या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 3 August 2011

वागीन

          ''आये ये आये, सांग ना बापूला मला बी ताईच्या वाणी साळत जायच हाय.''     
          '' आगं पर ती मालकाची पोर हाय, आपून गरीब माणसं सकाळच्याला खाललं तर रात्तच्याला मीळना!''     
          '' ती कवी जाती की ती कुठ लई तालेवाराची लेक हाय.''      
          '' नकु वाद घालू बग माज्यासंगं, उरिक लवकर दुगिनी चार पुती शेंगा काडल्या त चार घम्याली मिळत्यान.''       
            गावात सातविपतुरच शाळा हुती. संगीला तवर शिकावनं बापूला जमलं पण आता इस्टीनि तालुक्याला धाडायच म्हंजी सोपं नव्हत्. त्याला बी वाटायचं पर वाटत् तसं सगळ थोडच हुतं. संगी तशी कळाय लागलं तशी हुशार! कदी तिनी खेळ अन खाण्याचा हट्ट केला नव्हता. जी आसन ती भावंडासनी देणार राहिल तर घेणार. साळत बी नापास कवा झाली नाय. शाळा चालू झाल्याल्या महिना झाला रोज संगी आईला तेच सांगायची. ताराबाईचा नाईलाज हुता.       
            संगी दिसाया निटास, सरळ लांब नाक, कामानिवानी भुवया, तपकिरी डोळ् उभाट चेहरा! उंची कमीच पर पोर बघताच मनात भरणारी! कामाला वागीण जी सांगनार ती काम केलच बगा. सातवीची शाळा बंद झाली न आईनी तिला रानातल्या कामाला न्यायाची चालू झाली. कामाच्या बाया बी सांगायच्या संगीच्या आईला धाड तिला साळला पर संगीच्या आयेची काळजी येगळी हुती आसली देखणी पोर काय बाय येडं वंगाळ झालं म्हंजी? मायचं ती!
            कामाला जायच्या अगुदार शिळीला गवात आणायला संगीच जायाची आईला बी घरातल काम उरकुस्तवर जायाची वेळ व्हायाची. संगीला उशीर झाला घाईतच पळली मालकाच्या ऊसाचा बांध काय नवीन नव्हता. गवतात पाय आडाकला फुड सापदिशी मोठ्या काळ्या दगडाव पडणार की इक्रमनी तिचा हात धरला. दोग धापदिशी माग उसाच्या कटाला पडली.इक्रम्नी तिला लागून दिल नाय  अंगावरच झेलली. तिला काय बी कळायच्या आत त्यान तिला उसात ओढली.
            जागी झाली तवा सगळ्या आंगातून कळा निगल्या आये म्हणायला तोंडातनं सबुद निगणं आवगड झाल्त आयच्या मांडीवरच डोक उचलता उचलत नव्हत आयकड बघितलं डोल्यास्नी लागलेल्या धारा थाबायचं नावच घीनात थोडा जीव शांत झाला. आयेचा आधार घेत उठली पायापातूर रगात बघितलं न तिला काय झालं अंदाज इना निट पायल जी मोटा हंबरडा फोडला कुणाला म्हणूनश्यान ती आवरणा. आई बापू कपाळाला हात लाऊन बसली. गरीब बिचारी आणिक काय करणार हुती!
            पंधरा दिस झालं पर संगी काय हातरून सोडना. कुणी बोलाया लागल तर डोळ्यातून पाणी काढण्यापरीस दुसर काय बी करत न्हवती. डोक्यातून जात न्हव्हत् इक्रमदादान आस कामुन्श्यान करावा. ताई तर सांगायची आपून सगळी बहिण भावंड म्हणून!
           '' संगे, बग कोण आलं हाय, आता तरी बुलशील न्हव''
            ताई आत आली न संगी उठून तिच्या गळा पडून रडाय लागली. सगळी घटना संगीनं ताईसनी सांगितली. तशी रागान लाल झालेली ताई उठून उभी राह्यली,''संगे उगाच दादाच नाव घेऊ नगस, तुमा लोकास्नी खाया घालायचं न तुमी इनाकरण आमची बदनामी नग करूस.''
            कालवा ऐकून संगीची आय आत आली. आज पहिल्यांदाच सगल्यास्नी करणाऱ्याच्या नावाचा उलगाडा झाला पर आईन संगीच्या तोंडावर हात ठिवला. आंजरून गोंजरून निट समजावल. संगीच्या डोक्यात मातूर इक्रम आन ताईसाठी नुसता राग नव्हता तर आग व्हती.
          ''आग संगे घरात बसूनस्यान याड लागल तुला, काम नग करू पर रानात गेल्याव मन तरी रमल.''
          बळ बळ आज आईन तिला बाहेर काढली. रानात गेल्याव गप् बसल ती संगी कसली. मोकळ्या हवत तीच मन बी जरा मोकळ झालं. हातात खुरपं घेऊन ती बी कामाला लागली. आज परत पहिल्यावाणी समद्या बायांच्या फुडं. ताराबाईचा जीव इतक्या दिस उडाला व्हता. फुडं फुडं सरनाऱ्या संगीला बघून तीच डोळ काठापातूर वल व्हयाचं नी परत खुरप्याखालच तन बघत  मातीत मिसाळून जायचं ! 

          '' संगे आग संगे बग तुजी शिळी सुटली पळ लवकर''
          संगी खुरप टाकून धावली. मुकं जनवार दावं सुटल्यावर सगळ्या दिशा त्याच्याच की पिसाटासारखाच उधाळनार बगा. संगी धापा टाकीत बायांपासून लांबवर आली. जोराच्या वाऱ्याला बी आताच टायम गावला वय. ह्या शिळीला आता आशी मारल ना मनाचा नुसता चरफडा होत हुता. ''काय संगे बराय ना, मग काय चाललय आता कवा पडायचं आमच्या अंगावर? चल की आता'' हसत हसत इक्रम एकदम पुढ उभा ठाकला  संगीच्या सगळ्या अंगात दारारून मुंग्या आल्या रेखीव कपाळावर घामाच थेंब गोळा झालं हातपाय धरणीला धरीनात. ''संगे आग संगे काय झालं ग पळाया''  कमळामावशीच्या आवाजानी तीच धडधडणार काळीज थोड हालक झालं. माग बगीतल परत वळूस्तवर जसा आला तसा इक्रम गायब बी झाला. संगीन घाम पुसला नी कमळामावशीच्या मागणं चालू  लागली. 
          आता तिला हे रोजच झालं. एकटी दिसली की तिला गाठायचा नी वाईट वाकड बोलायचा. माणूस तरी सारक कवर जवळ राह्यच. तिच्या डोक्यातल्या आग मातूर आता तिच्याहि आवरन्यापलीकडे गेली . ह्या इक्रमनी मला डागाळली तरी त्याच मन भरना माजा जीव बी घेणार हाय का आता? आईला सांगावा तर ती बी गप् बस म्हणल. ह्याला धडा शिकवायला पायजेनच. पर त्याला शिव्या देऊन्बी लाज वाटणा. परत कुत्र्यासारका माग पुड हायच.
         ह्या वाऱ्याला काय मरी आली उठल्यापासून भना भना करतुया. आईलाबी ना कवा टायमात काम उरकायला जमल नाय. बाया न्ह्यारिला यीतील तरी हि घरची हलायची नाय. बस तशीच मी जात्ये आता! कवा कडवळ कापून व्हायचं परत खुरपायला बी जायचं हाय.   
इळयाला धार लावली झपा झपा पावलं टाकीत निगाली कडवाळाच्या रानात. भर भर  विळा चालू लागला निम्मा वाफा झाला नी मागण कवळ कमरेला पडली. झिडकारल तरी कवळ काय सुटना. तीन इक्रमचा स्पर्श वळाकला तिच्या डोक्यातली आग भडकली खापदिसी काय कळायच्या आत तीन इळा त्याच्या हाताव मारला. आज ह्याला नाय सोडणार! कमरची मिठी सैल झाली हात दाबीत त्यो खाली वाकला न संगीन सपा सपा इळयांनी जमल तिथ वार केला. रगताच्या चिळकांडया उडून तीच त्वांड लाल झालं पर ती थांबायच नाव घेत नव्हती. इक्रामच्या आरोळ्या ऐकून समदी कामाची मजूर पळत आल एकान संगीचा हात धरला न इळा काडून घेतला इक्रामच धड निपचित वाफ्यात पडल आन संगी आरडत व्हती.
                            '' वागीन हाय वागीन, त्या कुत्र्यासारका मागून वार करीत नाय फुडून चिरते!''    

No comments: