या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday 8 September 2011

देवदूत

 गाठ मग ती शरीराच्या कुठल्याही भागात असो मनपटलावर एक भीतीची लकेर उमटवून जाते. असाच प्रसंग काल  परवा मीही अनुभवला. कॅन्सर विषयी भीती सर्वांच्या मनात असते आणि तस काही आपल्याला होऊ शकत अशी जाणीव जरी झाली तरी मन सैरभैर होऊन जात सगळ जग अचानक भकास वाटू लागत, जीवनात भरलेला सुगंध अचानक वार्याच्या झोताबरोबर उडून जातो. असा प्रसंग शत्रूलाही लाभू नये इतपर्यंत भावना मन व्यापून टाकतात.
   वीस दिवस झाले असतील साधारण एकाएकी एक गाठ जाणवली. वेदना नव्हती पण गाठ तशी मोठी होती . आता कळली किती दिवसापासून असेल सांगण जरा कठीणच कारण वेदना नव्हती . चाचपून पाहिलं इतर ठिकाणी हलत होती पण खालच्या बाजूने चिकटलेली भासली.दहा दिवस थोडीफार औषधे घेऊन बघितली पण काहीच फरक नाही मग डॉक्टरांना दाखवायचं ठरलं वेळे प्रमाणे रुबी हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागात पोहचलो डॉ अनुपमा माने यांना दाखवायचं ठरलं डॉ बाह्य रुग्ण तपासणी विभागात होत्या माझ्या अगोदर एक आजी होत्या कदाचित त्यांच्या त्या जुन्या पेशंट असतील. डॉ बाहेर आल्या त्या आजींची स्मित करत विचारपूस केली अर्ध्या तासात परत येते ऑपरेशन आहे सांगून निघून गेल्या . वेळ लागेल म्हणून चौफेर नजर फिरवली . एक मुलगी तिच्या आई वडिलांसोबत होती डोक्याला भुवयांना अजिबात केस नव्हते कदाचित किमो थेरपी चालू असावी आई वडील तिला हव नको ते विचारत होते पण चैतन्य हरवलेला तिचा चेहरा अंगावर शहारे उभे करत होता! माझ्या ह्यांनी हि गोष्ट ओळखली आणि ते माझ मन त्यांच्या बोलण्यात गुंतवण्याचा असफल प्रयत्न करू लागले!                                                                                
    तिच्या शेजारी एक जोडप बसलेलं यजमान एकदम शरीराने मनाने खचलेले आणि शेजारी बसलेली बायको डोळ्याच्या कडेपर्यंत आलेले अश्रू गालावर ओघळू न देण्याच्या असफल प्रयत्नात! काही लोकांच्या चेहऱ्यावर नीट झाल्याच समाधान आणि काहीतरी अवयव गमावल्याच दु:ख दोन्ही भावना एकत्रित लपंडाव खेळताना! कुणाच्या नाकात असलेली नळी काहींना त्यांच्या पासून किळस आल्यामुळे दूर बसण्यासाठी प्रेरित करत होती त्याच वेळी माझ मन मात्र यांचे आता किती दिवस राहिले असतील या विचाराने गर्भ गळीत झालेले! मन खिन्न होत आज मी सुपात असेल नि उद्या या जात्यात आले तर ? शरीरात एक वेदना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत विजेसारखी चमकून गेली डोळे मिटून मी यांचा हात पकडला. 
  आमचा नंबर आला आत जाताच एका गोड स्मितहास्याने डॉक्टरांनी आमच् स्वागत केल . माझ्या थोडा जीवात जीव आला . त्यांनी शांतपणे सर्व रिपोर्ट पहिले नि काही प्रश्न विचारले त्या मधेच स्मित करत शांतपणे विचारत होत्या . माझ्या मनावरचा ताण हळू हळू कमी होत होता . तपासून झाल्यावर त्यांनी विशेष नाही यावर शिक्कामोर्तब केल पण भविष्यात त्रास नको म्हणून काही तपासण्या करून आपण ती गाठ काढून टाकू असा सल्ला दिला. त्यांनी जराही न वैतागता (नाही तर काही डॉक्टरांना प्रश्न विचारणारे पेशंट नको असतात ) अगदी प्रेमाने प्रत्येक शंकेच निरसन केल.दोन दिवसापूर्वी आम्ही ती गाठ काढून टाकली . आज मन आणि शरीर या दोनही वरचा ताणरूपी पडदा हटला आहे . मन प्रसन्न आहे. याच सर्व श्रेय जात माझ्या अस्थिर मनस्थित साथ देणाऱ्या माझ्या यजमानांना, माझ्या कुटुंबियांना आणि देवदूत होऊन भेटलेल्या डॉ अनुपमा माने यांना! डॉ मानेन सारखे देवदूत माझ्या सारख्या संभ्रमात असणाऱ्या प्रत्येक पेशंटला भेटोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !   

No comments: