या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday 19 February 2016

शिकवण

   मुलांची निरागसता ही एक दैवी देणगी म्हणावी का ? कि या भवतालचे वातावरण मनात न रुजल्याने झालेली एक चांगली गोष्ट म्हणावी ? दोन्ही गोष्टी  एकच कि ! निर्माता देताना सारे कोरे , निर्मळ आणि स्वच्छ देतो पण ही सुखासीनतेकडे झुकलेली मानवी जमात ते फक्त घाणरडे करण्याच्याच मागे लागली आहे का असे वाटावे इतके या निसर्गनिर्मित गोष्टींना गलिच्छतेकडे नेत आहे . बरे याच्यात त्यांची हानीच आहे पण ...ज्यांना समजले ते काही करत आहेत पण तितके पुरेसे नाही नक्कीच ! कारण चारजणांनी घाण करावी आणि एकाने काढावी असे आहे हे . असे विचार माझ्या मनात उगीच कधीच घिरट्या घालीत नाहीत ; प्रत्येक वेळी काही घडते आणि विचारांची शृंखला चालू होते ..आजही तसेच काहीसे झाले .
     शनिवार तसा माझ्यासाठी थोडा सुखाचा , कारण त्या दिवशी थोडे जास्तवेळ झोपायला मिळते , मुलांची सुट्टी अशी आईसाठी चांगली असते ..पण कसले सुख सहजी थोडेच लाभते ! मुले मात्र त्या दिवशी आवर्जून लवकर उठतात , निरागसता दुसरे काय ! माझी सकाळची घाई चालू होती . गेम खेळता खेळता (कॉम्पुटरवर ) आमचा चिरंजीव मागे आला ..मी चपात्या लाटत होते , म्हणजे त्याच्याकडे बघणेही शक्य नसते ..कान मात्र मोकळे असतात .
"मम्मी एक प्रश्न विचारू ?" सत्योम . आता काही वेगळे नको विचारायला या विचाराने मी काळजीत पडले . पण तरी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पहिले .
"अगं , मला एक सांग कि , जर मी प्रेसिडेंट झालो .." माझे डोळे आपोआप विस्फारले . अरे देवा हे काय नवीन आता ..
"अगं म्हणजे गेम मध्ये गं ! " त्याने लगेच स्पष्टीकरण दिले . तो पाचवीत गेल्यापासून त्याला माझ्या चेहऱ्यावरचे भाव कळू लागले आहेत . बऱ्याच गोष्टी तो बोलायच्या आधी ओळखतो .
"बर मग .." मला आता बोलण्याशिवाय पर्याय नव्हता . काम मात्र चालू ठेवले .
" अगं , समजा मी प्रेसिडेंट म्हणून दोन गोष्टीपैकी एक निवडायची असे झाले तर मी कुठली निवडावी हे सांग."
"बर , विचार त्या दोन गोष्टी .." माझी उत्कंठा थोडी ताणली गेली .
"म्हणजे बघ , एक निर्णय असेल कि भुकेलेल्यांना अन्न धान्याची सोय करणे आणि दुसरा निर्णय असेल कि क्यान्सरग्रस्तांना उपचार मोफत देणे ." अरे बापरे , बराच गहन प्रश्न आहे . या माझ्या सत्योमने जिथे भूक काय असते हेच अनुभवले नाही तिथे याला या गोष्टीचे गांभीर्य कुठून येणार ? पण माझ्या मनात एक विचार चमकून गेला , याच्याकडूनच उत्तर काढायचे कमीत कमी मला याची संवेदनशीलता लक्षात येयील ..
"बाळा , तूच सांग बरे तुला काय वाटते काय जास्त महत्वाचे ? भूक कि उपचार ?" त्याने जरा वेळ माझ्याकडे पहिले ..थोडावेळ तो तसाच विचार करीत राहिला , आता मला खात्री वाटू लागली  कि हा क्यान्सरला महत्व देणार ..
"मम्मी , मला वाटते आजाराने मरणाऱ्यापेक्षा भुकेने मरणे जास्त वाईट ! मग मी आधी भूक नाहीशी करेल .." माझे डोळे आता पाणावले होते . माझ्या मनासारखे उत्तर दिले म्हणून नाही तर त्याच्या आत दयेसोबत सद्सद्विवेक वाढीला लागलाय हे पाहून ..खरंच मी हे कधी त्याला शिकवले नाहीच , पण मग ही त्याची दृष्टी भोवताल पाहून निर्माण होतेय याबद्दल समाधान वाटले . मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा म्हणून हात पुढे केला , त्याच्या डोक्याला पांढरे पीठ लागेल म्हणून त्याने पटकन बाजूला सारला ; आणि खट्याळ हसून तो पळून गेला ..आताही त्याने माझ्या डोळ्यातील आनंद पहिला होता आणि ओळखलाही होता .
    मी मात्र विचारात गढून गेले . या निरागस मनावर संस्कार कसे करायचे हा प्रश्न मला नेहमी छळत राही , त्याबरोबर दुसरा प्रश्न मी याला चांगले संस्कार देऊ शकेल का ? मी त्याला समजवावे म्हणजे तो हे समजेल ? कुणाचे मार्गदर्शन घ्यावे ? कुठली पुस्तके वाचावी त्यासाठी ? अशा अनेक गोष्टी माझ्या मनात नेहमी येत . पण त्याच्या वडिलांना म्हटले तर म्हणत आपण करीत राहायचे ..आपल्याला कुणी कसे वागावे हे शिकवले का ? आपण शिकत गेलोच न ? मग कशाला असा विचार करते ..अहो पण ...आपल्याला कुठे इतकी समज होती या वयात , आणि किती चंचलता आहे त्याच्यात सहा महिन्याचा असल्यापासून ! किती प्रचंड उर्जा आहे त्याच्यात , ती जर चुकीच्या मार्गाकडे वळली तर ? ते हसत आणि निघून जात ..त्यांनी कसली खात्री होती मुलांबद्दल मला उमजत नव्हते ..गेम खेळायला मिळाली नाही तर सर्वांवर चिडणारा , धिंगाणा करणारा सत्योमच मला दिसत राही ..कधी कधी तो दादावर धावून पण जातो , मग मला जास्तच काळजी वाटते . पण आजचे हे शहाणपणा आणि विवेकबुद्धीने दिलेले उत्तर ऐकले आणि मन आनंदून गेले . एक थंड शिडकावा अंगभर पसरून गेला .
"मम्मी , अगं बाहेर बघ तुझे पक्षी कसे ओरडत आहेत .." तो बाहेर खेळून आत आला होता .
"अरे हो रे , मी विसरले आज त्यांना पाणी आणि चारा ठेवायला ..ठेवते बघ ."
"तू विसरली गं , पण त्यांचे पोट थोडेच विसरेल .." आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला . दोघांनी घाईने भांडे धुतले आणि त्यात पाणी टाकून थोड्या शिळ्या चपात्या चुरगळून शेजारी ठेवल्या ...लगेच चिमण्या , कावळे आणि नेहमी येतात ते एकदोन वेगळे पक्षी तिथे पाण्याभोवती आणि अन्नाभोवती जमा झाले !
                           डॉ संध्या राम शेलार .

1 comment:

Rishika said...

लहान मुलांची निरागसता खरंच कधी कधी आश्चर्य वाटायला लावण्यासारखी असते.