या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 17 October 2011

पत्रास कारण कि

                                                  //श्री//                             

१७/१०/२०११                                                                                          सौ गीतांजली शेलार 
सोमवार                                                                                                                सांजवेळ 


                                     आदरनीय,
                                                 माझ्या बाळाचे गुरुजन ,
                                                       स. न .वि .वि . पत्रास कारण कि ,
माझ्या हृदयातील ज्या लहरींच्या प्रेरणेने हृदयाची हालचाल चालू आहे त्या लहरींचा निर्माता, माझ्या संधीकाली असणाऱ्या आयुष्याचा आधार, माझ्या मनाचा आनंद असणारा माझा बाळ मी त्याच्या पुढील जडणघडणी करता तुमच्याकडे सोपवताना माझ्या मनातील माझ्या स्वप्नांची, माझ्या अपेक्षांची जी काही यादी म्हणा हव तर ती मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणून तुमच्या अमूल्य अशा वेळेतील काही मिनिटे माझा हा पत्रप्रपंच वाचण्यासाठी द्यावा हि नम्र विनंती!
       माझ्या मनातील या ताऱ्याला, माझ्या आयुष्यातील स्वप्नांच्या या वेलीला आकाशाला गवसणी घालायची कला शिकवा !ज्यामुळे तो फक्त माझ्याच मनातील तारा न राहता समाज्यातील दीनदुबळ्या प्रत्येक घटकाच्या मनातील स्वप्नांचा वेलु बनेल ! त्याला बाराखडी शिकवताना क -कमळाचा ख -खगाचा आणि ग -गवताचा नक्की शिकवा,हे शिकवताना त्याला हा निसर्गच आपला निर्माता आहे याची अवहेलना करताना तुला तेवढच दु:ख होऊ दे जेव्हड तुला तुझ्या आई बाबाची अवहेलना होताना होईल हेही नक्की   शिकवा! फुलपाखरू जसं लहान मोठ्या प्रत्येक फुलातील मधुरस प्राशन करून आपल्या पंखांवर अनेक रंग घेऊन जशी आनंदाने बागडतात तसं प्रत्येक क्षणातील लहान मोठं सुख जगायचं कसं हे शिकवा म्हणजे त्याच आयुष्य फुलपाखराच्या पंखान्प्रमाणे विविधरंगी होईल ! 
        खळखळ वाहणारा निर्झर जसं त्याच्या शुद्ध पाण्याने काठावरील प्रत्येक सान थोराची तहान भागवण्यात धन्यता मानतो तसं यालाही प्रत्येक अबालवृद्धाची काठी होऊन सेवेच्या आणि प्रेमाच्या निर्मळ जलाने त्यांची तृषा शांत करताना निरपेक्ष भावना उरी कशी जपावी हे शिकवा ! नदी जसं डोंगराच्या कड्यावरून कोसळल्यानंतरहि तिचा प्रवाह अखंड चालू ठेवते आणि स्वताची वेदना उरी साठवून भोवताल हिरवाईच्या नवचैतन्याने नटवून पुढे चालत राहते तसं त्यालाही सांगा निराशेच्या गर्तेत गेल्यावरही स्वताच्या वेदनेच भांडवल न करता जवळच्या गरीबांच जीवन सुखाच्या हिरवळीने व्यापून टाक, स्वताचा प्रवास न थांबवता ! 
        पाखरू जसं दिवसभर चाऱ्यासाठी हिंडून सायंकाळी घरट्याकडे झेपावते तसं तुही संपूर्ण जगातील ज्ञान मिळवण्याच्या नादात स्व:तच्या  मूळ घरट्यात परतायचं असतं हे कधी विसरू नकोस! आणि तुझी ज्ञानार्जनाची भूक भागविण्यासाठी काही क्षणांसाठी दूर जाताना भांबावून जाऊ नये हेही शिकवा माझ्या पिलाला! डोंगर जसं वाऱ्यावादळात जराही विचलित न होता भक्कम राहतो तसं तुही या समाजाने निर्माण केलेल्या चक्रीवादळात हरवून न जाता बरोबरच्या आणखी चार जणांना घेऊन कसं तटस्थ रहायचं हेही नक्की शिकवा ! 
         त्याला हे सांगा कि फणसा नारळाप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनात असतो  एक हळवा गोडवा जो मिळवायचा असतो न थकता त्याचे काटे काढून व कडक करवंटी फोडून ! थकु नकोस हे करताना कारण कष्ट करून जी गोष्ट मिळवशील ती तुला फक्त सुख नाही देणार तर आत्मसुख देणार आहे ! कितीही छोटा जीव असलास तू, तरी तुझ्यासारख्यांना  एकत्र घेऊन कितीही मोठं कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असते आपल्यात! हे पटवून देताना मुंग्यांच्या एकीने कसं भलमोठ वारूळ तयार होत हेही दाखवा त्याला!
          त्याला शिकवा कितीही मोठा तरु बनलास समाजाच्या, दृष्टीने तरी वेलींनाअंगाखांद्यावर घेऊन त्यांनाही आकाशाजवळ नेऊन सोड त्या अशोकवृक्षाप्रमाणे !आणि त्याचवेळी तुझी मूळहि घट्ट कर जमिनीत त्या वटवृक्षाप्रमाणे!  त्याला शिकवा शोधायचं असत या निसर्गाच्या कुशीत लपलेल सत्य, जे आपल जीवन संमृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करेल ! त्याला हेही सांगा आपला निर्माता असणाऱ्या निसर्गाने बनविली आहे प्रत्येक गोष्ट माणसाच्या भल्यासाठी फक्त कसं ते आपण ओळखायच असत ! 
          माजलेल्या भल्यामोठ्या हत्तीला जसं छोटी मुंगी काबू करू शकते तसं तू कितीही लहान असलास तरी तुझी सत्याची आणि प्रेमाची ताकत अगडबंब अशा संकटालाही वेसन घालू शकते हे त्याला समजावून सांगा! 
तुम्हाला मी माझा संगमरवरी दगड सुपूर्द केला आहे त्याला तुम्ही पायरीचा आकार दिलात तर मी समजेन माझा बाळ ज्ञानेश्वर बनला म्हणून नक्की तुम्हाला दुवा देईन! त्यातून तुम्ही कळस घडवला तर मी समजेन तुम्ही तुकाराम घडवला आणि तुम्हाला दुवा देईन ! आणि तुम्ही त्याची मूर्ती घडवली तर मी समजेन तुम्ही राम ,कृष्ण किंवा शिवाजी राजे घडवलेत आणि तुम्हाला दुवा देईन ! 

                                                                                              -तुमची कृपाभिलाषी 
                                                                                                      सौ गीतांजली शेलार.

                                                                                          
                     

4 comments:

सौ गीतांजली शेलार said...

thanks sandip!

Anonymous said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

छान प्रत्तेक गुरुजींनी वाचावे. It remined me,
http://majhimarathi.wordpress.com/2006/07/11/26/

Anonymous said...

छान. हे फक्त शिक्षकांनाच नव्हे तर पालकांनाही पाठवले पाहिजे.