या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday, 23 July 2026

तुला पाहिलंय मी!

तुला बाळंत होताना पाहिलंय मी…

सृष्टीच्या कुशीतून सृष्टी जन्म घेताना पाहिलंय मी!

इवल्याशा दुःखाने क्षणभर कोमेजणारी तू…

दुःखांचे डोंगरही कवेत घेऊन उभी राहणारी तू…

तुला पाहिलंय मी! 

अपमानांच्या राशी ओलांडून

मानेला तिरकं करत

मागे पाहणारी तू…

तुला पाहिलंय मी!

असह्य अंधारलेल्या अवकाशातही

ताऱ्यांचा माग घेत चालणारी तू…

तुला पाहिलंय मी!

हतबलतेच्या भोवऱ्यात

पुन्हा पुन्हा गिरक्या घेत,

तरीही नव्याने उभी राहणारी तू…

तुला पाहिलंय मी!

चुलीपासून ताटापर्यंतच्या प्रवासात

भाकरीला मायेचा आकार देणारी तू…

तुला पाहिलंय मी!

संघर्षाच्या वाटेवर

पाय रोवून ठाम उभी राहणारी तू…

तुला पाहिलंय मी!

मरेपर्यंत पदराचा ओलावा

लेकरासाठी जपणारी तू…

तुला पाहिलंय मी!

वेदनांची अनिवार्यता स्वीकारून,

त्यांच्यावरच स्वार होणारी तू…

तुला पाहिलंय मी!

मी पाहिलंय तुला…

वेदनांना नाकारत नाही,

तर त्यांचाच हात धरून

नव्या सृष्टीला जन्म देताना.

आणि मग—

त्या कोवळ्या पालवीकडे

ममत्वाने पाहणारी तू…

तुला पाहिलंय मी!

कारण…

तू फक्त स्त्री नाहीस…

तू वेदनेतून उमलणाऱ्या सृष्टीचं दुसरं नाव आहेस…

  डॉ संध्या राम शेलार.