या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 12 December 2022

बाया

बाया करतात बाराही महिने व्रतवैकल्ये..
बिघडल्या प्राक्तनाचा फेर बदलावा म्हणून..
तो मात्र तसाच पिळत राहतो तिला आतबाहेर! 
तिची श्रद्धा अफाट.. सातातले सात दिवस आळवत राहते ती... साऱ्याच देवांना...
कुणालाच नाही घाम फुटत ...ना देवघरात ना घरात ...
बाकी बाया सांगत राहतात ..
नवी नवी व्रते.. कुणी सांगत नाही .. स्वातंत्र्याचे गाणे ...
युगेयुगे ते गायलेच नाही कुठल्या बाईने! 
बयो तू तुझी हो ...गा तुझेच गीत ...
बिघडलेला फेरा कर सरळ धैर्याने..तुझे प्राक्तन तूच लिही...तुझ्या स्वतंत्र शाईने... 
सृष्टीच्या निर्मातीला नाही शोभत हतबल होणे ..
आता हो निऋतिची लेक ..
हो सम्राज्ञी तुझ्याच जन्माची ! 
तुझ्यात वसली आहे नियती आणि दैव तुझे !  
                 

No comments: