शांत वातावरणात शाळेच्या पटांगणातून लता मंगेशकरांच्या आवाजात ‘ जरा याद करो कुर्बानी .’ ऐकू येत होते . आणि मन असह्य अशा घालमेलीत अडकून पडले . हाताने काम चालूच होते , परंतु मनाने मी कामात नव्हतेच . बाहेर गेले  , पक्षांना चारा टाकायला आणि भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवायला ..रोजचीच सवय दोन तीन वर्षापासूनची म्हणून सारी कामे अगदी व्यवस्थित चालू होती जरी मन कामात नव्हते ! दोन तीन कावळे लगेच जवळ येवून उभे राहिले त्यांना भांडे धुवून त्यात पाणी टाकेपर्यंत पण दम निघत नव्हता तर्री मी आज लवकर सारे करीत होते . तसाही पक्षांचा दिवस पहाटेच सुरु होतो म्हणजे त्यांना भूक लागणारच ना ? आणि मी मनाशीच हसले ..माणसाने सृष्टीचे गणित आपल्याच ठेक्यावर का चालवले असेल ? पण तरी किती सुधारणा झाली तरी निसर्ग माणसाला हुलकावणी देतोच आणि तोच श्रेष्ठ आहे हे वारंवार दाखवतो . पण हे समजेल त्याला ! मला तरी समजते का ? या प्रश्नावर मात्र मन अधिक गहिऱ्या खाईत जातेय असेच वाटले .
  मी भांडे धुवून पाणी ओतनारच होते रस्त्यावर की एक बैलगाडी येताना दिसली , त्यांच्यावर उडू नये म्हणून मी कावळ्यांची घाई डावलून थांबले (थोडे सौजन्य अजून अबाधित आहे !) दोन लहान लेकरे , दोघे तरुणच म्हणावे की पोरकट या संभ्रमात पडावे असे नवराबायको , आणि एक मळकटलेल्या आणि केसांचा पुंजका न विंचरलेल्या म्हातारीच्या (?) ओझ्याने वाकलेली ती मरतुकडी बैलजोडी गाडी ओढत पळत होती . अजून सातही वाजले नव्हते , गारठ्याने कुडकुडावे इतकी थंडी हवेत होती , सूर्याचे आगमन झाले होते पण तोही कदाचित पांघरून ओढून बसला होता , कुडकुडत ! सकाळी उठायला नकार देणारे माझे मन त्या टोळीवाल्या लोकांना उसतोडीला जाताना पाहून थोडे बावरले . किती पहाटे हे नित्यादि कर्म आवरून पोटाच्या सोयीसाठी बाहेर पडलेत , अगदी या पक्षांसारखेच ! खरे तर हा गरीब आणि पोटापाण्यासाठी भटकंती करणारा माणूसच अजून निसर्गाला धरून वागतोय नाहीतर आपण ? चंगळवादाच्या भोवर्यात अडकून पडलोय ! काल एक पुस्तक वाचताना , मार्स्कवाद ,कम्युनिस्ट , समाजवाद असे अनेक भयंकर शब्द वाचले ..भयंकरच कारण मला त्याचा अर्थच माहीत नाही ..काय आहे हे ? कम्युनिस्ट विचारवंतांची हत्या वगैरे खूप वाचनात येते आताशा पण सारे डोक्याला फेर्या मारून निघून जाते ..आजही मी डॉ असून मला समाजवाद माहीत नाही ! त्याची रुजलेली खोल मुळे माहीत नाहीत ! का मी जाणूनच घेवू इच्छित नाही ? गांधीबाबा वाचला रे तुला फक्त पुस्तकाची पाने पालटत वाचत गेले ..तुझे अस्तित्व त्या पानापानात न शोधताच ! सत्याचे प्रयोग वाचले ..तुझ्याच आश्रमातून विकत आणले होते ..भारावले काहीवेळ तुझ्या त्या त्यागासाठी पण काय झाले ..दोन तीन तासानंतर पूर्ववत झाले सारे .. पैसे नाहीत तर दवाखान्यात का आलात असे विचारण्यापर्यंत मजल गेली माझी तुला वाचतानाच ! हे लिहितानाही डोळे ओले झालेत पण खरे सांगू हेही वांझच विचार आहेत बघ ..मनाला कोंडून जगतोय गांधीबाबा आम्ही , चंगळवादाचा पुरस्कार करीत ! आज ६७ वा प्रजासत्ताक साजरा करताना एकाही चंगळवाद्याच्या मनात काहीच खुपत नाही ..ना तुझे आख्खे आयुष्य समाजासाठी स्वातंत्र्यासाठी वाहने ना त्या असंख्य अशा स्वातंत्र्यनायाकांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी झुगारून देणे ! त्यांच्या रक्तावर पोसलेली आमची चंगळवादी मने पुन्हा गुलामगिरीची परक्यांची अस्रे घेऊन आपल्याच बांधवांना ठेचण्यासाठी सज्ज झालीत गांधीबाबा ! गुलामगिरी खरंच संपलीय का ? की अजूनही आहे अबाधित त्या मग्रूर मनात ? ज्यांच्या पूर्वजांचा बळी गेला गुलामगिरी झुगारताना आज त्यांचे वंशज आम्ही पुन्हा तीच गुलामगिरी गरीब ,शोषितांवर लादायला सज्ज आहोत .. त्या वेळेत आणि आज  काहीच फरक नाही गांधीबाबा , फक्त परिमाणे बदलली आहेत . तेंव्हा जास्त ताकदवान राजा होता आणि आज जास्त पैसेवाला झालाय फक्त ! मी नेहमी विचारते कुणी टोळीवाले , उसतोडीचे पेशंट आले की कुठला रे बाबा तुम्ही ...त्यांनी मग मराठवाडा विदर्भातील वेगळ्यावेगळ्या गावांची नावे सांगावी ..अशीच काही गावे आहेत ही भर माझ्या ज्ञानात पडते इतकेच ..अलीकडे थोडे वाचून वाचून संवेदनशीलता (सामाजिक) जपणारे मन बावरते थोडेसेच पण फी घेऊन स्याम्पलची औषधे देण्यापुरतेच ! स्वतःच्या हितासाठी संवेदनशीलता जपणारी आपली मने कधी प्रगल्भ होणार हा वांझोटा विचार मनात कुरवाळत ..हो पण यांच्याच कष्टावर गाडी , बंगले आणि प्रॉपरटी घेणारा हा सुशिक्षित समाज कधीच आत्मपरीक्षण करणार नाही का ? की दोन चार रुपडे फेकले की आपण मोकळे झालो का दानवीर म्हणून घ्यायला ...या कष्टकऱ्यांच्या जीवनात ज्या दिवशी हास्य उमलेल तो दिवस खरा प्रजासातक असेल ! शक्य आहे का हे ..हे वांझोट्या विचार्वांतांनो आणि पैसा , प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या मागे पळणाऱ्या आपल्या सारख्या त्यांच्या कष्टावर आपली पोटे पोसणाऱ्या बांडगुळांनो एकदाच मनाला हे विचारून बघायचे का ?
आज खरंच लाज वाटतेय मला , पहिल्यांदा ..माझ्याच गुलामगिरीची ! कारण कामाची बाई आली नाही तर नित्यादि कर्मे करायलाही बावरणारे माझे मन गुलामच नाही का ? सवयीचे गुलाम , चंगळवादाचे गुलाम !

        डॉ संध्या राम शेलार . 

Sunday 17 January 2016

वाटेवरले वारकरी

 आयुष्याच्या वाटेवर भेटणारे बरेचजण असतात , कुणी एकदा दिसतात पुन्हा कधीच न दिसण्यासाठी . कुणी सोबत चालतात आणि आपल्या मनाचा कप्पा व्यापतात कधी कळतंच नाही , कुणी अनेकवर्षानंतर अनापेक्षितपणे भेटतात आणि पूर्वीसारखी पुन्हा जवळची होतात . कुणी पूर्वी पाहिलेली , पण कधीच संवाद न केलेली , अशी भेटतात आणि आपलीशी होतात . कुणी हृदयात हळवी किनार ठेवून गेलेली पुन्हा समोर उभी ठाकतात आणि मनातील हुरहूर कधी काहूर होते कळतंच नाही . काही तर अशी असतात ,कि हृदय व्यापून आयुष्यभरासाठी ओरखडे ठेऊन जातात . आयुष्याच्या या अनोळखी वाटेवर उद्या काय असेल कुणाला कळलंय का कधी ? हो पण हे सारेजण जीवन विचारांनी, आचारांनी, अनुभवांनी  समृद्ध करून जातात काही सावल्या आणि पाऊलखुणा ठेवून ! असेही हे वाटेवरचे वारकरी माझ्या आयुष्याला नेहमीच शिकवत , समृद्ध करीत गेले . काहींनी हृदयाचे हळवे कोपरे असे व्यापले कि त्यांच्या आठवणी सुद्धा मला आनंदी करतात . हर्षाची ही मोरपिसे आयुष्यभर अशीच खोलवर मनात रुजवून , रुतवून घ्यावीत . काही न मागता देणारी अशीही नाती भेटली आणि काही कितीही घेऊन पुन्हा हात करणारी पण ! पण तरी दोन्हीत आनंद आहे खरंच आहे . अश्याच या वाटेवरच्या वारकऱ्यांना मी लिहिणार आहे . नव्हे लिहायला हवेच , कारण हे करताना त्यांनी दिलेले सुखदुःखाचे क्षण अनुभवताना आजच्या वेदना कमीच वाटतील हो न ?

भिजलेलं मन

तुझ्या असण्याने
गहिवरलेले आयुष्य
माझी मी उरलीच नव्हते
प्रत्येक क्षणावर
तुझीच मोहर
तुझ्याशी खेळलेला तो
नजरबंदीचा खेळ
शब्दांनी सजण्याआधी
संपलेली ती वेळ
उद्याची वचने
आजच घेतलेली
स्वप्नांची तोरणे
पापण्यात सजलेली
सुखाच्या वेलींनी
गाव माझं सजलेलं
प्रेमात तुझ्या
मन होतं भिजलेलं
  डॉ संध्या राम शेलार .

Saturday 9 January 2016

नारळाचे पाणी

       
स्मिता एकदम वर्गात शिरली आणि बाहेरच्या उन्हाच्या काहिलीतून आतल्या कलकलाटात येताच तिचे डोके अगदी चक्रावून गेले . किती बोलतात या मुली ? आजी म्हणते आम्हा बहिणींना ‘ काय भोर्ड्याहो तुमची कलकल बंद होते का नाही ? का रात्र अशीच जाणार ?’ आजीला तरी दोन चार भोरड्या आहेत पण इथे थोड्या नाहीत साठ!!! खरंच या पोरींना कंटाळा कसा नसेल येत बोलायचा ? एकीचे दुसरीला तरी ऐकू जात असेल का ? आणि काय बोलत असतील ? खूप राग येत होता स्मिताला सार्यांचा .
“किती बोलता ग ?” शेवटी तिने न राहवून सार्यांना विचारलेच .
“तू पण बोलतेस बर , उगी आव आणू नको शहाण्याचा ..” उमा हसत होती .
“बर ..” मग मात्र स्मिताही हसून मान्य आहे म्हणत मानेला झटका देत बोलली . खरच आहे कि ! आपल्या कलकलीचा थोडाच आपल्याला त्रास होतो !
पण तरीही तिचा मूड आज ठीक नव्हताच . किती लिखाण देतात चौधरी सर , लिहून लिहून जीव दमून जातो . पण त्यांना काय आहे फक्त प्रश्न वाचायचे आणि आणि सार्या मुलींचे लिहिलेले चेक तरी करतात कि काय कोण जाने ? रात्री झोपच नाही होत यामुळे , आणि शिवाय त्यांना हे कळायला नको का कि आम्हाला बाकीचे पण विषय आहेत अभ्यास करायला ? आणि फक्त इतिहास भूगोल करून थोडेच आम्ही दहावी पास होणार ? त्यांना पडले आहे त्यांच्या विषयाचा चांगला निकाल आला पाहिजे याचे पण आम्ही काय घाण्याचे बैल थोडेच आहोत . शिवाय सार्या मुली , शिक्षेच्या भीतीने बिचार्या करतात . करतील नाही तर काय करतील , त्या सुकुमार हातावर पट्टीचे वळ उमटवताना त्यांना थोडेच काही वाटत असेल ? किती निष्ठुर आहेत न सर ... त्यांच्या मुलांशी तरी नीट बोलत असतील कि काय कुणास ठावूक ? महामुनी बाई सांगतात कि नारळाची करवंटी जरी कडक असली तरी आतले पाणी किती सुमधुर असते ! फणसाचे काटे जरी असले तरी गर कसा जिव्हेला तृप्त करतो . पण या सरांचा असा गोडवा कधी दिसलाच नाही . सतत आठ्या कपाळावर आणि नाकावर ओघळलेला चष्मा पाहूनच त्यांची भीती वाटते. त्यांना हसता येत असेल का ? या प्रश्नाने मात्र स्मिताने तिच्या मनातच डोक्यात टपली मारून घेतली आणि स्वत:शीच हसली . हसण्याशिवाय या जगात माणूस जिवंत तरी राहिल का ?
“ये चौधरी सर आले ..” एकजण म्हणाली आणि वर्गात भयाण शांतता पसरली . स्मिता पळत जावून तिच्या बाकावर जावून बसली . आज मंजुश्री तिच्या आधी येऊन बसलेली . तिला आश्चर्य वाटले पण विचारायच्या आधीच सर वर्गात आले पण . खाली मान घालून बसलेली मंजुश्री काही उठली नाही , मग तर स्मिताला जास्तच आश्चर्य वाटले . काय झाले या पोरीला ? आधीच होमवर्क पूर्ण नसते हिचे म्हणून सरांची नेहमीची टार्गेट ती आणि आज जर पहिले सरांनी तर बिचारीचे काय होईल ? स्मिताने हलवण्यासाठी तिच्या गालाला हात लावला तर ओला झाला कि हात ! अरे देवा म्हणजे हि रडते आहे ...बिचारी पुन्हा सावत्र आईने काहीतरी त्रास दिला म्हणायचा . बिचारी तिथून आगीतून निघते आणि इथे फुपाट्यात पडते ! काही जीव असे प्राक्तन घेवून जन्माला का येत असतील ? पण यांची कीव करणेही चुकीचे ..त्यात मंजुश्रीची तर नक्कीच करू नये . किती वसकन बोलते हि ? कुणाच्याही अंगावर धावून जाते . कुणी काही म्हणयला तिला तर हि डाफरलीच समजा ..म्हणून तिला एकही मैत्रीण नाही या अख्या वर्गात . का असे करत असेल ती ? माझ्या विचारक्षमतेच्या बाहेरचे आहे हे सारे ..पण हिनेही थोडे परिस्थितीशी जुळवून घेणे अपरिहार्य आहे पण या मंजुश्रीला समजेल तर शपथ ..का रडत असेल हि ?
“येस सर ..” अरे देवा नशीब मी हजेरी दिली नाही तर ...सर एकदा लक्ष नसले तर पुन्हा किती गयावया करा पण हजर  मांडीत नाहीत ...चौधरी सर !!!
“मंजुश्री ...ये मंजुश्री...” हळू आवाजात मी तिला हाक मारली आणि हलवत राहिले .
“येस सर ..” तिने आता मात्र उठून प्रेझेंटी दिली .चेहरा लालबुंद झालेला , आणि त्यावरच्या पुटकुळ्या तर आणखी उठावदार झाल्या . नाकाचा तोलांब शेंडा गाजरासारखा  गुलाबी लाल झाला होता . आवाजात एक खोल लय होती . कुठेतरी मधेच तो कंप पावत होता . सरांनीही वर मान करून तिच्याकडे पहिले आणि नाकावरचा चष्मा वर सारत पुन्हा हजेरीपुस्तकात डोके खुपसले . स्मिता मात्र हादरून गेली . काय झाले असेल हिला ??
    तो पूर्ण तास ती मंजुश्रीच्या विचारात गढून गेली . मंजुश्रीही अधून मधून डोळे पुसत होती . नाक पुसून आणि डोळे पुसून तिचा रुमाल पुराओला झाला होता . स्मिता कधीच रुमाल बाळगत नव्हती . मंजुश्री तिला अनेकदा म्हणायचीही कि रुमाल का नाही ठेवत ? तर तिचे उत्तर तयार असे मी रडत नाही आणि शेंबडीही नाही , त्यावर ती खळखळून हसे . पण मंजुश्रीला यात काही हसण्यासारखे आहे असे कधी वाटत नव्हते आणि ती फक्त तोंड फिरवत असे आणि म्हणे यात काय हसायचे ? कशाला पण हसू नये स्मिता , बाकीचे म्हणतील कि वेडी आहे का ? स्मिता मनात म्हणे वेडी म्हटले न तरी चालेल मला मंजूश्री पण कुणी कधी मानुसघानी म्हणू नये यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील . पण मनातच कारण असे जर स्मिता समोर बोलली तर मंजुश्री दोन दिवस तरी अबोल झाली असती आणि शेवटी स्मितालाच लहान बापाची होऊन तिची माफी मागावी लागली असती . स्मिताचा स्वभावच होता तो कि ती कोणाला अबोल पाहू शकत नव्हती आणि कितीही मोठा अपराध असेल समोरच्या व्यक्तीचा तरी ती माफ करायला कधीही मागेपुढे पाहत नव्हती .. तिच्यासाठी नाते हे तिच्या अहंकारापेक्षा मोठे होते !!
     एकदाचा तास संपला आणि आज विशेष म्हणजे चौधरी सरांनी कुठलेही प्रश्न विचारले नव्हते आणि होमवर्क पण दिले नव्हते फक्त शिकवले होते ...आतापर्यंत मनात गर्दी करून राहिलेले प्रश्न स्मिता आता मंजुश्रीला विचारू लागली .
“काय झाले मंजुश्री तुला ? का रडतेस सांग तरी ..” स्मिताने अलगद तिच्या केसांवरून हात फिरवून तिला विचारले . तिच्या त्या मायेच्या स्पर्शाने मंजुश्री हुंदके देत रडू लागली आणि अलगद तिच्या गळ्यात पडली . इतक वेळ विचारांनी चक्रावून गेलेली स्मिता तिचे अश्रू पाहून आणखीच हळवी झाली आणि तिच्याही डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. थोडा वेळ तिने मंजुश्रीला रडू दिले , मग हलकेच तिचे डोके वर उचलून तिला भरल्या डोळ्यांनी पहिले . स्मिताच्या डोळ्यात पाणी पाहून मंजुश्री मात्र आतून हलली आणि स्मिताचे डोळे पुसू लागली .
“माझ्याकडून एक चूकच झाली बघ स्मिता , पण मी शपथ घेवून सांगते मी जाणून बुजून नाही केली ग ...”
स्मिता तिला डोळ्यानेच काय म्हणून विचारले , कारण तिला वाटले आपले शब्दही आता ओले होऊनच बाहेर येतील ..
“अग मी आज लवकर आले मला भूमितीचे मागचे लिहून काढायचे होते , तुझ्याकडून म्हणूनच मी काल वही नेली पण रात्री मी लगेच झोपले आणि सकाळी तर तुला माहित आहे मला स्वतःचा डबा करावा लागतो . मग वाटले इथे काही लिहिणे शक्य नाही म्हणून लवकर आले . मी लिहित होते . वर्तुळ काढताना माझ्या हातून कर्कटक निसटले आणि अर्पिताच्या पायावर उडून लागले .. वरून पडल्याने ते तिच्या पायात घुसले ..खरंच स्मिता मी मुद्दाम नाही ग मारले ..” आणि पुन्हा मंजुश्री रडू लागली ..
“अरे देवा इतकेच ? आणि यासाठी तू रडतेस मंजुश्री ? अर्पिताला सांगायचे न कि मी मुद्दाम नाही केले ..माफी मागायची ..”स्मिताला हसावे कि रडावे हेच कळत नव्हते ..काय वेडी मुलगी यासाठी रडते ..अर्पिता काय राक्षस आहे का कि हिला खावून टाकेन ? वेडीच आहे ...
“स्मिता इतके सोपे असते तर मी रडले असते का ग ?”
“मग झाले काय असे अवघड ,,आणि सांगायला इतका वेळ लावला ..” प्रश्नार्थक नजरेने आणि वैतागल्या चेहऱ्याने ती मंजुश्रीकडे पाहू लागली .
“अर्पिताचे आणि माझे काल शाळा सुटताना भांडण झाले होते ..ते माझ्या लक्षात पण नव्हते ग ..आणि अर्पिता म्हणतेय कि तू मुद्दाम कालचा कसूर काढण्यासाठी आज असे केले ..खरच स्मिता मी माझ्या मृत आईची शपथ घेवून सांगते असे माझ्याकडून अजाणतेपणी झाले ...” आणि पुन्हा मंजुश्रीच्या डोळ्यातून अश्रुधारा उसळत बाहेर येऊ लागल्या ..
“हो मंजूश्री , तू आईची शपथ नको घेवूस ..मी जाणते तू खोटे बोलत नाहीस ..पण बघ बर कुठल्याही मुलीशी पटवून न घेणे किती त्रासदायक झाले ..तू तुझा मीपणा कुरवाळत बसलीस आणि सारे तुझ्यापासून दूर होत गेले . थोडे कुठे तरी आपल्या अभिमानाला मुरड घालावी लागते ..समाजाबरोबर राहायचे तर समाजासारखे राहावे लागते ग ..कुणी थोडे बोलले म्हणून त्याला लगेच दूर लोटू नये किंवा मनात जरी राग आला तरी तो ओठांना पण माहित करू नये . मग कुणीच आपले राहत नाही ..एखादी व्यक्ती संपूर्ण चांगली असूच शकत नाही आणि तिच्या गुणदोषासकट आपण जेंव्हा तिला स्वीकारतो तेंव्हाच एखादे नाते मार्गक्रमण करू लागते ..म्हणशील लागली म्हातारी प्रवचन द्यायला ..पण खरे सांग मी जे म्हणते ते पटते न तुला ?” तिचा हात घट्ट दाबत स्मिता तिला म्हणाली . अश्रुनी गच्च चेहरा वर उचलत मंजुश्रीने मान हलवून होकार दिला . तिच्या चेहरा स्पष्ट सांगत होता चुकले मी स्मिता ...तिचे व्याकुळ डोळे तिच्या चुकीच्या स्वभावाची  माफी मागत होते..तिचे मन पश्चातापाने भरून आले होते ..डोळ्यात दाटलेले ढग मात्र पुढच्या ..शिक्षेच्या भीतीने धास्तावले होते ..
“असू देत आपण अर्पिताला सांगू ..तिची माफी मागू ..मी सांगते तिला ती माझे नक्की ऐकेल ..” तिच्या केसातून हात फिरवत स्मिता तिला समजावत होती ..
“सारे संपले स्मिता ...मी तिचे पाय पकडले तरी तिने ऐकले नाही ..ती मुख्याध्यापक बाईकडे गेली आणि तक्रार केली ..त्यावेळी म्याडम खूप ओरडल्या मला ..अशी खुनशी मुलगी नको शाळेत म्हणाल्या ..त्यांनी चौधरी सर ठरवतील असेही सांगितले ..आता काय होईल ग स्मिता ? सर तर मला जराही माफ नाही करणार ..”आणि मंजुश्री आता धाय मोकलून रडू लागली .. तिचे कढत अश्रू स्मिताला अस्वस्थ करत होते . स्मिता समजत होती इतके हे प्रकरण सहज नव्हते . मंजुश्रीला तिचा दाखला हातात मिळणार होता ..डायरेक्ट शाळा सोडावी लागणार होती .. आता मात्र स्मिता चक्रावून गेली ..या नकळत घडलेल्या चुकीचे इतके मोठे प्रायश्चित ? आज जर मंजुश्रीला काढले शाळेतून तर तिचे शिक्षण इथेच थांबणार होते ..ती खूप हुशार होती असे नाही पण शिकण्याचा तिचा अधिकार एका नकळत , अजाणतेपणी झालेल्या चुकीचा बळी ठरणार होता ..तिचे आयुष्य बदलणार होते ..
“नको रडू मंजुश्री ...आपण सांगू सरांना ..मी सांगेन ..” स्मिताचे डोळेही वाहू लागले . तिला समजत नव्हते कि खरच या शब्दांना काही अर्थ आहे का ? का मी उगीच बोलते आहे .चौधरी सर कुणाचही ऐकणार नाहीत . आणि शिक्षक कुणी यामध्ये पडणार नाहीत . चौधरी सरांचा शब्द शेवटचा ..आणि या पाषाणहृदयी सरांना मंजुश्रीच्या भविष्याशी काहीच देणे घेणे नाही . त्यांच्या काळजाला पाझर फुटणे अशक्यप्राय आहे .. बिचारी मंजुश्री ..इतक्यात शाळेचे शिपाई मंजुश्रीला बोलवायला आले . ती आता भीतीने थरथरत होती ..लालबुंद झालेला तो चेहरा आणि तिचे थरथरणारे अंग ..पडते कि काय असेच क्षणभर वाटले . पण जाने भाग होते ..ती तशीच जड पावलांनी चालत जाऊ लागली ..मधेच बाकाचा आधार घेत होती ..तिची अशी दयनीय स्थिती पाहून पुरा वर्ग शांत झाला . सार्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या . साऱ्यांच्या डोळ्यात भीतीचे सावट दिसत होते आणि अर्पिता मात्र छदमी हसत होती . हे पाहताच स्मिताच्या तळपायाची आग मस्तकात शिरली ..आणि ती ताडकन उठून अर्पिताकडे आग ओकणारा कटाक्ष टाकून मंजुश्रीच्या मागे गेली ..मंजुश्रीच्या आधी जावून ती सरांच्या पुढ्यात उभी ठाकली ..ती काय बोलणार आहे हे तिलाच कळत नव्हते पण ती खूप निश्चयी चेहऱ्याने तिथे उभी होती ..
“सर मला कळते कि याविषयी मी बोलू नये ..तुम्ही जी शिक्षा याबद्दल मला द्याल ती मला मान्य आहे .पण तुम्हाला माझे बोलणे ऐकावे लागेलच आणि हे ऐकून तुम्ही तुमचा निर्णय द्यावा . मंजुश्री चुकली ..खरच चुकली पण अजाणतेपणी ..तिच्या डोक्यात काहीच राग नव्हता अर्पिता बद्दल ..मलाही आधी असेच वाटले कि कालच्या भांडणाचे तर नाही न तिने उसने फेडले ..पण नाही सर मंजुश्री रागीट आहे , अलिप्त राहते ती कुणाशी जमवूनही घेत नाही पण ती क्रूर नाही सर ..फक्त तिला परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही ..याला कारण तिच्या घरातील तिचा होणारा छळ कारणीभूत आहे . ज्या मुलीला आईची छाया नाही तिला चांगले वाईट कोण सांगणार .. सावत्र आई फक्त तिचा उपयोग करते ..तिचा छळ करते म्हणून मंजुश्रीला सारे जगच मतलबी वाटते ..आणि काय चूक आहे सर असे वाटले तर ? पण आज जेंव्हा तिला तिच्या या अलीप्ततेचा दुष्परिणाम दिसला तेंव्हा तिचे तिलाच समजेल ..अनुभव जे काही शिकवतो ते काळजात रुतते सर ..आणि हे रुतलेले तिला बदलणार आहे . आपण जर तिला बदलायला चान्स नाही दिला तर तिचे आयुष्य कसे सावरेल सांगा न सर ? आणि आपण माणूस आहोत ...चुका न करायला देव नाही .तिच्याहीकडून नकळत चूक घडली पण त्याची अशी , शाळेतून काढण्याची शिक्षा देवून आपण काय मिळवणार सर ? हो ती खूप काही गमावणार ..तिचे शिक्षण इथेच थांबणार ..लग्न होणार पण स्वभाव बदलणार नाही ..कारण ती शिकणारच नाही माफ करणे काय असते ? ती एक क्रूर मुलगी नाही हो पण क्रूर स्री नक्की बनेल ..पण याउपर तुम्ही तिला माफ केलेत तर तिला सुधारण्याचा चान्स मिळेल तिलाही कळेल कि प्रेमाने राहिले तर जग आपलेच असते अगदी सख्खे आपले ..नाती बनवताना पहिला धडा असतो समोरच्या व्यक्तीची आजूबाजूची परस्थिती बऱ्याचदा त्याच्या वागण्याचे प्रतिबिंब असते ..आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून , स्व:ताला त्याजागी ठेवून आपण कसे वागलो असतो हा विचार करून मगच समोरच्याला माफ करायचे का ? हे ठरवावे ..आणि माफितून कुणाचे आयुष्य बदलणार असेल कुणी सुधारणार असेल , कुणाला खरंच झालेल्या चुकीचे परिमार्जन करायचे असेल तर तिला माफ करणे देवाचे नाही माणसाचे कर्तव्य आहे .. म्हणून सर चुकतो तो देव आणि सारासार विचार करून चुकीला माफ करतो तो देवमाणूस !” एका दमात स्मिता सारे बोलून गेली काय बोलली तिला काही आठवत नव्हते , मात्र सारे शरीर थरथरत होते भीतीने आणि दु:खाने ! इतका वेळ खाली पाहून बोलणारी स्मिता सरांकडे पाहू लागली ..तिच्या डोळ्यात गर्दी केलेले अश्रू सरांच्याही डोळ्यात दाटले होते ..आभाळ गच्च झाले होते ! सरांनी स्मिताच्या डोक्यावरून हात फिरवला ..आणि रुमालाने डोळे टिपले ..पाषाणाला पाझर फुटला होता ..नारळाच्या पाण्याची आणि फणसाच्या गराची आठवण स्मिताला झाली ..खर आहे महामुनी म्याडम ...प्रत्येक कठोर माणूस खूप हळवा असतो !