या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday 19 August 2011

पठ्ठी

   ''मरण येत नाही, म्हणून जगतेय!'' असे वाक्य अनेकांच्या तोंडी येत. खरोखर ते हतबल असतात का ? जगणं इतकं अवघड असू शकतं ? तसं पाहिलं तर कितीसं दु:ख आपण सहन करत असतो! कदाचित हो कदाचित नाही! दु:ख असताना मृत्यू कवटाळंण जितकं सोपं तितकं ते पार करून जाण अवघड! आणि ज्याला अवघडाची आस तो माणूस! मग आपण माणूसपण कस सोडू शकतो ? ज्या स्रिया पोटच्या पिलाला आपल्याबरोबर बळी द्यायला तयार होतात त्यांच्यासाठी............
     मळलेले कपडे पण वास न येणारे, केस विंचरलेले चेहरा काळाच पण धुतलेला, पदर खांद्यावर पण पूर्ण छाती पूर्णपणे न झाकणारा, मांडीवरची पोर साधारण पाच सहा महिन्याची. जवळच पाच वर्षाची दुसरी पोर. ''नंबर आला तुमचा चला ताई'' गडबडीने उठून आत केबिन मध्ये गेली. डॉक्टरांनी तपासून औषधे लिहून दिली अन ती बाहेर आली. ''औषध निम्मीच का आणलीत ताई?'' ''पैसा कमी हाय'' ''मग डॉक्टरांना सांगा'' ती परत आत गेली. 
     ''सगळी औषध घेतली नाहीस तर तुझ बाळ कस नीट होणार ताई? आधीच ते जास्त आजारी आहे, त्याला औषध लागतीलच.'' डॉक्टर.
     ''काय करू ताई, आठ दिसाच खाय प्यायचं सामान  भरून जे बाकी राह्यलं तेच्यामंदी हीच औषध आली''  
     ''तुझा नवरा कुठाय, बोलव त्याला'' 
     ''ताई हि पोरगी झाली त्यो मला सोडून गेला दुसरी बाई घेऊन, मी बा जवळ हाय तिथबी साव्तर आय हाय, उसतोडीच काम त्येंच्या संग करते, ती म्हणती दवा पाण्याला कुठून पैसा देऊ तीन पोर आन चौथी मी त्ये खायला तरी किती जनस्नी देणार आन त्यावर दवा म्हंजी लई झाल. आठ दिस झाल पोर आजारी हाय, आज पैस दिलं म्हणून आले.'' 
       डॉक्टरांना कससच झाल नि त्यांनी त्यांच्या जवळची औषधे त्या बाईला दिली.
    ''फी देऊ नको बाहेर मी सांगते त्यांना.''
    ''लई उपकार झाल ताई''
    ''मुलींच्या शिक्षणाचं काय'' दयेपोटी डॉक्टरांनी चौकशी केली.
    '' त्ये कस जमल ताई? आमी आठ नऊ महीन इकडच असतु. माझ्या या मोठ्या पोरीला आश्रम शाळेत घेतील काव ताई?''
    ''घेतील ना ती सहा वर्षाची होऊ दे नंतर टाक आश्रम शाळेत.''
     ती बाहेर गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात डॉक्टर म्हणाले ''पाठ थोपटली पाहिजे पठ्ठीची! अवघडलेल जगण तिनी सोप केलय!''   

2 comments:

Pravin said...

छान पोस्ट! तुम्ही खूप छान आणि नेमके लिहिता.शुभेच्छा!

सौ गीतांजली शेलार said...

dhanyawad pravin!